एके दिवशी …. एक कथा

सूर्याचे भ्रमण हस्त नक्षात होत असतांना महाराष्ट्राच्या कांही भागात हादगा खेळण्याची पारंपारिक रीत आहे. कांही ठिकाणी तो भोंडला या नांवाने ओळखला जातो तर कांही जागी त्यातल्या गाण्यांना भुलाबाईची गाणी असे नांवही आहे. मी सुमारे १५ वर्षांपूर्वी त्या निमित्याने निरनिराळ्या हादग्याच्या गाण्यांच्या चालीवर ही छोटीशी गोष्ट लिहिली होती. मी या गाण्यात कांही पारंपारिक हदग्याच्या गाण्यांच्या ओळींचा समावेशसुद्धा केला आहे. प्रत्यक्ष हादगा किंवा भोंडला खेळणाऱ्या मुलींपर्यंत ती गोष्ट पोचवता येणे मला शक्यच नव्हते म्हणून आमच्या हितगुज नावाच्या सांस्कृतिक मंडळाच्या वार्षिक उत्सवात मी ती चालीवर वाचून दाखवली होती. या गोष्टीतले वातावरण १५ वर्षांपूर्वीचेच आहे. तेंव्हा बुकिंग वगैरे कामे नेटवर होत नव्हती, अजून वॉट्सअॅप आले नव्हते, एसएमएस नुकतेच सुरू झाले होते. सासूसासरे, मुलगा आणि सून सगळे एकत्र रहात होते.

एलोमा पैलोमा गणेशदेवा । माझी गोष्ट सांगू दे करीन तुझी सेवा ।।
गोष्ट सांगाया द्यावी देवा । थोडीशी बुध्दी ।।

**** *** (चाल बदल)
एके दिवशी मिस्टर जोशी, निघाले ऑफीसला ।
त्यांच्यासाठी लंचबॉक्स, मिसेसने भरला ।।
भरलेला डबा तिने, बॅगेमध्ये ठेवला ।
बॅगेचा खणसुध्दा, हळूच तपासला ।।

**** ***(चाल बदल)
त्यात होतं एक पाकीट । पाकीटाच्या आंत तिकीट ।
तिकीट होतं सिनेमाच्या, थिएटरचे ।।
तिकीट अलगद काढलं । ब्लाउजमध्ये खोचून दिलं ।
कारण लागली चाहूल, नव-याची ।।
“झालं कां गं इन्स्पेक्शन । बॅग देतेस कां आणून ।
बस जाईल निघून, ऑफीसाची ।। ”
नवरा निघाला घाईत । हंसून दाखवला हात ।
फिरताच त्याची पाठ, काढलं तिकीट ।।
तारीख दहा ऑक्टोबर । म्हणजे गेला शनिवार ।
खेळ दुपारचे चार, वाजतांचा ।।

**** ***(चाल बदल)
त्या दिवशी काय काय झालं, तिला सारं आठवलं ।
सकाळीच तिनं होतं, नवऱ्याला विचारलं ।।
“शनिवारची सुटी ना आज, पाऊस आहे ओसरला ।
थोडी मौज मस्ती करू, जायचं कां हो पिक्चरला” ।।

**** ***(चाल बदल)
म्हणाला “ते शक्य नाही गं । कामाचा साठला हा ढीग ।
क्लीअर करायचाय् बॅकलॉग, ऑफीसवर्कचा” ।।
असं जातांना सांगून गेला । रात्री उशीरा परतला ।
त्याचा अर्थ नीट आला , आता ध्यानात ।।
क्षणात तिनं लावला फोन । खणातच वाजला रिंगटोन ।
घरीच मोबाइल सोडून, गेली की स्वारी ।।
तिनं पुन्हा पाहिलं तिकीट । उलटून पाठपोट ।
सापडलं एक नांव ‘जेनेट’, अन् फोन नंबर ।।
नवऱ्याच्या मोबाइलवर । तिने शोधले कॉल्ड नंबर ।
जेनेटचा वारंवार, रेकॉर्ड होता ।।

**** ***(चाल बदल)
रागाचा पारा तिच्या अनिवार चढला ।
कसा बसा वेळ तिनं चरफडत काढला ।
ऑफिस सुरू झाल्या झाल्या टेलिफोन लावला ।
नवऱ्याचं एक्स्टेन्शन सांगितलं द्यायाला ।।

**** ***(चाल बदल)
तिथली शिष्ट रिसेप्शनिस्ट । म्हणते काय काम अर्जंट ।
केल्यावर खूपच रिक्वेस्ट, केलं कनेक्ट ।।
“मला आत्ता आहे मीटिंग । माझा साहेब झोटिंग ।
उगारून दोन शिंगं, बघतो आहे ना ।।
माझी मीटिंग संपल्यावर । मीच फोन करीन बरं ।”
एवढं सांगून रिसीव्हर, दिला की ठेऊन ।।
आला प्रचंड वैताग । जिवाची झाली तगमग ।
धुमसतच लागली मग, घरकामाला ।।
दुपारची जेवणं झाली । सासू कलंडून गेली ।
सून करीतच राहिली, विचार मनात ।।

**** ***(चाल बदल)
सासूबाई दाखवतात किती त्या सोज्ज्वळ ।
कुणालाही वाटावे या बाई किती प्रेमळ ।
माझ्या वागण्यातलं त्यांना बोचतं कुसळ ।
नणंदेच्या तोऱ्याचं मात्र चालतं मुसळ ।।
मला कळलं आहे त्यांचं इंगीत सगळं ।
परवाचीच गोष्ट आहे पुरावा सबळ ।।

**** ***(चाल बदल)
नणंदा भावजया दोघी जणी । घरात नव्हतं तिसरं कोणी ।
“फ्रीजमधलं चॉकलेट खाल्लं कोणी” । मलाच विचारलं ।।
गेल्या महिन्यामधली गोष्ट । करते सारं चित्र स्पष्ट ।
मनाला होतात कष्ट । आठवल्यावर ।।
आत्याबाईंचं पत्र आलं । चारूचं लग्न ठरलं ।
सर्वांना होतं बोलावलं । आग्रहानं ।।

**** ***(चाल बदल)
सासरे म्हणाले, “मी तर मामा ।
येईन कामा धामा । माझ्या भाच्याचं लगीन ।।”
वऱ्हाडी कोण कोण जाणार , आमच्या चारूचं लगीन ।।
सासू म्हणाली,” जाणारच् मी ।
मी तर सख्खी मामी । माझ्या भाच्याचं लगीन ।।”
वऱ्हाडी कोण कोण जाणार , आमच्या चारूचं लगीन ।।
नणंद म्हणाली, ” मी तर करवली ।
माझा करवलीचा मान । नटून थटून छान छान ।
खूप धमाल करीन, माझ्या भावाचं लग्न ।।”
वऱ्हाडी कोण कोण जाणार , आमच्या चारूचं लगीन ।।

**** ***(चाल बदल)
नवरोजीनं मात्र केला पुरता बेरंग ।
सदान् कदा त्याच्या आपल्या ऑफिसच्या मीटिंग ।
त्यात म्हणे आणखी कोणी बडं प्रस्थ येणार ।
कोणालाही आता बॉस सुट्टी नाही देणार ।।

**** *** चाल बदल
मी आपलं म्हंटलं उगीच । “यांना सोडून घरीच ।
कशी येऊ एकटीच, मी हो लग्नाला ।।”
तेवढं सर्वांनी ऐकलं । सीरीयसली की घेतलं ।
गेले ना सोडून एकलं, मला हो घरी ।।

**** *** चाल बदल
आता नवऱ्याचंसुध्दा फुटलं गुपीत ।
माझ्याहून प्रिय त्यांना जेनेटची संगत ।।
मला खोटं सांगून तिला सिनेमाला नेतात ।
मरमर मरून त्यांच्यासाठी काय आपली गत ।।
अस्सं सासर द्वाड बाई कोंडून मारतं ।।

विचार आला मनात हे, कसलं आपलं जिणं ।
सारे अप्पलपोटे इथे, मला विचारतं कोण ।
एका एका प्रसंगाची, होऊन आठवण ।
अश्रूंच्या मोत्यांनी भरले, डोळ्यांचे रांजण ।।
अस्सं सासर द्वाड बाई मारतं कोंडून ।।

आठवले मी माहेरी, किती होते सुखात ।
कशाची ना चिंता होती, ना कशाची ददात ।
कित्ती कोडकौतुक रोज, गोडधोड पानात ।
अस्सं माहेर सुरेख बाई खायाला घालतं ।।
अस्सं सासर द्वाड बाई कोंडून मारतं ।।

**** *** चाल बदल
झाली मनाची तडफड । माहेराची लागली ओढ ।
सासू मात्र होती गाढ, झोपलेली ।।
तिला मुळी कल्पनाच नाही । सुनेचं बिनसलं कांही ।
उठल्यावर गेली तीही, मंडळात ।।
पतीचा ना आला फोन । तगमग होईना सहन ।
चिठ्ठी लिहून ठेऊन, गेली माहेरा ।।
जेंव्हा संध्याकाळ झाली । घरची मंडळी परतली ।
त्यांची दाणादाण उडाली, चिठ्ठी वाचून ।।

**** *** चाल बदल
सासूबाईंनी फोन लावला । “ये गं सूनबाई आपल्या घराला ।
माझा नेकलेस देते तूला ।”
“तुमचा नेकलेस नको मला । कधीच औट ऑफ फॅशन झाला ।
मी नाही यायची तुमच्या घराला ।”
सासुरवाशी, सून रुसून बसली कैसी । मिस्टर जोशी, मिसेस रुसून गेली कैसी ।।

सासऱ्याने एसेमएस केला । “ये गं सूनबाई आपल्या घराला ।
नवीन स्कूटी घेतो तूला ।”
“एसेमएसचा रिप्लाय आला । स्कूटी बिट्टी नको मला ।
मी नाही यायची तुमच्या घराला ।”
सासुरवाशी, सून रुसून बसली कैसी । मिस्टर जोशी, मिसेस रुसून गेली कैसी ।।

नणंद गेली समजावयाला । “चल गं वहिनी आपल्या घराला ।
सेंटची बाटली देते तूला ।”
“मुळीच नको बाटली तुझी । त्याची मला आहे अॅलर्जी ।
यायची इच्छा नाही माझी।”
सासुरवाशी सून रुसून बसली कैसी । मिस्टर जोशी, मिसेस रुसून गेली कैसी ।।

**** *** चाल बदल
सरते शेवटी मिस्टर जोशी, स्वतः गेले बोलवायला ।
समजावण्या की जाब विचाराया, की दम भरायला ।।
“काय प्रकार आहे हा सांग, कशाचा घेतेस सूड ।
सकाळी तर तुझा होता, किती चांगला मूड ।।”

**** *** चाल बदल
पर्समधून काढलं तिकीट । “काय आहे आठवा हे नीट ।
कोण सटवी ही जेनेट , आहे कां उत्तर ।।”
नवरा म्हणाला हांसून । “तूच पहा लावून फोन।
स्वतः घे करून पूर्ण, शहानिशा ।।”

**** *** चाल बदल
टेलीफोनवर तिने, नंबर लावला ।
दुस-या बाजूने एक, पुरुष बोलला ।
“धिस ईज जेनेट ट्रॅव्हल मॅडम, वॉट् कॅन आय् डू फॉर यू ।
वुई हॅव मेनी पॅकेजेस अँड , आय् कॅन मेक वन फॉर यू ।।”

**** *** चाल बदल
मिसेस गेली भांबावून । पतीच्या हातात दिला फोन ।
सांगितले लगेच त्यानं , “जोशी स्पीकिंग ।।
आमचं झालं कां बुकिंग । हॉटेल, ट्रॅव्हल, साईट सीइंग ।
केंव्हा मी येऊ सांग, तिकीट घ्यायला ।।”
पत्नीला मग सांगितलं । “लग्नाला जाणं हुकलं ।
तुझं तोंड हिरमुसलेलं , दिसलं आईला ।।
तिच्या मनाला लागलं । बाबांनी मला सांगितलं ।
मी सुध्दा ठरवलं, कांही मनात ।।
आपली मॅरेज अॅनिव्हर्सरी । जोशात करावी साजरी ।
गोवा पहायची करावी पुरी, तुझी इच्छा ।।
शनिवारी योगायोगानं । येतांना ऑफीसमधून ।
मिस्टर मिसेस महाजन , भेटले वाटेत ।।
गेलेले नुकते गोव्याला । म्हणे छान पॅकेज मिळाला ।
ट्रॅव्हल एजंटचा नंबर दिला , त्यांनी लगेच ।।
जो कागद मिळाला खिशात । ते होते गं हेच तिकीट ।
त्यामागे लिहिला घाईत , फोन नंबर ।।
मोबाईलवर लावून फोन । मी सांगितला माझा प्लॅन ।
म्हणाला दिवसांनी दोन , मिळतील तिकीटे ।।
कांही हातात नव्हतं आलं । म्हणून तुला नाही सांगितलं ।
त्यानं एवढं सगळं झालं, महाभारत ।।”

**** *** चाल बदल
एके दिवशी मिस्टर जोशी आणि मिसेस जोशी ।
समजुतीच्या घोटाळ्याला पडले कसे हो फशी ।
संशयकल्लोळाची एक कहाणी छोटीशी ।
सांगितली तुम्हा आज, सांगा वाटली कशी ।।
एके दिवशी .. . . . . . . ..

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: