जागतिक पर्यावरण

जून २०१३ मध्ये दोन भागात लिहिलेल्या या लोखाचे एकत्रीकरण आणि संपादन केले दि.०५-०६-२०२०

जागतिक पर्यावरण (भाग १)

माझे शालेय शिक्षण संपेपर्यंत म्हणजे ज्या कालावधीत मी मराठी भाषा शिकून आत्मसात केली त्या काळात ‘पर्यावरण’ हा शब्द अजून प्रचलित झाला नव्हता. त्याचा उद्भव किंवा उद्गम नक्की कधी झाला हे मला माहीत नाही, पण त्याचा प्रसार मात्र नक्कीच अलीकडच्या काळात झाला आहे. मला कळायला लागल्यापासून निसर्ग, सृष्टी वगैरे शब्द ओळखीचे झाले होते. ग्रामीण भागात रहात असल्यामुळे घराबाहेर पडून कोणत्याही दिशेने दहा पंधरा मिनिटे चालत गेल्यावर पुढे नजर पोचेपर्यंत निसर्गाचेच साम्राज्य असे. किंबहुना चहूकडे वाढलेल्या वनस्पतींनी झाकलेल्या नैसर्गिक भूमीवर अधूनमधून तुरळक अशी मानवनिर्मित वस्ती दिसत असे. निसर्गाकडून मिळत असलेल्या ऊन, पाऊस, थंडी, वारा वगैरे गोष्टी जशा प्रकारे मिळतील त्यांच्याशी सलोखा करून त्यानुसार आपली राहणी ठेवली जात असे. अचानक उद्बवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींपासून आपला बचाव करणे हे सर्वात मोठे दिव्य असायचे. आपल्यासारख्या यःकश्चित प्राण्याकडून एवढ्या भव्य आणि बलवान निसर्गाला कसलाही धोका पोचू शकतो असे तिथे कोणी सुचवले असते तर इतरांनी त्याला नक्कीच वेड्यात काढले असते. त्या काळात परदेशातलीच काय पण भारतातील शहरांमधील परिस्थिती कशी आहे याचीही मला सुतराम कल्पना नव्हती. ‘अनंत हस्ते’ आपल्याला जीवनावश्यक गोष्टी पुरवणाऱ्या ‘विपुला च पृथ्वी’ वर सर्वस्वी अवलंबून असलेला मानव प्राणी हा एक क्षुद्र जीव आहे अशी माझी पक्की धारणा झाली होती.

इंग्रजी भाषेतला ‘एन्व्हायरनमेंट’ हा शब्द त्या काळात निराळ्या अर्थाने ओळखीचा झाला होता. ‘घर, शाळा वगैरे ज्या ठिकाणी आपण काही वेळ घालवत असू त्याच्या सभोवतालचे वातावरण’ हा त्याचा दुसरा अर्थ आजसुध्दा प्रचलित आहे. आजूबाजूची माणसे, त्यांचे आचार, विचार वगैरेंचा देखील यात समावेश होतो. ‘एन्व्हायरनमेंट’ या शब्दाचा ‘आसपासची जमीन, हवा, पाणी’ असा संकुचित अर्थ आणि या अर्थाने ‘पर्यावरण’ हा या शब्दाचा नवा प्रतिशब्द आजकाल रूढ झाला आहे. निदान एकदा तरी हा शब्द वाचनात आला नाही किंवा कानावर पडला नाही असा एकही दिवस जात नाही इतका तो वापरून गुळगुळीत झाला आहे. पण त्या बरोबरच काही विपर्यस्त कल्पना किंवा माहिती पसरवली जात आहे.

‘मानवाने निसर्गावर विजय मिळवला आहे’ अशा प्रकारच्या वल्गना जितक्या पोकळ आहेत तितकीच माणसाने केलेली ‘पर्यावरणाची चिंता’ निरर्थक आहे. आजच्या जगामधील सात अब्ज माणसे आणि दोन तीनशे देश या सर्वांनी त्यांची सारी ताकत एकवटली तरीही निसर्गाची रूपे असलेल्या पंचमहाभूतांच्या सामर्थ्याच्या पुढे ती नगण्य ठरेल. सागराच्या लाटा किंवा सूर्यप्रकाश यातून क्षणाक्षणाला प्रकट होत असलेली किंवा धरणीकंपामध्ये काही सेकंदात बाहेर टाकलेली प्रचंड ऊर्जा पाहता हे लक्षात येईल. तेंव्हा आपल्यापेक्षा अनंतपटीने सामर्थ्यवान असलेल्या निसर्गाची आपण काळजी करतो असे म्हणणे हास्यास्पद आहे. पर्यावरणप्रेमी खरे तर त्यांच्या स्वतःच्या किंवा फार तर त्यांच्या वंशजांच्या चिंतेने व्याकूळ झाले आहेत असे म्हणता येईल.

बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि त्यात सारखे बदल होत असतात. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र असे रोज होणारे बदल, उन्हाळा, पावसाळा, हिंवाळा असे ऋतूंमधले बदल आणि भूपृष्ठात हळू हळू होत असलेले दीर्घकालीन बदल हे सारे निसर्गच घडवून आणतो. एका काळी ज्या ठिकाणी समुद्र होता तिथे हिमालयाची शिखरे झाली आहेत आणि एका काळी गर्द वनराई असलेला भूभाग आज वाळवंट झालेला किंवा समुद्राच्या तळाशी गेला आहे. डायनोसॉरसासारखे महाकाय प्राणी निर्माण झाले तसेच नामशेष होऊन गेले. इतर किती प्रकारचे जीव काही हजार वर्षांची काळ पृथ्वीवर राहून पुढे नष्ट झाले याची गणतीच करता येणार नाही. या सगळ्यांच्या तुलनेत पाहता मानवाच्या मूर्खपणामुळे किंवा हावरटपणामुळे आज पर्यावरणात पडतांना दिसत असलेला बदल अगदी मामूली म्हणता येईल.

निसर्ग हा नेहमी रम्यच असतो असे नाही. तो विध्वंसक रूपसुध्दा धारण करतो. दुसरी गोष्ट म्हणजे तो न्याय अन्यायाचा विचार करत नाही. एकाने त्याच्यावर आक्रमण केले तर तो त्याची शिक्षा त्या आक्रमकालाच करेल असे नाही. अगदी साधी गोष्ट पहायची झाली तर एका ठिकाणी समुद्रात भर टाकली तर दुसरीकडे कोठे तरी त्याचा परिणाम दिसतो. नदीच्या वाहत्या पात्रात घाण मिसळणारा वेगळाच असतो पण त्याचे वाईट परिणाम प्रवाहाच्या खालच्या अंगाला राहणाऱ्या लोकांना भोगावे लागतात. हवेचे प्रदूषण करणारे एक असतात आणि त्याचा त्रास इतरांनाही झाल्याशिवाय रहात नाही. ‘कराल तसे भराल’ हा न्याय निसर्गाच्या बाबतीत नीटसा लागू होत नाही. यामुळे पर्यावरणाची काळजी घेणे ही सर्वांची जबाबदारी ठरते.

यंत्रयुगाच्या आधी माणसाची विध्वंस करण्याची क्षमता अगदी कमी होती. त्याने दोन हाताने केलेल्या लहान सहान नुकसानाची भरपाई निसर्ग आपल्या अनंत हस्तांनी सहजपणे करत होता. त्यामुळे निसर्गात होणारे बदल हे त्याच्याच नियमानुसार घडत असत आणि त्यात एक नियमितता होती. मानवांची उत्पत्ती आणि विनाश यातसुध्दा नैसर्गिक समतोल पाळला जात असल्यामुळे जगाची लोकसंख्यासुध्दा जवळजवळ स्थिर होती. गेल्या शतकात यात मोठा फरक पडला. लोकसंख्या वाढतच गेली, तसेच प्रत्येक माणसाच्या गरजा वाढत गेल्या. यंत्रांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून त्या भागवल्या जाऊ लागल्या, तसेच निरनिराळ्या प्रकारच्या नवनव्या वस्तूंचे उत्पादन होऊ लागले आणि त्यांचा उपभोग घेण्याचा हव्यास वाढत गेला. यासाठी लागणारा कच्चा माल जमीन, पाणी आणि हवा यातून काढून घेतला जाऊ लागल्यामुळे त्यांचे साठे कमी होत चालले आणि यांत्रिक क्रियांमधून निर्माण होणारा कचरा निसर्गाच्या स्वाधीन केला जात असल्यामुळे त्यांचा उपसर्ग होणे सुरू झाले. यातून होणाऱ्या समस्यांवर निसर्ग आपल्या परीने मार्ग काढत असतो, पण तो माणसांच्या फायद्याचा नसल्यामुळे किंवा आपल्याला त्रासदायक वा धोकादायक असल्यामुळे आपण हैराण होतो. उदाहरण घ्यायचे झाल्यास मिठी नदीच्या किनारी राहणाऱ्या लोकांनी तिच्या पात्रात टाकलेल्या कचऱ्यामुळे ते अरुंद झाले म्हणून पावसाचे पाणी मुंबईच्या अन्य भागात पसरले आणि यापूर्वी कधीही जिथे पाणी तुंबत नव्हते तेथील लोकांना जलप्रलयाचा अनुभव घ्यावा लागला.

. . . . . . . . . . . . . . .

जागतिक पर्यावरण (भाग २)

जमीन, पाणी आणि हवा या तीन्हींचा समावेश पर्यावरणात होतो आणि माणसाच्या कृतींचा प्रभाव या तीन्हींवर पडतो. जमीनीवर पडणारा प्रभाव फक्त स्थानिक असतो, वाहत्या पाण्याबरोबर त्यावर पडलेला प्रभावसुध्दा पसरत जातो, वातावरणातील बदल क्षीण होत होत जगभर पसरतात. यामुळे वायुप्रदूषणाचा मुद्दा जागतिक झाला आहे आणि त्यामुळे त्यावरील उपाययोजना आंतरराष्ट्रीय पातळीवर ठरवल्या जात आहेत. हवेचे पृथक्करण केल्यास नत्रवायू (नायट्रोजन) आणि प्राणवायू (ऑक्सीजन) हे त्याचे मुख्य घटक असतात, त्याशिवाय अल्प प्रमाणात कर्बद्विप्राणील वायू (कार्बन डायॉक्साईड) सुध्दा असतो. सर्व वनस्पती दिवसा यातला थोडा थोडा कर्बद्विप्राणील वायू शोषून घेऊन प्राणवायू हवेत सोडतात, सर्वच प्राणी आणि वनस्पतीसुध्दा दिवसाचे चोवीस तास श्वसन करत असतात आणि या क्रियेत प्राणवायू शोषून घेऊन कर्बद्विप्राणील वायू हवेत सोडतात. लक्षावधी वर्षांच्या काळात या दोन्ही क्रियांमध्ये एक समतोल साधला गेला होता आणि त्यामुळे हवेमधील प्राणवायू व कर्बद्विप्राणील वायू यांचे प्रमाण स्थिर राहिले होते. पण गेल्या काही दशकांमध्ये कारखाने आणि स्वयंचलित वाहने यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्यामुळे कर्बद्विप्राणील वायूची निर्मिती खूप वाढली आहे आणि ती वाढतच आहे. उलट माणसाच्या हावेपोटी जंगलांची मोठ्या प्रमाणावर तोड होत असल्यामुळे वनस्पतींचे प्रमाण कमी होत आहे आणि त्यांची कर्बद्विप्राणील वायूपासून प्राणवायू तयार करण्याची क्षमता कमी होत चालली आहे. अशा प्रकारे वातावरणामधील संतुलन बिघडत आहे. शिवाय कारखान्यांमधून इतर काही प्रकारचे विषारी वायू बाहेर पडत असल्यामुळे त्यांचाही परिणाम वातावरणावर पडत आहे. ग्लोबल वॉर्मिंग या बिघाडात भूपृष्ठाचे सरासरी तपमान वाढल्यामुळे बर्फांच्या राशी वितळतील, त्यामुळे नद्यांना महापूर येतील, समुद्राची पातळी वाढल्यामुळे तो किनाऱ्यावरील जागा व्यापेल आणि मुंबई, न्यूयॉर्कसारखी समुद्रकिनाऱ्यावरील महानगरे पाण्याखाली बुडून जातील वगैरे भीतीदायक चित्र उभे केले जात आहे आणि हे होऊ नये यासाठी कडक उपाययोजना सुचवल्या जात आहेत. शक्य तेवढी झाडे लावा, झाडे जगवा ही मोहीम सुरू झालेली आहेच.

या योजना चांगल्या आणि आवश्यक आहेत यात शंका नाही, पण त्यांच्या बाबत काही गैरसमजुती पसरवल्या जात आहेत, त्यांची माहिती असणे आवश्यक आहे. सगळ्या झाडांची सगळी पाने दिवसभर प्राणवायू तयार करत असतात आणि त्यामुळे घनदाट जंगले हे प्राणवायूचे मोठे कारखाने आहेत असे अनेक लोकांना वाटते, पण ते पूर्ण सत्य नाही. कर्बद्विप्राणील वायू शोषून घेऊन त्यापासून अन्न तयार करण्याचे काम करण्यासाठी झाडांना इतर काही गोष्टींची आवश्यकता असते. पाणी आणि सूर्यकिरणे हवीतच, शिवाय जमीनीतून काही क्षार मिळावे लागतात. हे नसले तर ते झाड उपाशी राहते आणि सुकून जाते. हे सगळे प्राप्त होत असले तरीही त्या झाडाला अन्नाची आवश्यकता असावी लागते. त्याची वाढ होत असतांना हे अन्न मोठ्या प्रमाणावर तयार होते, पण झाड पूर्ण वाढल्यानंतर त्याला अन्न निर्माण करण्याची तितकीशी आवश्यकता वाटत नाही. झाडांच्या सर्व भागांचे आयुष्य समान नसते. त्याचे खोड आयुष्यभर त्याच्यासोबत असते तर फुले एक दोन दिवसांपुरतीच असतात. बहुतेक झाडांची पाने पिकून झडून जात असतात आणि त्यांच्यी जागी नवी पाने येत असतात. त्यातही काही झाडे हिवाळ्यात पूर्णपणे निष्पर्ण होतात काही झाडांची पाने अंशतः गळतात. जंगलामध्ये हा झाडांच्या खाली पडलेला पालपाचोळा कुजून जमीनीत मिसळतो किंवा वणव्यात भस्म होऊन जातो. या दोन्ही क्रियांमध्ये त्यातून कर्बद्विप्राणील वायू बाहेर पडतो आणि हवेत मिसळतो. अशा प्रकारे वर्षभराच्या अवधीत जेवढा कर्बद्विप्राणील वायू ही झाडे हवेमधून शोषून घेतात जवळ जवळ तेवढाच तो परतही करत असतात. त्यामुळे जंगलतोड करणे वाईट आहे आणि नवी राने वाढवणे चांगले आहे असे ढोबळपणाने खरे असले तरी हवेमधील कर्बद्विप्राणील वायूचे प्रमाण कमी करण्यासाठी ती काही काळापर्यंतच उपयुक्त असतात. एक कारखाना सुरू केला आणि त्याचा चहू बाजूला झाडे लावली का कर्बद्विप्राणील वायूची काळजी मिटली असे होत नाही. कुठल्याही झाडाची पाने तोडली किंवा फांद्या छाटल्या की लगेच पर्यावरणाचा नाश झाला असेही होत नाही. झाडाना नवे कोंब फुटतात, नवी पल्लवी येते, त्याची वाढ सुरू होते आणि त्याचा पर्यावरणाला लाभ सुध्दा होऊ शकतो.

गेल्या काही हजारो किंवा लक्षावधी वर्षांमध्ये पृथ्वीच्या पाठीवरील पशुपक्षी आणि वनस्पती यांचा एक समतोल साधला गेला होता. वनस्पतींच्या तुलनेत प्राणीमात्रांचे आकार आणि संख्या फारच लहान असल्यामुळे पृथ्वीच्या पाठीवरील कर्ब (कार्बन) हे मुख्यतः वनस्पतींमध्येच असते. भूपृष्ठावर उगवणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या वनस्पतींमध्ये साठलेले कर्बाचे प्रमाण हजारो वर्षांपासून स्थिर राहिले होते. पण लक्षावधी वर्षांपूर्वी जमीनीत गाडल्या गेलेल्या वनस्पतींचे रूपांतर दगडी कोळसा किंवा खनिज तेल, नैसर्गिक वायू (पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस) वगैरेंमध्ये होऊन गेलेले आहे. यंत्रयुगात ते जमीनीखालून बाहेर काढले जाऊ लागले आणि त्यांच्या ज्वलनातून निर्माण झालेला कर्बद्विप्राणील वायू हवेत मिसळत असल्यामुळे भूपृष्ठावरील कर्बाचे प्रमाण वाढत चालले आहे. ते शोषून घेऊन नव्या वनस्पतींमध्ये स्थिर करण्यासाठी प्रदीर्घ काळाचा अवधी लागेल. याचा विचार करून जे कारखाने अशा प्रकारे जगावर अधिक कर्बाचा बोजा टाकत आहेत त्यांनी कार्बन टॅक्स भरावा अशा प्रकारचे नियम पाश्चात्य देशात केले जात आहेत आणि इतर देशांनीसुध्दा ते करावे असा आग्रह धरत आहेत. उलट भारत आणि चीन यासारख्या देशांचे असे म्हणणे आहे की दर डोई उत्पादन किंवा विजेचा वापर यात ते पाश्चात्य देशांच्या तुलनेत खूप मागे आहेत, त्यामुळे त्यांनी असे कर लावले तर ते विकासाला बाधा आणतील यामुळे ते मागेच पडत जातील. यामुळे ते असल्या तरतुदी मान्य करणार नाहीत. अशा प्रकारे यात राजकारण आले आहे आणि सर्वमान्य धोरणे निश्चित होऊन त्यांची अंमलबजावणी होऊ लागेपर्यंत पर्यावरणावर होत असलेले दुष्परिणाम होत राहतील.

जमीनीवर होणारे परिणाम स्थानिक असल्यामुळे काही प्रमाणात त्या जमीनीच्या मालकालाच ते भोगावे लागतात. रासायनिक कीटकनाशके किंवा खतांमुळे जमीनीचा कस कमी झाला तर मालकाचे नुकसान होतेच, शिवाय ती रसायने कृषीउत्पादनांमध्ये मिसळून ग्राहकांच्या पोटात जातात आणि त्यांच्या आरोग्याला अपाय करतात. ही रासायनिक द्रव्ये तयार करणाऱ्या मोठ्या कारखान्यांमुळे आणखी प्रदूषण होते, ऊर्जा खर्च होते वगैरे दोष त्यात आहेत. पण या द्रव्यांमुळे शेतकऱ्याला थेट होणारा तात्कालिक लाभ अधिक आकर्षक असल्यामुळे त्यांच्याविरुध्द केलेली प्रचारमोहीम परिणामकारक ठरत नाही. या कारणांमुळे शेतीसाठी रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खते वापरावीत यावर पर्यावरणवाद्यांचा भर आहे. याबाबतीत अधिक मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे.

पाण्याचे प्रदूषण ही भारतात अत्यंत गंभीर समस्या बनली आहे. गंगेसारख्या एके काळी स्वच्छ निर्मळ पाण्यासाठी प्रसिध्द असलेल्या नदीला आता गटाराचे रूप आले आहे. ज्या काळात नदीच्या काठावर राहणारी लोकवस्ती कमी होती आणि नदीत सतत भरपूर पाणी वहात असायचे त्या काळात गावोगावच्या ओढ्यानाल्यामधून नदीत येऊन पडणारा सेंद्रीय कचरा जलचरांकडूनच नैसर्गिक मार्गाने नष्ट केला जात असे. गंगेसि मिळता गंगाजल बनून ते सांडपाणीसुध्दा पवित्र होत असे. पण आता त्यातला कचरा अपरंपार वाढत आहे, त्यात विषारी रसायने टाकली जात आहेत आणि जलचर जीवच नष्ट होत चालले आहेत. जनजागृती तसेच तंत्रज्ञान या दोन्ही आघाड्यांवर नेटाने प्रयत्न केल्यानेच हा प्रश्न आटोक्यात आणणे शक्य आहे. तसे नाही झाले तर त्यापासून होत असलेले दुष्परिणाम वाढतच जातील.

——–

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: