आयुधे, औजारे आणि यंत्रे – भाग – ३

आयुधे ४ fig

यंत्रयुग सुरू झाल्यावर अनंत प्रकारच्या यंत्रांचा विकास प्रचंड वेगाने होत गेला. कोळसा आणि लोखंडाच्या खाणींमधले उत्पादन तर अनेकपटीने वाढलेच, यंत्रांच्या सहाय्याने जमीनीखाली असलेले पेट्रोलियम तेल उपसून वर काढण्याला सुरुवात केल्यानंतर कोळसा जाळणा-या वाफेच्या अवजड इंजिनांच्या जागी खनिज तेलावर चालणारी सुटसुटीत इंजिने (ऑइल इंजिन्स) आली. त्यामुळे अधिक प्रकारचे कारखाने सुरू झाले, लहान इंजिनांचा वापर सुरू झाल्याने सुटसुटीत आकाराच्या मोटारी आणि दुचाकी वाहने रस्त्यावर धांवायला लागली आणि अशा इंजिनांवर चालणारी विमाने आकाशात उडू लागली. पॉवर स्टेशन्समध्ये मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती करून तिचा दूरवरच्या अनेक जागी पुरवठा करणे शक्य झाल्यानंतर विजेवर चालणारी जास्तच सोयिस्कर यंत्रे घराघरात तसेच कारखान्यात आली. अधिकाधिक कणखऱ आणि बळकट अशा मिश्रधातूंचे उत्पादन करणे, त्यांना ठोकून, लाटून, कापून आणि घासून हवा तसा आकार देणे आणि अशा विशिष्ट व चित्रविचित्र आकारांच्या तुकड्यांची एकत्र जोडणी करून त्यामधून अधिकाधिक गुंतागुंतीची अवजड यंत्रे तयार करणे शक्य झाले.

या सर्वांचा अपरिहार्य परिणाम अधिकाधिक प्रभावी शस्त्रास्त्रे तयार होण्यावरसुद्धा झालाच. अवजड तोफांच्या जागी वेगवान रणगाडे आले तसेच त्यांना निकामी करणारे अधिक विध्वंसक बाँब तयार केले गेले. समुद्रातल्या आगबोटींना बुडवण्यासाठी टॉर्पेडोज तयार झाले तसेच एका आगबोटीवरून दुस-या बोटीवर किंवा किना-यावरील इमारतींवर मारा करण्यासाठी खास प्रकारच्या तोफा आल्या. साध्या बंदुकांऐवजी (यांत्रिकबंदुका) मशीनगन्स, प्रक्षेपणास्त्रे (मिसाइल्स. रॉकेट्स) वगैरे गोष्टी आल्या. अनेक प्रकारची अतीवेगवान आणि आवाजाहून जास्त वेगाने धावणारी (सुपरसॉनिक) चपळ विमाने तयार झाली. त्यातून जमीनीवर बाँबहल्ले करणे, पॅराशूटमधून सैनिकांना खाली उतरवणे, अतीशय उंच जाऊन जमीनीवरील ठिकाणांचे निरीक्षण करणे अशी अनेक प्रकारची कामे करता येऊ लागली. ही सगळी शस्त्रास्त्रे म्हणजे खास स्वरूपाची यंत्रेच होती. माणूस हाताने जे काम करू शकतो त्याहून जास्त काम, अधिक वेगाने आणि सफाईने करणे हा प्रत्येक यंत्राचा उद्देश असतो. ही विनाशकारी यंत्रे हाताळणारे सैनिक प्रचंड प्रमाणात विध्वंस करण्याचे काम झपाट्याच्या वेगाने सहजपणे करू शकत होते. यामधील कांही आयुधे शांततेच्या काळात तयार झाली तर कित्येक शस्त्रे पहिल्या दोन महायुध्दांच्या काळात युध्दपातळीवर प्रयत्नांची शर्थ करून तयार केली गेली. ते साध्य करण्यासाठी तंत्रज्ञानात भर घालावी लागत गेली हे ओघाने आलेच.

अणुबाँबच्या महाभयंकर विस्फोटाने दुसरे महायुध्द संपले. असे महाविध्वंसक अस्त्र आपल्याकडे असलेच पाहिजे अशा विचाराने अनेक राष्ट्रांनी ते तयार करण्याच्या कार्यक्रमाला प्राधान्य दिले. प्रगत तंत्रज्ञान आणि आर्थिक सुबत्ता ज्यांच्यापाशी होती अशा महासत्तांनी ते तंत्रज्ञान मिळवले, अधिकाधिक शक्तीशाली बाँब बनवून त्याच्या चाचण्या घेतल्या आणि आपले विध्वंसक सामर्थ्य जगाला दाखवून दिले. ही अस्त्रे शत्रूच्या ठिकाणांवर नेमकी नेऊन टाकण्यासाठी अधिकाधिक पल्ला आणि क्षमता असलेली क्षेपणास्त्रे तयार केली गेली. त्यासाठी शक्तीशाली अग्निबाण तयार होत असतांना त्यांच्या सहाय्याने अवकाशात कृत्रिम उपग्रह सोडण्यात आले. सुरुवातीच्या काळात टेहळणी करून माहिती मिळवणे हे त्यांचे मुख्य काम असे. या उपग्रहांबरोबर संपर्क साधण्यासाठी आणि त्यांनी पाठवलेल्या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी अत्याधुनिक संदेशप्रणाली आणि संगणक यांचा विकास करण्यात आला. अशा प्रकारे दुस-या महायुध्दानंतरच्या काळात अणुशक्ती (अॅटॉमिक एनर्जी), अग्निबाण (रॉकेट्स), उपग्रह (सॅटेलाइट्स) आणि संगणक (काँप्यूटर्स) यांच्या तंत्रज्ञानात प्रचंड वेगाने जी प्रगती झाली तिच्या मुळाशी शस्त्रास्त्रस्पर्धा हे एक प्रमुख कारण होते.

तंत्रज्ञानातला हा विकास आधी मुख्यतः देशाचे संरक्षण करणे किंवा युद्धासाठी सज्ज राहणे यासाठी झाला असला तरी या तंत्रज्ञानाचा माणसाला त्याच्या रोजच्या जीवनातसुद्धा अनेक प्रकारे फायदा झाला. अणुशक्तीच्या सहाय्याने विजेची निर्मिती होऊ लागली आणि तिची उपलब्धता वाढली, कृत्रिम उपग्रहांच्या वापरामुळे सर्वच प्रकारच्या संदेशवहनात क्रांती झाली. त्यातून दूरचित्रवाणीमुळे जगभरातले कार्यक्रम घरबसल्या पाहता येऊ लागले आणि दूरध्वनीतून पृथ्वीच्या पलीकडल्या बाजूला असलेल्या माणसाबरोबर संभाषण करणे सहज शक्य आणि स्वस्त झाले. घरोघरी संगणक आले आणि आंतर्जालाच्या माध्यमातून लेखी मजकूर, आवाज आणि चित्रे अशा सर्वांची देवाणघेवाण क्षणार्धात करता येऊ लागली. जेथे जाऊ तेथे सांगाती नेता येणा-या मोबाईल फोनमधून असे संदेश आपण जिथे असू तिथे मिळू लागले. वसुधैव कुटुंबकम् अशी मनाची तयारी झाली नाही पण आपण ग्लोबल व्हिलेजचे नागरिक झालो. ही सगळी कमाल या नव्या काळातल्या यंत्रांमुळेच होऊ शकली.

या उपयुक्त सुविधांचा दुरुपयोग करून कांही अतिरेकी विध्वंसक कृत्ये करत आहेत. यामुळे यंत्र आणि शस्त्र, औजार आणि हत्यार यांच्यामधील जवळीक अधोरेखित होते. शस्त्रास्त्रे उदंड झाल्यामुळे मानवजातच समूळ नष्ट होणार असल्याचे भाकीत डूम्सडेवाले कधीपासून करताहेत, त्याचप्रमाणे पूर्वी दिवसभर राबून जेवढे काम होत असे ते आता यंत्रांच्या सहाय्याने चुटकीसरशी होऊ लागले तर उरलेल्या वेळात माणूस काय करेल अशी काळजी काही लोकांना लागली आहे. प्रत्यक्षात मात्र जिकडे पहावे तिकडे माणसेही उदंड होतांना दिसत आहेत आणि तरीसुध्दा बालवाडीतल्या मुलापासून त्याच्या पेन्शनर आजोबापर्यंत कोणाकडेही मोकळा वेळ नसतो. माझ्यासारखा निरुद्योगीसुध्दा हा असला लेख लिहायला काढतो आणि डेडलाईन येईपर्यंत तो टंकत बसतो.

. . . . . . . . . . (समाप्त)

यावर आपले मत नोंदवा