एकावर एक ….

एका मोठ्या कंपनीच्या डायरेक्टरच्या सेक्रेटरीची जागा अचानक रिकामी झाली. त्या महत्वाच्या जागेवर आपली वर्णी लागावी यासाठी कंपनीमधल्या व्यक्तींमध्ये चुरस, चढाओढ, खटपटी लटपटी, दबावतंत्र वगैरे सुरू व्हायच्या आधीच बाहेरून एक हुषार, चुणचुणीत आणि कार्यक्षम नवी सेक्रेटरी निवडून तिला आणायचे त्या डायरेक्टरने ठरवले आणि प्लेसमेंट सर्व्हिस चालवणा-या आपल्या मित्राला फोन करून चोवीस तासात ही निवड करून द्यायला सांगितले. हे आव्हान स्वीकारून ती एजन्सी लगेच कामाला लागली. अनेक उमेदवारांची सविस्तर माहिती त्यांच्याकडे होतीच. त्यांची छाननी करून टेलीफोन, एसएमएस, ईमेल वगैरे माध्यमांतून चाळीस पन्नास जणींना दुसरे दिवशी परीक्षा आणि मुलाखतीसाठी बोलावून घेतले. विविध विषयांमधील प्रश्नांचे संच तयार होतेच, त्यातून निवडक प्रश्न घेऊन त्याचा वेगळा संच तयार केला. परीक्षण करण्यासाठी आणि मुलाखत घेण्यासाठी तज्ज्ञ मंडळींना बोलावून घेतले. पन्नास मल्टीमीडिया कांप्यूटर तपासून घेऊन सर्व्हरला जोडून दिले. अशी सगळी जय्यत तयारी त्या दिवशीच करून ठेवली.

दुसरे दिवशी ठरलेल्या वेळी तीस पस्तीस मुली हजर झाल्या. त्यांना परीक्षेला बसवून त्या मित्राने डायरेक्टरला फोन लावला, “खूप उमेदवार आलेले आहेत. त्यांची परीक्षा तासभर चालेल. त्यानंतर विश्रांती आणि अल्पोपहाराची व्यवस्था केली आहे. त्यात तासभर जाईल. तोंपर्यंत आमची तज्ज्ञ मंडळी परीक्षण करून योग्य मुली निवडतील. त्यानंतर या मुलींच्या मुलाखती घेण्यासाठी तुम्ही येऊ शकाल कां? म्हणजे त्या एकदा तुमच्या नजरेखालून जातील.”
“छे! माझ्याकडे एवढा वेळ नाही. हे कामही तुम्हीच करायला पाहिजे.”
“ठीक आहे.  आम्ही त्या सर्वांचे तांत्रिक कौशल्य  तपासून पाहू. आमचे मानसशास्त्रतज्ज्ञ त्यांच्या स्वभावाचा अंदाज घेतील. त्यात चांगले वाईट असे नसते, तुम्हाला काय उपयोगाचे आहे ते तुम्हाला ठरवावे लागेल. त्यामुळे तुम्ही येऊन एकदा त्यावर फायनल निर्णय दिलात तर ते बरे होईल.”
“ठीक आहे, पण माझ्याकडे फक्त पाच दहा मिनिटे एवढाच वेळ आहे.”
“हरकत नाही. आमचे तज्ज्ञ प्रत्येकीला फक्त एकच प्रश्न विचारून शितावरून भाताची परीक्षा करतील.”
“ओ के”

चांचणी परीक्षा देत असलेल्या प्रत्येक मुलीला एक वेगळा संगणक दिलेला होताच, कानाला ध्वनीवर्धक (हेडफोन) लावला होता आणि गळ्यात ध्वनीक्षेपक (माइक) अडकवला होता. प्रश्नपत्रिकेतचे स्वरूप अजब होते. प्रश्न वाचून त्याखाली उत्तरे देणे होतेच, शिवाय एकादा प्रश्न मॉनिटरवर दिसायचा त्याचे उत्तर माईकवर सांगायचे तर एकादा आदेश हेडफोनवर विचारला जायचा त्याप्रमाणे सांगितलेला प्रोग्रॅम सुरू करून त्यावर दिलेली कृती करायची. एकादा प्रश्न वाचल्यानंतर अदृष्य होऊन जायचा तर एकादे उत्तर लिहिण्याची खिडकी फक्त कांही सेकंदांसाठी उघडी रहात असे. कांही प्रश्नाचे उत्तर एका शब्दात द्यायचे होते तर दिलेल्या एकेका शब्दावर तीन चार वाक्ये लिहायची होती. सामान्य ज्ञान, ऑफीस प्रोसीजर्स, हिशोब, भाषा, व्याकरण, यांसारख्या विषयांची चाचपणी त्यात होतीच, शिवाय संगणक ज्ञान, शॉर्टहँड, टाइपिंग, वाचन, कथन, विवेचन, आकलनशक्ती, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती, विचारशक्ती, विनोदबुध्दी, हजरजबाबीपणा वगैरेचासुध्दा कस लागत होता. त्यातला एक प्रश्न मानसशास्त्रातला होता.

एक तास संपल्यावर सर्वांनी हुःश केले. या मॅरॅथॉननंतर त्यांना विश्रांतीची नितांत गरज होतीच. थोडे फ्रेश होऊन सा-या रिफ्रेशमेंटसाठी गोळा झाल्या. गप्पांसाठी त्यांना एक छान विषय आयता मिळाला होता. कोणी त्या परीक्षेत विचारलेल्या नमूनेदार प्रश्नांचे कौतुक करत होती तर कोणी त्यांची टिंगल करत होती. कोणी हेडफोनवर ऐकलेल्या आवाजाची नक्कल करून दाखवत होती तर कोणी आपण माईकवर कशी गंमतीदार उत्तरे दिली याचे प्रात्यक्षिक दाखवत होती. कोणी बिनधास्तपणे बोलत होत्या तर हे बोलणेसुध्दा टेप होत असेल या धास्तीने कोणी आपण खाण्यात मग्न असल्याचे दाखवून बोलणेच टाळत होत्या.

परीक्षकांनी प्राथमिक फेरीमधून पंधरा सोळा जणींना निवडून मुलाखतीसाठी थांबवून ठेवले आणि इतरांना निरोपाचा नारळ दिला. मुलाखत घेणा-यांनी चार पांच प्रश्न विचारून सेक्रेटरीचे काम करण्यातले त्यांचे प्राविण्य तपासून पाहिले. त्यात अॅपॉइंटमेंट्स देणे किंवा घेणे, डायरी ठेवून कामाचे नियोजन करणे, पुढच्या कामाची सूचना आणि वेळेवर आठवण करून देणे वगैरेंचा समावेश होता आणि एकंदर व्यक्तीमत्व, चालणे बोलणे, त्याती अदब, मार्दव, हांवभाव वगैरे पाहून घेतले. त्यातून पाचसहा जणींची अखेरच्या फेरीसाठी निवड झाली.

ठरल्याप्रमाणे डायरेक्टरसाहेब आले आणि एकेकजणीला बोलावून फक्त एकच प्रश्न विचारला गेला. तो होता, “१ आणि १ मिळून किती होतील?”
“०, १, २, ३, ११” अशी या प्रश्नाची वेगवेगळी उत्तरे आली आणि त्यावर तज्ज्ञांची चर्चा सुरू झाली.

” ० उत्तर देणारी मुलगी नकारात्मक विचार करणारी आहे”
“म्हणजे भांडखोर, एकमेकाशी क्रॉस करून दोघांनाही रद्द करणारी”
“किंवा विध्वंसक प्रवृत्तीची”
“कदाचित अखेरच्या फेरीत असला (?) प्रश्न विचारला यावर तिचा हा मार्मिक शेरा असेल”

“बरं, १ उत्तर देणारी मुलगी स्वतःला विरघळून टाकणारी आहे.”
“म्हणजे ती स्वतःचे अस्तित्वच नाकारणार!”
“उलट कदाचित ती दुस-यालाच खाऊन टाकणारी निघाली तर?”
“दोघांनी मिळून एकदिलाने काम करायचे असे ती सुचवते आहे.”
“किंवा दोघांच्या वाटा एकाच दिशेने जात आहेत असे…”

” २ असे उत्तर देणारी मुलगी सरळमार्गी दिसते.”
“सरधोपट विचार करणारी, अगदी सामान्य कुवतीची..”
“किंवा दोघे मिळून दुप्पट काम होईल असे तिला म्हणायचंय्”
“किंवा दोन वाटांचे पर्याय सापडतील असे..”

” ३ उत्तर देणारी रोमँटिक दिसते आहे”
“किंवा सृजनशील”
“तिला सिनर्जी माहीत आहे”
“नाही तर तुला ही नको, मलाही नको, घाल तिस-याला असा विचार करत असेल”

“११ सांगणारी खूप महत्वाकांक्षी दिसते”
“किंवा कल्पनेच्या भरारीत रमणारी.. ”
“किंवा एकावर एक अकरा चे निर्बुध्दपणे पाठांतर करणारी”

तोंडी उत्तरांचा अर्थ लावून झाल्यानंतर चांचणी परीक्षेत दिलेल्या मानसशास्त्रीय प्रश्नाच्या उत्तरांवर चर्चा सुरू झाली. एक या अंकाचा एक ठळक व मोठा आणि एक लहान व पुसट आंकडा देऊन त्यांना पाहिजे तशा प्रकाराने स्क्रीनवर मांडायला त्या प्रश्नात सांगितले होते.

एकावरएक

“या चित्रातला लहान १ दूर उभा आहे. ही मुलगी फार संकोची स्वभावाची वाटते.”
“किंवा सावधगिरी बाळगून राहणारी”
“किंवा पुढच्यावर दुरून लक्ष ठेवणारी”

“हा १ पुढच्या १ ला चिकटला आहे. ही मुलगी पावलावर पाऊल टाकून अनुकरण करणारी आहे.”
“किंवा पाठीराखीण .. ”
“किंवा पाठीमागे लागणारी..”
“म्हणजेच पाठपुरावा करणारी ..”

“यातल्या लहान १ चे डोके मोठ्या १ च्या डोक्याच्या पातळीवर ठेवले आहे. ही समतावादी दिसते.”
“म्हणजेच न्यूनगंड न बाळगणारी ..”
“कदाचित स्वतःची उन्नती साधू पाहणारी असेल”

“यातला लहान १ मोठ्या १ च्या डोक्यावर उभा आहे. ही डोक्यावर चढून बसणारी असणार”
“म्हणजे अक्षरशः एकावर एक! वन अप(वू)मन !”
“दोघे मिळून जास्त उंची कशी गाठू शकतात हे ती दाखवते आहे.”
“खांद्यावर उभे राहणा-याला अधिक दूरवरचे दिसते हे न्यूटनचे वाक्य तिला ठाऊक आहे”

“यातला लहान १ मोठ्या १ च्या पुढे दाखवला आहे. ही मुलगी कोणत्याही बाबतीत पुढाकार घेणारी आहे.”
“समोरून येणारा हल्ला स्वतःच्या अंगावर घेण्याची तिची धडाडीची तयारी आहे.”
“अनावर उत्सुकतेपोटी ती पुढे जाणारी दिसते”
“आपल्या पाठीशी कोणी आहे याचा तिला विश्वास वाटतो आहे.”
“किंवा तिच्याकडे जबर आत्मविश्वास आहे.”

“या चित्रातल्या लहान १ ने मोठ्या १ ला चाट मारून आडवे पाडले आहे. ही खट्याळ दिसते.”
“किंवा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे तिला दाखवायचे आहे.”
“ती तर खाली पडलेल्या मोठ्या १ ला मदत करायला जवळ आली आहे, सुस्वभावी दिसते.”

“या चित्रातला लहान १ मोठ्या १ च्या पाठीवर ङभा आहे.”
” दुर्गामाता दिसते आहे.”
“ती कांहीच नाही, या चित्रातली पहा. यातल्या लहान १ ने मोठ्या १ ला साफ उताणे पाडले आहे.”
” आणि त्याच्या छाताडावर उभा आहे.”

“आता ही दोन्ही प्रकारची उत्तरे एकत्र पहायला पाहिजेत.”

ही चर्चा थांबवून डायरेक्टरने विचारले, “या सगळ्या मुलींना टाइपिंग, शॉर्टहँड येते ना ?”
“हो. सर्वांची त्यात चांगली गती आहे.”
“आणि सगळ्याजणी ते बिनचूक करतात.”
“अवघड जोडाक्षरे व्यवस्थित लिहितात.”
“व्याकरणातले नियम नीट पाळतात.”
“त्यांच्याकडे पुरेशी शब्दसंपत्ती (व्होकॅब्युलरी) आहे.”

“डायरी कशी ठेवायची हे त्यांना माहीत आहे ना?”
“हो. अॅपॉइंटमेंट्स  कशा द्यायच्या हे त्या जाणतात.”
“कुणाला ती लगेच द्यायची आणि कुणाला टिंगवायचे हे सुध्दा .. ”
“कोणती अॅपॉइंटमेंट घेणे जास्त महत्वाचे आहे याची जाण त्यांना आहे.”
“आणि ती कशी मिळवायची असते याची पण.. ”

“या सर्वांना नेहमीचे काँप्यूटर प्रोग्रॅम्स येतात ना?”
“हो. वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट वगैरे एमएस ऑफीसची माहिती यातल्या सगळ्या मुलींना आहे.”
“ई-मेल उघडणे, त्याचे उत्तर पाठवणे, त्याची अटॅचमेंट्स पाहणे आणि जोडणे वगैरे कामे या सर्वजणींना येतात.”
“इंटरनेटवर ब्राउजिंग करून आवश्यक ती माहिती शोधायला पण येते.”

“झालं तर मग. ही लाल स्कर्ट आणि सोनेरी टॉप घालून आलेली पोरगी बरी वाटते.  तिला जरा चांगले गुण जोडायचे आणि ते माझ्या ऑफीसला कसे उपयोगी ठरतील हे पहायचे काम तुमचे. तेवढे करून तिच्या नांवाने शिफारस देऊन टाका आणि तिला लगेच कामावर हजर व्हायला सांगा.

“?” “?” “?” “?” “?” “?” “?” “?”  (कमिटी मेंबर्सच्या चेहे-यावरील भाव)

(हा लेख यापूर्वी इतरत्र प्रसिध्द झाला आहे.)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: