वटपौर्णिमा, सावित्रीची कथा आणि पर्यावरण

नवी भर दि.१४-०६-२०१९ : वटसावित्री

पतिव्रता सावित्रीचे यजमान सत्यवान याचे प्राण हरण करण्यासाठी यमराज स्वतः येतात. सावित्री त्यांच्यापाठोपाठ जाते यमाशी संभाषण करते आणि त्याला चातुर्याने शब्दांत अडकवून आपल्या पतीचे प्राण परत आणते एवढी कथा सर्वांनाच माहीत असते. त्यात थोडीशी भर अशी आहे.

ही कथा महाभारताच्या वनपर्वात दिली आहे. मार्कंडेय ऋषींनी ही कथा युधिष्ठिराला सांगितली आहे. गायत्री आणि सावित्री या दोघी ब्रह्मदेवाच्या पत्नी असतात, त्यातल्या सावित्रीच्या वरदानाने अश्वपति या राजाला कन्यारत्न प्राप्त होते म्हणून तिचे नांव सावित्री ठेवले जाते. अश्वपति हा मद्र देशाचा राजा असतो. राजकन्या सावित्री अश्वविद्या, शस्त्रविद्या वगैरे सर्वांमध्ये प्रवीण असते. तिला साजेसा वर मिळणे कठीण असते. ती स्वतःच देशभ्रमणाला निघते. तिला एका वनामध्ये रहात असलेला द्युमत्सेन राजाचा पुत्र सत्यवान भेटतो. या राजाला त्याच्या विश्वासू लोकांनीच दगा देऊन पदच्युत केलेले असल्यामुळे तो वनवासी झालेला असतो. सत्यवान हा देखणा, सदाचरणी आणि वीरपुरुष असतो. मी त्याच्याशीच लग्न करणार असा हट्ट सावित्री धरते. त्याला अपमृत्यू येणार असल्याचे भविष्य प्रत्यक्ष नारदमुनींनी सांगितलेले असते, पण ते ऐकूनसुद्धा सावित्रीचा निर्धार ढळत नाही. ती पित्याचा राजवाडा सोडून पतीसोबत अरण्यात रहायला जाते.

ज्येष्ठ पौर्णिमेला त्याचे मरण ठरलेले असते म्हणून त्या दिवशी ती स्वतः सत्यवानाच्यासोबत अरण्यात जाते आणि यमाला भेटून त्याच्याशी संवाद साधते. यम तिला धर्मशास्त्रातले अनेक प्रश्न विचारतात. त्या सर्वांची समर्पक उत्तरे सावित्री देते. प्रत्येक उत्तरानंतर यम तिला एक वर देत जातो, पण तिला सत्यवानाचे प्राण वाचवायचेच असतात. त्यामुळे ती यमाची साथ सोडत नाही. त्याच्याशी तात्विक संवाद करीतच राहते. अखेर खालील पांच वर तिच्या पदरात पडतात.
१. तिच्या सासूसासऱ्यांना दृष्टी प्राप्त व्हावी.
२. तिच्या सासऱ्याला त्याचे राज्य परत मिळावे.
३. तिच्या वडिलांना शंभर पुत्र व्हावेत.
४. तिला तिच्या पतीपासून शंभर पुत्र व्हावेत. आणि अर्थातच यासाठी
५. तिचा पती पुनः जीवित व्हावा.

विदुशी लीनाताई मेहेंदळे यांनी दिलेल्या व्याख्यानावरून साभार.

———————————–

 

वनस्पती जमीनीमधून पाणी आणि हवेतून कर्बद्विप्राणील (कार्बन डायॉक्साईड) वायू शोषून घेतात आणि सूर्यप्रकाशामधून ऊर्जा घेऊन या दोन साध्या अणूंचा संयोग घडवून आणून त्यातून सेंद्रिक (ऑर्गॅनिक) पदार्थांचे प्रचंड गुंतागुंतीचे अणू तयार करतात. या क्रियेमधून प्राणवायूचे विमोचन होऊन हा उपयुक्त वायू हवेत सोडला जातो आणि नव्याने तयार झालेले सेंद्रिय पदार्थ त्या वनस्पतीच्या निरनिराळ्या भागात साठवून ठेवले जातात. शाकाहारी प्राणी त्यांचे भक्षण करून आपला उदरनिर्वाह करतात आणि मांसाहारी पशू त्या प्राण्यांना गट्ट करतात. सर्वच प्राण्यांना जीवंत राहण्यासाठी आवश्यक असलेला प्राणवायू आणि अन्नपदार्थ अशा प्रकारे वनस्पतींपासूनच मिळतात. कोणताही प्राणी थेट हवापाण्यापासून आपले अन्न तयार करू शकत नाही. निसर्गाकडून हे सामर्थ्य फक्त वनस्पतींना मिळाले आहे.

प्राचीन काळात जेंव्हा कारखानदारी अस्तित्वात नव्हती अशा काळात माणसाचे दैनंदिन जीवन पूर्णपणे निसर्गावर म्हणजे वनस्पती विश्वावरच अवलंबून होते. याची जाणीव आपल्या पूर्वजांना होती. झाडांना बोलता येत नसले तरी तेही सजीवच आहेत आणि त्यांचेबद्दल कृतज्ञपणा दाखवणे हे आपले कर्तव्य आहे हे सर्वांना समजावे आणि अधोरेखित केले जावे या हेतूने त्यांनी विविध वृक्षांना आपल्या धार्मिक परंपरांमध्ये महत्वाचे स्थान दिले. वड आणि पिंपळ हे वृक्ष आकाराने प्रचंड असतात. त्यांचे आयुष्य खूप मोठे म्हणजे शतकानुशतके असते. माणसांच्या अनेक पिढ्या त्यांच्या सावलीत सुखावतात तर त्याच्याही अनेकपटीने जास्त पक्ष्यांच्या पिढ्या या वृक्षांवर घरटी करून राहून जातात. बहुतेक सर्व मंदिरांच्या परिसरात वटवृक्ष किंवा पिंपळाचे झाड किंवा दोन्हीही लावली आणि टिकवून ठेवली जातात आणि मंदिरात देवदर्शनाला जाणारे भाविक या झाडांनाही नमस्कार करतात. अशी आपली सांस्कृतिक परंपरा आहे.

ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत केले जाते. वडाच्या झाडाची पूजा हा या व्रतातला महत्वाचा भाग आहे. पुराणकाळामधील सावित्री या महान पतिव्रतेने प्रत्यक्ष यमाशी नम्रतापूर्वक पण सखोल तात्विक वाद घातला, अनेक प्रकारे त्याची मनधरणी केली, कोणत्याही परिस्थितीत आपल्या पतीपासून विभक्त न होण्याचा आपला हट्ट सोडला नाही आणि यमाने हरण केलेले सत्यवानाचे प्राण चातुर्याने परत मिळवले अशी कथा आहे. या गोष्टीत सावित्रीचा निग्रह, तिचे पांडित्य आणि चतुराई दिसून येते. हे नाट्य एका वडाच्या झाडाखाली घडले असावे आणि एवढाच त्याचा संबंध या कथेशी असावा. वटवृक्षाप्रमाणे आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे आणि आपले सौभाग्य अखंड रहावे अशी मनोकामना या व्रताच्या निमित्याने व्यक्त करून व़टवृक्षाचे महत्व लोकांच्या मनावर ठसवावे अशा विचाराने ही परंपरा सुरू झाली असावी.

उद्या वटपौर्णिमा आहे. या निमित्याने स्त्रिया वडाची पूजा करतील, त्या झाडाला दोरा गुंडाळण्यासाठी त्याला प्रदक्षिणा घालतांना त्याचा बुंधा किती रुंद आणि मजबूत आहे हे त्यांच्या लक्षात येईल. विशाल वृक्षाचा भार पेलण्यासाठी त्याचा बुंधा बळकट असणे किती आवश्यक आहे हे त्यांना कळेल. जीवनातील कर्तव्यांचा बोजा पेलण्यासाठी खंबीरपणा कसा आवश्यक आहे याचा वस्तुपाठ त्यांना मिळेल. वडाची एक लहानशी फांदी तोडून घरी आणून तिची पूजा करणा-यांना यातले काहीच मिळणार, कळणार किंवा वळणार नाही. जी फांदी स्वतःच दोन चार दिवसात सुकून नष्ट होणार आहे किंवा त्याच्याही आधी म्हणजे दुस-या दिवशीच कच-याच्या ढिगा-यात टाकून दिली जाणार आहे ती बिचारी कोणाला कसला संदेश, स्फूर्ती किंवा आशीर्वाद देणार?

वडाच्या फांदीची पूजा करणे असे विकृत रूप या व्रताला शहरांमध्ये मिळाले आहे. त्यासाठी आधीच वडाच्या झाडांच्या फांद्या तोडून त्यांना जायबंदी केले जात आहे. ज्याच्याबद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी ज्याची पूजा करायची, त्याच झाडाची या कारणासाठी मोडतोड करणे हा मूळ उद्देशाचा केवढा विपर्यास आहे? सावित्रीची कथा तर आता विस्मृतीमध्ये हरवून गेली आहे. तिने यमधर्माशी कसली चर्चा केली हे क्वचितच कोणाला माहीत असेल. पतीनिधनाच्या दुर्धर प्रसंगी तिने आपला तोल सांभाळून इतका सखोल तात्विक संवाद केला होता ही गोष्ट कोणाला माहीतसुध्दा नसेल.

माझ्यासारखा वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारा माणूस पुराणातल्या भाकडकथांवर कसा काय विश्वास ठेऊ शकतो? असा प्रश्न काही लोकांच्या मनात येईल. त्यामुळे माझी याबाबतची भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. माणसाच्या आयुष्यात भविष्यकाळात घडणा-या घटना आधीपासून ठरलेल्या नसतात, त्यामुळे त्यांचे अचूक भाकित करता येणे अशक्य आहे. हातावरील रेषा किंवा आकाशातल्या ग्रहांच्या भ्रमणाशी त्याचा काडीमात्र संबंध नसतो असे माझे ठाम मत आहे. सावित्रीच्या कथेमधल्या सत्यवानाचे आयुष्य अल्प आहे असे भाकित त्या काळातील निष्णात ज्योतिष्यांनी केलेले असले तरीही त्याला अखेर चारशे वर्षांचे दीर्घायुष्य लाभते हा विरोधाभास त्या कथेतच आहे आणि पुढे असे सगळे कथानक होणार हे जर आधीच ठरलेले असले तर मग सावित्रीच्या कथेतील हवाच निघून जाईल, तिच्या गुणांना किंवा प्रयत्नांना काही मोलच उरणार नाही.

रेड्यावर आरूढ होऊन साक्षात यमराज तिथे येतात, सत्यवानाच्या शरीरामधून अंगठ्याएवढ्या आकाराचा त्याचा प्राण काढून घेऊन ते परत जायला निघतात, हे सगळे सावित्रीच्या मर्त्य डोळ्यांना दिसते. त्यांच्या मागोमाग तीही तीन दिवस तीन रात्री चालत राहते, यमाशी वाद विवाद संवाद वगैरे करून त्याला शब्दात पकडते आणि सत्यवानाचे प्राण त्याच्या ताब्यातून मिळवून घेते वगैरे कथाभाग विज्ञानाच्या कसोटीवर सत्य घटना ठरू शकत नाही. लहान मुलांना गोष्टी सांगतांना काऊ, चिऊ, वाघोबा, ससुला वगैरे प्राणी माणसांसारखे वागतात आणि बोलतात असे आपण सांगतो तेंव्हा ते खरे नसते हे त्यांनाही माहीत असते, पण मनोरंजक असल्यामुळे मुले त्या गोष्टी आवडीने ऐकून घेतात. नाटक, सिनेमा पाहतांना, कादंब-या वाचतांना त्यातल्या गोष्टी काल्पनिक असतात हे आपल्याला ठाऊक असते तरीही आपण त्यात गुंगून जातो. पुराणातल्या कथासुध्दा अशाच प्रकारे लोकांना आवडाव्यात यासाठी रंजक केलेल्या असतात. ही गोष्ट सुध्दा बहुतेक लोक जाणतात. आजकाल तर यमराज आणि त्याचे वाहन असलेला रेडा हे दोघेही विनोदाचे विषय झाले आहेत आणि त्यांची यथेच्छ कुचेष्टा केली जात असते. कोणालाच त्यांचे भय वाटत नाही. तेंव्हा पुराणामधील कथांमधले अक्षर न् अक्षर सत्य आहे असा अट्टाहास न धरता त्यांचे तात्पर्य आणि त्यातून मिळणारा बोध घेणे महत्वाचे आहे. ज्या कथांमधून असा बोध व मार्गदर्शन मिळते अशाच निवडक कथा एका पिढीकडून पुढच्या पिढीला सांगितल्या जात आपल्यापर्यंत आल्या आहेत आणि त्यांमध्ये असलेल्या मौलिक तत्वांमुळे त्या चिरकाल टिकून राहणार आहेत.

सावित्रीच्या कथेमधला अवास्तव भाग काढून टाकला तरीसुध्दा बरेच काही अद्भूत असे तिच्यात शिल्लक राहते. लाडात वाढत असलेली एक बुध्दीमान राजकन्या ज्ञानप्राप्तीचा मार्ग धरते आणि शिक्षण घेऊन शास्त्रनिपुण बनते, त्या काळात उपलब्ध असलेल्या अनेक विद्या ती संपादन करते. तिचे आईवडील या बाबतीत आडकाठी न आणता तिला प्रोत्साहन देतात. शिक्षणाद्वारे ती इतके उच्च स्थान गाठते की तिला योग्य असा पती शोधणे तिच्या पालकांच्या आवाक्याबाहेर होऊन गेल्यामुळे तिने आपला वर स्वतः शोधावा असे सुचवले जाते. या उद्देशाने देशोदेश धुंडाळल्यानंतर आंधळ्या आईवडिलांसोबत एका पर्णकुटीत राहणा-या रूपगुणसंपन्न आणि सुशिक्षित, सुसंस्कृत अशा सत्यवानाची निवड ती करते. हे स्थळ आईवडिलांना पसंत नसते. इतर काही लोकांनासुध्दा हे आवडत नाही किंवा त्यांना सत्यवानाचा हेवा वाटला असेल. तो अल्पायुषी असल्याचे भाकित पसरवले जाते, पण तरीही सावित्रीचा निर्णय बदलत नाही. राजवाड्यामधील ऐशोआरामाचे जीवन सोडून ती पतीगृही जाते. त्याच्या नित्याच्या कामात त्याला मदत करते. जळणासाठी लाकडे गोळा करायला त्याच्यासोबत अरण्यात जाते. अपघातामुळे तो उंचावरून खाली पडून निष्चेष्ट होतो. गोंधळून न जाता धैर्याने तीन दिवस सतत प्रयत्नांची पराकाष्ठा करून ती त्याचे प्राण वाचवते. घोर निराशेच्या अंधारात सापडलेल्या सासूसास-यांना नवी दृष्टी देऊन त्यांचे वैभव मिळवून देते. हे सगळे अलौकिक आणि दिव्य आहे. ते सगळे खरोखर असेच घडले होते की नव्हते याला माझ्या दृष्टीने फारसे महत्व नाही. सावित्रीच्या कथेमध्ये भेटणारी ही नायिका मला अद्वितीय भासते. वर्षातून एकदा तिची कहाणी ऐकूनसुध्दा अनेकांना त्यातून नवा प्रकाश मिळण्याची शक्यता आहे.

आता आपण वटसावित्रीव्रताकडे पाहू. आपल्या पूर्वजांनी खुबीने या निमित्य सर्व महिलांना वटवृक्षाकडे आकृष्ट केले आहे. वटवृक्षाचे वेगळेपण मी वर दाखवलेले आहेच. माझ्या कल्पनेनुसार पूर्वीच्या काळात सहज उपलब्ध असणारा हा वृक्ष एकंदरीतच वनस्पतीविश्वाचे प्रतीक मानायला हरकत नाही. मध्ययुगामध्ये अशी सामाजिक परिस्थिती निर्माण झाली होती की स्त्रियांना घराबाहेर पडणेच कठीण झाले होते.  मंगळागौर, हरतालिका, व़टसावित्री यासारख्या व्रतांच्या निमित्याने त्यांना आपापल्या घराबाहेत पडून एकत्र जमायची संधी दिली गेली. त्यावेळी इतर महिलांवर छाप पाडण्यासाठी आणि जास्तीत जास्त चांगले दिसण्यासाठी नटणे, उंची वस्त्रे आभूषणे धारण करणे ओघानेच आले. सौंदर्यप्रदर्शनाचा हा महिलांचा आवडता भाग आज सुध्दा सर्वत्र उत्साहाने पाळला जातो असे दिसते. घराबाहेर पडण्यासाठी नवरोबाची संमती मिळावी म्हणून हे सगळे त्याच्याच भल्यासाठी करत असल्याचा आव आणला गेला. म्हणजे त्याचा विरोध राहणार नाही. पुढील सात जन्म दर वेळी हाच पती मिळावा असे सांगण्यामुळे त्याचा अहंभाव जास्तच सुखावला जाईल अशी अपेक्षा होती. (अलीकडे मात्र हा आपल्यावर अन्याय असल्याची ओरड विनोदी नाटकांमध्ये होऊ लागली आहे.) सावित्री आणि सत्यवान दोघेही इतके पुण्यवान होते की एक तर त्यांच्यासाठी स्वर्गात जागा राखून ठेवल्या असतील किंवा त्यांना मोक्षप्राप्ती झाली असेल. त्यांच्या बाबतीत पुढील सात जन्मांचा प्रश्नच नसणार. सगळ्या बाजूंनी मोर्चेबांधणी करून झाल्यावर स्त्रियांना कोंदट माजघरातून बाहेर काढून मोकळ्या जागेत वडाच्या विशालकाय झाडाखाली जमवण्याचे योजले गेले. ज्येष्ठ महिना तसा कडक उन्हाचाच असतो. त्यात डेरेदार वटवृक्षाची शीतल सावली जास्तच आनंददायी वाटते. (या वर्षी मात्र धोधो पाऊस पडत आहे.) या निमित्याने त्या भव्य वृक्षाशी जवळीक निर्माण होते, आपुलकी वाटू लागते. कळत नकळत निसर्गाशी एक नाते जोडले जाते.

पूर्वीच्या काळात वडाची पूजा केल्यानंतर वटसावित्रीची कथा ऐकली जात असे. त्यात सुरस आणि चमत्कृतीपूर्ण कथानक आहेच, सावित्री आणि यमधर्म यांचा संवादसुध्दा असे. हिंदू धर्मशास्त्रांमधील अनेक मुद्दे यातून श्रोत्यांच्या कानावर आपसूक प़डत. पुराणातली सावित्री सर्व शास्त्रांमध्ये पारंगत होती, पण मधल्या काळात स्त्रियांना शिक्षणापासून वंचित केले गेले होते. व्रताचा भाग म्हणून अशा पोथ्यांचे श्रवण केल्यामुळे त्यांना धर्माचे थोडे ज्ञान मिळण्याची संधी मिळायची.
असे अनेक स्तुत्य विचार या सणामागे दिसतात.


नवी भर – दि.१४-०६-२०१९

वट पौर्णिमा – एक मुक्त चिंतन

वड, उंबर, पिंपळ, जांभूळ, आंबा हे पाच अतिशय पवित्र वृक्ष मानले गेलेले आहेत.

उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा पाण्याचे व अन्नाचे दुर्भिक्ष्य असते तेव्हा या घनदाट वृक्षांची सावली असते, यांची फळे पशुपक्षांचे पोट भरतात. यांच्या जवळ पाण्याचे नैसर्गिक स्रोत असतात. या वृक्षांचे जतन करणे सर्वच प्राणीमात्रांच्या साठी आवश्यक असते. यासाठी या वृक्षांच्या सन्निध्यात देवळे असतात व त्यांचे संरक्षण भक्त करतात.

सध्याच्या जंगलतोडीच्या जमान्यात तर या वृक्षांचे महत्व अधिक वाढले आहे त्यांच्या निमित्ताने इतरही सजीव सृष्टीचे महत्व माणसाला कळू शकते.

आदिकालापासून वनांचे रक्षण स्त्रिया करीत आल्या आहेत. त्यांच्या मधील उपजत माया त्यांना झाडांना पाणी घालणे, खत घालणे, त्यांची देखभाल करणे हे करवून घेत आलेली आहे.

वटसावित्रीच्या कथेच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांना आपले वृक्षसंवर्धनाचे काम व त्या निमित्ताने सावित्रीच्या कथेतून बोधन करुन घेण्याची वेळ आली आहे.

सत्यवानाचे गेलेले प्राण परत आणण्याच्या निमित्ताने सावित्री साक्षात यमधर्माशी संभाषण करते. त्याच्या कडून धर्म समजून घेते, त्याची मर्जी संपादन करते व आपल्या इच्छा पूर्ण करवून घेते.

ते सर्वच संभाषण “देवीभागवतात” व्यासांनी दिलेले आहे. ते वाचून चिंतन करण्याजोगे आहे.

शहरी संस्कृतीत वडाची पूजा करणे व पतीसाठी काही प्रार्थना करणे हे हास्यास्पद मानले जाते.
शहरातील गावभाग, व ग्रामीण, निमग्रामीण भागात अजूनही वडांची पूजा महिला करतात. या महिला बहुतेक करुन बाहेर नोकरी-धंदा न करणार्‍या असतात. त्या त्यांचे कुलाचार त्यांच्या घरातील जुन्याजाणत्या स्रियांच्या मार्गदर्शनाखाली अजूनही करताना दिसतात.

शहरातील काही निसर्गप्रेमी सुशिक्षित महिला वडाची रोपे तयार करतात त्यांचे मोफत वाटप करतात. घरातील कुंडीत ते रोप लावून पूजा करतात.

वनविभागही लाखोंच्या संख्येने अशी रोपे तयार करतात व वाटतात.
काही नगरसेवक या निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्‌घाटन करतात.
—————————————————–

वटपौर्णिमा आणि माध्यमे

सन २०१८मधला अनुभव:
काल वटपौर्णिमेचा सण होऊन गेला. फेसबुक, वॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियावर या सणाची जितकी टिंगल केली गेली तितकी कदाचित कुठल्याच धर्माच्या कुठल्याच सणाची होत नसेल. वट वट सावित्री काय, वडा (मला) पाव काय, कोणीतर चक्क VAT(69) पौर्णिमा करून टाकली. कुणी वडाला सूत गुंडाळण्याला त्याच्या गळ्याभोवती फास आवळणे म्हंटले. यातून वांचण्यासाठी कुणी वडाला शुभेच्छाही दिल्या. “पूजेला जातांना अंगावर फार जास्त दागिने घालून जाऊ नका, नाहीतर दुसऱ्या बायका पुढच्या जन्मात तुमचा नवरा त्या स्वतःसाठी मागतील” असा सूज्ञ सल्ला कोणी दिला. एका वडाच्या झाडाच्या फांद्या तोडून त्याची अनेक बायका पूजा करतात त्यामुळे त्यांना पुढच्या जन्मांमध्ये सगळ्यांच्या नवऱ्यांचे एक एक पार्ट मिळत जातील असा तर्क कुणी लढवला. “सात जन्म एकच नवरा मिळू दे असे म्हणणे हा समस्त नवऱ्यांवर अन्याय आहे, त्यांना कांही व्हरायटी नको का?” हा जोक जुना झाला. या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी आज पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्याला सात उलट्या प्रदक्षिणा घालाव्यात असा मार्ग सुचवला. “आपला हा जन्म सातवा आहे असा मला साक्षात्कार झाला.” असे एका नवऱ्याने आपल्या बायकोला सांगितले. “पुढच्या वर्षी सुद्धा मला हाच नवरा, पण बायको म्हणून मिळू दे, मग मी या जन्माचे चांगले उट्टे काढीन” असे एक म्हणाली, तर “आता बायको होऊन ती दुसरे काय करते आहे?” असा प्रश्न तिच्या नवऱ्याच्या मनात आला. आता “याच जन्मात सात नवरे मिळू देत असे वरदान कुठल्या झाडाची पूजा करण्याने मिळेल?” याची चौकशी सुरू झाल्यामुळे नवरोबांचे धाबे दणाणले आहे.

गंमत म्हणजे स्वतःला संस्कृतिसंवर्धक का काय ते समजणाऱ्या लोकांनी दिलेल्या स्पष्टीकरणांनी हंसून हंसून पुरे वाट केली. म्हणे एकाच जन्मात दर बारा वर्षांनी शरीरातल्या सगळ्या पेशी बदलतात (त्यांना हे कुणी सांगितले?) म्हणजे बायका आपल्या नवऱ्यांसाठी आणखी बारा सत्ते चौऱ्याऐंशी वर्षाचे आयुष्य मागतात. वडाच्य़ा झाडांमध्ये ऑक्सिजन असते आणखी कुठकुठल्या पॉझिटिव्ह एनर्जी असतात आणि त्या वडाभोंवती फेऱ्या घालणाऱ्या स्त्रियांना प्राप्त होतात म्हणे. “हे आपल्या पूर्वजांना माहीत होते, आजच्या सायंटिस्ट लोकांना यातलं कांही तरी कळतं का?” असे पालुपद त्यांच्या प्रत्येक वाक्याला जोडलेले असतेच. हे सगळे जर त्या मार्कंडेय ऋषीला समजले तर कुठून आपण ही कथा युधिष्ठिराला सांगितली असे त्याला वाटले असणार.

————————-

One Response

  1. […] वटपौर्णिमा आणि पर्यावरण या विषयावरील… […]

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: