आमच्या छकुल्या (भाग १ ते ४)

दहा वर्षांपूर्वी मी हा लेख चार भागांमध्ये  लिहिला होता. त्याच्या आधीच्या पांच वर्षाच्या काळातल्या सुखदायी घटनांबद्दल त्यात लिहिले होते. जुने लेख वाचत असतांना सापडला आणि आता त्याला एकत्र करून या स्थळावर तो देत आहे.

आमच्या छकुल्या (भाग १)

छकुल्या १

आमच्या घरी जेंव्हा या आमच्या छकुल्या नाती जन्माला आल्या तेंव्हा काय झालं माहीत आहे?
माझ्या अंगणांत दोघी मुग्ध कलिका या आल्या । घरदार परिसर आनंदाने ओसंडला ।।
सगळं घर आता त्यांच्याभोवती फिरायलाच नव्हे तर नाचायला बागडायला लागलं. आमच्यापुढे पहिला प्रश्न होता तो म्हणजे त्यांची नांवे काय बरं ठेवायची?
दोन अर्थपूर्ण नांवे शोधाया लागल्या बुद्धी । कुणी सांगे अंजू मंजू, सोना मोना, रिद्धी सिद्धी ।।
मनाजोगती मिळाली जोडी शोधता धुंडता । एक इरा सरस्वती दुजी ईशा दुर्गामाता ।।

त्यांच्या बाळलीला दिवसेगणिक वाढत गेल्या. आम्ही कौतुकाने त्या पहात होतो. आज काय नजरेला नजर देऊन पाहिलं, आज पहिला हुंकार दिला, आज कोण कुशीवर वळली, आज कोण पालथी झाली, आज पुढे सरकली, आज मुठीत बोट पकडलं, आज हांक मारतांच हंसून साद दिली असं कांही ना कांही नवं नवल दोघींच्या बाबतीत रोजच घडत होतं. बघता बघता दोघी रांगायला लागल्या, आता जमीनीवर कोठली वस्तू ठेवायची सोय नव्हती. त्या उचलून थोड्या वर ठेवीपर्यंत दोघीही आधार धरून उभ्या रहायला लागल्या.
दोघी झाल्या भारी द्वाड करतात ओढाओढ । आरडाओरड मस्ती, झोंबाझोंबी चढाओढ ।।
दांडगाईला कळेना कसा घालावा आवर । उचलून ठेवायाच्या सा-या वस्तू उंचावर ।।

असंच पहाता पहाता वर्ष उलटून गेलं. दोघी एकमेकीच्या मागे पळायला लागल्या. त्यांच्या निरर्थक गोंगाटातून अर्थपूर्ण शब्द उमटू लागले. शब्देविण संवादू कडून सुसंवादाकडे पावले पडायला लागली. त्या दोघीही आवडीने गाणी ऐकायला लागल्या आणि आपल्या बोबड्या उच्चारातून ती म्हणायला लागल्या, त्याच्या तालावर हातवारे करीत पाय नाचवू लागल्या. पण थोड्याच दिवसांनी माझ्या मुलाची, इंग्लंडमध्ये बदली झाली आणि आमच्या छकुल्या परदेशी चालल्या गेल्या. त्यांना जेमतेम कामापुरते मराठी शब्द समजू लागले होते. तरीही त्या देशात गेल्यावर तिकडची भाषा सहज शिकून गेल्या. आता वेबकॅम व ईमेलमधून फोटो दिसत, फोनवर व चॅटिंगमधून बोलणे होई. त्यावरून समजलं की,
आंग्ल भाषेतून घेती पारंपरिक संस्कार । कृष्ण खातसे बटर, देवी लायनवर स्वार ।।
पाखरे उडून गेली परी किती दूर दूर । बोल बोबडे ऐकाया मन सदैव आतुर ।।
ईमेलमधून येती छायाचित्रे मनोहर । त्यांचे संग्रह करून पहातसे वारंवार ।।

असंच आणखी एक वर्ष होत आलं. तेंव्हा मात्र अगदी राहवेना. कामाच्या व्यापातून मुक्तता मिळाली होती. तेंव्हा सरळ तिकीटं काढली आणि इंग्लंड गाठलं.
———————————

आमच्या छकुल्या (भाग २)

आमच्या छकुल्या2

आम्ही उभयता लीड्सला जाऊन पोचलो पण आमचे सामान कांही तिथपर्यंत आले नाही. त्यामुळे आता काय करायचे याची चौकशी करून ऑफीसात जाऊन रीतसर तक्रार नोंदवण्याचे सोपस्कार पूर्ण करून बाहेर येईपर्यंत बराच वेळ लागला आणि सगळा मूडही गेला होता. पण फरमध्ये नखशिखांत गुंडाळून घेऊन कडाक्याच्या थंडीत आमची वाट बघत उभ्या असलेल्या छकुल्यांना पाहिले आणि सगळा मनस्ताप व थकवा कुठच्याकुठे पळून गेला. घरी पोचेपर्यंत ईशा व इराबरोबर नव्याने छान गट्टीसुद्धा जमून गेली. खास त्यांच्यासाठी हौसेने आणलेल्या वस्तू तर सामानाबरोबर राहिल्या होत्या पण त्याने कांही बिघडले नाही. नंतर यथावकाश आमचे सामानसुमान घरपोच पोचले.

घरी आल्या आल्या दोघीही एक चित्रमय पुस्तक घेऊन जवळ आल्या व त्यातील गोष्ट सांगायचा हट्ट धरून बसल्या. जेमतेम अडीच वर्षाच्या वयात त्यांना अक्षरज्ञान कोठून असणार? चित्रे बघत बघत बाजूला लिहिलेली गोष्ट वाचून सांगायची. त्यांच्याकडे असलेल्या साऱ्या पुस्तकातल्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत होत्या. सिंड्रेलाच्या सावत्र आईऐवजी ‘तिची काकू’ म्हंटले तर लगेच हटकायच्या. तरीसुद्धा त्या गोष्टी पुनःपुनः ऐकायचा भयंकर नाद! एक गोष्ट सांगून झाल्यावर मी इराला म्हंटलं,”आता तू सांग.” तिने लगेच मी सांगितलेल्यातला पन्नास साठ टक्के भाग घडा घडा आपल्या बोबड्या बोलात सांगून टाकला. ईशा आधी पळून गेली. परत आल्यावर तिने ऐटीत ते पुस्तक हातात धरले आणि वाचायला येत असल्याचा आव आणत “वन्स अपॉन ए टाईम” पासून सुरुवात करून मध्ये थोडा वेळ “ग्लंग्लॅंग्लींग्लूं” वगैरे इंग्रजी टोनमध्ये म्हणून “दे लिव्ह्ड हॅपीली देअरआफ्टर” करून टाकलं. कधीकधी त्या आपल्या मनाने गोष्ट रचून सांगायच्या. या बाबतीत इराची कल्पनाशक्ती अफाट आहे. आपल्या सभोवतालचे खरे विश्व तसेच पुस्तकातून आणि टी.व्ही.वर दिसणारे काल्पनिक विश्व यातील पात्रांचे बेमालुम मिश्रण ती करत असे. तिच्या गोष्टीतली सिंड्रेला पार्टीला जाण्याऐवजी जंगलात फिरायला गेली, तिथे तिला मोगली भेटला, त्याने तिला केक दिला. ती दोघे मिळून स्नोव्हाईटकडे जेवायला गेली. वाटेत एक नदी लागली. तिच्या काठावर लिटल मर्मेड बसलेली होती. एक शार्क मासा तिच्या अंगावर धांवून आला, इराने त्याला घाबरवून पळवून लावले, त्याबद्दल आईने तिला चॉकलेटचा डबा दिला. त्यातल्या गोळ्या तिने शाळेतल्या मित्रामैत्रिणींना दिल्या तसेच पोस्टमन पॅट आणि शॉपकीपरलाही दिल्या. अशा प्रकारे ती वाटेल तिकडे मनसोक्त भरकटत जात असे आणि कंटाळा आला की कोठला तरी प्रिन्स घोड्यावरून येऊन सिंड्रेलाला घेऊन जायचा. त्यानंतर दे लिव्ह्ड हॅप्पीली देअरआफ्टर.

इंग्लंडमधील इतर लोकांबरोबर त्यांना येत होती तेवढी इंग्लिश भाषा त्या तिकडल्या उच्चाराप्रमाणे बोलायच्या. आमच्यासाठी मात्र त्यांनी आपली एक वेगळीच भाषा बनवली. सुचेल ते इंग्रजी क्रियापद लावून पुढे ती क्रिया करते म्हणायच्या. “मी ईट करते, ड्रिंक करते, स्लीप करते” वगैरे. ‘र’ चा उच्चार करता येत नसल्याने इरा आपले नांव ‘इवा’ सांगायची तर ईशा तिला ‘इया’ म्हणायची. मराठी शब्दच मुळात कमी माहीत असतांना त्यातला लिंगभेद व वचनभेद कसा कळणार? आम्ही तिला “येतेस कां” म्हंटले तर ती आम्हालासुद्धा “येतेस कां” असंच म्हणणार. त्या वयातली बहुतेक मुले असेच बोलतात. एकदा इरा मला मला “खव्वी मव्वाठी गोष्ट सांग” असे म्हणाली. मी आपली त्यांना काऊ चिऊची गोष्ट सांगितली. त्यातही मेण आणि शेण म्हणजे काय हे त्यांना समजणे कठीणच होते, ते कसेबसे सांगितले. ती गोष्ट त्यांना कितपत समजली ते पहावे म्हणून मी त्यांना विचारले “चिऊ कशी करते?”

खिडकीबाहेर चिवचिवाट करणाऱ्या चिमण्या त्यांच्या चांगल्या ओळखीच्या होत्या. इराने लगेच दोन्ही हात पसरून पंख फडफडण्याची क्रिया करीत चिवचिव करून दाखवली. मी जेंव्हा विचारले “काऊ कसं करतो?” तेंव्हा लगेच ईशा हंबरली “मूऊऊऊऊ”. त्या दोघींनी इंग्लंडमध्ये कधी कावळा पाहिलाच नव्हता तेंव्हा त्यांना काऊ म्हणजे त्यांना चित्रात पाहिलेली गायच वाटली!

ईशा व इरा या दोघी जुळ्या बहिणी असल्या तरी एकमेकीपासून भिन्न आहेत. इरा जास्तच गोरी, उंच व थोडी दांडगट आहे. ती ईशाच्या हातातली वस्तु हिसकावून घ्यायचा प्रयत्न करते. ईशा चपळाईने तिची खोडी काढून पळून जाते किंवा तिची वस्तु पळवून लपवून ठेवते. असा टॉम आणि जेरीचा खेळ त्यांच्यामध्ये चालू असतो. पण दोघींचाही एकमेकीवर खूप जीव आहे. कुठलीही गोष्ट कधीही दुसरीला मिळाल्याखेरीज एकटीने खात नाहीत. सगळ्या गोष्टी लोकांना दाखवायची इराला खूप हौस आहे. तिला संधी मिळायचा अवकाश, लगेच तिचे नाचणे व गाणे सुरू होऊन जाते पण ईशा मात्र तिची इच्छा असेल तेंव्हाच अप्रतिम गाणार किंवा नाचणार. इराची स्मरणशक्ती चांगली आहे. ऐकलेले शब्द समजू देत किंवा नाहीत ते उच्चार तिच्या लक्षात राहतात. ईशाची आकलनशक्ती चांगली आहे. कुठलीही गोष्ट तिच्या चटकन लक्षात येते. तिला तालासुराची उपजत जाण आहे. त्यामुळे ती सारेगमचे आरोह व अवरोह व्यवस्थित दाखवते. इरा सरगममधली सगळी अक्षरे कधीकधी एकाच सुरात म्हणून टाकते, पण इंग्रजी व मराठीतलीच नव्हेत तर अनेक हिंदी गाणीसुद्धा तिला चालीवर आणि मधल्या म्यूजिकसकट पाठ आहेत.

दोन वर्षांपूर्वी ती मंडळी भारतात परतल्यावर आधी मुंबईला राहून सगळी नीट व्यवस्था झाल्यानंतर पुण्याला गेली. तिकडून येतांना “इंडियाला जायचंय्” असे बोलणे झाले असेल. त्यामुळे मुंबईतले आमचे घर म्हणजे इंडिया अशीच ईशा व इरा या दोघींची समजूत झाली होती. देश ही संकल्पना त्या वयात समजणे कठीण होते. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही त्यांच्याकडे पुण्याला गेलो तेंव्हा इरा म्हणाली होती, “मला पण तुमच्याबरोबर इंडियाला यायचंय्.” त्यानंतर जेंव्हा त्यांच्याकडे गेलो होतो तेंव्हा परत निघायच्या वेळी ईशा म्हणाली, “आजोबा, तुला माहीत आहे कां की इथं सुद्धा इंडियाच आहे. मग तू पण इथंच कां नाही रहात?”


आमच्या छकुल्या (भाग ३)

जन्मतारीख - भाग ३

आमच्या ईशा आणि इरा या दोन व तीन वर्षांच्या झाल्या त्या वेळचे त्यांचे वाढदिवस त्या इंग्लंडमध्ये असतांना आले. ते भारतात करत असायचे तशाच पध्दतीनेच पण तिथल्या भारतीय मित्रमैत्रिणींना बोलावून तिथे साजरे केले गेले. आम्हीही टेलीफोन, इंटरनेट, वेबकॅम वगैरे माध्यमातून त्यात जेवढा सहभाग करता आला तेवढा करून घेतला. चौथ्या वर्षपूर्तीच्या दिनापर्यंत त्या भारतात आल्या होत्या आणि पुण्याला आमचे जाणे येणे सारखे चाललेले असे. त्यामुळे वाढदिवसाला जाणे झालेच.

आजकालची लहान मुले आपले नांव सांगायला लागतात त्याच्यापाठोपाठच आपली जन्मतारीखसुद्धा सांगायला शिकतात. आमच्या ईशा आणि इरा यांना आपापल्या नांवांमधल्या ‘श’ आणि ‘र’ चा उच्चारसुद्धा नीट जमत नव्हता तेंव्हापासून त्या “सोळा जूनला माझा बड्डे आहे.” असे सांगताहेत. त्या वेळी संख्या आणि महिना या संकल्पनाच त्यांना कळलेल्या नसल्यामुळे ‘सोळा’ ही एक ‘संख्या’ आहे आणि ‘जून’ हे एका ‘महिन्या’चे नांव आहे एवढे कळण्याइतकीही समज आलेली नव्हती. ‘बड्डे’ म्हणजे ‘धमाल’ एवढेच त्यांना पक्के समजलेले होते. त्या दिवशी छान छान कपडे घालायचे, हॉलमध्ये भिंतीवर रिबिनी, फुगे वगैरे लावायचे, खूप मुलांना जमवून मनसोक्त दंगा करायचा, केक कापायचा, ‘हॅपी बर्थडे’चे गाणे म्हणायचे, टाळ्या वाजवायच्या, यम्मीयम्मी गोष्टी खायच्या. सगळे लोक त्या ‘बड्डे बॉय’ किंवा ‘बड्डे गल्’ ला ‘विश’ करतात, त्यांना ‘प्रेसेंट्स’ देतात वगैरे सगळा तपशील त्यांना पाहून पाहून ठाऊक झाला होता. त्यामुळे आपले वाढदिवस नेहमी नेहमी येत रहावेत असे त्यांना वाटायचे. अधून मधून त्या आपल्या मित्रमैत्रिणींच्या बर्थडे पार्ट्यांना जाऊन तिथे धमाल तर करायच्याच, इतर दिवशी आपल्या भातुकलीच्या खेळात मिकी उंदीरमामा, टेडी अस्वल किंवा बार्बी भावली यांचे साग्रसंगीत वाढदिवस ‘मनवत’ असत.

आता त्या शाळेत जायला लागल्या होत्या. वाढदिवसाच्या दिवशी सकाळी शाळेचा गणवेश न घालता नवा ड्रेस घालून आणि शाळेत वर्गातल्या मुलींना वाटण्यासाठी चॉकलेट्सचे डबे घेऊन त्या शाळेला गेल्या. शाळा सुरू झाल्यानंतर त्यांच्या वर्गात पहिला वाढदिवस त्यांचाच आला होता का काय कोण जाणे, शाळेत बर्थडे कसा साजरा करतात हे त्यांनाही ठाऊक नव्हते आणि आम्हालाही. शाळेतून घरी परत आल्यावर त्यांनी थोडक्यात शाळेतली गंमत सांगितली पण त्या थोड्याशा हिरमुसलेल्या वाटल्या. खोदून खोदून विचारल्यावर ईशाने सांगितले, “स्कूलमध्ये आपला बड्डे झाला, पण त्याची पाट्टीच नाही झाली!” या वर्षीचा वाढदिवस हा असाच होणार की काय असे तिला वाटले होते. “हा फक्त शाळेतला बर्थडे झाला, आतां संध्याकाळी आपण घरी पार्टी करू, त्यात तुमचे फ्रेंड्स, अंकल, आँटी वगैरे खूप लोक येणार आहेत. त्यावेळी घालायसाठी दुसरे नवीन ड्रेस आणले आहेत. तेंव्हा आपण नाच, गाणी, खेळ वगैरे सगळे करायचे आहे. ” असे समजाऊन सांगितल्यानंतर त्यांची कळी खुलली.
——————————–

आमच्या छकुल्या (भाग ४)

chhakulyaa४

आता आमच्या छकुल्या पांच वर्षांच्या झाल्या आहेत. वयाबरोबर त्यांची समजशक्ती आणि समजुतदारपणा वाढला आहे. त्याबरोबर सगळे कांही समजून घेण्याची जिज्ञासा अपार वाढली आहे. कुठल्याही प्रश्नाचे त्यांना समजेल आणि पटेल असे उत्तर मिळेपर्यंत त्या पिच्छा सोडत नाहीत. त्यांना आता काऊचिऊ, कुत्रामांजर यांच्यापेक्षा जिराफ, झेब्रा, अजगर आणि देवमासा अशा प्राण्यांबद्दल कुतुहल वाटते. त्यांची चित्रे पाहून त्या या प्राण्यांना ओळखतातच, शिवाय ते प्राणी काय खातात आणि कसे ओरडतात वगैरेसारखे प्रश्न त्या विचारतात. त्यांना प्राणीसंग्रहालयात नेऊन कांही वेगळे प्राणी दाखवता येतील, त्यावेळी त्या प्राण्यांनी खाण्यासाठी किंवा ओरडण्यासाठी आपले तोंड उघडले तर नशीब!
एकदा मी बसलो आता इरा मागून आली आणि माझ्या टकलावरून हात फिरवत म्हणाली,” आजोबा, तुझे केस कुठे गेले?”
या अचानक आलेल्या प्रश्नाला मी कांहीतरी उत्तर द्यायचे म्हणून सांगितले, “अगं, वाऱ्याने थोडे थोडे उडून गेले.”
या उत्तराने तिचे समाधान झाले नाही. आपल्या केसांवरून हात फिरवत ती म्हणाली, “हे पहा, माझे केस किती छान वाढताहेत. तुझेच कसे उडून गेले?”
मी सांगितले, “तुझे केस कसे छान काळेभोर आणि दाट आहेत, तसे माझे नाहीत ना! माझे तर पांढरे आणि हलके झाले आहेत, म्हणून ते उडून जातात. ”
” पण तुझे केस असे पांढरे आणि पातळ कां झाले?” लगेच पुढला प्रश्न आला.
“मी आता ओल्ड झालोय ना, म्हणून. ”
“पण तू ओल्ड कशाला झालास?”
काय सांगावे ते मला सुचेना. “वयानुसार सगळेच म्हातारे होतात.” असे सांगून तिला भीती घालायची माझी इच्छा नव्हती. मी सांगितले, “खरं म्हणजे चुकलंच माझं! ”
“मग सॉरी म्हण. ”
इराच्या या वाक्याचा अर्थ मला लागत नाही असे पाहून ईशाने स्पष्टीकरण दिले, “अरे आजोबा, कुणाचं चुकलं असलं तर त्यानं सॉरी म्हणायचं असतं. एवढं पण तुला ठाऊक नाही कां?”
“अरे हो, मी तर विसरलोच होतो. पण मी कुणाला सॉरी म्हणू?” मी विचारलं.
“कुणाला नाही तर देवबाप्पाला सॉरी म्हण, म्हणजे तो तुला पुन्हा केस देईल.”
तिचे आशावादी विश्व सरळ सोपे होते. त्याला तडा द्यावा असे मला वाटले नाही. पण थोडी वस्तुस्थिती मान्य करता यायला हवी. म्हणून मी सांगितले, “देवबाप्पा म्हणतो की तुला आजोबा व्हायचं असेल तर आधी म्हातारा व्हायला पाहिजे. तुम्हाला ओल्ड आजोबा आवडतो ना?”
“ओके”, ” ओके” म्हणत त्यांनी तो संवाद थांबवला.
आता त्या मैसूरला रहायला गेल्या आहेत. पुण्याच्या सेंट मेरी कॉन्व्हेंटमधून एकदम तिथल्या पुष्करणी बालोद्याना शाळेत गेल्याने त्यांना कल्चरल शॉक वगैरे बसेल अशी आम्हाला भीती वाटत होती. पण तसे कांहीच झाले नाही. इथे जुन्या शाळेतल्या मैत्रिणी नाहीत म्हणून थोडी कुरकुर केली, पण तेवढीच. आता त्यांना इंग्रजी, हिंदी, संस्कृत आणि कन्नड या चार भाषा आणि गणित, सामान्य ज्ञान, चित्रकला वगैरे विषय आहेत. त्यांची पुस्तके आणि वह्या मिळून अठरा आयटमचे गांठोडे पाहून आम्हालाच घाम फुटला होता. त्याशिवाय घरी मराठी बोलायचे शिक्षण चाललेच असते. त्यामुळे आम्ही त्यांना हवे तसे बोलू देतो. त्यातल्या व्याकरणाच्या चुका काढून आणि आदरार्थी बहुवचन वगैरेचा घोळ घालून त्यांना बोलतांना आडवत नाही. एकदा मनात आलेले विचार मांडता येणे जमू लागले की बाकीच्या गोष्टी हळू हळू जमतील.

सिंड्रेला, स्नोव्हाइट वगैरेंच्या परीकथांच्या जगातून त्या पूर्णपणे बाहेर आलेल्या नाहीत, पण आता माणसांच्या जगातल्या कांही गोष्टी ऐकायला आणि सांगायला लागल्या आहेत. त्यांना आता अक्षरज्ञान झाले असले आणि बोलतांना शब्द जुळवून वाक्यरचना करता येऊ लागली असली तरी अजून पुस्तक वाचता येत नाही. त्यामुळे गोष्टींच्या पुस्तकांतल्या गोष्टी त्यातल्या चित्रांच्या आधारानेच सांगाव्या लागतात. एका चित्रात एक पोलिस एका चोराचा पाठलाग करतो आहे असे दाखवले होते त्याप्रमाणे मी इराला सांगितले. त्यावर तिने विचारले, “तुला हे कसे समजले?”
मी म्हंटले, “ते तर अगदी सोप्पं आहे. मागून धांवणाऱ्या या पोलिसाने त्याचा युनिफॉर्म घातला आहे. हा बघ! ”
“पण मग चोर युनिफॉर्म कां नाही घालत?” खरेच सगळ्या गुन्हेगारांनी विशिष्ट गणवेष घातले असते आणि त्यांना ओळखता आले असते तर किती बरे झाले असते ना?

अशा आहेत आमच्या गोड छकुल्या. चिवचिवाट करून मन रमवणाऱ्या आणि मध्येच न सुटणारे प्रश्न विचारून निरुत्तर करणाऱ्या.
.
.
.
हा लेख लिहूनही आता दहा वर्षे होऊन गेली. आता त्या छकुल्या राहिल्या नाहीत. त्यांनी आपले विश्व निर्माण केले आहे आणि त्यांना कुठलाही प्रश्न पडला तर त्याचे उत्तर त्या स्वतःच गूगलवरून शोधून काढतात आणि मलाच नवनवी माहिती देतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: