ब्रह्मकुमारींचे रक्षाबंधन

मी हा लेख ३ वर्षांपूर्वी  म्हणजे  २०१४ मध्ये लिहिला होता. 

पूर्वीच्या काळात दक्षिण महाराष्ट्र किंवा उत्तर कर्नाटकाच्या आमच्या प्रदेशात रक्षाबंधनाचा प्रघात नव्हता. माझ्या लहानपणी श्रावणी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असे म्हणत असत. आमच्या गावापासून समुद्रकिनाराही शेकडो मैल दूर असल्यामुळे त्या दिवशी समुद्रावर जाण्याचा प्रश्नच नव्हता. कदाचित दहा पिढ्यांपूर्वी कोकणात राहणारे आमचे पूर्वज समुद्राला नारळ अर्पण करतही असतील, आम्ही फक्त नारळीभात खात असू. समुद्रकिनारा खूप दूर आणि पावसाचे प्रमाणही कमी असल्यामुळे त्या भागात नारळाचे उत्पादन होत नसे. ओले खोबरे हा आमच्या घरातल्या रोजच्या जेवणातला भाग नव्हता, कधी तरी ते खाणे हा थोडासा चैनीचा भाग होता. सणावारी केलेल्या मोदक, करंज्या वगैरेतून थोडेसे खोबरे खायला मिळत असे आणि एकाद्या पूजेसाठी किंवा देवदर्शनाच्या वेळी नारळ फोडला गेला तर चटणी, भाजी, आमटीमध्ये खोबरे घालून त्यांची चंव वाढवली जात असे. त्यामुळे पोटभर नारळीभात म्हणजे एक मेजवानी होती आणि हा योग वर्षातून एकदाच येत असल्याने त्याचे मोठे अप्रूप वाटायचे.

त्या काळात संघात जाणारे माझे शाळेतले मित्र श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी शाखेत जाऊन त्यांच्या झेंड्याला राखी बांधायचे. राष्ट्रध्वज नसल्यामुळे तो कशाचे प्रतीक होता आणि माझे मित्र त्याचे रक्षण करणार म्हणजे ते काय करणार आहेत हे काही त्यातल्या कोणाला सांगता येत नसे. शिवाय झेंडा हा शब्द पुल्लिंगी असल्यामुळे त्याला राखी बांधणारे माझे मित्र त्याच्या बहिणी ठरणार म्हणजे कुणी कुणाचे रक्षण करायचे असा घोळ होत असे. मी त्या मार्गाने गेलो नसल्यामुळे त्याबद्दल जास्त विचार केला नाही.

जुन्या काळातली लोकप्रिय नटी बेबी नंदा हिची प्रमुख भूमिका असलेला छोटी बहन हा सिनेमा तुफान लोकप्रिय झाल्यानंतर “भैया मेरे राखीबंधनको निभाना” हे त्या सिनेमातले गाणे लोकांच्या ओठावर आले आणि उत्तर भारतातल्या या सणाचा अखिल भारतात प्रसार झाला. त्यापूर्वी दक्षिणेत हा सण फारसा कोणी पाळत नव्हते. माझ्या लहानपणी आमच्या गावातल्या बाजारात राख्या मिळतही नसत. विणकाम, भरतकाम वगैरे करण्यासाठी घरात आणलेल्या रेशमाच्या धाग्यांपासून मुलींनी घरच्या घरीच राख्या तयार करून घरातल्या आपल्या भावांच्या मनगटावर त्या बांधायला तेंव्हा नुकतीच सुरुवात झाली होती. त्याची व्याप्ती फार तर गावातल्या अगदी जवळच्या नातेवाईकांपर्यंत होत असे. लग्न करून सासरी गेलेल्या बहिणी माहेरपणासाठी श्रावणात माहेरी आल्या असल्या तरच त्यांचा भावाला राखी बांधायचा कार्यक्रम होत असे.

नोकरीला लागल्यानंतरसुद्धा माझ्या बहिणींबरोबर भाऊबीज हा सण मी दरवर्षी नियमितपणे साजरा करत होतो, पण रक्षाबंधन मात्र अगदी क्वचित प्रसंगीच करून घेतले असेल. आमच्या घरी तशी प्रथाच नव्हती. माझी मुले मात्र त्यांच्या चुलत, मावस, आत्ते, मामे बहिणींकडून दरवर्षी राखी बांधून घ्यायला लागली. ती जन्माला आलेल्या वर्षापासूनच त्यांच्या या बहिणींच्या राख्या पोस्टाने यायला सुरुवात झाली आणि त्यांची संख्या वाढत गेली. हा सण अखिल भारतात साजरा व्हायला सुरुवात झाली असली तरी आमच्या ऑफिसला त्या दिवशी सुटी नसायची. माझे उत्तर भारतीय सहकारी कपाळाला कुंकवाचे उभे पट्टे ओढून आणि मनगटापासून कोपरापर्यंत मोठमोठ्या राख्यांची माळ बांधून ऑफिसात यायचे, काही जण मिठाईचे बॉक्सही आणायचे आणि त्यातल्या मोतीचुराच्या लाडवांचे किंवा बर्फीचे तुकडे आम्हाला वाटायचे. त्या दिवशी मला आपले मनगट ओकेबोके वाटायचे, पण कुणाला तरी बळेबळेच बहीण मानून तिच्याकडून राखी बांधून घ्यावी असे मात्र कधी वाटले नाही.

अशी अनेक वर्षे गेल्यानंतर या वर्षी एका वेगळ्या प्रकारच्या रक्षाबंधन सोहळ्याला हजर राहण्याचा योग आला. आमच्या घरापासून जवळच असलेल्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अशे भारदस्त नाव असलेल्या संस्थेकडून आम्हाला एक आमंत्रण मिळाले. मलाही या संस्थेबद्दल आदरमिश्रित उत्सुकता होतीच, तिच्याबद्दल जेवढे कानावर आले होते ते चांगलेच होते, पण प्रत्यक्षात तिथे जाणे झाले नव्हते. त्यामुळे तिथला रक्षाबंधनाचा कार्यक्रम आकर्षित करत होता. आम्ही दोघेही लवकर स्नान वगैरे करून पावन होऊन जायला निघालो. जिन्याच्या पाय-या उतरून खाली उतरलो तेवढ्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. एरवी आम्ही पुन्हा घरी परत जाऊन गरम गरम चहा पीत बसलो असतो, पण या वेळी आमचा निर्धार पक्का होता. दोन तीन मिनिटांत एक रिक्शा मिळाली आणि आम्ही त्यांच्या आश्रमात जाऊन पोचलो.

हा आश्रम म्हणजे एक सिमेंट काँक्रीटची लहानशी पक्की इमारत आहे. तिथल्या पहिल्या मजल्यावरच्या हॉलमध्ये शंभर दीडशे खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या, त्या अर्ध्याअधिक भरल्या होत्या. स्टेजवर एका महापुरुषाची तसबीर ठेऊन त्याला पुष्पमाला घातल्या होत्या. तीन चार खुर्च्याही मांडून ठेवल्या होत्या. लाउडस्पीकरवर रक्षाबंधनासंबंधी सुमधुर आणि अर्थपूर्ण अशा गाण्यांच्या रेकॉर्ड्स वाजत होत्या. तिथली एकंदर स्वच्छता आणि टापटीप वाखाणण्यासारखी होती. तिथे आलेली सगळी माणसेही डिसेंट दिसत होती आणि गलका न करता शांतपणे बसून ती गाणी ऐकत होती. कार्यक्रमाची सुरुवात होण्याची वेळ येताच पांढरा शुभ्र गणवेष असल्यासारख्या साड्या नेसलेल्या चार महिला आल्या आणि व्यासपीठावर स्थानापन्न झाल्या. त्यांना सगळे दीदी असे म्हणत होते. सर्वांनी त्यांना आणि त्यांनी सर्वांना अभिवादनाची देवाणघेवाण करून झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रजापिता ब्रह्मकुमारी ही संस्था किंवा संप्रदाय जगातल्या किती देशांमध्ये पसरला आहे आणि त्याची किती ठिकाणी केंद्रे आहेत, त्यांचे विचार, ध्येयधोरणे वगैरेंबद्दल संक्षिप्त माहिती देण्यात आली.

त्यानंतर सर्वात ज्येष्ठ दीदींचे सुरस व्याख्यान झाले. त्यांनी अगदी सोप्या भाषेत धर्माचरण, व्यसनमुक्ती वगैरेंवर भर दिला. या दिवशी संस्थेच्या प्रमुखांच्या वतीने त्या दीदी सर्वांना म्हणजे सर्व उपस्थित स्त्रीपुरुषांना राखी बांधणार होत्या पण त्याच्या आधी सर्वांनी एक फॉर्म भरून द्यायचा होता. त्या दिवसापासून आपण अमूक एक व्यसन सोडणार आहोत असे वचन त्या फॉर्मद्वारे द्यायचे होते. माझ्यासारख्या ज्याला कसलेच व्यसन नव्हते त्यांनी एक दुर्गुण सोडायचा निर्धार करायचा होता. हे काम अधिक कठीण होते की कमी कठीण होते कोण जाणे. सर्वांनी फ़ॉर्म भरून तिथे ठेवलेल्या बॉक्समध्ये टाकला आणि रांगेने पुढे जाऊन दीदींकडून पांढरी शुभ्र राखी बांधून घेतली. निरनिराळा संदेश असलेले एक एक कार्डही त्यांनी प्रत्येकाला दिले, हा परमेश्वराने दिलेला आदेश आहे असे मानून त्याचे पालन करण्याचा यथाशक्ती प्रयत्न करावा असे त्यांनी त्यांच्या प्रवचनात आधीच सांगितले होते. सर्वांनी ते कार्ड शिरोधार्य मानले. माला मिळालेले कार्ड हा आदेश नसून एक अभिप्राय होता. तो कितपत योग्य होता हे मला ओळखणारेच सांगू शकतील. सर्वांना प्रसाद म्हणून अल्पसा फराळ वाटला गेला. तो प्रसाद भक्षण करून आणि एक वेगळा अनुभव घेऊन आम्ही घरी परतलो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: