गुढी पाडवा

गुढी पाडवा २०१३

गुढी पाडव्यानिमित्य सर्व वाचकांना मनःपूर्वक शुभेच्छा.

आज गुढी पाडवा, नव्या वर्षाची सुरुवात करून देणारा आनंददिन, सगळे लोक उत्साहाने साजरा करत आहेत. उंच गुढ्या उभारून आणि दाराला तोरण बांधून आपल्या मनातला आनंद इतरांना दिसावा, समजावा, सर्वांच्या मनात तो पसरावा असा प्रयत्न करतात. पण हा आनंद नेमका कशासाठी आणि काय म्हणून तो व्यक्त करायला पाहिजे? असा प्रश्न चिकीत्सक वृत्तीच्या लोकांना पडणारच. कित्येक निरुत्साही लोक तसे बोलून दाखवतात सुध्दा! नव्या पिढीतली मुले तर हा नववर्षदिन मानतच नाहीत अशी खंत एका पोक्त बाईंनी व्यक्त केल्याचे वृत्त वर्तमानपत्रात वाचले होते.

खरेच हा आनंद असलाच तर तो कशाचा असतो? कोणी म्हणतात की या दिवशी ब्रह्म्याने विश्वाची निर्मिती केली. म्हणजे तो सगळ्या विश्वाचाच ‘बर्थडे’ झाला. पण त्यात एक गोम अशी आहे की तिथी, वार, तारीख, महिना वगैरे सगळ्या गोष्टी आपण फक्त पृथ्वीवरील जीवनाच्या संदर्भात बोलू शकतो. पृथ्वीपासून थोडे दूर अंतराळात गेल्यास त्यांना कांहीही अर्थ उरत नाही कारण तिथे सूर्य कधी उगवतही नाही की मावळत नाही. तो सतत आभाळात तळपत असतो. म्हणजे एकीकडे कायमची उन्हाची अतीतीव्र अशी रखरख आणि त्याच बरोबर शून्याच्याही खूपच खाली इतके अतीशीत तपमान! मग दिवस,रात्र, हिवाळा, उन्हाळा केंव्हापासून केंव्हापर्यंत आणि कसा मोजणार? संपूर्ण विश्वाचा विचार केला तर आपली पृथ्वी धुळीच्या कणाइतकीसुध्दा नाही. तेव्हा पृथ्वीवरल्या तिथीला वैश्विक महत्व देता येणार नाही.

आणखी कोणी सांगतात की या दिवशी प्रभू रामचंद्रांचे लंकेहून अयोध्येत आगमन झाले. चौदा वर्षे वनवासात गेलेल्या आपल्या लाडक्या राजाचे पुन्हा दर्शन घडणार याचा अतीव आनंद सर्व अयोध्यावासीयांना झाला असणार. त्यातून रावणासारख्या बलाढ्य आणि दुष्ट शत्रूचे पारिपत्य करून तो येणार आहे याचे विशेष कौतुक त्यांना वाटले असणार. त्यामुळे त्यांनी आनंदोत्सव साजरा करणे अपेक्षित आहे. गुढ्या, तोरणे उभारून, कमानी वगैरे सजवून त्यांनी रामाचे स्वागत केले असणार. यानंतर रामासारखा सक्षम आणि न्यायप्रिय राजा मिळाल्यामुळे राज्यात सगळीकडे आबादीआबाद होऊन प्रजा अत्यंत सुखी होईल अशी आशाही त्यांच्या मनात निर्माण झाली असणार. त्या अपेक्षा फलद्रुप झाल्यामुळे त्याची आठवण म्हणून ते प्रजाजन दरवर्षी गुढी उभारून सण साजरा करत असतीलही. पण आता त्याचे काय प्रयोजन उरले आहे? रामावताराच्या समाप्तीबरोबरच रामराज्य देखील लयाला गेले आणि रावणापेक्षासुध्दा जास्त जुलमी व पापी राजवटी त्यानंतर इतिहासात येऊन गेल्या. तेंव्हा कधी काळी या दिवशी रामाने अयोध्येत प्रवेश केला होता या गोष्टीचे विशेष महत्व आज कोणाला वाटणार आहे? प्रत्यक्षात तसा आनंद कोणाला होतांना मला कधी दिसला नाही.

या दिवसाचे सर्वात जास्त महत्व त्या दिवसाला नसून त्याच्या आगेमागे सुरू होणा-या वसंत ऋतूला आहे. त्याआधी शिशिरामध्ये कडाक्याची थंडी असते. थंड हवेच्या प्रदेशातली झाडे बर्फाने झाकून गेली असतात. इतर ठिकाणीसुध्दा ब-याचशा झाडांची पाने या काळात गळून पडतात. वसंत ऋतूमध्ये त्यांना नवी पालवी फुटते आणि पाहता पाहता हिरव्यागार पानांनी ती मढवली जातात. चेरीसारखी झाडे फुलांनी डंवरून येतात. ते दृष्य पाहण्यासारखे असते. ट्यूलिपच्या फुलांनी फुललेल्या बागा तर अविस्मरणीय दिसतात. आपल्याकडेही बहुतेक वनराई प्रसन्न असते. आंब्याच्या झाडाला मोहर येतो, त्याचा सुगंध चहूकडे दरवळतो आणि छोट्या कै-या दिसायला लागतात. रबीच्या हंगामातली पिके डोलायला लागली असतात. त्यामुळे “वसंत वनात जनात हांसे, सृष्टीदेवी जणू नाचे उल्हासे। गातात संगीत पृथ्वीचे भाट, चैत्रवेशाखाचा ऐसा हा थाट ।।” असा आनंदी आनंद असतो.

विजेचे दिवे येण्यापूर्वीच्या काळात रात्रीच्या वेळेला फारसे महत्व असायचे नाही. फक्त निशाचरांच्या दृष्टीने तिला महत्व होते. सर्वसामान्य माणसांचा दिवस सूर्योदयापासून सुरू होत असे आणि संध्याकाळपर्यंत तो संपत असे. दिवस आणि रात्र या दोघांना मिळून सुध्दा दिवस असेच म्हणतात. त्याला वेगळे नांव दिलेले नाही. चैत्राच्या नवपल्लवीपासून निसर्गाच्या ऋतुचक्राची सुरुवात समजली जात असे आणि शिशिरात गळणा-या पानाबरोबर ते चक्र संपत असे. यामुळे वर्षाची सुरुवात ही निसर्गाच्या नव्या ऋतुचक्राची सुरुवात असल्यामुळे उत्साहाचे वातावरण तयार होणारच. सूर्योदयाचा क्षण आपल्याला नेमका पाहता येतो तशी वसंताची नेमकी सुरुवात जाणवत नाही. चेरीब्लॉसमसारखा निसर्गाचा अद्भुत चमत्कार आपल्याला दिसत नाही. यामुळे चैत्र शुध्द प्रतिपदेचा सर्वांना समजू शकेल असा दिवस या समारंभासाठी ठरवला गेला. नववर्षाची सुरुवातही त्याच दिवशी होत असल्यामुळे तेही निमित्य झाले. फलज्योतिष्यावर विश्वास बाळगणारे लोक नववर्षात ग्रहमान कसे राहील ते पाहू लागले. नवीन वर्ष सुखात जावे असे प्रत्येकाला वाटणारच. तशी प्रार्थना करणे, तशा सदीच्छा व्यक्त करणे वगैरे ओघानेच आले. या कारणांमुळे गुढी पाडव्याचा सण लोकप्रिय झाला.

“इकडे उन्हाने आमच्या जिवाची काहिली होते आहे आणि यांना वसंताचे आगमन कसले सुचते आहे?” असेच आज मुंबईकरांना वाटत असेल. तिथी, महिना आणि ऋतु यांच्यात ही एवढी तफावत कां दिसते आहे हे समजून घेण्यापूर्वी त्यांच्याबद्दलची थोडी माहिती असणे जरूरीचे आहे. पृथ्वी स्वतःभोवती एका दिवसात एक गिरकी घेते व सूर्याभोवती वर्षात एक फेरी मारते आणि चंद्र पृथ्वीला महिन्यात एक प्रदक्षिणा घालतो हे आता आपल्याला माहीत आहे. पण मुळात पृथ्वीच्या गिरकी घेण्याच्या कालावधीवरून दिवस ठरला, चंद्राच्या भ्रमणावरून सुमारे तीस दिवसांचा महिना आणि पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे बारा महिन्यांचे एक वर्ष ठरले गेले हे कदाचित सर्वांना ठाऊक नसते. आपण स्वतःच पृथ्वीच्या सोबत फिरत असल्यामुळे तिचा वेग आपल्या ज्ञानेंद्रियांना जाणवत नाही. विचारशक्ती आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर आपल्या बुध्दीला त्याचे आकलन होते.

पूर्वीच्या काळात वेगळी परिस्थिती होती. नजरेच्या टप्याच्या पलीकडे जमीन पसरलेली दिसते, क्षितिजावर दिसणा-या जागेकडे जातांना ते क्षितिजच पुढे पुढे सरकतांना दिसते. त्यामुळे जगाला कोठे अंत असणार नाही असे वाटते. भूकंपासारखे क्वचित येणारे प्रसंग सोडले तर एरवी धरती आपणा सर्वांना भक्कम आधार देते. तिच्या आधाराने आपली घरे आणि झाडे उभी असतात हे पाहिल्यावर पृथ्वी ही विपुला आणि अचला आहे अशी दृढ खात्री सर्वांना वाटत होती. तिचे असेच उल्लेख प्राचीन साहित्यात दिसतात. रोज सकाळी पूर्वेला उगवून व संपूर्ण आभाळाला पार करून संध्याकाळी पश्चिमेला मावळतांना प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणारा तेजस्वी पण आकाराने एकाद्या चेंडूएवढाच दिसणारा सूर्य विपुला पृथ्वीच्याही कोट्यवधी पटीने विशाल असेल आणि तो जागचा हलतही नसेल हे कुणालाही पटण्यासारखे नव्हते. क्वचित कोणा विद्वानांच्या मनात असे विचार आले असले तरी ते इतर विद्वज्जनांना मान्य होत नसत. जनसामान्य तर अशी कल्पनासुध्दा करू शकत नव्हते. त्यामुळे आभाळात चाललेल्या घडामोडी इथून आपल्याला कशा दिसतात याच्या आधारावरच खगोलशास्त्र निर्माण झाले, त्याचा अभ्यास होत गेला आणि अजून होत आहे. त्यात आढळलेल्या नियमित पुनरावृत्तीवरून कालगणना करण्याचे अद्भुत असे शास्त्र त्यातून तयार केले गेले.

अमावास्येला चंद्राचे अदृष्य होणे, त्यानंतर प्रतिपदेपासून कलेकलेने वाढत जात पौर्णिमेला त्याचे पूर्णबिंब दिसणे आणि त्यानंतर पुन्हा कलेकलेने लहान होत अमावास्येला गायब होणे हे चक्र सतत नियमितपणे चाललेले असते. या चक्राच्या कालावधीला ‘महिना’ असे नांव दिले गेले. प्रत्यक्षात तो कालावधी सुमारे साडेएकोणतीस दिवसांचा असतो. त्यामुळे आपल्या पंचांगातला महिना कधी तीस दिवसांचा तर कधी एकोणतीस दिवसांचा येतो. सुमारे ३५४ दिवसांत असे बारा महिने उलटून एक वर्ष संपते. सूर्य मावळताच आकाशात तारका दिसायला लागलेल्या असतात, पण चंद्र मात्र रोजच आदल्या दिवसाहून दोन घटिका उशीराने उगवतो. त्यामुळे आदल्या रात्री ज्या तारका त्याच्या आजूबाजूला होत्या त्या दुसरे दिवशी पश्चिमेकडे सरकल्या असतात व आदल्या दिवशी ज्या तारका त्याच्या मागे होत्या त्या आता त्याच्या सोबतीला आलेल्या दिसतात. असे करता करता सत्तावीस दिवसांनंतर सुरुवातीला त्याच्यासोबत असलेल्या तारका पुन्हा त्याच्या आसपास असतात. या सत्तीस तारकापुंजांना अश्विनी, भरणी वगैरे नांवे दिली गेली. तसेच त्यांना नक्षत्र म्हणण्यात आले. त्याचप्रमाणे त्याच तारकांचे बारा समान आकाराचे पुंज करून त्यांना राशी असे नांव दिले गेले. या नक्षत्र व राशींच्या संदर्भात सूर्य, चंद्र, शनी, मंगळ आदी ग्रहगोलांचे निरीक्षण करणे सोयीचे झाले. सर्व सत्तावीस नक्षत्रांतून फिरून चंद्र सत्तावीस दिवसात परत आलेला असतो, त्यामुळे अमावास्येपर्यंत तो आणखी पुढे सरकतो आणि रोज नक्षत्र बदलत प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री वेगळ्या नक्षत्रात असतो. वर्षाच्या पहिल्या महिन्यात तो चित्रा नक्षत्रात असतो म्हणून तो चैत्र महिना आणि पुढल्या महिन्यात विशाखा नक्षत्रात असतो म्हणून वैशाख महिना अशी बारा महिन्यांची नांवे पडली.

सूर्याला कला नसतात, पण दिवस आणि रात्री सतत सहा महिने लहान लहान किंवा मोठ्या मोठ्या होत जातात, त्याचे एक चक्र असते, ते सुमारे ३६५ दिवसांचे असते. ते एक वर्ष धरले जाते. सूर्य आभाळात तळपत असतांना तेथे कोणत्याही चांदण्या दिसू शकत नाहीत, पण सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर अंधार पडल्यावर केलेल्या निरीक्षणावरून तो कोणत्या राशीत आहे ते समजते. एका राशीतून पूर्ण प्रवास करून पुढील राशीत जायला सूर्याला तीस ते एकतीस दिवस लागतात. त्या कालावधीलाही महिना असे नांव दिले गेले. अशा बारा महिन्यांचे चक्र सुमारे ३६५ दिवसांचे असते. जेंव्हा चंद्र आपल्या चक्रातून बारा वेळा फिरून आलेला असतो तेंव्हा ३५४ दिवस झालेले असतात, पण सूर्याला आपल्या पूर्वीच्या जागेवर यायला अजून ११ दिवस लागतात. तोपर्यंत चंद्राच्या पुढील महिन्याचे अकरा दिवस झालेले असतात. पाश्चात्य देशात सुमारे ३६५ दिवसांचे सौर वर्ष पाळले जाते ते पूर्णपणे सूर्याच्या स्थितीवरच आधारलेले असते. त्याचा चंद्राशी कांही संबंध नसल्यामुळे कोणत्याही तारखेला पौर्णिमा, अमावास्या किंवा इतर कोणतीही तिथी येऊ शकते. दिवसांचे लहान व मोठे होत जाणे हे मात्र तारखेप्रमाणेच ठरत असल्यामुळे वर्षातला सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान दिवस ठरलेले आहेत. ते अनुक्रमे जून आणि डिसेंबर या महिन्यातच ठरलेल्या तारखेला येतात. उन्हाळा व हिवाळा या गोष्टी सूर्यप्रकाशामुळे घडत असल्यामुळे पाश्चात्य कॅलेंडरप्रमाणे त्या ठराविक महिन्यात येतात. पण भारतीय पंचांगातले महिने थोडे आगे मागे होत राहतात. चंद्र आणि सूर्य यांच्या निरीक्षणावर आधारलेल्या कालावधीत फार जास्त अंतर पडू नये यासाठी भारतीय पध्दतीत दर तीन वर्षात एक अधिक महिना पाळला जातो. तरीही या वर्षीचा गुढी पाडवा अकरा एप्रिलला आला असला तरी पुढील वर्षी तो याच तारखेला कधीच येणार नाही. ज्या वर्षात अधिक मास नसतो त्या वर्षानंतर तो त्या तारखेच्या दहा अकरा दिवस आधी येतो आणि जर त्या वर्षात अधिकमास असेल त्यानंतरच्या वर्षात तो वीस बावीस दिवस उशीराने येतो.

या अनिश्चिततेमुळे पंचांगातील महिने व निसर्गातील ऋतु यात फरक येतो. दुसरी गोष्ट अशी आहे की वर्षातले सहा ऋतु मानले असले तरी प्रत्येकाचा नैसर्गिक कालावधी समानच असण्याचे कारण नाही. सर्वसाधारणपणे उन्हाळा आणि हिवाळा हे प्रमुख ऋतू जास्त काळ जाणवत राहतात आणि वसंत किंवा शरदासारखे हवानामात बदल घडवून आणणारे दिवस थोडेच असतात. भौगोलिक परिस्थितीप्रमाणे प्रत्येक जागी वेगवेगळे हवामान असते. उत्तरेकडील युरोप खंडात कडाक्याची थंडी पडत असल्यामुळे त्यांना उन्हाळा अत्यंत सुखावह वाटतो आणि उन्हाळ्याची नुसती चाहूल देणारा वसंतसुध्दा त्यांना स्वागतार्ह वाटतो. मुंबईमध्ये प्रचंड उकाड्यामुळे उन्हाळा अगदी नकोसा वाटतो आणि गुलाबी थंडीचा शिशिर ऋतूच छान वाटतो. तो संपून वसंत सुरू होताच आनंद होण्यापेक्षा येणा-या उकाड्याची चाहूल जास्त अस्वस्थ करते. पश्चिम किनारपट्टी सोडल्यास महाराष्ट्राच्या इतर भागात मात्र वसंत ऋतू थोडा बहरलेला जाणवतो.

ऋतूनुसार सणवार ठरवतांना भारतातील वेगवेगळ्या भागांचा विचार केला जात असल्यामुळे स्थानिक हवामानाप्रमाणे त्यांना कमी अधिक महत्व मिळत जाते. उत्तरेकडील पंजाबमध्ये बैसाखी अधिक लोकप्रिय होते तर महाराष्ट्रात दसरा आणि दिवाळी. तरीही गुढी पाडव्यालासुध्दा त्याचे म्हणून महत्व आहेच!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: