दीप अमावास्या (दिव्याची अंवस) की गटार अमूशा ?

दीप

आपल्याला मदत करणारी माणसे, पशूपक्षी, वनस्पती इतकेच नव्हे तर आजूबाजूच्या निर्जीव वस्तूंबद्दल आपल्याला आत्मीयता किंवा आदर वाटावा आणि आपण तो कृतींमधून व्यक्त करावा अशा प्रथा आपल्या सणवारांमधून पाडल्या गेल्या आहेत. दिवा ही एक अशीच अत्यंत उपयुक्त वस्तू आहे. अंधारात चाचपडत असतांना दिव्याच्या उजेडाने आपल्याला आजूबाजूला काय काय आहे हे दिसते, न ठेचकाळता पुढे जाण्यासाठी आपला मार्ग दिसतो. प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये दीपप्रज्वलन करावे लागतेच, त्या आधी त्या दिव्याची पूजाही केली जाते.

विजेचे दिवे प्रचारात येण्यापूर्वी  रोजच संध्याकाळ झाली की पूर्ण अंधार पडायच्या आधी घरोघरी दिवे लावण्चाया एक कार्यक्रम असे. संधीप्रकाशाच्या त्या वेळेलाच दिवेलावणी असे नाव होते. त्या वेळी “दिवा दिवा दीपत्कार, कानी कुण्डले मोतीहार, दिव्याला देखुन नमस्कार।।” असे म्हणून दिव्याला नमस्कार करण्याची परंपरा आहे, किंवा पूर्वी ती होती असे आता म्हणावे लागेल. रोज देवाची पूजा करताना नीरांजन रूपी दिव्याचा उपयोग केला जातो. साग्रसंगीत देव पूजेच्या प्रारंभी देवासमोर समयी लावून शंख-घंटा पूजना प्रमाणेच दिव्यालाही गंध, अक्षता, फ़ुले वगैरे वाहण्याची  पद्धत आहे. ती करतांना एक श्लोक म्हंटला जातो. तो असा आहे.
“भो दीप ब्रह्म रूप: त्वं ज्योतिषां प्रभु: अव्यय:।
आरोग्यं देहि पुत्रांश्र्च सर्वार्थान् च प्रयच्छ मे ।।
या श्लोकात दिव्यामध्येच परब्रह्माला पाहून त्याच्याकडे आशीर्वाद मागितले आहेत.

दीप अमावास्या आणि दीपावली हे दोन वार्षिक सण “दीप” या दैवताला खास समर्पित आहेत. दोन्हीही सण अमावास्येला येतात. त्या काळ्याकुट्ट रात्रीच्या अंधारात दिवे लावून त्यांच्या प्रकाशाने त्या अंधाराचा नाश करायचा, तमसो मा ज्योतीर्गमय हा संदेश त्यातून सर्वांना द्यायचा असा उद्देश या प्रथेत आहे. त्यातला दिव्याची अंवस हा सण तर खास दिव्यांसाठी साजरा केला जात असे. त्या दिवशी घरातील सर्व समया, निरांजने, लामणदिवे वगैरे घासून पुसून चकाचक करून त्यांची पूजा केली जाते, तसेच कणकेच्या खोलगट आकाराच्या वाट्या तयार करून त्यामध्ये तेल वात घालून ते दिवे लावतात. तसेच पिठाचे दिवे उकडून प्रसाद म्हणून तूप आणि गुळासोबत खाल्लेही जातात. दिव्याच्याच पूजेमध्ये दिव्यानेच दिव्याची आरती आणि दिव्याला दिव्यांचाच नैवेद्य ! काय गंमत आहे ना?

पंचतंत्र किंवा इसापनीतीमधील सगळे प्राणी माणसांसारखे बोलतात आणि वागतात. आपल्या कहाण्यांमध्येही असेच घडते. दिव्याच्या अंवसेच्या कहाणीतले उंदीर आणि दिवेसुध्दा माणसांसारखे बोलतात. यातली गोष्ट थोडक्यात अशी आहे.

एका राजाच्या सुनेने एकदा घरांतला एक अन्नपदार्थ स्वतः खाल्ला, आणि त्याचा आळ उंदरांवर घातला. (राजाच्या सुनेला हे करायची काय गरज होती, तिला हवा तो पदार्थ मागून मिळायला काय हरकत होती?) उंदरांना ते समजले. (कसे?) तिचा सूड घ्यावा म्हणून त्यांनी त्या रात्री तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसरे दिवशी सासूदिरांनी तिला संशयावरून घरांतून हाकलून दिले. ती सून दिव्यांची चांगली काळजी घेत असे, दिव्यांच्या अंवसेच्या दिवशीं त्यांना चांगला नैवेद्य दाखवत असे. पण ती घरांतून निघाल्यावर ते बंद पडले. पुढे दिव्यांच्या अंवसेच्या दिवशी राजा शिकारीहून परत येत असतांना एका झाडाखाली थांबला. तिथे त्याला दिसले की गांवांतले दिवे अदृश्य रूप धारण करून (मग राजाला ते दिसले कसे?) त्या झाडावर बसून एकमेकांशी गप्पागोष्टी करीत आहेत. राजाच्या घरच्या दिव्याने त्यांना सून आणि उंदरांची गोष्ट सांगितली. दर वर्षी मनोभावे पूजा करणारी सून या वेळी राजवाड्यात नसल्यामुळे तो दिवा दुःखी झाला होता. हा सर्व प्रकार ऐकून आपल्या सुनेच्या चारित्र्याबद्दल राजाची खात्री झाली. त्याने आणखी चौकशी केली आणि सुनेला सन्मानाने घरी परत आणले.

कहाणीतल्या काळात फक्त तेलातुपाचेच दिवे असत. इंग्रजांच्या राजवटीत केरोसीनचे कंदील, चिमण्या वगैरे आल्यानंतर दिव्यांच्या अमावास्येला त्यांचीही पूजा व्हायला लागली होती. विजेच्या दिव्यांमुळे दिव्याखाली अंधार ही म्हणच रद्दबातल करून टाकली. हे दिवे भिंतीवर उंचावर बसवलेले असल्यामुळे आणि शॉक लागण्याच्या भीतीपोटी त्यांना घासण्यापुसण्यात कोणाला रस नव्हता. फक्त एक स्विच दाबताच हे दिवे लागतात किंवा बंद होतात. त्यांना तेल वात वगैरे घालावे लागत नाही, त्यांच्याकडे लक्ष पुरवावे लागत नाही. रोज सायंकाळी दिवे लावणे हे पूर्वीसारखे मोठे काम उरले नाही. विजेची खात्रीलायक उपलब्धता वाढत गेली. त्यामुळे निदान घरात तरी रात्रीचा अंधार राहिला नाही. हे सगळे होत असतांना दिव्याच्या अंवसेचे महत्व कमी कमी होत गेले.

मी मुंबईला आल्यानंतर सुरुवातीच्या काळात एकदा रात्रीचा सिनेमाचा शो पहायला गेलो होतो. बसमध्ये एक विचित्र प्रकारचा उग्र दर्प पसरला होता. थिएटरमध्येसुध्दा तोच घाण वास घमघमत होता. तो अगदी असह्य झाल्याने मी शेजारच्या सभ्य वाटणाऱ्या माणसाला विचारले. त्याने आश्चर्याने मलाच विचारले, “आज गटारअमूशा आहे हे तुम्हाला ठाऊक नाही?” हा गावठी दारूचा दुर्गंध होता हे त्यानंतर माझ्या लक्षात आले. पुढे श्रावणमहिना येणार असल्यामुळे सगळे बेवडे तर्र होऊन फिरताहेत. पक्के दारुडेसुध्दा या बाबतीत खरेच धर्मनिष्ठ असतात की त्यांना पोटात दारू रिचवायला हे आणखी एक निमित्य मिळते तेच जाणोत. मागच्या वर्षी या दिवशी पुण्यातली सर्व मांसाहारी रेस्तराँ खचाखच गर्दीने भरली होती आणि या एका दिवसात अमूकशे की हजार टन चिकन, मटण, मासे वगैरेंचा खप झाला अशा बातम्या वर्तमानपत्रात आल्या होत्या. त्या दिवशी दीप अमावस्या कशा प्रकारे साजरी केली, किती लोकांनी दिव्यांची पूजा केली हे मात्र कोठे वाचले नाही. त्या दिवशी दीप अमावास्या (दिव्याची अंवस) नावाचा एक सण होता याचीच कित्येकांना कल्पना नसावी.

गटारी अमावास्या हे मूळच्या गताहारी अमावास्या या शब्दाचा अपभ्रंश होऊन आलेले रूप आहे असा एक नवा शोध संस्कृतिसंरक्षकांनी लावला आहे. असे मी या वर्षीच (२०२१ मध्ये) पहिल्यांदा ऐकले.

आता बदलत्या परिस्थितीनुसार सणसुध्दा बदलले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: