लोकमान्य टिळक आणि गणेशोत्सव

“लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला” असे मी मला समजायला लागल्यापासून ऐकत आलो आहे. ‘वैयक्तिक’ आणि ‘सार्वजनिक’ यातील फरक कळायला लागल्यानंतर  “लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला” अशी सुधारणा त्यात झाली. “लोकमान्यांनी लावलेल्या रोपाचा केवढा मोठा वृक्ष झाला आहे.” असे कौतुकाचे शब्द कालांतराने ऐकू येऊ लागले. अलीकडच्या काळात “लोकमान्यांनी उदात्त हेतूने सुरू केलेल्या या उत्सवाला हे कसले स्वरूप पात्र झाले आहे?” असे निराशेचे उद्गार अनेक वेळा ऐकावे लागतात. या सर्वात लोकमान्य टिळक हा एक समान धागा आहे. लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सुरू केला म्हणजे त्यापूर्वी तो कोणाला माहीत नव्हता. गुरुत्वाकर्षणाचा किंवा ऑक्सीजनचा जसा कोणा शास्त्रज्ञाने शोध लावला त्याप्रमाणे टिळकांनी गणेशोत्सवाचा शोध लावला अशा थाटात कांही लोक बोलतांना आढळतात. याबद्दल मला मिळालेली थोडी त्रोटक माहिती या लेखात देण्याचा प्रयत्न करीत आहे.

गणपती हे पेशव्यांचे कुलदैवत होते आणि त्यांची गाढ श्रध्दा असल्याने पेशवाईच्या काळात पुण्यात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा करण्याची सुरुवात झाली. तो उत्सव तमाम जनतेसाठी खुला नसला तरी पेशव्यांच्या दरबारातील प्रतिष्ठित मंडळींची हजेरी तिथे लागत असे. त्यानिमित्य शनिवारवाड्याची सजावट आणि दिव्यांची रोषणाई केली जात असे, तसेच भजन कीर्तन, गायन, नृत्य आदि कार्यक्रम होत असत. पेशव्यांचे मुख्य सरदार हा उत्सव आपापल्या संस्थानांच्या ठिकाणी करू लागले. त्यामुळे लोकमान्य टिळकांनी सुरू करण्यापूर्वीपासूनच महाराष्ट्रातील कांही ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत होता.

देशकार्यासाठी किंवा स्वराज्याच्या चळवळीसाठी जास्तीत जास्त जनतेने एकत्र येणे आवश्यक होते. पण उघड उघड त्या कारणाने लोकांना बोलावल्यास ब्रिटीश सरकार त्याला मान्यता तर देणार नाहीच, तशा कोणत्याही प्रयत्नांना ते मुळातून खुडून टाकणार हे निश्चित होते. सरकारला विरोध करून पुढे येण्याचे धैर्य सामान्य जनतेत नव्हते. लोकमान्य टिळकांना इतिहास आणि समाजशास्त्राची चांगली जाण होती. ज्युपिटर या ग्रीकांच्या देवाच्या स्मरणार्थ भरवले जाणारे ऑलिंपिक खेळ विविध ग्रीक राज्यांना एकत्र आणण्यात यश्स्वी ठरले होते. दर आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाणा-या वारक-यांची संख्या खूप मोठी होती. अशा धार्मिक मेळाव्यांना विरोध न करणे असे इंग्रजांचे धोरण होते. या बाबींचा मेळ घालून लोकांना एकत्र आणण्यासाठी एक नवा उपक्रम सुरू करायचे असे त्यांनी ठरवले.

लोकमान्य टिळकांनी सन १८९३ मध्ये पुण्यात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्यानंतर त्यांनी आपल्या केसरी या वृत्तपत्रात आणि जाहीर भाषणांमध्ये त्यासंबंधी प्रचार चालू ठेवला होता. टेलीफोन, टेलीव्हिजन व इंटरनेट अशा आजकालच्या माध्यमांच्या अभावीसुध्दा लोकमान्यांचे सोशल नेटवर्किंग इतके चांगले होते की वर्षभरानंतर सन १८९४ साली शेकडो ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले गेले. या वेळी टिळकांनी लिहिलेल्या अग्रलेखात या गणेशोत्सवाचे समग्र वर्णन केले आहेच, त्याला विरोध किंवा त्याची टिंगल करणा-या लोकांवर चांगले आसूड ओढले आहेत.  त्यातील कांही मुद्द्यांचा सारांश खाली उद्धृत केला आहे.

“यंदाचा भाद्रपद महिना, विशेषतः गेले कांही दिवस मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाच्या अक्षरांनी नोंदण्यासारखे गाजले. सर्व पुणे शहर गणपतीच्या भजनाने गजबजून गेले होते.
प्रत्यही निढळाच्या घामाने पैसे मिळवून आम्हा सर्वांची तोंडे उजळ करणारा साळी, माळी, रंगारी, सुतार, कुंभार, सोनार, वाणी, उदमी इत्यादि औद्योगिक वर्ग यांनी घेतलेली मेहनत केवळ अपूर्व आहे.
कोतवाल चावडी, रे मार्केट …. आदि ठिकाणच्या गणपतीच्या मूर्ती प्रेक्षणीय होत्याच, मेळ्यांचा सरंजाम पाहून तर आमची मती गुंग झाली. त्यात जो अश्रुतपूर्व चमत्कार दृष्टीस पडणार याची आम्हास कल्पना करता आली नाही.

“गणपतीची ही स्वारी ब्राह्मणांच्या प्रोत्साहनाने निघाली आहे, यात धर्ममूलक थेंबही नाही, हे एक नवे खूळ आहे, ही ताबूतांची नक्कल आहे, करमणूक करून घेण्यासाठी केलेले थोतांड आहे” असे नाना प्रकारचे तर्क युरोपियन वगैरे लोकांच्या डोक्यातून निघत आहेत. ज्यांचे मस्तक मत्सराने, भीतीने व क्रोधवशतेने शांतिशून्य झाले आहे, त्यांच्यापुढे मोठ्या वशिष्ठाने वेदांत सांगितला तरी पालथ्या घागरीवर पाणी घालण्यासारखे होणार आहे. पण ज्यास दोन आणि दोन चार इतके समजण्यापुरती अक्कल आहे तो एकदम कबूल करेल की यात सर्व हिंदू लोकांचा हात आहे.

पेशवाईचा इतिहास वाचल्यास आणि बडोदे, सांगली, जमखिंडी आदि जागी भाद्रपद महिन्यात जाऊन आल्यास हा उत्सव बराच जुना व सार्वत्रिक आहे हे ताबडतोब लक्षात येईल. यंदा नवीन गोष्ट झाली ती म्हणजे गणपतीची मिरवणूक मोठ्या थाटामाटात झाली. सर्व जातीच्या लोकांनी जातीमत्सर सोडला आणि एका दिलाने आणि धर्माभिमानाने ते मिसळले ही आनंदाची गोष्ट झाली.

मेळ्यात भाग घेणा-या सुमारे तीन हजार माणसांनी रात्री पाच पाच तास मेहनत घेऊन जी गाणी बसवली व हजारो स्त्रीपुरुषांनी ती ऐकली या सर्वांना जर चैन, लहर, करमणूक असे नाव द्यायचे असेल तर भक्तीपंथ कोणता ते आम्हास समजत नाही किंवा ज्याला अधर्मवेडाने पछाडले आहे त्यांस भजनाचा आनंद समजत नाही असे तरी म्हंटले पाहिजे.”

सर्व भारतीय लोकांनी आपसातले भेद सोडून एकत्र यावे ही लोकमान्य टिळकांची मुख्य इच्छा होती आणि गणेशोत्सवाच्या निमित्याने निदान कांही दिवस तरी ते घडतांना दिसले याचे त्यांना समाधान वाटले. सर्व लोकांनी आपापल्या कामात भरभराट केल्यावर हिंदुस्थानची कीर्तीसुध्दा जगभरात पसरेल. इंग्लंड व हिंदुस्थान या दोन देशांमध्ये अपूर्व प्रेमाचे संबंध उत्पन्न होऊन हे दोन्ही देश प्रलयकाळापर्यंत जगाचे पुढारीपण करतील अशी आशा लोकमान्यांनी या लेखात व्यक्त करून त्यासाठी सर्वांना बुध्दी देण्याची प्रार्थना केली आहे.

. . . . . .  . . . . (क्रमशः)

One Response

  1. सुंदर लेख !! ट्विटरवरून जास्तीजास्त लोकांपुढे पोचायला पाहिजे. आजकाल टिळकांच्या कार्याचा उल्लेख जाणिवपूर्वक टाळला जातो कारण का तर ते ब्राम्हण होते म्हणून.. टिळकांच्या कार्य जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: