चातुर्मास

चातुर्मास याचा शब्दशः अर्थ चार महिने. पण चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ किंवा ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अशा कुठल्याही चार महिन्यांच्या काळाला चातुर्मास असे म्हणत नाहीत. आषाढी शुध्द एकादशीपासून ते कार्तिकी शुध्द एकादशीपर्यंत महाराष्ट्रातला चातुर्मास पाळला जातो. त्यात आषाढातले वीस दिवस, श्रावण, भाद्रपद आणि आश्विन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्यातले अकरा दिवस येतात. अशा प्रकारे तो पाच महिन्यांत पसरलेला असतो. उत्तर भारतात काही भागातला चातुर्मास आषाढातील गुरु पौर्णिमेनंतर कार्तिकातील त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत असतो. तिकडच्या पंचांगांतले महिने कृष्ण प्रतीपदेपासून सुरू होऊन पौर्णिमेपर्यंत असतात. त्यामुळे त्यांच्या चातुर्मासात आषाढ महिना येत नाही, त्यांचा चातुर्मास श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक या चारच महिन्यांचा असतो.

माझ्या लहानपणी आमच्या घरात चातुर्मासाचे मोठे प्रस्थ होते. त्या काळात लग्नमुंजी वगैरेंचे मुहूर्त येत नसल्यामुळे हे समारंभ त्यापूर्वी उरकून घेतले जात किंवा लांबणीवर टाकले जात असत. याचा आम्हा मुलांना काही उपसर्ग नव्हता. आमच्या दृष्टीने महत्वाचा एवढाच भाग होता की चार महिने कांदा व लसूण हे पदार्थ घरात आणायलादेखील बंदी असे. बाहेरचे खाणे तर पूर्णपणे निषिद्ध होते. एकादशीच्या दिवशी तोंडालासुध्दा त्यांचा वास येऊ नये किंवा त्याची ढेकरही येऊ नये अशा विचाराने ही बंदी एक दिवस आधीपासून अंमलात आणली जात असे. त्याच्याही आदल्या दिवशीची कांदेनवमी उत्साहाने साजरी केली जात असे आणि कांद्याची थालीपीठे, झुणका, भजी वगैरे करून घरातला कांद्याचा सगळा स्टॉक संपवला जात असे.

घरातली मोठी माणसे, विशेषतः स्त्रीवर्ग चातुर्मासासाठी एकादा ‘नेम’ धरत असत. चार महिने एकादा अन्नपदार्थ खायचा नाही, एका वेळीच जेवण करायचे, रोज एकादे स्तोत्र म्हणायचे, रोज किंवा अमूक वारी एकाद्या देवळात दर्शनाला जायचे, तिथे जाऊन दिव्यात वाटीभर किंवा चमचाभर तेल घालायचे, सूर्योदयाच्या आधी उठून स्नान करायचे अशा असंख्य प्रकारचे नेमधर्म असत. चार महिने मौनव्रत धरणे हे सर्वात कठीण व्रत होते. पुरुषवर्गामधील काही लोकांना एकच नेम करतांना मी पाहिला. तो म्हणजे चार महिने दाढीमिशा आणि केस वाढवणे. चातुर्मासात असले नेम करण्यामुळे त्यापासून मिळणारे पुण्य अनेक पटीने वाढते असे समजले जात असे. “असे का?” या प्रश्नाला “आपल्या आ़जोबा, पणजोबांपासून हे चालत आले आहे, ते लोक मूर्ख होते का?” अशा प्रतिप्रश्नातूनच उत्तर मिळत असे आणि चुकून कोणी “कदाचित असतील.” असे प्रत्युत्तर दिले तर त्याची काही धडगत नसे. असा नेम पाळण्यापासून खरेच पुण्य मिळते का हा एक वेगळा प्रश्न आहे. पण जेवढे पुण्य मिळेल त्यापेक्षाही जास्त पाप हा नेम मोडल्यामुळे मिळेल अशा भीतीमुळे हे नेम जरा घाबरत घाबरतच धरले जात आणि भक्तीभावापेक्षा भीतीपोटीच त्यांचे पालन होत असे. लहान मुलांना मात्र कांदालसूण न खाण्याव्यतिरिक्त कसले नेम करायला सांगत नव्हते.

शिक्षणासाठी घर सोडून बाहेर पडल्यानंतर माझा चातुर्मासाशी दूरान्वयेही कसलाच संबंध राहिला नव्हता. काही  दिवसांपूर्वी आलेल्या एका ढकलपत्राने चातुर्मास सुरू झाल्याची वर्दी दिली. थोडा निवांत वेळ मिळाल्यावर त्याबद्दल आंतर्जालावर थोडी विचारपूस केली. त्यातून असे समजले की आषाढ शुध्द एकादशीला ‘देवशयनी‘ असे नाव आहे. क्षीरसागरात शेषनागाने वेटोळे घालून बनवलेल्या शय्येवर त्या दिवशी श्रीविष्णूभगवान निद्रिस्त होतात आणि चार महिने झोपून झाल्यानंतर कार्तिक महिन्यातल्या प्रबोधिनी एकादशीला ते जागे होतात. माणसांचे एक वर्ष म्हणजे देवांचा एक दिवस असतो आणि चातुर्मास म्हणजे त्यांचे रात्रीतले आठ तास होतात. तेवढी निद्रा घेऊन ते भल्या पहाटे उठून कामाला लागतात. मध्यंतरीच्या काळात जगाचे कार्य व्यवस्थित चालावे अशी पूर्ण व्यवस्था केलेली असतेच.

“देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे असे धर्मशास्त्र सांगते.” अशी माहिती सनातन संस्था या स्थळावर दिली आहे. “मनुष्याचे एक वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते. ‘जसजसे एका माध्यमातून दुसर्‍या माध्यमात जावे, तसतसे काळाचे परिमाण पालटते’, हे आता अंतरिक्षयात्री चंद्रावर जाऊन आले, तेव्हा त्यांना आलेल्या अनुभवावरून सिद्धही झाले आहे.” असे सांगून त्यांनी आपल्या कथनाला आधुनिक विज्ञानाची कुबडी देण्याचा अत्यंत दुबळा प्रयत्नही केला आहे. आपल्या पृथ्वीतलाच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवरच सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र असते हे मी पन्नास वर्षांपूर्वी एका खेडेगावात शिकत असतांना भूगोलाच्या पुस्तकातून शिकलो होतो. आणि उत्तर ध्रुवाजवळील आर्ट्रिक प्रदेशात एस्किमो नावाची माणसे आणि दक्षिण ध्रुवाजवळील अँटार्क्टिक प्रदेशात पेन्ग्विन नावाचे पक्षी राहतात असेही शिकलो होतो. त्यांचा एक दिवस आणि रात्र देवांच्या दिवस व रात्रींएवढे असतात. तेंव्हा माणूस पृथ्वीच्या कक्षेबाहेरसुध्दा गेला नव्हता. निरनिराळ्या ठिकाणी दिवस व रात्र निरनिराळ्या वेळी आणि वेळांकरता असतात हे समजण्यासाठी चंद्रावर जाण्याची गरज नव्हती.

सनातन संस्था या स्थळावर दिलेल्या माहितीनुसार चातुर्मासात सण आणि व्रते अधिक प्रमाणात असण्याचे कारण असे आहे. “श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक या चार मासांत (चातुर्मासात) पृथ्वीवर येणार्‍या लहरींत तमोगुण अधिक असलेल्या यमलहरींचे प्रमाण अधिक असते. त्यांना तोंड देता यावे; म्हणून सात्त्विकता वाढवणे आवश्यक असते. सण आणि व्रते यांद्वारे सात्त्विकता वाढत असल्याने चातुर्मासात जास्तीतजास्त सण आणि व्रते आहेत. शिकागो मेडिकल स्कूलचे स्त्रीरोगतज्ञ प्रोफेसर डॉ. डब्ल्यु. एस्. कोगर यांनी केलेल्या संशोधनात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या चार मासांत विशेष करून भारतामध्ये, स्त्रियांना गर्भाशयासंबंधी रोग चालू होतात किंवा वाढतात, असे आढळले.” असे चातुर्मासामधील व्रतांसाठी एक ‘शास्त्रीय’ दिसणारे कारणसुध्दा ठोकून दिले आहे. असल्या मिथ्याविज्ञानापासून (सुडोसायन्सपासून) परमेश्वराने या देशाला वाचवावे अशी प्रार्थना करावी  असे आता इथल्या नास्तिकांनासुध्दा वाटेल.

वैद्य बालाजी तांबे आजकाल प्रसिध्दीच्या प्रखर झोतात दिसतात. चातुर्मासात पावसाळा असतो आणि त्याचा परिणाम म्हणून शरीरातील अग्नी मंदावलेला असतो. चेतनाशक्‍ती, वीर्यशक्‍ती इतर ऋतूंच्या मानाने कमी झालेली असते. यावर उपाय म्हणून लंघन, मौन वगैरेंचे पालन करावे आणि तुळस, पिंपळ आदि वनस्पतींच्या औषधी उपयुक्ततेचा लाभ घ्यावा यासाठी चातुर्मासात व्रतवैकल्ये सांगितली आहेत, असे ते म्हणतात. शिवाय सामाजिक आरोग्यासाठीही…
– आरोग्यरक्षणाबरोबर व्रतवैकल्यांच्या निमित्ताने लोक एकत्र येऊ शकतात, त्यातून सामाजिक आरोग्य सुधारते.
– दैनंदिन व्यवहारापेक्षा काही तरी वेगळे करण्याची संधी मिळाल्याने मनाला विरंगुळा मिळतो.
– एकंदरच उत्सवाचे वातावरण अनुभवता येते.
– सर्वात महत्त्वाचे म्हणजे हलक्‍या फुलक्‍या तऱ्हेने मनावर निर्बंध घालण्याचा, शिस्त लागण्याचा सराव होऊ शकतो.
वगैरे लाभ त्यांनी सांगितले आहेत. अर्थातच हे सगळे लाभ आपण वर्षाच्या बाराही महिन्यात घेऊ शकतो असे असतांना त्यासाठी चातुर्मासच कशाला हवा?

प्रत्यक्षात चातुर्मासात इतके सण येतात आणि त्या निमित्याने गोडधोड खाणे चालले असते की लंघनाऐवजी थोडेसे  अतिभोजनच होते. तसेच या काळात जास्तच जनसंपर्क होत असल्यामुळे मौनाच्या ऐवजी जास्तच बोलणे होते. मला असे वाटते की पावसाळ्यात नद्यानाले पुराच्या पाण्याने दुथडी भरून वहात असतात, त्यामुळे पूर्वीच्या काळचे कच्चे रस्ते बंद झालेले असत. पेरणी होऊन गेल्यानंतर पिके उगवून कापणीची वेळ येईपर्यंत शेतात प्रत्यक्ष फार जास्त काम नसते पण पिकांची राखण करण्यासाठी तिथे उपस्थित असणे आवश्यक असते. पावसाळ्यातल्या गढूळ पाण्यामधून साथीचे रोग पसरण्याची शक्यता असते. हवामान झपाट्याने बदलत असल्यामुळे सर्दीखोकला, ताप यासारख्या व्याधी जास्त प्रमाणात होतात. अशा वेळी घरात असलेलेच चांगले म्हणूनही या दिवसात बहुतेक लोक बाहेरगावी जाण्याचे प्रोग्रॅम आखत नसत. आप्तेष्ट येऊ शकणार नाहीत म्हणून लग्नमुंजीसारखे समारंभ ठरवत नसत. घरात काढायचा वेळ सत्कारणी लावण्यासाठी निरनिराळ्या देवांच्या पूजा आराधना करत. अशा प्रकारे चातुर्मासाची सुरुवात झाली असावी असा माझा अंदाज आहे. आजच्या जगात यातल्या कुठल्याच गोष्टींना महत्व उरलेले नसल्यामुळे लोक कसले वेगळे नियमही पाळत नाहीत आणि नेमधर्म वगैरेवर कुणाचा फारसा विश्वास उरलेला नाही. त्यामुळे चातुर्मास कधी आला आणि गेला तेच समजत नाही.

संपादन दि.१२-०७-२०१९

हे लेख पहा :

श्रावणमास
https://anandghare2.wordpress.com/2012/07/17/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b8/

श्रावण मासातले नेमधर्म आणि सणवार
https://anandghare2.wordpress.com/2012/07/19/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae-%e0%a4%86%e0%a4%a3/

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: