न्यूयॉर्कची सफर – ५ मॅनहॅटन

न्यूयॉर्कदृष्ये

नील आर्मस्ट्राँग आणि एड्विन आल्ड्रिन जेंव्हा चंद्रावर जाऊन उतरले होते त्यावेळी त्यांचे साथीदार एका यानातून चंद्राभोवती घिरट्या घालत होते. दोघा चांद्रवीरांनी चंद्रावरचे काम आटोपल्यानंतर ते या यानात परत गेले आणि त्यातून पृथ्वीवर परतले. त्याचप्रमाणे आम्हा पाहुण्यांना लिबर्टी आयलंडवर पाठवून सौरभ आणि सुप्रिया न्यूयॉर्क शहरात भटकंती करत होते आणि आम्ही त्यांचेबरोबर मोबाईलवर संपर्क साधून होतो. त्यामुळे एलिस आयलंड पाहून आम्ही परत येईतोपर्यंत ते आमच्या स्वागतासाठी बॅटरी पार्कमध्ये येऊन पोचले होते. दिवस मावळण्यापूर्वी न्यूयॉर्क शहराचे अवलोकन करण्यासाठी दीड दोन तास वेळ होता. त्या वेळात न्यूयॉर्कच्या हृदयात (हार्ट ऑफ दि सिटी) मध्ये पायी पायी फिरत राहिलो. रविवारचा सुटीचा दिवस असल्यामुळे कामासाठी त्या भागात येणा-या लोकांची वर्दळ नव्हती. हा अनुभव आपल्याला मुंबईच्या फोर्टमध्येसुध्दा रविवारी फिरतांना येतो. हंसतखिदळत गटागटाने पायी चालणारे बहुतेक लोक पर्यटकच असावेत आणि न्यूयॉर्कचा अजूबा डोळेभर पाहून थक्क होण्यासाठीच तिथे आले असावेत हे त्यांच्या देहबोलीवरून स्पष्ट होत होते. त्यातले निदान निम्मे तरी चिनी किंवा भारतीय वंशाचे म्हणजे आशियाई होते.

मॅनहॅटन म्हणजे दाटीवाटीने उभ्या असलेल्या उंचच उंच गगनचुंबी इमारतींची भाऊगर्दी हे चित्र मी लहानपणापासून पहात आलो होतो आणि अनेक इंग्रजी सिनेमात पाहिले होते. कफपरेड आणि नरीमन पॉइंटला उभ्या असलेल्या त्याच्या संक्षिप्त आवृत्त्या मुंबईत पाहिल्या होत्या. तरीसुध्दा न्यूयॉर्कला प्रत्यक्ष गेल्यावर तिथे आजूबाजूला दिसलेले काँक्रीटच्या जंगलाचे दृष्य विस्मयचकित करणारेच होते. फिरतांना डोक्यावर टोपी किंवा कॅप घातली असती तर ती एका हाताने धरूनच ठेवावी लागली असती. फिरत फिरत ज्या जागी एके काळी वर्ल्ड ट्रेड टॉवर्स उभे होते त्या जागी गेलो. ती रिकामी जागा पाहून ११ सप्टेंबरची आठवण जागी झाली. जवळ जवळ उभ्या असलेल्या त्या गगनचुंबी इमारती छायाचित्रात पाहून जर त्यातली एक इमारत बाजूला कलंडली तर स्टँडवर एकाला लागून एक उभ्या केलेल्या सायकली पडत जातात त्याप्रमाणे ओळीने त्या सगळ्या इमारती कोसळत जातील असे मला वाटायचे. उभा केलेला खांब त्याला बाजूने धक्का दिल्यास आडवा होतो त्याचप्रमाणे समुद्रावरून येऊन विमानाने आडवी धडक दिल्यास ११० मजल्यांच्या या उत्तुंग इमारती आडव्या पडून मागच्या बाजूच्या उंच इमारतींना पाडत जातील असे कदाचित हे कृत्य करणा-या आत्मघातकी अतिरेक्यांनासुध्दा कदाचित वाटले असेल. पण ११ सप्टेंबरला वर्ल्ड ट्रेड टॉवर्सचे दोन मनोरे कोसळून जागच्या जागीच त्यांचे ढिगारे झाले. या इमारतींचे डिझाईन करतांनाच त्यांचे लहान लहान तुकडे होऊन ते जागच्या जागीच पडावेत अशी योजना केली होती. हे दृष्य टेलीव्हिजनवर पाहून आधी तर आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नव्हता. पण पुढे तीच चित्रे पुनःपुन्हा दिसत राहिली आणि स्मरणात कोरली गेली. तो धक्का आणि ढिगाराच प्रचंड असल्यामुळे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या आवारातल्या इतर इमारती तेवढ्या जमीनदोस्त झाल्या. पण आजूबाजूच्या इमारती शाबूत राहिल्या. न्यूयॉर्कला गेल्यावर आम्ही त्या जागी मोकळी जागा पहात होतो. त्या जागेवर नव्या बांधकामाला सुरुवात झाल्याच्या खुणा दिसत होत्या. लवकरच त्या जागी पहिल्याहून अधिक भव्य आणि देखण्या गगनचुंबी इमारती उभ्या राहतील आणि माणसांनी गजबजून जातील. गतस्मृतींना ताज्या ठेवण्यासाठी ११ सप्टेंबरचे एक स्मारक देखील बांधण्यात येत आहे. (ही चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आता तिथे नव्या टोलेगंज इमारती उभ्या राहिल्या आहेत.) अर्थातच त्याचेसुध्दा व्यापारीकरण होऊन त्यातून गडगंज माया निर्माण केली जाईल हे ओघाने आलेच.

तिथून आम्ही फिरत फिरत अमेरिकन कुबेरांच्या राजवाड्याच्या भागात आलो. न्यूयॉर्कच्या या लहानशा भागातून अमेरिकेचीच नव्हे तर सगळ्या जगाची आर्थिक सूत्रे हलवली जातात असे समजले जाते. वॉल स्ट्रीटवरील बाजारात समभागांचे भाव वधारले किंवा कोसळले तर त्याचा परिणाम टोक्योपासून लंडनपर्यंत मुंबईसकट सगळ्या शेअरबाजारांवर होतो. मध्यंतरीच्या काळात अमेरिकन बँकांनी आपला व्यवसायाचा व्याप वाढवण्याच्या उद्देशाने घराच्या तारणावर भरमसाट कर्जे वाटण्याचा सपाटा चालवला होता. सुलभरीत्या मिळालेल्या कर्जामधून कोणीही घर विकत घ्यावे, याच कारणाने मागणी वाढल्यामुळे त्याची किंमत वाढली की त्या तारणावर जास्त कर्ज मिळायचे. अशा रीतीने घरांच्या किंमती आणि त्यासाठी होणारा कर्जपुरवठा या दोन्ही गोष्टी आभाळाळा भिडू लागल्या होत्या. पण हा फुगा केंव्हाही फुटण्याच्या तयारीत होता. कांही लोकांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरणे आर्थिक मंदीमुळे कठीण होऊ लागले. घरांच्या किंमतीत सतत होणारी वाढ पाहून यापासून अनार्जित धनार्जन करण्याचा विचार अनेकांनी केला होता. त्यांना ते कर्ज हप्त्याहप्त्याने फेडायचे नव्हतेच, थोड्या दिवसांनी ते घर विकून त्यापासून फायदा मिळवण्याच्या इराद्याने त्यांनी कर्ज काढून त्याची खरेदी केली होती. पण आता त्यांनी विकायला काढलेल्या घरांना जास्त किंमत देणारे गि-हाईक मिळेनासे झाले. मागणीपेक्षा पुरवठा अधिक असल्यामुळे घरांच्या किंमती आणखी खाली आल्या. त्याचा परिणाम गहाण ठेवलेल्या तारणाची किंमत कमी होण्यात झाला आणि गहाण ठेवलेल्या घराचा लिलाव करून त्यातून कर्जाची रक्कम मिळणे अशक्य झाले.. पैशाची व्यवस्था होऊ शकत असली तरी ते पैसे बँकेत भरून आपले पहिले घर सोडवून घेण्यापेक्षा तेवढ्याच पैशात दुसरीकडे जास्त चांगली जागा विकत घेणे शक्य झाले. दिलेले कर्ज वसूल न होऊ शकल्यामुळे बँका अडचणीत सापडल्या. त्यामुळे बँकांच्या ठेवीदारांनी आपले पैसे काढून घ्यायला सुरुवात केल्यानंतर तर त्यांना दिवाळखोरीतच जावे लागले. बँकांकडून इतर क्षेत्रांना मिळणारा अर्थपुरवठा कमी झाला. यावर उपाय म्हणून अमेरिकन सरकारने अनेक पॅकेजेस आणली तरीसुध्दा याचा फटका भारतासकट जगभरातल्या अर्थकारणाला बसलाच.

न्यूयॉर्कच्या फायनॅन्स डिस्ट्रिक्टध्ये फिरतांना या गोष्टी आठवणारच. या बाबतीतले अनेक निर्णय त्या भागातील उंच इमारतींमधील ऑफीसांच्या बंद खलबतखान्यात घेतले असतील, पण तशी पुसटशी जाणीवसुध्दा रस्त्याच्या फूटपाथवरून चालतांना येणे शक्य नव्हते. या भागात कांही उत्तुंग गगनचुंबी अवाढव्य इमारती आहेत, त्याचप्रमाणे जुन्या काळातील युरोपियन वास्तुशिल्पाची आठवण करून देणा-या कमानी आणि खांब वगैरेंनी नटलेल्या भव्य वास्तूसुध्दा आहेत. त्यांच्या दर्शनी भागात विविध प्रकारचे पुतळेही उभे केलेले आहेत. वॉल स्ट्रीटवर येताच एका जागी पर्यटकांची तोबा गर्दी उडालेली दिसली. जवळ जाऊन पहाता तिथल्या अवाढव्य आकाराच्या वळूच्या पुतळ्याभोंवती सगळे जमलेले होते. अमेरिकेतली गुरे पहाण्याचे भाग्य काही मला लाभले नाही, पण भारतात पाहिलेल्या सर्वात आडदांड खोंडाच्या मानाने तो निदान दीडपटीने तरी मोठा होता. मान खाली घालून, पण डोळे वटारून पहात समोरच्याला ढुशी मारण्याच्या किंवा कोणी अंगावर चालून आलाच तर त्याला सरळ शिंगावर घेण्याच्या पवित्र्यात तो शेपूट उभारून जय्यत तयारीत खडा आहे. त्याच्या नजरेतला बेदरकार आक्रमक भाव आणि अंगाप्रत्यंगातले सौष्ठव पहात राहण्याजोगे आहे. पण तिथल्या गर्दीतल्या कोणाला त्याचे रसग्रहण करावे असे वाटतांना दिसले नाही. त्यातला जो तो त्याच्यासोबत आपला फोटो काढून घेण्याच्या प्रयत्नात होता. त्यासाठी जशी जिथे जागा सापडेल तिथे त्याला रेलून किंवा त्याच्या समोर उभे राहून ते आपली छायाचित्रे काढून घेत होते. कोणी त्याच्या पाठीवर हात ठेवून उभा होता, तर कोणी त्याचे एक शिंग हातात धरले होते, कोणी हात उंच करून त्याचे शेपूट पकडायला पहात होता तर आणखी कोणी त्याच्या पायांमध्ये बसून आणखी काही कुरवाळत होता. त्या प्रवाशांची हौसेची व्याख्या पाहून मला हंसू आवरत नव्हते.

तिथून हिंडत हिंडत आम्ही टाइम्स स्क्वेअरमध्ये आलो तोंपर्यंत अंधार झाला होता, पण रंगीबेरंगी निऑनच्या असंख्य दिव्यांतून बनवलेल्या प्रचंड जाहिरातींनी तो सारा परिसर झगमगत होता. इतक्या जाहिराती एकत्र पाहिल्यावर त्यातली कोणती लक्षात राहील आणि ती कोणाच्या नजरेत भरलीच नाही तर ती देऊन काय फायदा असा प्रश्न पडतो. रोजच्या वर्तमानपत्रातली जाहिरातींनी भरलेली पाने न उघडताच आपण बाजूला करतो, त्याचप्रमाणे रोज तिथून येजा करणारे लोक मान वर करून या जाहिराती पहाण्याचा आणि पाहिल्यानंतर त्या वाचण्याचा प्रयत्न करतील असे वाटत नाही. आम्हाला मात्र हे दृष्य नवे असल्याने आम्ही त्या कौतुकाने पहात होतो आणि त्यात आकर्षक असे नवीन काही आढळले तर ते एकमेकांना दाखवत होतो. त्यातली कुठलीच वस्तू किंवा सेवा आम्हाला विकत घ्यायची नसल्यामुळे त्या जाहिरातीचा आमच्यावर होणारा परिणाम शून्याएवढाच होता. आम्ही फक्त त्या जाहिरातीमधील चित्रे आणि मजकूर पाहून त्यातल्या कलाकौशल्याचा आस्वाद घेत होतो.

न्यूयॉर्कमधील कांही ठळक गोष्टी पाहून झाल्या होत्या आणि सकाळपासून केलेल्या पायपिटीमुळे पायाचे स्नायू कुरकुर करू लागले होते. त्यामुळे अखेर आम्ही “आजचा दिवस छान गेला” असे म्हणत त्या दिवसाचा दौरा आटोपता घेतला आणि पोर्ट ऑथॉरिटी बस स्टेशनमार्गे पार्सीपेनीला परत गेलो. एका लहानशा कंडक्टेड टूरवर जाण्यासाठी दुसरे दिवशी आम्हाला त्या भागात सौरभछ्या मार्गदर्शकाविना यायचे असल्यामुळे वाटेवरल्या सगळ्या  महत्वाच्या जागा आणि खाणाखुणा यावेळी नीटपणे पाहून घेतल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: