अमेरिकेची लघुसहल ३ – पहिला दिवस – बफेलो सिटी – अमेरिकन महिषऊरु

TourBus1

ओंटारिओ सरोवरातल्या सहस्रद्वीपांमधील चाळीस पन्नास बेटांच्या किना-याजवळून जातांना त्यांवरील नैसर्गिक तसेच मानवनिर्मित सौंदर्यस्थळांचे अवलोकन करीत तासभर जलविहार करून परत आल्यावर आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला.  सूर्य मावळतीच्या दिशेने बराच खाली उतरला होता. त्या मावळत्या दिनकराचे फिकट होत बदलत जाणारे रंग आणि डोंगरमाथ्यांच्या गडद किंवा काळपट होत जाणा-या विविध रंगांच्या छटा पहात पहात पुढे जाता जाता सूर्यास्त झाला आणि हेडलाईट्सच्या उजेडात आमची बस मार्गक्रमण करत राहिली. अखेर पहिल्या दिवसाच्या मु्कामाचे ठिकाण आले.

कन्नड भाषेत गांवाला ऊरु म्हणतात. आपल्याकडे जशी वडगांव, पिंपळगांव, रावळगांव वगैरे नांवे असलेली खूप गांवे आहेत, त्याचप्रमाणे कर्नाटकात हुन्नूर, बसरूर, बेलूर वगैरे नांवांची असंख्य लहान लहान गांवे आहेत. अशाच प्रकारचे बंगळूरु हे गांव महानगर झाले आणि आता कर्नाटकाची राजधानी आहे, महिषासुराचे म्हैसूर हे सुध्दा मोठे शहर आहे आणि पूर्वी कित्येक शतके या भागाची राजधानी या गांवात होती. महिषऊरु या शब्दांचे इंग्रजी प्रतिशब्द घेतले तर बफेलो सिटी असे भाषांतर होईल. अमेरिकेच्या मिनिटूरमधला आमचा पहिला मुक्काम या गांवी होता.

बफेलो हे न्यूयॉर्क राज्यातले दुस-या क्रमांकाचे मोठे शहर आहे, पण न्यूयॉर्क शहराशी तुलना करायची झाली तर मुंबई आणि कोल्हापूरमध्ये जेवढा फरक असेल तेवढा या दोन शहरांच्या आकारात आहे. शिवाय न्यूयॉर्क शहर त्या राज्याच्या दक्षिणेच्या किंवा आग्नेय दिशेच्या टोकाला अॅटलांटिक महासागराच्या किनारी आहे तर बफेलो सिटी त्याच्या बरोबर उलट दिशेच्या म्हणजे उत्तरेच्या किंवा वायव्य दिशेच्या टोकाला कॅनडाच्या सीमेवर आहे. एक सागरकिना-यावर आहे तर दुसरे डोंगराळ प्रदेशात आहे. बफेलो या गांवाचे नांव कुठल्याशा फ्रेंच शब्दांवरून पडले असे सांगतात. त्या गावातल्या रस्त्यांवर म्हैस पहायला मिळण्याची शक्यता नव्हतीच, पण कुठल्याही रस्त्याच्या बाजूला पाण्याच्या डबक्यात डुंबणारी एकसुध्दा म्हैस दिसली नाही, तसेच गांवाबाहेर म्हशींचे गोठे किंवा तबेले कांही दिसले नाहीत. किंबहुना अमेरिकेत म्हैस आणि रेडे हे पाळीव पशु असावेत असे वाटतच नाही. तिथल्या मुक्कामात निरनिराळे टक्के स्निग्धांश असलेले दुधाचे सारे नमूने चाखून पाहिले, पण आपल्याकडच्या म्हशीच्या सकस दुधाची सर त्यातल्या एकालाही आली नाही.

बफेलोला पोचल्यावर क्षुधाशांतीसाठी एका खूप प्रशस्त अशा चायनीज हॉटेलात नेले गेले. अमेरिकेतल्या बाजारभावांचा विचार करता अगदी क्षुल्लक दरात पोटभर इच्छाभोजनाची सोय तिथे होती. तीनचार लांबलचक टेबलांवर प्रत्येकी दहा तरी वेगवेगळे पदार्थ मांडून ठेवले होते. मक्याच्या पिठाच्या घोळात शिजवलेल्या दोन तीन भाज्या आणि उकडलेले बटाटे किंवा पांढरा भात असे मोजके पदार्थ सोडले तर इतर सर्वकांही सामिष होते. चिनी लोक त्यांच्या घरात उंदीर, पाली, झुरळे वगैरे खातात असे ऐकले असले तरी निदान इतरांना किळस येऊ नये म्हणून तरी त्याचे सार्वजनिक प्रदर्शन करत नाहीत.  बेडूक, खेकडे आणि शिंपल्यातले किडे यांच्या कांही पाकसिध्दी होत्या, त्या कणभर चाखूनही पाहिल्या, पण त्यांचे एवढे कौतुक कशासाठी करतात हे समजले नाही. त्यामुळे चिकन आणि प्रॉन्सयुक्त नूड्ल्स आणि फ्राईडराइसच्या ओळखीच्या त-हा खाणे इष्ट वाटले. कसले तरी सूप होते, त्याचे नांव लक्षात राहिले नाही, पण त्याची चंव अप्रतिम होती.

बफेलो शहरापासून नायगरा धबधबा अगदी जवळ आहे, पण सहस्रद्वीपांपासून बफेलोपर्यंत जाण्याच्या रस्त्यातून आम्हाला त्याची दुरून झलकसुध्दा दिसली नाही. रात्रीच्या वेळी लेजरच्या रंगीबेरंगी झोतातून त्यावर खूप छान रोषणाई करतात असे ऐकले होते. दुसरे दिवशी मुक्कामाला वेगळ्या गांवी जायचे असल्यामुळे आम्हाला ती पहायला मिळणार नव्हती. बारा वर्षांपूर्वी मी कॅनडाच्या बाजूने नायगराचा धबधबा रात्री पाहिला होता, पण त्यातले आता एवढे आठवत नव्हते. शिवाय बारा वर्षात त्यात केवढी तरी प्रगती झाली असणार! आमच्यासोबत आलेली बाकीची मंडळी पहिल्यांदाच या जागी येत होती. धबधब्यावरची ही रोषणाई पहायला रात्री टॅक्सीने पटकन जाऊन यावे अशी एक कल्पना डोक्यात आली. पण परदेशात अशी व्यवस्था करण्यासाठी काय करावे लागते, त्याला किती खर्च येईल आणि त्यातून काय पदरात पडेल यातल्या कशाचीच नीट कल्पना नव्हती. शिवाय दुसरे दिवशी पहाटे लवकर उठावे लागले होते, दुपारी वामकुक्षीही घेतली नव्हती आणि दिवसभर बसमधून फिरलो असलो तरी त्यातून शरीराची दमणूक झाली होती. त्यामुळे हॉटेलवर जाऊन आपली खोली ताब्यात घेण्याचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर आधी गादीवर पडावेसे वाटले आणि गादीला पाठ टेकताच क्षणार्धात निद्राधीन झालो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: