अमेरिकेची लघुसहल ४- दुसरा दिवस -१ नायगारा -१

niagaraBlog1

नायगाराच्या धबधब्याहून खूप उंच असलेले धबधबे आणि नायगारा नदीच्या कांहीपट रुंद पात्र असलेल्या विशाल नद्या आपल्या भारतात आहेत. यातल्या कांही नद्यांना पूर आलेला असतांना त्याना घातलेल्या बंधा-यांवरून खाली झेपावत जाणारे प्रचंड जलौघही मी पाहिले आहेत. नायगारासारखे रुंद धबधबे मी फारसे पाहिले नसले तरी कदाचित जगात इतरत्र असतील असे मला वाटते. पण नायगाराला जेवढी उदंड प्रसिध्दी मिळाली आहे तेवढी इतर कुठल्याही जागेला मिळत नाही. नायगारा नदी फारशी मोठी नसली तरी तिला पहायला येणा-या पर्यटकांचा ओघ मात्र नेहमीच प्रचंड असतो. या पाहुण्यांना निरनिराळ्या प्रकारचा अनुभव देऊन तृप्त करणारे अनेक कल्पक उपक्रम या जागी चालतात. त्या सगळ्याच ठिकाणी हौशी पर्यटकांच्या लांब रांगा लागतात. यात आपली पाळी लवकर येऊन जावी म्हणून आम्हाला शक्य तितक्या लवकर तिथे न्यायचे आमच्या सहलीच्या आयोजकांनी ठरवले होते.

आमच्या भ्रमणकाळात अमेरिकेच्या त्या भागात चांगलीच कडाक्याची थंडी पडू लागली होती. आम्ही तर मुंबईच्या उकाड्यातून तिकडे गेलो असल्यामुळे आम्हाला जरा जास्त हुडहुडी भरत होती. आम्हाला सांगितले गेल्याप्रमाणे आम्ही भल्या पहाटे उठलो तेंव्हा हवेतले तपमान शून्याच्या जवळपास पोचलेले होते. नळाचे पाणी गोठले नसले तरी बर्फासारखे थंडगार होते, त्यामुळे लगेच गीजर सुरू केला. झोपायच्या खोलीत गालिचा अंथरलेला होता, पण बाथरूममधल्या बर्फासारख्या लादीला पाय टेकवत नव्हता. दोन दिवसाच्या प्रवासात ओझे नको म्हणून आम्ही चपला बरोबर नेल्या नव्हत्या. एक टर्किश टॉवेल जमीनीवर अंथरून पायाला लागणारा थंडीचा चटका घालवला. थंडीमुळे दिवसभरात घाम आलेला नव्हताच आणि धुळीशीही संपर्क झालेला नसल्यामुळे शारीरिक स्वच्छतेसाठी सचैल स्नान करण्याची आवश्यकता नव्हती, ते करण्याची तीव्र इच्छा होत नव्हती आणि त्यासाठी पुरेसा वेळही नव्हता. त्यामुळे अमेरिकेत गेल्यावर अमेरिकनांसारखे रहायचे ठरवून गरम पाण्याने हातपायतोंड धुवून घेतले आणि कपडे बदलून आम्ही तयार झालो.

आम्ही युरोपच्या दौ-यावर गेलो असतांना प्रत्येक मुक्कामात रोज सकाळी भरपूर काँटिनेंटल ब्रेकफास्ट मिळत होता. आम्हाला एकादे दिवशी सकाळी लवकर निघायचे असले तरी खास आमच्या ग्रुपसाठी तो वेळेच्या आधी देण्याची व्यवस्था केलेली असे. अमेरिकेच्या या मिनिटूरमध्ये खाण्यापिण्याची जबाबदारी आयोजकांवर नव्हतीच. हॉटेलची रेग्युलर सर्व्हिस सुरू व्हायला अवधी होता. पण याची कल्पना आधीच देऊन ठेवलेली असल्यामुळे आम्ही आदल्या रात्रीच बन, वेफर्स, फळे वगैरे खाद्यसामुग्री बाजारातून आणून ठेवली होती. शिवाय न्यूजर्सीहून आणलेले आमचे फराळाचे डबे सोबतीला होतेच, पण इतक्या पहाटे काही खाण्याची इच्छा नसल्य़ामुळे गीजरच्या गरम पाण्यात डिपडिप करून गरम गरम चहा बनवला आणि बिस्किटांबरोबर प्राशन केला.

सकाळी उजाडताच आम्ही बफेलो शहर सोडले आणि वीस पंचवीस मिनिटांत नायगराच्या परिसरात जाऊन पोचलो. तो जगप्रसिध्द धबधबा पाहण्याची सर्वांना उत्कंठा असली तरी आधी आम्हाला तिथल्या एका सभागृहात नेले गेले. तिथला शो सुरू व्हायला वेळ होता, म्हणून बाजूच्या स्टॉलवरून सर्वांनी सँडविचेस, बर्गर यासारखे कांही पदार्थ विकत घेतले आणि एका हातात ती डिश आणि दुस-या हातात कोकची बाटली धरून अमेरिकन स्टाइलने हॉलमध्ये प्रवेश केला. अलीकडे मॉल्समध्ये असतात तशासारखे हे लहानसे सभागृह होते, पण त्यात समोरच्या बाजूला अवाढव्य आकाराचा पडदा होता. नायगारा लीजेंड्स ऑफ अॅड्व्हेंचर या नांवाचा एक माहितीपट त्यावर दाखवला गेला.  हजारो वर्षांपूर्वी त्या भागात वास्तव्य करणा-या रेड इंडियन लोकांच्या टोळक्यांचे दृष्य सुरुवातीला पडद्यावर आले. त्यात लेलावाला नांवाची एक सुंदर, धीट आणि मनस्विनी युवती असते. तत्कालीन रीती रिवाजांप्रमाणे टोळीमधील सर्वात बलदंड अशा पुरुषाबरोबर तिचे लग्न ठरवले जाते. पण केवळ वडिलांच्या आज्ञेखातर त्या आडदांड धटिंगणाशी विवाह करणे लेलावालाला मान्य नसते. लग्नसमारंभाच्या रात्रीच ती आपल्या झोपडीतून निसटते आणि घनदाट जंगलात पळून जाते. खलनायकाची माणसे शिकारी कुत्र्यांसारखी तिच्या मागावर जातात. त्यांना चुकवण्यासाठी एका लहानशा नांवेत बसून ती नायगारा नदीत शिरते आणि धबधब्याच्या परिसरातल्या दाट धुक्यात अदृष्य होते. अशी कांहीशी दंतकथा त्या भागातील आदिवासी लोकांमध्ये प्रसृत आहे. त्यानंतर चांदण्या रात्री अधूनमधून तिची अंधुक पण कमनीय आकृती त्या धबधब्याच्या कोसळत्या पाण्यात कोणाकोणाला दिसत राहते अशी समजूत आहे. या प्रेमकथेचे अत्यंत मनोवेधक चित्रण या लघुपटात केले आहे.

त्यानंतर कथानक एकदम पंधरासोळाव्या शतकात आले आणि युरोपातल्या लोकांनी अमेरिकेतील मिळेल त्या भागाचा ताबा घ्यायला सुरुवात केल्याची दृष्ये पडद्यावर आली. इंग्रज आणि फ्रेंच लोकांनी आधी आदिवासी लोकांना तिथून पिटाळून लावले आणि त्यानंतर आपसात मारामा-या सुरू केल्या. अमेरिकन राज्यक्रांती झाल्यानंतर नायगाराचा तो भाग स्वतंत्र झाला, पण पलीकडचा कॅनडा ब्रिटीशांच्या ताब्यात राहिला. नायगाराच्या परिसरात होऊन गेलेल्या त्या काळातल्या कांही चकमकी आणि लढायांचे छायाचित्रण पडद्यावर जीवंत केले गेले. त्या ऐतिहासिक काळातले गणवेश, त्यांची शस्त्रास्त्रे, त्यांच्या रणनीती वगैरे सर्व गोष्टी अत्यंत लक्षवेधी स्वरूपात दाखवल्या गेल्या.

सगळी युध्दे संपल्यानंतर त्या भागातल्या नागरी वाहतुकीचा कसा विकास होत गेला, कोणकोणत्या प्रकारच्या नौकांचा उपयोग करून इथल्या नदीचा खळखळता प्रवाह ओलांडण्याचे प्रयत्न करण्यात यश आले, त्यात यशस्वी झालेल्या तसेच कधीकधी अपयशी ठरलेल्या साहसी वीरांच्या गाथा सांगितल्या गेल्या. नायगराचा धबधबा, त्याच्या वरच्या भागात अतीशय वेगाने धांवणारा आणि खाली खळाळत जाणारा पाण्याचा प्रवाह या तीन्ही गोष्टी साहसी लोकांना कांही तरी अचाट करून दाखवण्याची प्रेरणा नेहमीच देत आल्या आहेत. अनेक लोकांनी त्या प्रयत्नात आपले प्राण गमावले आहेत, कांही लोक त्या दिव्यातून सुखरूपपणे बाहेर आले आहेत, तर कांही लोक त्यांच्या आयुष्याची दोरी बळकट असल्याकारणाने जेमतेम बचावले. यातल्या कांही लोकांच्या चित्तथरारक कथा दाखवल्या गेल्या. विशेषतः एक लहान मुलगा नांवेत बसून वरच्या भागात नदी ओलांडत असतांना ती नांव भोव-यात सापडते त्याची कथा मनाला स्पर्श करते. अनेक धाडशी लोक जिवावर उदार होऊन त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात आणि अगदी अखेरच्या क्षणी त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन त्या मुलाचे प्राण वाचतात. तसेच एक प्रौढ बाई लाकडाच्या पिंपात बसून धबधब्याच्या पाण्याबरोबर खाली कोसळते. खालच्या बाजूला असलेले नावाडी तिचा शोध घेऊन ते पिंप कांठावर घेऊन येतात. आजूबाजूला जमा झालेले तिचे आप्त जसे श्वास रोखून ते पिंप उघडण्याची वाट पहात असतात तसेच प्रेक्षकसुध्दा मुग्ध होऊन पुढे काय होणार याची वाट पहात असतात. ती बाई हंसत हंसत पिपातून बाहेर आलेली पहाताच सर्वजण सुटकेचा निःश्वास सोडतात.

अशा प्रकारची अनेक चित्तथरारक नाट्ये एकमेकात गुंफून या लघुपटात पेश केली गेली. पार्श्वभूमीवर सतत नायगराचा धबधबा निरनिराळ्या अँगलमधून दाखवला जात होता.  वेगवेगळ्या ऋतूंमध्ये दिसणारी त्याची अनंत रूपे मंत्रमुग्ध करणारी होती. त्याच्या जोडीला रहस्यमय कथा उलगडत जात होत्या. आकर्षक दृष्ये आणि मनोरम पार्श्वसंगीत यांच्या मिश्रणाने तो कार्यक्रम बहारदार असाच होता. त्यात तासभर गेल्याचे कोणालाही वैषम्य वाटले नाही. बहुतेक पर्यटक इतके प्रभावित झाले होते की घरी गेल्यानंतर इतरांना दाखवण्यासाठी या लघुपटाच्या डीव्हीडी त्यांनी विकत घेतल्या.

. . .  ..  . . . ..  . . . (क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: