व्रतबंध

सिलिब्रेटीज हॉटेलच्या प्रेसिडेन्सी बँके हॉलमध्ये बरीच गर्दी जमली होती. लालचुटुक रंगाची मऊमऊ कुशन्स बसवलेल्या शोभिवंत खुर्च्या हॉलभर मांडून ठेवलेल्या होत्या. त्यातल्या बहुतेक खुर्च्यांवर कोणी ना कोणी विराजमान झालेले होते. त्यात पुरुषांची संख्या तशी कमीच होती. गुढग्याच्याही खालपर्यंत पोचणारी पठाणी शेरवानी परिधान केलेले तीन चार जण सोडल्यास इतरांनी चांगल्यापैकी शर्टपँट घातल्या होत्या. महिलावर्गाची संख्या मोठी होती आणि त्यांच्या वेषभूषेमध्ये अगणित प्रकार होते. उत्तरेतील बनारसीपासून दक्षिणेतल्या कांचीपुरमपर्यंत आणि पश्चिमेतल्या पटोलापासून पूर्वेतल्या आसाम रॉसिल्कपर्यंत सर्व त-हेच्या रेशमी साड्या, शालू, पैठणी वगैरे होत्याच, त्याशिवाय विविध प्रकारच्या भारतीय तसेच परकीय फॅशन्सच्या असंख्य ड्रेसेसचे नमूने पहायला मिळत होते. बहुतेकजणी अंगावर ठेवणीतले निवडक आणि आकर्षक दागिने ल्यायल्या होत्या. सर्वांनी चोपडलेल्या सेंट्सच्या सुवासांच्या मिश्रणातून वातावरणात आगळाच गंध दरवळत होता. सौम्य वाद्यसंगीताच्या मधुर लकेरी हॉलमध्ये घुमत होत्या, त्यातच लोकांच्या बोलण्याचे आवाज मिसळत होते. आपल्या आवाजाचे डेसिबल वाढणार नाही याची काळजी घेऊन प्रत्येकजण हळूहळू फुसफुसत असले तरी सर्वांचा मिळून कलकलाट नसला तरी गलबला होत होता. एका लहानशा गावात आयुष्य घालवून साठपासष्ठ वर्षांपूर्वी निवर्तलेल्या रघुनाथशास्त्र्यांचा आत्मा त्या हॉलच्या आसपास घुटमळत होता.

पणतवंडाच्या मुंजीचा सोहळा पाहण्यासाठी स्वर्गातून त्याला पृथ्वीतलावर पाठवले गेले होते. तो आत्मा त्या जागेच्या शोधात हिंडत होता. एकाद्या घराच्या अंगणात बांबू रोवून आणि त्यावर जाजमाचे छत टाकून मांडव घातला असेल, त्याच्या दारापाशी केळीचे खुंट उभे करून ठेवले असतील, आंब्याची पाने आणि झेंडूची फुले यांच्या माळांचे तोरण बांधले असेल, दारापाशी ताशेवाजंत्री वाजत असतील, आत मंत्रघोष चालला असेल, मांडवात यज्ञकुंडाचा धूर भरलेला असेल आणि मागच्या बाजूला पेटलेल्या चुलखंडांचा. उन्हाने रापलेल्या अंगाचे दर्शन घडवणारे उघडबंब ढेरपोटे आचारी त्यावर अगडबंब हंडे आणि पातेली चढवून त्यात अन्न रांधण्यात मग्न असतील, डोक्यावर शेंडी आणि कमरेला लंगोटी किंवा रेशमी चड्डी धारण केलेले अष्टवर्ग बटू धावपळ करत असतील, मोठी माणसे, विशेषतः त्यांच्या आया त्यांच्यावर ओरडून त्यांना शांतपणे बसायला सांगत असतील, वगैरै वगैरे जे दृष्य रघुनाथशास्त्र्यांच्या आत्म्याला अपेक्षित होते ते गावात कुठेच सापडले नाही. प्रेसिडेन्सी हॉलमध्ये मास्टर क्षितिज याची थ्रेड सेरेमनी आहे असे लिहिलेला बोर्ड सिलिब्रेटीज हॉटेलच्या रिसेप्शनपाशी लावला होता, पण इंग्रजी वाचता येत नसल्यामुळे रघुनाथशास्त्र्यांच्या आत्म्याला त्याचा बोध झाला नाही.

रघुनाथशास्त्र्यांच्या आत्म्याला एक गोष्ट ठाऊक नव्हती. ती म्हणजे जेंव्हा त्यांची मुंज लागली होती त्या वेळी त्यांचे खापरपणजोबा बाळंभटाचा आत्मा असाच गोंधळून गेला होता. वैयक्तिक स्वरूपाच्या या धार्मिक विधीसाठी इतकी माणसे का जमली आहेत याचे त्याला नवल वाटले होते. बारा वर्षांसाठी घरापासून दूर जाणार असलेल्या रघूला बालरूपात पाहून घेण्यासाठी हे लोक जमले आहेत म्हंटले तर त्याच्य़ा वियोगाच्या कल्पनेने गंभीर न होता ते इतक्या आनंदात कसे असू शकतात हे त्याला समजत नव्हते. अंगावर उंची नवे कपडे आणि दागिने, डोक्यावर पागोटे वगैरे घालून घोड्यावर बसलेल्या रघुनाथाची बँडबाजाच्या कर्णकर्कश आवाजात मिरवणुक निघाली. तिला भिक्षावळ असे म्हणतात हे ऐकून त्या आत्म्याला झीटच यायची बाकी राहिली असेल.

आतासारख्या दिवसातून ठराविक तास चालणा-या शाळा प्राचीन काळात अस्तित्वात नव्हत्या. शेती, व्यापार, हस्तकौशल्य वगैरे जीवनोपयोगी बाबींचे शिक्षण घरातच मिळत असे. वेदशास्त्रादिकांचे अध्ययन करण्यासाठी चांगल्या गुरूची नितांत आवश्यकता असायची. छापील पाठ्यपुस्तके आणि वह्या वगैरे नसल्यामुळे बहुतेक सारे शिक्षण मौखिक असायचे. गुरूला मुखोद्गत असलेल्या ऋचा, सूक्ते, श्लोक वगैरे शिष्यांकडून तोंडपाठ करून घेणे हा या शिक्षणाचा महत्वाचा भाग असे. त्यातल्या कानामात्रा, -हस्वदीर्घ, अनुस्वार वगैरे प्रत्येक बारकावे अचूक असणे अत्यंत आवश्यक होते. यासाठी शिष्याने एकाग्रचित्त व्हायला पाहिजे. त्याचे मन विचलित होऊ नये, त्याला इतर कशाचा मोह पडू नये म्हणून त्याला कठोर ब्रह्मचर्यव्रत पाळावे लागत असे. त्याने जिभेचे चोचले पुरवायचे नाहीत, मऊ शय्येवर झोपायचे नाही अशा प्रकारची बंधने त्याच्यावर घातली जात. त्या काळातले गुरू म्हणजे ऋषीमुनी नगराबाहेर अरण्यात आश्रम बांधून रहात असत. ज्ञानार्जन करण्यासाठी शिष्यांनाही त्यांच्या आश्रमातच रहावे लागे. त्यांच्या उदरनिर्वाहाचा भार गुरूवर पडू नये म्हणून शिष्यांनी भिक्षा मागून आणावी आणि ती गुरूला अर्पण करावी अशी व्यवस्था केली जात असे. अशी समजूत आहे.

भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा अशी गरीब परिस्थिती असणा-या शिष्यांना या बंधनामध्ये कदाचित फारसे बिकट वाटणार नाही. पण प्राचीन भारतात अन्नधान्य, फळफळावळ, दूधदुभते वगेरेंची रेलचेल होती असेही सांगतात. अशा सुबत्तेत वाढणा-या लाडावलेल्या मुलाने एकदम सर्व मौजमजा आणि आवडीनिवडींचा त्याग करून विरक्त आणि निरीच्छ बनणे हे मला तरी अनैसर्गिक वाटते आणि असल्या नियमांचे किती पालन होत असेल याची शंका वाटते. ज्ञानाची मनापासून अतीव ओढ असलेल्या आणि त्यासाठी पडतील तेवढे कष्ट करण्याची आणि काहीही सहन करण्याची मनाची तयारी असलेल्या एकाद्या असामान्य मुलालाच ते शक्य होत असेल. कदाचित त्या काळात अशा असामान्य मुलांचाच व्रतबंध करून त्यांना गुरूगृही पाठवत असावेत. असे असेल तर व्रतबंधाच्या संस्कारात अशक्यप्राय अशी बंधने सरसकट सगळ्या मुलांवर घालायची रूढी कशी पडली?

जगातील बहुतेक सारे धर्म परमेश्वराला मानतात. तो सर्वसाक्षी, सर्वज्ञ आणि सर्वशक्तीमान देव आणि सामान्य माणूस यांच्या दरम्यान सर्व धर्मांमध्ये काही मध्यस्थ असतात. परमेश्वराची उपासना करण्याव्यतिरिक्त आचरण, आहार वगैरे जीवनातील इतर अनेक अंगांसाठी धर्माच्या नावाखाली असंख्य नियम सांगितले जातात. ते नियम प्रत्यक्ष ईश्वरानेच तयार केले असून ऋषी, मुनी, प्रेषित यांच्या मार्फत ते जगाला सांगितले गेले असल्यामुळे त्यांचे पालन अनिवार्य आहे असेही सांगितले जाते. हे नियम आणि त्यांचा अर्थ सामान्य माणसांना सांगायचे काम हे मध्यस्थ करतात. ही मंडळी धार्मिक वृत्तीची आणि सदाचरण करणारी, देवाच्या जवळची असावी अशी अपेक्षा असते. पुरोहित, शास्त्री, पाद्री, मुल्ला, मौलवी, ग्रंथी, मुनी, भिक्खू वगैरेंच्या रूपात हा वर्ग सर्वत्र दिसतो. या वर्गाला समाजात मानाचे स्थान असते. प्राचीन काळातले भारतातले ऋषीमुनी अरण्यात वनवास करून रहात होते, पण नंतरच्या काळातले धर्मगुरू नगरवासी झाले. त्यांच्या शिष्यांना घर सोडून गुरूगृही जाऊन रहाण्याची आवश्यकता राहिली नाही. या धर्मगुरूंना समाजात आणि राजदरबारी मानसन्मान मिळत होताच, त्याशिवाय द्रव्यप्राप्ती होऊ लागली. आपल्या मुलांनाही असेच सन्माननीय आणि समृद्ध जीवन मिळावे असे सर्वांना वाटणे साहजीक होते.

धर्मगुरूंचे काम सांभाळण्यासाठी विशेष शिक्षण घेऊन दीक्षा घेतली जाते. या शिक्षणाची सुरुवात करण्याची मुंज ही पहिली पायरी असते. ती पार केल्याशिवाय शिक्षणाची सुरुवातच करायची नाही असा परंपरागत निर्बंध होता. आपल्या मुलाला जेवढे जमेल तेवढे तो शिकेल, आपण त्याला संधी उपलब्ध करून दिली पाहिजे असा विचार करून आज प्रत्येक पालक त्याच्या मुलाला शाळाकॉलेजांमध्ये पाठवतो. असाच विचार करून सर्व मुलांचा व्रतबंध करण्याची प्रथा पडली असावी. त्यातले व्रत आणि बंध मागे पडत गेले आणि निव्वळ उपचार शिल्लक राहिला. मेकॉले साहेबाने शालेय शिक्षणपद्धत आणल्यानंतर मुंज आणि शिक्षण यातला संबंध संपला. मुंज केल्यानंतर घेण्याचे शिक्षण फक्त संध्या आणि मंत्र यांच्यापुरते सीमित राहिले. आता ते सुध्दा राहिलेले नाही. एकत्र कुटुंबातल्या घरातल्या आजोबा पणजोबांच्या आग्रहामुळे त्यांच्या समाधानासाठी एक कार्यक्रम केला जाऊ लागला आणि त्याला समारंभाचे स्वरूप प्राप्त झाले. या निमित्याने आप्तेष्टांनी एकत्र जमणे, खाण्यापिण्याची हौस भागवून घेणे, भेटवस्तू देणे, नवे कपडेलत्ते आणि दागिने करणे वगैरे होऊ लागले.

पंचवीस तीस वर्षांपूर्वीच्या काळात थाटात मुंज करण्याचे प्रमाण बरेच कमी झाले होते. गिरगावात एका ठिकाणी सार्वजनिक मुंजी लागत असत आणि प्रत्येक बटूमागे त्याच्या जवळच्या आप्तांसाठी पाच की दहा कूपने मिळत, तेवढेच लोक त्याला उपस्थित रहात असत. काही लोक तीर्थक्षेत्राला जाऊन तिथे मुलाची मुंज लावून येत असत. घरातल्या लग्नकार्याच्या सोबत लहान मुलांच्या मुंजी लावल्या जात. असे काही समारंभ मी पाहिले आहेत. माझ्या परिचयातल्या एका मुलाची मुंज या कशातच झाली नव्हती आणि त्याला त्याचा काही विषादही वाटत नव्हता. पण आधी मुंज झाल्याखेरीज त्याचे लग्न मी लावणार नाही असा भटजीने हट्ट धरला आणि त्याची मुंज, सोडमुंज आणि विवाह हे सगळे विधी एकापाठोपाठ उरकून घेतले.

काळ आणखी पुढे गेल्यानंतर म्हणजे आतापर्यंत मुंज हा प्रकार इतिहासजमा होईल असे मला त्यावेळी वाटत होते. त्यातल्या व्रत आणि बंध या शब्दांना खरोखर काही अर्थ उरलेला नाही. पण मध्यम वर्गीयांची आर्थिक परिस्थिती चांगली सुधारल्यामुळे समारंभ करण्याचा उत्साह मात्र कमी होण्याऐवजी जास्तच वाढलेला दिसतो. परवा मी एका मुंजीला गेलो होतो. आपल्या आजोबासोबत तिथे आलेल्या एका ७-८ वर्षाच्या मुलीने आजोबांना विचारले, “आपण इथे कशाला आलो आहोत?”
“आपल्या विकीच्या मुंजीला”
“मुंज म्हणजे काय? ती कशाला करतात?”
“ती शिक्षणाची सुरुवात आहे. आता त्याने गुरूकडे शिकायला जायचे आहे.”
“तो तर आधीच थर्ड स्टँडर्डला आहे. आता कसली सुरुवात? त्याला हॉस्टेलमध्ये पाठवणार आहेत का? पण त्यासाठी चकोट कशाला करायला पाहिजे? मुलं त्याला हसणार नाहीत का? माझी मैत्रिण रुची पण हॉस्टेलात राहते, तिची पण मुंज केली होती का? ……….”
नातीचे प्रश्न संपत नव्हते आणि आजोबांना काही केल्या उत्तरे सापडत नव्हती. अखेर मी तिची समजूत घातली, “अगं विकीच्या आईबाबांना एक मोठी पार्टी द्यायची होती, सगळ्या रिलेटिव्ह्जना आणि फ्रेड्सना बोलवायचे होते, आपले नवे ड्रेसेस, ज्युवेलरी त्यांना दाखवायची होती, त्यांच्या नव्या फॅशन्स पहायच्या होत्या. तू नाही का किती मस्त ड्रेस घातला आहेस? हे सगळं एन्जॉय करायसाठी आपण इथे आलो आहोत. “

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: