जिवतीचा पट आणि कहाण्या

jivatiPatSmall

संपादन दि.२४-०७-२०२० : जिवतीच्या पटाची माहिती देणारा एक वॉट्सअॅपवर आलेला लेख आणि शुक्रवारच्या कहाण्यांवरील माझाच एक वेगळा लेख या लेखात समाविष्ट केले.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत श्रावण महिन्याला एक खास स्थान आहे. जिवतीचा पट आणि कहाण्या या दोन गोष्टींना हा महिनाभर विशेष महत्व प्राप्त होते. शहरातल्या वातावरणात आता पंचांगातल्या महिन्यांना महत्व राहिले नाही आणि जीवनातले सर्व व्यवहार कॅलेंडरबरहुकूम होत असल्यामुळे ते महिनेच बाजूला पडले आहेत असे चित्र दिसत असले तरी निदान ग्रामीण भागात आणि शहरातल्या कांही घरात अजून श्रावण महिना पाळला जातो. पूर्वी तो सरसकट सगळ्यांच्या घरी पाळला जात असे, आता एका बाजूने त्याचे प्रमाण कमी कमी होत आहे असे असले तरी परदेशात गेलेले मराठी लोकसुध्दा त्यातला कांही भाग पाळतात असेही मी पाहिले आहे.

श्रावण महिना लागताच देव्हा-याच्या बाजूला जिवतीच्या पटाची स्थापना होते. पूर्वी तो साध्या कागदावर काळ्या शाईने छापला जात असे. आता तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे गुळगुळीत कागदावर सुबक आणि रंगीत चित्रे असलेले पट मिळतात. हिरण्यकश्यपूचे पोट फाडत असलेले श्रीनरसिंह, त्यांच्या समोर हात जोडून उभा असलेला बालक प्रह्लाद, कालियामर्दनाचा प्रसंग, अनेक बालगोपालांसह दोन जिवत्या, हत्तीवर आरूढ झालेले बुध आणि वाघावर स्वार झालेले बृहस्पती यांची चित्रे या पटावर काढलेली असतात. त्यासाठी याच देवतांची निवड कोणी आणि कां केली वगैरे प्रश्नांची उत्तरे मला कधी मिळाली नाहीत. परंपरांच्या मुळाशी जाऊन पोचणे कठीण असते. तिथी आणि वार पाहून यातल्या एकेका देवतेची पूजा करावी असा विचार कदाचित असेल, पण बहुतेक सगळे लोक रोजच या सर्व चित्रांना गंध, फूल, हळद, कुंकू वाहतात. पूर्वीच्या काळी वापरलेल्या साध्या कागदावरचे चित्र महिनाभरानंतर ओळखू येत नसे आणि त्याचे विसर्जन केले जात असे. आजकाल कांही लोक हा पट लॅमिनेट करून घेतात आणि श्रावण महिना संपल्यानंतर स्वच्छ पुसून तो उचलून ठेवतात. पुढच्या वर्षी श्रावण आल्यानंतर (त्या वेळी तो सापडला तर) पुन्हा त्याची पूजा करावी अशी योजना असते, ती किती यशस्वी होते ते माहीत नाही.

श्रावण महिन्यात संध्याकाळी कहाण्या वाचण्याचा प्रघात मात्र आता मागे पडत चालला आहे. माझ्या लहानपणी संध्याकाळी दिवेलागणी झाल्यानंतर घरातली सगळी मुले एकत्र बसून शुभंकरोती आणि परवचा म्हणत असत. श्रावण महिन्यात त्यानंतर कहाणीवाचनाचा कार्यक्रम ठरलेला असे. त्या वेळी घरातली कांही मोठी माणसे सुध्दा येऊन बसत आणि श्रवण करत असत. पहिली कहाणी नेहमी गणेशाची असे. “निर्मळ मळं, उदकाचं तळं, तेथे गणेशाची देवळंरावळं” अशी त्याची सुरुवात केल्यानंतर “संपूर्णाला काय करावे, पसापायलीचे पीठ कांडावे, त्याचे अठरा लाडू करावेत, सहा देवाला द्यावेत, सहा ब्राम्हणाला द्यावेत, सहाचे सहकुटुंब भोजन करावे.” वगैरे सूचना असत. पण रोज वाचूनसुध्दा त्यावर कोणी अंमलबजावणी केलेली मात्र कधी माझ्या पाहण्यात आली नाही.

त्यानंकर रोज त्या दिवसानुसार वेगळी कहाणी वाचायची. रविवारी आदित्यराणूबाईची, सोमवारी शंकराची, मंगळवारी मंगळागौरीची, नागपंचमीला नागोबाची वगैरे. या सर्व कहाण्या “आटपाट नगर होते.” पासून सुरू होत आणि “ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफल संपूर्ण ” या वाक्याने संपत. त्यात बहुतेक करून तीन चार शब्दांची लहान लहान वाक्ये असत. आटपाट नगर होते झाल्यानंतर “तिथे एक राजा होता. तो खूप शूर होता. त्याला दोन राण्या होत्या.” किंवा “तिथे एक ब्राम्हण रहायचा, तो खूप गरीब होता.” वगैरे सोप्या वाक्यांमधून ती गोष्ट पुढे सरकत असे. त्याचे वाचन करतांना सुध्दा ते एका विशिष्ट लयीत केले जात असे.

कांही कहाण्यांमधून खूप चांगला आशय मनावर बिंबवला जात असे. उदाहरणार्थ शुक्रवारची कहाणी घेता येईल. एका श्रीमंत भावाची दुर्दैवी बहीण अत्यंत गरीब होती. एकदा त्या भावाने रोज सहस्रभोजन घालायला सुरुवात केली, पण आपल्या बहिणीला जेवणाचे आमंत्रण दिले नाही, तिची दैन्यावस्था पाहून लोक आपल्याला नांवे ठेवतील याची भीती त्याला वाटली. आपल्या मुलांच्या पोटात चार चांगले घास जावेत या उद्देशाने अन्नाला मोताद झालेल्या बहिणीने तिथे जायचे ठरवले. पण निमुटपणे रांगेत जाऊन बसलेल्या आपल्या बहिणीच्या आणि तिच्या मुलांच्या अंगावरले कपडे पाहून त्या निष्ठुर भावाला लाज वाटली आणि तिचा राग आला. तिने तिला पुन्हा न यायला सांगितले, पण मुलांनी मामाकडे जायचा हट्ट धरल्यामुळे झालेला अपमान विसरून ती बहीण दुसरे दिवशी पुन्हा सहस्रभोजनाच्या पंक्तीत जाऊन बसली. भाऊ या वेळी जास्तच डाफरला. तिसरे दिवशी तर त्याने तिला हाताला धरून बाहेर काढले.

पुढे तिच्या कुटुंबाला ऊर्जितावस्था आली. आता मात्र भावाने तिला आग्रहाने आपल्याकडे जेवायला बोलावले. तिच्यासाठी पंचपक्वांनांचा बेत केला. ती जेवायला आल्यावर तिला सन्मानाने पाटावर बसवले. त्या बहिणीने आपला भरजरी शेला, गळ्यातला चंद्रहार, हातातल्या गोठ पाटल्या वगैरे एकेक अलंकार काढून त्या पाटावर ठेवले. मग त्यातल्या एकाला जिलबीचा घास दिला, दुस-याला पुरणाच्या पोळीचा, तिस-याला लाडूचा वगैरे. ती हे काय करते आहे असे भावाने विचारताच त्या मानिनीने उत्तर दिले, “आज तू ज्यांना जेवायला बोलावले आहेस त्यांनाच मी हे जेवण भरवते आहे. माझे जेवण मला सहस्रभोजनाच्या दिवशी मिळाले आहे.” त्या बोलण्याने भावाचे डोळे खाडकन उघडले, त्याने बहिणीची क्षमा मागितली आणि आपल्या वागणुकीत सुधारणा केली.

अशा अनेक बोधप्रद गोष्टी या कहाण्यांमध्ये आहेत. पण आजच्या जीवनात घरातली सारी मंडळी तीन्हीसांजेला घरी परतच नाहीत आणि आल्यानंतर टीव्हीसमोर बसलेली असतात. ते मनोरंजन सोडून त्यांनी जुन्या पुराण्या कहाण्या ऐकाव्यात अशी अपेक्षा धरता येणार नाही.

************

जिवतीच्या प्रतिमेचा भावार्थ

मानवाला अनादी काळापासून घडणाऱ्या घटनांचं कौतुक आणि त्याबद्दल उत्सुकता आहे. याच उत्सुकतेमधून तो नवनवीन आविष्कार आणि गूढ घटना यांबद्दल आदरभाव दाखवत आलेला आहे. या आदराचं रूपांतर त्या अनाकलनीय गूढाचा सत्कार व पूजन करण्यात झालं . यातूनच ते गूढ पिढ्यांपिढ्या पुजले जाऊ लागले . असेच एक गूढ दर पिढ्यांनी पुजलं ते ‘जिवती पूजन’ या रूपात.
कोण हि जिवती? हिच्या पूजनाचा हेतू काय? जिवती प्रतिमेचा नेमका भावार्थ काय? असे बरेच प्रश्न मनात रेंगाळत होते. यासंदर्भात मला जे काही कळलं ते आपल्या पर्यंत पोहोचवण्यासाठी हा लेखन प्रपंच.
आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा-जिवंतिका पूजन सुद्धा करतात. दिवा हे ज्ञानाचं, वृधिंगतेच प्रतीक आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप. तुम्ही एक दिवा उजळा त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळेच याला वंश वृद्धीचं प्रतीक मानतात. या प्रतीकाचं पूजन म्हणजेच आजचं दीपपूजन.
आजची दुसरी पूज्य देवता म्हणजे जिवती. जिवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. आजपासून संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेच पूजन मातृशक्ती कडून केलं जातं व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या, वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केलं जाते. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमाचे?

(जिवतीची सर्वत्र पूजा केली जाणारी प्रतिमा. अंतरजालावरून )

जिवती प्रतिमेत नरसिंह, कालियामर्दन करणारा कृष्ण , मुलांना खेळवणाऱ्या जरा- जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध – बृहस्पती(गुरु) यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पुजलं जाते.

प्रथम भगवान नरसिंहचं का?
भगवान विष्णूंचा चवथा अवतार असलेले नरसिंह, आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट झाले. हि कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशिपू पासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पुजले जातात.
त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण-
यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्हीपण श्रावणातील आराध्य दैवते. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्णच का? आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल कि या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असतांना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या- बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असतांना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पुजला जातो.
नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी आणि कालियादमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळतांना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासूनचे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात म्हणून जिवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान.

नंतर येतात त्या जरा व जिवंतिका : या यक्ष गणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते. मगधनरेश बृह्दरथ याला दोन राण्या असतात. दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते. परंतु राजाला पुत्र/ पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतीत असतो. याच सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा- अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अर्भकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अर्भक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोनीही शकलं सांधते. जरा ते सांधलेले अर्भक संध्यासमयास बृह्दरथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रीत्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मन देतो. त्याच प्रमाणे जरादेवतेचा वार्षिक महोत्सव सुरु करतो, अशी हि जरा देवी. जरेंचीच सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवते अशा रूपात दाखवतात.

प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध – बृहस्पती..
बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो. तर बृहस्पती (गुरु) वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, अध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते. बुधाचं वाहन हत्ती. हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने, व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरुन लक्षात येते. बृहस्पतीचं वाहन वाघ. हे अहंकाराचा प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो. अहंकार मानवाच्या प्रगतीमध्ये, आध्यात्मिक साधनेत बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या , गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते. म्हणूनच बुध – बृहस्पती यांना सुद्धा जिवती प्रतिमेत स्थान मिळालं.

प्रथम रक्षक देवता, नंतर जन्माबालकेचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा जिवती प्रतिमेचा क्रम.
एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवती पूजन. जगातील सर्व प्राणिमात्रांच्या उज्वल भविष्याची, रक्षणाची प्रार्थना करून हा लेख प्रपंच थांबवतो……
जरे जीवन्तिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी ।
रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते ।।

वॉट्सअॅपवरून साभार दि. २४-०७-२०२०

श्रावण शुक्रवार कहाण्या

श्रावण महिना सुरू होऊन गेला आहे. घरोघरी देवघरात जिवतीच्या पटाची स्थापना झाली आहे. पुढील महिनाभर त्यांची पूजा केली जाईल. या पटात इतर काही देवांची चित्रे असली तरी जिवतीला सर्वात जास्त महत्व असते, जिवतीच्या नावानेच हा पट ओळखला जातो. जिवती ही मुख्यतः लहान मुलांची जीवनदायिनी देवी अशी तिची प्रतिमा आहे. श्रावण महिन्यामधील दर शुक्रवारी तिची पूजा करून तिला पुरणाचा नैवेद्य दाखवायचा आणि घरामधील सर्व लहान मुलांचे औक्षण करून जिवतीमातेने त्यांचे रक्षण करावे अशी तिला मनोभावे प्रार्थना करायची अशी प्रथा असे.

श्रावण महिन्यात दररोज त्या दिवशीच्या वाराची कहाणी वाचली जात असे. काही लोक अजूनही वाचत असतील. त्या वाराच्या दैवताची आराधना केल्यामुळे तो (किंवा ती) प्रसन्न झाला (किंवा झाली). त्यांची कृपा कोणा भक्तावर झाल्यामुळे त्याला कशाची प्राप्ती झाली याची सुरस गोष्ट त्या कहाणीमध्ये असते. शुक्रवारसाठी दोन कहाण्या आहेत.
एका कहाणीमध्ये एका गरीब स्त्रीला फसवून तिची दायीच तिचे मूल चोरते आणि त्या गावच्या निपुत्रिक राणीला ते नेऊन देते. गरीब बाईच्या पोटी वरवंटाच जन्माला आला असे ती दुष्ट सुईण तिला सांगते. या थापेवर तिचा विश्वास बसत नाही, पण ती काहीच करू शकत नसल्यामुळे नियमितपणे जिवतीची पूजा करत राहते आणि माझा मुलगा जिथे कुठे असेल तिथे तो सुखात आणि सुरक्षित राहू दे अशी प्रार्थना करते. तिचा मुलगा राजपुत्र म्हणून थाटात वाढतो. त्याच्यावर आलेल्या संकटामधून जिवतीच्या कृपेने तो सहीसलामत वाचतो. अखेर एका सार्वजनिक जेवणावळीमध्ये ती स्त्री जेवायला बसलेली असतांना राजपुत्र झालेला तिचा मुलगा पंगतीला पक्वान्न वाढायला येतो. त्याला समोर पाहताच त्या आईला पान्हा फुटतो आणि त्या दुधाचे थेंब त्याच्या ओठावर पडतात. त्या अद्भुत घटनेनंतर त्या राजपुत्राच्या जन्माच्या रहस्याचा खुलासा होऊन तो त्याच्या जन्मदात्या आईला भेटतो.

दुस-या कहाणीमधील बाई दारिद्र्यात रहात असतांना तिचा भाऊ तिचा अपमान करतो. त्याने घातलेल्या गावजेवणासाठी ती आली असतांना तिला पानावरून उठवून माघारी पाठवतो. ती सुध्दा जिवतीची भक्त असते. जिवतीच्या कृपेने त्या कुटुंबाचे वाईट दिवस जाऊन त्यांना समृध्दी प्राप्त होते. त्यानंतर तोच भाऊ त्या बहिणीला सन्मानाने आपल्या घरी जेवायला बोलावतो आणि तिला पाटावर बसवून पंचपक्वांनांनी भरलेले जेवणाचे ताट तिच्यापुढे मांडतो. ती स्वाभिमानी बहीण आपले एक एक अलंकार काढून पाटावर ठेवते आणि ताटामधील पक्वांनांचा एक एक घास त्यांना देते. “हे जेवण तू यांच्यासाठीच मला दिले आहेस, माझे जेवण मी अन्नछत्रात जेवले.” अशी कानउघाडणी केल्यानंतर त्या मतलबी भावाचे डोळे उघडतात.

या दोन्ही कहाण्या मला खूप आवडतात, विशेषतः दुसरी कहाणी. या बहीण भावांच्या गोष्टीत दिव्याच्या अंवसेच्या कहाणीसारख्या इतर कहाण्यांप्रमाणे अचाट चमत्कार नाहीत, बोलणारे पशूपक्षी किंवा निर्जीव पदार्थ यात नाहीत. सगळ्या घटना वास्तवात घडू शकण्यासारख्या आहेत. “आईबापबंधूभगिनी, दारिद्र्यात नसते कोणी।”, त्या वेळी “कुणी कुणाचे नाही।” किंवा “कठीण समय येता कोण कामास येतो।” वगैरे अन्य ऊक्तींमध्ये सांगितलेले जीवनातले कटू सत्य या कहाणीत दाखवले आहे. मोठ्या झालेल्या मुलाला पाहताक्षणी त्याची ओळखदेख नसतांनासुध्दा त्याच्या आईला पान्हा फुटतो एवढा पहिल्या कहाणीमधला अवास्तव भाग सोडला तर चांगल्या आणि वाईट मानवस्वभावांचेच दर्शन त्यात घडते. अर्थातच माणसाने काय करावे आणि काय करू नये याचे मार्गदर्शन या कहाण्यांच्या तात्पर्यामध्ये मिळते.

One Response

  1. […] जिवतीचा पट आणि कहाण्याhttps://anandghare2.wordpress.com/2017/07/27/%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%9f-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%95%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/ […]

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: