महाराष्ट्र देश आणि महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र

आपले महाराष्ट्र हे राज्य आपल्या भारत या देशाचा एक भाग आहे हे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना माहीत आहे, पण “बहु असोत सुंदर संपन्न की महा । प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।” आणि “मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा । प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ।।” अशासारख्या सुप्रसिद्ध जुन्या कवितांमध्ये ‘महाराष्ट्रदेश’ असे वर्णन आले आहे. या गीतांचे कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि गोविंदाग्रज या सुविद्य व्यक्तींना महाराष्ट्र हा एक देश नसून ते एक राज्य आहे इतकी साधी गोष्ट माहीत नव्हती कां? किंवा त्यांच्या मनांत भारतातून फुटून निघून महाराष्ट्र हा एक स्वतंत्र देश बनावा असे देशद्रोही विचार होते असे कोणाला वाटेल. पण तसे कांहीसुद्धा असणे शक्य नाही. मग नेमका काय घोळ आहे?

पहायला गेले तर ‘देश’, ‘प्रदेश’, ‘राज्य’, ‘राष्ट्र’ वगैरे शब्द जुनेच आहेत, पण या शब्दांचा जो अर्थ आपण काढतो तो मात्र तितकासा जुना नाही. एका राजाच्या अंमलाखालील प्रदेश म्हणजे ‘राज्य’ या अर्थाने हा शब्द प्राचीनकालापासून रूढ होता. मोठा बलशाली राजा असेल तर तो सम्राट या नांवाने ओळखला जात असे व इतर राजे त्याचे मांडलीक बनून रहात. त्या सर्वांचे मिळून त्याचे ‘साम्राज्य’ बनत असे. शंभर वर्षापूर्वी जगातील पांचही खंडांत इंग्रजांचे साम्राज्य पसरले होते. कॅनडा, ऑस्ट्रेलिया किंवा केनिया, युगांडा यांप्रमाणेच इंडिया किंवा हिंदुस्तान हा त्याचा भाग होता. आपल्या सोयीसाठी इंग्रजांनी आधी त्यातून बर्मा (ब्रम्हदेश किंवा आताचा मायनामार) व सिलोन (आताची श्रीलंका) वेगळे केले व स्वातंत्र्य देण्यापूर्वी हिंदुस्तानाचे विभाजन करून त्यातून भारत व पाकिस्तान असे दोन देश निर्माण केले. या शिवाय हैदराबाद व म्हैसूरसारखी प्रचंड आकाराची तसेच सांगली वा जमखंडी यासारखी छोटेखानी अनेक संस्थाने इंग्रजांच्या अधिपत्याखाली होती. तेथील संस्थानिकसुद्धा स्वतःला ‘राजे’ म्हणवून घेत व त्यांचे संस्थान हे त्यांचे ‘राज्य’ असे. माझ्या लहानपणी आमच्या पाठ्यपुस्तकांत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यू.एस्.ए.) चा उल्लेख ‘अमेरिकेची संयुक्त संस्थाने’ असा केला जात असे. ब्रिटिश इंडियाची विभागणी मुंबई, मद्रास, बंगाल, पंजाब इत्यादि इलाख्यांमध्ये (प्रॉव्हिन्सेसमध्ये) केलेली होती.

इंग्रजी साम्राज्याला विरोध करून स्वातंत्र्याचा लढा देणा-या स्वातंत्र्यवीरांनीच ‘देश’ आणि ‘राष्ट्र’ हे शब्द आज रूढ असलेल्या अर्थाने प्रचारात आणले असावेत. आता ते ‘कंट्री’ आणि ‘नेशन’ या इंग्रजी शब्दांचे प्रतिशब्द वाटतात. पण भौगोलिक सीमारेषा दाखवणारा ‘कंट्री’ हा शब्द आणि त्या सीमांमध्ये राहणा-या लोकांचा समूह म्हणजे ‘नेशन’ इतका स्पष्ट फरक ‘देश’ आणि ‘राष्ट्र’ या शब्दांचा उपयोग करतांना केला जात नाही व हे दोन्ही समानार्थी शब्दच असावेत असे वाटते. संपूर्ण हिंदुस्तान हा एक देश असावा ही भावनाच इंग्रजांना मान्य नव्हती व त्यांना सोयीची नव्हती. शिवाय ते इकडे येण्यापूर्वीसुद्धा तो अनेक राजे, नवाब, बादशहा वगैरेंच्या बिन्न राज्यांमध्ये विभागला गेलेला होताच. त्यामुळे त्या काळात आपण व आपल्या ओळखीच्या व्यक्ती रहात असलेल्या जागेच्या आजूबाजूचा आपल्या परिचयाचा भाग तेवढा ‘आपला देश’ आणि त्याच्या पलीकडील सगळा अपरिचित भाग ‘परदेश’ या अर्थाने हे शब्द वापरले जात असावेत असे जुनी पुस्तके वाचतांना वाटते. खुद्द पश्चिम महाराष्ट्राचेच समुद्गकिना-यालगत असलेले ‘कोकण’ आणि सह्याद्रीच्या पलीकडला भाग म्हणजे ‘देश’ असे दोन भाग होते. तिथे राहणारे अनुक्रमे कोकणस्थ आणि देशस्थ म्हणून ओळखले जात असत.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेलांनी सगळी संस्थाने खालसा करून त्यांच्या अंमलाखालील भूभाग भारतीय संघराज्यात विलीन करून घेतल्यानंतर जुनी राजेशाही संपुष्टात आली होती. त्यानंतरच्या काळात भारताची जी फेररचना करण्यात आली त्यात ‘प्रॉव्हिन्स’च्या जागी ‘स्टेट’ आणि ‘इलाखा’च्या जागी ‘राज्य’ हे शब्द आले. ‘राज्य’ या शब्दाला नवीन अर्थ दिला गेला, त्याची नव्याने व्याख्या केली गेली. ‘प्रांत’ हा त्या काळी प्रचारात असलेला शब्द बदलून त्याऐवजी ‘राज्य’ या संस्कृत शब्दाला प्राधान्य दिले गेले व अनेक ‘राज्यां’चे मिळून भारतीय ‘संघराज्य’ करण्यात आले. तसेच भारत हा एक ‘देश’ असे सर्वसामान्यपणे समजले जाऊ लागले.

खरे तर ‘प्रदेश’ हा ‘देशा’पेक्षा मोठा असायला हवा. पण त्याचा संकोच करून ‘उत्तर प्रदेश’, ‘मध्यप्रदेश’, ‘आंध्रप्रदेश’ अशी नांवे राज्यांना दिली गेली. त्याचप्रमाणे ‘महाराष्ट्र’ हे राष्ट्रापेक्षा महान असले पाहिजे, पण खूप काळ घासाघीस करून शेवटी ते नांव आपल्या राज्याला देण्यात आले. यासाठी मोठा लढासुद्धा दिला गेला होता. हे करतांना फक्त व्याकरणाचा विचार न करता कांही परंपरा व लोकांच्या भावनांना महत्व देण्यात आले.

वर उल्लेख केलेल्या दोन्ही कविता ज्या काळांत लिहिल्या गेल्या तेंव्हा ‘राज्य’ ही संकल्पनाच वेगळी होती आणि ‘देश’ शब्दाचा तत्कालिन रूढ अर्थही वेगळा होता. पण महाराष्ट्राचा भूगोल आणि इथल्या रहिवाशांच्या पूर्वजांनी रचलेला इतिहास या दोन्हींचे अत्यंत मार्मिक वर्णन या दोन्ही कवितांमध्ये दिले आहे आणि त्या अजरामर झालेल्या आहेत. इंग्रजांच्या राज्यात मराठी भाषा बोलणारी जनता मुंबई व मध्यप्रांतात तसेच हैद्राबाद संस्थानात विभागून इतर भाषिक लोकांबरोबर रहात होती. १ मे रोजी आपण जो महाराष्ट्रदिन साजरा करतो त्या दिवशी मुख्यतः मराठीभाषिक लोकांची वस्ती असलेल्या या सर्व प्रदेशांचे एकत्रीकरण करून त्याचे एक वेगळे राज्य बनवण्यात आले. ही एक प्रशासनिक पुनर्रचना होती. यापूर्वीसुद्धा तेथील मराठी लोक व त्यांची संस्कृती अस्तित्वात होतीच. महाराष्ट्राचा ‘जन्म’ त्या दिवशी झाला म्हणजे तिथे पूर्वी कांही नव्हते अशातला भाग नाही. ‘महाराष्ट्र’ या नांवाच्या एका राज्याचा नवा प्रशासनिक कारभार त्या दिवशी सुरू झाला.

——————————————————————

उद्या महाराष्ट्र राज्याचा वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्याने काही जुनी महाराष्ट्रगीते सादर करीत आहे.

महाराष्ट्र गीत – १
बहु असोत सुंदर संपन्न की महा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

गगनभेदी गिरीविण अणु नच जिथे उणे ।
आकांक्षांपुढती जिथे गगन ठेंगणे ।
अटकेवरी जेथिल तुरंगि जल पिणे ।
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ।
पौरुषास अटक गमे जेथ दुःसहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे ।
सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे ।
रत्नां वा मौक्तिकांही मूल्य मुळी नुरे ।
रमणींची कूस जिथे नृमणीखनि ठरे ।
शुद्ध तिचे शीलही उजळवी गृहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

नग्न खड्ग करि उघडे बघुनि मावळे ।
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे ।
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले ।
भासति शतगुणित जरी असति एकले ।
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

विक्रम वैराग्य एक जागि नांदती ।
जरीपटका भगवा झेंडाही डोलती ।
धर्म राजकारण समवेत चालती ।
शक्ति युक्ती एकवटुनि कार्य साधिती ।
पसरे यत्कीर्ती अशी विस्मयावहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो ।
स्फूर्ती दीप्तीधृतिही जेथ अंतरी ठसो ।
वचनी लेखनीही मराठी गिरा दिसो ।
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनी वसो ।
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

कवि – श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

महाराष्ट्र गीत – २
दुस-या एका सुप्रसिद्ध महाराष्ट्रगीताची दोन कडवी खाली उद्धृत करीत आहे.

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ।।

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा ।
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा ।
अंजन कांचन करवंदीच्या कांटेरी देशा ।
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा ।
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा ।
शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा ।
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी ।
जोडी इहपरलोकांसी,व्यवहारा परमार्गासी ।
वैभवासी, वैराग्यासी ।
जरीपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ।।

अपर सिंधूच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा ।
सह्याद्रीच्या सख्या जिवलगा, महाराष्ट्र देशा ।
पाषाणाच्या देही धरिसी तू हिरव्या वेषा ।
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटीच्या रेषा ।
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची ।
मंगल वसती, जनस्थानींची श्रीरघुनाथांची ।
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी ।
जोडी इहपरलोकांसी,व्यवहारा परमार्गासी,वैभवासी, वैराग्यासी ।
जरीपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ।।

….. गोविंदाग्रज

महाराष्ट्र गीत – ३
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ।।

रेवा वरदा, कृष्णा कोयना, भद्रा गोदावरी ।
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी ।
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा ।।

भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा ।
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा ।
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिव शंभू राजा ।
दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ।।

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी ।
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी ।
दरिद्र्याच्या उन्हात शिजला ।
निढळाच्या घामाने भिजला ।
देशगौरवासाठी झिजला ।
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा ।।

——- राजा बढे

मराठी भाषेसंबंधीची माधव ज्यूलियनांची संपूर्ण कविता खाली दिली आहे.

मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे ।
नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे ।।
जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी ।
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी ।।
जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी ।
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता थोरवी; ।।।
असूं दूर पेशावरीं, उत्तरीं वा असूं दक्षिणीं दूर तंजावरीं, ।
मराठी असे आमुची मायबोली, अहो ज्ञानदेवीच देखा खरी ।।
मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं ।
पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं।।
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी ।
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापे हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं ।।
हिच्या लक्तरांची असे लाज आम्हा, नका फक्त पाहू हिच्या लक्तरां ।
प्रभावी हिचे रूप चापल्य देखा पडावी फिकी ज्यापुढे अप्सरा ।।
न घालू जरी वाङ्‌मयातील उंची हिरे मोतियांचे हिला दगिने ।
’मराठी असे आमुची मायबोली’, वृथा ही बढाई सुकार्याविणें ।।
मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यात ही खंगली ।
हिची थोर संपत्ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं ।।
तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्नें नियोजूं तयांना हिच्या मंडणी ।
नको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी ।।

माधव ज्यूलियन

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: