श्रीरामाची उपासना

विश्वातील चराचरात भरून राहिलेल्या निर्गुण निराकार परमेश्वराची आराधना आणि उपासना करणे कठीण असते. यामुळे ती असंख्य दृष्य प्रतिमांच्या स्वरूपात केली जाते. विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय सांभाळणारी ब्रम्हा, विष्णू व महेश ही त्रिमूर्ती आणि आदिशक्ती ही ईश्वराची प्रमुख रूपे धरली तरी प्रसंगोपात्त इतर अनेक रूपांमध्ये देव प्रकट झाला किंवा त्याने अवतार घेतला याच्या सुरस कथा आपल्या धार्मिक वाङ्मयात आहेत. अंबरीशासाठी भगवान विष्णूचे जे दहा अवतार झाले त्यातील मत्स्य, कूर्म वगैरेंबद्दल कोणाला फारसे कांही माहीत नसते, किंवा त्यांची स्वतंत्र मंदिरे सहसा दिसत नाहीत. मोठ्या देवळांच्या भिंतींवर किंवा खांबांवर कधी कधी दशावताराची चित्रे असतात त्यात मत्स्यावतार दिसतो. अनेक देवळांच्या फरशीवर कासवाला विराजमान होतांना दिसते, पण तो कूर्मावतार आहे का याबद्दल मला शंका वाटते. कुणीही त्याची पूजा करतांना मी पाहिले नाही. वराह, नरसिंह, वामन वगैरेंची देवळेही कमीच आहेत आणि घरात त्यांची प्रतिमा ठेवून त्यांची उपासना करणारे मी तरी पाहिले नाहीत. परशुरामाला आजकाल खूप महत्व आणि प्रसिध्दी मिळत असली तरी त्यामागची कारणे वेगळी असावीत. राम आणि कृष्ण हे दोन अवतार मात्र विशेष प्रसिध्द आणि लोकप्रिय आहेत. आपले जीवन रामाने किती व्यापून टाकले आहे हे आपण मागील भागात पाहिले होते. त्याच्या उपासनेबद्दल थोडे या भागात पाहू.

परंपरेने चालत आलेल्या समजुतीनुसार रामनामाचा जप केल्याने माणसाच्या सर्व पापांचे क्षालन होते, त्याचे दैन्य, दुःख वगैरे नाहीशी होतात आणि अंती तो भवसागर पार करतो अशी भाविकांची दृढ श्रध्दा असते. “रामनामाने शिळा उध्दरल्या.” या कथेवर त्यांचा पूर्ण विश्वास असतो. आपला उध्दार होण्याच्या इच्छेने श्रध्दाळू लोक जमेल तेंव्हा जमेल तितके वेळा तोंडाने रामनाम घेतात. बरेच लोक “श्रीराम जयराम जयजयराम” या मंत्राचा नियमितपणे एकशे आठ किंवा हजार वेळा जप करतात. वेळी प्रसंगी लक्ष किंवा कोटी वेळा या नामाचा जप करण्याचे किंवा अखंड नामस्मरणाच्या सप्ताहासारख्या उत्सवाचे आयोजन केले जाते

‘सेतुबंधन’, ‘ पुष्पक विमान’ वगैरे सर्व पौराणिक संकल्पना शंभर टक्के सत्य होत्या असे मानणारा सुशिक्षित किंवा उच्चशिक्षित लोकांचा एक नवा वर्ग मला भेटतो. या लोकांनी विज्ञानाचे शिक्षण घेतलेले असते पण तरीसुध्दा  आर्किमिडीज, न्यूटन वगैरे शास्त्रज्ञांनी मांडलेल्या सिध्दांतांपेक्षा या लोकांचा पुराणांतील कथांवर जास्त विश्वास असतो. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी एवढी प्रगती केलेली होती की त्यांना हे साध्य होते असे त्यांना ठामपणे वाटते. विज्ञानातील चार शब्दांचा उपयोग करून “रामनामाच्या उच्चारातून ज्या ध्वनिलहरी उठतात त्यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ती घरभर पसरून कानाकोप-यातल्या ऋण ऊर्जेला हुसकून लावते. याच लहरी शरीरातील रक्ताभिसरण वाढवतात, छातीचे ठोके नियमित करतात, रक्तदाबावर नियंत्रण ठेवतात. एकंदरीतच शरीर, मन आणि आत्मा यांचे शुध्दीकरण करतात.” वगैरे अनेक ‘शास्त्रीय’ गुण हे लोक रामनामाला जोडतात. पण भक्तीमार्गाने जाऊन प्रत्यक्षात रामाचे नामस्मरण करतांना मात्र मी त्यांना फारसे पाहिले नाही.

माझ्या लहानपणच्या जगात रोज संध्याकाळी दिवेलागणी झाल्यावर घरातली सारी मुले एकत्र बसून रामरक्षा म्हणत. त्यामुळे सगळ्या संकटांपासून संरक्षण मिळते, सर्व मनोकामना पूर्ण होतात वगैरे सांगितले जात असले तरी तसा तेवढा प्रत्यक्ष अनुभव येत नव्हता. त्या वयात मनातल्या इच्छा पूर्ण होण्याची वाट पहायला धीर नसतो. आंबा खावा असे वाटले की अल्लाउद्दीनच्या दिव्यातल्या राक्षसाप्रमाणे कोणीतरी तो हांतात आणून द्यायला हवा तर त्याचा कांही उपयोग! पायापासून डोक्यापर्यंत एकेका अवयवाचे नांव घेऊन त्याचे संरक्षण राम करो अशी रोज प्रार्थना करीत असलो तरी ठेचकाळणे, खोक पडणे, ताप, खोकला, पोटदुखी वगैरे जे कांही व्हायचे ते होतच असे. त्या वयात पापक्षालन, मोक्ष, मुक्ती वगैरेंचे आकर्षण वाटायचेच नाही. तरीही एक मजेदार कारण पटत असे. त्या लहान गांवात कांही पडकी ओसाड घरे होती, अनेक जुनाट वृक्ष होते आणि रात्री काळोखाचे साम्राज्य असे. त्यात “हा खेळ सांवल्यांचा” चालत असे. वा-याच्या झुळुकीबरोबर पाने हालत आणि कुठला तरी नादही त्याबरोबर कधी वहात येत असेल. त्यामुळे अनेक प्रकारचे भास कोणाला तरी होत आणि त्याची वर्णने तिखटमीठ लावून पसरली जात. अमक्या झाडावर मुंजा आहे, दुसरीकडे हडळ आहे, कुठे बांगड्यांची किणकिण ऐकायला येते तर कुठे पैंजणांची छुमछुम वीजत असते अशा प्रकारच्या गोष्टी नेहमीच कानावर पडत असे. असल्या अगोचर शक्तींवर रामरक्षा हा रामबाण उपाय होता. त्यामुळे भक्तीभावाने नसली तरी भीतीपासून मुक्ती मिळवण्यासाठी रामरक्षा म्हंटली जात असे.

आमच्या गांवात शंकराची अनेक देवालये होती. मारुती, गणपती, विठोबा, दत्त वगैरें देवांची एकाहून जास्त देवळे होती. घरातील वडील मंडळींपैकी कोणी ना कोणी दर सोमवारी शंकराच्या, गुरुवारी दत्ताच्या, शुक्रवारी अंबाबाईच्या आणि शनिवारी मारुतीच्या दर्शनाला नियमितपणे जात. एकादशीला विठ्ठल आणि संकष्टीला गणपतीच्या देवळात जाणे ठरलेले असे. तिथे जाऊन कुणापुढे नारळ फोडणे, कुठे ओटी भरणे, कुठे तिथल्या दिव्यात तेल घालणे, कुठे अभिषेक करवणे वगैरे विधी अधून मधून होत असत. गांवात रामाचे मंदीरसुध्दा होते, पण त्याचे दर्शन घेण्याचा कुठला वार किंवा तिथी ठरलेली नव्हती. दरवर्षी होणा-या रामनवमीच्या सोहळ्याखेरीज एरवी कधी रामाच्या देवळात गेल्याचे मला आठवत नाही. घरातल्या देवांच्या सिंहासनात इतर अनेक मूर्ती होत्या, रांगणारा बाळकृष्णसुध्दा होता, पण रामाची मूर्ती कांही नव्हती. नाही म्हणायला दिवाणखान्यात अनेक देव देवता, साधुसंत आणि पूर्वजांच्या फोटोबरोबर रविवर्म्याने काढलेले रामपंचायतनाचे फ्रेम केलेले चित्र होते. पण कधी त्याला हार घातलेला आठवत नाही. एकंदरीत आमच्या घरातल्या रोजच्या पूजाअर्चेच्या विधीमध्ये रामाचा समावेश नव्हता. माझ्या ओळखीत तरी मी इतर कोणाकडेही तो पाहिला नाही. आमच्या गांवातले राममंदीर आणि नाशिकचे काळा राम व गोरा राम वगळता इतर कुठल्या गांवातले राममंदीरसुध्दा मला पाहिल्याचे स्मरणात नाही. मुंबईला गिरगांवात मराठी लोकांचे आणि माटुंग्याला मद्रासी लोकांचे अशी रामाची मंदिरे आहेत असे नुसते ऐकले आहे.

उत्तर भारतात गोस्वामी तुलसीदासांच्या रामचरितमानसाचे खूप महत्व आहे. अनेक लोक त्याची पारायणे सारखी करत असतात. कांही लोकांना ते तोंडपाठ असते. रामचरितमानसातल्या दोह्यांवर आधारलेले सवाल जवाब किंवा अंताक्षरीचे कार्यक्रमदेखील तिकडे होतात इतके ते सर्वश्रुत आहे. रामचरितमानसाइतके लोकप्रिय रामायणाचे पुस्तक महाराष्ट्रात नाही. आमच्या घरी रामविजय नांवाची एक पोथी होती ती माझ्या आईला अत्यंत प्रिय होती. एकादे कथाकादंबरीचे पुस्तक कुठेही, केंव्हाही बसून किंवा पडल्या पडल्या संवडीने वाचता येते, मधला कंटाळवाणा भाग वाटल्यास वगळता येतो किंवा ते पुस्तक वाचणेच अर्धवट सोडता येते. तसे पोथीच्या बाबतीत करता येत नाही. तिचे पारायण करायचे झाल्यास सचैल स्नान करून पाटावर बसून त्यातील अक्षर अन् अक्षर स्पष्ट उच्चार करीत वाचायचे असते. सुरू केलेला अध्याय मध्येच सोडता येत नाही आणि सुरू केलेले पारायण पूर्ण करून त्याची विधीवत यथासांग समाप्ती करावी लागते. लहान मुलांना हे सगळे शक्य नसल्याने मला ती पोथी वाचायची फारशी संधी मिळाली नाही. पण जेवढी श्रवणभक्ती करता येणे शक्य झाले त्यावरून त्या पोथीत रामाच्या चरित्राची गोष्ट अत्यंत रसाळ शब्दात सांगितली आहे एवढे नक्की समजले. रामनामाचा जप, रामरक्षा आणि या पोथीच्या पारायणाखेरीज रामाची अन्य कोणती उपासना आमच्या घरी होत नव्हती.

रामदासस्वामी पूर्णपणे रामभक्त होते. त्यांना जगात चोहीकडे श्रीरामाचे दर्शन होत होते. कंबरेवर हात ठेऊन उभ्या असलेल्या पंढरपूरच्या विठोबाला पाहून त्यांनी ” इथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा” असे विचारले होते. पण त्यांनीसुध्दा श्रीरामाची मंदिरे उभी करण्याऐवजी हनुमंताची देवळे बांधून त्यातून जनतेचे बलसंवर्धन करण्यासाठी प्रचार केला असे दिसते. आजही गांवागांवात जेवढी मारुतीची देवळे दिसतात तेवढी श्रीरामाची दिसत नाहीत.

—–

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: