गणपतीच्या कहाण्या

श्रावण महिन्यात रोज एक कहाणी वाचली जात असे. त्यातली पहिली कहाणी नेहमी गणपतीची असे.  गणेशचतुर्थीच्या दिवसासाठी दोन वेगवेगळ्या कहाण्या आहेत. या तीन्ही कहाण्या खाली दिल्या आहेत, तसेच त्यांवर थोडे माझे अभिप्रायही दिले आहेत.

आपल्याकडे पूर्वीच्या काळात श्रावण महिन्यात रोज कहाण्या वाचायची प्रथा होती. विजेचे दिवे नसल्यामुळे रात्री बाहेर सगळा अंधारगुडुप असे. त्यामुळे संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेस घरातील सर्व मंडळी घरी परत येत असत. सर्वांनी एकत्र जमायचे, एकाद्या चुणचुणीत मुलाने त्या दिवसाची आणि कधीकधी तिथीची कहाणी मोठ्याने वाचायची आणि इतर सर्वांनी ती भक्तीभावाने श्रवण करायची असा रिवाज होता. प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात गणपतीचे स्मरण करून करण्याची पध्दत आहे. त्याप्रमाणे गणपतीची कहाणी वाचून या कार्यक्रमाची सुरुवात होत असे. ही कहाणी खाली दिली आहे. माझे बंधू डॉ.धनंजय घारे यांनी सांगितलेला या कहाणीचा अन्वयार्थही खाली दिला आहे. त्यावर माझे थोडेसे विवेचनही आहे.

गणेशाची कहाणी.

ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी.

निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष आणि सुवर्णाची कमळे. विनायकाची देवळे राउळे. मनचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा ? श्रावण्या चौथीस घ्यावा. माघी चौथीस संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावे ? पशा पायलीचे पीठ कांडावे. त्याचे अठरा लाडू करावे. सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे. सहाचं सहकुटुंब भोजन करावे. अल्पदान महापुण्य. ऐसा गणराज मनी ध्याइजे, मनी पाविजे. चितलं लाभिजे. मन:कामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे. ही सांठा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफ़ल संपूर्ण.

तात्पर्य व बोध :
श्रीगणेशाच्या सर्वोत्कृष्ट पूजेसाठी श्रीगणेश मूर्तीची मनामध्येच ध्यान-धारणा मार्गाने स्थापना करून पूजा करावी. हा मानस पूजा विधी षोडश उपचाराने सिद्धीस नेण्यास उपयोगी अशी काही संस्कृत स्तोत्रे आहेत. त्यातील एखादे तोंड पाठ केल्यास वा संपूर्ण पूजाविधीच तोंड पाठ केल्यास अशी पूजा करणे सहज शक्य होते.
या मानस पूजेचेच एक सहा महिन्यांचे “व्रत” करावे (वसा घ्यावा). श्रावण शुक्ल चतुर्थीस प्रारंभ करून सहा महिने माघी शुक्ल चतुर्थी पर्यन्त हे व्रत पाळून त्याचे नित्य नेमाने आचरण करावे. यां वशाला एका दमडीचाही खर्च येत नाही. त्यामुळे अत्यंत गरीबांतही गरीब अशा माणसांनाही हा वसा घेणे (वा व्रत करणे-पाळणे) अगदी सहज सुलभ साध्य आहे.
नंतर या व्रताचे उद्यापन करावे. त्यांतहि अगदी कमी खर्चात व स्वत:च्या आर्थिक स्थितीला परवडेल अशा प्रकारे ते (उद्यापन) कसे करावे ते वरील कहाणीत वर्णन केलेले आहे. श्रीगणेशाला प्रत्येक कार्यारंभी नमन करून ‘निर्विघ्न कार्यसिद्धि’ साठी त्याची प्रार्थना करण्याची पद्धत आहे.

पूर्वीच्या काळातले ब्राह्मण शेतीवाडी, उद्योगव्यवसाय, नोकरी चाकरी वगैरे करत नसत. विद्यार्जन आणि विद्यादान हेच त्यांचे काम असे. त्यामुळे त्यांच्या उदरभरणाची व्यवस्ता समाजाकडूनच होत असे. निरनिराळ्या धार्मिक व्रतवैकल्यांमध्ये यासाठी ब्राह्मणभोजन, दानधर्म वगैरेंद्वारे त्या काळात ही सोय करून ठेवली होती. या कहाणीमधल्या उद्यापनात अठरा लाडू करून त्यातले सहा देवापुढे ठेवायचे, देवळात आलेला कोणीही भुकेला ते खाऊन पोट भरू शकेल, सहा ब्राह्मणाला देम्याचे स्पष्टीकरम वर दिलेलेच आहे, उरलेले सहा अर्थातच त्याने आपल्या कुटुंबीयांसह स्वतः भक्षण करायचे आहेत. अशा रीतीने गणेशाची जी कृपा त्या माणसावर होईल तिचा लाभ एकट्याने न घेता तो वाटून घ्यावा अशी शिकवण या कहाणीतून मिळते.
———————————————-

गणेश व चंद्रदेवाची कहाणी
ऐका परमेश्र्वरा गणेशा व चंद्र देवा तुमची कहाणी.
एकदां भाद्रपद शुक्ल चतुर्थीला ब्रह्मदेवानं श्रीगणेशाची पूजा केली. त्याला अष्टसिद्धींचं कन्यादान केलं व आपले सृष्टीची उत्पत्ती करण्याचे कार्य निर्विघ्न पार पडावे असा वर मागितला. गणेशानं “तथास्तु” म्हणून वरदान दिलं.

पुढे काय झालं ? गणेश आपल्या मूषक वाहनावर बसून आठी बायकांसह लग्नाचं वऱ्हाड घेऊन आकाश मार्गानं परतत होते. तो वाटेत मूषकाचा पाय अडखळला व गणेश मूषकावरून खाली पडले. ते चन्द्रानं पाहिलं. गजाननाचं हत्तीसारखं तोण्ड, मूषकाच वाहन, पाय घसरून पडणं सर्व काही विनोदात्मकच दिसत होतं खरं. पण वाटेत पाय घसरून पडलेल्याला काही इजा झालीय का ? लागलंय कां ? मदत हवीय कां ? असे योग्य विचार मनांत न आणता चन्द्र खदखदून हसू लागला. त्या दृश्याची मौज घेऊ लागला. ते पाहून गणेशाला फ़ार राग आला. त्याने चन्द्राला शाप दिला. तो कांय दिला ? गणेश म्हणाले “चन्द्रा, तुला आपल्या सौन्दर्याचा फ़ार अहंकार झाला आहे. आज पासून जो कोणी तूझे तोंड पाहील त्याचेवर चोरीचा वृथा आरोप येईल. सर्व जण तुझे दर्शन निषिद्ध मानतील.”

या शापानं काय झालं ? सगळे चन्द्राचे तोंड पाहीनासे झाले. त्याला चुकवू लागले. टाळू लागले. अपशकुनी मानू लागले. चन्द्रही फ़ार घाबरला. आपल्यामुळे सर्व लॊकांना त्रास होऊ नये म्हणून लपून बसला. कोणाला तोंड दाखवेना. सर्व देवांना त्याची दया आली. त्यांनी ब्रह्मदेवाकडे जाऊन चन्द्राच्या शापावर उपाय मागितला. ब्रह्मदेव म्हणाले. “गणेश मलाही अत्यंत पूज्य आहे. त्याचा शाप मला फ़िरवता येणार नाही. विष्णु व महादेवालाही ही गोष्ट साध्य होणार नाही. तरी चन्द्राने श्रीगणेशालाच शरण जावे. त्याला प्रसन्न करून घ्यावे व झाल्या अपराधाची क्षमा मागावी. म्हणजे गजानन उ:शाप देईल.”

सर्व देवांनी जाऊन ही युक्ती चन्द्राला सांगितली. चन्द्राने गणेशाची व्रते, पूजा, अथर्वशीर्ष पठण, मंत्र जप, स्तोत्रपठण वगैरे मार्गाने उपासना केली. प्रार्थना केली. झाल्या अपराधाची क्षमा मागितली. सर्व देवांनीही गणेशाची प्रार्थना केली. चन्द्राला उ:शाप द्यायची विनंती केली. मग गजानन प्रगट झाले. त्यांनी चन्द्राला उ:शाप दिला. “ब्रह्मदेवांच्या शब्दाला व सर्व देवांच्या विनंतीला मान देऊन उ:शाप देतोय” म्हणाले. “यापुढे फ़क्त भाद्रपद चतुर्थीला मात्र चन्द्राला माझा शाप लागू राहील. चन्द्र दर्शन निषिद्ध राहील. इतर दिवशी नाही.” सर्वांना आनंद झाला. चन्द्राला उ:शाप मिळाला.

पण चन्द्राचं पूर्ण समाधान झालं नाही. चन्द्रानं आणखी खूप तपश्र्चर्या केली. .गाणेश व्रते केली. पूजा केली. मंत्र जप केला. स्तुती-स्तोत्रे गाइली. झाल्या अपराधाची मनोभावे क्षमा मागितली. प्रार्थना केली. मग शेवटी गजानन प्रसन्न झाला. चन्द्राला वर दिला. “इथून पुढे माझ्या संकष्ट-चतुर्थीच्या व्रताला तुझे दर्शन घेऊनच लोक उपवास सोडतील. सर्व तुझ्या चन्द्रोदयाची आणि चन्द्रदर्शनाची प्रतीक्षा करतील.” असे सांगितले. मग चन्द्राला समाधान झाले. आपल्या दर्शनासाठी लोक वाट पाहतील. दर्शन घेतील. अक्षता उधळतील. म्हणून तो आनंदित झाला. पुऩ्हा हसू खेळू लागला.

जसा चन्द्राला गणेश प्रसन्न झाला तसाच तुम्हां आम्हांला पण होवो.

ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफ़ल संपूर्ण.
———————————————————————————————

ही कहाणीसुध्दा माझे बंधू डॉ.धनंजय यांनी पाठवली आहे. त्यातला भावार्थ (आजच्या युगातील भाषेत) असा असावा असे मला वाटते.

गणेशाच्या कहाणीचा अर्थ

माझ्या मते या कहाणीमधील गणेश आणि चंद्र हे दोघे आपल्या मनामधील निरनिराळ्या प्रवृत्तींची प्रतीके आहेत, त्यांच्यामध्ये कधी संघर्ष चालतो आणि कधी सख्य असते. पण ते समजावून सांगणे आणि समजून घेणे जरा कठीण आहे. त्यामुळे माझ्या कल्पनेप्रमाणे मी या कहाणीचे आजच्या काँप्यूटरच्या युगातील भाषेत एक इंटरप्रिटेशन केले आहे. यात कोणाचाही अधिक्षेप करण्याचा माझा हेतू नाही.

ब्रह्मदेव हा (जगाच्या) निर्मितीचा प्रमुख आहे तर गणेश हा विद्येचा अधिधाता आहे. एक हार्डवेअरचा प्रमुख तर दुसरा सॉफ्टवेअरचा असे म्हणता येईल. सॉफ्टवेअर लिहिण्यासाठी आधी हार्डवेअर लागतेच. ब्रह्मदेवाने आठ (सिध्दी) ऑपरेटिंग सिस्टिम्स आणि त्यावर चालणारे असंख्य प्रोग्रॅम बनवायला गणेशाला मदत केली आणि अर्थातच गणेशाने त्यांना तपासून बिनचूक करून घेतले. सुरुवातीला सगळे सॉफ्टवेअर चांगले डिबग केले असले तर प्रॉग्रॅम वारंवार सुरळीतपणे चालतो. त्याचप्रमाणे गणेशाने व्हॅलिडेशन आणि व्हेरिफिकेशन केल्यानंतर ब्रह्मदेवाचा कारखाना व्यवस्थित काम करून विश्वाची निर्मिती करू लागला.

सॉफ्टवेअर्सच्या डेव्हलपमेंटचे काम गणपती करत असतांना एकदा त्याचा माऊस थोडा स्लिप झाला आणि प्रोग्रॅम हँग झाला. चंद्र हा मौजमजा करणारा, सर्वांना आवडणारा, देखणा पण उनाड प्रवृत्तीचा, वेळी अवेळी निरनिराळ्या वेशात उगवणारा किंवा गायब होणारा असा मजेदार देव आहे. निर्मितीच्या कामात त्याचा सहभाग नसतो, तो इतरांचे मनोरंजन करत असतो. सीरियस स्कॉलरटाइप चिकित्सक माणसाची फजीती झाली तर अशा हीरोंना हंसू फुटते, त्याची टिंगल करायचा चान्स मिळतो, तसे झाले. अर्थातच गणेशाला राग आला. “आता मला हसतांना तुला मजा वाटते आहे, पण काम नीटपणे होण्यासाठी सखोल अभ्यासच महत्वाचा आणि उपयोगाचा असतो. तुझ्यासारख्या उनाडांच्या मागे लागलेल्या लोकांकडून कसलीही कामे धडपणे होणार नाहीत. आयत्या वेळी कुणाची तरी कॉपी करायची वेळ (चोरीचा आळ) त्यांच्यावर येणार आहे. त्यामुळे (परीक्षेची वेळ आली की) सगळे तुला टाळतील. अशा वेळी माझी मदत ज्यांना पाहिजे असेल ते यापुढे तुझे तोंड देखील पहाणार नाहीत.” असे त्याला बजावले.

खरेच तसे होऊ लागल्यामुळे चंद्राला पश्चात्ताप झाला. तो खजील होऊन तोंड लपवून बसला. त्यामुळे इतर देवांना चुकल्याचुकल्यासारखे वाटायला लागले. त्यांनी सृष्टीचे कर्ता, धर्ता आणि हर्ता म्हणजे कन्स्ट्रक्शन, ऑपरेशन आणि डिस्पोजल डिपार्टमेंट्सच्या डायरेक्टरांना जाऊन त्यांना गणपतीचे मन वळवण्यासाठी त्यांची मनधरणी केली, पण त्या तीघांचेही गणपतीशिवाय पान हलत नसल्यामुळे त्यांनी थेट गणपतीकडेच जायला त्यांना सांगितले. चंद्राने त्याला शरण जाऊन त्याची क्षमा मागितली तर गणेश आपला आदेश मागे घेईल असे सांगितले.

त्याप्रमाणे चंद्राने गणपतीची स्तुती करून त्याची माफी मागितली. इतर देवांनीही चंद्गासाठी रदबदली केली. गणेशाने प्रसन्न होऊन चंद्राला सांगितले की वर्षातून एक दिवस भाद्रपद चतुर्थीला सारे लोक माझी भक्ती करतात, त्यावेळी त्यांनी तुझ्याकडे लक्ष दिलेले मला चालणार नाही. इतर दिवशी त्यांना तुझ्यापासून मिळणारा आनंद मिळवायला माझी काही हरकत नाही.

अशा प्रकारे चंद्रावर टाकलेला बहिष्कार मागे घेतला गेला असला तरी त्याचे उदास झालेले मन उल्हसित झाले नव्हते. त्यासाठी त्याला आणखी काही हवे होते (ये दिल माँगे मोअर). गणपतीच्याच कृपेने ते मिळेल याचीही त्याला खात्री होती. त्याने गणपतीची मनधरणी आणखी पुढे चालत ठेवली. शेवटी गणपती पुन्हा त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी चंद्राला सांगितले की यापुढे जे लोक माझ्याकडे येतील (माझी उपासना करतील) ते महिन्यातून एकदा संकष्टीच्या रात्री तुलासुध्दा भेटतील, त्यासाठी मुद्दाम तुशी वाट पहातील.

हे ऐकून चंद्राला खूप आनंद झाला त्यामुळे चंद्राची कळी खुलली, तो पहिल्यासारखा चांदण्याची बरसात करू लागला.

——————————————-

स्यमंतक मण्याची कहाणी (कहाणी भाद्रपद चतुर्थीच्या चन्द्र दर्शन दोष निवारणाची)

ऐका परमेश्वरांनो, गणेश, चन्द्र व श्रीकृष्णांनो तुमची कहाणी.
चन्द्र हा प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचाच अवतार आहे, पण तो चन्द्रवंशी क्षत्रिय कुलाचा मूळ पुरुष मानला जातो. चन्द्रवंशी घराण्याचा सर्वांत उज्वल तारा म्हणजे भगवान श्रीकृष्ण. तेंव्हा श्रीकृष्णाकडून भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी चन्द्राच्या दर्शनाचे अजूनही राहून गेलेले लांछन मिटवण्यावर एक उपाय निर्मिला गेला हेहि सर्वथा योग्यच झाले. हा उपाय काय म्हणजे ‘स्यमंतक मण्याचे आख्यान श्रवण’ करणे व त्यासंबंधित एका संस्कृत श्लोकाचे (सिंह: प्रसेनं अवधीत् सिंहो जांबवताहत: सुकुमारक मा रोदी तव हि एष स्यमंतक: ) पठण करणे. या कथेत भगवान श्रीकृष्णाच्या दोन प्रमुख बायकांशी (जांबवंती व सत्यभामा) त्याच्या विवाहांची नोंद पण गुंतलेली आहे. ती कथा अशी आहे.

‘द्वापर’ युगांती “उग्रसेन” राजाला सिंहासनाधिष्ठित करून भगवान श्रीकृष्ण व बलराम यांची जोडी द्वारकेला राज्यकारभार सांभाळीत होते. द्वारकेतील एक यादव श्रेष्ठ ‘सत्राजित्’ याने घोर तपश्र्चर्या करून सूर्याला प्रसन्न करून घेतले. वरदान म्हणून सूर्याकडून ‘स्यमंतक’ मणी मिळवला. हा मणि सूर्या सारखाच तेज:पुंज होता व रोज १२ भार सोने ओकीत असे. तसेच त्याला धारण करताना अत्यंत स्वच्छतेची, शुद्धतेची, पावित्र्याची काळजी घ्यावी लागे, अन्यथा अपवित्रपणे धारण करणारा घोर प्राण संकटात पडत असे.

स्यमन्तक मणी धारण करण्यामागच्या सर्व धोक्यांचा विचार करून श्रीकृष्णाने सत्राजिताला असा सल्ला दिला की हा मणी राजा उग्रसेनाकडेच योग्य प्रकारे सुरक्षितपणे सांभाळला जाईल. इतरांना ते फ़ारच कठीण काम आहे व संकटांना आमंत्रित करण्या सारखे आहे. पण कृष्णाचा हा मैत्रीचा व सद्भावनेने दिलेला सल्ला सत्राजिताला कांही आवडला नाही. मणी उग्रसेनाला दिला म्हणजे तो अप्रत्यक्षपणे कृष्णालाच वापरायला दिल्यागत होईल व त्या मण्याच्या लोभानेच त्याने हा सल्ला आपल्याला दिला असणार असे त्याच्या मनाने घेतले व त्याने तो मणी उग्रसेनाला देण्याचे साफ़ नाकारले.

पुढे काय झाले की एकदा सत्राजिताचा भाऊ प्रसेन भगवान श्रीकृष्णा बरोबर अरण्यांत शिकारीला गेला. अरण्यांत घुसल्यावर दोघे आपाआपल्या कोणत्या तरी पशूचा पाठलाग करता करता एकमेका पासून दूर गेले. त्या दिवशी अपवित्रपणे प्रसेनाने स्यमंतक मणी गळ्यांत घातला होता. त्याचा परिणाम असा झाला कि त्याने सिंहाला मारण्याच्या ऐवजी तोच सिंहाकडून मारला गेला. नंतर त्या झटपटीत तो मणी सिंहाच्या गळ्यांत पडला व तो सिंह जांबवंताच्या दृष्टीस पडला. तेंव्हा जांबवंताने त्या सिंहाला ठार मारून तो मणी मिळवला व आपल्या गुहेत नेऊन आपल्या लहान मुलाच्या पाळण्यावर बांधला. त्यानंतर तो मुलगा रडू लागला की त्या मुलाची बहीण ‘जांबवंती’ हा मणी पहा. रडू नको. म्हणून त्याचे सांत्वन करीत असे.

इकडे काय झाले कि भगवान श्रीकृष्ण त्यांच्या पारधीचे काम आटोपून एकटेच द्वारकेला परतले. प्रसेन परत आला नाही व श्रीकृष्ण मात्र परत आला हे पाहून सत्राजिताला श्रीकृष्णाचा सल्ला आठवला. प्रसेनाजवळ मणी होता तेंव्हा, श्रीकृष्णानेच त्याला एकटा पाहून त्याचा खून करून मणी पळवला असणार असे त्याच्या मनाने घेतले आणि नीट विचारपूस व विचारही न करताच त्याने “श्रीकृष्णाने असे केलेच” म्हणून अपप्रचार करण्यास सुरुवांत केली. श्रीकृष्ण हा लहानपणापासूनच नटखट-कारस्थानी म्हणून सुप्रसिद्धच होता त्यामुळे लगेचच लोकांचा या खोट्या आळेवर विश्वास बसला.

श्रीकृष्णाने ते ऐकल्यावर बरोबर अनेक पोक्त साक्षीदार माणसे घेऊन तो अरण्यांत प्रसेनाच्या शोधांस गेला. तेथे त्याने सर्वांना प्रसेनाचे प्रेत व त्याला सिंहाने मारले असल्याच्या खाणाखुणा दाखवल्या. नंतर ते सर्व त्या सिंहाच्या पावलांचा मागोवा घेत पुढे गेले तेंव्हा त्यांना तो सिंहही मेलेला आढळला. त्या सिंहाची अस्वलाशी झटापट होऊन त्यांत तो मेल्याच्या खुणाहि पाहून मंडळी त्या अस्वलाच्या पाउलांचा मागोसा घेत घेत जांबवंताच्या गुहेपाशी आली. सिंहालाही मारू शकणारे अस्वल वास करते त्या गुहेत घुसण्याचे धाडस कृष्णाने “साक्षीदारकी” करण्याच्या उद्देशाने बरोबर आणलेल्या कोणालाही होईना. शेवटी त्या सर्वांना “तुम्ही इथेच माझी वाट पहा” असे सांगून त्यांना गुहेच्या दारातच ठेवून कृष्ण एकटांच गुहेत घुसला. खूप आंत गेल्यावर त्याला तो स्यमंतक मणी एका लहान मुलाच्या पाळण्यांवर शोभेकरिता व मुलाचे लक्ष वेधण्यासाठी बांधून ठेवलेला दिसला. त्या मुलाची मोठ्ठी बहीण त्याला अंगाई गीत गाऊन झोपवण्याचा प्रयत्न करीत होती. ते गीत होते “सिंह: प्रसेनं अवधीत् सिंहो जांबवताहत: सुकुमारक मा रोदी तव हि एष स्यमंतक:” (हे एक श्लोकी गीतच चन्द्र दर्शनाचा दोष शमवण्याचा “मंत्र” झाला आहे.)

कृष्णाला अचानक गुहेत आलेला पाहून जांबवंतीला आश्चर्य वाटले व आनंदही झाला. तिने स्यमंतक मणी कृष्णाला देऊ केला व निजलेला जांबुवंत उठण्यापूर्वीच निघून जाण्यास सुचवले. तेंव्हा कृष्णाने शंख फ़ुंकून जाम्बवन्ताला जागे केले. मग जांबुवंताचे व कृष्णाचे जवळ जवळ महिनाभर घोर युद्ध झाले. शेवटी जांबुवंत थकला व आपल्याला हरवणारा दुसरा कोणी असणे शक्य नाही, हा प्रत्यक्ष श्रीरामच पूर्वी दिलेल्या वचनानुसार श्रीकृष्ण अवतारात आपल्याला भेटायला आलेला आहे हे त्याने ओळखले व त्याला नमस्कार करून त्याची स्तुती केली. श्रीकृष्णानेहि प्रसन्न होऊन त्याला “श्रीराम” दर्शन घडवले. नंतर जांबुवंताने आपल्या कन्येचे जांबवंतीचे कन्यादान त्याला करून ‘स्यमंतक’ मणी “वर दक्षिणा” म्हणून प्रदान केला. मग श्रीकृष्ण जांबवंतीला बरोबर घेऊन गुहे बाहेर आला.

इकडे गुहेबाहेरील माणसांनी जवळ जवळ तीन आठवडे श्रीकृष्णाची वाट बघितली. नंतर श्रीकृष्ण गुहेत अस्वलाकडून मारला गेला असणर म्हणून समजून ती मंडळी द्वारकेला परतली आणि त्यांनी श्रीकृष्णाच्या मृत्यूचे वृत्त सर्वांना सांगितले. सर्वाना फ़ार शोक झाला व त्यांनी श्रीकृष्णाचे श्राद्धादिक क्रियाकर्मही केले.

गुहे बाहेर कोणीच नाही हे पाहून श्रीकृष्णाला आश्चर्य वाटले पण ते लोक द्वारकेला परत गेले असणार हे ओळखून तो जांबुवंतीसह द्वारकेला आला. त्याला अशा प्रकारे परत आलेला पाहून सर्वांना आनंद झाला. पण सत्राजिताला आपल्या आततायी मूर्खपणाने आपण श्रीकृष्णावर घातलेल्या चोरीच्या खोट्या आळाचा पश्चात्ताप झाला. श्रीकृष्णाने सत्राजिताला दरबारांत बोलवून सर्वांच्या समक्ष तो स्यमंतक मणी त्याच्या हवाली केला तेंव्हा तर सत्राजिताला फ़ारच ओशाळे झाले. केलेल्या चुकीच्या प्रायश्चित्तासाठी त्याने आपली कन्या ‘सत्यभामा’ हिचे कन्यादान श्रीकृष्णाला केले व स्यमंतक मणीही देऊ केला. पण श्रीकृष्णाने सत्यभामेशी लग्न केले पण मणी घेण्याचे साफ़ नाकारले.
मण्याचे अपशकुनी अस्तित्व खरोखरच आपल्याला फ़ारच धोकादायक आहे हे सत्राजिताच्या लक्षांत आले व त्याने तो मणी गुप्तपणे अक्रूलाला दिला. अक्रूर तो मणी घेऊन गुपचुपपणे काशीस जाऊन राहिला व त्या मण्यांतून निघणारे सोने वापरून अनेक यज्ञ याग करीत लोकोपयोगी परोपकारी व धार्मिक कृत्ये करण्यांत आयुष्य घालवू लागला.

एकदा श्रीकृष्ण व बलराम पांडवांना भेटायला हस्तिनापुराला गेल्यावेळी वेळ साधून शतधन्व्याने सत्राजिताचा खून केला आणि स्यमंतक मणी त्याचे जवळ घरी दारी शोधला पण तो त्याला मिळाला नाही. तेंव्हा तो श्रीकृष्णाच्या भीतीने द्वारका सोडून पळून जाऊ लागला. श्रीकृष्णाला सत्यभामेकडून शतधन्व्याने केलेल्या सत्राजिताच्या वधाची बातमी कळल्यावर श्रीकृष्ण व बलराम लगेचच द्वारकेला परतले व त्यांनी शतधन्व्याचा पाठलाग करून त्याला लाथा बुक्क्यांच्या प्रहारांनीच ठार मारले. त्यांनाही मणी अक्रूराकडे काशीत आहे हे माहीत नव्हते. शतधन्व्याकडे मणी नाही हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले व बलरामालाही या सगळ्या प्रकरणांत श्रीकृष्णाचाच कांहीतरी हांत असावा अशी शंका आली व तो श्रीकृष्णाची भर्त्सना करून विदर्भाला निघून गेला.

स्यमंतक मण्याच्या चोरीचे भूत पुन:पन: आपल्यावर सवार होते हे पाहून श्रीकृष्णाला फ़ार दु:ख झाले व तो अशा दु:खाने म्लानवदन होऊन बसला असताना नारद मुनींनी त्याला पाहिले. त्याच्या चिन्तेचे कारण समजून घेतल्यावर त्यांच्या लक्षांत आले की हे सर्व भाद्रपद शुक्ल चतुर्थीला चन्द्रदर्शनाचा दोष लागल्यानेच घडत असणारं. त्यांनी यावर उपाय म्हणून गणेशाची व्रते उपवास जप तप होम हवन इत्यादिक मार्गाने गजाननाला प्रसन्न करून घेण्याचा मार्ग सुचवला. त्याप्रमाणे श्रीकृष्णाने व्रतादिक तपश्र्चर्या करून गणेशाला प्रसन्न करून घेतले. गणेशाने त्याला हे स्यमंतक मण्याचे आख्यान जे श्रवण करतील व “सिंह: प्रसेनं अवधीत् सिंहो जांबवताहत: सुकुमारक मा रोदी तव हि एष स्यमंतक:” हा मंत्र जे म्हणतील त्यांना यापुढे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला चन्द्रदर्शनाचा दोष लागणार नाही असा वर दिला.

श्रीगणेश कृपेने स्यमंतक मण्याच्या काशीतील अस्तित्वाची खबरही श्रीकृष्णाला कळली व त्याने बलरामासही ही सर्व वास्तविकता पटवून दिल्यावर तो द्वारकेला परतला व दोघे सलगीने सुखासमाधानाने राहू लागले.

अशा प्रकारे श्रीकृष्णाला ज्याप्रमाणे गणेश प्रसन्न झाला तसाच तुम्हां आम्हांवरही होवो.

ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफ़ल संपूर्ण.

———————————————————————————–
ही कहाणी माझे बंधू डॉ.धनंजय घारे यांनी मला पाठवली आहे. त्यांचे आभार
———————————————————————————-

निष्कर्ष

पन्नास वर्षांपूर्वी उडत उडत कानावर पडलेली किंवा अर्थ न समजता वाचन केलेली स्यमंतक मण्याची कहाणी (किंवा सुरस आख्यान) आता छान तपशीलवार वाचायला मिळाली. यामधल्या सत्राजिताने घोर तपश्चर्या करून हा मणी प्राप्त करून घेतला, पण त्याचा किती उपभोग किंवा उपयोग करून घेतला ते तोच जाणे. आधी तो मणी त्याच्यापासून दुरावला आणि अखेर त्यापायी त्याला स्वतःचे प्राण गमवावे लागले, प्रसेन आणि शतधन्वा हेही त्यांच्या प्राणांना मुकले. यावरून असे दिसते (बोध मिळतो) की अप्राप्य आणि अमूल्य अशी वस्तू सांभाळण्याचे सामर्थ्य अंगात नसेल तर तिचा हव्यास धरणे म्हणजे सर्वनाशाला आमंत्रण देणे असते. याशिवाय काही उपनिष्कर्ष काढता येतील. उदाहरणार्थ
१. आपल्याला न पेलेल असे वरदान घेऊ नये
२. आपल्याकडील अमूल्य आणि खास वस्तू कोणालाही देऊ नये. (भावालासुध्दा)
३. बाहेर जातांना (विशेषतः ओसाड जागी) अंगावर दागीने घालू नयेत
४. जोखमीची वस्तू सांभाळण्याची जबाबदारी फार कठीण असते. त्यात प्राण गमावण्याची वेळ येऊ शकते.
५. मित्राच्या सल्ल्यावर विचार करावा.
६. संशयाला कोणतेही निमित्य पुरते आणि त्याला औषध नाही.

….. वगैरे

या स्यमंतक मण्याच्या निमित्याने श्रीकृष्णाला दोन बायका मिळाल्या … कशामुळे काय घडेल याचा काही नेमच नाही. या आख्यानामध्ये घडत जाणा-या अनेक चमत्कृतीपूर्ण घटनांचा सुसंगत व सुसंबध्द असा अर्थ लावणे माझ्या आवाक्याबाहेर आहे. जांबुवंतीने गायिलेल्या “सिंह: प्रसेनं अवधीत् सिंहो जांबवताहत: सुकुमारक मा रोदी तव हि एष स्यमंतक:” या अंगाईगीताचा गणेशाशी किंवा चंद्राशी काय संबंध असू शकतो हे निव्वळ अतर्क्य आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: