माझा एक नंबरचा शत्रू – ‘पसारा’ शब्दाचा जनक

मला जेंव्हा नीट बोलायलासुद्धा येत नव्हते, तेंव्हापासून “छुबंतलोती तल्लानं” वगैरे माझ्याकडून पाठ करून घेतले होते. त्यातल्या “छतलूबुद्दी” या शब्दाचा अर्थ समजायला लागल्यापासून माझ्या मनातला कुणाहीबद्दलचा वैरभाव काढून टाकण्याचा प्रयत्न मी अधून मधून करत असतो. माझ्या पाठीमागेसुद्धा माझ्याबद्दल बरे बोलणारे लोक मी सहसा कुणाला ‘वाईट’ म्हणत नाही किंवा कुणाचे वाईट चिंतत नाही असे काही वेळा सांगतात म्हणे. हे ऐकून मलाही बरे वाटते. पण मला माहीत आहे की काही शत्रूंनी माझ्या लहानपणापासून आजतागायत माझा पिच्छा पुरवला आहे. त्यांना कितीही वेळा हाकलले तरी बहिणाबाईंच्या ‘वढाय वढाय मना’सारखी ही शत्रूरूपी ढोरे ‘फिरी फिरी पिकावर’ माघारी येतच असतात.

त्यातल्या काही व्यक्ती तर इतिहासातल्या कोणत्या शतकात होऊन गेल्या तेही मला सांगता येणार नाही, पण त्यांनी करून ठेवलेल्या कृती मला अजून छळत असतात. त्यांनी केलेल्या एकाच पापामुळे त्यांनी माझ्यासारख्या इतक्या लोकांचा तळतळाट घेतला आहे की पुढच्या निदान हजार जन्मात तरी ते डास, ढेकूण किंवा झुरळ होणार आहेत याबद्दल माझी खात्री आहे. आज ते ज्या कोणत्या योनीत आणि जिथे कुठे असतील तिथे त्यांचे तळपट व्हावे अशी इच्छा मनात येते आणि एकादा डास, ढेकूण किंवा झुरळ समोर दिसला की त्याचा पार चेंदामेंदा करावा असे वाटते. “माझ्या आयुष्यात मला कधीही न भेटलेल्या या लोकांनी माझे असे कोणते घोडे मारले आहे?” असा विचार तुमच्या मनात येईल, पण मला विचाराल तर माझे फक्त घोडेच नाही तर हत्ती, उंट, गाय, हरीण, ससा वगैरे जो कोणता प्राणी मला कधी हवाहवासा वाटला त्याची या लोकांमुळे वाट लावली गेली आहे. आता एक उदाहरणच पहा ना!

मी तेंव्हा सात आठ वर्षांचा असेन. त्या काळात आताच्या मुलांसारखा ‘मी तो हमाल भारवाही’ झालो नव्हतो. माझी स्लेटची पाटी, पेणसिल, अंकल्पी (अंक लिपी), सर्वसमावेशक असे एक किंवा फार फार तर तशी दोन पाठ्यपुस्तके, कुणी तरी आणून दिलेले एकाददुसरे चित्रांचे पुस्तक, एकादी जुन्या पाटकोऱ्या कागदांची रफ वही, पाच दहा सुटे कोरे किंवा पाटकोरे कागद, शिस्पेन्सिल, रबर, रंगांच्या खडूंची पेटी इतकीच तेंव्हा माझी संपत्ती होती. आमचे प्रशस्त घर माणसांनी भरलेले होते. ऊनपाऊस, थंडीवारा आणि निवांतपणा पाहून मी एकाद्या जागी पुस्तक पहात किंवा चित्र काढत बसलो असेन, त्याच वेळी दारात आलेल्या रम्या किंवा अंत्याची हाक मला ऐकू आली तर लगेच जाऊन पहायला नको का? घरातले कपडे वेगळे आणि बाहेर जाण्यासाठी वेगळा ड्रेस म्हणजे ‘आत एक आणि बाहेर एक’ असा भेदभाव मी त्या काळात करत नसे. त्यामुळे “मी खेळायला चाललोय्” अशी दारातूनच आरोळी देऊन मी सटकलो तर त्याला काय हरकत होती? घरातल्या इतक्याजणांपैकी कोणी ना कोणी तरी ती नक्कीच ऐकणार याची खात्री असायची. खेळून परत आल्यावर सडकून भूक लागलेली असे, थोडे खाऊन होईपर्यंत घरातले कोणीतरी एकादे लहान सहान काम करायला सांगत असे. आपले अर्धवट सोडलेले पुस्तक पहाणे किंवा चित्र काढणे त्यानंतर पुढे चालवावे म्हंटले तर त्या वस्तू जिथे सोडून मी पळालेलो होतो तिथून त्या अदृष्य झालेल्या असायच्या. घरातल्या कोणत्या तरी ताईमाईने, आईने किंवा काकूने त्या उचलून कुठे तरी ठेवलेल्या असायच्या, पण नेमके काय झाले हे मात्र कोणीही मला सांगत नसे. कदाचित त्यांच्याही ते लक्षात येत किंवा रहात नसेल. जमीनीवर काही पडलेले दिसले की ते उचलून ठेवायचे अशी त्यांच्या हातांना यांत्रिक संवय झाली असावी.

“माझ्या त्या वस्तू कुठे गेल्या?” असे कोणाला विचारायचीही सोय नसे. त्याचे उत्तर कोणाकडे आहे? हेच मुळात माहीत नसल्याने कुणाला म्हणून विचारायचे? हा प्रश्न तर होताच आणि कोणालाही माझा प्रश्न विचारला तरी “तू आपापल्या वस्तू उचलून जागेवर ठेवायला कधी शिकणार आहेस? नुसता पसारा करून ठेवायला तेवढं येतं!” हेच उत्तर मिळण्याची खात्री असायची. त्यानंतर माझ्या मनात पुन्हा कधी पुस्तक पहायचा किंवा चित्र काढायचा विचार आला तर मग मी दोन चार कपाटे आणि कोनाडे धुंडाळून माझी मालमत्ता शोधून काढत असे. त्यात इतर दहा पंधरा वस्तू जमीनीवर येत आणि माझा अर्ध्याहून अधिक मूड गेलेला असे. उरल्यासुरल्या मूडला सांभाळत मी माझ्या कामात तंद्री लावायचा प्रयत्न करतो न करतो तेवढ्यात पुन्हा कोणी ताईमाईअक्का यायच्या आणि कानाला पकडून मला ओढत नेऊन मी नव्याने केलेला ‘पसारा’ दाखवायच्या, तो उचलून ठेवायला लावायच्या, पाठीत धपाटाही मिळायचा. त्या काळापासून मी ‘पसारा’ या शब्दाचा भयंकर धसका घेतलेला आहे.

माझा एक मोठा भाऊ कॉलेजशिक्षणासाठी शहरात चालला गेला तेंव्हा रिकाम्या झालेल्या कपाटातला एक खण मी हट्ट करून माझ्या ताब्यात घेतला. माझ्या पुस्तक आणि वह्यांची संख्या तोपावेतो थोडी वाढली होती, शिवाय कंपासपेटी, फुटपट्टी, रंगपेटी, रंगकामाचे ब्रश, दौतटाक, टीपकागद वगैरे काही साधनांची त्यात भर पडली होती. आता माझी हक्काची जागा मिळाल्यामुळे मी काही वस्तूंचा संग्रह करू शकणार होतो. मी तयार केलेल्या कागदाच्या होड्या, विमाने, पक्षी वगैरे कलाकृती आतापावेतो दुसरा दिवस उजाडायच्या आत बंबामध्ये “अग्नये स्वाहा” होत असत, आता मी त्या माझ्या खणात जपून ठेवू लागलो. काडेपेट्यांचे ‘छाप’, रिकाम्या झालेल्या डब्या, भोवरे, गोट्या, गजगे, चिंचोके, पोस्टाची रिकामी पाकिटे, त्यांच्यावरची तिकीटे, रंगीबरंगी खडे, गारगोट्या, शंखशिंपले, खेडेगावात क्वचितच मिळणारी चमकदार नवी नाणी किंवा अती प्राचीन वाटणारी घासून गुळगुळीत झालेली जुनी नाणी अशा अनेक चित्रविचित्र वस्तू मला आकर्षक वाटायच्या आणि मी त्यांना माझ्या खणात स्थान देत असे. त्यातली कुठलीही गोष्ट चुकून जमीनीवर पडली तर ‘पसारा’ समजली जाईल आणि कदाचित मला पुन्हा तिचे दर्शन होणार नाही एवढे शहाणपण मी अनुभवावरून शिकलो होतो. त्यामुळे मला हवी असलेली वस्तू काढतांना इतर काही वस्तू बाहेर आल्याच तरीसुद्धा मी त्यांना पुन्हा खणात कोंबून ठेवत असे.

पण एकाद्या दिवशी मी शाळेतून परत येऊन पाहतो तो माझ्या खणाचे व्यवस्थित स्वरूप आणि मोकळेपण पाहून मला रडू आवरत नसे. मी प्रेमाने जमवलेल्या काही गोष्टी तर तिथून नाहीशा झालेल्या असतच, शिवाय “बघ, मी तुझा खण किती छान आवरून ठेवला आहे? तू त्यात नुसता बुजबुजाट मांडला होतास!” असले काही उद्गार ऐकावे लागत असत. पहायला गेल्यास माझ्या खणातला सोकॉल्ड ‘पसारा’ कुणाला आणि कसला त्रास देत होता? ताई, माई, अक्का, आई, काकू वगैरेंना तोसुद्धा का सहन होत नव्हता? “अचानक कोणीतरी पाहुणा घरी आला आणि त्याने ते कपाट उघडून पाहिले तर त्यातला तुझा खण बघून त्याला काय वाटेल? तो (बहुतांश वेळा ती) त्यावर काय म्हणेल?” असल्या प्रश्नांची सरबत्ती माझ्यावर होत असे. कदाचित त्यात त्यांचीही काही चूक नसेल. “ज्या कोणत्या महाभागाने मराठी भाषेत ‘पसारा’ हा शब्द आणला त्यालाच धरून धोपटायला पाहिजे” असे माझे ठाम मत त्या काळात बनत गेले. आजवर ते बदललेले नाही.

. . . . . . . . . . . .

जरा निसर्गाकडे पहा. निसर्गातले डोंगर कधी तरी एकादा पिरॅमिड, देवळाचा घुमट किंवा भाताची मूद यांच्यासारखे सिमेट्रिकल असतात का? निरनिराळ्या नद्या कधी सरळ रेषेत आणि एकमेकींना समांतर किंवा काटकोन करून वाहतात का? आभाळातले ढग कधी वर्तुळाकार, त्रिकोणी, चौकोनी किंवा पंचकोनी असतात का? रानात उगवलेली झाडे कवायत करत असलेल्या सैनिकांसारखी एकेका रांगेत ठराविक अंतर सोडून उभी असतात का? जमीनीवर पडलेली त्यांची पाने सत्यनारायणाच्या पूजेसाठी मांडतात तशी एकाच बाजूला देठ करून उताणी ठेवलेली असतात का? जमीनीवर पडलेली पाने, फुले, गवत, दगड, गोटे वगैरेंचे त्यांच्या आकारानुसार किंवा रंगांप्रमाणे वेगवेगळे ढीग असतात का? निसर्गामध्ये तसले काहीसुद्धा नसते. तिथे सगळे काही अव्यवस्थितपणे मिसळलेले आणि पसरलेले असते. याचाच अर्थ पसारा असणे हा निसर्गाचा नियम आहे आणि तो करणे हा प्राणीमात्रांचा नैसर्गिक गुण आहे, अर्थातच मनुष्यप्राण्याचासुद्धा, हे वेगळे सांगायची गरज आहे असे मला वाटत नाही.

मी कॉलेजशिक्षणासाठी हॉस्टेलवर रहायला गेलो तिथे एकेका खोलीत तीन तीन मुलांची सोय केलेली होती. प्रत्येकासाठी एक लहानशी कॉट आणि टेबलखुर्ची दाटीवाटी करून ठेवली होती, कपाट मात्र नव्हते. सगळ्या मुलांनी पलंगाखाली आपापल्या ट्रंका आणि बॅगा ठेवून त्यात आपापले सामान ठेवायला सुरुवात केली. पण तिथे रोख पैसे सोडल्यास आणखी काही सहसा चोरीला जात नाही हे लवकरच सर्वांच्या लक्षात आले. रोज चार पाच तास लेक्चर्स ऐकण्यात आणि तीनचार तास प्रॅक्टिकल्स करण्यातच दिवसातला सगळा वेळ आणि शक्ती खर्ची पडत होती. नवीन ओळखी करून घेणे, नवे मित्र जोडणे, नवे वातावरण समजून घेऊन त्याच्याशी जमवून घेणे वगैरेंमध्ये उरलेल्या वेळात प्रयत्न करत होतो. सकाळी उठल्यानंतर समायिक स्वच्छतागृहांमध्ये नंबर लावून सकाळची कामे उरकून घेऊन आणि मेसमध्ये जाऊन पोटभर नाश्ता करून वेळेवर कॉलेजला पोचण्यात रोज खूप धावपळ करावी लागत होती. यामुळे त्यानंतर सगळ्या मुलांमधले नैसर्गिक गुण बाहेर येत गेले. मग अंगावरून काढलेले कपडे कॉटवर टाकले जायचे, लॅबकोट किंवा बॉयलरसूट असे काही चढवलेले असले तर ते कॉलेजमधून परत आल्यानंतर आधी काढून तिथेच भिरकावले जायचे, रात्री झोपायच्या आधी कपडे बदलले तर काढलेले कपडे त्यावरच पडायचे. वह्यापुस्तकेसुध्दा काही टेबलावर तर काही पलंगावर मस्तपैकी पसरलेली असायची. ही अवस्था सगळ्याच खोल्यांची होती. एकादा मुलगा कुठून तरी एकादे पिवळे पुस्तक घेऊन आला तर ते मात्र गादीखाली, उशीच्या अभ्र्यात वगैरे लपवून ठेवले जायचे आणि त्याची कुणकुण इतर कोणाला लागताच ते तिथून अदृष्य व्हायचे.

एका अतीश्रीमंत मुलाचे त्या काळातले फॉरेनरिटर्न्ड आईवडील त्याला भेटण्यासाठी दर रविवारी मुंबईहून मोटारगाडीने येत असत. त्यांनी त्या मुलाच्या खोलीतल्या एका कोपऱ्यात कॅनव्हासचा भला मोठा झोळा अडकवून ठेवला होता. अंगावरून काढलेला कोणताही कपडा, तसेच वापरलेला टॉवेल, नॅपकिन, रुमाल वगैरे सगळे तो लगेच त्या झोळ्यात टाकायचा. आईवडिलांनी त्यांच्याबरोबर आणलेला नोकर त्या मुलाच्या पलंगावरच्या चादरी, पलंगपोस, टेबलक्लॉथ आणि त्या झोळ्यात जमा झालेले सगळे कपडे काढून त्याचा गठ्ठा बांधून बाजूला ठेवायचा. व्यवस्थित धुवून इस्त्री केलेल्या कपड्यांचा त्याने सोबत आणलेला नवा गठ्ठा उघडून त्यातली चादर गादीवर व्यवस्थितपणे अंथरायचा, उशांचे अभ्रे बदलायचा, टेबलक्लॉथ बदलून त्यावरची सगळी वह्यापुस्तके लगोरीसारखी म्हणजे सर्वात मोठे पुस्तक तळाशी, त्याहून किंचित लहान आकाराचे त्यावर अशा रीतीने नीट मांडून ठेवायचा, रुमाल, टॉवेल्स, घरातले कपडे, बाहेर जातांना घालायचे कपडे, पांघरायच्या चादरी वगैरे सगळ्यांचा भरपूर नवा स्टॉक त्या मित्राच्या खोलीतल्या ट्रंकेत व्यवस्थित ठेवायचा आणि बांधून ठेवलेला गठ्ठा घेऊन जायचा. पसारा आणि नीटनेटकेपणा या विषयांवरील व्याख्यान ऐकायची इच्छा नसल्यामुळे त्या मुलाचे रूममेट दर रविवारी सकाळी उठून आपापल्या वस्तू जमतील तेवढ्या आवरून ठेवू लागले. पहिल्या एक दोन आठवड्यानंतर त्या मुलाचे वडील त्याला भेटायला हॉस्टेलवर क्वचितच आले असतील, त्याच्या आईचे येणेही हळूहळू कमी होत गेले, पण नोकर किंवा ड्रायव्हर मात्र न चुकता दर रविवारी येत राहिला आणि त्याचे कर्तव्य बजावत राहिला. पुढे त्याच्या वडिलांची दिल्लीला बदली झाली तेंव्हा त्याचे चाळीस पन्नास किंवा जितके काही कपड्यांचे सेट होते ते एका मोठ्या ट्रंकेत घालून हॉस्टेलवर येऊन पडले. ते धुवून घेण्यासाठी त्याने स्थानिक व्यवस्था केली, पण लवकरच तो आणि त्याचे रूममेट माणसांत परत आले.

काही मुलांची घरे हॉस्टेलपासून दीडदोन तासांच्या अंतरावर होती किंवा पुण्यातच त्यांची एकादी ताई माई रहात असे. यामुळे घरातले कोणीतरी कधीही अवचितपणे त्यांच्या खोलीवर येण्याची दाट शक्यता असायची. ती मुलेसुद्धा रविवारची सगळी सकाळ आपापली खोली आवरण्यात घालवायची. एकदोन मुलांना बहुधा आवरोमॅनिया झाला होता. आपली प्रत्येक वस्तू कुठल्याही क्षणी विशिष्ट जागी, विशिष्ट अवस्थेतच असणे हेच सर्वात जास्त महत्वाचे असते असे ते समजत असत. एकाद्या पुस्तकातली माहिती पहायची असली तर ते लोक आधी त्या पुस्तकाच्या वर असलेली सगळी पुस्तके एक एक करून व्यवस्थितपणे बाजूला काढून ठेवत, हवे असलेले पुस्तक बाजूला ठेऊन इतर सगळी पुस्तके पुन्हा व्यवस्थितपणे रचून ठेवत आणि नंतर ते बाजूला ठेवलेले पुस्तक उघडून पहात. त्यातली माहिती वाचून किंवा पाहून झाली की पुन्हा ते पुस्तक त्याच्या ठरलेल्या जागेवर व्यवस्थितपणे ठेवत. अर्थातच इतर सगळ्या पुस्तकांना दोन वेळा व्यवस्थितपणे हाताळणे त्यात आलेच. हॉस्टेलमधल्या दुसऱ्या एकाद्या मुलाने त्या शिस्तप्रिय मुलाच्या टेबलावरच्या पुस्तकांच्या चंवडीमधले एकादे तळातले पुस्तक पाहण्यासाठी खस्सकन ओढून काढले किंवा ते पाहून झाल्यानंतर टेबलावरच कुठेसे ठेवले तर तो त्याचा अक्षम्य अपराध असायचा. सगळ्यात वर दिसत असलेले पुस्तकसुद्धा पाहून झाल्यानंतर त्याच्या मूळ जागेवर ठेवतांना ते उलटे ठेवले गेले, म्हणजे त्याचे मुखपृष्ठ खालच्या बाजूला किंवा शिवण डाव्या बाजूऐवजी उजव्या बाजूला झाली तर त्या मुलांना ती गोष्ट अस्वस्थ करत असे. त्यांच्या अशा वृत्तीमुळे कोणीही त्यांच्या कुठल्याच वस्तूला हात लावत नसत आणि त्यांचा सगळा वेळ आवरासावरीतच जात असल्यामुळे इतर कुणाशी मैत्री करणे, त्या मित्रांबरोबर गप्पा मारणे, खेळणे, भटकणे वगैरे काही आपल्या जीवनात असते हे त्यांच्या गावी नसायचे.

असे काही अपवाद सोडले तर इतर सगळी मुले मात्र रविवारी सकाळी उन्हे चांगली अंगावर येईपर्यंत आपल्या पलंगावरच्या पसाऱ्यात आरामात लोळत पडायची. मनसोक्त लोळून झाल्यानंतर मग आठवडाभरात साठलेली किरकोळ कामे हातात घ्यायची, एकादा मनोरंजनाचा कार्यक्रम किंवा खेळाची मॅच पहायला जायची, उगाचच बाजारात फिरून विंडोशॉपिंग करायची आणि या सगळ्यामधून फालतू वेळ मिळाला तर खोलीची थोडी आवराआवर करायची असा त्या काळातल्या सुटीच्या दिवसाचा दिनक्रम असायचा. त्या काळात पसारा हा शब्द फारसा कानावर पडायचा नाही आणि पडला तरी त्याची मजा वाटायची. त्यामुळे या शब्दाच्या निर्मात्याबद्दल मनात बसलेली आढी तेंव्हा त्रासदायक वाटत नव्हती. किंबहुना मी त्याला विसरून गेलो होतो. बालपणाचा काळ सुखाचा असे म्हणायची पद्धत असली तरी मला मात्र हॉस्टेलमधला काळ सुखाचा असेच तेंव्हा वाटत असे आणि ते फारसे चूक नव्हते.

. . . . . . . . . . . . .. . .

मी लग्न करून संसाराला लागल्यानंतर ‘घर’ या संकल्पनेचे काही फंडे नव्याने समजत गेले. आपले घर म्हणजे आपल्या मर्जीप्रमाणे वाटेल तसे आरामात राहण्याची हक्काची जागा आहे असे मला वाटत असले तरी आपल्याकडे येणाऱ्याजाणाऱ्यांनी आपल्या घराला चांगले म्हणणे अतीशय आवश्यक असते. त्यांनी आपल्या घराचे (म्हणजे गृहिणीचे) कौतुक करावे, निदान त्यांना नांवे तरी ठेऊ नयेत हे सर्वात जास्त महत्वाचे असते. त्यांना नांव ठेवायला जागाच मिळू न देणे हे गृहिणीचे परमोच्च कर्तव्य तसेच ध्येय असते. अर्थातच आपल्या घराचे बारकाईने निरीक्षण करून त्यातल्या उणीवा दाखवणे हा त्या येणाऱ्याजाणाऱ्यांचा मुख्य हेतू असणार. ते लोक आपल्याला भेटायला किंवा आपल्याशी बोलायला येत असतात असे मला उगीचच वाटते. आपले घर कसे असते यापेक्षा ते कसे दिसते याला जास्त महत्व असते. यात पुन्हा चांगलेवाईट ही विशेषणे सापेक्ष असतात. त्यामुळे “आपलं घर तर किती छान दिसतंय्?” असे मी म्हणून काही उपयोग नसतो. तसे इतरांनी म्हणायला हवे, पण दिवसभर मी कामासाठी बाहेरच असल्यामुळे हे येणारे जाणारे, खरे तर येणारजाणाऱ्या, आपल्या घराबद्दल काय बोलत असतात ते मला कसे समजणार? त्यामुळे मी या विषयावर अधिकारवाणीने बोलू शकत नाहीच. घरासंबंधीच्या तत्वज्ञानाचे थोडे बाळकडू मी लहानपणी प्राशन केले होते, पण हॉस्टेल्समध्ये घालवलेल्या सुवर्णयुगात त्याचा अंमल ओसरला होता. माझा जुना शत्रू म्हणजे पसारा शब्दाचा जनक मी संसार थाटल्यानंतर पुन्हा कलीसारखा माझ्या घरात घुसला.

घर चांगले दिसण्यात ‘पसारा’ या शब्दाला अवाच्या सव्वा निगेटिव्ह मार्क असतात. केर, कचरा, घाण वगैरेंना घरात थारा देता कामा नयेच हे कोणीही मान्य करेल, पण जगातल्या सगळ्या सुंदर वस्तू वेचून तुम्ही घरी आणून ते सजवलेत तरी एकाद्या जागी झालेला पसारा त्या सगळ्यावर बोळा फिरवतो. ‘पसारा’ म्हणजे ‘पसरलेल्या वस्तू’ असा व्याकरणातला अर्थ असेल, पण घराच्या सौंदर्याच्या संदर्भात या शब्दाला एक वेगळाच व्यापक अर्थ असतो. कोणतीही टुकार, खराब किंवा वाईटच नव्हे, एकादी सुरेख, उपयुक्त आणि तुमची अत्यंत आवडती वस्तूसुद्धा जर का जमीनीवर, गादीवर, सोफ्यावर, खुर्चीवर, खिडकीत वगैरे पडली असेल तर ती वस्तू ‘वस्तू’ न राहता तिचे रूपांतर ‘पसाऱ्या’त होते. ‘नो पार्किंग झोन’मध्ये एकादी मर्सिडिज गाडी उभी असली तरी तिला खेचून नेणारे महाभाग असतात, त्याचप्रमाणे कुठेही ‘पसारा’ दिसला की त्याला उचलून नजरेआड करणारे हात सारखे शिवशिवत असतात. ‘टोइंग’वाल्यांनी नेलेली गाडी कुठे मिळेल याची थोडी फार कल्पना असते, पण ‘पसारा’ म्हणून गायब झालेल्या वस्तूंबद्दल काही सांगता येणार नाही. मिळाल्या तर एका मिनिटात मिळतील नाहीतर त्या कुठल्या ब्लॅकहोलमध्ये गायब झाल्या हे कधीच समजणार नाही. त्यातून जर का हा ‘पसारा’ घरी आलेल्या पाहुण्याच्या नजरेला पडेल अशी शक्यता निर्माण झाली तर त्याला देहांताची शिक्षा होणे अटळ असते. खरे वाटत नसले तर एक अनुभव सांगतो.

मी जेंव्हा चारपाच वर्षांचा होतो त्या काळात आमच्या घरातल्या एकाद्या कोनाड्याचा एकादा कोपरासुद्धा ‘माझा’ नव्हता, पण या बाबतीत माझा मुलगा नशीबवान होता. तो तीनचार वर्षांचा झाला होता तोपर्यंत त्याला अनेक खेळणी आणि चित्रमय पुस्तके मिळाली होती. ती सगळी ठेवण्यासाठी आम्ही त्याला घरातली एक अख्खी खोलीच दिली होती. त्या खोलीत त्याला वाटेल तसे खेळायला मोकळीक दिली होती. ती खोली त्याला ‘त्याची’ वाटावी म्हणून भिंतींवर आकर्षक रंगीत चित्रे लावली होती. इतके सगळे करूनसुद्धा त्याला मात्र तसे काही वाटत नसे, कारण तो पठ्ठा ‘हे (संपूर्ण) घर माझेचि विश्व’ असे मानायचा आणि अर्थातच घरातल्या सगळ्या वस्तू त्याला हाताळून पहायच्या असत. एकाद्या सम्राटाच्या ऐटीत तो घरभर फिरायचा, लाटणे, झारा, टूथपेस्ट, पेन, घड्याळ असले जे काही हाताला लागेल ते उचलून कुठेही नेऊन तो त्याच्याबरोबर खेळत बसायचा. त्याला उचलून त्याच्या खोलीत नेऊन खेळवणे आणि त्याच्या हातातल्या इतर वस्तू काढून घेणे हे काम मला नाइलाजाने करावे लागत असे. एकादा कायदा तत्वतः मान्य नसला तरी जबाबदार नागरिकाला त्याचे पालन करणे आवश्यक असते त्याचप्रमाणे ‘पसाराविरोधी’ अध्यादेशाची अंमलबजावणी करणे मला भाग होते.

एकदा माझे सासरेबुवा आमच्याकडे आलेले होते. त्यांना त्यांच्या मुलीबरोबर निवांतपणे गुजगोष्टी करायला मिळाव्यात म्हणून मी माझ्या मुलाला त्याच्या खोलीत घेऊन गेलो. पाहुण्यांच्या आगमनापूर्वी सर्व घराबरोबर त्याची खोलीही आवरली गेली होतीच, सगळी खेळणी आणि पुस्तके कपाटात बंद केलेली होती. त्यातले एक चित्रमय पुस्तक काढून मी त्यातली परीकथा सांगायला सुरुवात केली. अनेकदा ऐकून त्याला ती गोष्ट पाठ झालेली होती, मी एक वाक्य बोलताच तो पुढचे वाक्य सांगायचा. अशा प्रकारे ते पुस्तक वाचेपर्यंत तो कंटाळला. त्याला थोड्या प्रॅक्टिकल आणि क्रिएटिव्ह कामात गुंतवण्याच्या दृष्टीने मी पत्त्यांचा जोड काढला आणि आम्ही दोघांनी मिळून बंगला बनवायला सुरुवात केली. दोन पत्त्यांचा त्रिकोण तयार करणे, त्याला धक्का न लावता शेजारी दुसरा त्रिकोण रचणे आणि त्यांना आडव्या पत्त्याने हलकेच जोडणे त्याला जमायला लागले आणि आमचा बंगला मोठा मोठा होत गेला. माझ्या मुलाला त्यात एक प्रकारचा अपूर्व आनंद मिळत होता, त्याच्या वयाच्या मानाने पाहता त्याचे हस्तकौशल्य खरोखरच कौतुक करण्यासारखे होते आणि ते करून मी त्याला प्रोत्साहन देत होतो.

“चहा तयार झालाय् रे” अशी माझ्या आईची हाक कानावर येताच मी उठलो आणि “मी पाच मिनिटात येतोय् हां.” असे मुलाला सांगून बाहेर हॉलमध्ये आलो. आम्ही सर्वांनी चहा प्यायला सुरुवात केली. एवढ्यात माझा मुलगाही बाहेर आला आणि “आजोबा, चला, तुम्हाला एक गंमत दाखवायची आहे.” असे म्हणत त्यांचे बोट धरून ओढायला लागला. एका हातात कप धरून ते त्याच्याबरोबर गेले असते तरी काही बिघडणार नव्हते आणि त्यांची तशी तयारीही होती. पण “अरे आजोबांना जरा चहा तर पिऊ दे. दोन मिनिटांनी ते येतील.” असे म्हणून त्याची समजूत घातली गेली. तो बिचारा निमूटपणे वाट पहात उभा राहिला. यामागचा कावा माझ्याही लक्षात न आल्यामुळे मीही गाफिल राहिलो.

चहाचा शेवटचा घोट घेतल्यावर आम्ही त्याच्याबरोबर त्याच्या खोलीत गेलो आणि तिथले दृष्य पाहून माझ्या काळजाचे पाणी पाणी झाले. माझा मुलगा तर आश्चर्याने आणि दुःखाने सुन्न होऊन गेला कारण तेवढ्यात कोणीतरी तिथे येऊन जमीनीवरचा पसारा हलवायचा म्हणून आम्ही बांधलेला बंगला पार नाहीसा करून टाकला होता आणि पत्त्यांचा जोड उचलून कपाटात ठेऊन दिला होता. कारण काय तर पाहुण्यांनी पहायला ती खोली चांगली दिसायला हवी ना! वर्ल्ड ट्रेड सेंटरचे टॉवर्स कोसळल्यानंतर अमेरिकेच्या जनतेला उद्देशून आषण करतांना जेवढे दुःख अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या चेहऱ्यावर दिसले होते त्याहूनही जास्त आक्रोश माझ्या मुलाच्या डोळ्यांमध्ये मला दिसत होता. पण “कुणाला काय हो त्याचे? कुणाला काय सांगावे?” अशी माझी अवस्था झाली. माझा जुना शत्रू म्हणजे पसारा शब्दाचा जनक माझ्याकडे बघून खदाखदा हसतो आहे असे मला वाटून गेले.

मातेची माया, ममता वगैरेंची थोरवी असंख्य लोकांनी सांगितली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी वगैरे जितक्या भाषा मला येतात त्या सगळ्यांमध्ये मी याबद्दल अनेक वेळा वाचले आहे. स्वाहिली किंवा हिब्रू वगैरे ज्या भाषा मला समजत नाहीत त्यांमध्येसुद्धा तिचे वर्णन असणार याची मला खात्री आहे. “मुलाचा आनंद म्हणजेच आईचा आनंद आणि मुलाचे दुःख म्हणजेच आईचे दुःख, मुलाला कुठे टोचलं तर आईच्या डोळ्यात पाणी येतं आणि मुलाच्या डोळ्यातली चमक पाहून आईचे डोळे चमकायला लागतात.” वगैरे जे काही सगळेजण म्हणतात तसे असणारच, पण मला एक गोष्ट समजत नाही. घरात दंगामस्ती करून सगळे सामान इकडेतिकडे टाकणारी लहान मुले सगळ्या काळांमध्ये मी घरोघरी पाहिली आहेत. त्यात मुलांना होत असलेला आनंदही त्यांच्या चेहेऱ्यावर ओसंडतांना दिसत असतो, पण हा आनंद त्यांच्या माउलींच्या तोंडावर मात्र दिसत नाही. मुलाच्या आनंदामुळे आनंदी होण्याऐवजी त्या रागावतात, वैतागतात, मुलांना दटावून त्यांचा विरस करतात किंवा रट्टे देऊन त्यांना रडवतात. असे का होत असावे? आपल्या घरातला पसारा बघून कोणीतरी आपल्याला काय म्हणेल? ही इनसिक्यूरिटी इतकी तीव्र असते की आपल्या मुलाला काय वाटेल? हा विचार त्यावेळी करावासा वाटत नाही,

साक्षात मातेच्या मनावरसुद्धा सत्ता गाजवणारा हा विचार ज्याच्यामुळे निर्माण झाला तो म्हणजे पसारा या शब्दाचा जनक आपला शत्रूच नाही का? मी तर त्याला एक नंबरचा शत्रू समजतो.

. . . . . . . . . . . . .

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: