लोकमान्य टिळक आणि गणेशोत्सव – २

१८९३ साली लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्याला जो विरोध झाला त्याचा त्यांनी कसा समाचार घेतला याबद्दल त्रोटक माहिती मी मागील लेखात दिली होती. हा विरोध वेगवेगळ्या मुद्द्यांवर आणि वेगवेगळ्या स्तरांवर झाला होता. देवघरात बसून सोवळ्याने ज्या देवाची पूजा करायची पध्दत होती त्याला चौकाचौकात बसवण्याने आणि रस्त्यावरून मिरवत नेण्यामुळे त्याच्या पावित्र्याचा भंग होतो अशी ओरड कर्मठ धर्ममार्तंड करत होते, एवढेच नव्हे तर त्यामुळे देवाचा कोप ओढवण्याची भीती ते घालत होते. दुस-या बाजूला टिळक आणि त्यांचे कांही मुख्य सहकारी ब्राह्मण जातीचे असल्यामुळे हा सगळा ब्राह्मणांना पुढे पुढे करून समाजावर वर्चस्व गाजवण्याचा त्यांचा एक कुटील डाव आहे असा आरोप कांही लोक करत होते. ही मुसलमानांच्या मोहरमच्या ताबूतांची नक्कल आहे असे सांगून हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना भडकवण्याचा उद्योग इतर कोणी करत होते. अशा तात्विक मुद्द्यांशिवाय सजावट आणि मेळ्यांचे कार्यक्रम यांचा दर्जा, त्यावर होणारा खर्च आणि त्यात वाया जाणारा वेळ याबद्दल नाक मुरडणारे बरेच लोक होते.  या सर्वांनी उडवलेल्या राळीमुळे विचलित न होता त्यांचे मुद्देसूद खंडन करून समाजातल्या जास्तीत जास्त लोकांचा विश्वास संपादन करणे आणि आपल्या या नव्या उपक्रमाला त्यांची मान्यता मिळवून त्यांना मोठ्या संख्येने त्यात सहभागी करून घेणे हे अत्यंत कठीण काम लोकमान्यांनी त्या काळात करून दाखवले आणि वर्षभरातच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणा-या मंडळांची संख्या शतपटीने वाढली. त्यासंबंधी टिळकांनी सन १८९४ साली लिहिलेल्या अग्रलेखाचा सारांश मी मागील लेखात दिला होता.

त्यानंतर आणखी एक वर्षाने म्हणजे सप्टेंबर १८९५ मध्ये टिळकांनी लिहिलेला केसरीचा अग्रलेखसुध्दा उपलब्ध आहे. तोपर्यंत विरोधाची धार इतकी बोथट झाली होती की या अग्रलेखात त्यांनी आपल्या बचावाचा पवित्रा घेतला नाही किंवा झालेल्या टीकेचा खरपूस समाचारही घेतलेला नाही. त्यांच्या अत्यंत प्रगल्भ आणि सकारात्मक लेखनाचा नमूना यात दिसतो.  त्यापूर्वीच्या वर्षभरात पुणे शहरात कांही अप्रिय घटना घडलेल्या होत्या आणि त्यामुळे पोलिसांनी उत्सवावर बरेच निर्बंध लादले होते. ‘यंदाचा गणपत्युत्सव’ या मथळ्याखाली लिहिलेल्या या लेखाच्या प्रारंभीच पोलिसांनी ठेवलेल्या चोख बंदोबस्ताचे लोकमान्यांनी कौतुक करून त्यांचे आभार मानले आहेत.  त्याबरोबरच लोकांच्या संयमाची आणि सहनशीलतेची त्यांनी भरभरून प्रशंसा केली आहे. कांही निर्बंध जाचक वाटले तरीसुध्दा त्याबद्दल संताप किंवा चीड व्यक्त करण्याची ही वेळ नव्हे हे जाणून त्यांचे काटेकोरपणे पालन केले, आपल्या उत्साहाच्या भरात अविचाराने कांही चूक होऊ नये याची काळजी घेतली आणि पोलिसांबरोबर संघर्ष केला नाही किंवा त्यांना कोणतेही निमित्य मिळू दिले नाही. लोकमान्यांच्या शब्दात सांगायचे झाले तर “कोणाच्या कोंबड्याने कां उजाडेना” असे लोकांना वाटू लागले होते व त्यामुळे पोलिसांनी केलेल्या नियमांचे त्यांनी उल्लंघन केले नाही, इतकेच नव्हे तर उलट आपल्या हौसेस आपण होऊनच स्वतः आळा घालून आपला सुस्वभाव सर्वांस व्यक्त करून दाखवला आणि हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यास मदत केली.

यानंतर त्यांनी महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. “मेळ्यांमधील बहुतेक पदात कांही ना कांही सार्वजनिक हिताचाच उल्लेख केला होता. जेणेकरून लोकांत स्फूर्ती उत्पन्न होईल अशीच पदे रचलेली होती. एकाद्या ज्ञातीत, लोकांत अगर प्रांतात विशेष चळवळ सुरू झाली म्हणजे कवितेत अशाच प्रकारे स्फूर्ती येत असते” हे सांगून त्यांनी त्याबद्दल आपले समाधान व्यक्त केले आहे.

“निरनिराळ्या कारणांसाठी हा उत्सव निरनिराळ्या लोकांना प्रिय होत असला तरी राष्ट्राच्या अभ्युदयासाठी असा उत्सव होणे आवश्यक आहे” असे त्यांनी प्रतिपादन केले आहे. हिंदू धर्मात अनेक सण असले तरी त्यातले बहुतेक सण आपापल्या घरी साजरे केले जातात. पंढरीची वारी सार्वजनिक असली तरी ती पुरातन असल्यामुळे तिच्यात आपल्या मनासारखे परिवर्तन घडवून आणणे अशक्य नसले असाध्य आहे. शिवाय ती एकाच ठिकाणी होते. गणपतीचा उत्सव गांवोगांवी लोकांना साजरा करता येतो. वर्षातले दहा दिवस कां होईना, एका प्रांतातल्या सर्व हिंदू लोकांनी एका देवतेच्या उपासनेत गढून जावे ही कांही लहान सहान गोष्ट नव्हे. ती साध्य झाली तर आपल्या भावी अभ्युदयाचा पाया आपणच घातल्यासारखे होईल. सार्वजनिक प्रार्थनेचा जो फायदा ख्रिस्ती व मुसलमान धर्मातील लोकांना मिळतो तसाच तो हिंदू धर्मीयांनासुध्दा होईल.

दोन वर्षातच या उत्सवाचा प्रसार मुंबई, कोल्हापूर, सातारा, नगर, धुळे इत्यादी अनेक गांवात झाला होता, पण “असले उत्सव सर्व ठिकाणी सुरू झाल्याखेरीज त्याचा खरा फायदा आपणास दिसणार नाही. कोणत्याही देवाची एकनिष्ठपणे आराधना केल्याने उपासकांच्या मनाला एक वळण लागून उपासकबंधुत्वाची बूध्दी जागृत होते. मन व बुध्दी अशा प्रकारे सुसंस्कृत झाल्यावर त्याचा उपयोग अशा रीतीने इतर ठिकाणी करण्यात अडचण येत नाही. विषय वेगळे असले तरी ते ग्रहण करण्यास मनाची आणि बुध्दीची स्थिती एकाच प्रकारची लागते हे उघड आहे. धर्मोन्नतीचा व धर्माभिमानाचा अशा प्रकारे राष्ट्रोन्नतीशी संबंध आहे.” असे टिळकांनी लिहिले आहे. त्या वर्षी ज्यांनी ज्यांनी म्हणून हा उत्सव साजरा करण्याच्या कामी द्रव्याने, अंगमेहनतीने, गौसेने अथवा कवित्वाने मदत केली त्यांचे आभार मानून पुढील वर्षी यापेक्षाही जास्त प्रमाणात हा उत्सव साजरा करण्यास गणपती त्यांस बुध्दी देवो अशी प्रार्थना करून लोकमान्य टिळकांनी हा लेख संपवला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करतांना अवघ्या प्रांताच्या आणि राष्ट्राच्या अभ्युदयाचे उदात्त ध्येय लोकमान्य टिळकांच्या डोळ्यासमोर होते ही गोष्ट या लेखातून स्पष्ट होते.

. . .  . . . . . .  (समाप्त)

2 प्रतिसाद

  1. अप्रतिम माहिती. माझा प्रश्न आहे की चौदा विद्यांचा दाता श्रीगणेश त्यांच्या विद्यांचा आणि मंत्राचा उपदेष्ठा कोण. नं. 919769478231.

    • आपल्या प्रश्नाचा रोख समजला नाही. प्रत्येकाने त्याला हवी ती विद्या किंवा कला स्वतःच्या प्रयत्नानेच मिळवावयाची असते असे माझे व्यक्तिगत मत आहे. श्रीगणेशाची उपासना आपले ध्येय दाखवण्यासाठी प्रतीकात्मक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: