तेथे कर माझे जुळती – ५ श्रीमती डॉ.गंगूबाई हंगल

GangubaiHangal

(हा लेख मी २००८ साली लिहिला होता.)

मी शाळेत असतांना एकदा आमच्या लहानशा गांवात पं.भीमसेन जोशी यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला होता. त्या वेळी त्यांचे गायन ऐकायला किंवा त्यांना पहायला सारा गांव त्या जागी लोटला होता आणि सगळे लोक कशासाठी तिकडे जात आहेत ते पहायला जाऊन मीसुध्दा गर्दीतून वाट काढत मंचाच्या अगदी जवळ जाऊन बसलो होतो. हा एक अपवाद वगळला तर माझ्या लहानपणी मी शास्त्रीय संगीत कधी ऐकल्याचे मला आठवत नाही. शास्त्रीय संगीतावर आधारलेली नाटकसिनेमातली गाणी मात्र मला विशेष आवडत असत. त्यातल्या आलाप ताना तेवढ्या थोड्या ओळखीच्या होत्या. पुढे हॉस्टेलच्या मेसमधल्या रेडिओवर बहुधा रेडिओ सिलोन किंवा विविधभारती यातले एकादे स्टेशन लावलेले असायचे. एकादी मोठी घटना होऊन गेली असली तर कोणीतरी त्यावर बातम्या लावायचा. एकदा असेच आम्ही चारपाच मित्र जेवण आटोपल्यानंतर रेडिओशेजारी कोंडाळे करून बसलो होतो. स्टेशन बदलण्याच्या बटनाशी चाळा करता करता अचानक एक दमदार तान ऐकू आली. “अरे व्वा! हा कोण बुवा आहे बुवा?” आमच्यातला एकजण उच्चारला. त्यातला दुसरा ‘बुवा’ आमच्यातल्या एका मुलाला उद्देशून होता. त्याने शाळेत असतांना संगीताच्या एकदोन परीक्षा देण्यापर्यंत मजल मारली होती आणि अमक्या गाण्याचा तमका राग आहे वगैरे माहिती सांगून तो आमच्यावर शाइन मारायला पहात असे.
तो लगेच म्हणाला, “अरे बुवा काय म्हणतोय्स? या आपल्या गंगूबाई असणार.”
आम्ही जेवढे म्हणून हिंदी वा मराठी सिनेमे पाहिले होते त्यातले ‘गंगूबाई’ नावाचे पात्र भांडी घासणे, लादी पुसणे आणि क्वचित कधी लावालाव्या करणे याव्यतिरिक्त आणखी कांही करतांना आम्ही पाहिले नव्हते. त्यामुळे सर्वांनात हंसू फुटले.
“अरे ए, तुला बुवा म्हंटलं म्हणून आम्हाला शेंडी लावतोस का रे?” कोणीतरी विचारले. यावरून दोघांची जुंपली आणि “तुझी माझी पैज” पर्यंत गेली. अखेर “जो कोणी हरेल त्याने सर्वांना चहा पाजायचा.” असा तोडगा एका हुषार मुलाने सुचवला आणि अर्थातच सर्वांनी तो एकमताने मंजूरही करून टाकला. एक कप चहासाठी सर्व मुलांनी ते गायन शेवटपर्यंत ऐकले. मेसच्या इतिहासात प्रथमच त्या रेडिओमधून शास्त्रीय संगीताचे स्वर बाहेर पडत असावेत. गायन संपल्यानंतर निवेदिकेने घोषणा केली. त्यात “अभी आप सुन रहे थे श्रीमती गंगूबाई हंगलका मधुर गायन …” वगैरे सांगितले तेंव्हा मी आयुष्यात प्रथमच त्यांचा आवाज आणि त्यांचे नांव दोन्ही ऐकले.

लग्न करून बि-हाड थाटल्यानंतर रेडिओ, टेपरेकॉर्डर, टेलिव्हिजन वगैरे सगळ्या वस्तू यथावकाश घरात येत गेल्या आणि त्यातून आमचे सांगीतिक जीवन सुरू झाले. यात माझा सहभाग श्रवणभक्तीपुरताच मर्यादित होता, पण आता सुगम संगीताच्या सोबतीला शास्त्रीय संगीत ऐकणे सुरू झाले आणि त्याची गोडी वाटायला लागली. हळूहळू त्याचे कार्यक्रम, मैफली वगैरेंना जाऊ लागलो. त्यामुळे त्यातले दादा लोक म्हणजे पंडित, बुवा, उस्ताद आणि खानसाहेब वगैरेंची नांवे परिचयाची झाली. रेडिओ ऐकतांना किंवा टीव्हीवर पाहतांना आभाळातल्या नक्षत्रांसारखे वाटणारे हे कलाकार टाटा थिएटर किंवा नेहरू सेंटर सारख्या ठिकाणी जमीनीवर अवतरले तरी वलयांकितच दिसतात. मात्र चेंबूरचे बालविकास मंदिर किंवा दादर माटुंगा कल्चरल सेंटरसारख्या जागी होणा-या कार्यक्रमाला लवकर गेल्यास त्या तारकांना अगदी दहा बारा फुटांच्या अंतरावरून पहायला मिळते. थोडा उत्साह दाखवला तर कार्यक्रम झाल्यानंतर पुढे जाऊन त्यांना चरणस्पर्श करता येतो. पं.कुमार गंधर्व, पं.भीमसेन जोशी, पं.जसराज, किशोरीताई वगैरेंच्या जोडीनेच त्या काळात गंगूबाईंचे नाव आदराने घेतले जात असे. त्यांचे गायन ऐकण्याची संधी रसिक श्रोते चुकवत नसत. या सगळ्या दिग्गजांचे गायन ऐकण्यासाठी आम्हीसुध्दा दूरदूरच्या सभागृहात जात असू.

एकदा योगायोगाने आगगाडीच्या डब्यात पं.शिवानंद पाटील आणि सौ.योजना शिवानंद या जोडप्याची भेट होऊन ओळख झाली आणि ती वाढत गेली. त्यानंतरची कांही वर्षे योजना प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही घरचे कार्य समजून हजर रहात होतो. त्या वेळी प्रमुख कलाकारांचा सत्कार तर होत असेच, त्या निमित्याने कांही अन्य आदरणीय मंडळींचा सत्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले जात असत. यामुळे अनेक मान्यवर कलाकारांना जवळून पाहण्याची, त्यांच्याबरोबर दोन शब्द बोलण्याची संधी मला मिळाली. अशाच एका प्रसंगी मी पहिल्यांदा गंगूबाईंना क्षणभरासाठी भेटलो होतो.

योजना प्रतिष्ठानतर्फे दर वर्षी पं.बसवराज राजगुरू स्मृतीदिनानिमित्य कर्नाटकातल्या एकदोन कलाकारांच्या गायन वादनाचा कार्यक्रम ठेवला जात असे. त्यात सन २००१ मध्ये श्रीमती डॉ.गंगूबाई हंगल यांच्या गायनाचा कार्यक्रम ठेवला होता. हा समारंभ बेळगांवला झाला. त्यासाठी आम्ही सारेजण आदल्या दिवशी तिथे जाऊन पोचलो. हुबळीहून गंगूबाईसुध्दा आल्या होत्या. त्यांच्या राहण्यासाठी वेगळी व्यवस्था केली असली तरी बराच वेळ त्यासुध्दा आमच्यातल्याच एक बनून आमच्यासोबत राहिल्या. घरातल्या मोठ्या माणसाच्या मायेने सर्वांची विचारपूस करत होत्या, हास्यविनोद करून खळखळून हंसत होत्या. आपण एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या सान्निध्यात बसलो आहोत असे कोणाला वाटू देत नव्हत्या, कसल्याही प्रकारची प्रौढी त्यांच्या बोलण्यात नव्हती किंवा त्यांच्या जोरकस गायनात जो आवेश दिसतो त्याचाही मागमूस नव्हता. उत्तर कर्नाटकात घरोघरी बोलली जाते तशा साध्या सोप्या कानडी बोलीभाषेत सारे संभाषण चालले होते. मधून मधून कानडीमिश्रित मराठीसुध्दा त्या बोलायच्या. मीसुध्दा द्विभाषिक असल्यामुळे मला समजायला कसली अडचण पडली नाही. दुसरे दिवशी त्यांनी केलेले गायन तर मंत्रमुग्ध करणारे होतेच, त्या दिवशी झालेली त्यांची भेट अधिक प्रभाव पाडणारी होती.

पं.भीमसेनजी आणि स्व.आठवले शास्त्री यांच्याबद्दल लिहितांना मी त्यांच्या कर्तृत्वाबद्दल लिहिले नव्हते कारण यापूर्वी अनेक वेळा त्याविषयी लिहिले गेले आहे. गंगूबाईंच्याबद्दल माझ्या वाचनात जेवढे आले ते बहुतेक इंग्रजीत होते. मराठी भाषेतसुध्दा लेख आले असतील, त्यांना श्रध्दांजली वाहणारा अग्रलेख मी पाहिला आहे, पण कदाचित तो सर्वांनी वाचला नसल्यास वाचकांना माहिती व्हावी यासाठी त्यांच्या जीवनातल्या कांही ठळक गोष्टी नमूद करत आहे. त्या कर्नाटकातल्या धारवाड जिल्ह्यात जन्माला आल्या आणि त्यांनी जगभरातल्या श्रोत्यांची मने जिंकली असली तरी बहुतेक वेळी त्यांचे वास्तव्य हुबळी धारवाडच्या परिसरातच राहिले. गंगूबाईंच्या मातोश्री कर्नाटक संगीतात पारंगत होत्या, पण त्यांनी गंगूबाईंना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची तालीम द्यायचे असे ठरवले. किराणा घराण्याचे प्रख्यात गायक पं.रामभाऊ कुंदगोळकर ऊर्फ सवाई गंधर्व यांचेकडून त्यांनी हिंदुस्तानी संगीताचे शिक्षण घेतले. पण त्याच्या खूप आधी म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षीच गंगूबाईंनी बेळगाव येथे भरलेल्या काँग्रेसच्या संमेलनात स्वागतगीत गाऊन सर्वांची वाहवा संपादन केली होती. गुरूकडून घेतलेले शिक्षण त्यांनी आत्मसात केलेच, त्याला आपल्या प्रतिभेची जोड देऊन त्याचे अप्रतिम सादरीकरण केले आणि त्यातून नांवलौकिक मिळवला. त्या ज्या काळात संगीताच्या क्षेत्रात आल्या त्या काळात स्त्रियांना त्यात मानाचे स्थान नव्हते, उलट त्यांची अवहेलनाच जास्त होत असे. ते सर्व हालाहल पचवून त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि सर्व विरोधकांना व निंदकांना पुरून उरल्या.

गंगूबाईंनी जेमतेम प्राथमिक शालेय शिक्षण घेतले होते, पण त्यांना चार विद्यापीठांनी डॉक्टरेटची पदवी देऊन सन्मानित केले. एवढेच नव्हे तर धारवाड विद्यापीठात त्यांनी अनेक वर्षे संगीतावर अध्यापन केले आणि त्याच्या सिनेटच्या त्या सदस्या होत्या. अनेक संस्थांनी त्यांना पन्नासावर बिरुदावली बहाल केल्या. त्यात संगीत नाटक अकादमी या सर्वोच्च संस्थेचाही समावेश होतो. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण ही पदके दिली. एकंदर नऊ पंतप्रधान आणि पाच राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला आहे.

त्यांनी काळावर जवळ जवळ मात केली होती. मी पहिल्यांदा त्यांना ऐकले तेंव्हाच त्या सत्तरीला आल्या होत्या पण आवाज खणखणीत आणि सूर अगदी पक्के होते. त्यांचे शेवटचे गाणे ऐकले तेंव्हा तर त्या नव्वदीला आल्या होत्या, तरीसुध्दा आवाजात कंप नव्हता. त्यांना अधून मधून विश्रांती देण्यासाठी त्यांच्या कन्यका कृष्णाबाई बहुतेक वेळी त्यांची साथ करत असत. त्यांच्या संगीतविश्वातल्या वारस समजल्या गेलेल्या कृष्णाबाई दुर्दैवाने त्यांच्या आधीच चालल्या गेल्या, त्या त्यांच्या वयाची पंचाहत्तरी झाल्यानंतर. त्यानंतर गेल्या कांही वर्षात गंगूबाईंचे नांव बातम्यांमध्ये येत नव्हते. एकदम त्या अत्यवस्थ असल्याचे वृत्त आले आणि त्यापाठोपाठ त्यांच्या देहावसानाचीच बातमी आली. काळ आणखी तीन चार वर्षे थांबला असता तर वयाचे शतक झळकवणारी एक थोर व्यक्ती आपल्याला पहायला मिळाली असती. (गेल्या वर्षी म्हणजे २०१३मध्ये त्यांची शतसंवत्सरी झाली)

2 प्रतिसाद

  1. […]  श्रीमती डॉ.गंगूबाई हंगल […]

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: