अभंग रंग

हा लेख मागल्या वर्षी (२०१२मध्ये) आलेल्या अनुभवावरून तेंव्हा लिहिला होता. या वर्षीच्या आषाढी एकादशीच्या निमित्याने इथे चिकटवत आहे.

आज आषाढी एकादशीनिमित्य एक छान पहायला आणि मुख्य म्हणजे ऐकायला मिळाला. काणेबुवा प्रतिष्ठान कडून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात संगीताचार्य काणेबुवांच्या शिष्या मंजुषा कुलकर्णी पाटील, किशोरी आमोणकरांचे शिष्य रघुनंदन पणशीकर आणि स्व.जितेंद्र अभिषेकी यांचे चिरंजीव शौनक अभिषेकी या मुरलेल्या गायकगायिकांनी या कार्यक्रमात भाग घेतला होता. तबल्याच्या साथीला पं.विजय घाटे आणि पखवाजवर पं.भवानीशंकर हे गायकांच्यापेक्षाही प्रसिध्द असे आघाडीचे कलाकार होते, सारेगमपवरील अप्रतिम बांसुरीवादनाने घराघरात पोचलेले अमर ओक आणि टाळ या वाद्याच्या वादनामधील एकमेव तज्ज्ञ असलेले प्रख्यात आणि ज्येष्ठ कलाकार माउली टाकळकर हे सुध्दा साथीला होते. हार्मोनियमवर साथसंगत करणारे श्रीराम हसबनीस अजून फार जास्त प्रसिध्द झाले नसले तरी उत्तम वादन करीत होते. इतक्या सगळ्या गुणी कलाकारांनी एकत्र येऊन सादर केलेला हा कार्यक्रम लाजवाब होणारच !

शौनक अभिषेकी यांनी काही श्लोक गाऊन मंगलमय सुरुवात करून जय जय रामकृष्णहरी या नामाचा घोष सुरू केला आणि सभागृहात धार्मिक वातावरण निर्माण केले. विठ्ठलाच्या भजनाची सुरुवात रूपाचा अभंग गाऊन करायची वारकरी संप्रदायाची प्रथा आहे. त्यानुसार मंजुशाने संत ज्ञानेश्वरांच्या अभंगापासून या अभंगरंगाची पारंपरिक पध्दतीने सुरुवात केली.

रूप पाहतां लोचनी । सुख जाले वो साजणी ।।१।।
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ।।२।।
बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठली आवडी ।।३।।
सर्व सुखाचे आगर । बाप रखुमादेवीवर ।।४।।

आषाढी आणि कार्तिकी एकादशीला सर्व विठ्ठलभक्त पंढरपूरच्या यात्रेला जातात. हे महात्म्य पंढरीलाच कां आहे याबद्दल नामदेव महाराजांचा अभंग शौनकने सादर केला.

आधी रचिली पंढरी। मग वैकुंठ नगरी॥१॥
जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर ॥२॥
जेव्हा नव्हती गोदा गंगा । तेव्हा होती चंद्रभागा ॥३॥
चंद्रभागेचे तटी । धन्य पंढरी गोमटी ॥४॥
नासिलीया भूमंडळ । उरे पंढरीमंडळ ॥५॥
असे सुदर्शनावरी । म्हणुनी अविनाशी पंढरी ॥६॥
नामा म्हणे बा श्रीहरी । आम्ही नाचु पंढरपुरी ॥७॥

त्यानंतर रघुनंदन पणशीकरांनी गायिलेला अभंग मी पूर्वी ऐकलेला नव्हता. यात संत एकनाथांनी नारायणाची विनवणी केली आहे.

अहो नारायणा, सांभाळावे अपुल्या दीना ।।
अमुची राखावा जा लाज, परोपरा हेचि काज ।।
सांभाळावी ब्रीदावळी, दया करुणाकल्लोळी ।।
एका जनार्दनी शरण, करुणाकर पतितपावन ।।

ज्ञानेश्वरांनी पाया रचला, नामदेवांनी ओसरी बांधली, एकनाथांनी खांब उभे केले या क्रमाने महाराष्ट्रातील संतांनी उभ्या केलेल्या मंदिराचा कळस संत तुकारामांनी रचला. त्यांचा एक सुप्रसिध्द अभंग मंजुषाने सादर केला. वाचा, नेत्र, कान, मन वगैरे सर्वांगाने विठोबाची भक्ती करावी आणि त्यात देहभाव हरपून जावे असे संत तुकोबांनी या अभंगात सांगितले आहे.

घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचें ॥१॥
तुम्ही घ्या रे डोळे सुख । पाहा विठोबाचें मुख ॥२॥
तुम्ही ऐका रे कान । माझ्या विठोबाचें गुण ॥३॥
मना तेथें धांव घेई । राहें विठोबाचे पायी ॥४॥
रूपी गुंतले लोचन । पायी स्थिरावले मन ॥५॥
देहभाव हरपला । तुज पाहता विठ्ठला ॥६॥
तुका म्हणे जीवा । नको सोडूं या केशवा ॥७॥

या कार्यक्रमाचे एक संयोजक आणि पुण्याचे उपमहापौर श्री. दीपक मानकर यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. मध्यंतरानंतर त्यांनी एक अलीकडच्या काळातले प्रसिध्द गाणे गाऊन घेतले. संत नामदेवांच्या या अभंगाला पारंपरिक भजनापेक्षा वेगळ्याच प्रकारची चाल लावून संगीतकार श्रीधर फडके आणि गायक सुरेश वाडकर या द्वयीने भक्तीसंगीताच्या क्षेत्रात एक वेगळे असे स्थान मिळवून दिले आहे.

विठ्ठल आवडी प्रेमभावो । विठ्ठल नामाचा रे टाहो ॥
तुटला हा संदेहो । भवमूळ व्याधीचा ॥
म्हणा नरहरी उच्चार । कृष्ण हरी श्रीधर ।
हेची नाम आम्हा सार । संसार करावया ॥
नेणो नामाविण काही । विठ्ठल कृष्ण लवलाही ।
नामा म्हणे तरलो पाही । विठ्ठल विठ्ठल म्हणताची ॥

मध्ययुगात होऊन गेलेल्या संतमंडळींनी पंढरीचे गुणगान केलेले आहेच, पण आजकालच्या युगातले कवी अशोकजी परांजपे यांनी जुन्या काळच्या भाषेत पंढरपूराचे सुंदर वर्णन केले आहे. शौनक अभिषेकी आणि रघुनंदन पणशीकर या दोघांनी मिळून हे गाणे फारच सुंदर गायिले.

अवघे गरजे पंढरपूर । चालला नामाचा गजर ।।ध्रु.।।
टाळघोष कानी येती । ध्यानी विठ्ठलाची मूर्ती ।
पांडुरंगी नाहले हो । चंद्रभागातीर ।।१।।
इडापिडा टळुनी जाती । देहाला वा लाभे मुक्ती।
नामरंगी रंगले हो । संतांचे माहेर ।।२।।
देव दिसे ठाई ठाई । भक्त लीन भक्तापायी ।
सुखालागी आला या हो । आनंदाचा पूर ।।३।।

पेशवाईत होऊन गेलेले शाहीर होनाजी बाळा यांनी लिहिलेली घनःश्यामसुंदरा ही अमर भूपाळी आणि सांगा मुकुंद कुणी हा पाहिला यासारखी गीते शांतारामबापूंनी काढलेल्या चित्रपटातून एका काळात लोकप्रियतेच्या आणि प्रसिध्दीच्या शिखरावर पोचली होती. त्यांनी लिहिलेले एक गाणे पं.सुरेश हळदणकरांच्या आवाजात प्रसिध्द झाले होते. त्यातली शब्दरचना यापूर्वी कधी लक्ष देऊन ऐकलेली नसल्यामुळे आतापर्यंत मी त्याला नाट्यसंगीत समजत होतो. ती गौळण आहे हे आज समजले. मंजुषाच्या गोड आवाजात तिचा अर्थही सुसंगत वाटला आणि समजला.

श्रीरंगा कमलाकांता हरि पदरातें सोड ॥
व्रिजवासी नारी । जात असो की बाजारी ।
कान्हा का मुरारी । अडविता का कंदारी ।
मथुरेची बारी । पाहू मज हो गिरिधारी ।
विकुनी नवनीत दधि गोड । हरि पदरातें सोड ॥
ऐका लवलाही । गृहिं गांजिती सासुबाई ।
परतुनिया पाही । येऊ आम्ही ईश्वर ग्वाही ।
ग्यान देऊन काही । मग जाऊ आपले ठायी ।
पतीभयाने देह रोड । हरि पदरातें सोड ॥
विनवुनी कृष्णासी । शरणागत झाल्या दासी ।
आणिल्या गोपि महालासी । होनाजिरायासी ।
जा मुकुंदा सोड रे ॥ हरि पदरातें सोड ॥

मुख्यतः शास्त्रीय संगीतातील आजच्या काळातल्या सर्वश्रेष्ठ गायिका समजल्या जाणा-या किशोरीताई आमोणकरांनी काही अप्रतिम सुगम संगीतही गायिले आहे, त्यात भक्तीसंगीताला महत्वाचे स्थान आहे. त्यांचे शिष्यवर रघुनंदन पणशीकरांनी तुकारामाच्या या अभंगातून किशोरीकाईंची आठवण करून दिली. मंजुषाने गायिलेल्या तुकारामाच्याच घेई घेई माझे वाचे या अभंगात सांगितल्यानुसार आचरण केल्यानंतर भक्ताची काय अवस्था होते, ते या अभंगात सांगितले आहे.

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
येणें सोसें मन जालें हांवभरी । परती माघारीं घेत नाहीं ॥२॥
बंधनापासूनि उकलल्या गांठी । देतां आली मिठी सावकाशें ॥३॥
तुका म्हणे देह भारिला विठ्ठलें । कामक्रोधें केलें घर रीतें ॥४॥

संत चोखा मेळा यांनी लिहिलेला एक अभंग पं.जितेंद्र अभिषेकी यांनी एका काळी ज्याच्या त्याच्या ओठावर आणला होता. त्यांचे सुपुत्र शौनक यांनी आपल्या दणदणीत आवाजात त्याचा नाद सभागृहात घुमवला.

अबीर गुलाल उधळीत रंग । नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥१॥
उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जाती हीन ।
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन ।
पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥२॥
वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू ।
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ ।
विठ्ठलाचे नाम घेऊ हो‌उनी निःसंग ॥३॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती ।
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग ॥४॥

विठ्ठल हा देव रामदासांना रामच वाटला होता, इतर अनेक संतांनी त्याला निरनिराळ्या रूपात पाहिले. संत तुकारामाच्या एका अभंगात त्यांनी त्याच परमेश्वराची अनेक रूपे दाखवली आहेत.

श्री अनंता, मधुसूदना, पद्मनाभा नारायणा ।।
सकल देवाधिदेवा, कृपाळू, वाली, केशवा ।
महानंदा, महानुभावा, सदाशिवा, सदंगरूपा ।
अगा ये सगुणा, निर्गुणा, जय जगचालिता, जगजीवना ।
वसुदेवदेवकीनंदना, बाळरांगणा, बाळकृष्णा ।
तुका आला लोटांगणी, मज ठाव द्यावा जी चरणी ।
हीच करितसे विनवणी, भावबंधनी, सोडवावे ।।

कार्यक्रमाची सांगता मंजुषाने संत कान्होपात्रा यांच्या या प्रसिध्द अभंगाने भैरवी रागात केली.

अगा वैकुंठीच्या राया । अगा विठ्ठल सखया ॥१॥
अगा नारायणा । अगा वसुदेवनंदना ॥२॥
अगा पुंडलिक वरदा । अगा विष्णू तू गोविंदा ॥३॥
अगा रखुमाईच्या कांता । कान्होपात्रा राखी आता ॥४।।

सर्वच गायक वादकांनी आपल्या कौशल्याची कमाल करून प्रत्येक अभंगाला टाळ्यांच्या कडकडात दाद मिळवली. अमर ओक यांनी बांसुरीवर अप्रतिम साथ दिलीच, शिवाय बहुतेक अभंगामध्ये आपले स्वतःचे सुरेख तुकडे वाजवून रसिकांची वाहवा मिळवली. मिलिंद कुलकर्णी यांचे निरूपण फारच छान होते. अनेक संत आणि अर्वाचीन कवींच्या रचनांमधील ओळींचा संदर्भ देत त्यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले होते.

बरेच दिवसांनी असा कानाला आणि मनाला तृप्त करणारा कार्यक्रम पहायची संधी मिळाली.
—————————————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: