मोतीबिंदू आणि भिंगाचे भेंडोळे

मोतीबिंदू आणि  भिंगाचे भेंडोळे (भाग १)

एकोणीसाव्या शतकातल्या पन्नाशीत मी नुकताच शाळेला जायला लागलो होतो त्या काळात क्वचित कधी एक जख्ख म्हाताऱ्या सोवळ्या बाई आमच्याकडे यायच्या. कंबरेमध्ये काटकोनात वाकलेल्या त्या आजींच्या दोन्ही डोळ्यांमधला मोतीबिंदू भरपूर वाढला होता. त्यामुळे पांढुरकी झालेली त्यांची बुबुळे पाहून मुले त्यांना घाबरत असत. त्या काळात गांवोगांवी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियांची शिबिरे भरत नव्हती. कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी निदान मिरजेच्या वानलेस हॉस्पिटलमध्ये जावे लागत असे, पण तिथे जाण्यासाठी वाहतुकीची चांगली सोय नव्हती. सर्व्हिस मोटर नावाच्या बेभरवशाच्या खटाऱ्यात बसून पन्नास किलोमीटर अंतरावरले कुडची स्टेशन गाठायचे आणि तिथे दिवसातून एक दोनदाच अवेळी येणा-या एमएसएम रेल्वेच्या मीटरगेज गाडीची वाट पहात तिष्ठत बसायचे. ती आल्यानंतर त्या गाडीत कसेबेसे गर्दीतून घुसायचे आणि मिरजेला जायचे. अशा प्रकारची (गैर)सोय होती. अत्यंत गरजू लोकच नाइलाजाने असले दिव्य करत असत. त्या आजींच्या घरी आणखी कोण कोण होते ते आता मला आठवत नाही, पण त्यांना ऑपरेशनसाठी मिरजेला घेऊन जाण्याची कोणाची तयारी नसावी किंवा हा कठीण प्रवास त्यांना झेपणार नाही असे त्यांना वाटत असावे. आपल्या क्षीण झालेल्या दृष्टीसाठी त्या कधी दैवाला दोष लावत किंवा आणखी भलते सलते दृष्टीला पडू नये म्हणून परमेश्वरानेच दिलेली दृष्टी तो काढून घेतो आहे असे त्या विषण्णपणे म्हणत असत. त्यांचे मोतीबिंदू अखेरपर्यंत त्यांच्या डोळ्यांमध्ये राहिले आणि ते डोळे क्षीण होत होत एकदिवस कायमचे मिटून गेले. मोतीबिंदू या गोंडस वाटणाऱ्या नावामागील हे विदारक सत्य मला त्या वृध्देच्या डोळ्यांमध्ये पहिल्यांदा दिसले.

एकोणीसशे ऐंशीच्या घरात असतांनाची गोष्ट. त्या काळात माझी आई आमच्याकडे रहात होती. एकदा तिला चष्मा लावूनसुध्दा पोथी वाचतांना बरेच वेळा अडखळतांना पाहिले. पण तिने त्याचा काहीच उलगडा केला नाही. सहज बोलता बोलता खिडकीतून समोर दिसणाऱ्या इमारतीच्या कठड्यावर बसलेल्या पक्ष्याबद्दल विचारले, पण तिला तो पक्षी तर नाहीच, पण बाल्कनी आणि कठडासुध्दा नीट दिसत नव्हता असे तिच्या उत्तरावरून माझ्या लक्षात आले. मग मात्र मी तिला नेत्रतज्ञांकडे घेऊन गेलो. त्यांनी तिचे डोळे तपासले आणि दोन्ही डोळ्यांमध्ये मोतीबिंदू झाला असल्याचे सांगितले. तो परिपक्व झाल्यावर लगेच काढला नाही तर तिची दृष्टी गमावून बसण्याचा धोका असल्याचे सांगितले आणि जास्त वाट न पाहता ऑपरेशन करून घ्यावे असे सुचवले. काहीशा अनिच्छेनेच आई ते ऑपरेशन करून घ्यायला तयार झाली.

कोणतीही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी आवश्यक असलेली तिच्या शारीरिक आरोग्याची तपासणी सुरू झाली. माझ्या आईला खूप पूर्वीपासून दम्याचा विकार होता. थोडा निसर्गोपचार, थोडे घरगुती उपाय आणि काही आयुर्वेदिक औषधे यांच्या आधारावर ती दम्यावर नियंत्रण ठेवत असे. अगदीच आणीबाणी आली आणि आवश्यकता पडली तरच ती डॉक्टरांकडे जात असे. पण ही वैद्यकीय तपासणी सुरू झाल्यावर डॉक्टरांनी त्यांच्या औषधांचे प्रयोग तिच्यावर सुरू केले आणि त्यांच्या दृष्टीने तो आटोक्यात आणला असे वाटल्यानंतर दंतवैद्याकडे पाठवून दिले. सत्तरी गांठेपर्यंत आईच्या सर्व दाढा निखळून गेल्या होत्या, समोरचे थोडे दात शिल्लक असले तरी त्यांची अवस्था फारशी चांगली नव्हती. त्यांचा चर्वणासाठी उपयोग होत नव्हता. पण ते दांत सडायला लागले असल्यामुळे त्यांच्यापासून इन्फेक्शन होऊ नये यासाठी डोळ्याचे ऑपरेशन करण्याआधी ते दात काढून टाकावे लागतील असे दंतवैद्याने सांगितले. सगळे दात काढल्यानंतर कवळी बसवून व्यवस्थित जेवण करता येईल हा फायदाही दाखवला. नको नको म्हणत निरुपाय म्हणून अखेर आई त्याला तयार झाली. एका दिवशी फक्त एकच दात काढायचा आणि ती जखम बरी झाल्यानंतर दुसरा दात काढायचा असे धोरण असल्यामुळे त्यात बरेच दिवस गेले. मोतीबिंदू झालेल्या रुग्णांची संख्या बरीच असल्यामुळे आणि जास्त घाई करण्याची गरज वाटत नसल्यामुळे आईच्या शस्त्रक्रियेसाठी पुढच्या महिन्यातली तारीख मिळाली.

डोळ्यांचे ऑपरेशन चालले असतांना आणि त्यानंतर त्याची जखम बरी होईपर्यंत शिंक, ठसका, खोकला, उलटी, उचकी अशा कोणत्याही क्रियेने डोळ्यांना धक्का बसू नये याची काळजी घ्यावी लागणार होती. या दृष्टीने आईला तीन दिवस आधीच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करून घेतले आणि औषधे, वाफारे, इंजेक्शने, औषधी थेंब वगैरेंच्या सहाय्याने तिच्या संपूर्ण शरीराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. त्याशिवाय तापमान, रक्तदाब, नाडीचे ठोके वगैरेंची मोजणी रोज सकाळ संध्याकाळ केली जात असे. त्यापूर्वीच्या आयुष्यात ती कधीच अशा प्रकारच्या इस्पितळात राहिली नव्हती. त्यामुळे तिथल्या वेगळ्या वातावरणानेच ती भांबावून गेली होती. ऑपरेशन होऊन वॉर्डमध्ये परत आल्यानंतर डोके स्थिर ठेऊन सतत उताणे पडून राहण्याची आज्ञा झाली. असे आढ्याकडे पहात तास न् तास निश्चलपणे पडून राहणे तिला अशक्यप्राय वाटत असणार. तिच्यातल्या असामान्य सोशिकपणामुळे ती उघडपणे काही तक्रार करत नव्हती, पण जे काही चालले होते ते तिच्या मनाविरुध्द असल्याचे तिच्या देहबोलीतून स्पष्ट होत होते.

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर दहा पंधरा दिवस रोज डोळ्यात मलमे आणि थेंब घालणे चालले होते. त्यानंतर तपासणी होऊन ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झाल्याचे सांगितले गेले. एक नेहमीच्या वापरासाठी आणि दुसरा वाचन करण्यासाठी असे खूप जाड भिंगांचे दोन चष्मे आणले. त्यांच्या सहाय्याने आता आईला नवी स्पष्ट दृष्टी मिळाली होती. पण थोड्या दिवसांनी तिने आपला मुक्काम माझ्या मोठ्या भावाकडे हलवला. त्यानंतर या नव्या दृष्टीचा तिने किती उपयोग करून घेतला आणि त्यातून तिला किती आनंद प्राप्त झाला याचा जमाखर्च कांही मला मांडता आला नाही. आमच्या दुर्दैवाने वर्षभरातच ती आम्हाला सोडून गेली. आपल्या मंद होत गेलेल्या दृष्टीबद्दल तिची तक्रार नव्हती आणि त्या अवस्थेत हा वर्षभराचा काळ तिने तिच्या मर्जीनुसार वागून कदाचित जास्त आनंदाने काढला असता असेही कधीकधी वाटायचे. आपण चांगला उद्देश मनात बाळगून प्रयत्न करत असतो. पण पुढे घडणाऱ्या गोष्टींची आधी कल्पना नसते आणि त्यांची चाहूल कधी लागेल याचाही काहीच नेम नसतो. कदाचित आईला ती लागली असल्यामुळे ती सारखा विरोध करत असेल. पण आपल्याला त्याबद्दल नक्की काहीच माहीत नसल्यामुळे या जरतरला काही अर्थ नसतो एवढेच खरे.

एकोणीसशे नव्वदीच्या दशकातला एक प्रसंगः आमच्या कॉलनीतल्या सरळसोट मुख्य रस्त्यावरून मी चाललो होतो. रस्त्यात तुरळक रहदारी होती. माझा कॉलेजपासूनचा मित्र कृष्णा कामत समोरून येत असलेला मला दुरूनच दिसला आणि आश्चर्याचा एक लहानसा धक्का बसला. जन्मजात असलेल्या वैगुण्यामुळे त्याला बालपणीच चष्मा लागला होता आणि त्याचा नंबर वाढत वाढत कॉलेजमध्ये असतांना उणे बारा तेरापर्यंत गेला होता. जुन्या काळातल्या सोडावॉटरच्या बाटलीच्या तळाशी असते तशा पाच सहा मिलिमीटर जाड कांचेच्या भिंगाचा बोजड चष्मा हा त्याच्या चेहेऱ्याचा आवश्यक भाग बनला होता. त्याचा चष्म्याविना चेहेरा फारच कमी लोकांनी पाहिला असेल. पण आज तो चक्क चष्म्याशिवाय अगदी व्यवस्थितपणे रस्त्यावरून चालत येत होता. त्याच्या चालण्यात चाचपडण्याचा किंवा ठेचकाळण्याचा किंचितही भाग दिसत नव्हता. क्षणभर मला ते खरेच वाटले नाही. पण तो माणूस कामतच होता यात जराही शंका नव्हती.

तरुण मुले आणि विशेषतः मुली काँटॅक्ट लेन्स लावून आपले वैगुण्य लपवतात हे मला माहीत होते, पण पन्नाशीकडे झुकण्याच्या वयात कामतला ते करण्याची गरज नव्हती. त्याची तसे करण्याची प्रवृत्तीही नव्हती. शिवाय इतक्या जास्त पॉवरची स्पर्शभिंगे मिळतात की नाहीत याबद्दल मला शंका होती. “होमिओपाथी, आयुर्वेदिक किंवा लेजर तंत्र यांच्या सहाय्याने डोळ्याचा नंबर घालवून देऊ” असा दावा करणाऱ्या जाहिराती मी वाचल्या होत्या, पण त्यावर माझा विश्वास बसला नव्हता की मला प्रत्यक्षात तसे एकही उदाहरण आढळले नव्हते. न जाणो ते कदाचित खरे असेल आणि असा धन्वंतरी या कामताला भेटला असेल असा विचारही एकदा मनात डोकावून गेला.

तोपर्यंत कामत माझ्यापासून चारपाच पावलांच्या अंतरावर येऊन पोचला होता. झपाझप पुढे येऊन त्यानेच माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, “अरे, माझ्याकडे असा काय पाहतो आहेस? मी कामतच आहे.”
“पण तुझा चष्मा …. ”
“तो गेला, त्याला पार अरबी समुद्रात टाकून दिला.” आपल्या शैलीत कामत्याने सांगितले.
“ही जादू कुणी केली?” माझी उत्सुकता वाढत होती
“कुणी नाही. अरे, माझे कॅटॅरॅक्टचे ऑपरेशन झाले … आणि मला साध्या डोळ्यांनी दिसायला लागले.”
माझ्या आश्चर्याला पारावार उरला नाही. बहुतेक लोकांना चाळिशीनंतर चाळशी लागते. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर तर केवढा जाड भिंगांचा चष्मा लागायचा. पण याला आधीपासून असलेली चाळशी चाळिशीमध्ये गेल्यानंतर नाहीशी झाली होती (वाचण्यासाठी त्यालाही भिंगे लागत असणारच) आणि मोतीबिंदू काढल्यानंतरही जाड भिंगांशिवाय याला व्यवस्थित दिसते आहे हा काय प्रकार आहे याचा बोध होत नव्हता. कदाचित त्याच्या पूर्वी असलेल्या चष्म्याचा नंबर उणे बारा अधिक त्या काळात मोतीबिंदूच्या ऑपरेशननंतर लागणाऱ्या चष्म्याचे अधिक बारा मिळून शून्य झाले असेल असा गणिती विचार माझ्या मनात आला. अखेर त्यानेच सांगितले, “आता कॅटॅरॅक्ट ऑपरेशन झाल्यानंतर डोळ्यात रिकाम्या झालेल्या जागी कृत्रिम लेन्स बसवून देतात. त्या लेन्समधून छान दिसायला लागते.” हा शोध तोपर्यंत भारतात येऊन पोचला होता, पण मला माहीत नव्हता.

. . . . . .

मोतीबिंदू  आणि भिंगाचे भेंडोळे भाग २

एकवीसावे शतक आल्यानंतर सेवानिवृत्तीचा दिवस नजरेच्या टप्प्यात आला. पण त्यापूर्वी होत असलेल्या पदोन्नतींच्या सोबतीने कार्यक्षेत्र, अधिकार, जबाबदारी, कामाचा व्याप, त्यातली आव्हाने वगैरेंच्या कक्षा विस्तारत होत्या, आपले कर्तृत्व सिध्द करण्याच्या संधी समोर येत होत्या आणि त्यांचा उपयोग करून घेण्याचे माझे प्रयत्न चालले होते. आयुष्यातल्या अशा महत्वाच्या टप्प्यावरून वाटचाल करतांना सुदृढ शरीराची साथ आवश्यक होती. पण नेमक्या याच वेळी मला डाव्या डोळ्याने अंधुक दिसायला लागले. मोतीबिंदूची सुरुवात झाल्यामुळे हा बदल झाल्याचे समजल्यावर त्यावर काही उपाय नाही हे लक्षात आले. डाव्या डोळ्याची दृष्टी हळू हळू मंद होत असली तरी उजव्या डोळ्याने पाहून मी काम करू शकत होतो. दोन अडीच वर्षांनंतर डाव्या डोळ्याची क्षमता निम्म्यावर आली आणि लेखन वाचन वगैरेसाठी ती त्याहूनही कमी झाली. शिवाय मोतीबिंदूने उजव्या डोळ्यातही मूळ धरून विस्ताराला सुरुवात केली. तो डोळाही अधू व्हायला लागला तर मात्र काम करणे कठीण होणार होते.

कृष्णा कामत भेटल्यानंतर दहा वर्षात माझ्या ओळखीतल्या आणखी काही लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले होते. प्रत्यारोपण केलेल्या नव्या कृत्रिम भिंगाने त्यांना व्यवस्थित दिसत होते. एक दोन लोकांच्या बाबतीत मात्र काही गुंतागुंत झाल्यामुळे नव्या व्याधी उद्भवल्या होत्या. अशा एकाद्या अपवादांमुळे संभाव्य धोक्याची जाणीव होते आणि बहुतेक लोक अजूनही शस्त्रक्रियेमधला धोका न पत्करता मोतीबिंदू परिपक्व होण्याची वाट पहात असत. मला मात्र दोन्ही डोळ्यांमधली दृष्टी एकाच वेळी मंद झाली असती तर कामच करता आले नसते. पूर्वीच्या काळी यावर कसलाही उपायच नसायचा. आपले प्रारब्ध म्हणून ही गोष्ट मान्य करावी लागत असे. पण नव्या तंत्रज्ञानाने उपलब्ध केलेल्या सोयींमुळे परिस्थितीत बदल झाला होता. त्याचा उपयोग करून घेणे आता मला शक्य होते.

यावर मी स्वतः विचार केला, सर्व संबंधितांशी विचारविनिमय केला आणि सर्वतोपरी काळजी घेऊन डाव्या डोळ्याचे ऑपरेशन करून घेण्याचा निर्णय घेतला. शरीरात इतर कोणती व्याधी नसल्याने फिटनेसचा प्रश्न आला नाही. ऑपरेशनच्या आदल्या दिवशी मला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करून घेतले आणि अँटीबायॉटिक्सचा कोर्स सुरू करून दिला. दुसरे दिवशी ऑपरेशन टेबलवर गेल्यावर आधी तुलनेने चांगला असलेल्या उजव्या डोळ्यावर पट्टी बांधली, डाव्या डोळ्याच्या आजूबाजूचा भाग बधीर केला आणि शस्त्रक्रिया सुरू झाली. सर्व वेळ मी संपूर्णपणे भानावर होतो. प्रत्यक्ष सूर्याकडे पहात आहे असे वाटण्यासारखा प्रकाशाचा प्रचंड लोळ डाव्या डोळ्यात उतरला आणि काय दिसते ते मला समजेनासे झाले. कुरकुर, खुळ्ळ असले आवाज कानावर पडत होते. काही मिनिटांनीच माझ्या उजव्या डोळ्यावरील पट्टी काढली आणि मला वॉर्डमध्ये पाठवून दिले. डावा डोळा मात्र बंद करून ठेवलेला होता. दर तासातासाने नर्स येऊन तो उघडायची आणि त्यात औषध घालून पुन्हा झाकून ठेवायची असे रात्री झोपेपर्यंत चालले. दुसरे दिवशी सकाळी डॉक्टरांनी तो डोळा तपासला आणि घरी जायची परवानगी दिली. त्याबरोबर वीस दिवस रजा घेण्याची शिफारसही केली.

माझ्या घरातल्यांना ही एक प्रकारची पर्वणीच वाटली असेल, कारण मी त्यापूर्वी कित्येक वर्षात सलग वीस दिवस घरी राहू शकलो नव्हतो. घरी गेल्यावरसुध्दा दोन प्रकारचे टेलीफोन आणि इंटरनेट यांनी मी जगाशी संपर्क साधून होतो, शिवाय घरापासून माझे ऑफीस हाकेच्या अंतरावर असल्यामुळे माझे सहकारी केंव्हाही घरी येऊन मला भेटू शकत होते. त्यामुळे घरी आल्यानंतर दुसरे दिवशीच मी माझ्या अखत्यारीतल्या कामाच्या तांत्रिक बाबतीत लक्ष घालायला सुरुवात केली आणि माझ्याविना कोणताही खोळंबा होणार नाही याची काळजी घेतली. माझ्या गैरहजेरीत घडणाऱ्या घडामोडींची माहिती मला मिळत राहिल्यामुळे त्यात खंड पडला नाही.

आता मी चोवीस तास घरीच उपलब्ध असल्याची खात्री असल्यामुळे अनेक आप्तेष्ट मला भेटायला येऊन गेले. त्यांच्याबरोबर निवांतपणे गप्पा मारता आल्या. त्यातून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. नवीन घटना, वेगवेगळे अनुभव कानावर आले, या पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्याच्या निमित्याने चांगले चुंगले खायची चंगळ झाली, रिकाम्या वेळात माझी आवडती गाणी ऐकायला मिळाली, शरीराला भरपूर विश्रांती मिळाली आणि वीस दिवसांनी नवी दृष्टी घेऊन नव्या जोमाने कामाला लागलो. नको त्या वेळी येऊन दगा देणाऱ्या मोतीबिंदूबद्दल मनात जी घृणा निर्माण झाली होती त्यातला कडवटपणा बराचसा कमी झाला.

माझ्या ओळखीतल्या एका बहुश्रुत गृहस्थांचे सामान्यज्ञान दांडगे आहे. पण अमेरिकेच्या प्रेसिडेंटपासून कोपऱ्यावरल्या पानवाल्यापर्यंत कोणत्याही माणसाने केलेली कोणतीही कृती चुकीचीच आहे असे सांगून “त्याने असे करण्याऐवजी तसे का केले नाही?” असे विचारायचे आणि त्यांच्याशी वाद घातला तर बारकाव्यात कुठेतरी शब्दात पकडून बोलणाऱ्याला निरुत्तर करायचे हा त्यांचा आवडता छंद आहे. त्यामुळे त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सरळ उत्तर न देता टोलवत रहायचे असे मी ठरवले होते. माझ्याशी बोलतांना माझ्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेचा विषय निघताच त्यांनी विचारले, “तुम्ही आपले ऑपरेशन इथेच कशाला करून घेतलेत?”
त्यांना कारणे सांगण्यात अर्थ नसल्यामुळे मी प्रतिप्रश्न केला, “मग मी ते कुठे करायला हवं होतं?”
“अहो ते मद्रासच्या एका डॉक्टरानं तिथं मोठे नेत्रालय उघडलं आहे ना, ते एकदम बेस्ट आहे म्हणतात.”
“आपले राष्ट्रपती, पंतप्रधान वगैरे लोक तिथंच जातात, तेच ना?”
“हां, तुम्ही तिथंच का नाही गेलात?”
“त्यानं काय झालं असतं?”
“अहो तिथं लेजरनं ऑपरेशन करतात म्हणे.”
“म्हणून काय झालं?”
“लेजर म्हणजे एकदम अद्भुत प्रकारचे किरण असतात. तुम्हाला ठाऊक नाही?”
“आहे ना. पण छान सरळ रेषेत कापली जाते म्हणून आता भाजी चिरायलासुध्दा लेजरगन वापरायची का?”
“अहो मी डोळ्याच्या ऑपरेशनबद्दल बोलतोय्.”
“मोतीबिंदूचं ऑपरेशन म्हणजे त्यात काय काय करतात हो?”
“आधी डोळ्यात वाढलेला मोतीबिंदूचा खडा बाहेर काढतात आणि हल्ली त्या जागी एक कृत्रिम भिंग बसवतात.” त्यांनी ऐकीव माहिती सांगितली, पण मला प्रत्यक्ष अनुभव होता.
त्यावर मी विचारले, “बरोबर. यात लेजरचा संबंध कुठे आला?”
ते किंचितसे गोंधळलेले पाहून मी सांगितले, “हे काम करण्यापूर्वी डोळ्यावरल्या आवरणाला एक बारीकशी भेग करायची असते. तेवढ्यापुरता लेजरचा उपयोग होतो.”
“तेच तर महत्वाचे आहे ना?” त्यांनी लगेच मोका पाहून विचारले.
“असते ना, पण जुने खराब झालेले भिंग जपून बाहेर काढण्याची पुढची क्रिया जास्त महत्वाची असते आणि नवे भिंग व्यवस्थितपणे बसवणे सर्वात जास्त महत्वाचे असते.”
“तुम्ही कसली लेन्स बसवून घेतलीत?” त्यांनी नवा विषय सुरू केला.
“ते सगळं डॉक्टरच ठरवतात.”
“म्हणजे त्यांनी तुम्हाला विचारलं सुध्दा नाही का?”
“त्यात काँटॅक्ट लेन्ससारख्या निरनिराळ्या शेड्स, स्टाइल्स किंवा फॅशन्स नसतात. आपल्या डोळ्यात कोणत्या साइझची लेन्स फिट होईल ते डॉक्टरच ठरवतात आणि बसवतात. त्यात ते मला काय विचारणार आणि कसले ऑप्शन्स देणार?”
“म्हणजे तुम्ही साधीच लेन्स बसवलीत की काय?”
“मग फोडणीची बसवायला पाहिजे होती का?” मी वैतागून खवचटपणाने विचारले.
“फोडणीची नाही पण फोल्डेबल का नाही घेतलीत?”
“लेन्ससारखी लेन्स असते, तिला काय होल्डॉलसारखं गुंडाळून ठेवायचंय् की छत्रीसारखं मिटवून ठेवायचंय्? तिची घडी घालायची काय गरज आहे?”
“ते लेटेस्ट टेक्निक आहे. तुझ्या डॉक्टरला माहीत नसेल, नाहीतर तुला परवडणार नाही म्हणून तो बोलला नसेल.”
“जाऊ दे. जी फिक्स्ड लेन्स आता माझ्या डोळ्यात बसवली आहे ती कुठे खुपत नाही, तिचा मला कसला त्रास नाही, तिनं मला सगळं काही छान स्पष्ट दिसतंय्. मला एवढं पुरेसं आहे. तुझ्या त्या भिंगाच्या भेंडोळ्यानं आणखी कसला फायदा होणार होता?”
“अहो, लेटेस्ट टेक्निकचा काही तरी लाभ असणारच ना? उगीच कोण कशाला ते डेव्हलप करेल?”
“?”
अखेर त्याने मला निरुत्तर केलेच!

. . . . .

मोतीबिंदू  आणि  भिंगाचे भेंडोळे (भाग ३)

मोतीबिंदू

माझ्या उजव्या डोळ्यामधला मोतीबिंदू अत्यंत मंद गतीने वाढत होता. सेवानिवृत्त होईपर्यंत त्याचे ऑपरेशन करण्याची आवश्यकता पडलीच नाही. त्यानंतर मनात एक प्रकारची विरक्तीची भावना निर्माण झाली होती. वर्षभरातच एक मोठे आजारपणही येऊन गेले. त्यात ती भावना वाढीला लागली. “जेवढ्या प्रयत्नसाध्य गोष्टी मला मिळवणे शक्य होते, त्यातल्या बहुतेक सगळ्या मिळून गेल्या आहेत, आता यापुढे जे काही आपण होऊन पदरात पडेल ते गोड मानून आलेला दिवस पुढे ढकलावा, आणखी कसला हव्यास धरू नये, आकांक्षा, अभिलाषा वगैरेंना मुरड घालावी” अशा प्रकारच्या विचारांचे ढग मनात जमायला लागले होते. नियमितपणे माझ्या डोळ्यांची तपासणी होत होतीच. “उजव्या डोळ्यातला मोतीबिंदू पुरेसा वाढला असल्याने पाहिजे तर आता शस्त्रक्रिया करता येईल, पण ती नाही केली तरी त्यापासून धोका नाही.” असे एकदा डॉक्टरांनी सांगितले. डाव्या डोळ्यातला मोतीबिंदू या अवस्थेत येण्यापूर्वीच काढून झाला होता, पण थोडी सावधगिरी, थोडी निष्क्रियता आणि थोडे औदासिन्य यांनी मिळून या वेळी दुसरा पर्याय स्वीकारण्याचा निर्णय घेतला. डोळ्यातला मोतीबिंदू हळू हळू वाढत होता आणि दृष्टीला अंधुक करत होता, तरीही पुढे दरवर्षी याचीच पुनरावृत्ती होत राहिली आणि मी त्या डोळ्याचे ऑपरेशन पुढे ढकलत राहिलो.

दरम्यानच्या काळात मनात विचांरांचे मंथन चाललेले होते. माझा मूळचा चळवळ्या स्वभाव आणि लहानपणापासून त्यावर झालेले प्रयत्नवादाचे संस्कार मला स्वस्थ बसू देत नव्हते. मोकळ्या वेळात काही नवे अवांतर उपद्व्याप सुरू केले आणि त्यांना थोडे फार यश मिळाल्यामुळे मनातल्या आशावादाला फुलोरा येत गेला. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन किंवा त्याचा फोकस पुन्हा किंचित बदलला, त्याला सामोरे जाण्यासाठी वेगळा पवित्रा घेतला गेला. हे सगळे माझ्या कळत नकळत होत होते. क्रिकेटच्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी नवे कोरे पिच असते, ताज्या दमाचा फलंदाज त्यावर खेळतांना धावांचा ढीग जमवण्यासाठी मनसोक्त फटकेबाजी करतो. पण शेवटची पारी खेळण्याची वेळ येईपर्यंत पिच ढेपाळलेले असते, त्यावरून चेंडू अनिश्चित उसळ्या मारतात किंवा वेडेवाकडे वळायला लागतात, खेळाडू थकलेले असतात, कधी कधी थोडे जखमी झालेले असतात. त्यांना कदाचित पहिल्या पारीतल्यासारखा तुफानी खेळ करता येणार नाही याची जाणीवही असते, पण या वेळी सामना जिंकण्याची जिद्द मनात असते. समोरचे आपले साथीदार एकामागोमाग एक तंबूत परतत असतांनासुध्दा एकादा खेळाडू नेटाने खेळत राहतो. “जीवनातल्या आपल्या या दुसऱ्या इनिंगमध्येसुध्दा असेच चिवटपणे खेळायचा प्रयत्न केला, फक्त ‘शेवटचा दिस’च नव्हे तर तोपर्यंतचा प्रत्येक दिवस ‘गोड’ व्हावा यासाठी ‘अट्टाहास’ धरला तर त्यात काही गैर नाही.” असे वेगळे सकारात्मक विचार मनात घर करायला लागले. तसे पूर्वी तिथे जमलेले विरक्तीचे ढग विरू लागले

एका वर्षी नेहमीसारखी डोळ्यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टराने पुन्हा एकदा आधीच्या वर्षांसारखा ”हो किंवा नाही” असा मोघम अभिप्राय दिला तेंव्हा मी त्यांना विचारले, “एक डॉक्टर म्हणून तुम्ही पेशंटला कोणता सल्ला द्याल?”
तो गृहस्थ सकारात्मक विचार करणारा आहे हे मला माहीत होते. त्याने सांगितले, “आता जेंव्हा तुम्हाला सोयिस्कर असेल त्या वेळी ऑपरेशन करून घ्या. त्यामुळे तुम्हाला दोन्ही डोळ्यांनी मिळून चांगले दिसायला लागेल.”
मी याबद्दल विचार केलेला होताच. रक्तदाब आणि मधुमेह हे विकार तेंव्हा आटोक्यात आले होते, तांत्रिक सल्लागार म्हणून हातात घेतलेली सारी कामे मी मार्गी लावली होती, आमच्या घरात कोणताही कौटुंबिक कार्यक्रम ठरवलेला नव्हता की आम्ही परदेशगमनाचा बेत आखला होता. थोडक्यात म्हणजे त्या काळात मी ‘मोकळा’ होतो आणि परिस्थिती अनुकूल होती. त्यामुळे दिवाळीची धूमधाम संपल्यावर लगेच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यायचे ठरवून टाकले आणि ते काम करवून घेतले.

मुंबईतले प्रख्यात नेत्रशल्यविशारद पद्मश्री केकी मेहता यांच्या रुग्णालयात हे ऑपरेशन झाले. ‘फॅकोइमल्सिफिकेशन’ नावाच्या गुंतागुंतीच्या नावाच्या टेक्निकचा वापर यात केला गेला. माझे मोतीबिंदूचे पहिले ऑपरेशनसुद्धा असेच झाले होते, फक्त मला त्याची माहिती नव्हती. डॉक्टरमजकुरांनी सर्वात आधी डोळ्यावरील आवरणाला एक लहानसा छेद घेतला. त्यातून आत भिंगापर्यंत सुई घातली आणि तिच्यातून मोतीबिंदूच्या खड्याला अल्ट्रासॉनिक ध्वनीलहरींचे धक्के देऊन त्याचा चुराडा केला. हा ‘मोतीचूर’ आणि डोळ्याच्या नैसर्गिक भिंगामधला उरलासुरला द्रवपदार्थ एका पोकळ सुईमधून शोषणाने (व्हॅक्यूमने ओढून) बाहेर काढला. त्यानंतर एका खास प्रकारच्या इंजेक्शनच्या सुईमधून पारदर्शक कृत्रिम भिंगाची सुरळी डोळ्यात सोडली आणि तिला योग्य जागी फैलावून व्यवस्थित बसवले. हे सारे काम फार फार तर पंधरा मिनिटात झाले असेल.

ऑपरेशन टेबलवर गेल्यानंतर मला शिरेतून एक इंजेक्शन दिले गेले होते. त्याने मी बोलता बोलता स्वप्नाच्या जगात गेलो होतो. पंधरा वीस मिनिटांनी कोणी तरी मला नावाने हाक मारताच उठून बसलो. तेंव्हा स्वप्नातून जागे झाल्यासारखे वाटले, पण त्या स्वप्नातला कसलाच तपशील मात्र आठवला नाही. अर्धवट गुंगीच्या अवस्थेत असतांना एका आज्ञाधारक मुलाप्रमाणे मी सांगितलेले ऐकत होतो. टेबलावरून उठून खाली उतरलो आणि व्हीलचेअरवर बसलो. मला ढकलत एका पिटुकल्या वॉर्डमध्ये नेले गेले. तिथे गेल्यावर व्हीलचेअरवरून उतरून बेडवर जाऊन पडलो. माझी पत्नी तिथे माझी वाट पहात बसली होती. पाच दहा मिनिटात मी पूर्णपणे जागा झालो, आपले कपडे बदलले आणि पत्नीबरोबर टॅक्सीत बसून घरी गेलो. एरवीसुद्धा मी नेहमीच बेशुध्द झाल्यासारखा गाढ झोपतो असे घरातले सांगतात. त्यामुळे यावेळी मी निद्रावस्थेत गेलो होतो की बेशुध्दावस्थेत ते मलाही नक्की सांगता येणार नाही. पण इतक्या झटपट बेशुध्द होणे आणि पुन्हा शुध्दीवर येणे बहुधा कठीण असावे. तेंव्हा ती गुंगी म्हणजे बहुधा एक प्रकारची झोपच असावी.

माझ्या डाव्या डोळ्याचे म्हणजे माझे मोतीबिंदूचे पहिले ऑपरेशन झाल्यानंतर ज्या गृहस्थांनी मला फोल्डेबल लेन्सबद्दल छेडले होते ते या दुसऱ्या ऑपरेशनच्या वेळे पर्यंत कुठे गेले होते कोण जाणे. त्यांची गाठ पडली नाही. त्यांना शोधून काढून ”मी आता ‘भिंगाचे भेंडोळे (फोल्डेबल लेन्स)’ डोळ्यात बसवली असल्याचे सांगावे” असे एकदा वाटले. पण ”आता ती लेन्स ‘मल्टीफोकस’ आहे का?” असे त्यांनी कदाचित (किंवा नक्कीच) विचारले असते.

या हकीकतीलाही चारपाच वर्षे होऊन गेली. माझ्या पत्नीच्या एका डोळ्यातल्या मोतीबिंदूचे ऑपरेशन नुकतेच झाले. ते सुद्धा ‘फॅकोइमल्सिफिकेशन’ टेक्निकनेच आमच्या हॉस्पिटलमध्ये झाले. तिच्याही डोळ्यात भिंगाचे भेंडोळे म्हणजेच फोल्डेबल लेन्स बसवली गेली. आमच्या हॉस्पिटलमधल्या प्रथेनुसार तिलाही ऑपरेशनच्या आदल्या दिवशी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करून घेतले आणि अँटीबायॉटिक्सचा कोर्स सुरू करून दिला. वयपरत्वे आलेल्या इतर व्याधींचा विचार करता इतर सगळे औषधोपचार सुरू ठेवणे आणि नियमितपणे शरीराची तपासणी करत राहणे या दृष्टीने हे सोय़ीचे आणि आवश्यकच होते. शरीरातल्या रक्तात गुठळी होऊ नये यासाठी एक विशिष्ट औषध काही लोकांना दिले जात असते, पण कोणतेही ऑपरेशन करायचे झाल्यास लहानशी का होईना, पण जखम होणार आणि त्यातून बाहेर पडणारे रक्त लवकर गोठले नाही तर रक्तस्त्राव कसा थांबणार? यामुळे अशा रुग्णांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे ऑपरेशन यशस्वीपणे होऊन गेल्यानंतर आणि त्यानंतर डोळ्याची तपासणी होऊन गेल्यानंतर आणखी एक दिवस हॉस्पिटलमध्ये ठेऊन घेतले.

आणखी दोन तीन वर्षे गेल्यानंतर मला पुन्हा थोडे धुरकट दिसायला लागल्यामुळे काळजी वाटायला लागली होती. आमच्या डॉक्टरने तपासून पुनः डॉ.केकी मेहता यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी पाठवले. त्यांनी तपासून सांगितले की डेळ्यातल्या ज्या पिशवीमध्ये हे कृत्रिम भिंग बसवले जाते तिच्या पृष्ठभागावर धूळ जमावी त्याप्रमाणे कसले तरी कण जमतात आणि ते लेजरच्या सहाय्याने काढून टाकता येतात. खरोखर फक्त पाच मिनिटात त्यांनी माझ्या डोळ्यातले भिंग साफ करून दिले आणि तेही कसलीही भूल न देता. मला पुन्हा स्वच्छ दिसायला लागले.

डोळ्यात तयार झालेला मोतीबिंदू काढून त्याजागी अॅक्रिलिकचे कृत्रिम भिंग बसवणे आता कॉमन झाले आहे. या नव्या भिंगाने मस्त आणि स्वच्छ दिसते, एवढेच नव्हे तर पूर्वी असलेला ऱ्हस्व किंवा दीर्घ दृष्टीदोषही काढून टाकला जातो. प्रत्येक शहरात हे ऑपरेशन करणारे अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स असतात. त्यांचा सक्सेस रेट जवळजवळ शंभर टक्के असतो. मात्र त्यासाठी आधी संपूर्ण शरीराची कसून तपासणी करून घेतली पाहिजे, ऑपरेशनच्या आधीही आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे आणि नंतरचे काही दिवस तर जास्तच काळजी घ्यायला हवी. एवढे पथ्य सांभाळले तर आता मोतीबिंदूला घाबरण्याचे कारण नाही.

. . . . . . . . . . (समाप्त)

……… संपादन दि. १७-१०-२०१९

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: