वसंताचे आगमन

“वसंत वनात जनात हांसे, श्रुष्टीदेवी जणु नाचे उल्हासे।
गातात संगीत पृथ्वीचे भाट, चैत्र वैशाखाचा ऐसा हा थाट।।”
असे कवि शांताराम आठवले यांनी आपल्या कुंकू या चित्रपटातल्या सुप्रसिद्ध गीतामध्ये लिहिले आहे. “हे पृथ्वीचे भाट कोण असतील ?” या प्रश्नाचा उलगडा गीतरामायणातील पहिल्याच गाण्यामधील या शब्दांनी होतो.

“ते प्रतिभेच्या आम्रवनांतिल, वसंत वैभव गाती कोकिल।
बालस्वरांनी करुनी किलबिल, गायने ऋतुराजा भारिती।।”
महाकवि ग.दि.माडगूळकरांनी या गाण्यात श्रीरामाच्या चरित्राचे गायन करणार्‍या लवकुशांना ऋतुराज वसंताच्या वैभवाचे कूजन करणार्‍या कोकिलांची उपमा दिली आहे. याच गदिमांनी आपल्या दुसर्‍या एका गीतात एका नवयौवनेच्या मनातली मुग्ध घालमेल “आला वसंत देही मज ठाउकेच नाही” या शब्दात नेमकी टिपली आहे. तर कवि शांताराम आठवले यांनी आपल्या दुसर्‍या एका गीतात वसंताच्या आगमनाचे स्वागत असे केले आहे.

आला वसंत ऋतु आला, वसुंधरेला हंसवायाला,
सजवीत नटवीत तारुण्याला, आला आला आला ।।
शतरंगांची करीत उधळण, मधुगंधाची करीत शिंपण,
चैतन्याच्या गुंफित माला, रसिकराज पातला ।।
वृक्षलतांचे देह बहरले, फुलांफुलातुन अमृत भरले,
वनावनातुन गाऊ लागल्या, पंचमात कोकिळा ।।
व्याकुळ विरही युवयुवतींना, मधुरकाल हा प्रेममीलना,
मदनसखा हा शिकवी रसिका, शृंगाराची कला ।।

वसंत ऋतूच्या इतक्या सुंदर काव्यमय वर्णनानंतर त्याला गद्यातून कांही जोड द्यायची गरज कुठे आहे? आपल्या संस्कृतीप्रमाणे वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत व शिशिर हे ऋतुचक्राचे सहा भाग आहेत. पण “नेमेचि येतो बघ पावसाळा हे पृथ्वीचे कौतुक जाण बाळा” ही उक्ती ढोबळमानानेच खरी ठरते. शाळेत जसा एक तास संपल्याची घंटा वाजली की वेगळ्या विषयाचा दुसरा तास सुरू होतो तसा ठरलेला महिना आला की लगेच वातावरण बदलत नाही. चैत्र वैशाखाचा वसंत महिमा सांगितला असला तरी वैशाख महिन्यात ग्रीष्माच्या उन्हाचा वणवा पेटलेला असतो. तो वर्षा ऋतूमधील जलधारांनी शांत होत होत आश्विन महिन्यातले शरदाचे टिपुर चांदणे पडू लागते. त्यानंतर गुलाबी थंडी घेऊन “हेमंताचे दिवस मजेचे रविकिरणांत नहाया” येतात व त्याचे पर्यवसान पौष आणि माघ महिन्यांमधील शिशिराच्या कडक थंडीत होते. ती कमी होऊन फाल्गुन महिन्यातच ऋतुराज वसंताची चाहूल लागते व हा निसर्गातील सुखावह बदल धूमधडाक्याने रंगोत्सव करून साजरा केला जातो. उत्तर भारतामध्ये पौर्णिमेनंतर महिना बदलतो. त्यांच्या प्रथेनुसार होली हा वसंत ऋतू साजरा करण्याचा त्योहार असतो. फगवा ब्रिज देखनको चली रे अशी शास्त्रीय संगीतामधील वसंत रागाची प्रसिध्द चीज आहे. हवेमधील तापमानात होत असलेली वाढ पाहता वसंत ऋतू नक्कीच सुरू होऊन गेला आहे. आंब्याचा मोहोर जुना होऊन आता कै-या आणि आंबेसुध्दा बाजारात यायला लागले आहेत.

इंग्लंड आणि अमेरिकेत मात्र जीवघेणी थंडी आणि उबदार गरमी हेच दोन मुख्य ऋतु असतात. वर्षभर आभाळ ढगाळलेलेच असते व गरमीमध्ये साधा तर थंडीमध्ये हिमकणांचा पाऊस पडतो. त्यामुळे निरभ्र आभाळ असलेला ‘रविकिरणांत नहायाचा’ दिवस वर्षामध्ये कधीही आला तर तो उत्साहाने ऊन खाऊन साजरा होतो. त्यातल्या त्यात हिंवाळा संपला असल्याची जाणीव करून देणारा उत्साहवर्धक ‘स्प्रिंग’ आणि मनमुराद मौजमजा करण्याचा मोठे दिवस असलेला ‘समर’ हे दोन चांगले ऋतु आणि हवेतील गारवा वाढवीत झाडांना निष्पर्ण करणारा ‘ऑटम’ व सगळीकडे बर्फाचा पांढरा शुभ्र रंग पसरवणारा कडाक्याच्या थंडीचा तसेच दीर्घकाल रात्रींचा ‘विंटर’ हे दोन कष्टमय ऋतु असे चार ऋतु तिकडे मानले जातात. त्यातला स्प्रिंग हा आपल्या वसंतासारखाच असतो. झाडांना नव्या पालव्या फुटतात, त्यावर कळ्या उगवून त्या उमलतात व फुलांना बहार येतो. त्यामुळे सगळीकडे प्रसन्न वातावरण होते. तिकडे मात्र हे अचानक दिसू लागते. दाबून ठेवलेली स्प्रिंग खटका दाबताच एकदम उसळी मारते त्याप्रमाणे निष्पर्ण झालेली झाडे एकदम पानाफुलांनी डंवरून येतात.

असा हा आपल्या फाल्गुन, चैत्राच्या सुमारास येणारा वसंत किंवा त्यांचा स्प्रिंग तिकडे मार्च महिन्यात येतो. त्यातील २१ तारखेला म्हणजे नुकताच सूर्य विषुववृत्तावरील प्रदेशांत माध्यान्हीला बरोबर डोक्यावर येतो व ध्रुव प्रदेश सोडल्यास जगभर त्या तारखेला बरोबर बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र असते. त्यानंतर उत्तर गोलार्धात तो डोक्यावर येऊ लागतो व रात्रीपेक्षा दिवस मोठा होत जातो. दक्षिण गोलार्धात नेमके याच्या उलट घडते व थंडी पडायला सुरुवात होते. आपल्याकडे गुढी पाडवा, युगादी तसेच तामीळ लोकांचा नववर्षदिन हे सण साजरे होतात. याच्याच थोडेसे पुढे मागे आपली होळी तर पाश्चात्यांचा ईस्टर हे उत्सव येतात. चैत्रमहिन्यात नवरात्र बसवण्याची कांही भागात प्रथा आहे. आपल्याकडे चैत्रागौरी बसवतात व महिनाभर त्यांची उपासना करतात. त्यांत होणारे हळदीकुंकू व त्यानिमित्ताने आंब्याच्या डाळीचा प्रसाद ही त्या समारंभाची खास वैशिष्ट्ये.

अशा या आनंदाची बहार घेऊन येणार्‍या वसंत ऋतूचे स्वागत आणि त्याला मनःपूर्वक प्रणाम!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: