पाणी – साधे, जड आणि मंतरलेले

हैड्रोजन या मूलद्रव्याचे दोन अणू आणि प्राणवायू (ऑक्सीजन)चा एक अणू यांचा संयोग होऊन पाण्याचा एक रेणू तयार होतो. ही रासायनिक क्रिया कित्येक अब्जावधी वर्षांपूर्वी पृथ्वीच्या पाठीवर पहिल्यांदा घडली असे म्हणतात. त्यानंतर ती घडत गेली आणि त्यामधून पाण्याचे महासागर तयार झाले. त्याच्याहीनंतर जीवसृष्टी निर्माण झाली. त्या अनादी कालापासून ते आजपर्यंत पाण्याच्या प्रत्येक रेणूमध्ये हेच दोन अणू असतात आणि टिम्बक्टूला जा नाहीतर होनोलुलूला जाऊन पहा, कुठल्याही ठिकाणचे पाणी अगदी तसेच असते. “पाणी म्हणजे पाणी म्हणजे पाणी असतं, तुमचं आमचं अगदी सेम असतं” असे खरे तर म्हणता यायला हवे, पण “पिण्डे पिण्डे मतिर्भिन्नाः कुण्डे कुण्डे नवं पय:|” असे आपल्या सुभाषितकारांनी लिहून ठेवले आहे. ‘बारा गावचे पाणी प्यायलेला’ माणूस बिलंदर असतो असे उगीच म्हणत नसतील. त्यामुळे जागोजागचे पाणी नक्कीच वेगळे असणार. कुठल्याही परगावी गेल्यावर तिथल्या पाण्याचा पहिला घोट घेतांच त्याच्या चवीतला वेगळेपणा आपल्याला चांगला जाणवतो.

खरे तर सगळ्या ठिकाणचे मूळ पाणी एकसारखेच असले तरी ते वेगळे वाटते याचे कारण त्याचा सर्वसमावेशक गुण हे आहे. शुद्ध पाणी हे ‘कलरलेस, ओडरलेस, टेस्टलेस’ म्हणजे ‘बिनरंगाचे, बिनवासाचे आणि बेचव’ असते. पण पेलाभर पाण्यात चिमूटभर मीठ घातले तर ते खारट लागते, साखर घातली तर गोड आणि लिंबाचा रस घातला तर ते आंबट लागते. कुठल्याही अत्तराचा एक थेंब त्यात टाकला की त्याचा सुगंध त्या सगळ्या पाण्याला येतो आणि कुठल्याही रंगाने माखलेला ब्रश जरी पाण्यात बुडवून हलवला तर ते सगळे पाणी त्या रंगाचे दिसायला लागते. “पानी तेरा रंग कैसा, जिसमे मिलाओ वैसा” अशी एक हिंदी कहावतसुद्धा आहे. पाण्याच्या या गुणामुळे त्यात जे काही मिसळले जाईल त्याचा गुण त्या पाण्याला लागतो. ठिकठिकाणच्या पाण्यात मिसळलेले हे इतर पदार्थ असंख्य प्रकारचे असल्यामुळे तिथल्या पाण्याचे वेगळेपण जाणवते.

नदीच्या, विहिरीतल्या किंवा नळातून येणाऱ्या पाण्यामध्ये इतर जे पदार्थ मिसळलेले असतात त्यांना पाण्याचाच घटक धरून त्यामधून पाण्याचे कांपोजिशन बनते असा विचार करणे शास्त्रीय दृष्ट्या बरोबर नाही, पण बरेच लोक तसे समजतात. फुफ्फुसामधली हवा, पोटातले अन्न, शरीरातले रोगजंतू हे सगळे माणसाच्या शरीराचे भाग असतात असे उद्या कोणी सांगितले तर आपण ते मान्य करू कां? पण पाण्याची गोष्ट वेगळी आहे. त्यात मिसळलेल्या अन्य पदार्थांसकट त्याचा विचार केला जातो. पाणी हा विषयच बहुधा वाद निर्माण करणारा असावा. चाळीतल्या नळापासून तो तमिळनाडू – कर्नाटक, भारत – पाकिस्तान यांच्यापर्यंत सगळीकडे पाण्यावरून भांडणे चाललेली असतात.

पावसाच्या ढगामध्ये तयार झालेला पाण्याचा थेंब अगदी शुद्ध असतो असे जरी मानले तरी तो जमीनीवर पडायच्या आधी हवेमधून खाली उतरत येतो. त्या हवेत नायट्रोजन, ऑक्सीजन आणि कार्बन डायॉक्साइड हे वायू तर सगळीकडे असतातच, काही ठिकाणी सल्फर डायॉक्साइड, नायट्रिक किंवा नायट्रस ऑक्साईड, अमोनिया, मीथेन वगैरे इतर काही वायूसुद्धा असण्याची शक्यता असते. हवेतून धावत खाली पडणाऱ्या पावसाच्या थेंबांमध्ये या वायूंचे काही अणू विरघळतात किंवा त्याच्याशी संयोग पावतात. जमीनीवर पडलेल्या पाण्याचा काही भाग मातीत, वाळूत किंवा खडकांमध्ये असलेल्या भेगांमध्ये जिरून जातो आणि उरलेले पाणी जमीनीवरील खळग्यांमध्ये साठते किंवा उतारावरून वहायला लागते. ते एकाद्या सखल भागात जाऊन साठले तर त्याचे तळे होते आणि पुढे पुढे वहात गेले तर त्याचे अनेक प्रवाह एकमेकांमध्ये मिसळून ओढा, नाला, नदी वगैरे होतात.

अनादि कालात पृथ्वीचा ऊष्ण गोळा थंड होत गेला, त्यातून पृथ्वीच्या पृष्ठभागावरचे कठीण कवच तयार होत गेले. तिच्या पोटातला थोडा थोडा तप्त रस त्यानंतरसुद्धा ज्वालामुखींमधून बाहेर पडत राहिला आणि त्यामधून त्यात आणखी भर पडत गेली. ऊन, पाऊस, वादळ वारे वगैरेंच्यामुळे पृथ्वीवरील पर्वत, डोंगर आणि जमीनीची झीज होत राहिली. हे सगळे होत असतांना त्यामधून दगड, माती, वाळू वगैरे तयार होत गेले. हे इनऑर्गॅनिक पदार्थ धातू किंवा अधातूंपासून तयार झालेले असतात. वनस्पतींची पाने, फुले, फळे, फांद्या वगैरे भाग जमीनीवर पडत असतात, झाडांची मुळे तर जमीनीच्या आतच असतात, पशुपक्षी कीटक वगैरेंनी उत्सर्जन केलेली द्रव्ये आणि त्यांचे मृतदेह जमीनीवर पडतात, हे सगळे प्राणीजन्य किंवा वनस्पतीजन्य पदार्थ कुजतात तेंव्हा त्यांचे विघटन होऊन त्यातले काही भाग वायूरूपाने वातावरणात जातात आणि उरलेले अवशेष जमीनीवर शिल्लक राहतात. हे सगळे सेंद्रिय पदार्थ (ऑर्गॅनिक मॅटर) अखेर मातीमध्ये मिसळत असतात. पावसाचे पाणी जमीनीवरून वहात जातांना मातीतले काही पदार्थ त्या पाण्यात सहजपणे मिसळतात. पाणवनस्पती आणि जलचर प्राण्यांच्या बाबतीतही असेच घडत असते. त्यामधून बाहेर पडलेली सेंद्रिय द्रव्ये तर पाण्यातच असतात. नदी वहात वहात पुढे जातांना तिच्या पाण्यातला काही गाळ ती काठांवर टाकतही जात असते आणि काठावरल्या काही पदार्थांना पुढे घेऊन जात असते. दूर पल्ल्याच्या रेल्वेगाडीमध्ये दर स्टेशनवर काही प्रवासी खाली उतरतात आणि काही प्रवासी गाडीत चढतात, त्याचप्रमाणे नदीच्या प्रवाहात मिसळत गेलेल्या इतर पदार्थांमध्येही बदल होत असतात.

जमीनीमधून आणि जमीनीखालील दगडधोंड्यांमधून झिरपत जाणारे पाणी खाली जात असतांना पाण्याचे काही कण मातीच्या कणांना चिकटून राहतात. त्यामुळे मातीला ओलावा येतो. पाण्याचे उरलेले कण किंवा थेंब दगडमातीखडक वगैरेंमधून वाट काढून खाली खाली जात असतांना कुठेतरी अभेद्य असा खडक लागतो. ते पाणी त्याच्या पलीकडे जाऊ शकत नसल्यामुळे वरच्या बाजूला साठत जाते. जमीनीखाली साठत गेलेल्या पाण्याचे ओघळ एकमेकांमध्ये मिसळतात. त्यांना जिथे जी भेग किंवा पोकळी सापडेल तिला भरत जातात. अशा प्रकारे जमीनीखालच्या पाण्याचा एक साठा तयार होतो. पावसाळ्यात जमीनीवरून खाली उतरत आलेले पाणी त्यात भरत जाते. नद्यानाले, तलाव, कालवे वगैरेंच्या तळाशी असलेल्या जमीनीमधूनसुद्धा थोडे पाणी झिरपत खाली जात असतेच. यामुळे त्या भूगर्भातल्या जलाच्या साठ्याची पातळी वाढत जाते. या पातळीला वॉटर टेबल असे म्हणतात. अर्थातच पावसाळ्यात ही पातळी वर येते. वॉटरटेबलच्या बरेच खालपर्यंत विहीर खणली तर जमीनीखालच्या साठ्यामधले पाणी झऱ्यांमधून विहिरींमध्ये येऊन पडते. झाडांची मुळे जमीनीमधले पाणी शोषून घेत असतात. विहिरींमधील पाण्याचा उपसा होत असतो यामुळे वॉटरटेबलची पातळी इतर ऋतूंमध्ये खाली जात असते. उन्हाळ्यामध्ये ती पातळी विहिरीच्या तळापेक्षाही खाली गेली तर ती विहीर आटून कोरडी होऊन पडते. जमीनीमधून खाली झिरपत जाणारे पाणी जमीनीतले काही क्षारही शोषून घेत असते, तर त्या पाण्यात मिसळलेले मातीचे काही कण वाटेवरच अडकून राहतात आणि त्यामुळे खोलवरच्या झऱ्यांमधले पाणी स्वच्छ दिसते. अशा प्रकारे पाण्याच्या या साठ्यामध्येसुद्धा पाण्याव्यतिरिक्त इतर गोष्टींची ये जा चालत असते.

नदीच्या पाण्यामध्ये मिसळलेले ओघळ आणि नदीचा प्रवाह ज्या भागामधून येतात तिथल्या दगडमातीतल्या आणि खडकांमधल्या क्षारांचा (मिनरल्स) काही अंश त्या पाण्यात येतो. विहीरीमध्ये येणारे पाणी कित्येक दिवस किंवा महिने जमीनीखाली राहिलेले असल्यामुळे त्या पाण्यात या क्षारांचा अंश अधिक प्रमाणात उतरतो. सेंद्रिय पदार्थांच्या बाबतीत कदाचित याच्या उलट घडत असते. विहिरीच्या पाण्यापेक्षा नदीच्या पाण्यात त्यांचे प्रमाण जास्त दिसते. पण एकाद्या विहिरीला उपसा नसला आणि आजूबाजूचा पालापाचोळा किंवा इतर घाण तिच्या पाण्यात पडून कुजत राहिले तर मात्र त्या पाण्यात त्याचे प्रमाण भयंकर वाढते.

. . . . . . . . . . . . . . . . . . . .

पाण्यात विरघळलेल्या किंवा मिसळलेल्या क्षारांमधले (मिनरल्समधले) काही क्षार आपल्या शरीराला आवश्यक असतात, काही उपयुक्त तर काही अपायकारकही असतात. उरलेले सगळे निरुपयोगी आणि निरुपद्रवी असतात. पण खरे पाहता त्या सगळ्यांची पाण्यामधली मात्रा इतकी कमी असते की त्यांच्यामुळे प्रत्यक्षात सहसा फारसा फरक पडत नाही. पिण्याच्या पाण्यामधून सोडियम, पोटॅशियम किंवा आयोडिन मिळत असेल म्हणून त्या हिशोबाने कोणी भाजीपाला, फळे, दुधाचे पदार्थ वगैरे खाणे कमी करू शकत नाही आणि पेशंटला कॅल्शियम किंवा आयर्नच्या गोळ्या खायला सांगायच्या आधी कोणताही डॉक्टर त्याच्या पिण्याच्या पाण्याचे पृथक्करण करून त्यातला लोहाचा किंवा कॅल्शियमचाा अंश तपासून पहात नाही. शरीराला आवश्यक असलेल्या क्षारांचा मुख्य पुरवठा माणसांचा आहार आणि औषधोपचारामधून त्याला होत असतो. शिसे, पारा किंवा आर्सेनिक यासारख्या घातक मूलद्रव्यांच्या खाणी ज्या प्रदेशात असतील तो भाग सोडला तर इतर ठिकाणच्या पाण्यात त्यांचे क्षार मिसळण्याचे नैसर्गिक कारण नाही. समुद्राच्या पाण्यात बरेच क्षार (मुख्यतः मीठ) मिसळलेले असतात, त्याचप्रमाणे काही ठिकाणच्या विहीरींमधल्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असले तर त्यांची खारट किंवा कडू चंव त्या पाण्याला येते, त्यामुळे ते पाणी जनावरेसुद्धा पीत नाहीत, माणसे तर नाहीच नाही. क्षारांच्या बाबतीत एक चांगली गोष्ट म्हणजे त्यांच्यामधून रोगजंतूंचा प्रसार होत नाही. कुठलेही कीटक आणि रोगजंतू मिठाच्या सहाय्याला राहू शकत नाहीत म्हणून लोणची टिकवण्यासाठी त्यात भरपूर मीठ घालतात आणि ती वर्षभर टिकतात.

वनस्पती आणि प्राणीजन्य (सेंद्रिय) कचरा झाडांच्या किंवा पिकांच्या वाढीसाठी अत्यंत उपयोगी असे टॉनिकचे काम करतो, पण माणसांसाठी मात्र तो फक्त धोकादायक असतो कारण त्यांच्या सहाय्याने रोगजंतूंची वाढ झपाट्याने होते. पाण्यात मिसळलेल्या या प्रकारच्या घाणीमुळे पचनसंस्थेच्या व्याधी तसेच पाण्याद्वारे पसरणारे संसर्गजन्य रोग होतात. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात ठिकठिकाणच्या नाल्यांमधून येणारे पाणी नदीत मिसळत असल्यामुळे संसर्गजन्य रोगांच्या साथी जास्त पसरतात. अलीकडच्या काळात गांवोगावच्या गटारांमधले पाणी फार मोठ्या प्रमाणात नद्यांमध्ये सोडले जात असल्यामुळे सगळ्या ‘गंगा’ आता ‘मैल्या’ झाल्या आहेत. शिवाय कारखान्यांमधले सांडपाणी आणि पिकांवर फवारलेली जंतूनाशके त्यात वाहून येत असल्यामुळे नद्यांचे पाणी विषारी व्हायला लागले आहे. या दोन्ही प्रकारच्या प्रदूषणामुळे आता बहुतेक नद्यांचे पाणी थेट पिण्यायोग्य उरलेले नाही.

वाहत्या पाण्यातला न विरघळलेला कचरासुद्धा त्याच्या प्रवाहाबरोबर वाहून नेला जात असतो. पण पाणी एका जागी स्थिर राहिले तर गुरुत्वाकर्षणामुळे त्यातले पाण्याहून जड असलेले कण तळाशी साठत जातात आणि हलके कण वर येऊन तरंगतात. या दोन्हींच्या मधले पाणी बरेचसे स्वच्छ दिसते. शहरांच्या पाणीपुरवठाकेंद्रांमध्ये या गुणधर्माचा उपयोग करून बराचसा कचरा आणि गाळ बाहेर काढला जातो. जाळी (स्ट्रेनर) किंवा गाळणी (फिल्टर) यांचेमधून पाणी आरपार जाते पण त्यामधल्या छिद्रांपेक्षा मोठ्या आकाराचे कण त्यात अडकतात. ही छिद्रे जितकी बारीक असतील तितका अधिक कचरा पाण्यामधून वगळला जातो, आणि पाणी स्वच्छ होत असते, पण त्या छिद्रांमधून जातांना पाण्याला विरोध होत असल्यामुळे त्याचा प्रवाह कमी होतो. शिवाय त्या छिद्रांमध्ये अडकलेल्या कणांमुळे ती बुजतात, त्यामुळे पाण्याचा प्रवाह आणखी कमी होत होत पूर्णपणे बंद होऊ शकतो. हे टाळण्यासाठी ही गाळणी वेळोवेळी धुण्याची किंवा बदलण्याची व्यवस्था करावी लागते. घरगुती उपयोगात आपल्याला ते कदाचित जाणवणार नाही, पण कारखान्यांमध्ये विशिष्ट कामांसाठी पाण्याचा ठराविक प्रवाह आवश्यक असतो आणि त्यासाठी पंप चालवले जातात, त्यावर वीज खर्च होते. यामुळे पाण्याच्या साठ्यामधल्या पाण्याची गुणवत्ता (क्वालिटी) आणि प्रक्रियेसाठी (प्रोसेससाठी) आवश्यक असलेली गुणवत्ता या दोन्हींचा विचार करून त्यानुसार अवश्य असतील त्या आकारांचे आणि प्रकारांचे फिल्टर्स बसवले जातात.

समुद्रातले पाणी चार पदरी फडक्यांमधून गाळले किंवा कोणत्याही प्रकारच्या फिल्टरमधून काढले तरी ते खारटच लागते, कारण पाण्यात विरघळलेल्या क्षारांचे कण अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे त्यातून आरपार जातात. त्यांना पाण्यापासून वेगळे काढण्यासाठी वेगळ्या तंत्रांचा उपयोग करावा लागतो. आयॉन एक्सचेंज कॉलम्स नावाच्या संयंत्रांमध्ये ठेवलेल्या रासायनिक पदार्थांमध्ये (कॅटआयन आणि अॅनआयन बेड्समध्ये) पाण्यातल्या क्षारांचे कण शोषले जातात आणि शुद्ध पाणी बाहेर निघते तर मिठागरांमध्ये सगळ्या पाण्याची वाफ होऊन ते उडून जाते आणि फक्त मीठ शिल्लक राहते. रिव्हर्स ऑस्मॉसिस प्लँटमध्ये पाणी आणि त्यातले क्षार या दोन्ही गोष्टी वेगळ्या केल्या जात असल्या तरी ते पूर्णपणे वेगळे होत नाहीत. त्यात सोडलेल्या क्षारयुक्त पाण्याचा एक भाग क्षारमुक्त होतो आणि दुसरा भाग जास्त संपृक्त (कॉन्सेन्ट्रेटेड) होतो. यामुळे या क्रियेचा उपयोग मुख्यतः पाण्याच्या (किंवा इतर द्रव पदार्थांच्या) शुद्धीकरणासाठीच केला जातो. प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या शरीरात ज्या प्रकारे पाणी खेळत असते, तोंडाने प्यालेले पाणी आतड्यांमधून रक्तात जाते, त्यामधून पेशींमध्ये जाते आणि अखेर घामामधून किंवा मूत्रामधून ते बाहेर पडते या क्रिया ऑस्मॉसिसच्या तत्वावर चालत असतात. रिव्हर्स ऑस्मॉसिस प्रोसेसमध्ये त्याच तत्वांचा उपयोग विरुद्ध दिशेने करण्यात येतो. साध्या फिल्ट्रेशनपेक्षा हे वेगळे असते.

मी शाळेत असतांना असे शिकलो होतो की काही ठिकाणचे पाणी ‘जड’ असते, त्या पाण्यात साबणाला फेस येत नाही, डाळी शिजत नाहीत, पिके नीट वाढत नाहीत वगैरे. त्याला इंग्रजीमध्ये ‘हार्ड वॉटर’ असे म्हणतात, आजकाल कदाचित मराठी भाषेत ‘कठीण पाणी’ असा शब्द वापरत असतील, पण आमच्या लहानपणच्या काळात तरी शास्त्रविषयाच्या पुस्तकात त्याला ‘जड पाणी’ असे नाव दिले होते. कदाचित ते पचायला जड असते अशी समजूत असल्यामुळे तसे म्हणत असतील. पण खरे तर मूळ पाणी पचण्याचा किंवा न पचण्याचा प्रश्नच नसतो. आपण खाल्लेल्या अन्नामधले पिष्टमय पदार्थ (कार्बोहायड्रेट्स), स्निग्ध पदार्थ (फॅट्स) आणि प्रथिने (प्रोटीन्स) वगैरे गोष्टींचे पोटात पचन होत असते. त्यातला अन्नरस पाण्यात विरघळून किंवा मिसळून रक्तामार्फत शरीराच्या सर्व भागांमध्ये जातो. हे काम रक्ताभिसरणामधून होत असते. रक्तसुद्धा अनेक प्रकारच्या पेशी पाण्यात मिसळूनच तयार झालेले असते. शरीरामधील सर्व अवयवांना अन्नरस पुरवण्याच्या कामासाठी पाणी हे एका प्रकारचे वाहन असते. जर पाण्यामध्ये आधीपासून काही प्रकारचे क्षार जास्त प्रमाणात असतील तर त्या पाण्याचे गुणधर्म बदलतात. त्याचा अन्नपचनाला अडथळा आल्यामुळे ते अन्न नीट पचत नाही किंवा अंगी लागत नाही. याचा दोष अर्थातच त्या क्षारयुक्त पाण्याला दिला जाणार. अशा जड किंवा कठीण पाण्यातले क्षार काही प्रमाणात पाण्यामधून बाहेर निघून ते ठेवलेल्या भांड्याना चिकटतात आणि त्यांचे कठीण असे थर तयार होतात. त्यामुळे फिल्टर्समधली छिद्रे बुजून जातात, हीटरवर त्यांचे थर साठले तर त्यातली ऊष्णता न पोचल्यामुळे पाणी गरम होत नाही, शरीरातसुद्धा नको त्या इंद्रियांमध्ये किंवा रक्तवाहिन्यांमध्ये ते साठून अडथळा निर्माण करू शकतात.

ज्याला इंग्रजीत ‘हेवी वॉटर’ म्हणतात अशा प्रकारचे ‘जड पाणी’ नांवाचा पदार्थ माझ्या लहानपणी कोणालाच ऐकूनसुद्धा माहीत नव्हता. त्याचा उपयोग फक्त विशिष्ट प्रकारच्या अणुभट्ट्यांमध्ये केला जातो.

अप्सरा ही भारतातली पहिली अणुभट्टी सुरू झाली तेंव्हा मी शाळेत शिकत होतो. या प्रायोगिक अणुभट्टीचे (रिसर्च रिअॅक्टरचे) नामकरण खुद्द स्व.पं.जवाहरलाल नेहरू यांनी त्याच्या उद्घाटनाच्या वेळी केले होते. या घटनेला त्या काळात चांगली प्रसिद्धी मिळाली होती. ही एक आगळ्याच स्वरूपाची भट्टी आहे. यात मध्यम आकाराच्या जलतरणतलावासारख्या (स्विमिंग पूल) एका टाकीमध्ये अत्यंत स्वच्छ आणि शुद्ध पाणी भरून ठेवलेले आहे आणि त्या पाण्याच्या तळाशी ठेवलेल्या समृद्ध युरेनियम (एन्रिच्ड युरेनियम) या इंधनामधून ऊष्णता बाहेर पडते. जळत्या लाकडावर पाणी टाकले की ती आग विझते, पण इथे मात्र इंधनच पाण्यात बुडवून ठेवलेले असावे लागते. इंधनामधून निघालेल्या ऊष्णतेमुळे ते पाणी तापते. इंधनाच्या आजूबाजूचे पाणी ती ऊष्णता आणि त्यासोबत निघालेले प्रारण (रेडिएशन) शोषून घेते आणि त्यामुळे तलावाबाहेरची किंवा त्याच्या काठावरची जागा माणसांना काम करण्यासाठी सुरक्षित राहते. पाण्याच्या तळाशी भट्टी असणे हा प्रकार विसंगत वाटत असला तरी विस्मयकारक नाही. माझ्या लहानपणी घराच्या भिंतींना लावायचा चुना घरीच कालवत असत. चुनाभट्टीमधून भाजून आणलेली चुनखडी डब्यातल्या पाण्यात टाकताच त्यातून स्स्स्स असा आवाज येत असे आणि त्यातून गरम वाफा निघत असत. बीकरमधल्या थंडगार पाण्यामध्ये सोडियम धातूचा लहानसा खडा टाकताच तो उकळत्या तेलात टाकलेल्या भज्यासारखा कसा तडतडतो हे शाळेतल्या प्रयोगशाळेत एकदा दाखवले होते. समुद्राच्या पोटात एक वडवानल नावाचा अग्नि असतो असे वाचले होते. यामुळे अग्नि आणि पाणी यांचे नेहमीच हाडवैर नसते याचा थोडा अंदाज होता.

भारतातली दुसरी प्रायोगिक अणुभट्टी (रिसर्च रिअॅक्टर) कॅनडाच्या सहकार्याने उभारली गेली. त्यात जड पाणी (हेवी वॉटर) हे मंदायक (मॉडरेटर) आणि नैसर्गिक युरेनियम इंधन यांची जोडी (काँबिनेशन) आहे. मी जेंव्हा या रिअॅक्टरची माहिती वर्तमानपत्रांमध्ये वाचली तेंव्हा मला या गोष्टीचे थोडेसे नवल वाटले होते. मला ठाऊक असलेले जड पाणी (हार्ड वॉटर) पचायला जड, त्यात डाळी शिजत नाहीत यामुळे ते स्वयंपाकासाठी बाद, त्यात साबणाचा फेसच होत नसल्यामुळे कपडे धुवून स्वच्छ निघत नाहीत, त्यात आंघोळ केली तर शरीराला खाज सुटायची शक्यता, झाडांना दिले तर त्यांचीही नीट वाढ होत नाही वगैरे त्याच्यासंबंधी फक्त तक्रारीच ऐकल्या आणि वाचल्या होत्या. असे हे सगळ्याच दृष्टीने दुर्गुणी आणि कुचकामाचे वाटणारे पाणी रिअॅक्टरसाठी कशामुळे उपयोगी पडत असेल हे समजत नव्हते. “परमेश्वराने निर्माण केलेली कुठलीही वस्तू पूर्णपणे निरुपयोगी नसते, प्रत्येक वस्तूचा किंवा जीवाचा काही ना काही उपयोग असतोच.” असे तात्पर्य असलेल्या काही बोधकथा वाचल्या होत्या त्यांची आठवण झाली. पण भारतात उभारल्या गेलेल्या त्या रिअॅक्टरसाठी लागणारे जड पाणी त्या काळात कॅनडामधून आयात केले होते ही आणखी एक बुचकळ्यात टाकणारी बाब होती. एवढ्या मोठ्या भारत देशात त्यासाठी दोन चार टँकर जड पाणी मिळाले नसते का? ते कॅनडामधून आणण्याची काय गरज होती? असे त्या वेळी वाटले होते.

पुढे अणुशक्तीखात्यात नोकरीला लागल्यानंतर ‘जड पाणी’ (हेवी वॉटर) या शब्दाचा खरा अर्थ समजला. हे जड पाणी कॅनडातल्या कुठल्याही नदीत, विहिरीत किंवा तळ्यात मिळत नाही. किंबहुना जगात कुठेच जड पाण्याचा वेगळा साठा उपलब्ध नाही. हे खास प्रकारचे पाणी साध्या पाण्यामध्येच अत्यंत सूक्ष्म प्रमाणात अस्तित्वात असते. हैड्रोजन या मूलद्रव्याचे दोन अणू आणि ऑक्सीजनचा एक अणू यांच्या संयोगातून पाणी तयार होते. पृथ्वीच्या पाठीवरील कोणताही समुद्र, नदी, तलाव किंवा विहिरीमधल्या पाण्यात हेच अणू आणि याच प्रमाणात असतात, त्यामुळे इथून तिथून सगळे पाणी एकसारखे असते. आता चंद्रावर किंवा मंगळावर सापडलेल्या पाण्याचे पृथक्करण केले तर त्यातही हेच दिसेल. किंबहुना त्या ठिकाणी हे अणू आढळले म्हणून ”तिथे पाणी सापडले” असे सांगितले जाते. पहायला जाता कोठल्याही मूलद्रव्याचे सगळे अणू एकसारखेच असतात, त्या प्रमाणे हैड्रोजनचेसुद्धा असतात, पण दर ६४२० हैड्रोजन अणूंमधला एक अणू जाड्या असतो, त्याला ‘ड्युटेरियम’ म्हणतात. मूलद्रव्यांच्या अशा भिन्न रूपांना समस्थानिक (आयसोटोप) म्हणतात. हैड्रोजनच्या इतर अणूंमध्ये एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन असतो, त्याच्या या जुळ्या भावंडाकडे प्रोटॉनच्या सोबतीला एक न्यूट्रॉनसुद्धा असतो. यामुळे त्याचे वजन इतर अणूंच्या मानाने दुप्पट असते. अशा ड्युटेरियमचे दोन अणू आणि ऑक्सीजनचा एक अणू यांच्या संयोगातून जड पाणी तयार होते. ते सगळीकडे मिळणाऱ्या साध्या पाण्यातच सूक्ष्म प्रमाणात असते. आपल्या घरातल्या बादलीभर पाण्यातले एक दोन थेंब जड पाण्याचे असतात, पण ते वेगळे नसतात, सगळीकडे पसरलेले असतात. बादलीतले एक थेंबभर पाणी काढून घेतले तर त्यातलासुद्धा सूक्ष्म भाग जड पाण्याचा असतो. अशा प्रकारच्या ‘जड पाण्या’चा हा अर्थ ‘हार्ड वॉटर’पेक्षा खूप वेगळा आहे. हे जड पाणी साध्या पाण्यामधून महत्प्रयासाने बाहेर काढावे लागते, यामुळे ते मोठ्या कारखान्यांमध्येच तयार होते. आता असे काही कारखाने भारतात उभारले आहेत आणि या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण झाला आहे.

जड पाणी आणि साधे (हलके) पाणी यांचे बहुतेक सगळे गुणधर्म अगदी एकसारखे आहेत आणि हे दोन्ही द्रव एकमेकांमध्ये अनिर्बंधपणे विरघळतात, त्यामुळे त्यांना वेगवेगळे करणे फार कठीण असते. सगळेच समस्थानिक (आयसोटोप्स) रासायनिक क्रियांच्या बाबतीत अगदी एकच असतात. या दोन प्रकारच्या पाण्यांच्या कोणत्याही प्रकारच्या रासायनिक क्रियांमध्ये देखील काहीच फरक नसल्यामुळे त्यांचा उपयोग करून त्यांना वेगळे करणे अशक्य असते. जड पाणी हलक्या पाण्याच्या तुलनेत सुमारे साडेदहा टक्के भारी किंवा जड असते, पण ते साध्या पाण्यात संपूर्णपणे विरघळलेले असल्यामुळे गुरुत्वाकर्षणाने तळाशी जाऊन बसत नाही. मात्र त्याचा उत्कलन बिंदू (बॉइलिंग पॉइंट) फक्त एका अंशाने जास्त असतो. या सूक्ष्म फरकाचा उपयोग करून त्यांचे पार्शल डिस्टिलेशन करता येते. त्याच्या प्रत्येक स्टेजमध्ये जड पाण्याचे प्रमाण फक्त किंचित प्रमाणात वाढते. त्याची अनेक वेळा पुनरावृत्ती करून ते वाढवत नेले जाते. ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया (कॉम्प्लेक्स प्रोसेस) आहे आणि ती खर्चिकही आहेच, शिवाय तिच्याबद्दल प्रचंड गुप्तता (कॉन्फिडेन्शियालिटी) बाळगली जाते.

जड पाण्याचा फक्त एकच गुणधर्म साध्या (हलक्या) पाण्यापेक्षा खूप वेगळा आहे. साधे पाणी न्यूट्रॉन्सना जास्त प्रमाणात नष्ट (कॅप्चर) करते, जड पाणी हे काम जवळ जवळ शून्याइतकेच करते. यामुळे रिअॅक्टरमधल्या न्यूक्लियर रिअॅक्शन्सची साखळी टिकवून ठेवण्यासाठी साध्या पाण्यापेक्षा जड पाणी अधिक उपयुक्त ठरते. इतर अनेक प्रयोग करून झाल्यानंतर आज जे रिअॅक्टर्स बांधले जात आहेत त्यात दोन मुख्य प्रकार आहेत. जगातील बहुसंख्य अणुभट्ट्यांमध्ये समृद्ध युरेनियम (एन्रिच्ड युरेनियम) आणि हलके (साधे) पाणी (लाइट वॉटर) वापरतात, तर भारत आणि कॅनडा या देशांमध्ये जड पाणी आणि नैसर्गिक युरेनियम इंधन यांचा उपयोग केला जातो. नैसर्गिक युरेनियम आणि नैसर्गिक पाणी यांच्या उपयोगामधून चेन रिअॅक्शन करता येत नाही. निसर्गात मिळणाऱ्या युरेनियमचा त्याला समृद्ध (एन्रिच) न करता उपयोग करायचा असल्यास त्यासाठी जड पाणी आवश्यक असते.

. . . . . . . . . . . . . . . . . . .

पुराणकालातल्या ऋषीमुनींच्या चित्रांमध्ये त्यांच्या हातात एक कमंडलू दाखवतात. केंव्हाही तहान लागताच लगेच पिण्यासाठी त्यात पाणी भरून घेतलेले असेल असे वाटत नाही, कारण अशा पौराणिक चित्रांमध्ये इतर कोणत्याच पात्राच्या हातात पाण्याने भरलेला एकादा तांब्या किंवा लोटा दाखवलेला दिसत नाही. या मुनीवर्यांच्या कमंडलूमधले पाणी सुद्धा सहसा साधेसुधे नसायचे. मंत्रोच्चाराने भारलेल्या त्या पाण्यामध्ये अद्भुत सामर्थ्य दडलेले असे. त्यातले दोन चार थेंब शिंपडताच माणसाचा दगड, भस्म किंवा साप होऊन गेला किंवा याच्या उलट झाले अशा कथा पुराणांमध्ये आहेत. अल्लाउद्दीनच्या दिव्यामधला राक्षस (जिन्न), परीकथांमधल्या पऱ्या आणि चेटकिणीसुद्धा क्षणार्धात होत्याचे नव्हते किंवा नव्हत्याचे होते करून टाकत असत. मी अगदी लहान असतांना मला या सगळ्याच सुरस गोष्टी खऱ्या वाटायच्या. आपल्यालाही एकादी जादूची अंगठी किंवा छडी मिळाली तर आपण कशी आणि कोणकोणती धमाल आणि गम्माडीगंमत करू हे तेंव्हा स्वप्नात दिसत असे. थोडे मोठे झाल्यानंतर काही गोष्टी कळायला लागल्या, त्यात अरेबियन नाइट्समधल्या सुरस आणि चमत्कृतीपूर्ण कथा आणि फेअरीटेल्स वगैरे सगळे काल्पनिक असते, प्रत्यक्षात असल्या जादूच्या कांड्या वगैरे कुठेही मिळत नाहीत हे समजले, पण ऋषीमुनींचे तपोबल आणि मंत्रांमधली शक्ती याविरुद्ध मात्र कोणीही काही बोलायला धजत नव्हते, त्यामुळे मंतरलेले पाणी कदाचित खरे असू शकेल असे आणखी काही काळ वाटायचे. आपणही ते मंत्र शिकून घ्यावेत आणि आपल्याला निष्कारण त्रास देणाच्या मुलांच्या किंवा मास्तरांच्या अंगावर मंतरलेल्या पाण्याचे थेंब उडवून त्यांना बेडूक किंवा पोपट बनवून टाकावे असे दुष्ट विचार त्या काळात मनात यायचे.

पण त्यात काही शंकासुद्धा येत. पुराणकालातल्या ऋषीमुनींच्या मंतरलेल्या पाण्यात जर इतके सामर्थ्य असायचे तर ते स्वतःचे रक्षण का करू शकत नव्हते? अरण्यातल्या त्यांच्या आश्रमांवर असुर, दैत्य, दानव वगैरे दुष्ट लोक वारंवार हल्ले करून मारामारी आणि नासधूस करत असत, त्यांच्या तपश्चर्येत आणि यज्ञकार्यात बाधा आणत असत, यामुळे त्रस्त होऊन ते सगळे एकाद्या देवाची किंवा देवीची आराधना करत. मग ते देव किंवा देवी अवतार धारण करून त्या राक्षसांचा संहार करत अशा स्वरूपाच्या अनेक पौराणिक कथा आहेत. रामायणातसुद्धा राक्षसांच्या त्रासामुळे त्रस्त झालेले मुनीवर्य विश्वामित्र दशरथ राजाकडे जाऊन आपले गाऱ्हाणे त्याला सांगतात, “ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा। यज्ञरक्षणात तोच श्रेष्ठ सर्वथा।।” असे सांगून धनुर्धारी राम आणि लक्ष्मण यांना सोबत घेऊन जातात. ते दोघे धनुष्यबाणांनेच दैत्यांचा संहार करून ऋषीमुनींना भयमुक्त करतात अशी कथा आहे. भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य या आचार्यांनीसुद्धा महाभारतातल्या युद्धात परंपरागत शस्त्रास्त्रांच्या सहाय्यानेच लढाई केली. त्यातली विशिष्ट अशी संहारक अस्त्रे, अमोघ शक्ती वगैरेंनाही बाणासारखे धनुष्याच्या दोरीला लावूनच सोडले जायचे, पण त्यावेळी तोंडाने एकादा मंत्र पुटपुटला जायचा असे सिनेमा आणि मालिकांमध्ये दाखवतात. कदाचित हे दिग्दर्शकांच्या कल्पनेमधून येत असेल. इतिहासकाळातल्या कुठल्याही युद्धात मंतरलेल्या पाण्याचा शस्त्रासारखा उपयोग केलेला मात्र मी कधी वाचला किंवा ऐकला नाही.

पौराणिक कथा, ऋषी, मुनी वगैरेंचा संबंध हिंदू धर्मशास्त्रांशी जोडलेला असल्यामुळे मनात आलेल्या अशा शंका विचारायची परवानगी आमच्या लहानपणी नसायची. त्यातूनही कोणी धीर करून त्या विचारल्याच तर असे उत्तर मिळायचे की मंत्रशक्तीचा असा उपयोग करतांना कठोर तपश्चर्येमधून कमावून ठेवलेल्या पुण्याचा क्षय होतो आणि तो भरून काढण्यासाठी पुन्हा तशीच तपश्चर्या करावी लागते. ती करावी लागू नये म्हणून मंत्रशक्तीचा तसा उपयोग फक्त अपवादास्पद परिस्थितींमध्येच केला जात असावा. पण एरवी मात्र एकाद्या ऋषीला कुणाचा तरी राग आला म्हणून त्याने मंत्रांचा उपयोग केला अशा प्रकारच्या कथासुद्धा आहेत. मला तरी हे तेंव्हाही समर्थनीय वाटले नाही, पण ते महत्वाचे नाही. मंतरलेले पाणी कसलाही चमत्कार घडवू शकते आणि प्राचीन काळातल्या त्या संबंधातल्या गोष्टी काल्पनिक नसून सत्यकथा आहेत यावर त्या काळातल्या अनेक लोकांचा गाढ विश्वास असायचा. असा विश्वास बाळगणारे आणि त्यावरून वाद घालणारे लोक आजसुद्धा भेटतात. गंमत म्हणजे ते लोक आता साउंड एनर्जी, व्हायब्रेशन्स, फ्रिक्वेन्सी, रेझॉनन्स, सिनर्जी असले इंग्रजी शब्द फेकून त्यांचे सांगणे किती सायंटिफिक (शास्त्रीय) आहे असे सिद्ध करू पाहतात.

बहुतेक सगळ्या धार्मिक विधींच्या सुरुवातीला पूजेची तयारी करतांना कलश आणि दीप यांची यथासांग पूजा केली जाते. नंतर मुख्य दैवताची पूजा चालली असतांना आयत्या वेळी त्या वस्तू न मिळाल्याने गोंधळ होऊन नये म्हणून कदाचित अशी व्यवस्था करून ठेवली असावी. कलश आणि दिव्याची पूजा करण्यासाठी आधीच त्यांना घासून पुसून चकचकीत केलेले असतेच. त्यांना गंधपुष्प वगैरे वाहून नमस्कार करतात. त्यानंतर मंत्रोच्चाराबरोबर दीपप्रज्वलन केले जाते आणि कलशामध्ये पाणी भरले जाते. त्यावेळचे मंत्र म्हंटल्यावर उत्तरेमधील गंगा, यमुना, सिंधू या नद्यांपासून दक्षिणेतल्या कृष्णाकावेरीपर्यंत भारतातल्या सगळ्या पवित्र नद्यांचे पाणी त्या कलशात आले आहे असे समजले जाऊन त्या पाण्याला एक वेगळे स्टेटस प्राप्त होते. त्यानंतर ते पाणी साधे रहात नाही, ते पिण्यासाठी किंवा हात धुण्यासाठी घेतले जात नाही. त्या पवित्र पाण्याने इतर सगळ्या पूजासामुग्रीवर प्रौक्षण करून त्यांनाही पवित्र किंवा शुद्ध करतात तसेच स्वतः आणि तो विधी पहायला बसलेल्या लोकांच्या अंगावर या पवित्र पाण्याचे एक दोन थेंब पडले की सगळ्यांचे शुद्धीकरण होते. पूजाविधी संपल्यानंतरसुद्धा ते मंतरलेले पाणी मोरीत किंवा बेसिनमध्ये ओतले जात नाही. ते एकाद्या झाडाला, शक्य झाल्यास तुळशीला वाहतात.

प्रत्येक पूजाविधी झाल्यानंतर त्याचे थोडे पुण्य इतरांनाही मिळावे यासाठी तीर्थ आणि प्रसाद वाटला जातो. यातला प्रसाद हा चांगला चविष्ट आणि मधुर असा खाद्यपदार्थच असतो. सर्वांच्या आधी तो देवाला अर्पण करण्यासाठी देवाला त्याचा नैवेद्य दाखवतात. प्रत्यक्षातले देव त्यातला कणभरसुद्धा खात नाहीतच, पण त्याला दिलेला नैवेद्य त्यानेच प्रसाद म्हणून आपल्याला बहाल केला आहे अशी सोयिस्कर समजूत करून घेऊन त्या प्रसादाचे भक्षण केले जाते. पूजाविधीतला हा भाग सर्वांना मनापासून आवडतो. पूजेच्या सुरुवातीला देवाच्या मूर्तीला ताम्हनात ठेवून त्याला पाण्याने न्हाऊ घालतात, दूध, दही, तूप, मध आणि शर्करा यांचे पंचामृत त्या मूर्तीवर वाहून, सुगंधित पाणी ऊष्ण पाणी वगैरेंनी तिला स्नान घालतात, त्या मूर्तीवर पाण्याचा अभिषेक करतात, तिला ताम्हनात ठेवलेले असतांनाच तुळशी, बेलाची पाने, दुर्वा, फुले वगैरेही वाहतात. या सगळ्यांनी युक्त असलेले ताम्हनामधले पाणी पूजा संपल्यानंतर तीर्थ बनते. ते प्राशन करतांना खालील श्लोक म्हंटला जातो.
अकालमृत्यूहरणम् सर्वव्याधीविनाशकम् । … पादोदकम् तीर्थम् जठरे धारयाम्यहम्।।
ज्या देवतेची पूजा केली असेल तिचे नाव … या जागी घेतात. शरीरातल्या सर्व व्याधींचा नाश व्हावा आणि अकालमृत्यू टळावा यासाठी त्या देवतेचा पदस्पर्श झालेले हे पाणी मी पोटात घालत आहे असा या श्लोकाचा अर्थ होतो. हा अर्थ समजला असो किंवा नसो, तो पटला असो किंवा नसो, बहुतेक सगळे हिंदू लोक पळीभर तीर्थ पिऊन घेतात. त्यामुळे पुण्य लागेल अशी एक अंधुक कल्पना कदाचित त्यामागे असते. अकालमृत्यू आला होता हेच माहीत नसते, तीर्थप्राशनामुळे तो टळला तरी ते कसे समजणार आणि नसला तर तसे का झाले याचे स्पष्टीकरण द्यायला इतर अनेक कारणे असतातच. अमक्या तमक्या देवाच्या पूजेचे तीर्थ प्यायल्यामुळे असाध्य रोग झालेला एकादा रोगी खडखडीत बरा झाला असे प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला दिसत नाही पण तसे सांगणारे भाविक भेटतात. जे विकार आपल्या आपणच किंवा इतर औषधोपचाराने ठीक होण्यासारखे असतात त्यांच्या बाबतीतसुद्धा रुग्णाच्या मनोधैर्याचा अनेक वेळा चांगला उपयोग होतो असे मानसशास्त्रज्ञ सांगतात. किंबहुना त्यासाठी आंतरिक शक्तीची आवश्यकता असते. निराशाग्रस्त झालेला एकादा रोगी “हे तीर्थ घेतलेस ना? आता कसली काळजी करू नकोस.” एवढ्या बोलण्यानेच बरा होण्याला सुरुवात होते. कशाने का होईना, पण त्याला बरे वाटणे महत्वाचे असते ना!

भारतातल्या एका कौटुंबिक कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांमध्ये एक परदेशातले ख्रिश्चन कुटुंब होते. सुरुवातीला धार्मिक पूजा हा त्या कार्यक्रमाचाच भाग होता. पूजा आरती वगैरे संपल्यावर सर्वांना तीर्थप्रसाद वाटला गेला. त्या परदेशी मंडळींनी प्रसाद तर आवडीने घेऊन खाल्ला, पण तीर्थाकडे पाहून “हे काय आहे?” असे विचारले. ते काय आहे हे सांगितल्यानंतर ते ‘पवित्र पाणी’ पिण्यायोग्य आहे हे सुद्धा त्यांना पटवून देणे अवघड होते.

स्वातंत्र्यपूर्व काळात जातीयतेचे महाभयंकर प्रस्थ असायचे. त्यात खाण्यापिण्यावर खूप कडक बंधने असायची. धान्ये, कडधान्ये, भाज्या, फळे वगैरे नैसर्गिक पदार्थ कोणाच्या शेतातून आले आहेत याचा विचार कोणी करत नसत, पण त्यांना पाण्यात शिजवून केलेला भात आणि आमटी, भाजी किंवा पाण्यात पीठ भिजवून केलेल्या भाकऱ्या आणि पोळ्या मात्र कोणत्या जातीच्या माणसांच्या घरात केल्या आहेत हे पाहूनच त्या खाण्याबद्दल ठरवले जात असे. गावातल्या कोणत्या पाणवठ्यावर कुणी पाणी भरायचे यावर कडक बंधने असत. परधर्माच्या, परजातीच्या लोकांनी, विशेषतः तथाकथित अस्पृश्यांनी भरलेले पाणी इतर लोक पीत नसत. गोव्यामध्ये तर गावातल्या विहिरीत ख्रिश्चनांनी पाव टाकल्यामुळे ते सगळे पाणी अपवित्र झाले आणि ते पाणी पिऊन सगळे गाव बाटले अशा घटना घडल्या होत्या म्हणतात. निसर्गाने सर्वांसाठी दिलेल्या पाण्यावर माणसांनी स्वामित्व गाजवून त्याच्या वापरावरून कलह माजवला जात होता. आज शहरांमधली या बाबतीतली परिस्थिती बदलली असली तरी देशाच्या काही मागास भागात अजूनही जुन्या चालीरीतींचे अवशेष शिल्लक राहिले आहेत.

मी शाळेत शिकत असतांनाची एक आठवण आहे. आम्ही ज्या मोठ्या गावात रहात होतो तिथून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या खेड्यात माझ्या आजोबांनी तयार केलेली शेती आणि बांधलेले घर होते. ते एका स्थानिक कुटुंबाला भाड्याने दिले होते. वीस किलोमीटरच्या त्या अंतरामध्ये एक नदी नावेतून पार करावी लागत असे आणि वाहतुकीची चांगली साधने नव्हती, त्यामुळे तिकडे जाऊन परत यायला निदान दोन दिवस लागत. एकदा कांही काम होते म्हणून मी त्या गांवाला गेलो होतो. खेडेगावामध्ये हॉटेल नव्हतेच म्हणून दोन दिवस टिकतील आणि पुरतील असे खाद्यपदार्थ माझ्या आईने बांधून दिले होते. तिथे गेल्यानंतर मी आपला डबा उघडून खाऊ लागलो तेंव्हा आमच्या भाडेकरूने मला समानतेवर मोठे लेक्चर दिले आणि त्याच्या बायकोने केलेले गरम जेवण खायला बोलावले. माझ्या मनात भेदभाव नव्हताच, मी आनंदाने त्यांच्या पंगतीला जाऊन बसलो. थोड्या वेळाने आमच्या शेतावर काम करणारा शेतकरी मला भेटायला आला. आमच्या भाडेकरूने आल्या आल्या त्याची जात विचारली आणि त्याला दरवाजाबाहेरच बसायला सांगितले. त्याला खापराच्या मडक्यात पाणी प्यायला दिले, त्याला आपल्या घरातल्या एका पाणी प्यायच्या साध्या भांड्यालासुद्धा स्पर्श करू दिला नाही. थोड्याच वेळापूर्वी मला दिलेले सामाजिक भाषण तो सोयिस्करपणे विसरून गेला होता किंवा कदाचित त्याचे इतर जातभाई काय म्हणतील याची त्याला काळजी वाटत असावी.

थोडक्यात सांगायचे झाल्यास पाणी म्हणजे पाणी म्हणजे नुसतंच पाणी नसतं, ते नेहमीच तुमचं आणि आमचं अगदी सेमही नसतं. त्यात खारट, गोड, कठीण, जड, हलके, शुद्ध, अशुद्ध वगैरे प्रकार असतातच, पवित्र, अपवित्र वगैरेही असतात. त्यातले काही शास्त्रीय आधारांवर असतात, काही परंपरा मानण्या, न मानण्यावर असतात.
. . . . . . . . . . . . . . . (समाप्त)

One Response

  1. खुप सुंदर वाचनीय असा लेख आहे…..धन्यवाद…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: