मौंजीबंधन भाग २

munj02

लग्नमुंजीच्या समारंभातले अनेक विधी एकामागून एक होत असतात. मी कधीही त्यांचेकडे फारसे लक्ष देऊन पहात नाही आणि पाहिलेले माझ्या लक्षातही रहात नाही. त्यामुळे मला ते अनुक्रमानुसार सांगतासुद्धा येत नाहीत. समारंभाला कोण कोण आले आहेत ते पहाणे आणि त्यांच्याबरोबर दोन शब्द बोलणे इकडेच माझे सगळे लक्ष बहुतेक वेळा असते. या व्रतबंध सोहळ्यातले जेवढे कांही ठळकपणे माझ्या दृष्टीला पडले, समजले किंवा खटकले आणि त्यामुळे थोडा काळ ध्यानात राहिले त्यांवरच मी इथे थोडे भाष्य करणार आहे.

या व्रतबंध समारंभाची सुरुवात आदल्या दिवशी घाणा भरण्याच्या कार्यक्रमाने झाली. एका प्रतीकात्मक उखळात वेगवेगळ्या धान्यांचे दाणे, हळकुंडे वगैरे पदार्थ घातले आणि देवाचे नांव घेऊन त्यांना मुसळाचे प्रतीक असलेल्या काठीने थोडे चिरडल्यासारखे केले. ते करतांना समस्त महिलावर्गाने त्या प्रतीकात्मक मुसळाला आपला हात लावून घेतला. सगळ्यांनी त्या प्रसंगानिमित्य खास परंपरागत गीते गायिली. उखळ-मुसळ, पाटा-वरवंटा, घुसळखांब, जाते वगैरे साधने आता लहान गांवातल्या घरातून देखील हद्दपार झाली असून त्यांची जागा मिक्सर ग्राइंडर, फूड प्रोसेसर वगैरेंनी घेतली आहे. त्यामुळे कुटणे, कांडणे, भरडणे अशासारखी घरातली परंपरागत कामे जवळ जवळ इतिहासजमा झाली आहेत. जुन्या पिढीतल्या महिलांनी ती पाहिली असतील किंवा कधी तरी केलीही असतील पण नव्या पिढीतल्या मुलींनी कदाचित कधी ऐकलीही नसतील.

शंभर वर्षांपूर्वीच्या काळात घरोघरी मिक्सर तर नव्हतेच, गांवात पिठाची गिरणीसुद्धा नसे. कसलीही तयार पिठे, पुडी किंवा भुकट्या आतासारख्या बाजारात विकत मिळत नव्हत्या. शेतातून घरात आलेल्या धान्यापासून त्यांचे खाद्यपदार्थ बनेपर्यंतच्या सर्व प्रक्रिया घरी हांतानेच केल्या जात असत. त्या काळात घरात एकादे मंगलकार्य निघाले की त्या दिवशी द्यायच्या मोठ्या मेजवानीची पूर्वतयारी कित्येक दिवस आधीपासून सुरू करावी लागत असे. घरातली बाईमाणसे, पाहुण्या, शेजारणी पाजारणी वगैरे सगळ्याजणी कंबर कसून त्या कामाला लागत असत. प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात चांगल्या मुहूर्तावर विघ्नहर्त्याचे नामस्मरण करून करायचा प्रघातच होता. त्याप्रमाणे शुभकार्यासाठी करण्याच्या फराळाच्या तयारीची सुरुवातदेखील उखळ मुसळाचा विधीपूर्वक उपयोग करून होत असे. अशा प्रकाराने घाणाभरणीचा कार्यक्रम सुरू झाला. आजकाल फडताळातले सारे डबे फराळाच्या पदार्थांनी आधीच भरलेले असतात आणि ही घाणाभरणी हे नेमके कशाचे प्रतीक आहे हे देखील त्यात सहभागी होणा-यांना माहीत नसते.

घाणाभरणीच्या कार्यक्रमात भटजीचे काय काम होते ते कांही मला नीटसे समजले नाही. उपनयनाच्या धार्मिक विधीशी त्याचा कसलाच संबंध दिसत तर नव्हता. ती फक्त खाद्यंतीची तयारी होती. कदाचित त्यासाठी लागणारी उखळ-मुसळ आदि सामुग्री पुरोहिताने पुरवली असेल किंवा देवाचे नांव संस्कृतमधून घेतले असेल. मुंजीच्या त्या समारंभातला हा कार्यक्रम राहत्या घरीच झाला. त्यानंतर सगळी मंडळी तयार होऊन कार्यालयात गेली.

कार्यालयातला पहिला कार्यक्रम ‘देवदेवक’ बसवण्याचा होता. परमेश्वर सर्व विश्व व्यापून दशांगुळे राहिला असला तरी त्याची पूजाअर्चा आणि प्रार्थना करण्यासाठी त्याचे एक दृष्य स्वरूप असावे लागते. नित्यनेमाने पूजा करण्याचे घरातले देव घरीच सुप्रतिष्ठित असतात. सहसा कोणीही त्या मूर्तींना आपल्याबरोबर घेऊन फिरत नाही. त्यामुळे अशा विशेष कार्यासाठी विशिष्ट प्रकाराने कांही देवांची तात्पुरती वेगळी प्रतिष्ठापना करून ते कार्य निर्विघ्न रीतीने पार पाडण्यासाठी त्यांची प्रार्थना केली जाते. कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांना ‘पुनरागमनायच’ म्हणजे पुन्हा येण्यासाठी विधीवत निरोप दिला जातो. एवढेच नव्हे तर ज्या सुपात त्यांची प्रतिष्ठापना केलेली असते ते रिकामे करून वाजवले म्हणजे कार्यक्रमाची सांगता झाली असे समजतात.

‘देवदेवक’ बसवून झाल्यावर लगेच आहेराचा कार्यक्रम सुरू झाला. प्रथम ‘घरचा’ आहेर झाला. त्यात बटू आणि त्यांचे आईवडील, आजीआजोबा वगैरे सर्व निकटच्या आप्तांना या कार्यक्रमानिमित्य नवे कपडे देऊन झाले. या वेळी दागदागिनेसुद्धा देतात, तसे दिलेही असावेत. खरे तर या गोष्टी त्यांनी स्वतःच आणलेल्या असतात. म्हणजे त्यात देणे घेणे नसतेच. त्यामुळे “या वेळेस अमके तमके ‘केले’.” असेच सांगायची पद्धत आहे. त्यानंतर आलेल्या पाहुणेमंडळींनी सर्वांना कपडे किंवा भेटवस्तू दिल्या, बरेच लोकांनी बंद पाकिटे दिली. आहेराचा कार्यक्रम झाला की समस्त पुरुषमंडळी “आपली जबाबदारी एकदाची संपली.” अशा थाटात सुटकेचा श्वास टाकतांना दिसतात. महिलामंडळ मात्र या निमित्याने घरच्यांनी काय काय ‘केले’ आहे आणि पाहुण्यातले कोण काय देत आहेत इकडे टक लावून पहात असते. त्यावरची त्यांची चर्चा दीर्घकाल रंगतेसुद्धा. खरे सांगायचे झाले तर या देण्याघेण्याचा देखील मौंजीबंधनाच्या धार्मिक कृत्याशी काडीइतका संबंध नसतो. मुंज होऊन विद्याध्ययन करायला कटिबद्ध झालेल्या बटूला त्यासाठी उपयुक्त होईल अशी कोणतीही वस्तू त्यात अभावानेच दिसते.

(क्रमशः)
———————————————————————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: