धुळवड आणि होली (रंगोत्सव)

Holi2007

पुढच्या आठवड्यात होळी आणि धुळवड येत आहेत. याबद्दल मी पूर्वी लिहिलेले दोन लेख देत आहे. हे लेख सन २००७ आणि २०१२ मध्ये लिहिलेले असले तरी त्यातला मजकूर साधारणपणे एकच आहे.
————————-
रंगोत्सव २००७
माझ्या लहानपणी मी ग्रामीण भागात पाहिलेली होळी हा सगळा बीभत्सरसाचा प्रकार होता. लाकडे, गोव-या, कडबा (ज्वारीचे खुंट), कागद, चिंध्या, सूप, टोपल्या, केरसुणी यासारख्या हाताला लागतील त्या सगळ्या ज्वलनशील पदार्थांचा अस्ताव्यस्त ढीग रचून फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री त्याची होळी पेटवली जायची. गल्लीतले लोक त्याच्या सभोवती घोळक्याने उभे राहून तिथे असतील, नसतील त्या सगळ्यांच्यी नावाने अर्वाच्य शिव्या घालून ठो ठो करून जोरजोरात बोंबलत असत.  “होळी रे होळी, पुरणाची पोळी, —–च्या xx मध्ये बंदुकीची गोळी” ही त्यातल्या त्यात सौम्य शिवी!

आमच्या घरात मात्र संस्कृतीसंरक्षणाचे जास्तच स्तोम असल्यामुळे या गोंधळात आम्ही मुलांनी सामील होणे मंजूर नव्हते. “शिवीगाळ करायची नाही.” असे तीन तीनदा बजावून सांगितल्यानंतर बाहेर काय चालले आहे ते फक्त पाहून यायला परवानगी मिळत असे. दुस-या दिवशी धुळवडीला तर त्या होळीच्या राखेत पाणी ओतून केलेला चिखल एकमेकांना फासला जात असे.  अंगावर चिखलफेक करून झाल्यावर किंवा त्याच्यासोबतच त्या चिखलात लोळणे आणि लोळवणे चालत असे. त्या काळात रोगजंतूंची फारशी दहशत बसलेली नव्हती, तरी किळस वाटत असल्यामुळे मी स्वतः होऊनच त्यापासून दूर रहात होतो. एकंदरीतच होळी आणि धुळवड माझे आवडते सण नव्हते.

मुंबईला अणुशक्तीनगर या आमच्या वसाहतीमधले वैज्ञानिकांचे वातावरण पूर्णपणे वेगळे होते. आधी तोंडात बसलेले “आयला मायला”यासारखे अपशब्द तिथे रहायला गेल्यानंतर गळून पडलेच, हिंदी किंवा इंग्रजी शिव्यांची बाधाही झाली नाही. सगळे बोलणे परीटघडीचे होऊन गेले. आमच्या बिल्डिंगमधले उत्साही लोक फक्त या सणासाठीच मुद्दाम चक्क बाजारातून लाकडे विकत आणून त्याची होळी पेटवत असत. त्याच्या सभोवती उभे राहून नेहमीच्या विषयांवरल्या गप्पाच चालायच्या, ट्रान्स्फर, प्रमोशन, सेमिनार, फॉरेन यूर वगैरेंवर पुरुष मंडळींच्या आणि भाज्यांचं लोणच, साड्यांचा सेल वगैरेंवर महिलावर्गाच्या.

दुसरे दिवशी मात्र हिंदी सिनेमात दाखवतात तशी ओल्या आणि कोरड्या रंगांनी ‘होली’ खेळली जात असे. रंग उडवणे, फासणे, ”हॅप्पी होली” म्हणत कडकडून मिठ्या मारणे वगैरे सगळे काही फिल्मी स्टाईलमध्ये त्यात होत असे. ती खेळतांना घरोघरी जाऊन एकेकाला बाहेर ओढले जात असे. ते लोकही तयारच असत आणि पेढे, बर्फी, लाडू, गुजिया, मठरी, कचोरी, जलेबी, गुलाबजाम वगैरेंनी भरलेली ताटे समोर येत. त्यांचे घास घास करत भरपूर खाणे, ठंडाई पिणे वगेरे झाल्यानंतर सर्वांनी एकत्र जमून गाणी , अंताक्षरी, (व्हेज, नॉनव्हेज) विनोद, कोडी, उखाणे वगैरे धमाल केली जात असे. अखेरची काही वर्षे सार्वजनिक भोजनाची व्यवस्थाही होऊ लागली. फराळ झालेला असला तरी केटररने आणलेले दोन घास अन्न खाऊन होलिकोत्सवाची सांगता होत असे.

आता ते दिवसही गेले, त्यावेळी होळी खेळणारे मित्रही रिटायर होऊन निरनिराळ्या ठिकाणी रहायला गेले. होळीच्या दिवशी त्यांच्या आठवणी मात्र आल्याखेरीज रहात नाहीत.

————————————————————————
धुळवड आणि होली  २०१२
माझ्या लहानपणी ज्या प्रदेशात आम्ही रहात होतो त्या भागात तरी होळी पौर्णिमा किंवा शिमगा या उत्सवाला बरेच बीभत्स स्वरूप आले होते. घरात पुरणाची पोळी आणि कटाची आमटी खायला मिळत असल्याने आम्ही आनंदात असू, पण बाहेर जाऊन रस्त्यात चाललेल्या सार्वजनिक धिंगाण्यात आम्हाला सहभागी होता येत नव्हते. होळीच्या दहा बारा दिवस आधीपासूनच लाकडे आणि लाकडाच्या वस्तूंची पळवापळवी सुरू होत असे. काही वात्रट मुले आपण कुठून काय पळवून आणले याची फुशारकी मारायची, पण त्या वस्तू कुठे लपवून ठेवल्या आहेत याचा थांगपत्ता लागू देत नसत. ते शोधून काढून त्यावर डल्ला मारण्याचे काम आणखी कोणी करत असे. शेवटी सगळे अग्निनारायणाच्याच स्वाधीन करायचे असल्यामुळे तो चोरीचा अपराध समजला जात नसला तरी ते काम करणारा मुलगा सापडला तर त्याला भरपूर चोप मिळायचाच. स्वतःची असो किंवा त्याने ढापलेली असो, पण ज्याची वस्तू पळवली गेली जायची तो पळवणा-याच्या नावाने शंख करायचाच. होळीचा दिवस अगदी जवळ आल्यावर मुलांची टोळकी उघड उघडपणे घरोघरी जाऊन लाकडे जमवून आणत आणि जो कोणी देणार नाही त्याच्या घरासमोर शंखध्वनि करत. त्यामुळे बहुतेक लोक बंबात घालण्यासाठी किंवा चुलीत जाळण्यासाठी ठेवलेल्या ढिगामधून थोडी लाकडे, काटक्या, ढलपे वगैरे देत असत. काही मुले जमवलेल्या ज्वलनशील वस्तूंची राखण करायचे काम करत असत. होळीच्या दिवशी संध्याकाळ झाली की ते ढिगारे भर रस्त्यांत मधोमध आणून पेटवून दिले जात आणि रात्रभर ते जळत रहात. त्यावेळी तिथे जमलेल्या लोकांमध्ये गलिच्छ शिवीगाळ करण्याची चढाओढ चालत असे. आमच्या घरातले वातावरण जास्तच सोवळे असल्याकारणाने त्या गोंधळात सामील होण्याची परवानगी कधीच मिळाली नाही. पण गल्लीत चाललेला गोंधळ कानावर येत असे, घराच्या गच्चीवरून दिसतही असे आणि हळूच थोडासा पाहून येत असू.

त्याच्या दुसरे दिवशी म्हणजे धुळवडीला गलिच्छपणाचा सुमारच नसे. होळीत जळालेल्या लाकडांची राख त्या दिवशी एकमेकांना फासायची असा पूर्वीचा रिवाज असला तरी त्या राखेतच माती, शेण आणि गटारातली कसलीही घाण मिसळून त्यात ज्याला त्याला लोळवणे चालत असे. ते करणा-या जमावाच्या हातात एकादा अनोळखी इसम सापडला तर त्याची पुरती वाट लावली जाई. असल्या धुडगुसात सामील होण्याचा विचारसुध्दा करणे आमच्या घरी कोणाला शक्य नसल्य़ामुळे धुळवडीच्या दिवशी सकाळी कुठल्याही कारणासाठी कोणीही बाहेर पडत नसे. त्या दिवशी कुठे कुठे कोणकोणते घाणेरडे प्रकार घडले याच्या बीभत्स पण सुरस कहाण्या पुढील काही दिवस कानावर येत रहात. मनातला सगळा ओंगळपणा या वेळी बाहेर काढून टाकायचा आणि त्याची पाटी स्वच्छ करायची हा होळीच्या मागला उद्देश असतो असे सांगितले जात असले तरी त्याचा अतिरेक होत असल्यामुळे तो साध्य होत नसे. उलट त्यातून नवेच हेवे दावे निर्माण होत आणि झालेल्या अपमानाचे पुढल्या वर्षी उट्टे काढण्याचा निर्धार केला जात असे. शिमगा संपला तरी त्याचे कवित्व शिल्लक राहते अशी म्हणच पडली आहे ती त्यामुळेच.

होळी पौर्णिमेच्या दुसरे दिवशी सकाळी (आपल्या धुळवडीला) उत्तर भारतीय लोक रंग खेळतात. हिंदी सिनेमांमध्ये केले जाणारे होलीच्या उत्सवाचे प्रचंड उदात्तीकरण पाहून त्याचे पडसाद मुंबईसारख्या महानगरातील समाजातसुध्दा दिसायला लागले. मुंबईमधून तरी मराठी माणसांची परंपरागत रंगपंचमी आता लुप्तच झाली आहे असे दिसते. पुण्यासारख्या शहरात ती काही प्रमाणात खेळली जात असली तरी हिंदी सिनेमातल्या होलीची सर त्याला येत नाही. अणुशक्तीनगरसारख्या प्रामुख्याने शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांच्या वसाहतीत खूपच सभ्य वातावरणात होली खेळली जात असे. त्या दिवशी एकमेकांना (कडकडून) भेटणे, रंग उधळणे किंवा रंगाने माखणे याबरोबरच घरोघरी निरनिराळ्या मिठाया आणि नमकीन पदार्थ खायला मिळत आणि गाणी, विनोद वगैरेंच्या मैफली अंगावर टाकल्या जाणा-या रंगाइतक्याच रंगत असत. खरोखरच होलीचा त्योहार एक सांस्कृतिक उत्सव या भावनेने साजरा होत असे. उत्तर भारतीय आणि बंगाली लोक यात अमाप उत्साहाने भाग घेत असत आणि आम्हालाही त्यात सामील करून घेत असत. एक दोन वर्षातच आम्हीसुध्दा त्यात त्यांच्याइतक्याच उत्साहाने भाग घेऊ लागलो. माझ्या लहानपणच्या काळात होळी किंवा धुळवड यात सामील होण्यास महिलावर्गाला सक्त मनाई होती. त्या दिवसात त्या कधी चुकूनसुध्दा घराबाहेर पडतसुध्दा नसत. पण अणुशक्तीनगरमधल्या होलीमधील रंगणे, रंगवणे, खाणेपिणे आणि गाणे वगैरे सगळ्या भागात त्या पुरुषवर्गाच्या दुप्पट उत्साहाने भाग घेत असत. मी सेवानिवृत्त होऊन वाशीला रहायला गेल्यानंतरसुध्दा दोन तीन वर्षे आम्ही होलीचा आनंद घेण्यासाठी पूर्वीच्या ठिकाणी जात होतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: