तेथे कर माझे जुळती – ८ – श्री.यशवंत देव

तेथे कर माझे जुळती – ८ – श्री.यशवंत देव (पूर्वार्ध)

YashavantDeo
प्रत्येक लोकप्रिय गाण्यामागे गीतकार, संगीतकार आणि गायक वगैरे अनेक मंडळी असतात हे आता सर्वांना माहीत असते, पण माझ्या लहानपणी आमच्या लहानशा गावात यांची विशेष चर्चा होत नसे. सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर किंवा गायक सुधीर फडके यांनी अमके तमके गाणे गायिले आहे इतपत त्या गाण्यासंबंधीची थोडीशी माहिती केंव्हा केंव्हा मिळायची, काही गाणी शाळेच्या पाठ्यपुस्तकात कविता म्हणून समोर येत असत, त्यांच्या कवींची नावे पाठ करावी लागत, पण गाण्यांना फक्त चाली लावण्याचे सत्कार्य करणारा कोणी वेगळा महान संगीतकार असतो हे मात्र त्या काळात कोणाकडून ऐकले नव्हते. या गोष्टीला काही महत्व असते हेच मुळात मला ठाऊक नव्हते. अशा त्या अज्ञानी बाळपणाच्या काळापासून मी महान कवी, गायक आणि संगीतकार श्री.यशवंत देव यांची कित्येक गाणी आवडीने ऐकत आलो होतो, फक्त ते मला माहीत नव्हते. त्यातली काही गाणी पुन्हापुन्हा गुणगुणून मला तोंडपाठही झाली होती. कॉलेजच्या शिक्षणासाठी शहरात आल्यानंतर गायक, गीतकार आणि संगीतकार काय काय वेगळे करतात ते जरा समजायला लागले. माझे काही मित्र या तीन्ही क्षेत्रातल्या विशिष्ट मोठ्या व्यक्तींचे चाहते असल्यामुळे त्यातला कोण श्रेष्ठ यावर नेहमी त्यांच्यात वाद चालत आणि त्यातून माझ्यासारख्या अज्ञानी मुलांना तत्वबोध मिळत असे.

गीतामधील भाव श्रोत्यांपर्यंत पोचवण्यासाठी संगीतकाराला काव्याची सखोल जाण असावी लागते आणि आपल्या काव्याचे गाणे होण्यासाठी त्यात नादमधुर आणि तालबद्ध शब्दरचना करण्यासाठी कवीला संगीताचे थोडे ज्ञान असणे चांगले असते. गायकाला तर गीतकाराच्या काव्यरचनेतले भाव संगीतकाराने केलेल्या स्वररचनेतून श्रोत्यापर्यंत पोचवायचे असल्यामुळे साहित्य आणि संगीत यांची चांगली जाण असावी लागते. पण कोणत्याही विषयाची उत्तम समज असणे एवढे नवनिर्मितीसाठी पुरेसे नसते. त्यासाठी मुळात प्रतिभा आणि त्यावर घेतलेले परिश्रम, व्यासंग, अभ्यास वगैरेंची साथ असावी लागते. काव्यरचना, संगीतरचना आणि गायन या गोष्टी एकमेकींना पूरक आणि काहीशा परस्परावलंबी असल्या तरी त्या तीन्ही क्षेत्रांमध्ये मोठा नावलौकिक मिळवणा-यांची संख्या फार कमी आहे आणि अशा लोकांमध्ये श्री.यशवंत देव अग्रगण्य असावेत.

ते आकाशवाणीवर काम करत असल्यामुळे त्यांचे नाव रेडिओवर नेहमी कानावर पडत होतेच, दूरदर्शन आल्यानंतर त्यांची सात्विक, सोज्ज्वळ आणि प्रसन्न मूर्ती टीव्हीच्या स्क्रीनवर दिसायला लागली. त्यांचे भावस्पर्शी पण मुद्देसूद बोलणे, आपले विचार समजावून सांगण्याची हातोटी, प्रामाणिकपणाच्या जोडीला बराचसा मिश्किलपणा वगैरेंमुळे त्यांना पहात आणि ऐकत रहावे असे वाटत असे. गायन, चर्चा, मुलाखत अशा कोणत्याही मिषाने ते कार्यक्रमात येणार असले तर मी तो कार्यक्रम आवर्जून पहात असे. तंत्रज्ञान हे माझे कार्यक्षेत्र सर्वस्वी वेगळे असल्यामुळे कामाच्या निमित्याने त्यांची भेट घडण्याची मुळीच शक्यता नव्हती, पण माझ्या मनात त्याची तीव्र इच्छा मात्र होत होती. “इच्छा असेल तर मार्ग सापडतो” असे म्हणतात. या बाबतीत तो आपण होऊन माझ्यासमोर आला.

सुमारे वीस एक वर्षांपूर्वी योजना प्रतिष्ठानतर्फे श्री.यशवंत देव यांच्या मार्गदर्शनाखाली एक सुगम संगीताची कार्यशाळा झाली होती. त्यात अलकाला म्हणजे माझ्या पत्नीला प्रवेश मिळाला. या कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी करून ‘बोल संतांचे’ नावाचा एक छान जाहीर कार्यक्रम सादर केला गेला. कर्नाटक संघाच्या हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाची रंगीत तालीम दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये ठेवली होती. ती पहाण्यासाठी कोणाला आमंत्रण नव्हतेच, पण त्यात भाग घेणा-यांना घरी परत जाण्यासाठी सोबत करायच्या निमित्याने माझ्यासारखे मोजके आगांतुक उपटसुंभ पाहुणे आले होते. रंगीत तालीम सुरू होताच सर्व गायक, गायिका, वादक वगैरे मंडळी स्टेजवर गेली आणि संयोजक मंडळी त्याच्या आसपास राहिली. कार्यक्रम पाहण्यासाठी श्री.यशवंत देव समोरच्या खुर्चीवर विराजमान झाले. कदाचित मी इतर लोकांमध्ये वयाने सर्वात मोठा असल्याने मला त्यांच्या शेजारी जागा दिली गेली. ओळख, नमस्कार वगैरे औपचारिक भाग झाल्यानंतर काय बोलावे, कुठून सुरुवात करावी याचा मला प्रश्न पडला होता, तेवढ्यात कार्यक्रमच सुरू झाला.

त्यांनी बसवलेल्या सांगीतिक कार्यक्रमावर कोणत्याही प्रकारचा शेरा मारण्याची माझी पात्रता नव्हतीच, प्राज्ञाही नव्हती. शिवाय मला खरोखर तो इतका चांगला वाटत होता की त्यात कोणती उणीव दिसतच नव्हती. ‘छान’, ‘मस्त’, ‘वा! वा!’ वगैरे उद्गार काढण्यापलीकडे काही करणे मला शक्यच नव्हते. देव सर मात्र प्रत्येक स्वर कान टवकारून ऐकत होते आणि प्रत्येक हालचाल लक्षपूर्वक पहात होते. त्यातल्या सूक्ष्म बारकाव्यांबद्दल नेमक्या सूचना देत होते. वीस बावीस नवशिके गायक आणि पाच सात नवखे वादक यांच्या व्यक्तीमत्वातले किंवा कौशल्यातले सारे कंगोरे एवढ्या कमी अवधीमध्ये घासून पूर्णपणे काढून टाकणे शक्य नव्हतेच, पण काही वेळा देव सरांना ते टोचत होते. या अत्यंत ‘रॉ’ अशा प्रकारच्या ‘मटीरियल’पासून अप्रतिम सांगीतिक शिल्पकृती बनवण्याचे कार्य त्यांनी साकार केले होतेच, त्याला जास्तीत जास्त पॉलिश करण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला दिसत होता. त्यात ते जराही कसूर करत नव्हते. लता मंगेशकर, आशा भोसले, अरुण दाते यांच्यासारख्या कसलेल्या गायकांकडून गाणी म्हणवून घेणारे यशवंत देव या नवख्या, होतकरू आणि हौशी गायकांसाठी एवढी मेहनत घेत असलेले पाहून मला काय वाटले ते शब्दात सांगता येणार नाही.

‘बोल संतांचे’ या कार्यक्रमात अनेक संतांचे अभंग आणि पदे यांना नव्या चाली लावून ती गाणी सादर केली होती. समोर बसलेल्या एक किंवा दोन मुख्य गायक गायिकेने त्यातल्या सर्व ओळी गायच्या आणि बाकीच्या सर्वांनी त्यातील ध्रुपद आणि काही ओळी कोरसमध्ये गायच्या असे ठरवले होते. जास्तीत जास्त नव्या कलाकारांना व्यासपीठावर गाण्याची संधी मिळावी या हेतूने बहुतेक प्रत्येक गाण्यासाठी वेगवेगळे लीड आर्टिस्ट निवडले होते. त्या काळात चांगल्या प्रतीचे कॉर्डलेस माईक मिळत नसावेत. त्यामुळे बोजड स्टँडसकट सात आठ माइक आणले होते आणि त्यातले काही पुढच्या बाजूला आणि काही मागच्या बाजूला पसरून ठेवले होते. एक गाणे संपल्यानंतर पुढच्या गाण्यासाठी एकादा गायक मागून पुढे यायचा आणि आधीचा गायक मागे जाऊन बसायचा. दोन गाण्यामधील वेळात निवेदकाचे बोलणे चालत असतांना हा बदल केला जात होता. हे सुलभ रीतीने व्हावे यासाठी प्रत्येकाच्या जागा ठरवून दिल्या होत्या. एक गायक जागा बदलत असतांना माइकच्या वायरशी किंचित अडखळला ही गोष्ट देवांच्या नजरेने टिपली आणि हे असे का झाले याची त्यांनी चौकशी केली. रिहर्सलला थोडा गोंधळ झाला तरी मुख्य कार्यक्रमात तो होणार नाही असे भोंगळ उत्तर त्यांना मान्य नव्हते. कोणते माइक नेमके कोठे ठेवले जातील आणि त्यांच्या वायरी कशा जोडल्या जातील हे सर्व जातीने पाहून कोणतीही वायर कोणाच्याही पायात येणार नाही याची जबाबदारी एकाने घेतल्यावर त्यांचे समाधान झाले. इतकी पक्की तयारी करून घेतल्यानंतर कर्नाटक संघातला मुख्य कार्यक्रम नुसता निर्विघ्नपणे पार पडला नाही तर तो अप्रतिम झाला हे सांगायची गरजच नाही. प्रत्येक गाण्याला टाळ्यांचा कडकडाट करून श्रोत्यांनी सभागृह डोक्यावर घेतले. यातली सर्व कलाकार मंडळी ही हौशी आणि शिकाऊ आहेत असे मुळी वाटतच नव्हते. इतके ते सफाईदार झाले. श्री.यशवंत देवांचे कुशल मार्गदर्शन आणि योजनाताईंचे योजनाबद्ध संयोजन यांनी ही किमया घडवून आणली होती.

. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .. . . . . .. . . .

तेथे कर माझे जुळती – ८ – श्री.यशवंत देव (उत्तरार्ध)

yashavantDev2

वाद्यसंगीत किंवा शास्त्रीय संगीतातला तराणा यांना भाषा नसते. ख्यालगायनामध्ये असलेली तीन चार ओळींची बंदिश तासभर घोळवूनसुद्धा अनेक वेळा तिच्यातले सगळे शब्द कळत नाहीत. सुगम संगीतात मात्र संगीताबरोबर त्यातील काव्याला खूप महत्व असते. शास्त्रीय संगीताच्या मैफलीतले गवय्ये काही वेळा असे गातात की त्या गाण्यातल्या मनाला स्पर्श करणा-या भावनांपेक्षा त्यांचा मालकंस किंवा मारवाच मनाला जास्त भिडतो. श्री.यशवंत देव यांच्या गाण्यामध्ये मात्र नेहमीच शब्दांना पहिला मान मिळतो. ‘शब्दप्रधान गायकी’ या विषयावर त्यांनी पुस्तकही लिहिले आहे आणि या विषयावर ते प्रात्यक्षिकांसह जाहीर व्याख्याने देत असत. कोणत्याही गाण्यातले शब्द महत्वाचे असतातच, पण फक्त योग्य शब्दरचना करून भागत नाही. त्याच्या उच्चारातील फरकामुळे गाण्यातच नव्हे तर बोलण्यातसुद्धा किती फरक पडतो हे ते अत्यंत मनोरंजक उदाहरणे देऊन दाखवत. त्यातले एक माझ्या अजून लक्षात राहिले आहे. एका वाक्यातले शब्द असे आहेत
हा रामा काल सकाळी का आला नाही?
वेगवेगळ्या शब्दांवर जोर देण्याने त्याचा अर्थ कसा बदलतो पहाः
हा रामा काल सकाळी का आला नाही? … आलेला रामा वेगळा होता
हा रामा काल सकाळी का आला नाही? ….. गोविंदा कशाला आला?
हा रामा काल सकाळी का आला नाही? … आज उगवतो आहे किंवा परवाच येऊन गेला
हा रामा काल सकाळी का आला नाही? …… सायंकाळी किंवा रात्री आला
हा रामा काल सकाळी का आला नाही? …. न येण्याचे कारण काय?

संगीतातले एक मजेदार उदाहरण पहाः तीन वेगवेगळ्या गवयांना चार शब्द दिले होते. रोको मत जाने दो. त्यांनी ते असे गाऊन दाखवले
रोओओओको रोओओओओको रोको, मत जाने दो ……. अरे त्याला थांबवा
रोको मअतअ, रोको मअअअतअ, रोको मअतअ, जाने दो … त्याला जाऊ द्या ना
रोओओओओकोओओ, मअअअतअ, जाआआनेएए, दोओओ … काही ही करा

त्यांनी केलेल्या अनेक स्वररचनांमागे त्यानी केलेला विचार व्याख्यानात मांडून त्यातील चालीत किंवा उच्चारात बदल केल्यास त्या गाण्याचा अर्थ किंवा त्यामधील भावांच्या छटा कशा बदलतात हे सविस्तर सांगतांना ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करायचे. एकाद्या गीताच्या जन्मापासून ते रेकॉर्ड होऊन श्रोत्यांपर्यंत पोचेपर्यंत त्याचा प्रवास कसा होतो याचे मनोरंजक किस्से सांगायचे. हा कार्यक्रम मी टीव्हीवरही पाहिला आणि प्रत्यक्ष समोर बसूनही त्याची मजा घेतली. मला अतीशय आवडलेल्या कार्यक्रमांत तो येतो.

यशवंत देवांनी सुंदर कविता किंवा गीते तर लिहिली आहेतच, अत्यंत मजेदार विडंबने केली आहेत. पत्नीची मुजोरी या नावाने त्यांचा संग्रह प्रसिद्ध आहे. याबद्दल बोलतांना त्यांनी एकदा सांगितले की ते जेंव्हा गायनाच्या कार्यक्रमांना जात असत तेंव्हा श्रोतेगण त्यांना ज्या फर्माइशी करत त्यातली काही गाणी त्यांची नसायची. त्या गाण्यांचे शब्द, सुरुवातीचे आणि अंत-यांमधले वाद्यसंगीताचे तुकडे, त्यातल्या आलाप, ताना, लकेरी यासारख्या सुरेख खास जागा वगैरे सर्व तपशीलासकट ती गाणी तयार असायची नाहीत आणि ते नसेल तर त्यात मजा येणार नाही. शिवाय त्यांची स्वतःची इतकी सुरेल गाणी असतांना त्यांनी इतरांची गाणी काय म्हणून तयार करून ठेवायची ? पण श्रोत्यांना एकदम नाही म्हणून नाराज करण्यापेक्षा त्यांच्या पदरात काही तरी तत्सम टाकावे म्हणून त्यांनी तत्कालीन लोकप्रिय गाण्यांच्या चालीवर स्वतः गाणी लिहिली आणि ती गायला सुरुवात केली. ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ या चित्रपटातले ‘देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघड दार देवा आता उघड दार देवा।’ हे गाणे एके काळी तुफान लोकप्रिय होते. त्याच्या चालीवर देवांनी गाणे रचले, ‘पत्नीची मुजोरी, घडे नित्य सेवा, मरण धाड देवा आता मरण धाड देवा।’ म्हणजे तिजोरीच्या दाराऐवजी स्वर्गाचे दार उघड! गंमत म्हणजे हे गाणे चालले असतांना त्यांच्या सौभाग्यवती करुणाताई बाजूलाच किंवा समोर बसलेल्या असायच्या आणि खिलाडूपणे त्याचा आनंद घ्यायच्या.

आम्ही त्यांच्या निरनिराळ्या कार्यक्रमांना अनेक वेळा उपस्थिती लावली. शक्य तोवर तो चुकवला नाही. ‘असे गीत जन्मा येते’, ‘शब्दप्रधान गायकी’ अशासारख्या कार्यक्रमांमध्ये ते जे सोदाहरण गंमतशीर निवेदन करत असत आणि त्यातले सूक्ष्म बारकावे हसत खेळत श्रोत्यांना समजावून सांगत असत त्यामुळे सुगम संगीताकडे पाहण्याची (किंवा ते ऐकण्याची आणि समजून घेण्याची) माझी क्षमता बरीच बदलली. मला पूर्वी माहीत नसलेल्या बारीक सारीक गोष्टींकडे मी लक्षपूर्वक पाहू लागलो. त्यांच्या आस्वादातून मला मिळणारा आनंद अनेकपटीने वाढला. बहुतेक वेळी यशवंत देवांचा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही स्टेजवर जाऊन त्यांना भेटून येत असू. अशी असंख्य माणसे त्यांना रोज भेटत असतील. पण ते जुनी ओळख असल्याप्रमाणे आपुलकी दाखवून नेहमी हसतमुखाने आमचा प्रणाम स्वीकारत असत आणि एकाद्या वाक्यातून ती ओळख पटवून देत असत. त्यामुळे आम्हाला धन्य वाटत असे.

त्यांना वयाची सत्तरी ओलांडली तेंव्हा एका मोठ्या सभागृहात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. पण त्यांचा दांडगा उत्साह आणि चपळपणा तरुणांना लाजवण्यासारखा होता. त्या कार्यक्रमाला कलाक्षेत्रातले सारे दिग्गज उपस्थित होते. मंगेश पाडगावकर, अरुण दाते, व.पु.काळे, पुरुषोत्तम दारव्हेकर ही नावे मला आठवतात, कदाचित अजूनही काही मोठे लोक असतील. यशवंत देवांना अभीष्टचिंतन करतांना त्या सर्वांनी एकमुखाने म्हंटले, ‘दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचुन झुलायचे।’ यावेळी बोलतांना दारव्हेकर मास्तरांनी एक जुना किस्सा ऐकवला. त्या काळात ते आणि यशवंत देव नागपूरला आकाशवाणीवर काम करत होते. एकदा संगीतकार जोग यांनी यशवंत देवांना अंतर्देशीय पत्रातून नव्या गाण्यासाठी स्वरलिपीतून काही ओळी लिहून पाठवल्या आणि त्यावर योग्य असे गाणे लिहायला सांगितले. त्या ‘दुरुन’ पोस्टाने आलेल्या चालीवर देवांनी गीत लिहून सादर केले, ‘स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी।’

यशवंत देवांच्या अशा खूप आठवणी स्मृतीच्या कप्प्यात साठवून ठेवल्या आहेत. हा लेख लिहिण्याच्या निमित्यांने त्यांना उजाळा मिळाला.

One Response

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: