मौंजीबंधन भाग १

munj01

समारे पाच वर्षांपूर्वी मी मध्यप्रदेशातल्या एका छोट्याशा गांवात एका मुंजीच्या समारंभाला गेलो होतो. असा थाटामाटात साजरा केलेला उपनयन सोहळा मी यापूर्वी सुमारे बारा तेरा वर्षांपूर्वी पाहिला होता, तेंव्हा तो सुद्धा मध्यप्रदेशातल्याच दुस-या एका लहान गांवात. त्यापूर्वी हा समारंभ मी नक्की कुठे आणि कधी पाहिला होता ते आता आठवत देखील नाही इतकी वर्षे मध्ये लोटून गेली. आमच्या लहानपणी बहुतेक सगळ्याच मुलांचे मौंजीबंधन त्या काळच्या रिवाजानुसार आणि ऐपतीप्रमाणे थाटामाटात होत असे. पण नंतर त्याचे महत्व कमी होऊ लागले होते. घरातल्या एकाद्या मुलीचे लग्न होत असले तर त्याबरोबर नात्यातल्या लहान मुलांच्या मुंजी उरकून घेत असत. त्यामुळे त्यासाठी होणा-या खर्चात बचत होत असे आणि मोठ्या संख्येने लग्नाला आलेल्या पाहुणे मंडळींची उपस्थितीसुद्धा आयती मिळत असे. नंतरच्या काळात कांही लोक मोजक्या आप्तेष्टांना बोलावून घरच्या घरीच हा विधी घडवून आणू लागले किंवा एकाद्या तीर्थक्षेत्री जाऊन मुलांचे उपनयन संस्कार पूर्ण करून येऊ लागले. पुण्यामुंबईसारख्या शहरात सार्वजनिक समारंभात एकाच मुहूर्तावर एकाच जागी पन्नास साठ मुंजी लागायला लागल्या.

माझ्या एका मित्राची यातल्या कोठल्याच प्रकारात वर्णी लागली नव्हती. मुंज न झाल्यामुळे त्याला काहीच फरक पडला नाही किंवा या बाबीचा कधी साधा उल्लेखही झाला नाही. तरुण वयात आल्यानंतर त्याचे प्रेम जुळले. दोघांच्याही घरचा त्याला विरोध नसल्यामुळे त्यांनी विधीवत विवाह साजरा करायचे ठरवले. पण त्यांचे लग्न लावणारा पुरोहित त्याच्या विवाहसंस्काराचे आधी त्याच्यावर उपनयनसंस्कार झालाच पाहिजे असा आग्रह धरून बसला. अखेरीस लग्नापूर्वी त्याने आपली मुंज करवून घेऊन कांही तासांसाठी ब्रम्हचर्यव्रताचा स्वीकार केला आणि सोडमुंज करवून घेऊन लगेच त्यातून आपली सुटकाही करून घेतली.

उपनयन हा संस्कार प्राचीन कालापासून चालत आला आहे आणि आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे असे म्हणता येईल. पण प्राचीन काळी असलेल्या परिस्थितीनुसार वेगळ्याच उद्देशाने सुरू केलेल्या प्रथांना मध्यंतरीच्या काळात किती वेगळे रूप येत गेले याचे मुंज हे एक उत्तम उदाहरण आहे. आजकालच्या जगात त्यामागे असलेली परंपरागत प्रथा पूर्णपणे मागे पडली आहे, किंबहुना अदृष्य झाली आहे. मूळ उद्देश आणि प्रत्यक्ष अनुभव आणि कृती यात प्रचंड तफावत आल्यावर असे होणे हे नैसर्गिक आहे. प्राचीन काळात गुरूकुल पध्दत होती. आजच्यासारखे चाकोरीबद्ध शालेय शिक्षण नव्हते. दररोज ठराविक वेळेत शाळेला जाणे, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके, अभ्यासक्रम, परीक्षा, प्रमाणपत्रे वगैरे कांही नव्हते. वयाची आठ वर्षे पूर्ण होईपर्यंत सारी मुले आपल्या बाल्यावस्थेचा मनसोक्त उपभोग घेऊ शकत. हवे तेवढे खेळणे, बागडणे, हुंदडणे, खाणेपिणे, मनात येईल तेंव्हा आईच्या कुशीत शिरणे यातल्या कशालाच कोणाचा प्रतिबंध नव्हता. घरातल्या घरातच कांनावर चार शब्द पडून त्यातून आपोआपच ज्ञानाचे दोन कण मिळाले तर मिळाले, ऐकता ऐकताच कांही पाठांतर झाले तर झाले. त्यात सक्तीचा भाग नसायचा.

त्यानंतर मात्र गुरूकुल पध्दतीने मुलांचे औपचारिक शिक्षण सुरू होत असे. सखोल ज्ञानार्जन करण्यासाठी मनाची एकाग्रता आवश्यक असते. त्या वेळी इतर मोह पडू नयेत यासाठी मुलाने जाणीवपूर्वक प्रयत्न करणे जरूरीचे होते. त्याला पोषक असे वातावरण त्याच्या भोवती असेल तर ते सोपे जाईल. अशा सगळ्या कारणांसाठी रोजच्या जीवनात बदल घडवून आणणारा एक महत्वाचा टप्पा या अर्थाने उपनयन किंवा व्रतबंध या विधीची संकल्पना केली गेली असावी. मुलाने घर सोडून गुरूकडे रहायला जाण्यापूर्वी त्याला भेटून घेण्यासाठी त्याचे सगळे आप्त या सोहळ्याला एकत्र जमत असावेत.

हा संस्कार झाल्यानंतर बटूने घर सोडून गुरूच्या घरी जाऊन रहायचे. त्याची सेवा करून विद्यार्जन करायचे. त्याच्या कुटुंबावर आर्थिक भार पडू नये म्हणून चार घरी भिक्षा मागून आणायची आणि मिळालेल्या अन्नावर त्याने उदरनिर्वाह करायचा असे. शिक्षणाच्या काळामध्ये सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य वगैरेंचे निष्ठापूर्वक पालन करायचे. कुठल्याही प्रकारचा ऐषोआराम करायचा नाही, अगदी गादीवर झोपायचेसुध्दा नाही. कशाचीही हाव धरायची नाही, कुणीही काहीही दिले तरी ते गुरूला अर्पण करायचे वगैरे खूप कडक आचारसंहिता होती. इतकी अमानवीय वाटणारी बंधने पूर्वीच्या काळी तरी सरसकट सर्व मुलांकडून पाळली जात असतील की नाही याबद्दल मला शंका वाटते. कदाचित जो अद्वितीय मुलगा हे कठोर व्रत पाळू शकेल असे वाटेल त्यालाच हे संस्कार दिले जात असावेत. आजच्या जगात अशा प्रकारच्या वर्तनाची कल्पनाही करवत नाही, तरीसुध्दा कित्येक मुलांच्या मुंजी मात्र केल्या जातात.

. . . . . . . . . . . (क्रमशः)
——————————

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: