श्रावणी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, ओणम् आणि बलरामजयंती

एकादे पुण्यक्रम चातुर्मासात केले तर वर्षभरातील इतर दिवशी मिळेल त्यापेक्षा अधिक फल मिळते आणि श्रावण महिन्यात ते फल त्याहूनही जास्तपटीने मिळते अशी धारणा आहे. त्यामुळे हा संपूर्ण महिना धार्मिक समजला जातोच, शिवाय पूर्णचंद्राच्या प्रकाशामुळे पावन झालेला पौर्णिमा हा दिवस नेहमीच शुभ मानला जातो. अशा दुहेरी महत्वामुळे श्रावणी पौर्णिमेला दुग्धशर्करायोग म्हणता येईल. देशाच्या निरनिराळ्या भागात या दिवशी उत्सव साजरा केला जात असतो.

माझ्या लहानपणीची आठवण म्हणजे या दिवशी श्रावणी हा एक सार्वजनिक विधी होत असे. या दिवशी यज्ञयाग, मंत्रोच्चार वगैरे करून आणि पंचगव्य प्राशन करून देहाचे व मनाचे शुध्दीकरण करायचे आणि जुने यज्ञोपवीत काढून टाकून नवे परिधान करायचे असे. आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास मौंजीबंधनविधी करून मिळालेल्या पौरोहित्याच्या लायसेन्सचे वर्षभरासाठी रिन्यूअल करून घ्यायचे. मला तरी या लायसेन्सचे महत्वही कधी जाणवले नाही किंवा त्याचा उपयोग करण्याची वेळही आली नाही यामुळे मला हा विधी कधीच आवडला नाही. त्यातला पंचगव्य प्राशन करण्याचा भाग तर कमालीचा तिटकारा आणणारा होता.

त्या काळी संघात जाणारे माझे शाळेतले मित्र नेमाने त्या दिवशी शाखेत जाऊन त्यांच्या झेंड्याला राखी बांधायचे. तो राष्ट्रध्वज नसल्यामुळे तो कशाचे प्रतीक होता आणि माझे मित्र त्याचे रक्षण करणार (की तो झेंडा त्यांचे रक्षण करणार) म्हणजे ते काय करणार आहेत हे काही त्यातल्या कोणाला सांगता येत नसे. बेबी नंदाची प्रमुख भूमिका असलेला छोटी बहन हा सिनेमा लोकप्रिय झाल्यानंतर त्यातले भैया मेरे राखीबंधनको निभाना हे गाणे लोकांच्या ओठावर आले आणि या उत्तर भारतातल्या सणाचा अखिल भारतात प्रसार झाला. त्यापूर्वी दक्षिणेत हा सण फारसा कोणी पाळत नव्हते. माझ्या लहानपणीसुध्दा आमच्या गावातल्या बाजारात राख्या मिळत नसत. विणकाम, भरतकाम वगैरे करण्यासाठी आणलेल्या रेशमाच्या धाग्यांपासून मुलींनी घरच्या घरीच राख्या तयार करून आपल्या भावांच्या मनगटावर त्या बांधायला तेंव्हा नुकतीच सुरुवात झाली होती.

त्या दिवशीच्या जेवणात नारळीभात खायला मिळत असल्यामुळे त्या कारणाने मात्र आम्हा मुलांना श्रावणातली पौर्णिमा अतिशय प्रिय होती. सकाळी पंचगव्य प्राशन केल्याशिवाय जेवणात नारळीभात मिळणार नाही असा धाक दाखवला जात असल्यामुळे आम्ही नारळीभातासाठी तेही करायला तयार होत असू. समुद्रकिनारा खूप दूर आणि पावसाचे प्रमाणही कमी असल्यामुळे नारळाचे उत्पादन त्या भागात होत नसे. ओले खोबरे हा त्या भागातल्या आणि त्या काळातल्या लोकांच्या नेहमीच्या जेवणातला भाग नव्हता, ते खाणे हा थोडासा चैनीचा भाग होता. मोदक, करंज्या वगैरेंमधून कधीतरी खोबरे खायला मिळत असे आणि एकाद्या पूजेसाठी किंवा देवदर्शनाच्या वेळी नारळ फोडला गेला तर चटणी, भाजी, आमटीमध्ये ओले खोबरे घालून त्यांची चंव वाढवली जात असे. त्यामुळे जेवणात पोटभर नारळीभात म्हणजे एक खास मेजवानी होती आणि हा योग वर्षातून एकदाच येत असल्याने त्याचे मोठे अप्रूप वाटायचे.

नारळी पौर्णिमा हा सण कोळीबांधवांमध्ये खूप महत्वाचा असल्याचे मुंबईला आल्यानंतर समजले. मे महिन्याच्या अखेरीस मोसमी वारे वहायला लागतात आणि अंदमान, केरळ, कर्नाटक वगैरे करीत जूनच्या पहिल्या आठवड्याअखेर मान्सून कोकणात येऊन दाखल होतो. त्यावेळी सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यांच्याबरोबर समुद्रही खवळलेला असल्यामुळे मासेमारीसाठी दर्यात उतरणे धोक्याचे असते आणि या काळात मत्स्यव्यवसायाला वार्षिक सुटी दिली जाते. दोन महिन्यात पावसाचा आणि वाऱ्याचा जोर कमी होतो आणि धीट मंडळी मासे पकडण्यासाठी समुद्रात खोलवर जाण्याचे कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला तयार होतात. त्याआधी नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करून आपले रक्षण करण्याची प्रार्थना करतात. उत्सव म्हंटले की त्यानिमित्य नाचगाणे आणि खाणेपिणे आलेच. या बाबतीत कोळी लोक जास्तच उत्साही असतात.

कोकणाप्रमाणेच भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर दक्षिणेला केरळात राहणारे लोक या काळात ओणम हा त्यांचा सर्वाधिक महत्वाचा सण साजरा करतात. त्या भागातले लोक सौर पंचांगानुसार चालतात. सूर्य कोणत्या राशीत आहे यावरून त्यांच्या महिन्यांची नावे ठेवलेली आहेत. श्रावण किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुमाराला सूर्याचे भ्रमण सिंह राशीमधून होत असल्यामुळे या महिन्याचे नाव चिंगम (सिंहम किंवा सिंघम चा अपभ्रंश) असे आहे. वामनावतारात श्रीविष्णूने ज्या बळीराजाला पाताळात घालवून दिले त्याचे राज्य सध्याच्या केरळ प्रदेशात होते अशी समजूत असल्यामुळे बळीराजा हा त्यांचा महानायक आहे. वामनाची आज्ञा शिरोधार्य मानल्यामुळे प्रसन्न झालेल्या श्रीविष्णूभगवानांनी त्याला अमरत्वाचे वरदान दिले आणि दरवर्षी ओणमच्या दिवसात पृथ्वीतलावर येऊन आपल्या प्रजेला भेटण्याची परवानगीही दिली. हा सण दहा दिवस चालत असल्यामुळे बरेच वेळा तो नारळी पौर्णिमेच्या काळात चाललेला असतो. केरळीय लोक या दिवसात पूजाअर्चा वगैरे करतातच, शिवाय खास रांगोळ्या, खाणेपिणे वगैरे होते, तसेच नौकानयनाच्या स्पर्धा होतात. या बोटरेसेस पहायला आता जगभरातून पर्यटक येऊ लागले आहेत.

गेल्या वर्षी मला एक नवीच माहिती मिळाली. उडीशा (ओरिसा) राज्यात होऊन गेलेल्या चैतन्य महाप्रभू यांनी श्रीकृष्णभक्तीचा इतका प्रसार केला की त्यांनाच श्रीकृष्णाचा अवतार समजले जाते. अलीकडील काळात इस्कॉन ही आंतरराष्ट्रीय संघटना उदयाला आली आणि त्यांनी चैतन्यमहाप्रभूंच्या कृष्णभक्तीच्या कार्याला नवीन चालना दिली. या पंथाच्या लोकांनी जगभरात अनेक ठिकाणी मोठमोठी सुंदर देवळे बांधली आहेत आणि तिथे अनेक प्रकारचे उपक्रम चालले असतात. मागील वर्षी या दिवसात मी पुण्याला असतांना आलेल्या श्रावण पौर्णिमेला इस्कॉनपंथीयांनी सर्व ठिकाणी श्रीबलरामजयंती साजरी केली. पुण्यात झालेल्या अशाच एका समारंभात सहभागी होण्याची संधी मला योगायोगाने मिळाली. एका सभागृहातल्या मंचावर श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या इस्कॉन स्टाइलच्या सुबक मूर्ती मांडून ठेवल्या होत्या. त्यांना वाहण्यासाठी पोते भरून फुले आणली होती आणि आलेल्या प्रत्येक इसमाला सढळ हाताने ओंजळ भरून फुले दिली जात होती. एक एक जण पुढे येऊन ती फुले देवांना अर्पण करून येत होता. काही लहान मुलांनी एकमेकांवर फुले उधळायला सुरुवात केल्यानंतर तो प्रकार थांबवण्याची विनंती घोषणेद्वारे केली गेली. पण पूजाविधी संपल्यानंतर एका महंतानेच येऊन उरलेली बरीचशी फुले तिथे उपस्थित असलेल्या मंडळींच्या डोक्यावर उधळली. त्यानंतर चारपाच महिलांनी एक लांबलचक पडदा देवासमोर आडवा धरून त्याला अदृष्य केले. देवांना छप्पनभोग (५६ प्रकारचे नैवेद्य) देण्याचे काम पडद्याआड चालले होते. देवाचे भोजन भक्तांना दिसू नये यासाठी हे केले होते. त्याच वेळी तिथे आलेल्या मुख्य महंताचे प्रवचन सुरू झाले.

प्रवचनाच्या सुरुवातीला त्याने बलरामावताराची माहिती दिली. एका गोष्टीनुसार भगवान विष्णूच्या रामावतारात त्यांच्या शेषनागाने लक्ष्मणाचा अवतार घेऊन आज्ञाधारक लहान भावाची भूमिका उठवून झाल्यानंतर पुढच्या जन्मात विष्णूचा वडील बंधू व्हायचे ठरवले. त्यानुसार कृष्णावतारात बलराम हे त्याचे ज्येष्ठ बंधू म्हणून जन्माला आले. दुसऱ्या कथेनुसार बलराम आणि कृष्ण हे दोघेही मिळून विष्णूचा आठवा अवतार होते. त्यातला बलराम गोरा तर कृष्ण सावळा, बलराम शक्तीशाली तर कृष्ण बुध्दीमान व विद्वान, बलराम सरळमार्गी तर कृष्ण खट्याळ वगैरे वगैरे एकाच परमेश्वराची दोन रूपे होती. कंसमामा, वसुदेव, देवकी, रोहिणी, नंद, यशोदा वगैरेंची कथा अतीशय त्रोटकपणे सांगून झाल्यानंतर महंत आध्यात्माकडे वळले. अथातो ब्रह्मजिज्ञासा वगैरे ऐकून त्यानंतर मी हळूच काढता पाय घेतला, पण शेजारच्या खोलीत जेवणाची व्यवस्था होती आणि प्रसादभक्षण केल्याशिवाय कोणाला बाहेर जाऊ देत नसल्यामुळे मी पानावर जाऊन बसलो. कढीभात, बटाट्याची भाजी आणि खीर असे साधेच पण रुचकर जेवण होते. भोजन करून परत जातांना सभागृहात डोकावून पाहिले तर फेर धरून हरे रामा हरे कृष्णाचा गजर करीत भक्तमंडळी नाचत होती. त्यात तल्लीन झालेली मंडळी किती काळ त्या तंद्रीत राहिली हे पहायला मी तिथे थांबलो नाही.

2 प्रतिसाद

  1. […] श्रावणी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, ओणम् आणि बलरामजयंतीhttps://anandghare2.wordpress.com/2013/08/19/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a3%… […]

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: