स्मृती ठेवुनी जाती – ४ – विद्या

विद्या ही माझी मावस आतेबहीण, म्हणजे माझ्या वडिलांच्या मावसबहिणीची मुलगी. पूर्वीच्या काळात मोठी कुटुंबे असत. त्यामुळे माझ्या वडिलांना नेमकी किती आते, मामे, चुलत आणि मावस भावंडे (फर्स्ट कझिन्स) होती ते मला नक्की सांगता येणार नाही. माझ्या आधीच्या पिढीतले कोणीच आज उरले नसल्यामुळे ते कळणेही आता अशक्यप्राय आहे. त्या काळात वाहतुकीच्या फारशा सोयी नसल्यामुळे एकदा परगावी रहायला जाऊन दृष्टीआड स्थायिक झालेली आप्तमंडळी पुन्हा भेटणे दुर्लभच असायचे. पहिल्या पिढीमधले नातेसंबंध पुढील पिढीकडे नेऊन त्यांना सोपवणे त्या काळात तसे अवघडच होते. त्यामुळे माझे विद्याच्या इतकेच जवळचे नाते असलेली माझी इतर काही आतेचुलत किंवा चुलतमावस वगैरे भावंडे (सेकंड कझिन्स) मला जन्मात कधीही भेटली नसण्याची दाट शक्यता आहे आणि त्यांनाही माझ्या अस्तित्वाची माहिती असण्याचे कारण दिसत नाही. विद्याची आई म्हणजे आमच्या कै. सोनूआत्या पुण्याला रहात असत. कदाचित हे एक मध्यवर्ती शहर असल्यामुळे आमच्या घरातल्या कोणा ना कोणाचे या ना त्या कारणाने त्यांचेकडे नेहमी जाणे येणे होत असे. त्यांनाही खूप अगत्य असल्यामुळे त्या मात्र आम्हाला ब-याच जवळच्या वाटत होत्या आणि माझ्या जीवनातल्या एका लहानशा टप्प्यावर विद्या मला आपली एक जवळची बहीण वाटत होती.

माझे शालेय शिक्षण संपेपर्यंत मला काही पुण्याला जायची एकही संधी मिळाली नव्हती, पण सोनूआत्यांची एक बहीण जमखंडीलाच रहात असल्यामुळे तिला भेटण्यासाठी त्या कधी तरी तिच्याकडे एकादी चक्कर मारत असत आणि त्या वेळी त्या आमच्य़ाकडेही येऊन आम्हा सर्वांना भेटून अत्यंत आपुलकीने आमची चौकशी करून जात असत. त्यांच्यासोबत विद्याही जमखंडीला आली असली तर तीसुध्दा आमच्या घरी येत असे, पण क्वचित कधी तरी दिसणारी दूरच्या नात्यातली एक मुलगी यापलीकडे तिच्याबद्दल फार आपुलकी वाटायचे तेंव्हा काही कारण नव्हते. ती सारी मंडळी विजापूरला मे महिन्याच्या सुटीला अनेक वेळा अण्णाकाकांकडे म्हणजे विद्याच्या सख्ख्या मामाकडे येत असत. एकदा मीही त्याचवेळी विजापूरला गेलो असतांना आमचे चार दिवस एकत्र राहणे झाले आणि त्यातून आमच्या भावाबहिणीच्या नात्यात थोडी अधिक जवळीक निर्माण झाली.

माझ्याहून विद्या काही महिन्याने लहान असेल आणि शाळेत एकाद्या वर्षाने मागे असेल. म्हणजे ती वयाने साधारणपणे माझ्याएवढीच होती. आम्ही शाळेत शिकत असलेल्या गोष्टी, तसेच आमचे सामान्य ज्ञान, कुतूहल वगैरे एकाच पातळीवरचे होते. कोडी घालणे आणि कोड्यात बोलणे तिलाही खूप आवडत असे. कुठल्याही नव्या गोष्टीबद्दल वाटणारी उत्सुकता किंवा ती करायचा उत्साह हा आमच्यातला एक समान दुवा होता. विद्या सुरेख, तल्लख आणि चुणचुणीत मुलगी असल्याने घरात सर्वांची लाडकी होती. मामा मामी तिला प्रेमाने पिंटू किंवा पिंटी म्हणायचे, पण तो अधिकार त्यांनाच होता. मी मेधा पाटकरांना जेंव्हा पहिल्यांदा टीव्हीवर पाहिले तेंव्हा मला विद्याची आठवण झाली. ती सुध्दा अशीच आवेशाने बोलत असे. लहान सहान मुद्यांवर वाद विवाद करायला तिला आवडत असे. तसेच ती हजरजबाबी होती. कुठल्याही प्रश्नाला उत्तर आणि उत्तराला प्रत्युत्तर तिला लगेच सुचत असे.

इंजिनियरिंगच्या शिक्षणासाठी मी पुण्याला हॉस्टेलमध्ये रहात होतो त्या वेळी गावात माझे इतर कोणी जवळचे नातेवाईक नव्हते. साहजीकच सणावारी मी सोनूआत्यांकडे जात असेच. शिवाय एरवीसुध्दा कधी घरचे जेवण खाण्याची इच्छा अनावर झाली तर सरळ सदाशिव पेठेतल्या पेरूगेटजवळ असलेल्या त्यांच्या घरी जाऊन धडकत असे. त्या मंडळींनीही मला नेहमी अत्यंत आपुलकीची प्रेमळ वागणूक दिली. त्यामुळे मला परत हॉस्टेलवर जायची घाई नसे. विद्या, मंगलताई, सुरेश, बाळू वगैरे भावंडांबरोबर गप्पा मारण्यात वेळ कसा निघून जात असे ते समजत नसे. नाटक सिनेमांपासून ते राजकारण, समाजकारणापर्यंत अनेक विषयांमध्ये मला जेवढा रस होता तेवढाच त्यांनाही असल्यामुळे आम्हाला बोलायला विषयांची कमतरता नसे.

आमच्या कॉलेजजवळचा बोटक्लब हे आमच्या कॉलेजचे वैशिष्ट्य होते. हॉस्टेलमध्ये रहात असल्यामुळे मला एकाद्या संध्याकाळी बोटिंग करायला जाणे जमत असे. “तू नेहमी नुसत्या गप्पाच मारत असतोस. आम्हाला कधी नावेतून फिरायला नेणार आहेस?” असे विद्याने दोन तीन वेळा तरी विचारले असेल. त्यावर मला एकादे आश्वासन देऊन वेळ मारून न्यावी लागत असे. एक तर मी स्वतःच नाव चालवण्याच्या कौशल्यात फारशी प्रगती केलेली नव्हती. त्यामुळे झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवणे शहाणपणाचे होते. कदाचित हे विद्यानेही ओळखले असावे आणि डिवचण्यासाठी ती मला असे विचारत असेल. दुसरे म्हणजे त्या काळात इंजिनियरिंग कॉलेजात फारशा मुली शिकत नव्हत्या. अपवादास्पद एकादी मुलगी असलीच तरी ती मुलांपासून फटकूनच रहायची. त्यातली कोणी बोटक्लबकडे तर कधीच फिरकत नसे. अशा त्या वातावरणात पाहुणी म्हणून सख्ख्या बहिणीलासुध्दा नावेमधून फिरायला नेण्याची माझी हिंमत झाली नसती कारण तो लगेच चर्चेचा विषय़ झाला असता आणि त्या काळात मला ते नको होते.

माझे शिक्षण संपल्यानंतर मी पुणे सोडून नोकरीसाठी मुंबईला आलो. विद्यानेही टेलीफोनखात्यात नोकरी धरली, तिचे लग्न होऊन ती सासरी गेली, तिला चांगले स्थळ मिळाले, मुले झाली वगैरे तिच्यासंबंधीच्या बातम्या मला इतर नातेवाईकांकडून कळत होत्या. क्वचित कधी मी पुण्याला गेलेलो असतांना आमची अचानक गाठही पडायची, पण सविस्तर किंवा निरर्थक गप्पागोष्टी आणि वादविवाद करायला कोणालाच सवड उरली नव्हती. सात आठ वर्षांच्या कालावधीनंतर माझी पत्नी आणि मुलाला घेऊन मी विजापूरला गेलो होतो आणि योगायोगाने त्याच वेळी विद्यासुध्दा तिच्या मुलांना घेऊन तिथे आली होती. दोघांनाही खूप आनंद झाला आणि पुन्हा पूर्वीच्या काळातल्या आठवणी रंगल्या. त्यानंतर पुढल्या तीस पस्तीस वर्षांमध्ये कोणा कोणा समायिक नातेवाईकांकडे झालेल्या लग्नसमारंभातच आमची भेट होत गेली. समोर पहाताच मनातली दडून राहिलेली आपुलकी उफळून वर यायची, एकमेकांचे पत्ते आणि टेलीफोन नंबर लिहून घेणे, पुढच्या वेळी मी पुण्याला किंवा ती मुंबईला आल्यास नक्की भेटायचे असे ठरणे वगैरे व्हायचे आणि परतल्यानंतर इतर अनंत व्यापांमुळे ते विस्मरणात जायचे असेच होत गेले.

दहा अकरा वर्षांपूर्वी आम्ही अशाच एका लग्नसमारंभात भेटलो होतो त्यावेळी दोघेही आपापल्या नोकरीमधून रिटायर होण्याच्या मार्गावर होतो. त्यानंतर आपल्याकडे भरपूर रिकामा वेळ असणार आहे, तेंव्हा आता एकमेकांच्या घरी न जायला काही निमित्य रहाणार नाही वगैरे बोलून झाले. अर्थातच आम्हा दोघांचेही संसार आता अनेकपटीने विस्तारलेले होते आणि त्यातून कित्येक नवे नातेसंबंध स्थापन झाले होते. नोकरीची बंधने सोडून इतर व्याप आणि आरोग्य सांभाळून त्या सर्वांकडे जाणेसुध्दा आम्हाला जमत नव्हते. त्यामुळे कुठलेच पूर्वीचे जुने संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याला अग्रक्रम मिळू शकत नव्हता. पण यापुढे मात्र जेंव्हा जमेल तेंव्हा मोकळा वेळ मिळेल तशा कधी तरी या गोष्टी करायच्या असा विचार मनात होता. सध्या संपर्कात न राहिलेल्या अशा जुन्या आप्तेष्टाच्या मोठ्या यादीत विद्याचा क्रमांक खूप वर होता.

माझ्या सेवानिवृत्तीनंतर मधल्या काळात पुण्यातल्याच आमच्या समाईक नातेवाईकांच्या दोन लग्नसमारंभांना जायचे असे मी नक्की ठरवले होते आणि त्यानंतर त्या जागी भेटलेल्यांच्या घरी जायचा विचारही केला होता. दोन्ही लग्नांना विद्याची हजेरी असणारच आणि तिथे आमची भेट होणार याची मला खात्री होती. या वेळी मात्र पुण्यात तीन चार दिवस रहायचे आणि तिथल्या काही नातेवाइकांकडे जायचे, त्यामध्ये इतर काही कारण न सांगता या वेळी विद्याच्या घरी जायचेच असे आम्ही ठरवले होते. पण त्यातल्या एका वेळी पुण्याला जायच्या आदल्याच दिवशी मी स्वतःच अचानक तब्येत बिघडल्याने हॉस्पिटलात जाऊन दाखल झालो आणि दुस-या वेळी माझी पत्नी. त्यामुळे दोन्ही वेळी आम्हाला ते काही जमले नाही.

या जन्मात पुन्हा एकदाही माझी आणि विद्याची भेट होणे दैवाच्या योजनेत नव्हते. आपली तबेत धडधाकट असल्याचे पाहून विद्या नर्मदापरिक्रमा करायला म्हणून मध्यभारताच्या पर्यटनाला गेली आणि ती यात्रा करत असतांना वाटेतच एका गावी तिला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातून ती वाचू शकलीच नाही. ध्यानी मनी नसतांना अचानक येऊन धडकलेली ही दुःखद बातमी ऐकली आणि मन सुन्न होऊन गेले. भविष्यात असे काही होणार असल्याची पुसट कल्पना जरी आली असती, म्हणजे समजा ती आजारी पडली असल्याचे कानावर आले असते, तर मी नक्कीच मुद्दाम तिला भेटायला मुंबईहून पुण्याला गेलो असतो. पण तसे घडायचे नव्हते. अखेर ईश्वरेच्छाच बलवान असते हेच खरे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: