एप्रिल फुले

एप्रिलफुले

एप्रिल महिन्याची सुरुवात ‘एप्रिल फूल’ ने होते. संभावितपणाचा आव आणून एकादी लोणकढी थाप मारायची, कोणाला तरी गंडवायचे आणि त्याला जो फसेल त्याची टर उडवायची. पण हे सगळे अगदी माफक प्रमाणात. त्यापासून कोणी दुखावले जाणार नाही, कोणाला नुकसान किंवा इजा पोचणार नाही, त्यात आपला लाभ तर नाहीच नाही एवढी काळजी घेत ती मस्करी करायची.

एवढा थोडा मजेचा भाग सोडला तर लहानपणची एप्रिल महिन्याची मुख्य आठवण म्हणजे वार्षिक परीक्षा. त्या काळात बॉलपेनचा शोध लागला नव्हता. शाळेमधील मुलांनी फाउंटन पेन वापरण्यावर बंदी होती. पेनमुळे अक्षर बिघडते अशी समजूत होती. शिवाय त्या काळात महागडे वाटणारे पेन आणि त्याहून महागडी त्याची खास स्पिरिटमधली शाई यांची चैन गरीब मुलांना परवडण्यासारखी नव्हती, त्याची निबे स्थानिक बाजारात मिळत नव्हती. यामुळे शाळेतले रोजचे लिहिणे शिसपेनने करायचे आणि परीक्षेसाठी दौत टांक न्यायचा अशी रीत होती. एक पैशाला शाईची पुडी मिळायची आणि एक किंवा दोन पैशाला टांकाचे नवे निब. एका आण्यात अशी वार्षिक परीक्षेची तयारी करायची. शाळेत मास्तरांनी शिकवतांना जेवढे कानावर पडले असेल, त्यातले जेवढे लक्षात राहिले असले तर असेल. त्याच्या पलीकडे वर्षभर घरात फारसा अभ्यास असा केलेला नसायचा. वार्षिक परीक्षेच्या आधी मात्र मान मोडून सर्व विषयांची उजळणी करायची आणि ते ज्ञान परीक्षेच्या पेपरात भडाभडा ओकून मोकळे व्हायचे. शेवटचा पेपर लिहून परत येतायेताच कुठेतरी दौत फोडून टाकायची आणि टांक भिरकावून द्यायचा इतका त्यांचा वीट आलेला असे. पुढले सहा महिने तरी त्यांची गरज पडायची नाही.

वार्षिक परीक्षा संपली की मुलांच्यासाठी मे महिन्याची सुटी सुरू होऊन जाई. त्यामुळे हुंदडायला आणि खेळायला सारा दिवस मोकळा असायचा. मध्येच एक दिवस रिझल्टसाठी शाळेत जावे लागायचे पण मला तरी त्याचे बिलकुल टेन्शन नसायचे. माझी गणना ‘हुशार’ विद्यार्थ्यात होत असल्यामुळे नापास व्हायचा प्रश्नच नव्हता. पहिल्या दुस-या क्रमांकासाठी आतासारखी स्पर्धाही नव्हती. वर्गातल्या तीन चार ‘हुशार’ मुलांपैकी कधी कोणाला कधी कोणाला आलटून पालटून पहिला, दुसरा, तिसरा वगैरे नंबर मिळायचे. त्यांना कसलेही बक्षिस नसायचे त्यामुळे ते मिळाल्याचा आनंदही नव्हता किंवा हुकल्याचे दुःखही नसायचे.

कांही झाडांना वर्षभर फुले लागतात तर कांही फुले मात्र फक्त त्यांच्या ठराविक मोसमांत येतात एवढे सामान्यज्ञान आजूबाजूच्या निसर्गाकडे पाहून माहीत झाले होते. बहुतेक सगळीच झाडे पावसाळ्यात जोमाने वाढायची आणि प्रसन्नपणे फुलायची, त्यातली कांही दसरा दिवाळीकडे बहराला यायची. पण एप्रिल महिन्याचा फुलांबरोबर कसला संबंध नव्हता. आमच्याकडल्या बारमाही फुले सोडल्यास इतर कुठल्याच फूलझाडांना एप्रिलमध्ये बहर येत नव्हता. आंब्यालाही त्यापूर्वीच मोहोर येऊन गेलेला असायचा. मुंबईला आल्यावर निसर्गाशी असलेला प्रत्यक्ष संबंध तुटला होता. गुलाबाची आणि झेंडूची फुले बाजारात इथे वर्षभर मिळतात. सणावारांच्या सुमारास त्यांची किंमत वाढते, पण त्याचा आर्थिक संबंध पुरवठ्याशी नसून मागणीशी आहे एवढे अर्थशास्त्र समजत होते.

इंग्लंडमध्ये थंडीच्या दिवसात बर्फाच्छादित निसर्ग पाहिला. त्या काळात झाडांना फूल येणे तर सोडा, त्यांची बहुतेक सगळी पाने सुध्दा गळून पडलेली असतात. ते पाहिल्यानंतर त्यांच्या स्प्रिंगमध्ये येणा-या बहराचे महत्व जाणवले. मार्च महिन्यात बर्फ वितळायला सुरुवात होऊन त्याखाली दबलेली झाडे नव्या पल्लवीने ताजी तवानी होतात आणि मार्च अखेर ती प्रफुल्लित होतात. चेरीची झाडे फुलांनी झाकून जातात आणि रंगीबेरंगी दिसू लागतात. ट्यूलिपसारख्या फुलांची शोभा कांही औरच असते. खास करून ती शोभा पहाण्यासाठी हॉलंडमध्ये विस्तीर्ण बगीचे बनवले आहेत. त्यात वेगवेगळ्या जातींची ट्युलिप्सची झाडे लावून व वर्षभर खतपाणी घालून त्यांची काळजीपूर्वक निगा राखली जाते. मार्च एप्रिलमध्ये त्यांना अपूर्व असा बहर येतो आणि तो पहाण्यासाठी जगभरातून कोट्यवधी पर्यटक तिथे गर्दी करतात. काही वर्षांपूर्वीच्या एका एप्रिल महिन्यात आम्हाला ही संधी मिळाली. त्या अनुभवाचे वर्णन मी माझ्या ग्रँड युरोप वरील ब्लॉगमध्ये केले होते.

अशा प्रकारच्या बागा आता देशोदेशी तयार केल्या जाऊ लागल्या आहेत. युरोप सहलीत आम्हाला सर्वच देशात छोट्या छोट्या आकाराच्या ट्युलिपच्या बगीचांचे दर्शन घडत होते. त्याशिवाय कुठे रस्त्यांना दुभागणा-या बेटात ट्यूलिपच्या फुलांची रांग दिसे तर कुठे हॉटेलच्या रिसेप्शन कौंटरवर ती फुले सुंदर फुलदाणीत सजवून ठेवलेली दिसत. काश्मीरच्या सुप्रसिध्द मुगल गार्डन्समध्ये कांही भागात ट्यूलिपची फुले लावली असल्याचा वृत्तांत वर्तमानपत्रात वाचला होता. आता अमेरिकेत राहणा-या माझ्या भाचीने तिथल्या ट्यूलिप फेस्टिव्हलची छाया चित्रे पाठवली आहेत. कदाचित हॉलंडमधील बागांपेक्षाही तिथली शेते अवाढव्य आकाराची असावीत. नाही तरी अमेरिकन लोकांना आकाराच्या मोठेपणाचे भारी कौतुक आहे. क्षितिजांपर्यंत पसरतांना दिसणारी एकसारख्या रंगांच्या फुलांची रांग खरेच मुग्ध करून सोडते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: