तेथे कर माझे जुळती १३ – ए.नटराजन

तेथे कर माझे जुळती १३ – ए.नटराजन (भाग १)
अणुशक्तीखात्यात माझी निवड झाल्यानंतर मी तिथल्या प्रशालेचा अभ्यासक्रम पूर्ण करून वर्षभर रिअॅक्टर्स चालवण्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर माझी पॉवर प्रॉजेक्ट्स इंजिनियरिंग डिव्हिजनमध्ये बदली झाली. भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटरमधल्या निवडक कर्मचा-यांना घेऊन काही महिन्यांपूर्वीच हे नवे तात्पुरते ऑफीस सुरू केलेले होते. माझ्याबरोबरच माझा मित्र मानबेन्द्र दास याचीही बदली झाली होती. आम्ही दोघे मिळूनच भायखळ्याला असलेल्या त्या ऑफीसमध्ये गेलो आणि थेट तिथल्या सर्वोच्च अधिका-यांना जाऊन भेटलो. त्यांच्या लहानशा केबिनमध्ये त्यांच्या टेबलासमोर चार खुर्च्या मांडलेल्या होत्या, त्यातल्या मधल्या दोन खुर्च्यांवर आम्हाला बसायला त्यांनी सांगितले आणि पीएला बोलावून काही सूचना दिली. आमची नावे, शिक्षण, प्रशिक्षण वगैरेंबद्दल अत्यंत जुजबी स्वरूपाचा वार्तालाप चालला असतांना दोन वरिष्ठ अधिकारी त्यांच्या केबिनमध्ये आले. त्यातले गोरेगोमटे, उंचेपुरे आणि एकाद्या फिल्मी हीरोसारखे देखणे दिसणारे रस्तोगीसाहेब मानबेंद्र दासच्या पलीकडे बसले आणि काळेसावळे, थोडासा उग्र चेहरा असलेले आणि खास कोणासारखेच न दिसणारे नटराजनसाहेब माझ्या शेजारी येऊन बसले. त्या दोघांना उद्देशून मोठे साहेब म्हणाले, “तुम्हाला सहकारी पाहिजे आहेत ना? हे दोघे नवे इंजिनियर आजपासून आपल्याकडे आले आहेत.” असे म्हणून हातानेच खूण करत ते म्हणाले, “तुम्ही याला घेऊन जा आणि तुम्ही याला घेऊन जा.” अशा प्रकारे एका सेकंदात घेतल्या गेलेल्या त्या निर्णयाने आमच्या पुढल्या संपूर्ण आयुष्याची दिशा ठरून गेली. आमचा बायोडेटा, अॅप्टिट्यूड वगैरेची चर्चा झाली नाही किंवा काउन्सेलिंग वगैरेही काही झाले नाही. असे काही असते हे सुध्दा तेंव्हा आम्हालाही ठाऊकच नव्हते.
 प्रशालेमध्ये असतांना दर आठवड्याला एक किंवा दोन विषयांची परिक्षा होत असे, त्या सगळ्या टेस्ट्समध्ये मला भरघोस मार्क मिळाले असल्यामुळे एकाद्या नव्या विषयाचा अभ्यास करून तो आत्मसात करण्याची माझी क्षमता त्यातून सिध्द झाली होती. रिअॅक्टिव्हिटी, रेडिएशन यासारखे फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्सशी संबंधित थिअरॉटिकल स्वरूपाचे काम रस्तोगी यांच्याकडे होते आणि प्रॉजेक्टसाठी लागणारी निरनिराळी यंत्रसामुग्री आणि इतर भाग तयार करवून घेण्याची जबाबदारी नटराजन यांच्याकडे होती. या नोकरीत निवड होण्यापूर्वी दासने एक वर्ष कलकत्याच्या एका मोठ्या कारखान्यात काम केले असल्यामुळे त्याला त्या कामाचा थोडा अनुभव होता. या गोष्टींचा कोणी वर वर जरी विचार केला असता तर त्याने नक्कीच वेगळा निर्णय घेतला असता. पण ‘देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो’ असे म्हणतात तसे कदाचित तेंव्हा झाले असेल. त्या वेळी आर्बिट्ररी प्रकारे झालेल्या कामाच्या वाटणीमुळे नटराजनसाहेबांसोबत काम करायची संधी मला मिळाली आणि त्यांना माझ्यासारखा सहकारी मिळाला. अगदी योगायोगाने आमच्यात निर्माण झालेले हे नाते ते सेवानिवृत्त होईपर्यंत अखंड राहिले. त्या वेळी मला किंवा दासला या ऑफीसबद्दलच काहीही माहिती नव्हती आणि आम्हा दोघांनाही मिळेल ते काम सुरू करण्याची मनोमन तीव्र इच्छा होती. त्यामुळे कामाच्या स्वरूपाचा विचार आमच्या मनात आला नाही.
 मला बरोबर घेऊन नटराजन साहेब त्यांच्या केबिनपाशी आले. रेल्वेच्या लोकल गाडीच्या ड्रायव्हरकडे असते तशी ती पिटुकली केबिन होती. त्यात ठेवलेल्या त्यांच्या टेबलाच्या समोरच्या आणि उजव्या बाजूच्या अशा दोन कडांना पुरुषभर उंचीचे पत्र्याचे पार्टिशन ठोकलेले होते आणि साहेबांच्या खुर्चीच्या मागे लगेच पलीकडच्या केबिनचे पार्टीशन होते. त्यांनी आपली खुर्ची पुढे सरकावून माझ्यासाठी वाट करून दिली आणि मला पलीकडे जायला सांगितले. टेबलाच्या त्या चौथ्या कडेजवळ एक बिनहाताची खुर्ची ठेवलेली होती, तिच्यावर मला बसायला सांगितले. मग त्यांनी आपली खुर्ची मागे ओढून ते स्थानापन्न झाले. आता माझा बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाला होता. त्यांच्या टेबलावर काही पुस्तके, कागद, फाइली वगैरे पडलेल्या होत्या. त्यांना थोडेसे बाजूला सरकवून त्यांनी माझ्यासाठी टेबलावरच फूटभर रुंद जागाही रिकामी करून दिली.  माझे नाव, गाव, शिक्षण वगैरेंबद्दल अगदी त्रोटक माहिती विचारून झाल्यानंतर त्यांनी सरळ माझ्या कामाबद्दल बोलायला सुरुवात केली. त्यावेळी राजस्थानमधील कोटा या शहराजवळ आमचा नवा अॅटॉमिक पॉवर प्रॉजेक्ट बांधला जात होता. त्या प्रकल्पाबद्दल थोडीशी माहिती देऊन त्यात आपल्याला काय करायचे आहे हे त्यांनी विस्ताराने पण मोजक्या आणि नेमक्या शब्दांमध्ये सांगितले, तसेच त्यासाठी मी कुठून सुरुवात करायची याचीही स्पष्ट कल्पना दिली. तोपर्यंत जेवणाची वेळ झाली होती. घरून आणलेला डबा घेऊन ते त्यांच्या एका मित्राकडे गेले आणि मीही जेवून येण्यासाठी बाहेर आलो.
 बाहेर एका हॉलमध्ये एका रांगेमध्ये पाचसहा टेबले मांडून ठेवलेली होती आणि त्यांच्याजवळच सातआठ जास्तीच्या खुर्च्या ठेवल्या होत्या. त्या ठिकाणी दहाबाराजण बसलेले होते. त्यात मानबेंद्र दास होताच, शिवाय अजीत, संपत आणि सुभाष हे आमचे बॅचमेटही होते. उरलेली मुले आम्हाला एक दोन वर्षांनी सीनियर होती. बीएआरसीमधून त्यांची बदली झाली तेंव्हा ते आपापल्या टेबलखुर्च्यांसहित या नव्या ऑफीसमध्ये आलेले होते. नव्याने आलेले इंजिनियर त्यांची टेबले शेअर करत होते. आपोआपच मीदेखील त्यांच्यात सामील झालो. असे होणार हे नटराजनना नक्कीच ठाऊक होते, पण मला ऑफीसात आल्या आल्या आधी स्वतःसाठी स्वतःच जागा शोधायला सांगणे त्यांना बरे वाटत नव्हते म्हणून त्यांनी आपल्यातली एक चतुर्थांश जागा मला देऊ केली होती. शिवाय त्यांना पहिल्या दिवसापासून मला कामाला लावायचे होते आणि माझ्याकडे जागा नाही ही सबब त्यांना दाखवता येऊ नये अशा विचारही त्यांनी केला असेल.
 माझ्या मित्रांनी मला त्या लहानशा ऑफिसाची माहिती सांगितली. एका जागी लायब्ररीच्या नावाने दोन तीन कपाटे होती, त्यात काही मॅन्युअल्स, रिपोर्ट्स वगैरे ठेवले होते. तीन चार फाइलिंग कॅबिनेट्समध्ये सारा पत्रव्यवहार फाईल करून ठेवला होता. ड्रॉइंग्ज रेकॉर्ड सेक्शनमध्ये चार पाच रॅक्समध्ये बरीचशी ड्रॉइंग्ज रचून ठेवली होती. आमचा तो प्रॉजेक्ट कॅनडाच्या सहाय्याने बनणार होता. त्या काळात भारतात उभारल्या जात असलेल्या मोठ्या पॉवर प्रॉजेक्ट्समध्ये त्याची गणना होत होती. त्याच्या पहिल्या युनिटसाठी लागणारी सर्व यंत्रसामुग्री कॅनडामध्येच तयार होऊन भारतात येणार होती आणि दुस-या युनिटसाठी तशीच्या तशीच शक्य तितकी यंत्रसामुग्री भारतात तयार करवून घेण्याचा विचार होता. त्यासाठी तिकडून येत असलेली सगळी डॉक्युमेंट्स पाहून त्यावर आम्हाला अंमलबजावणी करायची होती. ही डॉक्युमेंट्स विमानाने किंवा आगबोटीने यायला नुकतीच सुरुवात झालेली होती. तसेच त्यावर काम करण्यासाठी आमच्या ऑफीसची यंत्रणा उभारली जात होती. एवढ्या मोठ्या प्रॉजेक्टसाठी शेकडो इंजिनियर लागणार होते. त्यांची जमवाजमव सुरू झालेली होती आणि त्यासाठी काही लोकांना ट्रेनिंगसाठी कॅनडाला पाठवले गेले होते, काहीजण बीएआरसीच्या आवारातच यावर काम करत होते. आम्हीही त्या यंत्रणेचा त्या वेळचा एक लहानसा भाग होतो. थोड्याच दिवसांनी आमचे ऑफीस गेटवे ऑफ इंडिया जवळ असलेल्या मोठ्या जागेत गेले आणि पुढे त्याचा विस्तार होत गेला.
 आमच्या प्रॉजेक्टच्या कामाचे स्वरूप लक्षात घेऊन त्याचे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन वगैरे मुख्य भाग केले होते आणि त्यातली कामे निरनिराळ्या वरिष्ठ अधिका-यांना वाटून दिली होती. नटराजन यांच्याकडे प्रॉजेक्टच्या ज्या भागाचे काम सोपवले होते त्यासंबंधी कोणकोणती मॅन्युअल्स, स्पेसिफिकेशन्स, ड्रॉइंग्ज वगैरे कॅनडाहून आली आहेत आणि त्यासंबंधी झालेला पत्रव्यवहार वगैरे पाहणे हेच माझे पहिले काम होते. ते पाहता पाहता त्यांचा अर्थ समजून घ्यायचा होता. मी एक जाडजूड रफपॅड घेतले आणि कामाला लागलो. आमच्या कामाशी संबंधित कोणते दस्तऐवज लायब्ररीत किंवा रेकॉर्ड सेक्शनमध्ये आहेत हे पाहून त्यांची यादी बनवली आणि ते करता करता त्यांच्यावर नजर फिरवून काही नोट्स काढल्या. दिवसातून दोन तीन वेळा तरी नटराजनसाहेबांना त्या दाखवत होतो आणि माझ्या मनात आलेल्या शंका विचारून घेत होतो. त्या काळात कॅनडामधून आलेली ड्रॉइंग्ज अतीशय किचकट आणि दुर्बोध तर होतीच, त्यांची क्वालिटीही खराब होती. स्टेन्सिल्सचा उपयोग न करता सगळे हाताने लिहिलेले होते आणि काही ड्रॉइंग्जवर लिहिलेले नीट वाचताही येत नव्हते. एवीतेवी भारतीय लोकांना यातले काही कळणार नाही अशी गुर्मी त्याच्या मागे होती किंवा त्यांना काही समजू नये असा डाव होता कोण जाणे. वाचलेले समजून घेण्यासाठी मला नटराजन यांच्याकडे जावे लागत असे. ते सुध्दा किंचितही रोष न दाखवता मला त्यात मदतच करायचे आणि आळस न करता नीट समजावून सांगायचे. असली विचित्र ड्रॉइंग्ज तेसुद्धा पहिल्यांदाच पहात असले तरी त्यांना थोडा अनुभव होता आणि दोन वर्षे अमेरिकेत राहून आलेले असल्यामुळे तिकडे वापरात असलेले सिम्बॉल्स, शॉर्टफॉर्म्स वगैरे त्यांना लगेच समजत होते. आम्ही दोघे मिळून त्यांचा जमेल तेवढा अर्थ लावत होतो.
 आमचे हे काम चालले असतांना अधून मधून ड्रॉइंग्जचे नवे नवे गठ्ठे येत होते. ते उघडून त्यांचे संदर्भ एकमेकांशी जुळवून पहातांना आम्हाला त्यांचा अर्थ जास्त चांगला कळत गेला. तरीसुध्दा कागदावर मारलेल्या लहान लहान आडव्याउभ्या रेखा पाहून त्यावरून अगडबंब आकाराच्या त्रिमिति वस्तूची कल्पना डोळ्यासमोर येण्याइतकी माझी नजर तयार होत नव्हती. फाइलींमधला पत्रव्यवहार वाचतांना असे लक्षात आले की आमच्या प्रॉजेक्टच्या पहिल्या युनिटसाठी लागणारी काही यंत्रसामुग्री भारतात येऊन साईटवर पोचली आहे आणि तिची उभारणी करण्यासाठी काही कॅनेडियन एक्स्पर्ट्सही आलेले आहेत. आम्ही दोघांनीही कोट्याला जाऊन ती प्रत्यक्ष पाहून येण्याचे ठरवले. त्यासाठी एक निमित्य मिळताच त्यांनी आम्हा दोघांसाठी वरिष्ठांकडून मंजूरी मिळवली आणि रेल्वेच्या तिकीटांची व्यवस्था केली. फ्राँटियर मेलमधून फर्स्टक्लासने केलेला हा माझ्या आयुष्यातला पहिलाच प्रवास मी नटराजनसाहेबांसोबत केला. त्या वेळी साईटवर कसलीशी मीटिंग ठरलेली असल्यामुळे आमच्या ऑफिसमधले आणखी काही सहकारीही आमच्याबरोबरच होते. सगळे मिळून गप्पा मारत आणि पत्ते खेळत केलेल्या या प्रवासात ज्यूनियर्स आणि सीनियर्स यांच्यामध्ये असलेला बराचसा दुरावा कमी झाला आणि आमच्यात एक खेळीमेळीचे वातावरण निर्माण झाले. मुंबईतल्या माझ्या निवासस्थानापासून प्रॉजेक्टसाईटवरील गेस्टहाउसपर्यंत सरकारी वाहनांमधून झालेला अशा प्रकारचा माझा हा पहिलाच ऑफीशियल प्रवास असल्यामुळे मला त्यातले सगळेच नवे होते. ते अद्भुतही वाटत होते आणि थोडे बावचळायला वाटणारे होते. नटराजन यांनी त्या संपूर्ण प्रवासात एकाद्या वडीलधारी माणसाने लहान मुलाची घ्यावी तशी माझी काळजी घेतली.
 नटराजन माझ्याहून दहा वर्षांनी मोठे असले तरी त्यांना वेगळ्या प्रकारच्या कामाचा अनुभव होता. स्वतः ड्रॉइंग्ज आणि स्पेसिफिकेशन्स तयार करून किंवा ती डॉक्युमेंट्स समजून घेऊन त्यानुसार यंत्रसामुग्री तयार करून घेणे अशा स्वरूपाचे भरीव काम त्यांनीही यापूर्वी केलेले नव्हतेच. पण त्यांनी अमेरिकेत शिकून एमएस ही पदवी मिळवली होती, त्यासाठी परदेशभ्रमण केले होते, जगातल्या इतर देशांमधली राहणी पाहिली होती, भारतातसुध्दा इतर संस्था आणि सरकारी ऑफीसांमधील उच्चपदावरील अधिका-यांना भेटून त्यांच्याशी बोलणी केली होती. एकंदरीतच त्यांची विचारपध्दती विस्तारलेली (ब्रॉडमाइंडेड) होती. ते बुध्दीमान होतेच, त्यांची स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती चांगली होती. त म्हणताच ताकभात हे ते ओळखू शकत होते. पण या कशाचाही त्यांना गर्व नव्हता, त्यातून त्यांना शिष्टपणा आला नव्हता. मोकळेपणाने चर्चा करायला ते तयार असत. याचा अर्थ ते आपला मुद्दा सोडायला तयार असत असा नाही, पण समोरच्या व्यक्तीला तो शांतपणे पटवून देण्याची त्यांची तयारी असे. याच्या उलट मी एका लहानशा गावामधून आलेला आणि स्वभावाने जरासा बुजरा आणि अल्लडच होतो, घरातले लोक आणि जवळचे मित्र यांना सोडून कोणाही अनोळखी माणसाशी बोलत नव्हतो, एटीकेट्स कशाला म्हणतात याची मी कधीच पर्वा केली नव्हती. मला बाह्य जगाचे फारच कमी एक्स्पोजर होते. पुस्तकी ज्ञान सोडले तर मी अगदी रॉ मटीरियल होतो. अशा अवस्थेतल्या मला घडवण्याचे बरेचसे काम नटराजनसाहेबांनी केले.
परदेशात आणि मुंबईत बराच काळ राहिल्यामुळे त्यांच्या बोलण्यातला तामीळ अॅक्सेंट पुसट झाला होता आणि इतर भाषिकांबरोबर राहून माझे मिंग्लिश सुधारले होते तसेच अनेक तामीळ मित्रांबरोबर बोलणे झाल्यामुळे मलाही टॅम्लिश समजू लागले होते. यामुळे पहिल्या दिवसापासून आमच्या दोघांमध्ये कधीच भाषेचा प्रॉब्लेम आला नाही. आमची वैचारिक व बौद्धिक फ्रिक्वेन्सी बरीच जुळत असल्यामुळे आमच्यात सहसा समजुतीचे घोटाळे होत नव्हते किंवा कोणालाच रिपीटीशन करावे लागत नव्हते. नटराजन निर्विवादपणे सर्वच बाबतीत माझ्याहून मोठे असल्यामुळे आमच्यात संघर्ष होण्याची वेळ येत नव्हती. शिवाय मी माझ्या घरात सर्वात लहान असल्यामुळे मला मोठ्यांचे ऐकून घेण्याची सवय होती. एकंदरीत पाहता आमचे बरे जमत गेले.
————————————————————————————————-
तेथे कर माझे जुळती १३ – ए.नटराजन (भाग २)
नटराजनसाहेबांच्या सोबत मी काम करायला सुरुवात केली त्या काळात यंत्रसामुग्रीच्या उत्पादनाच्या क्षेत्रात भारत आणि अमेरिका या देशामधील परिस्थितींमध्ये जमीन अस्मानाएवढा फरक होता. मोटारी, पंखे, शिवणयंत्रे, रेफ्रिजरेटर यासारख्या ग्राहकांना उपयुक्त अशा वस्तू तयार करण्याचे कारखाने भारतात चालू झालेले होते. त्यातले बहुतेक सगळे फॉरेन कोलॅबोरेशनवर उभारलेले होते आणि परदेशी कोलॅबोरेटर्सच्या सहाय्याने ते चालवले जात होते. विशिष्ट वस्तूच्या उत्पादनासाठी लागणारी यंत्रसामुग्री आयात केलेली असे आणि फक्त त्या उत्पादनांसाठी ती कशी चालवायची हे ठरवून दिलेले असे. आपली स्वतः बुध्दी चालवून नव्याने किंवा निराळे काही निर्माण करण्याची गरजही पडत नसे आणि त्यासाठी फारसा वावही नसे. यंत्रांच्या ठराविक कामात काही अडचण आली किंवा गरज पडलीच तर सहाय्य करायला परदेशी तज्ज्ञ.हजर असत किंवा त्यांना बोलावले जात असे.
 आमच्या प्रॉजेक्टच्या पहिल्या युनिटची सारी यंत्रयामुग्री कॅनडामधूनच तयार होऊन आली होती आणि दुस-या युनिटसाठी डिट्टो तशीच यंत्रे आम्ही भारतात बनवून घेण्याची योजना होती. त्या यंत्रसामुग्रीची जी ड्रॉइंग्ज आम्हाला मिळाली होती ती कॅनडामधील कारखान्यांसाठी कदाचित पुरेशी असतील. तो देशसुध्दा तेंव्हा कारखानदारीमध्ये फार पुढारलेला नसला तरी त्याच्यापाशी अमेरिकेचे भक्कम पाठबळ होते. या ड्रॉइंग्जमधील प्रत्येक भाग ‘अमुक अमेरिकन स्टँडर्डच्या तमूक ग्रेड’पासून बनवावा असे त्या ड्रॉइंगमधील ‘बिल ऑफ मटीरियल’मध्ये लिहिले होते, काही बाबतीत तर ‘अॅटलास सुपरइम्पॅक्टो’ किंवा ‘अल्टिमो’ एवढे ‘ट्रेड नेम’च लिहिले होते. एवढ्या वर्णनावरून तो नेमका कोणता मिश्रधातू आहे हेसुध्दा समजत नव्हते. अशा वर्णनाचा कच्चा माल भारतात निर्माण होत नव्हताच, त्या काळात इथल्या बाजारपेठेमध्येही तो उपलब्ध नव्हता. गीअर्स, मोटर, पंप, व्हॉल्व्ह, स्विचे वगैरे यंत्रे,  उपकरणे आणि नटबोल्ट, वॉशर्स, स्प्रिंग्ज, कपलिंग्ज यासारखे सुटे भाग सुध्दा ‘अमूक कंपनीच्या कॅटलॉगमधले तमूक आयटम नंबर’ अशा पध्दतीने ड्रॉइंगमध्ये दाखवले होते. त्यावरून काही बोध होत नसल्यामुळे त्या त्या कंपनीकडून किंवा तिच्या स्टॉकिस्टकडून ते विकत घेण्यावाचून गत्यंतर नव्हते. त्या काळात भारताची आयातनिर्यातविषयक नीती अत्यंत कडक होती. प्रत्येक परदेशी वस्तूसाठी इंपोर्ट लायसेन्स मिळवणे अत्यावश्यक असे. व्यापारी किंवा एजंट लोक अशा प्रकारचा माल इंपोर्ट करून त्याचा स्टॉक करून ठेवू शकत नसत. कॅनडामध्ये असे निर्बंध नसल्यामुळे या ड्रॉइंग्जनुसार जे काही आवश्यक असेल ते सारे तिथल्या कारखानदारांना स्थानिक बाजारातून सहजपणे मिळत असे, पण भारतातल्या कारखानदारांना ते फारच कठीण असल्यामुळे आम्हाला हवी असलेली यंत्रसामुग्री तयार करण्याचे काम हातात घ्यायला त्यातला कोणीच उत्सुक नव्हता. कोणत्याही वस्तूंच्या निर्मितीसाठी फॉरेन कोलॅबोरेशन असल्यास त्या कारखानदाराला त्या विशिष्ट उत्पादनांसाठी लागणारे परदेशी सामान मिळून जात असे, त्याचप्रमाणे या प्रॉजेक्टसाठी आवश्यक तेवढे सामान आम्ही कॅनडामधून आयात करू शकत होतो. हा सगळा विचार करून झाल्यावर आमच्या उपयोगासाठी सर्व कच्चा माल आणि विशिष्ट उत्पादने (प्रोप्रायटरी आयटम्स) आम्ही मागवून घ्यायची आणि येथील कारखानदारांना ती पुरवून त्यापासून आमच्या प्रॉजेक्टसाठी यंत्रसामुग्री तयार करवून घ्यायची असे ठरले होते. तसे करण्यावाचून गत्यंतरच नव्हते.
 ड्रॉइंग्जचा बारकाईने अभ्यास करून त्यातल्या प्रत्येक आयटमचा आकार शेवटी कसा असायला हवा ते समजते, पण तो कशापासून तयार करायचा हे त्यात दिलेले नसल्यास त्याबद्दल विचार करून ठरवावे लागते. उदाहरणार्थ बटाटेवड्याचा फोटो पाहून तो कसा तयार केलेला आहे, त्यासाठी कोणकोणत्या साहित्याची गरज आहे हे समजत नाही, तो चाखून पाहिल्यानंतर थोडा अनुभव आणि विचार यातून त्याचा अंदाज करता येतो. अशाच प्रकारे विश्लेषण, विचार, कल्पना आणि चर्चा करून आमच्या यंत्रसामुग्रीसाठी लागणारा कच्चा माल आणि विशिष्ट उत्पादने यांच्या याद्या नटराजन यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करायच्या कामाला मी लागलो आणि त्याच्या पुढल्या पायरीवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. त्यांच्याहून वरिष्ठ अधिका-यांच्या बरोबर ते निरनिराळ्या मोठमोठ्या कारखान्यांना भेट देत आणि तिथल्या संचालक मंडळींशी चर्चा करून येत. पण बहुतेक वेळी आपल्यासमोर केवढ्या मोठ्या अडचणी आणि आव्हाने आहेत याचीच उजळणी होत असे. पण यातून होणा-या मनस्तापाची किंवा नैराश्याची झळ त्यांनी आम्हाला लागू दिली नाही किंवा आम्हाला निरुत्साही होऊ दिले नाही.
 या ड्रॉइंग्जमधील प्रत्येक भाग अमुक अमेरिकन स्टँडर्डच्या तमूक ग्रेडच्या पदार्थापासून बनवावा असे लिहिले होतेच. या शिवाय “तो बनवण्यासाठी करायच्या वेल्डिंग, हीट ट्रीटमेंट, मशीनिंग, फिनिशिंग यासारख्या उत्पादनामधील प्रत्येक कृती अमक्या कोड किंवा स्टँडर्डच्या तमक्या सेक्शनमधील ढमक्या कलमानुसार केली पाहिजे”, “त्याचे निरीक्षण (इन्स्पेक्शन) आणखी कुठल्या सेक्शननुसार केंव्हा आणि कुणी केले पाहिजे.” वगैरे अनंत नियम संबंधित टेक्निकल स्पेसिफिकेशन्समध्ये लिहिलेले होते आणि ते सारे आम्हाला बंधनकारक होते. अशा प्रकारच्या अमेरिकन कायद्यांचे राज्य भारतात चालत नव्हते. त्यामुळे त्या काळी इथल्या कोणालाही ते नियम माहीत नव्हते. अशा परिस्थितीत कारखानदार तरी ते नियम पाळण्याचे आश्वासन कशाच्या बळावर आम्हाला देणार? त्यामुळे या बाबतीतसुध्दा आम्हीच त्यांना मदत करणे आवश्यक होते. आम्ही ती सगळी कोड्स आणि स्टँडर्ड्स मागवून घेतली, त्यांचा अभ्यास करून त्यातली जी कलमे आमच्या कामासाठी उपयुक्त, महत्वाची किंवा आवश्यक होती ती नीटपणे समजून घेऊन त्यानुसार कारखान्यांमधल्या लोकांशी चर्चा करावी लागत असे. नटराजन यांचे उच्च शिक्षण अमेरिकेत झालेले होते आणि बीएआरसीमधील कॅनेडियन रिअॅक्टरवर त्यांनी काम केलेले होते. त्यामुळे अशा प्रकारची डॉक्य़ुमेंट्स त्यांना माहीत होती. “आपण असे असे करून त्यामधून मार्ग काढू शकतो.” हे ते आत्मविश्वासाने सांगू शकत.
 असे असले तरीसुध्दा ही सगळी यंत्रसामुग्री तयार करण्याची जबाबदारी घेण्यासाठी सुसज्ज असे कारखानदार सुरुवातीच्या काळात भारतात मिळत नव्हते. रिअॅक्टर व्हेसल, स्टीम जनरेटर यासारखी काही महत्वाची पण स्थिर स्वरूपाची (स्टेशनरी) इक्विपमेंट तयार करण्याचे आव्हान लार्सन अँड टूब्रो, बीएचईएल, वालचंदनगर इंडस्ट्रीज यासारख्या मोठ्या कंपन्यांनी स्वीकारले, पण गतिमान यंत्रसामुग्री तयार करण्याएवढी त्यांची क्षमता नव्हती. काही यंत्रे आम्ही बीएआरसीच्या वर्कशॉपमध्ये तयार करायचे ठरवले, तरीही आणखी काही महत्वाची यंत्रे अजून शिल्लक होती. एचएमटी या सार्वजनिक क्षेत्रामधील कंपनीचे कारखाने भारतातील अनेक ठिकाणी होते, त्यातल्या हैद्राबाद येथील कारखान्यात ते ‘स्पेशल पर्पज मशीन टूल्स’ तयार करत असत. आमची यंत्रेसुध्दा ‘स्पेशल’ असल्यामुळे त्यातली काही यंत्रे त्यांच्याकडून बनवून घेण्याचा विचार केला. त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी नटराजनसाहेब, त्यांचे बॉस, आणखी एक सहकारी यांच्यासोबत मीसुध्दा हैदराबादला गेलो. पुन्हा एकदा आम्ही एकत्र प्रवास करत होतो. तिथे गेल्यानंतर काय बोलायचे याची स्ट्रॅटेजी ठरवण्यावरच या वेळच्या प्रवासात चर्चा झाली.
 एचएमटीच्या कारखान्यात गेल्यानंतर प्रथेनुसार त्यांनी आम्हाला त्याच्या महत्वाच्या विभागांमधून फिरवून आणले. ते करतांना आम्ही तिथे असलेली यंत्रे आणि इतर फॅसिलिटी पाहून घेतल्या, तसेच त्यातली किती यंत्रे काम करत होती आणि किती थंड पडलेली होती तेही पाहिले. त्यानंतर महाचर्चेला सुरुवात झाली. आमच्या कामाचे स्ट्रॅटेजिक महत्व, देशाची अस्मिता आणि इभ्रत, पायाभूत तंत्रज्ञानाचा विकास, दूरदर्शी धोरण, महत्वाकांक्षी योजना, स्वावलंबन, परस्परांचे सहकार्य वगैरेंबद्दल मोठ्या साहेबांनी आपल्या भाषणात सांगितले. केंद्र सरकारच्या उद्योग मंत्रालयामधून बहुधा यासंबंधीच्या सूचना एचएमटीलाही मिळालेल्या असाव्यात. त्यांनीही हो ला हो करीत सारे काही ऐकून घेतले. त्यानंतर “आमची कामे हातात घेण्यासाठी कोणकोणत्या फॅसिलिटीजची आवश्यकता आहे, त्यातल्या किती त्यांच्याकडे आधीपासून आहेत, त्यात कोणती भर टाकायची गरज कदाचित पडेल, त्यासाठी लागेल ती सर्व प्रकारची मदत आम्ही करूच.” वगैरे गोष्टी नटराजन यांनी थोडक्यात पण नेमक्या शब्दांमध्ये सांगितल्या. शिवाय “सध्या बाजारपेठेत असलेल्या मंदीमुळे त्यांच्या कारखान्यात त्याच्या पूर्ण कार्यक्षमतेइतके काम चाललेले दिसत नाही. बरीचशी स्पेअर कपॅसिटी असल्यासारखे दिसते. यामुळे त्यांनी आमचे काम घेतले तर त्यापासून दोघांना फायदा होईल.” वगैरे मुद्दे मांडले. ते त्यांना मान्य करावेच लागत होते, पण त्यांनी वेगळा मुद्दा पुढे केला. “अशा प्रकारचे काम इथे पहिल्यांदाच करायचे असल्यामुळे त्याला किती वेळ लागेल आणि त्यासाठी किती खर्च येईल याचा अंदाज आम्ही बांधू शकत नाही, मग त्याची किंमत आम्ही कशी ठरवणार?”
 या प्रश्नाची अपेक्षा आम्हाला होतीच आणि त्यावर उपायही ठरवलेला होता. “तुमच्या कारखान्यातील प्रत्येक यंत्र रोज किती वेळ चालते याची नोंद ठेवली जात असणार, तसेच प्रत्येक कामगाराचेही टाईमकार्ड असणार. त्यांचेसाठी ‘मॅनअवर’ आणि ‘मशीनअवर रेट्स’सुध्दा ठरलेले असणार. आमच्या कामावर ते किती खर्च होतात याचा वेगळा हिशोब ठेवावा आणि तेवढे बिल आमच्याकडे पाठवावे. आपल्या संस्था सार्वजनिक क्षेत्रामधल्या असल्यामुळे त्यांचे पेमेंट करणे म्हणजे केंद्र सरकारच्या एका खिशातले पैसे काढून ते दुस-या खिशात ठेवण्यासारखे आहे. त्यात काही अडचण येणार नाही. तुमचे आणि आमचे अकौंट डिपार्टमेंट मिळून ते पाहून घेतील.” अशा प्रकारचा ‘कॉस्टप्लस’ फॉर्म्यूला पुढे केल्यावर त्यांनीही तो स्वीकारला आणि प्रयोगादाखल एक यंत्र तयार करणे मान्य केले.
 तापलेले लोखंड मऊ असतांना त्यावर कसा घणाचा घाव घालाया हे नटराजन यांना चांगले ठाऊक होते. त्यांनी लगेच सांगायला सुरुवात केली, “सर्व रॉ मटेरियल्स आणि प्रोप्रायटरी आयटम्स आम्ही कॅनडाहून आय़ात करून तुम्हाला देणारच आहोत, पण त्यांना इकडे येण्यासाठी वेळ लागेल. त्याआधी करण्यासारखी बरीच कामे आहेत. वेल्डिंग आणि हीट ट्रीटमेंटसाठी कोड्सप्रमाणे प्रोसीजर्स लिहून ती अॅप्रूव्ह करून घ्यायची आहेत. त्यासाठी ट्रायल्स कराव्या लागतील. काही काँपोनंट्स खूप काँप्लेक्स आकाराचे आहेत आणि त्यांची अॅक्यूरसी अत्यंत महत्वाची आहे. ते आकार कसे तयार करायचे याचा विचार करून त्यासाठी जिग्ज आणि फिक्स्चर्स तयार करावी लागतील. अशा सगळ्या ट्रायल्स आपल्या स्टॉकमधल्या मटीरियलवर केल्या तर महागडे इंपोर्टेड मटीरियल वाया जाणार नाही. त्यातून अनुभव मिळेल आणि अडचणी समजतील. त्यामुळे आपले मटीरियल कॅनडामधून येईपर्यंत आपण सज्ज झालेले असू” वगैरे वगैरे सांगून झाल्यानंतर “या कामासाठी आधी एक टीम तयार करायला हवी. त्यांना आमच्या प्रॉजेक्ट साईटवर नेऊन या प्रकारचे कॅनडामधून आलेले मशीन दाखवता येईल, आमच्या वर्कशॉपमध्ये होत असलेले अशा प्रकारचे काम आणि त्याचे क्वालिटी अॅशुरन्स वगैरे दाखवता येईल.” वगैरे मुद्दे मांडून एचएमटीमधल्या दोन तीन जणांची एक लहानशी टीम तयार करून घेतली. आम्ही सगळी ड्रॉइंग्ज सोबत नेलेली होतीच. पुढील दोन तीन दिवस या टीमला त्या ड्रॉइंग्जमधले महत्वाचे मुद्दे दाखवले. ते इंजिनियर खरोखरच हुषार, कामसू आणि उत्साही होते. त्यांनी आम्हाला चांगले सहकार्य दिले त्याचप्रमाणे त्यांच्या कारखान्यातले काम कसे चालते याची सविस्तर माहितीही दिली.
 त्यांच्या डिझाइन ऑफिसमध्ये ड्रॉइंग्ज तयार झाल्यानंतर ती प्लॅनिंग सेक्शनमध्ये जातात. तिथे त्यांचे प्रोसेसशीट्स तयार होतात. कारखान्यातल्या शॉप फ्लोअरवरील ज्या विभागात जेवढे काम होत असेल त्याचीच माहिती देणारी ड्रॉइंग किंवा वेगळी स्केचेस त्यांना दिली जातात. त्यात काही अडचण आली तर ते ड्रॉइंग आणि प्रोसेस शीट रिवाइज केले जाते वगैरे शिस्त त्यांच्याकडे होती. आमच्याकडील कॅनेडियन ड्रॉइंग्जमध्ये सगळ्या प्रकारच्या माहितीची खिचडी होती आणि त्यातली डायमेन्शन्स इंच आणि फुटांमध्ये दिलेली होती. अशा प्रकारचे ड्रॉइंग त्या कारखान्यातला कोणताही कामगार हातातसुध्दा धरणार नाही. त्यांना कळू शकतील अशी त्यांच्या पध्दतीची ड्रॉइंग्ज तयार करणे सर्वात आधी आवश्यक होते. ती तयार करून ते आमच्याकडे पाठवू लागले. त्या ड्रॉइंग्जचे पहिले एक दोन गठ्ठे पाहून झाल्यावर त्यात काही उणीवा आणि चुका सापडल्या. त्या सुधारण्यासाठी आणि सुधारलेली आवृत्ती पुन्हा तपासण्यासाठी ड्रॉइंग्जचे गठ्ठेच्या गठ्ठे इकडून तिकडे पुन्हा पुन्हा पाठवावे लागणार होते. त्यात बराच वेळ वाया गेला असता. हे पाहून नटराजनसाहेबांनी एक निर्णय घेतला. मीच महिनाभर हैद्राबादला जाऊन रहावे आणि सर्व ड्रॉइंग्ज व्यवस्थितपणे तयार करून घेतल्यानंतरच परत यावे असा आदेश मला दिला. आतापर्यंत त्यांचा विश्वास संपादन केला असल्यामुळे ती ड्रॉइंग्ज अॅप्रूव्ह करण्याचा अधिकारही मला दिला.
 एच एम टी मधील इंजिनियर्सनी ड्रॉइंग्जनंतर प्रोसेस शीट्स आणि प्रोसीजर्स तयार केली, काहींच्या ट्रायल्स घेतल्या, प्रयोग करून पाहिले, बरेचसे मटीरियलही त्यांना दिले. पण त्यांच्या उत्साहाला मात्र ओहोटी लागली होती. आमच्याकडून सर्व प्रकारचे सहकार्य देऊनदेखील हे काम प्रगती करत नव्हते. दर दोन तीन आठवड्यात मी त्यांच्याकडे जाऊन काय चालले आहे हे पाहून येत होतो आणि नटराजनही महिन्यामधून एकादी भेट देऊन येत होते. पण दर वेळी अडचणींची नवी यादी समोर येऊ लागली. एचएमटीच्या ज्या उच्च अधिका-यांनी हे काम स्वीकारले होते ते बदलून किंवा नोकरी सोडून गेले होते आणि त्यांच्या जागी आलेल्या अधिका-यांना या कामात इंटरेस्ट नव्हता. सुरुवातीला जमवलेली टीमही त्यांनी मोडून टाकली आणि कोणी वाली नसल्यामुळे ते काम जास्तच रेंगाळायला लागले. याबद्दल जनरल मॅनेजरशी थोडे खडसावून बोलण्यासाठी नटराजन त्यांच्याकडे गेले तर त्यांनी भेटही दिली नाही. इतकी मिन्नतवारी करून आणि महाप्रयत्नाने एचएमटीबरोबर केलेले हे काँट्रॅक्ट रद्द करण्याचा निर्धार करून यावेळी ते परत आले. आल्यानंतर सविस्तर आकडेवारीसह या कामाचा संपूर्ण अहवाल तयार केला आणि त्यांच्या बॉसपुढे तो ठेऊन त्याला आपले म्हणणे पटवून दिले आणि त्यांच्यामार्फत उच्चपदस्थ अधिका-यांची मंजूरी मिळवली. अर्धवट केलेले काम आणखी कोणाकडून पुरे करून घेणे अत्यंत अडचणीत आणणारे होते आणि ते करण्यासाठी एकही पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे त्या कामाचे अनेक लहान लहान भाग केले आणि निरनिराळ्या कंपन्यांकडून किंवा आमच्या वर्कशॉपमधून ते करवून घेतले. या सर्वांची जुळणी साईटवरच एक वेगळी शेड उभारून त्यात केली. हे करतांना त्यांनी दाखवलेले धाडस, आत्मविश्वास, चिकाटी, कौशल्य वगैरे गुण अशा कसोटीच्या क्षणांमुळेच लोकांना समजले. त्या कालखंडात त्यांना कोणाकोणाकडून काय काय ऐकून घ्यावे लागले होते, किती मनस्ताप झाला होता, किती टेन्शन निर्माण झाले होते, त्यांच्यावर किती प्रेशर आले होते, तरीसुध्दा ते आपले काम शांतपणे करत होते आणि आम्हाला त्या ज्यूनियर मंडळींना थोडीसुध्दा झळ लागू दिली नव्हती.
———————————————————————————————————————————————————-

तेथे कर माझे जुळती १३ – ए.नटराजन (भाग ३)

आमच्या राजस्थानमधल्या पॉवर प्रॉजेक्टसाठी कॅनडाबरोबर टेक्निकल कोलॅबोरेशन होते आणि त्यांच्याकडून मोठे कर्जही मिळाले होते. पण त्याच्या पाठोपाठ तसाच दुसरा पॉवर प्रॉजेक्ट मद्रासजवळ कल्पकम इथे उभारला गेला तो पूर्णपणे स्वतःच्या प्रयत्नांमधून. त्यानंतर नरोरा इथे उभारलेल्या नव्या स्वरूपाच्या पॉवर प्रॉजेक्टच्या पायापासून शिखरापर्यंत पूर्ण डिझाइन आम्ही केले आणि त्यात सुधारणा करून काक्रापार, कैगा आणि पुन्हा कोटा या ठिकाणी वीजकेंद्रे उभारली. यातल्या प्रत्येक पायरीवर आमच्या कामाचे स्वरूप, व्याप आणि जबाबदारी यात भर पडत गेली. त्याचबरोबर अनेक नवे सहकारी आले आणि ऑफीसचा विस्तार होत गेला. नटराजन यांच्या समवयस्क अधिका-यांपैकी काही जणांची बदली झाली, काही जण नोकरी सोडून तर काही हे जगच सोडून गेले. त्या लोकांकडे असलेल्या कामाचा काही भाग दर वेळी नटराजन यांना सोपवण्यात आला आणि ऑफिसातले त्यांचे स्थान उंचावत गेले. आमच्या ऑफिसचे रिस्ट्रक्चरिंग किंवा रिऑर्गनायझेशनही होत होते. त्यात काही नवे ग्रुप किंवा सेक्शन बनले, काही जुन्या गटांचे विसर्जन किंवा विभाजन झाले. माझ्याकडे असलेल्या कामातही वाढ होत गेली, काही वेळा त्यातले काही काम काढून दुस-या ग्रुपकडेही दिले गेले. पण आश्चर्याची गोष्ट अशी की जवळजवळ तीस वर्षे मी मात्र सलगपणे नटराजन यांनाच डायरेक्टली रिपोर्ट करत राहिलो. याला योगायोग म्हणायचा की आणखी काही हे मलाही समजले नाही. माझ्या बॅचमधील इतर सगळ्या मुलांनी कधी ग्रुप बदलले, तर कधी त्यांचे बॉस बदलले गेले, पण माझ्या बाबतीत तसे कधीच झाले नाही. जेंव्हा नटराजन यांना बढती मिळून वरची जागा मिळाली तेंव्हा त्यांची जागा मला मिळत गेली. मी त्यांच्यारोबर काम करायला सुरुवात केली त्या वेळी आम्ही फक्त दोघेच होतो. ते रिटायर झाले तेंव्हा शंभराहून जास्त माणसे त्यांच्या हाताखाली काम करत होती, त्यातले पंधरा वीस जण माझ्याहून वयाने मोठे आणि ग्रेडने सीनियर होते, पण त्यातल्या कोणाला आमच्या दोघांच्या मध्ये आणले गेले नाही. अधिकारी आणि त्याचा सहाय्यक अशा कोणत्याही एका जोडीने सलगपणे इतकी वर्षे मिळून काम केल्याचे असे दुसरे उदाहरण आमच्या ऑफिसमध्ये झाले नाहीच, पण माझ्या माहितीतल्या इतर कोणत्याच संस्थेत असे घडले नाही. कदाचित हा एक प्रकारचा जागतिक विक्रम असण्याचीसुध्दा शक्यता आहे.
 या दीर्घ सहवासामुळे आम्हा दोघांनाही एकमेकांच्या व्यक्तीमत्वाचे निरनिराळे पैलू समजत गेले. नटराजन यांचे इंग्रजी भाषेवर एका निराळ्या प्रकारचे उत्तम प्रभुत्व होते. ते कधीही वाङ्मयीन किंवा काव्यात्मक भाषेत बोलत नसत. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक यासारखे अलंकार, म्हणी, वाक्प्रचार, कोटेशन्स वगैरे कशाचाही त्यांच्या बोलण्यात समावेश होत नसे, ते कधीही द्व्यर्थी शब्द उच्चारत नसत, पण जे काही सांगत ते अत्यंत नेमकेपणाने, सोप्या भाषेत, लहान वाक्यांमध्ये आणि स्पष्टपणे सांगत. त्यांनी बोललेला एकादाही शब्द मला समजला नाही आणि त्याचा अर्थ विचारावा लागला असे कधीच झाले नाही. मोघम स्वरूपाची किंवा ‘पण,’ ‘परंतु,’ ‘किंबहुना’ अशी अव्यये जोडून गोंधळात टाकणारी परस्पर विरोधी विधाने त्यांच्या बोलण्यात येत नसत. सुरुवातीला मला त्यांच्याइतके अचूक बोलता येत नसे. तरीही जसे त्यांचे बोलणे मला व्यवस्थित समजत असे तसेच मला काय सांगायचे आहे ते त्यांना कळत असे. त्यांचे बोलणे ऐकून हळूहळू मी त्यातून शिकत गेलो. त्यांच्या बोलण्याचा एक मोठा गुण असा होता की त्यात चुकूनसुध्दा एकही अपशब्द येत नसे. अमेरिकेत राहूनसुध्दा तिथली स्लँग त्यांनी उचलली नव्हती. अत्यंत नाठाळ माणसाच्या हट्टीपणाला किंवा आडमुठेपणालासुध्दा “नरकात जा.” (गो टू हेल) इतकी सौम्य रिअॅक्शन सुध्दा त्यांनी देतांना मी ऐकले नाही. मनुष्यस्वभावाप्रमाणे त्यांनाही राग येत असे, पण तोसुध्दा आरडाओरड, आदळ आपट, हातवारे यातले काहीही न करता ते सभ्य शब्दांमध्ये आणि ठामपणे व्यक्त करत असत. वेळप्रसंगी गरज पडल्यास ते आम्हाला चांगले फैलावर घेत असत, पण तरीही अपमानास्पद वागणूक देत नसत. त्यामुळे सर्वांना त्यांची जरब वाटत असे पण त्यांचा राग येत नसे.

जसे त्यांचे बोलणे मोजून मापून होते तसेच किबहुना त्याहूनही जास्त अचूकपणा त्यांच्या लिहिण्यात येत असे. आमच्या ऑफिसच्या प्रथेनुसार सुरुवातीच्या काळात आमच्या कामासंबंधी बाहेरच्या जगाशी होणारा सर्व पत्रव्यवहार त्यांच्या नावानेच होत असे. बाहेरून आलेली पत्रे त्यांच्याच नावाने येत आणि विषय पाहून त्या कामाशी निगडित असलेल्या सहाय्यकाकडे ते पाठवून देत. आलेल्या पत्राचा अभ्यास करून त्याच्या उत्तराचा मसूदा (ड्राफ्ट) घेऊनच मी त्यांच्याकडे जात असे. त्यातले अक्षरन् अक्षर वाचून त्यात व्याकरणातल्या चुका सापडल्या तर ते सुधारत असतच, शिवाय त्यातली शब्दरचना, वाक्यरचना यामधून नेमका अर्थ निघतो, त्याचा कोणी अनर्थ करू शकणार नाही याची काळजी घेत. त्यांनी वापरलेले शब्द आमच्या ओळखीचेच असले तरी ते जास्त योग्य असत. आम्हाला सुचलेल्या शब्दामधून वेगळ्या छटा निघण्याची शक्यता असे तशी त्यांनी केलेल्या दुरुस्तीमध्ये नसे. टेक्निकल स्पेसिफिकेशन्स लिहितांना अचूक शब्द वापरणे अत्यंत महत्वाचे असते. त्यात मोघमपणा आला तर गोंधळ उडण्याची शक्यता असल्यामुळे ते या बाबतीत खूप काळजी घेत असत.

 त्यांचे वागणेसुध्दा असेच काटेकोरपणाचे असायचे. ते ऑफीसमध्ये नेहमी वक्तशीरपणे येत आणि ऑफीसची वेळ संपल्यानंतर हातातले काम पूर्ण करून घरी जात असत, पण त्याचा देखावा करत नसत. ऑफीसमध्ये ते कधीही इतर विषयांवर बोलत नसत. कामाच्या वेळात चार मित्र किंवा सहका-यांना जमवून त्याच्यासोबत राजकारण, क्रीडा, सिनेमा, शेअर मार्केट अशा अवांतर विषयावर गप्पा मारणे त्यांना आवडत नव्हते. त्यांना ऑफिसचे काम सोडून कोणत्या विषयात रस होता हे मला इतक्या वर्षांच्या सहवासात कधीच कळले नाही. नाटक, सिनेमा, संगीत वगैरेंचा आस्वाद घेण्यासाठी ज्या ठिकाणी मी जात होतो त्यात कोठेही आमची कधीच गाठ पडली नाही. यात भाषेचा प्रश्नही होताच, कारण मी फक्त मराठी आणि हिंदी भाषेमधील कार्यक्रमांना हजर असत होतो आणि चाळीस वर्षे मुंबईत राहूनसुध्दा नटराजन यांना या दोन्ही भाषांमध्ये गोडी निर्माण झाली नव्हती. आमच्या ऑफिसचे काम इंग्रजीमधून चालत असले तरी सहका-यांबरोबर बोलणे बहुतेक वेळा हिंदीमध्येच होत असे. दक्षिण भारतीय आणि बंगाली भाषिक लोकसुध्दा त्यात सहभागी होत असत. पण ऩटराजन यांना मात्र इंग्लिश किंवा तामीळ सोडून इतर कोणत्याही भाषेत बोलतांना मी ऐकले नाही. बाजारात ते काय करत होते कोण जाणे.

त्यांना कसलेही व्यसन नव्हतेच, मद्य किंवा सिगरेटला ते मौज मजा म्हणूनदेखील कधीही स्पर्श करत नव्हते. चहा कॉफी वगैरेचे सेवनसुध्दा अगदी माफक आणि त्यांच्या केबिनमध्येच होत असे. ते कोणाबरोबर कँटीनमध्ये बसून टाइमपास करत आहेत असे दृष्य डोळ्यासमोर येतच नाही. त्यांची विचार करण्याची पातळी थोडी वेगळी होती. एरर, मिस्टेक आणि ब्लंडर (क्षुल्लक चूक, चूक आणि घोडचूक) या शब्दांच्या अर्थांमधल्या सीमारेषा पुसट आहेत, प्रत्येक माणूस आपापल्या परीने त्यांच्या व्याख्या ठरवत असतो असे असले तरी सर्वसाधारणपणे त्याचा एक सर्वमान्य अंदाज असतो. पण ज्या गोष्टी इतरांना साध्या ह्यूमन एरर वाटत त्यात नटराजन यांना कधीकधी बेजबाबदारपणा किंवा निष्काळजीपणा दिसत असे आणि जाणूनबुजून आळसामुळे किंवा दुष्टपणामुळे केलेल्या लहान सहान चुका त्यांच्या दृष्टीने गुन्हा असायचा. हा फरक माहीत नसलेल्या लोकांना ते तापट किंवा खडूस वाटत असत, पण त्यामुळे त्यांच्याविषयी पहिल्यांदा आढी निर्माण झाली तरी सहवासानंतर ती निघून जात असे. ते स्वतः कुणाबद्दलच मनात खुन्नस बाळगून त्याच्याशी सूडबुध्दीने वागत नव्हते.

 नटराजन यांच्या बोलण्यात मला कधीच एकादे संस्कृत सुभाषित आलेले आठवत नाही, पण कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषुकदाचन ही गीतेमधील ओळ ते प्रत्यक्ष जगत होते. ऑफिसात वाट्याला आलेले काम एवढाच कर्म या शब्दाचा अर्थ घेतला तर ते पूर्ण करण्यासाठी जे काही शक्य असेल ते करायचे एवढेच त्यांना माहीत होते. दर महिन्याला मिळणारा पगार आणि इतर सुखसोयी एवढे फळ त्यांना पुरेसे वाटत होते. निदान असे ते आम्हाला सांगत असत. “कर्तव्य (ड्यूटी) आणि भावना (इमोशन्स) यात गल्लत करू नकोस.” असे ते मला नेहमी बजावत असत आणि त्यांच्या वागण्यात ते दिसत असे. त्यामुळे कामात अडचणी आल्या तर ते विचलित होत नसत, त्या अचानक आल्या तर त्यांना धक्का बसत नसे, काम कसे पार पडेल याची चिंता करण्यात वेळ वाया घालवत नसत, अपयशाची भीती वाटत नसे, अपयश आले तर त्याचे जास्त वाईट वाटत नसे, त्यातून वैफल्य येत नसे आणि सगळे ठरवल्यासारखे झाले तर त्याचा खूप आनंदही होत नसे. तो सेलेब्रेट करावा असे वाटत नसे. एकादे लहानसे पण महत्वाचे काम पूर्ण केले किंवा त्यातला एक टप्पा पार केला म्हणून उत्साहाने त्यांना सांगायला गेलो तर त्याबद्दल पाठीवर शाबासकी मिळायच्या ऐवजी आणखी दोन नवी कामे गळ्यात पडण्याचीच शक्यता जास्त असे. माझे वडीलसुध्दा तोंडावर कधीच कौतुक करत नसत. त्यामुळे मला याची सवय होती. पण माझा स्वभाव वेगळा होता. मला माझ्या कामाबद्दल भावनिक एकात्मता (इमोशनल अटॅचमेंट) निर्माण झाल्याशिवाय रहात नसे. उत्साह, आतुरता, भय, चिंता, प्रेम, आपलेपणा, आशा, निराशा, आनंद, दुःख इत्यादी सर्व भावनांचा प्रत्यय मला माझ्या कामामधून मिळत होता. नटराजन एवढे स्थितप्रज्ञ कसे होऊ शकत हे मला अखेरपर्यंत गूढ राहिले.
 माझ्या मनावर लहानपणी आईवडिलांकडून जेवढे संस्कार झाले त्यानंतर सर्वात जास्त प्रभाव कोणाचा पडला असेल तर तो नटराजन यांचाच. ते माझे सर्वार्थाने मेंटॉर होते. माझ्या कामामध्ये सुरुवातीच्या काळात ते सतत माझ्यासोबत होते. त्यांनी लावलेले वळण मला लागले आहे हे पाहून त्यांनी हळूहळू आपला हात हलकेच सोडवून घेतला. नटराजन यांच्यावर पडत गेलेल्या इतर जबाबदा-यांबरोबर ती कामे करणारे इतर सहकारीही त्यांच्या हाताखाली येत गेले, तसेच आमच्या मुळातल्या कामाचा व्यापही वाढत गेल्यामुळे त्यासाठी अनेक नवे सहकारी नेमले गेले. यामधील प्रत्येक सहका-याला भरपूर वेळ देणे नटराजन यांना अशक्य होत गेले. नव्या लोकांचे सांगणे आणि त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्यावरील आपले म्हणणे त्यांना पटवून देणे यासाठी त्यांना जास्त वेळ द्यावा लागत असे, पण आमच्यातला सुसंवाद जमला असल्यामुळे माझे काम पटकन उरकत असे. त्यानंतर माझ्या कामात मला जेवढे स्वातंत्र्य मिळत गेले तेवढे इतरांना मिळत नसल्यामुळे त्यांना माझा हेवा वाटत असे.
 ऑफिसमध्ये आमचे इतके चांगले सूत जमलेले असले तरी व्यक्तीगत आयुष्यात आमची कधीही जवळीक झालीच नाही. या बाबतीत ते जितके अलिप्तपणे वागायचे तसाच अलिप्तपणा त्यांच्याबाबतीत मीही दाखवत राहिलो. त्यांच्या शिस्तप्रिय वागण्यामुळे त्यांचे कोणतेही वैयक्तिक काम मला करायला त्यांनी कधीच सांगितले नाही. त्यानिमित्याने त्यांच्या घरी जाण्याची वेळ आली नाही. कधीही सहज भेटायला म्हणून त्यांनी आपल्या सहका-यांना घरी बोलावले नाही आणि मीही अगांतुकपणे कधी त्यांच्या घरी गेलो नाही. काही विशिष्ट कारणानिमित्यानेच शिष्टाचार पाळण्यासाठी एक दोन वेळा आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो आणि एकदा ते सहकुटुंब आमच्या घरी आले होते. आम्ही एकाच उपनगरात रहात नसल्यामुळे रस्त्यात किंवा बाजारात भेट होण्याची शक्यताही फार कमी होती. ऑफिसमधील स्नेहसंमेलने, पिकनिक यासारख्या मेळाव्यांमध्ये ते सहभागी होत नसत. इतर काही ग्रुपमधले उत्साही लोक मुद्दाम असे मेळावे घडवून आणत, पण नटराजनसाहेबांनी अशा कल्पनेला कधी पाठिंबा दिला नाही. त्यामुळे आमचे व्यक्तीगत संबंध घनिष्ठ झालेच नाहीत.
 ते सेवानिवृत्त होऊन गेल्यानंतर माझा त्यांच्याबरोबर कसलाच संपर्क राहिला नाही. क्वचित कुठेतरी अचानक गाठ पडली आणि त्या वेळी “आपण मुद्दाम अमूक दिवशी अमूक ठिकाणी भेटू.” असे ठरवायचा विचार मनात आला तरी तशी कृती मात्र झाली नाही. “त्यांनी पुढाकार घेतला नाही तरी मला ते करायला हवे होते, त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटायला हवे होते, आयुष्यात एकदा तरी त्यांच्याबरोबर निवांतपणे बसून बोलायचे होते.” असे मला आता लाख वेळा वाटून काही उपयोग नाही. एक दिवस मी ऑफिसात असतांनाच अचानक एक फोन आला आणि “नटराजनसाहेब आपल्याला सोडून गेले.” ही धक्कादायक आणि क्लेशकारक बातमी समजली. त्याच्या आधी काही दिवस ते आजारी असल्याचे जरी मला कळले असते तर हातातली सगळी कामे बाजूला ठेऊन मी त्यांना भेटायला ते जिथे असतील तिथे गेलो असतो, मला तसे जायलाच हवे होते, पण ती संधीही मिळाली नाही. त्यांचे अखेरचे दर्शन घडले ते स्मशानातच.
पण त्यांनी मला घडवले असल्यामुळे त्यांची छटा माझ्या वागण्यात दिसून येते असे माझे जुने सहकारी मित्र मला सांगत. मी जीवंत असेपर्यंत ती दिसत राहणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: