विज्ञानाचा अभ्यास – एक संवाद

मी आठ वर्षांपूर्वी हा लेख तीन भागात लिहिला होता. त्यांना एकत्र आणून आणि थोडे संपादन करून आज या ब्लॉगवर देत आहे.

विज्ञानाचा अभ्यास आणि प्रसार करणाऱ्या एका गुरुकडे त्याला भेटायला एक नवा शिष्य आला. त्यांच्यामधला हा काल्पनिक संवाद.

शिष्य : गुरुवर्य, आपल्याकडून अंमळ मार्गदर्शन घ्यावे हा हेतू मनात बाळगून मी मोठ्या आशेने आपल्याकडे आलो आहे, माझ्यावर अनुग्रहाची कृपा करावी.
गुरू : वत्सा, तुझ्या अंगावरील वस्त्रे, भाळावरील टिळा वगैरे पाहता तू कोणत्या मठातून आला आहेस हे मला स्पष्ट दिसते आहे. तो मठ सोडून तू इथे माझ्याकडे कां बरे आला आहेस ?
शिष्य : छे! छे! तसा विचार स्वप्नातसुध्दा कधीच माझ्या मनाला शिवणार नाही. आपल्या मठात राहूनच फावल्या वेळात इतरत्र जाऊन ज्ञानाचे कांही जास्तीचे कण गोळा करावेत अशी माझी मनीषा आहे. विज्ञान या विषयाची माहिती करून घेण्यासाठी मी आपले नांव ऐकून आपल्याकडे आलो आहे.
गुरू : माझ्या नांवाची ख्याती तुझ्या मठापर्यंत पोचली हे ऐकून मला परमसंतोष होत आहे. मी तुला अवश्य मदत करेन, पण माझ्या मनात एक शंका येते. विश्वातील सर्व ज्ञानसंभार तुझ्या मठाधिपतींच्या स्वाधीन केला गेला होता असे नेहमी सांगण्यात येते.
शिष्य : ते खरेच आहे. कित्येक कल्पांपूर्वी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने आपल्या चार मुखांतून चार वेदांचे ज्ञान आपल्या प्राचीन काळातील महर्षींना सांगितले होते. त्यानंतर त्याखेरीज ज्ञानाचा कणमात्रसुद्धा कधीही आणि कोठेही उत्पन्न झाला नाही अशी आमची गाढ श्रध्दा आहे. ज्ञानाचा हा ओघ पुढे युगानुयुगातील कोट्यावधी वर्षे गुरूशिष्यपरंपरेतून आपल्या देशात वहात राहिला होता. कलीयुग आल्यानंतर दु्ष्ट म्लेंच्छांनी आक्रमण करून विध्वंस केल्यामुळे त्यातले बरेचसे नष्ट झाले. एकट्या नालंदा विश्वविद्यालयातली ……
गुरू : मला हे सांग, तू आज माझ्याकडे कशासाठी आला आहेस?
शिष्य : त्याचे निवेदन मी आधीच केले होते ते आपल्या स्मरणात असेलच.
गुरू : अरे, एक प्रकट निवेदन आणि दुसराच अंतरःस्थ उद्देश असे असू शकते. खरे तर तुला पाहून मला कचदेवयानी आख्यानाची आठवण झाली. पण कांही हरकत नाही. मला देवयानीसारखी हट्टी कन्यका नाही आणि मी जास्त वारुणीप्राशन करत नाही, कधीतरी एकादा चषक ओठांना लावलाच तरी त्यात राख मिसळलेली मला कळणार नाही इतक्या मद्यधुंद अवस्थेपर्यंच मी कधी पोचत नाही. त्यामुळे माझी अवस्था शुक्राचार्यांसारखी होण्याचा धोका मला वाटत नाही. शिवाय षट्कर्णी होताच विफल होईल अशी कोणतीही विद्या मी शिकलेलो नाही. माझ्या मते कोणतीही विद्या अशी नसते. ज्या विज्ञानाचे मी थोडेसे अध्ययन केलेले आहे ती विद्या दुसऱ्याला देण्यामुळे कमी होत नाही, उलट ती वाढते असा माझा विश्वास आहे. त्यामुळे ती शतकर्णी, सहस्रकर्णी झाल्यास त्यातून जगाला लाभच होणार आहे. म्हणूनच ती विद्या प्राप्त करण्यासाठी जो कोणी माझ्याकडे येतो त्याला मी कधी नकार देत नाही. तुलाही मी नाही म्हणणार नाही. पण तुझ्या हेतूविषयी माझ्या मनात शंका येते.
शिष्य : कोणती?
गुरू : विज्ञानाची खरोखर उपासना करणारे लोक आयुष्यभर स्वतःला त्या मार्गाचे वाटसरू समजतात. आपण अंतिम मुक्कामावर पोचल्याचा दंभ ते कधीही भरत नाहीत. आपण जसजसे पुढे जाऊ तसतसा पुढील भाग नजरेसमोर येत जातो, कोणीही मानव क्षितिजापर्यंत कधीच पोहचू शकत नाही, आपल्याला जेवढे समजले आहे त्याच्या अनंतपट त्याच्या पलीकडचे न समजलेले विश्व आहे हे त्यांना चांगले ठाऊक असते. पण आपल्याला विज्ञानातले सारे कांही समजलेले आहे असा आविर्भाव आणणारे कांही महाभाग आधीपासून तुझ्या मठात मात्र आहेत.
शिष्य : म्हणजे काय? असे महान लोक आमच्याकडे आहेतच मुळी ! आमच्या महंतांनी या विषयांवर एक महान ग्रंथ लिहिला आहे. आम्ही सारे भक्तगण नेहमी त्याची पारायणे करत असतो. पण पाश्चिमात्य पंडितांनी हल्लीच्या काळात विज्ञानात कांही नवे दिवे लावले आहेत असे ते म्हणतात. त्यांचा परामर्ष घेण्याच्या हेतूने मी आता तुमच्याकडून विज्ञानाचे थोडे पाठ घेण्याचे ठरवले आहे.
गुरू : म्हणजे तुमचे विज्ञान आता शिळे झाले आहे तर!
शिष्य : कांही तरीच काय? साक्षात् ब्रह्मदेवाने दिलेले अजरामर ज्ञान कधीही शिळे होणे शक्यच नाही. शिवाय आपली अब्जावधी वर्षे म्हणजे त्याचा तर फक्त एक निमिषमात्र असतो. त्यामुळे तसेही हे सारे ज्ञान ताजेतवानेच आहे. म्लेंच्छांनी केलेल्या ………. आणि त्यानंतर आलेल्या लबाड गौरवर्णीयांनी तर उरलीसुरली ग्रंथसंपदा इथून चोरून नेली आणि त्यातले एकेक पान वाचून ते आपल्या नांवाने खपवत गेले. परकीय अंमलाखाली आपल्या लोकांनाही ते ऐकून घ्यावे लागले असेल, पण स्वातंत्र्यप्राप्तीला सत्तर वर्षे होऊन गेली असली तरी आपल्या लोकांची मानसिक गुलामगिरी कांही गेलेली नाही. आपले मूर्ख विद्वान अजूनही त्यालाच खरे मानून पाश्चात्य संशोधकांचीच वाहवा करत असतात. आपल्या महान पूर्वजांच्या कार्याची त्यांना कदरच नाही. त्यांच्या हक्काचे पण उपटसुंभ लोकांनी काबीज केलेले श्रेय ते हिरावून घेणाऱ्यांकडून परत हिसकावून घेऊन आपल्या पूर्वजांना ते अर्पण करण्याचा विचार इतर कोणी करत नसला तरी आमचा मठ त्यासाठी कटिबध्द आहे …… अहो गुरुदेव, अहो, अहो, अहो, अहो, अहो, अहो, अहो, मी तुम्हाला काय सांगतो आहे?
गुरू : तुझे चालत राहू दे. त्याचा प्रतिवाद करण्यात मी माझा वेळ वाया घालवणार नाही. तुझ्या मस्तकातली ध्वनीफीत संपल्यानंतर आपण मुद्यावर येऊन चर्चा करू.
शिष्य : तर मी कुठे होतो?
गुरू : तू जिथे असशील तिथे ठीकच होतास, पण आज माझ्याकडे कशासाठी आला आहेस हे माझ्या लक्षात आले आहे, तुझ्या मनातला सुप्त हेतू आता प्रकट झाला आहे. या कामात माझी कांही मदत होणे शक्य नसल्यामुळे तू आपल्या मठात परत जाऊ शकतोस.
शिष्य : पण तुम्ही तर मला मार्गदर्शन करायला तयार झाला होता.
गुरू : बरोबर आहे, पण योग्य त्या वाटेवर जायचा रस्ता दाखवणे याला मार्गदर्शन असे आमच्याकडे म्हणतात. तू आधीच वेगळा रस्ता निवडलेला आहेस. तो दाखवणारे गुरूही तुला लाभलेले आहेत. मी तुला ती वाट दाखवू शकणार नाही.
शिष्य : आपल्याकडे आलेल्या कोणालाही विज्ञानाचे धडे द्यायला आपण नकार देत नाही असेही तुम्ही म्हणाला होतात.
गुरू : त्यासाठी मी आजही उत्सुक आहे. तू विज्ञानाचा विद्यार्थी व्हायला तयार असशील तर मी तुझा शिक्षक होईन, पण मग मी सांगतो ते तुला लक्ष देऊन ऐकायला पाहिजे. तेवढा वेळ तरी तुझ्या मस्तकात सतत फिरत असलेली ही तुझ्या पंथाची ध्वनिमुद्रिका बंद करून ठेवावी लागेल. एवढे एक पथ्य पाळणे तुला मान्य असेल तर मी लगेच तुला विज्ञानाचा पहिला धडा शिकवेन.
———————–
गुरू : वत्सा, आता आपण विज्ञानाचा पहिला धडा सुरू करू. विज्ञानाबद्दल तुझ्या मनात कोणती संकल्पना आहे? विज्ञान हा शब्द उच्चारताच तुझ्या डोळ्यासमोर पटकन कोणत्या गोष्टी येतात?
शिष्य : कोणी जटाधारी आणि अस्ताव्यस्त दाढी वाढवलेले, जाड भिंगाचा चश्मा लावलेले शास्त्रज्ञ प्रयोगशाळेत रात्रंदिवस कसलेसे संशोधन करून शोध लावतात. त्यालाच तुम्ही लोक विज्ञान म्हणता ना?
गुरू : हा विज्ञानाचा एक अत्यंत महत्वाचा भाग असला तरी आपल्या रोजच्या जीवनात आपण विज्ञानाचा उपयोग करत असतो. तो कशा प्रकारे असे तुला वाटते?
शिष्य : छे! छे! मी कधी नवे प्रयोग बियोग करून पहात नाही बाबा ! आपलं सगळं नीट चाललं असतांना उगाच कशाला प्रयोग करायचे?
गुरू : बरंय्. मग तू रोज दिवसभर काय करत असतोस?
शिष्य : प्रभातकाली उठून अभ्यंगस्नान करतो, देवपूजा करून स्तोत्रपठण करतो, कार्यालयात जाऊन तिथले काम करतो. आता सगळी दिनचर्या सांगत बसू का?
गुरू : नको. पण जेवण तरी करतोस ना?
शिष्य : म्हणजे काय? दिवसातून तीन वेळा आहार घ्यायलाच पाहिजे असे आपल्या आयुर्वेदात सांगितले आहे. तुम्ही घेत नाही कां?
गुरू : मी सुद्धा जेवण करतोच, पण ते आयुर्वेदात किंवा आणखी कुणी मला सांगितले आहे म्हणून करत नाही. मला भूक लागते ती भागवण्यासाठी मी आपली क्षुधाशांती करतो. पण तुला दिवसातून तीन वेळा आहार कां घ्यायला हवा?
शिष्य : आयुर्वेदात सांगितलेच आहे तसे.
गुरू : पण तुमचे ऋषीमुनी अन्नप्राशन न करता वर्षानुवर्षे रहात होते म्हणे.
शिष्य : ते तसे रहातच होते. यात काही संशय आहे का?
गुरू : म्हणजे आयुर्वेदात काय लिहिले आहे हे त्यांना माहीत नव्हते का ते आयुर्वेदाचे पालन करत नव्हते ?
शिष्य : ते तर सर्वज्ञानी होते. त्यांच्याबद्दल आपण अज्ञ लोक कसली चर्चा करणार?
गुरू : मला एवढेच सांगायचे आहे की अन्न खाण्यासाठी तू दिलेले कारण शास्त्रीय नाही. आता समज, तुला एक दिवसभर कांही ही खायला मिळाले नाही तर काय होईल?
शिष्य : भुकेने माझा जीव तळमळेल. आणखी काय होणार?
गुरू : म्हणजेच तसे होऊ नये म्हणून तू दिवसातून दोन तीन वेळा अन्नग्रहण करतो. बरोबर?
शिष्य : असेल कदाचित.
गुरू : असेल नाही, ते खरे कारण आहे. आता मला सांग, त्यासाठी रोज एवढा वेळ वाया घालवण्यापेक्षा तू एकदम आठवड्याभराचे जेवण का करून घेत नाहीस?
शिष्य : ते करायला मी काय उंट आहे?
गुरू : तू उंट नाहीस, पण ज्या पध्दतीने तू हा प्रश्न विचारलास त्यावरून तू स्वतःला उंटाहून श्रेष्ठ समजत असणार. पण तुच्छ उंटाला जे जमते ते तू कां करू शकत नाहीस?
शिष्य : साधी गोष्ट आहे. कारण मी उंट नाही, तो उंट आहे. तो माझ्यासारखे बोलू शकतो का?
गुरू : ठीक आहे. तू रोजच्या जेवणात काय काय खातोस?
शिष्य : हेच आपले वरण, भात, पोळी, भाजी, उसळ, चटणी, कोशिंबीर वगैरे
गुरू : आणि गवत, चारा, झाडाची पाने …
शिष्य : असले खायला मी काय बैल आहे की शेळी आहे? तुम्ही मला काय समजलात? मघापासून विज्ञान सोडून कसले भलते सलते प्रश्न विचारत सुटला आहात?
गुरू : वत्सा शांत हो. थोडा धीर धरलास आणि लक्षपूर्वक विचार केलास तर या सगळ्या संभाषणाचा विज्ञानाशी निकटचा संबंध आहे ते लवकरच तुला जाणवेल. पण एक गोष्ट चांगली लक्षात ठेव. कोणतीही विद्या आत्मसात करायची असेल तर त्यासाठी सहनशक्ती, एकाग्रता आणि सारासार विवेकबुध्दी यांची आवश्यकता असते. निरुत्साहित न होता एकाग्रचित्त होऊन चिकाटीने व नेटाने प्रयत्न करत रहाण्याची क्षमता अंगात असल्याखेरीज कोणताही माणूस विज्ञानाचे अध्ययन तर करू शकणारच नाही. आतापर्यंतच्या तुझ्या बोलण्यातून तू यासाठी किती अपात्र आहेस हेच दाखवत आला आहेस. तुझ्यासमोर मी आता दोन पर्याय ठेवतो. एकतर तू मनातून इच्छा नसतांना विद्यार्थ्याचे केवळ सोंग आणले आहेस हे मान्य कर आणि हे नाटक इथेच थांबव. अथवा मी सांगितलेले गुण जागृत कर आणि विज्ञानासंबंधीची माहिती जाणून घेण्याचा निदान एक प्रामाणिक प्रयत्न कर.
शिष्य : तुमच्याकडून कांही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत असे आता मलाही थोडे थोडे पटायला लागले आहे. त्यामुळे मी मनावर संयम आणि जिभेवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करेन.
गुरू : छान ! आता सांग, गायबैल वगैरे पशु चारा खातात, शेळ्यामेंढ्या झाडांचा पाला खातात, असे ते का करतात?
शिष्य : कारण ती जनावरे आहेत.
गुरू : वाघसिंह ही सुध्दा जनावरेच आहेत, पण ती गवत कां खात नाहीत?
शिष्य : कारण ती हिंस्र जनावरे आहेत.
गुरू : आपली कुत्रीमांजरे तर एवढी हिंस्र नसतात, पण ती सुध्दा चारा खात नाहीत.
शिष्य : कारण प्रत्येक प्राण्याचा आहार वेगळा असतो.
गुरू : हे मात्र तू अगदी १०० टक्के बरोबर सांगितलेस. आता सांग, कोणते अन्न कोणी खायचे हे कोण ठरवत असेल?
शिष्य : अर्थातच ही सगळी त्या परमेश्वराची अगाध लीला आहे. ज्याने प्राणीमात्र निर्माण केले त्यानेच त्यांचे अन्नसुध्दा निर्माण केले.
गुरू : हे सुध्दा अचूक उत्तर आहे. कोणी त्याला परमेश्वर म्हणेल, कोणी निसर्ग म्हणेल. पण प्रत्येक प्राणीमात्राचे अन्न निसर्गात तयार होत असते. तो स्वतः ते उत्पन्न करत नाही, एवढे खरे आहे. आता सांग जे अन्न तू रोज खातोस ते कोण बनवते?
शिष्य : अर्थातच माझी आई.
गुरू : आणि सकाळी कोणती भाजी करायची किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी कोणती डाळ शिजवायची हे कोण ठरवतो?
शिष्य : तेही बहुतेक वेळा माझी आईच ठरवते, कधीकधी बाबा सांगतात किंवा आम्ही मागणी करतो.
गुरू : म्हणजे कोणते अन्न खायचे आणि ते कशा प्रकाराने तयार करायचे यातले कांही निर्णय तुमच्या घरातली माणसे घेतात.
शिष्य : कांही नव्हे, ते सारे निर्णय आम्हीच घेतो.
गुरू : अगदी असेच म्हणता येणार नाही, कारण तृणधान्ये, कडधान्ये, पालेभाज्या, फळभाज्या वगैरे आपले मुख्य अन्नपदार्थ आपण शून्यामधून निर्माण करू शकत नाही. आपल्याला ते निसर्गाकडून घ्यावेच लागतात. आपण त्यांची लागवड करतो, त्यांच्या रोपांची मशागत करतो, आलेल्या पिकांची कापणी करतो अशा प्रकारे माणसांचा सहभाग त्यात असतो म्हणजे आपण निसर्गाला फक्त सहाय्य करतो. त्यानंतर भाजणे, शिजवणे, तळणे वगैरे प्रक्रिया करून आपण त्यांचेपासून रुचकर पदार्थ बनवतो. त्यामुळे आपण जे अन्न खातो ते तयार होण्यातले पहिले मुख्य निर्णय देवाचे किंवा निसर्गाचे असतात आणि नंतरचे इतर कांही माणसांचे असतात. यातला जो भाग निसर्गाचा आहे त्याचा पध्दतशीर अभ्यास करणे म्हणजे विज्ञानाचा अभ्यास. माणसे जे निर्णय घेतात त्यांचा अभ्यास पाकशास्त्र, समाजशास्त्र, संस्कृती वगैरे इतर नांवाखाली केला जातो. एकंदरीतच जीवनाच्या सर्वच क्षेत्रात निसर्गाच्या नियमांचा अभ्यास हेच विज्ञानाचे मुख्य ध्येय असते. आता सांग, तू कधीकधी घराबाहेर काही तरी खात असशीलच.
शिष्य : हो. रुचीपालटासाठी आम्ही उपाहारगृहांना भेट देत असतो.
गुरू : तिथे कांही वेगळे पदार्थ खात असाल.
शिष्य : अर्थातच.
गुरू : तू कधी परगावी जात असशीलच.
शिष्य : आमच्या शिबिरांना उपस्थित राहण्यासाठी आम्ही परप्रांतातसुध्दा जात असतो.
गुरू : त्या स्थानी तुला कुठल्या प्रकारचे अन्न मिळते?
शिष्य : तिथल्या स्थानिक पध्दतीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आमच्या जेवणात असतात.
गुरू : तुझ्या लहानपणी खाल्लेले कांही विशेष पदार्थ तुला आठवत असतील.
शिष्य : हो. आजोळी गेल्यावर आमची आजी खास कोकणातले कांही छान पदार्थ करून खायला घालत असे. आता ते मिळणे दुर्मिळ झाले आहे.
गुरू : तेंव्हा प्रचारात नसलेले कांही नवीन पदार्थ तू आता पाहिले असशील.
शिष्य : ते तर उदंड झाले आहेत. इंग्रज लोक फक्त पावबिस्किटे मागे सोडून गेले होते, आता पिझ्झा, बर्गर, पाश्ता, मॅकरोनी …. असल्या पदार्थांनी नुसता उच्छाद मांडला आहे. कांही विचारू नका. आपले कट्टर शत्रू म्हणजे जे चिनी, त्यांची नूडल्स आणि मांचूरियन सुध्दा लोक मिटक्या मारून खायला लागले आहेत. स्वाभिमान म्हणून कांही उरलेलाच नाही…..
गुरू : थोडा वेळ आपण तो विषय बाजूला ठेवू. जगाच्या वेगवेगळ्या भागात राहणारे लोक वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खातात असे तुझ्याच सांगण्यावरून दिसते. नाही का?
शिष्य : हो.
गुरू : देश तसा वेष अशीसुद्धा एक म्हण आहे, शिवाय लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात. अन्न, वस्त्र, भाषा या सगळ्या गोष्टी माणसांनी विकसित केलेल्या असल्यामुळे स्थान आणि काल यांच्याबरोबर त्या बदलत असतात. माणसांनी केलेले नियम, कायदे वगैरे गोष्टी समान आणि शाश्वत नसतात. त्या वेगवेगळ्या असतात आणि त्यात वरचेवर बदल होत राहतात. पण जगभरातली सारी जनावरे मात्र पूर्वीपासून चारा खात आली आहेत आणि भविष्यकाळातही गवताच्या कुरणात चरणार आहेत. आहार हे एक उदाहरण झाले. प्रकाशकिरण, ध्वनी, गुरुत्वाकर्षण, रासायनिक क्रिया, ऋतुचक्र, झाडांची वाढ वगैरे सर्व नैसर्गिक क्रियांना ही गोष्ट लागू पडते. त्यांच्याबद्दलचे निसर्गाचे नियम सगळीकडे समान असतात आणि काळासोबत ते किंचितही बदलत नाहीत. सृष्टीचे सर्व नियम स्थलकालातीत असतात. अशा शाश्वत नियमांचा अभ्यास विज्ञानात केला जातो.
शिष्य : विज्ञानातले नियम जर इतके शाश्वत असतात तर आइन्स्टाईनने न्यूटनला खोटे कसे ठरवले?
गुरू : आपल्याला असे ढोबळ विधान करून चालणार नाही. त्याच्या तपशीलात जायला हवे.
शिष्य : म्हणजे?
गुरू : मी तुला एक उदाहरण देतो. आज तुला एका माणसाने त्याच्या एकाद्या नातेवाइकाची ओळख करून दिली, उद्या दुसऱ्या कोणी तुला सांगितले की “हा त्याच्या काकाचा मुलगा आहे”, परवा तिसरा म्हणाला की “हा त्याच्या थोरल्या काकाचा मुलगा आहे”, “हा त्याच्या मोठ्या काकाचा धाकटा मुलगा आहे” अशी माहिती चौथ्या माणसाने तुला तेरवा दिली. अशा प्रकारे त्यांचे नातेसंबंध अधिकाधिक स्पष्ट होत गेले, याचा अर्थ पहिले तीघे खोटे बोलत होते असा होत नाही. विज्ञानाची प्रगती देखील अशीच टप्प्याटप्प्याने होत आली आहे. मी दिलेल्या उदाहरणात चारच टप्पे आहेत, तर विज्ञानाच्या इतिहासातील प्रत्येक विषयात ते असंख्य आहेत. तुझ्या प्रश्नाचे पूर्ण उत्तर मिळण्यासाठी आधी न्यूटनने काय काय सांगितले होते आणि नंतर आइन्स्टाईनने त्यात कोणती सुधारणा केली, याचा सखोल अभ्यास करायला हवा. आइनस्टाइनने कांही वेगळे सांगितले म्हणून न्यूटनचे नियम खोटे होते असे होत नाही. निसर्गाचे आपले नियम मुळीच बदललेले नाहीत. फक्त माणसाला त्यांचे झालेले आकलन वाढत गेले. यालाच विज्ञानातली प्रगती असे म्हणतात.
हे थोडेसे विषयांतर झाले. विज्ञानातील नियम आणि मानवीय नियम यात एक मोठा फरक आहे.
शिष्य : कोणता?
गुरू : माणसे कायदा करतात आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा निर्माण करतात, तरीही अनेक लोक त्याचे उल्लंघन करतात. तसे करणे त्यांना शक्य असते. निसर्गाचे नियम मात्र कोणीही कधीही मोडू शकतच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर विस्तवाला हात लावला तर त्याचा चटका बसणार किंवा पाण्यात दगड टाकला तर तो बुडणार असेच जगाच्या पाठीवर कुठेही होते, होत गेले आणि होत जाणार आहे.
शिष्य : हे मात्र बरोबर नाही हां! अहो, होलिका ज्या आगीत जळून भस्म झाली त्याच आगीतून भक्त प्रल्हाद सुखरूपपणे बाहेर आला आणि रामनामाच्या महिम्यामुळे समुद्राच्या पाण्यात दगड तरंगले अशी किती तरी उदाहरणे आपल्याकडे घडलेली आहेत.
गुरू : ही तुझी श्रध्दा आहे.
शिष्य : आपल्या पुराणांत तसे लिहिलेलेच आहे, ते प्रत्यक्षात घडले होते म्हणून तर इतक्या विस्ताराने लिहिले गेले असेल ना?
गुरू : उडणारे गालिचे आणि दिव्यातला राक्षस यांच्या सुरस आणि चमत्कृतीपूर्ण कथा अरबी भाषेत लिहिल्या गेल्या आहेत, सुपरमॅन किंवा आजकालच्या हॅरी पॉटरच्या गोष्टी कुणीतरी लिहिल्या आहेत म्हणून त्या सत्य घटना मानायच्या का?
शिष्य : पण पुराणे हे आपले धर्मग्रंथ आहेत. आपल्या पवित्र पुराणातल्या गोष्टींबद्दल तुम्ही शंका घेता, आणि त्या परक्या न्यूटन आणि आइन्स्टाईनवर तुम्ही का म्हणून विश्वास ठेवता?
गुरू : तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेऊ नयेच. अरे, हाच विज्ञानाचा अगदी प्राथमिक नियम आहे. केवळ अमक्या तमक्याने सांगितले म्हणून कोणतीही गोष्ट ग्राह्य मानायची नसते असा वैज्ञानिक पध्दतीचा आग्रह असतो. त्या माणसाने जे कांही सांगितले आहे ते पुराव्यांच्या आणि तर्काच्या आधारावर तपासून घेऊन सिध्द झाल्यानंतरच त्याचा स्वीकार केला जातो. न्यूटन आणि आइन्स्टाईन यांनी जे जे कांही सांगितले ते त्यांच्या काळातदेखील लगेच कोणीही मान्य केले नव्हते. त्याची व्यवस्थितपणे सर्वंकष छाननी करून झाल्यानंतर तत्कालीन विद्वानांना ते पटले आणि म्हणून त्यांनी ते मान्य केले.
शिष्य : आणि म्हणून तुम्ही सुध्दा मानलेत. असेच ना? आम्ही सुध्दा आमच्या आचार्यांनी सांगितले म्हणून पोथ्यापुराणांवर विश्वास ठेवतो. मग आपल्या दोघांमध्ये काय फरक आहे?
गुरू : खूप फरक आहे. वैज्ञानिक संशोधकांनी जे सिध्दांत सांगितले ते तर्काला धरून होते. त्याला प्रत्यक्ष प्रयोगांचा आधार होता, त्यामधून प्रत्यक्ष अनुभवाला आलेल्या विज्ञानाच्या नियमांचे खुलासेवार स्पष्टीकरण करणारे होते. ते निसर्गाच्या कोठल्याही शाश्वत नियमांचा भंग करणारे नव्हते. या सगळ्या गोष्टींवर अनेक वेळा झालेले विचारमंथन, त्याबद्दल निर्माण झालेल्या शंकांचे निरसन वगैरे पाहून झाल्यानंतर ते सिध्दांत मान्य करायला कांही हरकत नाही. शे दोनशे वर्षांपूर्वी लागलेल्या शोधांवर आजसुद्धा पुनःपुनः प्रयोग करूनच ते विद्यार्थ्यांना शिकवले जातात. पुराणातील ज्या चमत्कारांचे उल्लेख तू केलेस ते सृष्टीच्या नियमांच्या विरुध्द घडलेले वाटतात आणि ते कसे घडू शकले याचे शास्त्रीय स्पष्टीकरण मिळत नाही. प्रयोगाने ते सिद्ध करून दाखवता येत नाहीत. विज्ञानाच्या अभ्यासात अशा गोष्टी केवळ कोणी तरी सांगितल्या म्हणून विश्वसनीय समजल्या जात नाहीत. कथा, पुराणे वगैरे आपले समृद्ध असे पुरातन वाङ्मय आहे. ते उपमा, उत्प्रेक्षा, रूपक आदि अलंकारांनी नटलेले आहे. वाङ्मयामध्ये अनेक गोष्टी रूपकांमधून मांडल्या जातात, त्यांचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो, त्यातला गर्भित अर्थ, त्याच्या मागचा उद्देश, त्यातले सौंदर्य हे सगळे पहायचे असते, ते समजून घ्यायचे असते.
तुला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. न्यूटन, पास्कल वगैरे संशोधकांनी जे सिध्दांत मांडले त्यांच्या आधाराने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जी प्रगती झाली तिचा जेवढा लाभ युरोपातल्या लोकांना मिळाला आहे तेवढाच मला आणि तुलाही झाला आहे. त्याचप्रमाणे प्राचीन काळातल्या किंवा आजच्या भारतीय वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनाचा लाभ परकीयांनाही मिळाला, यामुळे ते त्यांचेसुध्दा आहेत. विज्ञानाच्या जगात हे आमचे हे तुमचे असा संकुचित विचार केला जात नाही.
शिष्य : पण मग भारतीय वैज्ञानिकांनी लावलेल्या शोधांचे श्रेय युरोपियन लोकांना कां देतात?
गुरू : एकादे उदाहरण सांग.
शिष्य : या न्यूटनच्या आधी हजारो वर्षांपूर्वी आपल्या लोकांना गुरुत्वाकर्षणाची माहिती होती.
गुरू : असे तुला वाटते. पण न्यूटनचा सिध्दांत तुला माहीत तरी आहे का?
शिष्य : हेच ना की झाडावरून सुटलेले फळ जमीनीवर पडते. आकाशात् पतितम् तोयम् यथा गच्छति सागरम् या श्लोकात काय वेगळे सांगितले आहे?
गुरू : अरे, कुठलीही गोष्ट वरून खाली पडते, झाडावरून रोजच पाने, फुले, फळे वगैरे खाली पडतच असतात, एवढी साधी गोष्ट लहान पोराने सुध्दा रोजच्या जीवनात पाहिलेली असते. तेवढे सांगायला न्यूटनची किंवा कोण्या मोठ्या ऋषीची गरज नाही. न्यूटनने यापेक्षा खूप जास्त आणि वेगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या.
शिष्य : हो, त्या फळाला पृथ्वी आपल्याकडे आकर्षित करते. ही गोष्टसुध्दा आपल्या आर्यभट्टांनी की भास्कराचार्यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवली आहे.
गुरू : नक्की कोणी आणि काय लिहून ठेवले आहे हे तरी तुला ठाऊक आहे का?
शिष्य : त्याची काय गरज आहे? त्यातल्या कुणीतरी जे कांही लिहिले आहे त्याचा अर्थ असा निघतो असे आमचे आचार्य म्हणतात.
गुरू : त्यांनी नेमके काय लिहिले आहे हे तुला माहीत नाही, न्यूटनने कोणता सिध्दांत मांडला तेही माहीत नाही आणि तरीही तू सांगतोस की आपल्या पूर्वजांना तो माहीत होता.
शिष्य : तुम्ही तो सांगू शकता?
गुरू : हो. तू जर त्याचा मनापासून अभ्यास केलास तर तू सुद्धा ते सांगू शकशील. पृथ्वीने ओढून घेतल्यामुळे झाडावरचे फळ खाली पडत असावे असा तर्कशुध्द विचार न्यूटनच्या आधी अनेक लोकांनी व्यक्त केला होता, भारतीय शास्त्रज्ञांनीसुद्धा केला होताच. पण त्याचा अर्थ न्यूटनने मांडलेला गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत त्यांनी पूर्णपणे सांगितला होता असा मात्र होत नाही. झाडावरचे फळ आणि झाडामागे दडलेला चंद्र या दोघांनाही पृथ्वी आपल्याकडे खेचून घेत असते, पण त्यातले फळ जमीनीवर येऊन पडते आणि चंद्र मात्र आभाळात फिरत कां राहतो यातले गूढ शोधता शोधता केलेल्या वीस वर्षांच्या तपश्चर्येनंतर न्यूटन गुरुत्वाकर्षणाच्या सिध्दांतापर्यंत कसा पोचला हे मी तुला सविस्तर सांगू शकेन. पण त्या आधी तुला इतर अनेक गोष्टी शिकून घ्याव्या लागतील. न्यूटनने हा सिध्दांत नुसत्या शब्दात एका वाक्यात सांगितला नव्हता, तर तो संपूर्ण गणितासह F=Gm1m2/dxd अशा एका विशिष्ट समीकरणाच्या रूपात मांडला होता. त्यासाठी पृथ्वीचा व्यास, चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर, चंद्राचा पृथ्वीभोंवती प्रदक्षिणा घालण्याचा वेग, किती उंच झाडावरून फळाला जमीनीवर यायला किती वेळ लागतो आणि त्यावेळी त्याचा वेग किती असतो यांचे आंकडे अशी किती तरी माहिती चिकाटीने गोळा करून, त्यांची गणिते मांडून, भरपूर आंकडेमोड करून झाल्यानंतर त्याला हे समीकरण मिळाले होते. फक्त पृथ्वीच नव्हे तर विश्वातील एकूण एक लहानमोठ्या वस्तू एकमेकांना स्वतःकडे आकर्षत असतात या मुख्य तत्वावर तो आधारलेला आहे. लाकूड पाण्यावर तरंगते, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, लंबकाची आवर्तने ठरावीक लयीमध्ये होत असतात अशा कित्येक निरनिराळ्या निरीक्षणांचे स्पष्टीकरण त्या सिद्धांतामधून मिळते. पण यातले काही माहीत नसणाऱ्या लोकांनी त्याबद्दल आपले अगाध अज्ञान दाखवण्याने जगात कोणाचे हंसू होईल?
शिष्य : या सगळ्याची मलाही कांही कल्पना नव्हती.
गुरू : आता आली आहे ना? मी आणखी एकदा तुला सांगतो विज्ञान म्हणजे आपल्या विश्वामधील प्रत्यक घटकाचे गुणधर्म आणि त्यामधील बदल कोणत्या नियमानुसार होतात याचा पद्धतशीर अभ्यास. तो स्वतःलाच करावा लागतो. इथे बाबावाक्यम् प्रमाणम् असे म्हणून चालत नाही. यापुढे विज्ञानाविषयी कांही तरी बोलायच्या आधी मनातला पूर्वग्रह सोडून देऊन त्या विषयाचा मन लावून अभ्यास कर, तो नीटपणे समजून घे, कोणी काय सांगितले याऐवजी त्यावर स्वतः विचार कर आणि मग काय ते ठरव. यात लागेल ती मदत करायला मी तयार आहे.
………

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: