अग्नि आणि संस्कार

रिमोटशी चाळा करतांना एका चॅनेलवर आयुर्वेदावर चर्चा होत असलेली दिसली. त्यात एक विदुषी सांगत होती, “आजकाल घरोघरी वॉटर फिल्टर बसवायचे एक फॅड निघाले आहे. हे अॅक्वागार्डचं पाणी फार शुद्ध असतं असं हे (मूर्ख) लोक समजतात. पण आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहता ते पाणी अशुद्धच असते कारण त्यावर अग्निसंस्कार झालेला नसतो. पिण्याचे पाणी तापवून प्यावे असे आयुर्वेदात सांगितले आहे. अग्नीमधली ऊर्जा, पावित्र्य आणि इतर गुणधर्म त्या क्रियेमध्ये पाण्याला मिळतात, ते संस्कार घेऊन ते पाणी पोटात गेल्यानंतर त्याच्यामुळे जठराग्नीला चालना मिळून अन्नाचे चांगले पचन होते. फिल्टरच्या पाण्यात हे अग्नीचे गुण तर नसतातच, शिवाय ते पाणी कोळशाबिळशामधून (अॅक्टिव्हेटेड कार्बन) जात जास्तच दूषित होत असेल. वगैरे वगैरे … या बाई दिसायला तर माझ्या मुलाच्या वयाच्या वाटत होत्या, पण त्यांची भाषा मात्र माझ्या आईच्या काळातली होती, त्यातही खास आयुर्वेदातले काही ‘शास्त्रीय’ शब्द मिळवून त्या बोलत होत्या.

आता आयुर्वेदात सांगितले आहे म्हणजे ते अगदी बरोबर असणारच, पण त्यात नेमके काय सांगितले आहे, फक्त ऊष्णोदक प्यायला सांगितले आहे की ते पाणी चांगले उकळून घ्यायला सांगितले आहे, रोग्यांवर उपचार म्हणून सांगितले आहे की सर्वसामान्य माणसांच्या रोजच्या उपयोगासाठी सांगितले आहे वगैरे गोष्टी कांही त्यांनी स्पष्ट केल्या नाहीत. माझी आई आयुर्वेद शिकलेली नव्हती, तिला सायन्सचा गंधही नव्हता, पण परंपरागत शिकवणींमधून ती बऱ्याचशा शास्त्रीय दृष्ट्या योग्य अशा गोष्टी करत असे. उदाहरणार्थ आजारी माणसाला किंवा लहान बाळांना द्यायचे पिण्याचे पाणी ती नेहमी तापवून देत असे. त्याच्यामागे कोणते शास्त्रीय कारण आहे याचा विचार ती करत नव्हती. तसे करायचे असते एवढेच तिला पक्के माहीत होते आणि त्याप्रमाणे ती करत होती.

मुळात ‘शास्त्र’ किंवा ‘शास्त्रीय’ या शब्दांचेच तिच्या शब्दकोषातले अर्थ फार वेगळे होते. “उपासाला रताळे चालते, पण बटाटा चालत नाही, सकाळी आंघोळ करूनच पाणी भरायला पाहिजे, पारोशाने भरले तर ते अपवित्र होते. स्वयंपाकाला ते चालत नाही, अनशापोटी किंवा उभ्याने पाणी पिऊ नये, जेवतांना फक्त उजव्या हाताच्या बोटांचा उपयोग करावा, अन्नाच्या पातेल्यालासुद्धा जेवणाऱ्याच्या हाताचा स्पर्शही होता कामा नये, तसे केले तर त्यातले अन्न अशुद्ध होते.” असले सगळे नियम “असं शास्त्रात सांगितलंय्” असे म्हणून ती स्वतः पाळत असे आणि ते पाळायला आम्हाला सांगत असे. हे नियम शिकवून अंगवळणी पाडणे हा तिच्या समजुतीप्रमाणे मुलांना चांगले वळण लावण्यातला भाग होता.

“अग्नीमध्ये पावित्र्य असते, शिवाय तो इतर गोष्टींनाही पावन करतो म्हणून त्याला ‘पावक’ असेही म्हणतात.” असे माझी आईसुद्धा सांगत असे. सोने अग्नीमध्ये तापवल्याने त्यात मिसळलेले अन्य हिणकस पदार्थ जळून जातात आणि शुद्ध बावनकशी सोने झळाळून उठते, यापासून ते सीतामाईच्या अग्निपरीक्षेपर्यंत बरीचशी उदाहरणे तिच्याकडे होती. शिवाय रोजचे दुधाचे उदाहरण घेतले तरी ते सकाळी, दुपारी आणि रात्री असे दोन तीन वेळा उकळवून ठेवले नाही तर ते नासते. आमटी भाजी वगैरेंनाही पुन्हा पुन्हा शिजवल्याने त्यांना अग्नी टिकवतो वगैरे वगैरे. पाणी उकळवल्यामुळे त्यातले रोगजंतू मरतात म्हणून त्यामधून संसर्ग होत नाही हे शास्त्रीय कारण शाळेत शिकवले जाते. दूध किंवा आमटी भाजी या गोष्टीसुद्धा त्याच कारणामुळे थोडा जास्त वेळ टिकतात पण नंतर त्या नासतातच. त्या कांही अग्नीमुळे पवित्र होऊन अमर होत नाहीत. पाणी थोडे गरम करून प्याल्यास घशाला शेक मिळतो आणि तो दुखत असल्यास त्यापासून आराम मिळतो, कदाचित पोटातल्या पचनक्रियेलाही त्याचा फायदा होत असेल. पण ते दहा बारा मिनिटे उकळवल्याशिवाय त्यातले सगळे रोगजंतु मरत नाहीत. पाण्याला रूम टेंपरेचरपासून बॉइलिंग पॉइंटपर्यंत तापवतांना दिलेल्या ऊष्णतेमधला कांही भाग वाफेबरोबर हवेत चालला जातो आणि उरलेल्यातला बराचसा भाग ते पाणी पुन्हा थंड होत असतांना वातावरणात निघून जात असतो. ते पूर्णपणे गार झाले तर दिलेल्या ऊर्जेतले कांहीही पाण्यात शिल्लक रहात नाही. अग्नीच्या ‘संस्कारा’मधून पाण्याला यापेक्षा जास्त काही मिळत नाही, त्या कसलाच बदल होत नाही.

अॅक्वागार्डसारख्या फिल्टर्समध्ये अत्यंत सूक्ष्म छिद्गांचे गाळणे असते. पाण्यात न विरघळलेला सगळा गाळ त्यामध्ये असलेल्या काही सूक्ष्म जीवजंतूंसकट त्या फिल्टरमध्ये अडकून राहतो आणि स्वच्छ पाणी बाहेर निघते. त्यानंतर अल्ट्राव्हायोलेट किरणांनी त्यातल्या रोगजंतूंना मारून त्या पाण्याला निर्जंतुक करण्यात येते. आजकाल रिव्हर्स ऑस्मॉसिस प्रोसेसमध्ये पाण्यात विघळलेले कांही क्षारसुद्धा बाहेर काढले जातात.

उकळल्यामुळे केलेले पाण्याचे निर्जंतुकीकरण जास्त परिणामकारक होते, पण पाण्यामध्ये मिसळलेला गाळ तसाच राहतो, तो काढण्यासाठी पाण्याला आधी चांगल्या प्रकारे गाळून नंतर उकळावे लागते. उकळण्यासाठी जास्त खटाटोप करावा लागतो आणि बरेच इंधन जाळावे लागते. याचा विचार करता सर्वसामान्य लोकांच्या रोजच्या उपयोगासाठी ते सोयीस्कर वाटत नाही, त्या मानाने वॉटर फिल्टर खूप सोयिस्कर असतो आणि पूर्णपणे नसले तरी बऱ्याच चांगल्या प्रमाणात रोगजंतूंपासून संरक्षण देतो. मुख्य म्हणजे घरातल्या सगळ्या लोकांच्या रोजच्या उपयोगासाठी त्याचा उपयोग केला जातो. ज्यातले सरसकट सगळे लोक फक्त उकळलेले पाणी पीत आहेत असे घर मी तरी पाहिलेले नाही. काही रुग्णांसाठी अत्यावश्यक असेल तेंव्हा मात्र त्यांना उकळलेले पाणीच दिले जाते. “आयुर्वेदाच्या काळात अॅक्वागार्ड नव्हते म्हणून ते सदोष, काही कामाचे नाही” असे त्या तज्ज्ञ विदुषींच्या तोंडून ऐकल्यामुळे तिचे विचार किंवा माहिती किती संकुचित होती हे तेवढे लक्षात आले.

संस्कार या शब्दाचा सोपा अर्थ “चांगला बदल” असा करता येईल. नीतीमत्ता, प्रामाणिकपणा, विनम्रपणा यासारखे चांगले गुण मुलांच्या मनात रुजावेत आणि त्यांनी सुस्वभावी सज्जन बनावे असा चांगला बदल त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या संस्कारांमध्ये अपेक्षित असतो. पोरवयातल्या अल्लडपणाला थोडी मुरड घालून विद्याध्ययनाची सुरुवात करून देण्यासाठी मौंजीबंधन हा संस्कार केला जातो. अजाण बालकात चांगला बदल करून त्याला ज्ञानमार्गावरला विद्यार्थी करायचे असते. मुंजीच्या वेळी त्यासाठी त्या मुलाने काही प्रतिज्ञा करायच्या असतात. तसेच गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी आणि संसार सुखी व्हावा या उद्देशाने काही शिस्त पाळावी यासाठी त्या वर आणि वधूने विवाहसंस्कारात काही वचने द्यायची असतात. या दोन्ही धार्मिक विधींमध्ये होम आवश्यक असतो. यातल्या प्रतिज्ञा आणि वचने अग्नीच्या साक्षीने उच्चारायची असतात. यात अग्नि म्हणजे नुसता जाळ किंवा ऊष्णता नसते, तर तो ईश्वराचे दृष्य आणि परिणामकारक असे रूप असतो. अग्नीसाक्ष केलेली प्रतिज्ञा आणि दिलेले वचन पाळणे बंधनकारक आहे आणि त्याचे पालन न केल्यास देवाची फसवणूक केल्यासारखे आहे, असा धाक त्यातून घातला गेला तर त्याचे पालन अधिक चांगल्या प्रकारे होईल अशी कल्पना होती. यात प्रत्यक्ष अग्नीचा किंवा होमामधून निघणाऱ्या धुराचा आणि धगीचा त्या बटूवर किंवा वधूवरांवर कांही परिणाम किंवा संस्कार होतो असे कांही नाही. तो फक्त नांवापुरता साक्षीला असतो. पुढे या संस्कारांचे कितपत निष्ठेने पालन केले जाते हे आपण पहातोच आणि ते न करणाऱ्याला जाब विचारायला स्वतः अग्निनारायण कधीच पुढे येत नाही.

कडाक्याच्या थंडीत घेतलेली शेकोटीची ऊब सोडली तर माणूस शक्यतो आगीपासून दूर राहून तिची धग टाळतच असतो. पण वस्तू किंवा पदार्थांवर त्याचे होणारे परिणाम पाहून त्यांचा उपयोग करून घेत असतो. बर्फाला आंच दिली तर त्याचे पाण्यात रूपांतर होते आणि पाणी उकळून त्याची वाफ होते. त्या वाफेला बंदिस्त जागेत कोंडले असेल तर ती थंड झाल्यावर तिचे पुन्हा पाणी होते आणि त्याला गोठवले तर बर्फ तयार होतो. अशा प्रकारचे बदल परिवर्तनीय असतात. त्यात पाण्यातल्या अणूंवर कसलाही परिणाम होत नाही. तांदूळ शिजवल्यावर त्याचा भात होतो पण भाताला थंड करून पुन्हा तांदूळ तयार होत नाहीत. हा अपरिवर्तनीय बदल आहे. याला आपण अग्नीचा तांदळावर झालेला संस्कार म्हणू शकू. पोलादासारख्या काही धातूंना गरम करून वेगाने थंड केल्याने त्यांचे गुणधर्म बदलतात. पण अग्नीच्या संस्कारामुळे अग्नीचे गुण भातात किंवा पोलादात उतरले असे म्हणणे हास्यास्पद आहे. कोणतीही तापवलेली वस्तू ऊष्ण असतांना तिला स्पर्श केल्यास चटका बसेलच, या अर्थाने अग्नीचा एक गुण त्या वस्तूमध्ये तात्पुरता येतो. आग विझल्यानंतर ती आग रहातच नाही, पण ती तापवलेली वस्तू थंड झाल्यावर शिल्लक राहते. तापवल्यामुळे तिच्यात झालेला बदल परिवर्तनीय असल्यास ती वस्तू थंड होताच मूळ रूपात परत येते आणि ते बदल अपरिवर्तनीय असतील तर एक नवी वस्तू जन्माला येते.

शास्त्रीय विचार केला तर अग्निमधून ऊष्णता मिळते आणि त्या ऊष्णतेमुळे तापमान वाढते. हीच गोष्ट सूर्याचे किरण, विजेचा प्रवाह वगैरे ऊर्जेच्या दुसऱ्या श्रोतांमुळे होते. त्या वाढलेल्या तापमानामुळे अन्न शिजणे यासारख्या क्रिया होतात, त्या अन्नामध्ये अग्नि, सूर्य किंवा वीज यांचे गुणधर्म येतात म्हणून ते शिजत नाही. पोटातल्या जठराग्नीला तर ते अन्न कशा प्रकारे शिजले असेल याच्याशी कांही देणेघेणे नसते. “वैदिक काळात फक्त अग्नि होता म्हणून स्वयंपाकासाठी त्याचा उपयोग करणेच तेवढे योग्य, ते सुद्धा चुलीत लाकडे जाळून तो अग्नि पेटवला असेल तरच.” असेही ठासून सांगणारे लोक भेटतात. “विजेची शेगडी, मायक्रोवेव्ह ओव्हन वगैरेंमध्ये अग्निसंस्कार होत नसल्याने ते खाणे (फिल्टरच्या पाण्याप्रमाणे) अशुद्ध आणि अपवित्र असते, इतकेच नव्हे तर त्यामुळे आजकाल लोकांचे आरोग्य बिघडत चालले आहेच, तसेच त्यांची नीतीमत्ता खालावत चालली आहे.” असेसुद्धा ठोकून देतात. आणि त्यांच्या विद्वत्तेबद्दल आदराने बोलणारे लोकही भेटतात, पण त्यातलेसुद्धा कोणीही त्यांचे सांगणे आचरणात मात्र आणत नाहीत, कारण अखेर प्रत्येकजण आपली सोयच पहात असतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: