आयुधे, औजारे आणि यंत्रे – भाग -२

आयुधे ३ fig

माणसाला धातूंपासून नळ्या तयार करता येऊ लागल्यानंतर लहानमोठ्या आकाराच्या तोफा तयार करण्यात यश मिळाले. अवजड तोफा वाहून नेण्यासाठी त्यांना गाड्यावर ठेवले जात असे किंवा चाके जोडली जात आणि जनावरांना जुंपून त्या ओढून नेल्या जात. तोफेच्या नळकांड्यात दारू ठासून भरत आणि त्याच्या पुढे दगडाचा किंवा लोखंडाचा गोळा ठेवला जाई. दारूच्या आतपर्यंत जाणारी खास प्रकारच्या ज्वालाग्राही कापसाची वात असे. ती पेटवली की जळत जळत तिची ज्वाला दारूपर्यंत पोचे आणि तिचा क्षणार्धात स्फोट होऊन त्या ज्वलनातून खूप वायू निर्माण होत. ते वायू मर्यादित जागेत कोंडले गेल्याने त्याचा दाब वाढत जाई आणि त्या दाबाच्या प्रभावाखाली तो गोळा वेगाने बाहेर फेकला जात असे. नळीतून जातांना मिळालेल्या दिशेने दूरवर जाऊन तो खाली पडत असे. आभाळातून अचानक आलेल्या या यमदूताचा प्रतिकार करणे शत्रूला शक्यच नसल्यामुळे त्याची दाणादाण उडत असे. शत्रूसैन्यावर दुरून मारा करण्यात तोफ अतीशय परिणामकारक असली तरी ती धनुष्यबाणाची जागा घेऊ शकत नव्हती. ती अवजड असल्यामुळे वेगाने वाहून नेता येत नसे आणि घनदाट जंगलात किंवा डोंगराळ भागात नेणे तर कठीणच असे. शिवाय एक बार उडाला की दुसरा बार भरायला वेळ लागत असे. त्यामुळे हातघाईच्या लढाईत तिची अडचणच होत असे. लहान आकाराच्या नळ्यांचा उपयोग करून हँडगन्स, बंदुका आणि पिस्तुलांची निर्मिती करण्यात आली. ही शस्त्रे आणि त्यांच्यासाठी लागणारा हलक्या वजनाचा दारूगोळा सैनिक आपल्या सोबत घेऊन जाऊ शकत. मोठ्या तोफांचा उपयोग खास कामांसाठी केला जाऊ लागला. युध्द चालले नसतांना फुरसतीच्या काळात या तोफा किल्ल्यांच्या तटबंदीच्या आड आणि बुरुजांवर नेऊन ठेवल्या जात. चालून येणा-या शत्रूसैन्यावर दुरून गोळाफेक करून त्यांची वासलात लावली जात असे. तसेच किल्ल्याला वेढा घालून बसल्यावर त्याच्या लाकडी दरवाज्याला किंवा विटांच्या तटबंदीला तोफेच्या सहाय्याने खिंडार पाडून आंत प्रवेश मिळवला जात असे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात शांततामय कामासाठीसुद्धा वेगवेगळे प्रयोग होत राहिले. तोफेसारख्या नळीतून वेगाने दूर जाणारा गोळा उडवण्याएवजी थोडासा दाब देऊन एका दट्ट्याला हळूहळू पुढेमागे ढकलणे, त्या दट्ट्याला दुस-या एका दांड्याद्वारे एका चक्राला जोडणे, पाणी उकळून त्याची वाफ करणे, ती वाफ एका मजबूत अशा जाड पात्रात साठवून ठेवणे, तिला पाइपामधून दुसरीकडे नेणे, तिच्या दाबावर आणि प्रवाहावर झडपांद्वारे नियंत्रण ठेवणे अशा निरनिराळ्या क्षेत्रातील प्रयोगातून मिळालेल्या माहितीची एकमेकींशी सांगड घालण्याचे प्रयत्न होत होते. वाफेच्या दाबाने सिलिंडरमधून पिस्टनला आतबाहेर ढकलून त्याला जोडलेले चाक फिरवण्यात अशा संयुक्त प्रयत्नांमधून यश मिळाले आणि त्यामधून स्वचलित यंत्र तयार झाले. त्या यंत्राची रचना अशी केलेली होती की एकदा हे इंजिन सुरू केले की जोपर्यंत बॉयलरमध्ये वाफ तयार होत राहील तोपर्यंत तो पिस्टन सतत आतबाहेर करत राहील आणि त्याला एका दांड्याने जोडलेले चक्र सतत फिरत राहील. हे सगळे आज अगदी सोपे वाटत असले तरी त्यासाठी निरनिराळ्या आकारांच्या भागांची कल्पना करून त्याबरहुकूम त्यांची निर्मिती कार्यशाळेत (वर्कशॉपमध्ये) करता येणे आवश्यक होते. यंत्रांच्या विकासाने त्यांची निर्मिती करू शकण्याएवढी मजल मारल्यानंतरच ते शक्य झाले. वाफेचे इंजिन बनवल्यानंतर त्याच्या रूपाने ऊर्जेचा एक नवा अखंड स्रोत सापडला. त्यापूर्वी अग्नीचा उपयोग फक्त ऊष्णता निर्माण करण्यासाठी होत असे. आता यंत्रांची चाके अग्नीच्या शक्तीवर फिरू लागली. वाहत्या वा-यावर फिरणा-या पवनचक्क्या आणि पाण्याच्या प्रवाहाने फिरणारी जलचक्रे त्याआधी निघाली होती, पण ती चक्के आणि त्यांना जोडलेली यंत्रे विवक्षित जागीच ठेवावी लागत असत आणि वारा किंवा पाण्याचा प्रवाह जोराचा मिळेल तेंव्हाच ती चालू शकत. अग्नीवर चालणारे इंजिन सोयिस्कर जागी ठेवणे आणि केंव्हाही हवा तितका वेळ चालवणे शक्य असल्यामुळे ते जास्त सोयीचे होते.

यंत्रांची चाके फिरवण्याचे काम हाताने करणा-या कामगारांच्या शक्तीला मर्यादा असत, तसेच तो माणूस थोड्या वेळात थकून जात असे. घोडे किंवा बैल यांच्या शक्तीचा उपयोग मुख्यतः गाडा ओढण्यापुरताच होत असे. उसाचा चरक, तेलाची घाणी यासारखी कांही थोडी यंत्रेच जनावरांकडून फिरवली जात असत. वाहता वारा, पाण्याचा प्रवाह वगैरेंच्या सहाय्याने चाक फिरवणे कांही थोड्या जागी कांही विशिष्ट परिस्थितीतच शक्य असल्यामुळे अशा यंत्रांचा उपयोग कमीच होत असे. पण वाफेच्या इंजिनाने या सगळ्या मर्यादा पार केल्या. जितक्या मोठ्या आकाराच्या इंजिनाचे भाग तयार करता येतील, जितक्या मोठ्या प्रमाणात वाफ निर्माण करून तिचा दाब वाढवत नेता येईल आणि जितक्या वेगाने झडपांची उघडझाप करता येईल तितकी जास्त शक्ती त्या इंजिनात असेल. या सगळ्या बाबीत सुधारणा करत जाऊन अधिकाधिक जास्त अश्वशक्ती असलेली इंजिने तयार होऊ लागली. पूर्वी जितकी यांत्रिक कामे माणसांच्या बाहुबलाने होत असत ती इंजिनाच्या ताकतीवर अनेकपट जोमाने आणि वेगाने होऊ लागली. त्यामुळे अधिकाधिक सक्षम यंत्रे विकसित होत गेली. रुळावरून धांवणारी रेल्वेगाडी, पाण्यात चालणारी जहाजे, कापड विणण्याचे माग, खाणीतून खनिजांचे उत्खनन करून ते जमीनीवर आणण्याची यंत्रणा, त्यांना वितळवून त्यांच्यापासून धातू बनवण्याचे काम करणा-या भट्ट्या आणि त्या धातूंना हवा तो आकार देणारी यंत्रे अशी निरनिराळ्या क्षेत्रातल्या यंत्रांची असंख्य उदाहरणे देता येतील.

या सर्वांचा उपयोग करून माणसाचे जीवनमान सुसह्य आणि आरामदायी करण्यासाठी अनेक प्रकारच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होऊ लागली, त्याचा प्रवास सुखकर होऊ लागला, त्याला दूरदेशी जाणे शक्य होऊ लागले वगैरे पायदे मिळालेच पण सुरुवातीच्या काळात तरी यातही शस्त्रास्त्रांच्या निर्मितीला अग्रक्रम मिळाला. स्वयंचलित यंत्रांच्या सहाय्याने तोफा, बंदुका आणि त्यांचा दारूगोळा वगैरेंचे कारखाने धडधडू लागले आणि त्यांचे उत्पादन वेगाने होऊ लागले तसेच त्यांच्या गुणवत्तेत आणि मारकतेच्या क्षमतेत सतत वाढ होत राहिली. युरोपमधील देशांनी या बाबतीत आघाडी मारल्यामुळे ते देश या बाबतीत मागासलेल्या देशांच्या मानाने जास्त शस्त्रसज्ज झाले आणि त्या शक्तीच्या जोरावर त्यांनी जगभर आपली साम्राज्ये स्थापन केली.

. . . …… . . . . . . . (क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: