मित्र, यार, दोस्त आणि फ्रेन्ड्स

श्रीकृष्ण आणि सुदामा ही बालमित्रांची जोडी प्रसिद्ध आहे. जिवलग मित्रांच्या जोडगोळीना नेहमी त्यांची उपमा दिली जाते. सगळ्या पौराणिक चित्रांमध्ये अगदी छोट्या बाळकृष्णाला देखील छान इवलासा पितांबर नेसवला जात असला तरी सुदामा, पेंद्या आदि त्याच्या सवंगड्यांना बहुधा लंगोटीच नेसवलेली दिसते. कदाचित यावरूनच ‘लंगोटीयार’ हा शब्द प्रचारात आला असावा. पुढच्या पिढीतल्या मुलांना लंगोटी हे वस्त्र पहायलाही मिळणार नाही. तेंव्हा वयाने कदाचित याच्याही मागे जाऊन ‘डायपर फ्रेंड्स’ असा नवा शब्दप्रयोग रूढ होईल.

मी शाळेत शिकायला जाण्याच्या आधीपासूनचे माझेही काही लंगोटीयार होतेच. आम्ही साधारणपणे एकाच काळात अर्धी चड्डी घालायला लागलो होतो आणि शालेय शिक्षण संपेपर्यंत बहुधा हाफ पँटच घालतही होतो. पुढे मी कॉलेजशिक्षणासाठी आमचे गांव सोडून पुण्यामुंबईकडे गेलो तसे माझे बालमित्रही चहू दिशांना पांगले गेले. मी आधी दोन वर्षे मुंबईला सायन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन इंटरमीडिएटची परीक्षा पास केल्यानंतर पुण्याला इंजिनियरिंगला गेलो. यामुळे दोन वर्षांमध्ये मुंबईला मिळालेले मित्रही नंतर पारखे झाले आणि पुण्याला गेल्यानंतर तिथे नवीन मित्र जोडले. त्यानंतर पुन्हा आमची फाटाफूट होऊन मी नोकरीसाठी मुंबईला आलो. कॉलेजमधले इतर मित्र कुठे कुठे गेले ते ही लगेच समजले नाही. या सगळ्या घटना १९६० च्या दशकात घडल्या. पन्नास वर्षांनंतर त्यातले सध्या पुण्यात राहणारे काही मित्र आता पुन्हा जवळ आले आहेत.

पूर्वीच्या काळात सेलफोन, इंटरनेट, ई मेल, फेसबुक, ट्विटर, वॉट्सअॅप यातले काहीच नव्हते. ट्रिंग ट्रिंग करणारा साधा टेलीफोनसुद्धा माझ्या बापुड्याच्या आवाक्याबाहेर होता. पोस्टाने पत्र पाठवणे हा कोणाशीही संपर्क साधण्याचा एकमेव मार्ग असायचा आणि त्यासाठी आधी कोणाचाही नवा पत्ता तरी कळायला हवा. शिवाय मी नव्या जागी गेल्यावर तिथले वेगळे वातावरण समजून घेऊन त्यात कसेबसे रुळण्याकडेच माझे सगळे लक्ष वेधलेले असायचे आणि त्या कामात रोजच विविध प्रकारच्या अडचणीही येत असत. त्यांना सामोरे जाऊन सोडवण्यातच माझा बहुतेक सगळा वेळ आणि शक्ती खर्च होत असे. माझ्या इतर मित्रांचीही गत यापेक्षा वेगळी असायचे कारण नव्हते. या सगळ्या कारणांमुळे माझे बालमित्र तसेच कॉलेजमधलेही बहुतेक मित्र यांच्याशी नंतर फारसा संपर्क राहिला नाही आणि ते हळूहळू दुरावत विस्मरणात चालले गेले. नंतरच्या काळात कधीतरी अचानकपणे एकाद्या जुन्या काळातल्या मित्राची कुठे तरी गाठ पडली की जुन्या आठवणी ताज्या होत, एकमेकांचे पत्ते घेतले जात पण प्रत्यक्ष पत्र लिहायला बसण्यापूर्वी ते चिठोरे हरवून जात असे. अशा प्रकारे तो मैत्रीचा दुवा सांभाळून ठेवणे कठीणच होत असे.

मैत्रीचे बंध एकदा का जुळले की ते कायमसाठी अगदी मजबूत असतात असे सांगितले जाते. यावर सिनेमा नाटकांमध्ये अनेक संवाद आणि गाणी असतात आणि ती तुफान लोकप्रियही होतात. पण निदान मला तरी याबाबतीत जरा वेगळे अनुभव आले. “यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी।” असे म्हणत खरोखरच कुणावर जीव ओवाळून टाकणारा मित्र माझ्या नशीबात नव्हता किंवा माझ्या पाहण्यातही कधीच आला नाही आणि आपल्या मनात दुस-या कुणाबद्दल स्वतःपेक्षाही जास्त प्रेमभावना बाळगावी असे मलाही कधी वाटले नाही. जीवनातले कुठलेही नाते, विशेषतः मैत्रीचे नाते टिकवून ठेवण्यासाठी सतत संपर्कात राहणे आवश्यक असते असा माझा अनुभव आहे.

मी नोकरीला लागल्यानंतर मला मिळालेले मित्र मात्र अनेक वर्षे माझ्या संपर्कात राहिले. त्यातले काही जण माझे कार्यालयातले सहकारी होते, काही जणांशी कामानिमित्य भेटणे व बोलणे होत असे तर काही जण आमच्या इमारतीत किंवा आसपास रहात होते. त्यातल्या ज्या लोकांशी माझे पटत होते किंवा आमच्या वेव्हलेंग्थ्स साधारणपणे जुळायच्या त्यांची गणना मित्रांमध्ये होत गेली. त्या लोकांशी माझ्या कामाव्यतिरिक्त काही अवांतर गप्पा गोष्टी होऊ लागल्या. त्यातले ही काही जण बदली होऊन किंवा नोकरी सोडून परगावी गेले, त्यांच्या जागी काही नवीन लोक आले असे होत गेले तरी नोकरीत असेपर्यंत माझा एकंदर मित्र परिवार ब-यापैकी वाढला होता. “समानशीलव्यसनेषु सख्यम्” असे म्हणतात, त्यातले समानशील सखे मला भेटले, पण मला स्वतःलाच कोणतेही व्यसन न लागल्यामुळे मित्र मिळवण्याचा दुसरा मार्ग मात्र मला उपलब्ध नव्हता.

कालांतराने मीच सेवानिवृत्त होऊन नव्या जागी रहायला गेल्यानंतर मात्र माझा मित्रपरिवार झपाट्याने कमी होत गेला कारण आता पूर्वीच्या मित्रांच्या भेटीगाठी होणे दुर्मिळ झाले आणि टेलीफोनवरचे संभाषणही हळूहळू कमी कमीच होत गेले. एक वय उलटून गेल्यानंतर नवे मित्र जोडायची इच्छा व उमेद कमी होत गेल्याने नव्या मित्रांची संख्या वाढणेही कठीणच होते.

पूर्वीच्या काळात काही लोक पेन फ्रेन्ड्शिप किंवा पत्रमैत्री करायचे. ते लोक आपल्या मनातले विचार, सुखदुःखे, कल्पना, आपली तत्वे, आपले बरे वाईट अनुभव वगैरे नाजुक गोष्टी स्वतःच्या जवळच्या लोकांशी बोलून व्यक्त करण्याऐवजी किंवा त्याशिवाय सवडीने कागदावर लिहून काढत आणि दूर देशी असणा-या मित्रांना किंवा मैत्रिणींना पत्राद्वारे पाठवून देत असत. तिकडूनसुद्धा त्या पत्राला असाच उत्साही प्रतिसाद मिळाला तर मग ती मैत्री दृढ होऊन वाढत जात असे. कधी कधी हे पत्रमित्र प्रत्यक्षात भेटलेलेही नसत किंबहुना ते त्यांना शक्यही होत नसावे, पण त्यांच्या संदेशांची देवाणघेवाण मात्र पत्रांद्वारे दीर्घकाळ चालत असे. अशा प्रकारच्या मैत्रीविषयी मी फक्त पुस्तकांमध्येच वाचलेले आहे, मला कधीच त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला नाही किंवा इतर कोणाचा पहायलादेखील मिळाला नाही.

माझे वडील रिटायर व्हायच्या पंधरा वीस वर्षांपूर्वी कधी तरी एका बदलीच्या गावी गेलेले असतांना त्या खेड्यात रहात असलेल्या एका गृहस्थांच्या संपर्कात आले होते असे मी ऐकले होते. माझ्या आठवणीत तरी त्या दोघांची कधीच गांठभेट झाली नव्हती, मी त्या गृहस्थांना कधीच पाहिलेले नाही किंवा ते खेडेही पाहिले नाही. पण माझे वडील रिटायर होऊन गेल्यानंतरसुद्धा कित्येक वर्षे त्यांना या जुन्या स्नेह्याची पत्रे नियमितपणे येत असत. त्यांचेकडून आलेली पत्रे माझ्या वडिलांना वाचून दाखवायचे काम मात्र माझ्याकडे यायचे. त्यांच्या पोस्टकार्डामध्ये फक्त तिकडची खुषाली कळवलेली असायची आणि इकडची चौकशी केलेली असायची. त्या पत्रलेखनाला फारसे वाङ्मयीन किंवा साहित्यिक मूल्य नसेलही, पण त्यामधून व्यक्त होत असलेली त्या दोघांमधली खूप जवळीक मात्र मलासुद्धा चांगली जाणवत असे. वडिलांच्या या मित्राबद्दलचे माझे कुतूहल वाढतच गेले आणि अखेरपर्यंत ते एक गूढ राहिले.

माझ्याकडे घरी असलेल्या पत्याच्या वहीतले बहुतेक सगळे पत्ते आमच्या नातेवाईकांचेच असायचे. टेलिफोन नसतांनाच्या काळात त्यांच्याशी पत्रव्यवहार होत असे. त्या वहीतली फारच कमी नांवे माझ्या मित्रांची असायची. तीसुद्धा जर मला कधी काळी त्यांच्या गावी किंवा घरी जायचे असले तर तेंव्हा उपयोगी पडावी म्हणून लिहून ठेवलेली होती. त्यातल्या कुणालाही मी पत्रे लिहून पोस्टाने पाठवली नाहीतच, त्यांच्याकडूनही कधी आली नाहीत. एकंदरीतच मी टपालखात्याला फारसे कष्ट दिले नाहीत.

अलीकडच्या काळात इंटरनेटचा प्रसार झाल्यानंतर मात्र हे चित्र पार पालटले. माझ्या ईमेल्सवरील काँटॅक्ट्सची संख्या वाढतच गेली आणि त्यात मात्र काही नातेवाईकही असले तरी त्यातली बहुतांश नावे मात्र माझ्या मित्रांचीच असायची. मी काही याहू किंवा गुगल ग्रुप जॉइन केल्यावर तर मला एकदम अनेक मित्र मिळाले. मनोगत, मिसळपाव, उपक्रम, ऐसी अक्षरे यासारख्या संकेतस्थळांवर माझे नाव नोंदवले होते. तिथे काही लिहिल्यास त्यावर लगेच अनेक शेरे किंवा प्रतिक्रिया येत, मी ब्लॉग लिहायला सुरू केल्यावर त्यावरही अनेक प्रतिसाद यायला लागले. या सर्वांमधून मला काही नवे मित्र मिळाले. फेसबुक, ट्विटर आणि वॉट्सअॅप ही तर खास सोशल नेटवर्कची साईट्स आहेत. माझे आधीपासून असलेले बरेचसे मित्र यात येत गेलेच, शिवाय कित्येक अनोळखी मित्रांची अनाहूत आमंत्रणे या नेटवर्क साईट्समधून येत असतात. मीच संपूर्ण खात्री पटल्याखेरीज कोणाला मित्र करून घेत नाही. तरी सुद्धा माझ्या या जालमित्रांची संख्या आता काही शेकड्यांमध्ये गेली आहे. तीन चार दशकांपूर्वी दूरावलेले, म्हणजे अक्षरशः हजारो किलोमीटर दूर अंतरावर परदेशी गेलेले माझे काही जुने मित्र मला पुन्हा कधी भेटतील अशी मला आशाच वाटत नव्हती, पण या नव्या माध्यमांमधून मला ते पुन्हा एकदा सापडले आणि माझ्या संपर्कात आले, तेंव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नाही.

मी प्रत्यक्षात कोणाच मित्राला हाताने पत्र लिहून पाठवले नसले तरी या आभासी जगातल्या मित्रांमध्ये मात्र रोजच भरपूर पत्रव्यवहार होत असतात. एकाच वेळी एका क्लिकमधून एकच संदेश अनेकांना पाठवता येतो, त्याला अवांतर मजकूर, चित्रे किंवा ध्वनि सहजपणे जोडता येतात आणि ते सगळे क्षणार्धात अनेक ठिकाणी जाऊन पोचतात, लगेच त्याची उत्तरे येऊ शकतात आणि आपण ते आणखी कोणाला पाठवू शकतो वगैरे त्याचे अचाट फायदे आहेत. आता तर हे सगळे हाताच्या मुठीत धरता येईल इतक्या लहानशा यंत्रामधून आणि आपण जिथे असू तिथूनच करता येणे शक्य झाले आहे. आपल्या आयुष्यात असे काही आपल्याला अनुभवायला मिळेल अशी मी कल्पनासुद्धा केली नव्हती. अर्थातच यामुळे मित्र या शब्दालाच नवा अर्थ, नवे परिमाण लाभले आहे.

या आभासी जगातल्या मित्रांमध्येसुद्धा विविध प्रकार असतात. त्यातले बरेचजण आधीपासूनच आपले खरे खुरे मित्र असतात पण दूर रहात असतात. त्यांच्याशी केंव्हाही लगेच संपर्क साधणे आता नव्या माध्यमांमधून सहज शक्य झाले आहे. आपल्याला गरज पडली की ते लगेच धावून येऊ शकतात, तसेच आपणही वेळेवर त्यांच्या मदतीसाठी काही करू शकतो. याविरुद्ध काही जालमित्र आपल्याला फक्त इंटरनेटवरच भेटतात. त्या वेळी ते लोक खूप जवळिकेने आपले मनोगत व्यक्त करतात, सल्ले देतात, विचार मांडतात, चर्चा करतात, वादही घालतात. दूर राहूनच त्यांच्याशी केलेल्या या संवादामधून आपल्या सामान्यज्ञानाच्या कक्षा विस्तारतात, आपल्याला उपयुक्त माहिती मिळतेच, वैचारिक समाधान मिळते, आपली बौद्धिक भूक प्रज्ज्वलित होते किंवा भागते, भावनात्मक आनंद मिळतो. विशेषतः निवृत्त आयुष्यात उपलब्ध झालेला माझा बराचसा रिकामा वेळ या मित्रांशी संवाद साधण्यात चांगला जातो किंवा सत्कारणी लागतो.

ब्लॉग्ज किंवा संकेतस्थळांवर भेटणारे काही मित्र तर या आभासी जगतात टोपणनावाने वावरत असतात. त्यांनी पांघरलेल्या बुरख्यामागील व्यक्ती पुरुष आहे की स्त्री, ती तरुण आहे की वृद्ध, ती कोणत्या सामाजिक किंवा शैक्षणिक स्तरातली आहे यातले काहीच आधी कळत नाही, पण तरीही त्यांच्या लेखनामधून ते मित्रत्वाने वागत असतात. अशा लोकांशी तात्विक चर्चा करणे किंवा वितंडवाद घालणे सोपे असते आणि त्यात मजाही येते, कारण तो अनामिक मित्र दुखावला जाण्याची काळजी करायची गरज नसते. त्यांचा समावेश मित्रांमध्ये करता येईलच का नाही अशी शंका येते, पण या लोकांचीही संमेलने भरतात, त्याला हजेरी लावली की आपल्याला बुरख्यामागले चेहेरे पहायला मिळतात. त्यातून काही लोकांशी खरी मैत्री जमते.

मैत्री, दोस्ती, यारी, फ्रेन्ड्शिप यांच्या असंख्य छटा असतात, त्यातल्या काही दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न या भागात केला आहे.

आज मैत्रीदिवसाच्या निमित्याने सर्व मित्रांना नमस्कार, रामराम, हॅल्लो, हाय् ………. ०६-०८-२०१७

 
———————————————————————————————————————————-

 

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: