पारंपरिक पध्दतीची गणपतीची गाणी (भाग १- ४)

पारंपरिक पध्दतीची गणपतीची गाणी – भाग १ (भूपाळ्या, अभंग, श्लोक)

(प्रकाशन: सप्टेंबर 5, 2016 एकत्रीकरण : १४-०५-२०१९)

मराठी संगीतातील लोकधारेला मोठी परंपरा आहे. कित्येक गाणी परंपरेने मागील पिढीकडून पुढील पिढीकडे चालत आली आहेत. काही गाणी संत किंवा शाहीरांनी लिहिली आहेत, तर आजच्या काळातील काही कवींनीसुध्दा लोकगीतांच्या शैलीमध्ये पद्ये रचली आहेत. प्रभातकाल मंगलमय करण्यासाठी गायिलेल्या भूपाळ्या, जात्यावरील ओव्या, मंगळागौर किंवा हदगा यासारखे स्त्रियांचे मेळावे, आरत्या, भजन, कीर्तन, भारुडे, तमाशामधील गण, गौळण, लावण्या, शाहीरांचे पोवाडे अशा विविध स्वरूपात हे लोकसंगीत ऐकायला मिळते. यामध्ये निरनिराळ्या प्रकारे आपल्याला गणपतीचे दर्शन होते.

माझ्या लहानपणी मी ऐकलेल्या आणि पाठ केलेल्या भूपाळ्यांमध्ये खालील दोन प्रमुख होत्या. सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात गणपतीच्या स्मरणाने करावी (म्हणजे दिवस चांगला जातो) ही शिकवण या दोन्ही गाण्यांमध्ये दिली आहे.

उठा उठा हो सकल जन, वाचे स्मरावा गजानन ।
गौरीहराचा नंदन, गजवदन गणपती ।।
ध्यानि आणुनि सुखमूर्ती, स्तवन करा एके चित्ती ।
तो देईल ज्ञानमूर्ती, मोक्ष सुख सोज्वळ ।।
जो निजभक्तांचा दाता, वंद्य सुरवरां समस्तां ।
त्यासी गाता भवभय चिंता, विघ्नवार्ता निवारी ।।
तो हा सुखाचा सागर, श्री गणराज मोरेश्वर ।
भावे विनवितो गिरीधर, भक्त त्याचा होऊनी ।।

पारंपारिक पध्दतीने कोणा गिरिधर कवीने वरील भूपाळी रचली आहे. त्याच्याविषयी काही माहिती नाही. गजाननाचे स्मरण आणि स्तवन केल्यामुळे भक्ताला कसा लाभ होतो याचेच वर्णन रामानंदांच्या या भूपाळीत आहे.
उठा उठा हो सकळिक, वाचे स्मरावा गजमुख ।
ऋद्धि-सिद्धींचा नायक, सुखदायक भक्तांसी ।।
अंगी शेंदुराची उटी, माथां शोभतसे कीरिटी ।
केशर कस्तूरी लल्लाटीं, कंठी हार साजिरा ।।
कानीं कुंडलांची प्रभा, सूर्य-चंद्र जैसे नभा ।
माजी नागबंदी शोभा, स्मरतां उभा जवळी तो ।।
कांसे पीतांबराची धटी, हाती मोदकांची वाटी ।
रामानंद स्मरतां कंठी, तो संकटी पावतो ।।

माझी आई ही भूपाळी पारंपारिक चालीवर म्हणत असे. पुढे लता मंगेशकरांच्या गोड आवाजात हे गाणे रेडिओवर मंगलप्रभात या कार्यक्रमात ऐकू येऊ लागले. हे कवी रामानंद कोणत्या काळात होऊन गेले की हे कोणा कवीचे टोपणनाव आहे हे मात्र माझ्यासाठी गूढच राहिले. या भूपाळीत गणपतीचे रूप आणि त्याने परिधान केलेली वस्त्रे अलंकार वगैरेंचे सविस्तर वर्णन करून शेवटी हा देव संकटसमय़ी पावतो असे आश्वासन दिले आहे.

ॐकार प्रधान रूप गणेशाचे हा संत तुकारामांनी लिहिलेला अभंग प्रसिद्ध आहेच.

ॐकार प्रधान रूप गणेशाचे । हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ॥१॥
अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णु । मकार महेश जाणियेला ॥२॥
ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्‍न । तो हा गजानन मायबाप ॥३॥
तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी । पहावी पुराणे व्यासाचिया ॥४॥

तुकोबानी गणेशाला उद्देशून याशिवाय आणखी काही अभंग लिहिले आहेत. यातला एक असा आहे.

गणराया लवकर येई, भेटी सकलासी देई ।।
अंगी शेंदुराची उटी, केशर कस्तुरी लल्लाटी ।।
पायी घागु-या वाजती, नाचत आले गणपती ।।
अवघ्या गणांचा गणपती, हाती मोदकाची वाटी ।।
तुका म्हणे शोधून पाहे, विठ्ठल गणपती दुजा नोहे ।।

तुकारामांचा दुसरा एक अभंग असा आहे.

धरुनिया फरश करी, भक्तांची विघ्ने वारी ।।
ऐसा गजानन महाराजा, त्याला नमस्कार माझा ।।
शेंदूर शमी बहु प्रिय त्याला, तुरा दुर्वांचा शोभला ।।
उंदीर असे ज्याचे वाहन, माथा जडित मुकुट पूर्ण ।।
नाग यज्ञोपवीत रुळे, शुभ्र वस्त्र शोभी साजरे ।।
भाव मोदक हारा भरी. तुका भावे पूजा करी ।।

तुकारामांनी असेही लिहिले आहे.

सिध्दीकांता चिंतामणी, माझी एका विनवणी ।।
घडो गणेशाचा संग, मनी रंगो बुध्दारंग ।।
चराचरी गजानन, माझे पाहोत नयन ।।
मायबापा सखया, तुका वंदीतो मोरया ।।

विठ्ठल आणि गणेश हे दो्ही एकच आहेत असे तुकारामांनी म्हंटलेले आहेच, सर्व देव एकच आहेत असे सांगतांना संत नामदेवांनी आपल्या अभंगात असे लिहिले आहे.

गणेश म्हणू तरी तुझाची देखणा, म्हणूनि नारायणा नमन तुज ।।
सारजा नमू तरी ते तुझी गायनी, म्हणूनि चक्रपाणी नमन तुज ।।
वेद नमू तरी तुझाचि स्थापिता, म्हणूनि लक्ष्मीकांता नमन तुज ।।
नामा म्हणे भेटी भेटी झाली पै राया, कोण गणो कोण गणो वा या सेवकासी ।।

जुन्या काळातील पंतकवींनी लिहिलेले श्लोक, आर्या वगैरे हा मराठी पद्याचा मोठा खजिना आहे. लहानपणी पाठ केलेला आणि अनेक वेळी म्हणून शाबासकी मिळवून देणारा हा श्लोक.

नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे ।
माथा शेंदुर पाझरे वरी वरी दुर्वांकुराचे तुरे ।
माझे चित्त हरे मनोरथ पुरे देखोनि चिंता नुरे ।
गोसावीसुत वासुदेव कवी रे या मोरयाला स्मरे ।।

गणेशाचे किती सुंदर वर्णन या श्लोकात केले आहे !
. . . . . . . . (क्रमशः)

पारंपरिक पध्दतीची गणपतीची गाणी – २ (तमाशातले गण)

(प्रकाशन: सप्टेंबर 6, 2016 एकत्रीकरण : १४-०५-२०१९)

कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात गणेशाचे स्मरण करून करण्याची पध्दत आहे. हदगा किंवा भोंडल्याची सुरुवात ‘ऐलोमा पैलोमा गणेशदेवा, माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा’ या गाण्याने करतात. कोणत्याही धार्मिक समारंभात अग्रपूजेचा मान गणपतीला असतो. आधी त्याची पूजा करून आपले ईप्सित कार्य निर्विघ्नपणे पार पडो अशी प्रार्थना त्याला करून नंतर सत्यनारायण किंवा महालक्ष्मी वगैरे मुख्य देवतेची पूजा सुरू होते. आरत्यांमध्ये सर्वात पहिली आरती ‘सुखकर्ता दुखहर्ता’ हीच असते. मराठी माणसांमध्ये ही आरती महाराष्ट्रगीतापेक्षासुध्दा जास्त लोकप्रिय आहे असे नक्की म्हणता येईल. इंग्लंड अमेरिकेला गेलेल्या मराठी लोकांनी ही आरतीसुध्दा साता समुद्रापलीकडे नेलेली आहे.

तमाशांची सुरुवात गण नावाच्या काव्याने होते. गणपतीचे स्तवन करून त्याची प्रार्थना या गाण्यात केली जाते. पेशवाईच्या काळात होऊन गेलेल्या पठ्ठेबापूराव यांनी रचलेला एक गण असा आहे.

आधी गणाला रणी आणला, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना ।। जी ई ई ..जी ई ई ..जी ईईई ।।

पुढे शारदा आणि सद्गुरूंचे स्मरण करून झाल्यानंतर पठ्ठे बापूराव म्हणतात,

माझ्या मनाचा मी तू पणाचा, जाळून केला चुना चुना ।
पठ्ठेबापूराव कवि कवनाचा, हा एक तुकडा जुना जुना ।। जी ई ई ..जी ई ई ..जी ईईई ।।
नाहीतर रंग पुन्हा सुना सुना ।।
——-
शाहीर साबळे यांनी त्यांच्या खड्या आवाजात गाऊन अजरामर केलेले दोन पारंपरिक गण असे आहेत.

पयलं नमन हो करितो वंदन, पयलं नमन हो पयलं नमन ।
तुम्ही ऐका हो गुणिजन, आम्ही करितो कथन ।।
अरे हो हो हो हो हो हो हो…..

पयलं नमन करुनी वंदन, इडा मांडून, इडा देवाला, इडा गावाला, इडा पाटलाला, आणि इडा मंडळिला ।।

आम्ही सांगतो नमन, तुम्ही ऐका हो गुणिजन, पयलं नमन हो पयलं नमन ।
आम्ही सांगतो कथन, तुम्ही ऐका हो गुणिजन ।।
अरे हो …..

विस्कटली हरा आम्ही घेत फुले, अज-गज-गौरीवर चवरी डुले ।
विस्कटली हरा आम्ही घेत फुले ।।

लहान मुलं-मुली जमून चिमुकाली, खेळ भातुकलीचा खेळताना नकली ।
अकलेच्या चिखलात नेत्र खुले, विस्कटली हरा आम्ही घेत फुले ।।

गणपती आला अन्‌ नाचुन गेला रं, गणपती आला अन्‌ नाचुन गेला ।
नटवार पार मांग झाला रं, गणपती आला अन्‌ नाचुन गेला ।।
अरे हो …..

पयलं नमन हो करितो वंदन, पयलं नमन हो पयलं नमन ।।

या गणात गणपतीचे फारसे वर्णनही नाही की प्रार्थनाही नाही. फक्त त्याची आठवण काढून त्याला नमन केले आहे एवढेच.
——
महाराज गौरीनंदना, अमर वंदना, दैत्यकंदना, हे मंगलमूर्ती ।
ठेव कृपा दृष्टी एकदंत दीनावर पुरती ।।

हे स्वयंभू शुभदायका, हे गणनायका, गीत गायका, अढळ दे स्फूर्ति ।

भवसमुद्र जेणे करून सहजगती तरती ।।
म्हणवून लागतो चरणी हे गजमुखा ।
दे देवा निरंतर स्मरणीच्या मज सुखा ।
दूर करी अंत:करणीच्या बा दु:खा ।
जय हेरंब लंबोदरा, स्वरूप सुंदरा, स्वामी सहोदरा, हे विघ्न निवारी ।
मज रक्षी रक्षी सहकुटुंब सहपरिवारी ।।

तिन्ही त्रिकाळ गण गंधर्व न करिता गर्व साधुनी पर्व सर्व देवांनी ।

आळविली तुला गाऊन मधूर ही गाणी ।।
हे प्राणी प्राण तव स्मरणाने जगवती ।
शशिसूर्य तुझ्या बळ भरणाने उगवती ।
हे धन्य धन्य अन्नपूर्णे श्री भगवती ।
कविराज असा हा दक्ष, सेवेमध्ये लक्ष, तयाचा पक्ष, धरुन मज तारी ।
महादेव प्रभाकर रक्षी या अवतारी ।।
महाराज गौरिनंदना हो महाराज गौरिनंदना ।।

हा गण मात्र अगदी एकाद्या स्तोत्रासारखा वाटतो. त्यातील संस्कृतप्रचुर भाषा पाहून हा तमाशाचा भाग असेल असे वाटतच नाही. शिवाय प्रास, यमके वगैरे छान जुळवली आहेत.
——-

लावणीप्रधान चित्रपटात देखील छान छान गण लिहिले गेले आहेत, उदाहरणार्थ हे दोन गण. श्रीगणेशाला अभिवादन करून आपला खेळ चांगला होऊ दे, त्यातील कलावंतांचे कौतुक होऊ दे, त्यांना यश, कीर्ती, संपत्ती वगैरे मिळून त्यांची भरभराट होऊ दे, अशी प्रार्थना या दोन्ही गणात केली आहे.

हे गणनायक सिद्धीविनायक, वंदन पहिले तुला गणेशा ।
रसीकजनांनी भरले अंगण, व्हावे मनाच्या त्यांच्या रंजन,
लवकर यावे दर्शन द्यावे, घ्यावे जवळी एकच आशा ।।

चाळ बोलती छुनछुन पायी, जणू अवतरली इंद्रसभा ही,
गुणवंतांचा आश्रय मिळतो, किर्तनरूपी असे तमाशा ।।

मेळा जमला ताल-सुरांचा, रंग उधळला शिणगाराचा,
दिनरातीला जागत राहो, जनसेवेतून अमुचा पेशा ।।
—-

हे शिवशंकर गिरीजा तनया गणनायका प्रभुवरा।

शुभकार्याच्या शुभ प्रारंभी नमन तुला ईश्वरा ।।
प्रसन्न होऊनी विघ्न हरावे, नम्र कलेचे सार्थक व्हावे ।
तुझ्या कृपेने यश कीर्तीचा बहर येऊ दे भरा ।।
वंदन करुनी तुजला देवा, रसिक जनांची करितो सेवा ।
कौतुक होऊनी आम्हा मिळवा सन्मानाचा तुरा ।।

. . . . . . . . . .. . . . . . (क्रमशः)

पारंपरिक पध्दतीची गणपतीची गाणी – ३ (कोळीगीते, नांदी)

(प्रकाशन : सप्टेंबर 6, 2016, एकत्रीकरण : १४-०५-२०१९)

कोळीगीते हा एक अत्यंत आकर्षक असा लोकगीतांचा प्रकार आहे. त्यातल्या ठेक्यावर आपोआप पावले थिरकायला लागतात. मल्हारी, एकवीरा आई वगैरे कोळी मंडळींची दैवते आहेत आणि असली तर बहुधा त्यांचीच स्तुती कोळीगीतांमध्ये असते. पण कोळीगीतांसारख्या ठेक्यावर आणि ठसक्यात गायिलेले गणपतीचे हे गाणे तुफान लोकप्रिय झाले होते आणि अजूनही आहे.

तुच सुखकर्ता तुच दु:खहर्ता, अवघ्या दीनांच्या नाथा ।
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा ।।

पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्षाने एकदाच हर्ष ।
गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा जाणुनी हा परामर्श ।
पुऱ्या वर्षाची, साऱ्या दु:खाची, वाचावी कशी मी गाथा ।।
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा ।।

पहा आली कशी आज वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ ।
गुळ-फुटाणे-खोबरं नि केळ, साऱ्या प्रसादाची केली भेळ ।
कर भक्षण आणि रक्षण तूच पिता अन्‌ तूच माता ।।
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा ।।

नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे ।
हाल ओळख साऱ्या घरांचे, कधी येतील दिवस सुखाचे ?
सेवा जाणुनी, गोड मानुनी, द्यावा आशीर्वाद आता ।।
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा ।।

या गाण्यातील कारुण्याचा भाव हृदयद्रावक आहे. वर्षभरातून एकदा गोड अन्नाचा स्पर्श होतो आहे आणि को सुध्दा गुळ-फुटाणे-खोबरं नि केळं यांचा. केवढी दैन्यावस्था ? पण अशा परिस्थितीतसुध्दा मायबाप गजाननावर अमाप श्रध्दा आहे, यातून तोच बाहेर काढेल, दुःखांचा नायनाट करेल आणि सुखाचे दिवस आणेल असा विश्वास आहे.
——

मराठी कोळीगीते आणि गुजराथी गरबा या दोघांचीही आठवण करून देणाऱ्या ठेक्यावरले एक गाणे एका काळी लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोचले होते आणि अजूनही गणेशोत्सवात ऐकायला हमखास मिळते. ते आहे.

अशी चिक्क मोत्यांची माळ होती ग तीस तोळ्यांची ग ।
जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा हो ।।

या चिक्कमाळेला रेशमी मऊ दोरा ग ।
मऊ रेशमाच्या दौऱ्यात नवरंगी माळ ओविली ग ।। १।।

अशा चिक्कमाळेला हिऱ्याचे आठआठ पदर गं ।
अशी तीस तोळ्याची माळ गणपतीला घातली गं ।। २।।

मोरया गणपतीला खुलुन माळ शोभली ग ।
अशी चिक्क माळ पाहून गणपती किती हसला गं ।। ३।।

त्यानं गोड हासूनी गोड आशीर्वाद दिला गं ।
चला करू या नमन गणरायाला गं ।। ४।।

या गाण्याचा आशय अगदी साधा आहे. एक अनमोल अशी हिऱ्यामोत्यांची माळ करून गणपतीला घातली, ती त्याला शोभून दिसली आणि त्याने प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला वगैरे गोष्टी इतक्या सहजपणे सांगितल्या आहेत की ते गाणे ऐकायला मजा वाटते आणि ठसकेदार उडत्या चालीमुळे गुणगुणावेसे वाटते.
—-

सगळ्या कामांची सुरुवात गणेशाचे स्मरण करून करायची पध्दत असली तरी मराठी नाटकांच्या सुरुवातीला नटवराला नमन करण्याचा पायंडा आपल्या आद्य नाट्याचार्यांनी पाडला आहे. सव्वाशे वर्षांपूर्वीच्या संगीत शाकुंतल या नाटकातली नांदी आजही ऐकायला मिळते.

पंचतुंड नररुंडमाळधर पार्वतीश आधीं नमितो ।
विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपति मग तो ॥

यात नटेश्वर शंकराला आधी वंदन केल्यानंतर लगेच विघ्नविनाशक गणपतीचे आवाहन करून आपले नाटक निर्विघ्नपणे पार पडावे अशी त्याला विनंती केली आहे. ‘सबकुछ बाळ कोल्हटकर’ या पध्दतीने त्यांनी सादर केलेल्या नाटकांमध्ये ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकाला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. गणेशावर श्रध्दा हा या नाटकाचा विषयच असल्यामुळे त्याच्या शीर्षकगीतात गणपतीची भक्ती येणारच. हे गीत आहे.

गजाननाला वंदन करूनी, सरस्वतीचे स्तवन करोनी,
मंगल शिवपद मनी स्मरोनी. सद्भावाने मुदित मनाने,
अष्टांगांची करूनि ओंजळ, वाहतो ही दुर्वांची जुडी ।।

अभिमानाला नकोच जपणे, स्वार्थासाठी नकोच जगणे,
विनम्र होऊन घालव मनुजा, जीवन हे हर घडी ।।
वाहतो ही दुर्वांची जुडी ।।

विघ्न विनाशक गणेश देवा, भावभक्तीचा हृदयी ठेवा,
आशिर्वाद हा द्यावा मजला, धन्य होऊ दे कुडी ।।
वाहतो ही दुर्वांची जुडी ।।

पार्वती नंदन सगुण सागरा, शंकर नंदन तो दुःख हरा,
भजनी पुजनी रमलो देवा, प्रतिमा नयनी खडी ।।
वाहतो ही दुर्वांची जुडी ।।

या गीतात गणपतीविषयी भक्तीभाव आहेच, शिवाय निस्वार्थ, निरभिमान आणि विनम्र वागणूक ठेवावी असा हितोपदेशसुध्दा आहे.

. . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

पारंपरिक पध्दतीची गणपतीची गाणी – ४ (अष्टविनायक चित्रपटगीते)

(प्रकाशन : सप्टेंबर 7, 2016 एकत्रीकरण : १४-०५-२०१९)

काशी आणि रामेश्वर ही सर्वात मोठी पवित्र देवस्थाने आहेत असे मी लहानपणी ऐकले होते. त्यांच्या खालोखाल पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरची अंबाबाई, गाणगापूरचा दत्त वगैरे देवस्थानांमध्ये पुळ्याच्या गणपतीचे स्थानही होते. मी पुण्याला असतांना कसबा पेठेतील गणपती आणि मुंबईला आल्यानंतर टिटवाळ्याच्या गणपतीचे महात्म्य ऐकले. प्रभादेवीचा सिध्दीविनायक हा तर आमचा नेहमीचा सुखकर्ता दुखहर्ता झाला. अडचणींच्या किंवा आनंदाच्या बहुतेक प्रसंगी आम्ही त्याचे दर्शन घ्यायला जात असू. या स्थानांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात गणपतीची आठ प्रमुख देवस्थाने आहेत आणि त्यांना अष्टविनायक म्हणतात हे मात्र लहानपणी कधीच माझ्या कानावर आले नव्हते. यातील बहुतेक स्थाने खेडोपाड्यात आहेत. पूर्वीच्या काळात ग्रामीण भागातील रस्त्यांची परिस्थिती दारुण होती आणि वाहतुकीच्या साधनांचा अभाव होता. त्यामुळे माझ्या माहितीत तरी कोणीही या अष्टविनायकांची यात्रा केल्याचे मी ऐकले नव्हते. पण १९७९ साली अष्टविनायक नावाचा एक चित्रपट आला आणि त्याने अमाप लोकप्रियता मिळवली. त्या चित्रपटाच्या द्वारे अष्टविनायकांना भरपूर प्रसिध्दी मिळाली. त्यातील कथानायकाला जसा गणेशकृपेचा लाभ मिळाला तसा आपल्याला व्हावा या इच्छेने असंख्य भाविकांना अष्टविनायकाची यात्रा करण्याची प्रेरणा मिळाली. सर्व यात्रा कंपन्यांनी त्यासाठी खास पॅकेज टूर्स बनवल्याच, इतर अनेक लोकसुद्धा अशा यात्रांचे आयोजन करायला लागले. माझे एक जवळचे आप्त त्यांची नोकरी सांभाळून सप्ताहांतात (वीक एंड्सना) भाविक यात्रेकरूंना अष्टविनायकांचे दर्शन घडवून आणत होते.

या चित्रपटाला जे प्रचंड यश मिळाले त्यात त्यातील गाण्यांचा फार मोठा वाटा आहे. यातील तीन अजरामर गाणी आजदेखील गणेशोत्सवात जागोजागी ऐकायला मिळतात.

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता,
मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया ।।

ओंकारा तू, तू अधिनायक , चिंतामणी तू, सिद्धिविनायक,
मंगलमूर्ती तू भवतारक, सर्वसाक्षी तू अष्टविनायक,
तुझ्या कृपेचा हात मस्तकी, पायी तव मम चिंता ।।
मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया ।।

देवा सरू दे माझे मीपण, तुझ्या दर्शने उजळो जीवन ।
नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण ।
सदैव राहो ओठांवरती, तुझीच रे गुणगाथा ।।
मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया ।।

पं. वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांनी गायिलेले हे गोड गाणे भक्तीगीतांच्या पठडीतले आहे. त्यात थोडी गणेशाची स्तुती करून त्याची कृपादृष्टी आपल्याकडे वळावी, आपले जीवन उजळून निघावे अशी प्रार्थना केली आहे. अशा प्रकारची कांही गाणी मी आधी लिहिलेल्या गणेशोत्सवावरील लेखात चित्ररूपामध्ये दिली होती. पं.वसंतराव देशपांडे यांनीच गायिलेल्या पुढील गाण्यात शास्त्रीय संगीतातील यमन रागाचे विलोभनीय दर्शन घडवले आहे. हे गाणे एकादे नाट्यगीत वाटावे इतके क्लासिकल ढंगाचे आहे. यात गणपतीच्या अनेक रूपांचे वर्णन आणि स्तुती यांना प्राधान्य आहे आणि मागणे जरा कमी आहे.

प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना, गणराया ।।

विघ्नविनाशक, गुणिजन पालक, दुरीत तिमीरहारका ।
सुखकारक तू, दुःख विदारक, तूच तुझ्यासारखा ।
वक्रतुंड ब्रम्हांड नायका, विनायका प्रभूराया ।।

सिद्धी विनायक, तूच अनंता, शिवात्मजा मंगला ।
सिंदूर वदना, विश्वाधीशा, गणाधिपा वत्सला ।
तूच ईश्वरा साह्य करावे, हा भवसिंधू तराया ।।

गजवदना तव रूप मनोहर, शुक्लांबर शिवसूता ।
चिंतामणी तू अष्टविनायक, सकलांची देवता ।
रिद्धी सिद्धिच्या वरा, दयाळा, देई कृपेची छाया ।।

अष्टविनायक या सिनेमाच्या शीर्षकगीताने अनेक उच्चांक मोडले असावेत. जवळ जवळ वीस मिनिटे चालणारे (तरीही कंटाळा न आणणारे) इतके मोठे दुसरे एकही गाणे मला तरी माहीत नाही. हे गाणे अनेक गायक गायिकांनी मिळून गायिले आहे. त्यातील कडव्यांमध्ये लोकगीतांचे अनेक रंग पहायला मिळतात. सुरुवातीला अष्टविनायकांची नावे एका शार्दूलविक्रीडित वृत्तामधील श्लोकात दिली आहेत. हा श्लोक अनेक वेळा लग्नामधील मंगलाष्टकातसुध्दा म्हंटला जातो. किंबहुना कुर्यात सदा मंगलम् या अखेरच्या चरणावरून तो मंगलाष्टकांसाठीच लिहिला असावा असे वाटते. त्यानंतर एका कडव्यात गणपती या देवतेचे गुणगान केल्यानंतर प्रत्येक स्थानी असलेल्या मंदिराचे सुरेख वर्णन तसेच त्या विशिष्ट स्थानासंबंधीच्या आख्यायिका, तिथली वैशिष्ट्ये वगैरे एकेका कडव्यात दिली आहेत. ग्रामीण भाषेत सुलभ अशा वाक्यरचनेत केलेले हे वर्णन अप्रतिम आहे. नानांनी म्हणजे स्व.जगदीश खेबूडकरांनी हे इतके मोठे आणि सुरेख गीत एका रात्रभरात लिहून दिले असे सचिन याने अलीकडेच टीव्हीवरील एका कार्यक्रमात सांगितले. ते ऐकून आश्चर्याला पारावार उरला नाही. ठराविक वृत्त किंवा छंदामध्ये बध्द नसलेल्या या गाण्यातील कडव्यांना अनिल अरुण यांनी लोकगीतामधील निरनिराळ्या चाली लावल्या आहेत. यातले त्यांचे कौशल्य आणि त्याला दिलेली विविध वाद्यसंगीताची जोड सगळे काही लाजवाब आहे. अशा प्रकारचे गाणे क्वचितच जन्माला येत असते.

संस्कृत श्लोक

स्वस्तिश्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरसिद्धिदम्‌ ।
बल्लाळं मुरुडं विनायकमढं चिंतामणीं थेवरम्‌।
लेण्यांद्रिं गिरीजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरम्‌ ।
ग्रामोरांजणस्वस्थित: गणपती कुर्यात्‌ सदा मंगलम्‌ ।।

अष्टविनायकांचे वर्णन 

जय गणपती गुणपती गजवदना ।
आज तुझी पूजा देवा गौरीनंदना ।
कुडी झाली देऊळ छान, काळजात सिंहासन ।
काळजात सिंहासन, मधोमधी गजानन ।
दोहीकडे रिद्धिसिद्धि उभ्या ललना ।।
अष्टविनायका तुझा महिमा कसा ।
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा ।।१।।

गणपती, पहिला गणपती, मोरगावचा मोरेश्वर लई मोठं मंदिर ।
अकरा पायरी हो अकरा पायरी हो, नंदी कासव सभामंडपी नक्षी सुंदर ।
शोभा साजरी हो शोभा साजरी हो. मोरया गोसाव्यानं घेतला वसा ।।२।।
अष्टविनायका तुझा महिमा कसा ।।

गणपती, दुसरा गणपती, थेऊर गावचा चिंतामणी ।
कहाणी त्याची लई लई जुनी ।
काय सांगू डाव्या सोंड्याचं नवाल केलं सा-यांनी ।
विस्तार त्याचा केला थोरल्या पेशव्यानी ।
रमा बाईला अमर केलं वृंदावनी ।
जो चिंता हरतो मनातली चिंतामणी ।
भगताच्या मनी त्याचा अजूनी ठसा ।।३।।
अष्टविनायका तुझा महिमा कसा ।।

गणपती, तिसरा गणपती, सिद्धिविनायका तुझं सिद्धटेक गाव रं ।
पायावरी डोई तुझ्या भगताला पाव रं ।
दैत्यामारु कैकवार गांजलं हे नगर।
विष्णुनारायण गाई गणपतीचा मंतर ।
टापूस मेलं नवाल झालं टेकावरी देऊळ आलं ।
लांबरुंद गाभाऱ्याला पितळेचं मखर ।
चंद्र सूर्य गरुडाची भोवती कलाकुसर ।
मंडपात आरतीला खुशाल बसा ।।४।।
अष्टविनायका तुझा महिमा कसा ।।

गणपती, चौथा गणपती, पायी रांजणगावचा देव महागणपती ।
दहा तोंड हिचं हात जणू मूर्तीला म्हणती ।
गजा घालितो आसन डोळं भरुन दर्शन ।
सूर्य फेकी मूर्तीभर वेळ साधून किरण ।
किती गुणगान गावं किती करावी गणती ।
पुण्याईचं दान घ्यावं ओंजळ पसा ।।५।।
अष्टविनायका तुझा महिमा कसा ।।

गणपती, पाचवा गणपती, ओझरचा इघ्नेश्वर लांब रुंद होई मूर्ती ।
जड जवाहीर त्याचं काय सांगू शिरीमंती ।
डोळ्यामंदी माणकं हो हिरा शोभतो कपाळा ।
तहानभूक हरपती हो सारा बघून सोहळा ।
चारी बाजू तटबंदी मधी गणाचं मंदिर ।
इघ्नहारी इघ्नहर्ता स्वयंभू जसा ।।६।।
अष्टविनायका तुझा महिमा कसा ।।

गणपती, सहावा गणपती, लेण्याद्री डोंगरावरी नदीच्या तीरी ।
गणाची स्वारी तयार गिरिजात्मक हे नाव ।
दगडामंदी कोरलाय्‌ भक्तिभाव ।
रमती इथे रंका संगती राव ।
शिवनेरी गडावर जल्म शिवाचा झाला हो ।
लेण्याद्री गणानी पाठी आशिर्वाद केला हो ।
पुत्राने पित्याला जन्माचा प्रसाद दिला हो ।
किरपेने गणाच्या शिवबा धाऊनी आला हो ।
खडकात केले खोदकाम दगडात मंडपी खांब ।
वाघ सिंह हत्ती लई मोठं दगडात भव्य मुखवट ।
गणेश माझा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा ।
आणि गिरिजात्मज हा तिनं बनवला पुतळा मातीचा ।
दगडमाती रुपदेवाचं लेण्याद्री जसा ।।७।।
अष्टविनायका तुझा महिमा कसा ।।

सातवा गणपती राया, महड गावाची महसूर वरदविनायकाचं तिथं एक मंदिर ।
मंदिर लई सादसूद जसं कौलारू घर ।
घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची कळसाच्यावर ।
सपनात भक्ताला कळं देवळाच्या मागं आहे तळं ।
मूर्ती गणाची पाण्यात मिळं त्यानी बांधलं तिथं देऊळ ।
दगडी महिरप सिंहासनी या प्रसन्न मंगलमूर्ती हो ।
वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो ।
चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा ।।८।।
अष्टविनायका तुझा महिमा कसा ।।

आठवा आठवा गणपती आठवा,
पाली गावच्या बल्लाळेश्वरा आदिदेव तू बुद्धीसागरा ।
स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमूख सूर्यनारायण करी कौतुक ।
डाव्या सोंडेचे रूप साजिरे कपाळ विशाळ डोळ्यात हिरे ।
चिरेबंद या भक्कम भिंती देवाच्या भक्तीला कशाची भीती ।
ब्रम्हानंदी जीव होई वेडा की पिसा ।।९।।
अष्टविनायका तुझा महिमा कसा ।।

अखेर गणपतीच्या आठ नावांचा गजर
मोरया मोरया मंगलमूर्ती, मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया ।
मोरया मोरया चिंतामणी मोरया, मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया ।
मोरया मोरया महागणपती मोरया, मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया ।
मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया, मोरया मोरया वरदविनायक मोरया ।
मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया, मोरया मोरया अष्टविनायक मोरया ।।
. . . . . . . . . . . . . . . . (समाप्त)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: