हौतात्म्य

hutatma1

लवकरच येणार असलेल्या हुतात्मा दिनानिमित्य काही विचार

चार वर्षांपूर्वी प्रजासत्ताक दिनानिमित्य झी मराठी वाहिनीवरील सारेगमप लिटल् चँप्स कार्यक्रमात ‘शूरा मी वंदिले’ हा अप्रतिम असा भाग सादर केला गेला. पं.हृदयनाथ मंगेशकर यांनी शूरवीरांच्या जीवनकार्याशी संबंधित अशी निवडक गाणी लहानग्या मुलांकडून छान बसवून घेतली होती. या भागातील प्रत्येक गाण्यासंबंधी महत्वाची माहिती स्वतः पं.हृदयनाथ मंगेशकर यांनी मोजक्या वाक्यांत दिली. त्यांचे ते निवेदन निव्वळ अप्रतिम होते. संगीतक्षेत्रावरील त्यांचे प्रभुत्व माहीत होतेच, त्यांचा अगाध व्यासंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा त्यांनी केलेला सखोल अभ्यास, तसेच मराठी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व हे सगळेच विस्मयकारक होते. अशा प्रकारचा कार्यक्रम क्वचितच पहायला मिळतो.

‘सरणार कधी रण प्रभु तरी’ या कविवर्य कुसुमाग्रजांच्या अजरामर कवितेचा समावेश या कार्यक्रमात केला होता. नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनाच्या अंतिम क्षणी त्यांनी परमेश्वराला उद्देशून काय म्हंटले असेल अशी कल्पना करून कुसुमाग्रजांनी ती भावना या कवितेत शब्दबध्द केली आहे. यासंबंधी माहिती देतांना पं.हृदयनाथ मंगेशकर यांनी प्रेक्षकांना थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नेले.

अफजलखानाच्या वधाने संतापलेल्या आदिलशाहीने त्याचा मुलगा फाजलखान आणि अनुभवी सरदार सिद्दी जौहर यांच्या अधिपत्याखाली प्रचंड फौजफाटा देऊन आक्रमण केले. त्या वेळी शिवाजी महाराजांचे वास्तव्य कोल्हापूरच्या जवळ पन्हाळ्यावर होते. आदीलशाही फौजेने त्या गडाला चारी बाजूंनी वेढा घातला आणि गडावरील लोकांचा कोंडमारा केला. नेहमीप्रमाणे घोड्यावर स्वार होऊन किल्ल्याच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडणे म्हणजे आयते शत्रूच्या हातात सापडणे झाले असते. त्यामुळे संधीची वाट पाहून शत्रूच्या हातावर शिताफीने तुरी देऊन निसटून जाणेच त्या परिस्थितीमध्ये आवश्यक होते.

पावसाळ्यातील एका अंधारी रात्रीच्या काळोखात बरोबर निवडक साथीदारांना घेऊन शिवाजी महाराज गडाच्या एका गुप्त मार्गाने गुपचुपपणे गडाबाहेर निघाले आणि धो धो कोसळणा-या पावसात गुढघाभर चिखल तुडवीत कांट्याकुट्यांनी भरलेल्या घनदाट जंगलातून मार्ग काढीत विशाळगडाच्या दिशेने निघाले. नरवीर बाजीप्रभू देशपांडे त्यावेळी त्यांच्यासोबत होते. सर्व दक्षता बाळगूनसुध्दा दुष्मनाला त्याचा सुगावा लागला आणि मोठी फौज घेऊन त्याने महाराजांचा पाठलाग सुरू केला. घोडखिंडीच्या जवळ आल्यावेळी ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या लक्षात आली आणि त्यांनी येऊ घातलेल्या बिकट प्रसंगाला धैर्याने तोंड द्यायचे ठरवले. पण बाजीप्रभूंनी वेगळा विचार करून महाराजांना सांगितले, “मी आपला सेवक असलो तरी आजचा दिवस धन्याने सेवकाचे ऐकले पाहिजे. तेंव्हा आपण त्वरेने विशाळगडाकडे कूच करावे. मी गनीमांना या खिंडीत रोखून धरतो. मात्र विशाळगडावर पोचताच आपण तोफेचे पाच बार काढून सुखरूपपणे पोचल्याचा संकेत तेवढा माझ्यासाठी द्यावा.”

या प्रमाणे बाजीप्रभूंनी आपल्याला मागे सोडून शिवाजी महाराजांना पुढे जायला भाग पाडले आणि शत्रूचा मुकाबला करण्यास सज्ज होऊन ते खिंडीत दबा धरून थांबले. खिंडीमधून जाणारी वाट अरुंद असल्यामुळे शत्रूच्या मोठ्या फौजेतील सगळ्यांनाच त्यातून एकाच वेळी पुढे जाणे शक्य नव्हते. यामुळे जी तुकडी पुढे आली तिच्यावर बाजीप्रभूंनी हल्ला चढवला. त्यातले कांही गारद झाले, कांही परत फिरले असतील, पण कोणीही पुढे मात्र जाऊ शकला नाही. ते पाहून मागून येणा-या फौजेतले सैनिक थबकले. पुन्हा पुन्हा जमवाजमव करून वेगवेगळ्या शस्त्रांनिशी वेगवेगळे डावपेच रचून ते हल्ले करत राहिले आणि बाजीप्रभू आणि त्यांचे शूर साथीदार त्यांना निकराने झुंज देऊन ते हल्ले परतवत राहिले. अशा प्रकारे ही हातघाईची लढाई थोडा थोडका वेळ नव्हे तर तब्बल दहा तास चालली होती कारण निबिड अरण्यातून आणि चिखलातून अंधारात अंदाजाने वाट काढीत विशाळगडापर्यंत पोचल्यावर तो चढून वर जाऊन तोफांचे बार भरून ते उडवायला शिवाजी महाराजांना वेळ लागणारच होता. त्यातही त्यांचे हे येणे अचानक झाल्यामुळे त्यांना तेथे पोचण्यापूर्वी आपल्याच माणसांच्या विरोधालाही तोंड द्यावे लागले होते. एवढा वेळ चाललेल्या लढाईत बाजींचे साथीदार हताहत होऊन त्यांची संख्या कमी कमी होत होती, त्यांना अन्नपाण्याविना लढत राहणे भाग होते, उलट शत्रूकडून ताज्या दमाचे नवे लढवय्ये नव्या शस्त्रास्त्रांचा उपयोग करून वाढत्या संख्येने हल्ला करत होते. तरीसुध्दा तलवारीच्या युध्दात बाजीप्रभू कोणाला जुमानत नाहीत हे पाहून त्यांच्यावर भाले बरच्या फेकल्या गेल्या. त्यातले कांही घाव त्यांनी शिताफीने चुकवले तर कांहींनी त्यांना घायाळ केले. अंगाची चाळण झाली तरीही ते खंबीरपणे उभे राहून कोणालाही खिंडीतून पार जाऊ देत नव्हते. अखेरीस त्या काळात दुर्मिळ असलेली बंदूक घेऊन खास बंदूकधारी शिपाई आला. त्याने उंचवट्यावर उभा राहून नेम धरून बंदुकीच्या गोळ्या बाजीप्रभूंच्या दिशेने झाडल्या. त्या वर्मी बसून ते निरुपाय होऊन खाली कोसळले.

आता त्यांच्या अंगात लढण्याचे त्राण उरले नव्हते. शरीराचे अंगांग विच्छिन्न झाले होते. त्यांना विकलांग अवस्थेत पाहून निर्दयी शत्रूसैनिक त्यांच्यावर प्रहार करतच होते. हे सगळे सहन करत शिवरायांच्या तोफांचे बार ऐकण्यासाठी त्यांचे पंचप्राण त्यांच्या कानात गोळा झाले होते. अशा विकल अवस्थेत त्यांनी परमेश्वराला काय आवाहन केले असेल याची कल्पना करून ते भाव ‘सरणार कधी रण प्रभु तरी’ या गाण्यात कुसुमाग्रजांनी विलक्षण प्रभावी शब्दात व्यक्त केले आहेत. “लवकर ते खुणेचे बार मला एकदाचे ऐकव आणि या कष्टमय अस्तित्वातून कायमचे मुक्त कर ना. तो क्षण तू लवकर कां आणत नाही आहेस?” असे ते प्रभूला विचारत आहेत. यथावकाश शिवाजी महाराज गडावर पोचल्याचे तोफांचे बार कानावर पडले आणि तत्क्षणी नरवीर बाजीप्रभूंनी समाधानाने प्राण सोडला. त्यांच्या या असामान्य पराक्रमाने ती जागा पावन झाली म्हणून ती पावनखिंड या नांवाने ओळखली जाऊ लागली आणि बाजीप्रभूंचे नांव इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले.
—————————-

उत्तरार्ध

नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची शौर्यगाथा ऐकतांना त्यातले तीन देदिप्यमान असे पैलू मला जाणवले. त्यांनी केलेला अलौकिक त्याग हा पहिला पैलू. प्राणापेक्षा अधिक अनमोल असे कांहीही आपल्याकडे नसते, त्यामुळे प्राणार्पण हा सर्वश्रेष्ठ त्याग ठरतो.

जे लोक दुःखातिरेक, संकटाचे भय, मानसिक धक्का अशा कारणाने आत्महत्या करतात त्यांच्या मनात समर्पणाची भावना नसते, ते त्यांचे मानसिक दौर्बल्य असते. सारेच सैनिक स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता रणांगणावर जातात तेंव्हा पराक्रम गाजवून विजयी होऊन परत येण्याची ऊर्मी त्यांच्या मनात असते आणि युध्दात ज्यांचा विजय होतो त्यांना विजयाचा उन्माद अनुभवायला मिळतो. कांही प्रसंगी पराभूत पक्षसुध्दा माघार, पलायन, तह, खंडणी, शरणागती, मांडलिकत्व वगैरेतल्या एकाद्या मार्गाने जिवानिशी आपली सुटका करून घेतो. त्यामुळे सैनिकांच्या मनात त्यागभावनेच्या जोडीला विजयलालसा तसेच भविष्यकाळाची स्वप्ने असू शकतात. पण बाजीप्रभू ज्या परिस्थितीतून जात होते त्यात या कशालाही वाव नव्हता. संतप्त झालेला बलाढ्य शत्रू त्यांच्यावर चालून येत होता. लढाईत त्याचा पराभव करणे केवळ अशक्य होते, तसेच तो कोणाचीही गय करणार नाही याची खात्री होती, बाजींना आपली जागा सोडून पळायचे तर नव्हतेच. त्यामुळे त्यांचा मृत्यू निश्चित होता. अशा प्रकारे एका उदात्त ध्येयासाठी साक्षात मृत्यूला आपण होऊन कवटाळणे ही त्यागाची अगदी परिसीमा झाली यात संशय नाही.

या प्रसंगी बाजीप्रभूंनी दाखवलेले धैर्य, शौर्य, युध्दकौशल्य, समयसूचकता वगैरे सर्व गुण एकमेकांशी निगडित असल्यामुळे त्यांचा एकत्र विचार केल्यावर हा बाजींच्या गाथेचा हा दुसरा पैलू त्यानी केलेल्या असीम त्यागापेक्षाही कांकणभर अधिक चमकदार वाटतो. साधारण माणूस मरणाच्या भीतीनेच गांगरून गर्भगळित होतो, त्याच्या हांतापायातल्या संवेदना नाहीशा होतात. कितीही उसने अवसान आणले तरी अशा प्रसंगी तो आपल्या पूर्ण सामर्थ्यानिशी उभा राहू शकत नाही. बाजीप्रभू मात्र स्वतः मरणाच्या दाढेत असतांना आणि सभोवार मृत्यू थैमान घालतांना दिसत असतांनासुध्दा आपले मनोधैर्य टिकवून अत्यंत शातपणे पण खंबीरपणे सर्व शक्ती पणाला लावून चिकाटीने प्रतिकार करत राहिलेच, अतुलनीय असे शौर्य गाजवून पुढे पाऊल टाकणा-या प्रत्येक गनीमाला नामोहरम करून लोळवत राहिले. त्यांच्या जागी दुसरा एकादा वीर असता आणि तो पराक्रमामध्ये अगदी किंचित जरी उणा पडला असता तर ताकतवान शत्रू कदाचित त्याच्यावर मात करून पुढे गेला असता. तसेच त्याने उतावीळ होऊन त्वेषाने शत्रूवर चाल केली असती तर त्यामुळे शत्रूसेनेची कदाचित जास्त हानी केली असती, पण उरलेले सैन्य खिंड पार करून पुढे जाऊ शकले असते. बाजीप्रभूंनी मात्र अनुकूल भौगोलिक स्थिती निवडून तिचा पुरेपूर वापर करून घेऊन शत्रूला खिंडीच्या पलीकडे थोपवून धरण्यात आपला अनुभव आणि युध्दकुशलता यांचा प्रत्यय आणून दिला.

पहिल्या दोन महत्वाच्या पैलूंमधून तिसरा महत्वाचा पैलू निर्माण झाला, तो म्हणजे त्यांनी आपले मर्यादित उद्दिष्ट निश्चित केले आणि त्याची मनोभावाने यशस्वीरीत्या पूर्तता केली. पावनखिंडीत झालेले युध्द जिंकणे त्यांना अशक्यच होते आणि अखेरीस त्यात त्यांचा पाडाव होऊन ते धारातीर्थी पडले असे असले तरी एकंदरीत त्यात त्यांचा विजय झाला असेच म्हणावे लागेल. शत्रूसैन्याला कांही काळापर्यंत खिंडीतून पलीकडे जाऊ द्यायचे नाही आणि त्या योगे शिवाजी महाराजांना सुखरूपपणे विशाळगडावर पोचण्यासाठी जेवढा अवधी लागणार होता तेवढा वेळ ती खिंड लढवून त्यांच्या प्राणांचे रक्षण करायचे एवढाच हेतू बाजीप्रभूंनी मनात धरला आणि तो पूर्णपणे साध्य केला. त्यामुळे पुढे शिवाजी महाराजांनी पराक्रम गाजवून हिंदवी स्वराज्याची उभारणी करून जगाच्या इतिहासाला वेगळे वळण लावले. या मोठ्या कार्याच्या उभारणीच्या पायामध्ये बाजीप्रभूंचा त्याग आणि पराक्रम याचा महत्वाचा वाटा आहे. इतिहास नेहमी विजयी वीरांच्या बाजूने असतो असे कांही लोक म्हणतात. प्राचीन काळात होऊन गेलेल्या एकाद्या अप्रसिध्द राहिलेल्या प्रसंगी कोणा अनामिक स्वामीभक्त सेवकाने अलौकिक असा त्याग आणि शौर्य एकादे वेळी कदाचित दाखवलेही असले तरी जर तो त्यात यशस्वी झाला नसला तर त्याची यशोगाथा लिहायलाही कोणी शिल्लक राहिला नसण्याची शक्यता आहे.

हुतात्मा हा शब्द संस्कृत भाषेतला असला तरी पौराणिक व ऐतिहासिक कथांमधील व्यक्तींच्या संदर्भात मी तो ऐकलेला नाही. तरीही “हुतात्म्यांनी केलेले बलिदान” हा शब्दप्रयोग वाचतांच नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचे उज्ज्वल उदाहरण माझ्या डोळ्यांसमोर येते आणि आजच्या युगातील हुतात्म्यांचा त्याग, निष्ठा, कार्य आणि त्याची परिणती यांची बाजीप्रभूंचे बरोबर कळत नकळत तुलना होते. आपण स्वतः आणि आपले कुटुंबीय यांच्या कल्याणाचा विचार मनात न आणता आणि कोठल्याही वैयक्तिक लाभाची यत्किंचित अभिलाषा मनात न बाळगता ज्या देशभक्तांनी स्वातंत्र्याच्या समरांगणात उडी घेऊन आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांची नांवे प्रातःस्मरणीय ठरतात. देशाच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी लढतांना ज्यांना वीरगती प्राप्त झाली त्या सैनिकांपुढे आदराने मान लवते. दहशतवादी, नक्षलवादी, फुटीरवादी आदी विध्वंसक प्रवृत्तींचे बरोबर लढतांना ज्यांना प्राण वेचावे लागले त्यांच्याबद्दल देखील मनात हीच आदराची भावना उठते. मात्र देशभक्तीच्या उदात्त भावनेखेरिज कांही ऐहिक उद्देशांचा विचार करून या लोकांनी जिवाला धोका असलेला आपला पेशा निवडलेला असतो हा त्यांच्यात आणि स्वातंत्र्यसैनिकात लहानसा फरक आहे. यामुळे त्यांच्या बलिदानाचे मोल कमी ठरत नाही, पण निदान अल्प प्रमाणात तरी त्यांच्या कुटुंबीयांची काळजी सरकार व समाजातर्फे घेतली जातेच.

यातला अपवादात्मक एकादा माणूस त्याचा स्वतःचा नाकर्तेपणा, गलथानपणा, संधिसाधू वृत्ती अशा गुणांमुळे गोत्यात येऊन बळी पडल्याचे समोर आले तर त्याच्या जागी दुसरा सक्षम अधिकारी असता तर वेगळे चित्र पहायला मिळाले असते असे वाटून जाते. देशांतर्गत हिंसाचारात अनपेक्षित रीत्या योगायोगाने सांपडलेल्या माणसांच्याकडून त्यागाची, समर्पणाच्या भावनेची अपेक्षाच नसते. त्यांच्या दुर्दैवाच्या कहाण्या ऐकून वाईट वाटते, पण मला ते हौतात्म्य वाटत नाही. जे लोक केवळ उत्सुकतेपोटी नको त्या जागी जातात आणि तिथे चाललेल्या धुमश्चक्रीमध्ये नाहक प्राणाला मुकतात, त्यांची खरे तर कींव येते. धर्म, जातपात, भाषा, प्रांत, मजूरांचे हक्क आदी कारणे पुढे करून जे लोक स्वतःच हिंसाचार सुरू करतात आणि त्यात त्यांचाच बळी पडला तर त्यांच्याबद्दल फारशी सहानुभूतीदेखील वाटत नाही. पण काही संधीसाधू मंडळी या सगळ्यांचा समावेश हुतात्मा या नावाखाली करतांना दिसतात.

अशा वेगवेगळ्या प्रकाराने अकाली मृत्यूमुखी पडलेल्या सगळ्या लोकांना सरसकट ‘हुतात्मा’ असे संबोधून त्यांचा गौरव व्हायला लागला तर हौतात्म्याच्या संकल्पनेचे अवमूल्यन होईल. तसे करण्यापूर्वी सुबुध्द माणसांनी थोडा विवेक बाळगावा आणि हुतात्मा ही संज्ञा विचारपूर्वक द्यावी, तसेच कोणीही कोणाच्याही हौतात्म्याचे आपल्या लाभासाठी भांडवल करू नये असे मला वाटते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: