तेथे कर माझे जुळती – ७ – पं.शिवानंद पाटील

तेथे कर माझे जुळती – ७ (पूर्वार्ध) – पं.शिवानंद पाटील

४७९ शिवानंद पाटील

मी हा लेख पाच वर्षांपूर्वी लिहिला होता.

या लेखमालिकेमधील पहिली दोन पुष्पे मी दोन जगद्वंद्य प्रख्यात व्यक्तींना समर्पित केली होती. त्यांच्या सहवासाचे अगदी मोजके क्षण मला प्राप्त झाले होते पण ते माझ्या मनावर कायमचा ठसा उमटवून गेले होते. त्यानंतर फारशी प्रसिध्दी न मिळालेल्या पण माझ्या जीवनावर परिणाम करणा-या माझ्या जवळच्या परिचयातल्या तीन व्यक्तींविषयी मी लिहिले होते. ज्या व्यक्तीला बरीच प्रसिध्दीही मिळाली आणि बरीच वर्षे थोडे जवळून पहाण्याची संधी मला मिळाली अशा एका खास व्यक्तीबद्दल मी आज या भागात लिहिणार आहे. त्यांचे नाव पं.शिवानंद पाटील. खरे तर त्यांच्याबद्दल चांगली तयारी करून खूप सविस्तरपणे लिहावे अशी माझी इच्छा होती. त्याच्याही आधी त्यांना खूप मोठे होतांना पहावे असेही मला वाटत होते, पण दैवाला ते मंजूर नव्हते. त्याने अचानक घाला घालून शिवानंदांना आपल्यातून ओढून नेले. त्यामुळे आता सुन्न झालेल्या मनःस्थितीमध्ये मला त्यांच्याबद्दल सुचेल तसे लिहीत आहे.

पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी पुणे मुंबई महामार्ग झाला नव्हता. रेल्वेने पुण्याला जाण्यासाठी आम्ही दादर स्टेशनला गेलो. पावसाळ्याचे दिवस होते, त्यामुळे पोचायला थोडा उशीरच झाला. त्या दिवशी डेक्कन एक्सप्रेस सुध्दा तशी उशीरानेच निघाली होती, पण आम्ही तिकीट काढून प्लॅटफॉर्मवर पोचेपर्यंत ती चालली गेली. कोयना एक्सप्रेससाठी दोन तास थांबावे लागणार होते आणि पावसाचा जोर वाढतच असल्यामुळे तिच्या वेळेबद्दल अनिश्चितताही वाढत होती. थोड्या वेळाने बंगलोरला जाणारी उद्यान एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर आली. पुण्याला जाऊ इच्छिणारे आमच्यासारखे खूप लोक प्लॅटफॉर्मवर उभे होते. ते सगळे गाडीत शिरले म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही सुध्दा समोर आलेल्या डब्यात चढलो. त्या काळातले प्रवासी थ्री टायर स्लीपरच्या डब्यात थेट आतपर्यंत घुसून बसण्याएवढे निर्ढावले नव्हते. आम्ही लोक दोन दरवाज्यांमधल्या जागेत अंग चोरून उभे होतो. रखडत रखडत गाडी कल्याणला आली. त्या स्टेशनावर प्रवाशांचा मोठा लोंढा डब्यात घुसायच्या तयारीत असलेला पाहून आमच्या सहप्रवाशांनीच आम्हाला आतल्या बाजूला ढकलले.

तिथे बसलेल्या प्रवाशांना बाहेरची परिस्थिती दिसत होतीच. त्यातल्या एका सुस्वभावी तरुण जोडप्याने थोडे सरकून आपल्या बाकावर आमच्या मुलांना बसवून घेतले. त्या दोघांनाही आम्ही दूरदर्शनवर पाहिले होते. अलकाने त्यांना लगेच ओळखले, पण उपचार म्हणून “तुम्ही शिवानंदच ना?” असे विचारले. पं.शिवानंद पाटील आणि योजना शिवानंद यांची आणि आमची पहिली ओळख अशी ध्यानीमनी नसतांना निव्वळ योगायोगाने झाली. त्या दिवशी पावसामुळे रेल्वेमार्गात अनेक अडथळे आले होते, अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या, आमची गाडीसुध्दा अत्यंत कूर्मगतीने हळूहळू सरकत रात्री पुण्याला जाऊन पोचली. शिवानंद आणि योजना यांना बंगळूरूपर्यंत जायचे होते. पुण्यापर्यंत आम्हाला एकमेकांचा सहवास मिळाला आणि वेळ काढण्यासाठी आम्ही अधून मधून बोलत राहिलो.

पं.बसवराज राजगुरू, स्व. गंगूबाई हंगल, स्व.जितेंद्र अभिषेकी, पं.काणेबुवा, पं.यशवंतबुवा जोशी यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांकडे शिवानंदांनी संगीताचे शिक्षण घेतले होते. आम्ही त्या महान संगीतज्ञांना प्रत्यक्ष किंवा टीव्हीवर पाहिले होते, त्यांचे गायन ऐकले होते आणि त्यांच्याबद्दल भरपूर वाचले किंवा ऐकले असल्यामुळे त्यांची नावे सुपरिचित होती. त्यांच्या विषयी शिवानंद आणि योजना जे काही सांगतील त्याचा संदर्भ आम्हाला लागत होता आणि संवाद सुरू ठेवण्यासाठी आम्हीही त्यांच्याबद्दल एकादा शब्द बोलू शकत होतो. अलकाने ज्या गुरूंकडून मार्गदर्शन घेतले होते ते फारसे प्रसिध्द नसले तरी संगीताच्या क्षेत्रातले लोक त्यांना ओळखत असावेत. त्यांना आपण ओळखत असल्याचे शिवानंद सांगत होते. कदाचित ते खरोखरच ओळखत असतीलही किंवा कदाचित आम्हाला बरे वाटावे म्हणून ते तसे सांगत असतील. याबद्दल जास्त खोलात जाण्याची आम्हाला गरज नव्हती.

शिवानंदांच्या बोलण्यात कानडी हेल येत असल्याचे माझ्या लगेच लक्षात आले होते. त्यामुळे मी तसाच हेल काढून कानडीमध्येच त्यांचे गाव विचारले. ते माझ्या गावाच्या शेजारच्याच तालुक्यातले निघाले. म्हणजे आम्हा दोघांचे बालपण एकाच प्रदेशात आणि एकाच प्रकारच्या संस्कृतीमध्ये गेले होते. आता आम्हाला बोलायला आणखी बरेच विषय मिळाले. मात्र शिवानंदांचा जन्म होण्यापूर्वीच मी तो भाग सोडून मुंबईला आलो होतो आणि माझ्या लहानपणी मला शास्त्रीय संगीताचा गंधसुध्दा नव्हता. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात मला माहीत नसलेले काही वेगळे आले की आमच्या काळातली गोष्ट जरा वेगळी होती असे म्हणायला मी मोकळा होतो. आम्हाला कानडीत बोलतांना पाहून आमच्या अर्धांगिनींना आधी थोडे कौतुक वाटले असेल, पण त्यांना काही शंका येऊ नयेत म्हणून आम्ही आपापल्या स्टाईलच्या मराठीवर येऊन सर्वांना समजतील अशा विषयांवर बोलू लागलो. त्या अर्ध्या दिवसात आमचे धागे चांगले जुळले आणि मुंबईला परत आल्यावर एकमेकाना संपर्क करायचा असे ठरवूनच आम्ही त्यांचा निरोप घेतला.

आम्हाला मनातून पुन्हा त्यांच्याशी बोलण्याची इच्छा होतीच. पण लवकरच त्यासाठी एक कारण मिळाले. आमच्या अणुशक्तीनगरच्या वसाहतीमध्ये स्वरमंडल नावाची एक सांस्कृतिक संस्था स्थापन करण्यात आमचाही खारीचा वाटा होता. त्याच्या तत्कालीन कार्यकारी मंडळावर असलेल्या मंडळींशी माझी चांगली मैत्री होती. त्यांनी कर्नाटकातल्या एका सुप्रसिध्द गवयाच्या गायनाचा कार्यक्रम ठरवला होता, पण काही अडचणींमुळे तो येणार नसल्याचे फक्त दोन तीन दिवस आधी समजले. कार्यक्रम करण्याच्या दृष्टीने बरीचशी तयारी झालेली असल्यामुळे तो रद्द करणे ही संस्थेच्या दृष्टीने नामुष्कीची आणि आर्थिक दृष्ट्या अडचणीची गोष्ट होती. आयत्या वेळी काय करावे या विचारात ती मंडळी आहेत हे समजल्यावर आम्ही पुढाकार घेतला आणि त्या दिवशी पं.शिवानंदांना वेळ आहे का याची विचारणा केली. त्यांना वेळ आहे हे समजल्यावर तडकाफडकी संयोजकांना सांगितले आणि स्वरमंडळात त्यांचा कार्यक्रम ठरूनही गेला. ते जोडपे त्यांच्या साथीदारांसह आधी आमच्या घरी आले आणि ताजेतवाने झाल्यानंतर त्यांना सभागृहाकडे नेण्याची व्यवस्था केली गेली. या भेटीत आमचा परिचय जास्तच दृढ झाला. त्या दिवशी झालेल्या कार्यक्रमात शिवानंद अप्रतिम गायले आणि दुस-या कोणा बड्या गवयाचा कार्यक्रम आधी ठरला होता हे बहुतेक लोकांना कळलेसुध्दा नाही. ज्यांना ही गोष्ट माहीत होती त्यांनाही त्याबद्दल जरासुध्दा रुखरुख वाटायला जागाच उरली नाही. स्वरमंडळातर्फे आजवर जेवढे कार्यक्रम केले गेले आहेत त्यातल्या सर्वोत्कृष्ट परपॉर्मन्सेसमध्ये या मैफिलीची गणना होईल.

यानंतर आमचा परिचय वाढत गेला. शिवानंदांचे गायन कोठेही असो किंवा योजना प्रतिष्ठानचा कोणताही कार्यक्रम असो, त्याचे आग्रहाचे निमंत्रण आम्हाला मिळत असे आणि स्थलकालाच्या मर्यादेत त्यातल्या जितक्या कार्यक्रमाला जाणे आम्हाला शक्य असेल त्या सर्व ठिकाणी आम्ही आवर्जून जातही असू. कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी किंवा संपल्यानंतर बॅकस्टेजवर जाऊन त्यांना भेटत असू. त्यांचा चहा, फराळ आणि गप्पागोष्टींमध्ये आम्ही सहभागसुध्दा घेतला. संगीताच्या तसेच इतर क्षेत्रांमधील कित्येक मोठ्या लोकांची यामुळे प्रत्यक्ष भेट घडली, त्यांचेशी हस्तांदोलन किंवा त्याना चरणस्पर्श करण्याची संधी आम्हाला मिळाली.

अमक्या रागामध्ये नसलेले कोमल गंधारचे स्वर आले किंवा असलेला तीव्र धैवत जरा कमी लागत होता अशा प्रकारचे बारकावे मला अजीबात समजत नसले तरी एकंदरीत ते गायन उत्तम, मध्यम की सुमार होते याचा थोडा अंदाज आता अनुभवावरून येतो. शिवानंदांचे जेवढे गायन मी ऐकले ते सारे उत्तम याच सदरात होते. त्यातही एकादे दिवशी मैफल चांगली रंगल्याने सर्व श्रोते मंत्रमुग्ध होऊन गेले आणि दुस-या एकाद्या दिवशी ती तेवढी रंगली नाही असे होणारच. पण मला तरी त्या दिवशी सुध्दा त्यांच्या गायनाचा दर्जा उत्तमच वाटला. शिवानंदांना त्यांच्या आईवडिलांकडून संगीताचे बाळकडू मिळाले होते. उपजत गोड गळ्यावर लहानपणापासून शास्त्रीय संगीताचे संस्कार झाले, त्यांना चांगले गुरू लाभले आणि त्यांनी स्वतः भरपूर मेहनत घेऊन गुरूंनी शिकवलेले गायन आपल्यात मुरवले होते. गायनासाठी श्रोत्यांपुढे जाण्यापूर्वी ते तिथे असलेल्या वडीलधारी लोकांचे आशीर्वाद घेत, त्यांच्या आराध्यदैवताचे स्मरण करून प्रार्थना करत असत. या सगळ्यांचा फायदा होतो अशी त्यांची श्रध्दा होती, किंवा त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढत असावा. शिवाय कलाकाराच्या मनातला प्रामाणिकपणा, चांगुलपणा, निष्ठा वगैरेंचे प्रतिबिंब त्याच्या कलाविष्कारात पडते असे म्हणतात. शिवानंदांच्या गायनात मला हे गुण कुठेतरी डोकावत आहेत असा भास होत असे.

———————————————————————-

तेथे कर माझे जुळती – ७ (उत्तरार्ध) – पं.शिवानंद पाटील

४७९ शिवानंद २

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातले कलाकार आपले उस्ताद, गुरू किंवा एकाद्या बुजुर्ग व्यक्तीच्या नावाचा उच्चार करतांना एका हाताने आपला एक कान पकडतात. त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करणे हा या परंपरागत प्रथेमागील उद्देश असतो. “माझ्या गाण्यात जेवढे चांगले दिसेल ते सारे माझ्या गुरूने मला शिकवले आहे आणि चुकीचे किंवा खराब असे सगळे माझे स्वतःचे आहे.” असे बरेचसे कलाकार मंचावरून म्हणतात, पण त्यांच्या एरवीच्या बोलण्यातल्या आत्मप्रौढीवरून असल्या बोलण्यात त्यांचा मानभावीपणा दिसून येतो. शिवानंद पाटील मात्र जेवढ्या उत्कट भावनेने त्यांच्या गुरूंबद्दल स्टेजवरून बोलत असत, तेवढाच आदरभाव त्यांच्या खाजगीतल्या बोलण्यातसुध्दा प्रकट होत असे.

त्यांचे पूर्वीचे गुरू इचलकरंजीचे पं. दत्तात्रेय विष्णू काणे (काणेबुवा) यांच्या वयाची ७५ वर्षे झाल्याचा महोत्सव त्यानिमित्य एक मोठा संगीताचा कार्यक्रम आयोजित करून शिवानंदांनी दादरला घडवून आणला. सांगली कोल्हापूरकडे रहात असलेल्या काणेबुवांच्या शिष्यपरिवाराचा मेळावा त्या ठिकाणी भरवला आणि त्यांचे गायन मुंबईकरांना ऐकवले. पं.काणेबुवांबद्दल आपल्या मनातला आदर शिवानंदांनी या शब्दात सांगितला, “अधिकार माझा काही न पाहता पायी ठेवले । पायी ठेविले गुरूने मज धन्य केले ।।”

पं.डॉ.बसवराज राजगुरू यांचा स्मृतीदिन शिवानंद आणि योजना पाटील १९९२-९३ पासून दरवर्षी साजरा करत आले आहेत. त्या निमित्याने दरवर्षी कर्नाटकातील एकाद्या मोठ्या गायक कलाकाराच्या गायनाचा कार्यक्रम ठेवला जात आला आहे. शिवानंद स्वतःसुध्दा आपल्या गुरूला तन्मयतेने आदरांजली वाहत. तनमनधन समर्पण करण्याचा भाव त्यात दिसून येत असे. स्व.गंगूबाई हनगल यांच्या वयाचा विचार करून त्यांना प्रवासाची दगदग होऊ नये या विचाराने एकदा हा कार्यक्रम बेळगावात ठेवला गेला. आपली कन्या कृष्णाबाई यांच्याबरोबर गंगूबाई त्या समारंभाला आल्या आणि गायल्यादेखील. जवळच्या नातेवाइकाच्या आगमनाने जो आनंद वाटेल तसा आनंद आणि आपुलकी या लोकांच्या भेटण्यामध्ये मला दिसली. बाहेरगावाहून बेळगावला गेलेल्या प्रत्येकाची ते स्वतः खूप आपुलकीने विचारपूस करत होते आणि त्यांची कसलीही गैरसोय होणार नाही याची खातरजमा करून घेत होते.

शिवानंदांची आणि माझी ओळख झाली त्या वेळी ते रेल्वेमध्ये नोकरी करत होते. नोकरी सांभाळून संगीताची सेवा करीत त्यांनी त्या क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले होते. संगीतासाठी जास्त वेळ मिळावा म्हणून पुढे त्यांनी नोकरी सोडली आणि पूर्णवेळ संगीताला वाहून घेतले. त्या क्षेत्रात त्यांची प्रगती होत गेली. संगीताच्या क्षेत्रात सर्वाधिक मानाचे स्थान लाभलेल्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवासह इतरही अनेक मोठ्या संमेलनांमध्ये त्यांचे गायन झाले. संगीत रंगभूमीवरही त्यांनी काही नाटकातून भूमिका केल्या. शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीत या दोन्ही क्षेत्रांमधील बक्षिसे आणि मानसन्मान त्यांना मिळाले. त्यांच्या गायनाच्या कॅसेट्स, सीडी निघाल्या. पं.दीनानाथ मंगेशकरांच्या नावाने दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार त्यांना मिळाला.

हे सगळे असले तरी त्यांना जेवढे अपेक्षित होते किंवा खरोखरच जसे व्हायला हवे होते तेवढे त्यांचे कार्यक्रम प्रत्यक्षात होत नव्हते. महागाईबरोबर वाढत जाणारे सर्वच खर्च आणि पैसे खर्च करून शास्त्रीय संगीत ऐकायला येणा-या श्रोत्यांमध्ये होत असलेली घट यांचे गणित जुळत नव्हते. कमी मानधन घेणे परवडत नाही आणि जास्त उत्पन्न देणारे कार्यक्रम होतच नाहीत असे होऊ लागले. संगीताच्या शिकवण्या करून त्यातून कमाई करायचा त्यांनी प्रयत्न केला, पण कलाकार आणि शिक्षक या दोन गोष्टींसाठी वेगळे गुण लागतात. उत्कृष्ट कलाकार आपली कला तितक्याच चांगल्या शिष्यालाच शिकवू शकतो, सामान्य दर्जाच्या विद्यार्थ्याकडून त्याच त्या प्राथमिक स्वरूपाच्या गोष्टी घटवून घेणे त्याला आवडत नाही. त्याच प्रमाणे उत्कृष्ट शिक्षकाला स्वतः मैफिल गाजवता येतेच असे नाही, त्यासाठी मुळातच प्रतिभेचे देणे असावे लागते. काही अद्वितीय कलाकारांमध्ये दोन्ही प्रकारचे कौशल्य असते, त्यांचा मोठा शिष्यपरिवार तयार होते. शिवानंदांच्या बाबतीत ते झाले नाही. कदाचित त्यांना होतकरू आणि कष्टाळू असा शिष्य लाभला नसावा. हेसुध्दा एक प्रकारचे नशीबच असते.

मराठी रंगभूमीवर एका काळी संगीत नाटकांनी राज्य गाजवले असले तरी आता त्याचे दिवस राहिले नाहीत. काही चांगल्या नाटकात शिवानंदांनी भूमिका केल्या, पण त्याचे जास्त प्रयोग झाले नाहीत. पं.जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबध्द करून अजरामर केलेली बहुतेक नाट्यगीते मी मूळच्या नाट्यकलावंतांकडून ऐकली आहेत, त्यातील काही गीते अभिषेकीबुवांच्या तोंडूनसुध्दा ऐकली आहेत. त्यातली काही गाणी, विशेषतः कट्यार काळजात घुसली या नाटकातील गाणी शिवानंद गात असे तेंव्हा पुनःप्रत्ययाचा आनंद मिळत असे. काही वर्षांपूर्वी साक्षात लता मंगेशकर आणि पं.हृदयनाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली शतजन्म शोधतांना हे नवे संगीत नाटक रंगभूमीवर आले होते. शिवानंदांनी त्यात प्रमुख भूमिका केली होती. ते नाटक चांगले असूनसुध्दा दुर्दैवाने व्यावसायिक दृष्ट्या अयशस्वी ठरले.

संगीतक्षेत्रातील कलाकारांमध्ये अनुकरणक्षमता आणि नवनिर्मितीक्षमता असे दोन निरनिराळे गुण आढळतात. शिवानंदांकडे दोन्ही होते, पण पहिला जरा जास्त प्रभावी असावा. गुरूंकडून शिकलेली गीते आणि बंदिशी ते स्वतःच्या गानकौशल्याने बहारदार फुलवून त्याना खूप उंच पातळीवर नेत असत. अनेक अभंगांना त्यांनी स्वतः चाली लावल्या. दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्य ते अभंगवाणी किंवा भक्तीगीतांचा कार्यक्रम सादर करत असत. त्या वेळी ऐकतांना त्यांनी लावलेल्या चालीसुध्दा गोड वाटत असत. पण अजित कडकडे किंवा सुरेश वाडकर यांच्या गाण्याच्या ध्वनिमुद्रिका जशा घरोघरी दिसतात तशा शिवानंदांच्या दिसत नाहीत.

अपेक्षेप्रमाणे यश मिळत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली नसली तरी त्यांच्या संवेदनशील मनाला ती लागली असणार. दोन वर्षांपूर्वी गंगूबाई हंगल निवर्तल्या त्या वेळी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी शिवानंद हुबळीला गेले असतांना त्यांना एक अपघात झाला आणि त्यात अंतर्गत इजा झाल्या. कदाचित त्या वेळी त्यांचे गंभीर स्वरूप लक्षात आले नसावे, पण कालांतराने त्यापासून त्रास होऊ लागला. तो जास्त वाढला की त्यावर उपचार आणि विश्रांती घ्यायची आणि कमी झाला की पुन्हा जोमाने कामाला लागायचे असे चालले होते. गेल्या वर्षी बसवराज राजगुरू स्मृतीदिन त्यांनी पुण्याला साजरा केला त्यावेळी त्यात गायनसुध्दा केले. त्या कार्यक्रमाला आम्ही हजर होतो, पण त्यांना झालेल्या अपघाताची आणि त्यातून उद्भवलेल्या आजाराची आम्हाला त्यावेळी माहितीसुध्दा मिळाली नव्हती. पण वर्षअखेर तो आजार बळावला आणि पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांना ठेवले होते. तिथून ते बरे होऊन परत आले असे ऐकले होते.
एप्रिलमध्ये चेंबूरला होणार असलेल्या अल्लादियाखाँ संगीत महोत्सवात यावर्षी त्यांचे गायनसुध्दा ठेवले होते. पण २१ तारखेला झालेल्या उद्घाटनाच्या दिवशीच ते रहीत झाल्याचे समजले. त्याबद्दल जास्त तपशील कळण्याच्या आधीच त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतल्याची दुःखद बातमी येऊन थडकली. ते मरोळला रहायला गेल्यापासून नेहमी आम्हाला त्यांच्या नव्या घरी येऊन जाण्याचे आमंत्रण देत होते आणि आम्हीसुध्दा जरूर येऊ असे म्हणत आलो होतो, पण ते काही जमले नाही आणि प्रत्यक्षात गेलो तेंव्हा साश्रु नयनांनी त्यांच्या तसबिरीपुढे हात जोडावे लागले. कालाय तस्मै नमः.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: