स्मृती ठेवुनी जाती -६- दादासाहेब आणि ताई

४८६ Parnaiks

मी हा लेख सुमारे चार वर्षांपूर्वी लिहिला होता. (September 12, 2012)

तो १९७५ सालचा सुमार असेल. आम्ही माझ्या एका जवळच्या आप्ताच्या घरी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी मध्यप्रदेशातल्या एका लहानशा गावी गेलो होतो. त्या गावात त्यांचा वाडवडिलोपार्जित जुना वाडा आहे. त्या विशाल वाड्याच्या सगळ्या बाजूंना मोकळी जमीन आणि या सर्वांभोवती भक्कम तटबंदी वगैरेंनी परिपूर्ण अशी ती गढी आहे. लग्नसमारंभासाठी वाड्यासमोर मोठा मांडव घातला होता. त्या विवाह समारंभातच दादासाहेब आणि ताई यांना मी पहिल्यांदा पाहिले. (ही नावे मी त्या दोघांना या लेखापुरती दिली आहेत.) वरपक्षाकडून जी पाहुण्यांची ‘बारात’ आली होती त्यात वरपिता आणि वरमाई म्हणून त्यांना सर्वोच्च मान होता.

दादासाहेब भारतीय लष्करात मोठ्या हुद्द्यावर होते, तेंव्हा ते बहुधा कर्नल असावेत. त्यापूर्वी मी कोणत्याच फौजी अधिका-याला जवळून प्रत्यक्ष पाहिले नव्हते. हिंदी सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे कर्नलसाहेब म्हणजे मिशांचे मोठेमोठे कल्ले आणि चेहे-यावर मग्रूर भाव धारण करणारे आडदांड आणि फटकळ गृहस्थ असतील अशी एक प्रतिकूल प्रतिमा त्या वेळी माझ्या मनात होती. पण दादासाहेबांचे व्यक्तीमत्व त्यापेक्षा फारच वेगळे होते. ते तर सौम्य प्रकृतीचे अतीशय शांत व प्रेमळ सद्गृहस्थ, अगदी परफेक्ट जंटलमन म्हणता येईल इतके सालस आणि आदबशीर दिसत होते. त्यांना पाहून ते वरपक्षाचे सरसेनानी वाटावेत असा त्यांच्याबद्दल दरारा उत्पन्न होत नव्हता. ताईंचे व्यक्तीमत्व मात्र प्रभावी होते. वरमाईची ऐट त्यांना शोभून दिसत होती आणि मांडवातल्या स्त्रियांच्या घोळक्यात त्या उठून दिसत होत्या.

पूर्वीच्या काळच्या लग्नसमारंभात कधी कधी वरपक्ष विरुध्द वधूपक्ष असे तणावपूर्ण वातावरण असायचे. बारीक सारीक बाबतीत देखील प्राधान्य, मान-अपमान, रीत-भात वगैरेंचे अवास्तव स्तोम माजवून त्यावरून वादावादी, रुसणेफुगणे, अडवणूक वगैरे प्रकार सर्रास चालत असत. या वरपक्षामध्ये दादासाहेबांशिवाय त्यांच्या परिवारातले इतरही काही सैन्याधिकारी होते. ते कसे असतील, वागतील, त्यातल्या कोणाची मर्जी कुठे बिघडणार तर नाही अशी थोडीशी धाकधूक यजमानपक्षाच्या लोकांना मनातून वाटत होती. पण या लग्नात तसे काहीही झाले नाही. सुरुवातीपासून अखेरपर्यंत दोन्ही पक्षांमध्ये संपूर्ण सामंजस्य राहिले आणि खेळीमेळीच्या व सौहार्दपूर्ण वातावरणात सारा सोहळा पार पडला. त्याचे श्रेय अर्थातच दादासाहेब व ताईंच्याकडे जाते.

सेवानिवृत्तीनंतर दादासाहेब व ताई जबलपूर इथे त्यांच्या बंगल्यात रहायला गेले. माझा मोठा भाऊसुध्दा काही काल जबलपूरवासी होता. एकदा आम्ही त्याच्याकडे गेलो असतांना त्याच गावात राहणा-या दादासाहेबांना भेटायला जाणे सामाजिक चालीरीतीनुसार आवश्यक होते. ते माझ्या आधीच्या पिढीतले आणि माझ्याहून वीस पंचवीस वर्षांनी मोठे होते. शिवाय त्यांचे जीवन सैन्यातल्या म्हणजे माझ्यापेक्षा खूप वेगळ्या वातावरणात व्यतीत झालेले असल्यामुळे त्या वेळी आम्हाला एकमेकांशी बोलण्यासाठी काही समान असे विषय मला दिसत नव्हते. भेटीची औपचारिकता पार पाडण्यासाठी एकदा त्यांना आपले तोंड दाखवून यावे, त्यांच्या तब्येतीची थोडी विचारपूस करावी, हवापाणी, महागाई वगैरेसारख्या सर्वसामान्य विषयावर दोन चार वाक्ये बोलावीत एवढ्या तयारीने आम्ही त्यांना भेटायला गेलो. पण त्यांनी आमचे फारच अगत्यपूर्वक स्वागत केले, आपुलकीने आमची विचारपूस केली, अत्यंत टापटिपीने व्यवस्थित सजवून ठेवलेला त्यांचा बंगला आणि सुंदर बगीचा दाखवला, त्यांनी जमवलेल्या वस्तू दाखवतांना त्यांच्या संबंधातल्या काही मजेदार आठवणी सांगितल्या. हे करता करता संध्याकाळ होऊन गेल्यावर रात्रीच्या भोजनासाठी थांबवूनच घेतले. त्यांचा आग्रह मोडणे आम्हाला शक्यच नव्हते.

जेवणाची वेळ होताच दादासाहेबांनी आपला बार उघडला. यापूर्वी मी कधीच कोणा नातेवाईकाच्या घरी मद्यपान केले नव्हते. मला त्याची मनापासून फारशी आवड नाहीच. पण मित्रांच्या सोबतीत कधी दोन चार घोट घेतले होते आणि अर्धवट भरलेला ग्लास हातात घेऊन ओल्या पार्ट्यांमध्ये फिरलो होतो, ते आपण इतरांपेक्षा कोणी वेगळे आहोत असे दर्शवू नये आणि त्या नंतर पिण्याचे फायदे या विषयावर कोणाचे वाह्यात व्याख्यान ऐकावे लागू नये एवढ्यासाठीच. त्यातही वडीलधारी मंडळी आसपास असतील तर “आज त्यांच्यासमोर नको” म्हणून मी ते टाळले होते. पण वडीलधारी आणि आदरणीय अशा माणसानेच हातात मधुप्याला दिल्यावर त्यांना नको कसे म्हणणार? मिलिटरीमध्ये पिणे हा शिष्टाचाराचा भाग असतो असे ऐकलेले होते. आपणही त्याला धरून चालणेच योग्य होते. आमची मैफल चाललेली असतांना महिलावर्गासाठी वाईनच्या बाटल्या निघाल्या आणि त्यात जास्त रंग भरला.

त्यानंतर जेवणामध्ये कोंबडीचे प्रकार होतेच. आम्ही भेटायला येणार असल्याची सूचना त्या मंडळींना दिल्यानंतर त्यांनी ही तयारी करूनच ठेवली होती. आम्हाला अभक्ष्यभक्षण वर्ज्य नाही, किंबहुना त्याचा शौक आहे ही माहिती त्यांना आधीपासून होती की त्यांनी ती मुद्दाम शोधून काढली होती हे तेच जाणोत. शिवाय मी कधी कल्पनाही केली नव्हती असा एक पदार्थ चवीपुरता ठेवला होता. सुप्रसिध्द क्रिकेटपटु कर्नल सी.के नायडू हे सुध्दा जबलपूरला स्थायिक झालेले होते आणि दादासाहेबांशी त्यांचा घनिष्ठ परिचय होता. निवृत्तीनंतरसुध्दा नायडूसाहेब रानावनात शिकार करायला जात असत. त्या काळात वन्य प्राण्यांच्या शिकारीवर अजून बंदी आलेली नसावी. शिकारीवरून परत आल्यानंतर शिकार केलेल्या प्राण्याच्या मांसाचा एक तुकडा त्यांनी दादासाहेबांकडे पाठवला होता, त्यापासून तो खाद्यपदार्थ बनवला होता. मी तो चाखून पाहिला, पण मला तरी तो विशेष आवडला नाही. रानात स्वैरपणे हिंडणा-या प्राण्याला ठार मारून तो पदार्थ तयार केला आहे या विचारानेच मनात कसेसे होत होते. पहायला गेल्यास मटण किंवा चिकन यासाठीसुध्दा हिंसा केली जातेच, पण शेळ्या व कोंबड्यांचे संगोपन देखील याच कारणाने मुद्दाम केले जाते, तसे नसते तर त्या कदाचित जन्मालाही आल्या नसत्या किंवा एवढे आयुष्यही जगल्या नसत्या, यामुळे त्यांच्या हत्येचा विचार आपल्याला तितका कष्टदायी वाटत नाही आणि त्या बाबतीत मन निर्ढावलेले असते.

काही वर्षांनंतर आम्ही दक्षिण भारताच्या दौ-यावर गेलो असतांन माझ्या भावाकडे बंगलोरला गेलेलो असतांना योगायोगाने त्याच वेळी दादासाहेब आणि ताई त्यांच्या मुलाकडे तिथे आले होते. त्यांना अचानक बंगलोरला भेटल्यानंतर आमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. वर दिलेले छायाचित्र त्यावेळचेच आहे. त्यानंतर मात्र दादासाहेबांची भेट होण्याचा योग आला नाही. ते निवर्तल्याची बातमीच समजली.

त्यानंतर अनेक वर्षे एकट्या ताई स्वतःच्या हिंमतीवर आपल्या बंगल्यात मनाप्रमाणे व्यवस्थितपणे रहात होत्या. एकटीने दूरवरचा प्रवास करून इकडे तिकडे जात होत्या. त्या स्वभावाने सोशल तर होत्याच, उमेदीच्या वयात थोडे समाजकार्यही करायच्या. त्यांना वाचनाची खूप आवड होती. इंग्रजी पुस्तके आवडीने वाचणारी माझ्या आधीच्या पिढीमधील दुसरी कोणी स्त्री मला कधी भेटली असल्याचे आठवत नाही. त्या काळात होऊन गेलेल्या एकाद्या समारंभात आमची ताईंशी भेट व्हायची. तेंव्हा त्या आमच्याकडल्या सर्वांची प्रेमाने विचारपूस करत होत्या, कोणी तरी कशा प्रकारचे लहानसे यश मिळवले असेल तर त्याचे तोंडभर कौतुक करत होत्या.

पुढे वयोमानाप्रमाणे ताईंची गात्रे क्षीण होत गेल्यामुळे त्यांना मुलांच्या आधाराने रहावेच लागले, दूरचा प्रवास करून इकडे तिकडे जाणे त्यांना कठीण होत होत अशक्य झाले. नव्वदीमध्ये आल्यानंतरसुध्दा त्यांना मधुमेह किंवा रक्तदाब यासारखा वृध्दत्वाचा विकार जडला नव्हता, पण त्यांच्या हातापायामधले त्राण कमी होत गेले. स्मृतीभ्रंश होऊ लागला. पूर्वीच्या आठवणी गायब झाल्यात जमा झाल्या असल्या तरी त्यातली एकादी अचानक उफाळून यायची. भूतकाळ आणि वर्तमानकाळ यातला फरक समजेनासा झाल्यामुळे त्या कधी भूतकाळात जाऊ पहायच्या किंवा त्या काळातल्या गोष्टी त्यांना आता पहाव्याशा वाटायच्या. हे सगळे सोसणे खूप कठीण होते, पण त्या तसे दाखवून देत नव्हत्या. अखेरीस त्यांना अंथरुणावरून उठणेसुध्दा अशक्य होऊन बसले. भेटायला आलेल्या माणसाला त्या ओळखतील की नाही याची शाश्वती राहिली नव्हती. त्यांचे बोलणेच जवळ जवळ बंद झाले होते. हे सगळे आमच्या कानावर येत होते. त्यामुळे कधी कधी आमच्या मनात येऊनसुध्दा त्यांना भेटण्याचा काही उपयोग होणार नाही या विचाराने आम्ही त्यांना भेटायला जाणे या ना त्या कारणाने पुढे ढकलत गेलो. काही दिवसांपूर्वी एका संध्याकाळी त्या अत्यवस्थ झाल्याचे कळले आणि रात्रीच त्या हे जग सोडून गेल्याचे दुःखद वृत्तही आले. त्यांचे त़डफदार, हुषार, चतुरस्र आणि मनमिळाऊ रूप पाहिल्यानंतर जीवनाच्या अखेरीस त्यांची केविलवाणी झालेली अवस्था आम्ही प्रत्यक्ष पाहिली नाही तरी ऐकूनच दयनीय वाटत होती. त्यातून त्यांची मुक्तता झाली असे ही कदाचित तेंव्हा सर्वांना वाटले असणार.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: