संस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे

मी हा विस्तृत लेख एका लेखमालेच्या स्वरूपात सात भागांमध्ये लिहिला होता. त्याचे थोडे संपादन करून आता या स्थळावर एकत्र सादर करीत आहे.
—————————-

संस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे – भाग १

माझ्या लहानपणापर्यंत सुलभपणे मराठी भाषेची लिपी शिकण्यासाठी ‘गमभन’चा शोध लागला नव्हता. सगळ्या चांगल्या कामांची सुरुवात ‘श्रीगणेशा’ने होत असे. ‘श्रीगणेशा’ म्हणजेच ‘शुभारंभ’ असा मुळी एक वाक्प्रचारच आहे. त्याप्रमाणे लेखन व वाचनाच्या शिक्षणाची सुरुवातसुध्दा ‘श्रीगणेशायनमः’ या वाक्याने होत असे. त्याचा उच्चार तेंव्हा श्रीगणेशायन्महा असा व्हायचा. श्रीश्री, गग करत एक एक करून सावकाशपणे श्री ग णे शा य न मः ही सारी अक्षरे शिकून झाल्यानंतर अआइई, कखगघ वगैरे मुळाक्षरे शिकायला मिळाली. पण अक्षरज्ञान होण्याच्याही आधीच रोज संध्याकाळी ‘शुभंकरोती’ म्हणायची संवय मला लावली गेली होती. घरातली सगळी मुले, म्हणजे माझी मोठी भावंडे तीन्ही सांजा होऊन गेल्यावर एकत्र बसून ‘शुभंकरोती कल्याणम्’, ‘वक्रतुंड महाकाय’, ‘गणनाथ सरस्वती’ वगैरे श्लोक म्हणायचे. ते रोज ऐकून मला तोंडपाठ झाले होते आणि मी सुध्दा रोज त्या सामूहिक पठणात सामील होत असे. अशा प्रकारे मला कळायला लागण्याच्या आधीच संस्कृत भाषेची थोडीशी ओळख झाली होती. फक्त त्याला ‘संस्कृत’ म्हणतात हे ठाऊक नव्हते. हे सगळे म्हणजे ‘देवबाप्पाची प्रार्थना’ आहे, मुलांनी रोज ती करायची असते आणि ती केल्यामुळे तो बाप्पा आपल्याला ‘चांगली बुध्दी’ देतो आणिकही आपले सगळे काही चांगले करतो असे एक कारण त्यासाठी दिले जात असे आणि बालमनाला त्याचीही गरज नव्हती. आई सांगेल ते ऐकायचे एवढेच कारण पुरेसे होते.

संस्कृतातले हे श्लोक म्हणायला येऊ लागल्यानंतर वाढत्या वयानुसार त्यात रामरक्षा, गणपतीअथर्वशीर्ष वगैरेंची भर पडत गेली. ‘ध्यायेदाजानुभावम् धृतशरधनुष्यम् बध्दपद्मासनस्थम्’ अशासारखे जोडाक्षरांनी युक्त शब्दसमूह एका दमात आणि चालीवर म्हणण्यामुळे जीभ लवचीक होते, नाहीतर ती जड होते, तसेच अशा पठणातून छातीला व्यायाम मिळतो वगैरे त्यापासून असलेले इतर फायदेही सांगत असत. शिवाय त्या काळात अंधाऱ्या रात्री हे श्लोक म्हणजे भुताखेतांपासून आपले संरक्षण करण्याचे प्रमुख साधन होते. आमच्या लहान गावात विजेचा प्रसार फारसा न झाल्यामुळे रस्त्यात नेहमी अंधारगुडुप असायचाच, घरातसुध्दा अनेक वेळा अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे भुते, हडळी, पिशाच, समंध वगैरेंना मनसोक्तपणे हिंडायला मोकळे रान मिळत होते आणि कोणाकोणाला कसला कसला भास झाल्याच्या सुरस कथा नेहमी ऐकायला मिळत असत. त्यामुळे अशा श्लोकांपासून मनाला मोठा आत्मविश्वास मिळत असे.

तोंडपाठ केलेल्या श्लोकांचा किंवा मंत्रांचा अर्थ समजावून द्यावा किंवा तो समजून घ्यावा असे सहसा कोणालाही वाटायचे नाही. लिहिलेली अक्षरे आणि त्यांचे पठण करतांना होणारा नाद एवढ्याच गोष्टी अत्यंत महत्वाच्या असत. त्यात तसूभरही अंतर पडलेले चालत नव्हते. आपल्या महान पूर्वजांनी लिहून ठेवलेले हे सारे श्लोक आणि मंत्र सामर्थ्यवान आणि अचूकच असले पाहिजेत आणि ते जसेच्या तसे पुढील पिढीला देणे हे आपले परमकर्तव्य आहे अशीच सर्वसाधारण धारणा असायची. त्याबद्दल कोणताही प्रश्न विचारायची मुभा नसायची. शंका घेणे हा तर सर्वस्वी अक्षम्य गुन्हा होता. एका दृष्टीने ते ही ठीकच होते. एकाद्या आडदांड थोराड मुलाला ‘अरे ढबाल्या’ किंवा ‘वाकडतोंड्या’ असे म्हंटले तर तो आपले थोबाड नक्की फोडणार एवढी अक्कल मुलांना त्यांच्या अनुभवातून येत होती. मग गणपतीबाप्पाला मात्र ‘वक्रतुंड, महाकाय’ ही विशेषणे लावली तरी तो कसा रागावत नाही? असा प्रश्न त्या शब्दांचा अर्थ समजल्यास त्यांना पडला असता. कोटी या प्रचंड संख्येचा त्यांना अंदाज नसला तरी त्या बाप्पाचा एका सूर्याएवढा प्रकाशसुध्दा आपल्याला कसा दिसत नाही? उलट आपल्यालाच त्याच्यासमोर दिवा का लावावा लागतो? असल्या अधार्मिक शंका लहान मुलांच्या मनात उठल्या असत्या. त्यापेक्षा त्यांना तो अर्थ न समजलेलेच बरे होते.

शाळेत मराठी भाषेचे व्याकरण शिकतांना ‘तत्सम’, ‘तद्भव’, ‘संस्कृतजन्य’ आदि शब्दांसह जसजशी अशा शब्दांची ओळख होत गेली, तसतशी संस्कृत भाषेच्या ज्ञानात भर पडत गेली, आठवीपासून अकरावीपर्यंत संस्कृत या विषयाचाच अभ्यास केला. त्यासाठी ‘रामः रामो रामाः’ पासून पाठांतराला एकदा जी सुरुवात झाली त्यानंतर चार वर्षे पाठांतरे होतच राहिली. अकार, आकार, इकार, उकार वगैरें निरनिराळ्या ‘कारां’नी अंत असलेले पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी शब्द आणि त्यांची एकवचन, द्विवचन व बहुवचनातील प्रथमा, द्वितिया आदि आठ विभक्त्यांमधली सगळी रूपे पाठ करावी लागत होती. त्याचप्रमाणे सर्वनामे, विशेषणे, क्रियाविशेषणे यांची वेगवेगळी रूपे आणि अनेक प्रकारच्या क्रियापदांची विविध काळामधली विविधवचनी रूपे अशा असंख्य गोष्टींचे पाठांतर करणे आवश्यक होते. पण रोजच्या जीवनात त्यांचा उपयोग नसल्यामुळे त्यांचे विस्मरण व्हायलाही वेळ लागत नसे.

सोपे शब्द असलेल्या काही वाक्यांमधून एकादी गोष्ट सांगणारे किंवा बोध देणारे गद्य धडेसुध्दा संस्कृतच्या पुस्तकात असायचे आणि व्यास, वाल्मिकी यांच्यापासून ते कालिदास, भवभूती यांच्यापर्यंतच्या महाकवींच्या रचनांची किंचित झलक दाखवणारे पद्याचे उतारेही असत. त्यातल्या एकाद्या परिच्छेदाचे किंवा श्लोकाचे मराठी भाषांतर करायचे प्रश्न पेपरात असायचे, त्यामुळे त्या भाषांतरांचेही पाठांतर केले जात असे. तसेच गाळलेल्या जागा भरा, जोड्या जमवा, वाक्य पूर्ण करा असे पैकीच्या पैकी मार्क देणारे अनेक प्रश्न पेपरात असल्यामुळे संस्कृत हा गणितासारखा स्कोअरिंग विषय होता. मात्र गणित हा विषय पायरी पायरीने चढता चढता अधिकाधिक पक्का होत गेला तसा संस्कृत हा विषय झाला नाही. शाळेबरोबरच संस्कृतशी असलेला संबंध सुटला तो जवळ जवळ कायमचा.

. . . . . . . . (क्रमशः)
——————–

संस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे – भाग  २

आपल्याला जे काही थोडे फार येत असेल त्याचा उपयोग करून घेण्याकडे माझा पहिल्यापासून कल असायचा. तो प्रयत्न करतांना आणखी काही वेगळे शिकायची गरज पडत असे, ते शिकण्याची संधी मिळत असे आणि मी तिचा लाभ घेत गेलो. केवळ पोपटपंची करण्यासाठी घोकंपट्टी करणे मला पसंत नव्हते. शिकलेले विषय समजून घेऊन लक्षात ठेवणे आणि त्यांचा जमेल तसा उपयोग करणे यावर माझा भर होता. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करू लागल्यानंतर तर रोजच नवनव्या तांत्रिक गोष्टी नजरेसमोर येत असत आणि त्या आत्मसात करणे आवश्यक असल्यामुळे कामाशिवाय अवांतर पाठांतर करायला वाव उरला नाही आणि संस्कृत भाषेचे अध्ययन थांबले. मी रहात असलेल्या कोणत्याच भागात संस्कृत ही भाषा बोलली जात नव्हती.

घरात किंवा एकाद्या देवळात चाललेली पूजा अर्चा पाहतांना त्यावेळी म्हंटले जात असलेले संस्कृत मंत्र कानावर पडायचे. संस्कृतचा थोडा अभ्यास केल्यानंतरच्य़ा काळात त्या मंत्रांचा उच्चार स्पष्ट ऐकू आला तर त्यातली सोपी वाक्ये समजायला लागली. वाढत्या वयानुसार केलेल्या अवांतर वाचनातून नव्या विचारांची शिंगे फुटायला लागली होती. “आपल्याला अमूक मिळावे यासाठी आपण तमूक विधी करणार आहोत” असा संकल्प त्या सर्वव्यापी सर्वज्ञ परमेश्वराला सांगायचा आणि सर्व जगाच्या कर्त्याकरवत्याकडे “मी तुझ्यासाठी हे करतो आहे, तेंव्हा तू माझ्यासाठी एवढे कर” अशी प्रार्थना करायची, त्यानंतर “आता मी त्या देवाला स्नान घालतो”, “त्याला चंदन लावतो”, “फुले वाहतो”, नैवेद्य देतो”, “दिवा दाखवतो”, “धूपाचा सुवास देतो”, “त्याचे ध्यान करतो” वगैरे गोष्टी त्याला सांगून करायच्या हे जरासे गंमतीचे वाटू लागले. परमेश्वराबरोबर करण्याचे हे सगळे संभाषण संस्कृत भाषेतच कशाला करायला हवे असा प्रश्न पडू लागला. मोठेपणी मी या पारंपारिक धर्म किंवा कर्ममार्गाने फारशी वाटचाल केली नाही. अशा प्रकारे माझ्या रोजच्या जीवनात संवाद, लेखन, वाचन यातल्या कुठल्याच मार्गाने संस्कृत भाषेचा उपयोग केला जात नव्हता.

एका परीने मी संस्कृत भाषेकडे अशी पाठ फिरवली असली तरी ती मात्र माझ्या पाठीशी अगदी मला खेटून उभी आहे असे गेली पन्नास वर्षे मला नेहमी जाणवत राहिले आहे. किंबहुना मी तिच्यापासून कधीच दूर गेलो नव्हतो. घरात आणि नातेवाइकांशी होणारे सर्व बोलणे मातृभाषेत होते आणि बाहेरच्या जगाशी होत असलेला संपर्क मुख्यःत्वे राष्ट्रभाषेत होतो. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांची जननी असलेल्या संस्कृत भाषेमधील असंख्य शब्दप्रयोग त्यात सारखे येतच असतात. आजीच्या घरात आपण रहात नसलो तरी तिच्याबद्दल अतीव आपुलकी वाटते, तिच्या आठवणी, तिचे संदर्भ नेहमी निघतच असतात. असेच काहीसे हे आहे. शिवाय या समानतेमुळे यातली एक भाषा चांगली येत असेल तर दुसरी भाषा समजण्याला त्याची खूप मदत होते.

याशिवाय संस्कृत भाषेचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे नवे शब्द निर्माण करण्याचे तिचे सामर्थ्य. माझ्या लहानपणाच्या काळानंतर गेल्या पन्नास वर्षात विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली, रहाणीमानात मोठे बदल झाले, कुटुंबसंस्था, सामाजिक वातावरण, राजकीय परिस्थिती वगैरेंमध्ये बदल झाले. त्यांच्यासोबतीने अनेक नवे शब्दप्रयोग आले. काँप्यूटर, इंटरनेट, व्हायरस यासारख्या नव्या शब्दांसाठी संगणक, आंतर्जाल, विषाणू यासारखे प्रतिशब्द तयार झाले. मराठी आणि हिंदीमधून राज्यकारभार करणे सुरू झाल्यानंतर आयुक्त, उपमहानिरीक्षक, कार्यकारी अभियंता वगैरे नावांची पदे निर्माण झाली. असले बहुतेक सगळे नवे शब्द संस्कृतजन्य आहेत. ज्या काळात संस्कृत ही भाषा बोलली जात होती त्या युगात या शब्दांची गरज नव्हती. त्यामुळे प्राचीन वाङ्मयात हे शब्द दिसणार नाहीत. संस्कृत भाषेच्या मूळ शब्दकोशांमध्ये ते सापडणार नाहीत. पण मराठी, हिंदी या सारख्या संस्कृतजन्य भाषांमध्ये असे नवे शब्द निर्माण करण्यासाठी आणि प्रचलित करण्यासाठी त्या प्राचीन भाषेचा उपयोग केला गेला आणि केला जात आहे. मुलगी मोठी होऊन सासरी नांदायला गेल्यानंतरसुध्दा तिची आई तिला अधून मधून काहीबाही देतच असते आणि गरज पडल्यावर मुलगी आपल्या आईकडे आधारासाठी पाहतेच ना? भारतीय भाषांच्या बाबतीत ही गोष्ट जास्त मोठ्या प्रमाणात होतांना दिसते. सर्वांना मान्य होतील असे नवे शब्द तयार करतांना बहुतेक वेळी संस्कृत भाषेचाच आधार घेतला जातो.

सिंधूदुर्गपासून गोंदियापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषांमध्ये निरनिराळ्या स्थानिक शब्दांचा वापर होत असतो. एका भागातले खास शब्द बरेच वेळा दुसऱ्या भागातील लोकांना अपरिचित असतात. हिंदी भाषा बोलणाऱ्या प्रदेशाचा विस्तार तर खूपच मोठा आहे. शिवाय वैराण वाळवंट, घनदाट वनराई, उत्तुंग हिमशिखरे आणि समतल भूमी असे विविध प्रकारचे भौगोलिक प्रदेश त्यात येतात. अर्थातच त्या भागांमध्ये बोलल्या जाणाऱ्या बोलींमध्ये जास्त वैविध्य आहे. पण दोन्ही भाषांच्या बाबतीत असे दिसते की देशातच नव्हे तर आता जगभर पसरलेल्या सुशिक्षित लोकांना समजतील अशा ज्या प्रमाणभाषा तयार केल्या गेल्या आहेत, शासकीय व्यवस्थेमध्ये ज्यांचा उपयोग केला जात आहे, मुद्रणतंत्रज्ञानाचा विकास झाल्यानंतर ज्या प्रमाणभाषांमध्ये अधिकाधिक लेखन केले जात आहे. त्या अधिकृत भाषांवर असलेला संस्कृतचा प्रभाव जाणवल्याशिवाय रहात नाही.

मी लहानपणी शिकलेले संस्कृत भाषेचे व्याकरण आतापर्यंत विसरून गेलो आहे. त्या भाषेत मला कदाचित आज एकादेही व्याकरणशुध्द वाक्य लिहिता येणार नाही. बोलण्याचा तर प्रयत्नसुध्दा मी कधीच केला नव्हता. पण या लेखातल्या वाक्यावाक्यांमध्ये संस्कृत भाषेमधून घेतलेल्या शब्दांची रेलचेल केलेली आणि ती मराठीमध्ये सहज खपून गेलेली दिसेल.

. . . . . . . . . . . (क्रमशः)
————————————

संस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे –  भाग ३

संस्कृत ही जीवंत भाषा आहे की मृत भाषा आहे असा वाद मी शाळेत असल्यापासून चालत आलेला मी ऐकला आहे आणि त्यात दोन्ही बाजूंनी भागसुध्दा घेतला आहे. घरात चाललेल्या चर्चांपासून ते वर्तमानपत्रात आणि आता आंतर्जालावर चालत असलेल्या वादविवादात हिरीरीने भाग घेणाऱ्यांसाठी हा एक आवडता विषय आहे. त्यात दोन्ही बाजूंनी पटतील असे चांगले मुद्दे असले तरी ते वरवर राहतात आणि भाषा बाजूला राहून अवांतर छुपे उद्देश समोर येतात हे पाहिल्यानंतर मी त्यात भाग घेणे सोडून दिले आहे.

माणसे तसेच कुत्रीमांजरे किंवा कावळेचिमण्या यासारखे पशुपक्षी हे सजीव आहेत आणि दगड, माती, लाकूड वगैरे निर्जीव वस्तू आहेत हे सगळ्यांना ठाऊक असते. त्यासाठी त्यांना कोणतीही व्याख्या करावी लागत नाही. हालचाल करणारे, बोलणारे ते सजीव आणि ते न करणारे निर्जीव असे अगदी सोपे निकष मानले तर त्याला अनेक अपवाद निघतात. सजीवांचे चालणेबोलणे निद्रावस्थेत, बेशुध्दावस्थेत आणि कोमात गेल्यानंतर कमीकमी होत जाते व जवळजवळ थांबल्यात जमा होते. तरीही ते जीवंत असतात. हालचाल आणि संभाषण न करणारे वनस्पतींचे प्रचंड विश्व सचेतन असते. उलटपक्षी पाहता निर्जीव असा लोखंडाचा तुकडासुध्दा सतत स्पंदन करत असतो असे सूक्ष्म निरीक्षणातून समजते. त्याच्यावर प्रहार केला तर त्यातून ठराविक प्रकारचा नाद निर्माण होतो आणि त्याचा तुकडा मोडतांना वेगळे आवाज निघतात. तरी तो मात्र अचेतनच असतो. सजीव प्राणी श्वासोच्छ्वास करतात, त्यांचे शरीरात रक्ताभिसरण सुरू असते, ते जन्माला येतात, अन्नग्रहण करतात, काही काळ वाढतात आणि अखेर मृत्यू पावतात वगैरे त्यांचे इतर काही गुणविशेष आहेत. पण त्यांनासुध्दा अपवाद दाखवता येतील. अनेक प्रकारची स्वयंचलित यंत्रे हवेमधील प्राणवायूचे शोषण करून कर्बद्विप्राणील वायूंचे उत्सर्जन करत असतात. त्यांची संख्या आता इतकी वाढली आहे की त्यांच्यामुळे पृथ्वीवरील वातावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. त्यांनासुध्दा इंधन लागते. अनेक संयंत्रांमध्ये पाणी किंवा विशिष्ट तेलाचे सतत अभिसरण होत असते. जगातल्या एकूण एक जड आणि अचेतन वस्तूसुध्दा केंव्हातरी निर्माण झालेल्या असतात तसेच त्या नष्टसुध्दा होत असतात. फक्त त्या बाबतीतल्या प्रक्रिया निराळ्या असतात.

सजीवांमध्ये प्राण असतो आणि निर्जीवांमध्ये तो नसतो हा खरे तर त्यांच्यामधला सर्वात जास्त महत्वाचा, कदाचित एकमेव निश्चित असा फरक असतो, पण प्राण या संकल्पनेचे अस्तित्व मात्र अद्याप अगम्यच आहे. ते कशा प्रकारचे आहे हे डोळ्यांना दिसणाऱ्या किंवा हाताने स्पर्श करता येणाऱ्या अशा जड वस्तूंच्या उदाहरणातून दाखवता येत नाही आणि पाहताही येत नाही.

सजीव प्राण्याच्या शरीरात असतो तशा प्रकारचा प्राण भाषांमध्ये असणार नाही. वर दिलेल्या जीवंतपणाच्या इतर व्याख्या भाषांना कशा लावता येतील याचे मापदंड स्थळकाळानुसार वेगवेगळे असतात. एकादी भाषा बोलता येणे, ती वाचता येणे आणि लिहिता येणे ही एकाद्या माणसाला ती भाषा येत असल्याची ठळक लक्षणे समजली जातात. निरक्षर लोकांना ती भाषा फक्त बोलता येते, काही साक्षर लोकांना लिहिलेले वाचता येते पण स्वतः मजकूर रचून तो लिहिता येत नाही. काही लोकांना या तीनही गोष्टी करता येतात. पण त्यासाठी त्या भाषेमध्ये लिहिण्यावाचण्याची सोय असायला हवी. सुरुवातीला माणसांनी एकमेकांबरोबर संवाद साधण्याच्या प्रयत्नांमधून वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये निरनिराळ्या भाषांचा जन्म झाला. आदिम काळात त्यांचा उपयोग फक्त बोलण्यात होत असणार. आजही दुर्गम अशा रानावनात राहणारे निरक्षर वनवासी, आदिवासी, ट्रायबल वगैरे लोक आपापसात त्यांच्या बोलीमधून बोलत असतात. त्यांच्या दृष्टीने पाहता त्या त्यांच्या भाषाच असतात आणि रोजच्या वापरात असल्यामुळे त्यांना जीवंतच म्हणायला हवे. पण त्यांना अधिकृत भाषा म्हणून सुशिक्षित लोकांच्या जगात मान्यता प्राप्त झाली नसेल, कदाचित त्या भाषेला विशिष्ट नावसुध्दा नसण्याची शक्यता आहे.

प्राचीन काळापासून जगाच्या निरनिराळ्या भागात काही प्रगत अशा संस्कृती उदयाला आल्या, कालांतराने त्यातल्या काही अस्तालासुध्दा गेल्या. बहुतेक ठिकाणी संस्कृतीच्या सोबतीने लेखनकलेचा उदय आणि विकास होत गेला. तो होत असतांना त्या लोकांच्या वापरात असलेल्या भाषांचे व्याकरण तयार झाले, त्यांच्यासाठी लिपी तयार होत गेली आणि त्यात लिखित वाङ्मयाची, ग्रंथांची निर्मिती होत गेली. त्या भाषांचे शास्त्रोक्त शिक्षण घेण्याची व देण्याची व्यवस्था झाली. मानवांच्या जीनवात त्यांना अधिकाधिक महत्वाचे स्थान प्राप्त होत गेले. त्या भाषांच्या सहाय्याने मानवाने अनेक विषयांचा अभ्यास केला आणि त्यातून त्याची प्रगती होत गेली. अशा प्रकारे ज्या बोलीभाषा अक्षरांमध्ये लिहिल्या व वाचल्या जात त्यांना प्रतिष्ठा, लोकप्रियता आणि राजमान्यता मिळत गेली.

प्राचीन काळात, बहुधा हजारो वर्षांपूर्वीच्या काळातल्या सर्वात जास्त प्रगत विश्वात संस्कृत या भाषेला सर्वमान्यता व मोठी प्रतिष्ठा मिळाली होती. त्या भाषेत लिहिल्या गेलेल्या अप्रतिम साहित्यकृती अजरामर होऊन राहिल्या. संस्कृत भाषासुध्दा प्रदीर्घ काळापर्यंत आर्य लोकांची बोलीभाषा राहिली असावी. पण प्राचीन काळातच प्राकृत, अर्धमागधी, पाली यासारखी तिची वेगवेगळी रूपे निघाली होती. कालांतराने वेगवेगळ्या भागांमध्ये तिच्या स्वरूपात अधिकाधिक स्थानिक बदल होत गेले, शब्दांचे अपभ्रंश होऊन नवे शब्द तयार होऊन ते रूढ झाले. परकीय भाषांमधील काही शब्दांचा उपयोग होऊ लागला आणि त्यातून मराठी, हिंदी, बांगला आदि आजच्या भाषा आणि त्यातील प्रत्येकीच्या अनेक उपभाषा आणि बोलीभाषा तयार होत गेल्या. तरीदेखील भारतातील विद्वान लोकांना संस्कृत भाषा शिकून त्या भाषेमधील ज्ञानाचे संपादन करण्याची आणि साहित्याचा आस्वाद घेण्याची इच्छा होतच राहिली, आयुर्वेद, ज्योतीर्विद्या आणि मुख्य म्हणजे हिंदू धार्मिक ग्रंथ यांचे अध्ययन करण्यासाठी संस्कृत भाषा शिकून आत्मसात करणे अत्यावश्यक होते. या कारणांमुळे ती भाषा रोजच्या संभाषणामध्ये वापरली जात नसतांनासुध्दा तिचे अध्ययन आणि अध्यापन चालत राहिले. हजारो वर्षे हे काम गुरूशिष्यपरंपरेतून होत राहिले. इंग्रजांचे राज्य आल्यानंतर त्यांनी सुरू केलेल्या शाळांमधील शिक्षणातदेखील संस्कृतचा अंतर्भाव करण्यात आला. आधीच्या लेखात मी लिहिले होते त्याप्रमाणे आधुनिक काळातल्या भारतीय भाषांवर संस्कृतचा इतका मोठा प्रभाव आहे की त्यांचा अभ्यास करतांनासुध्दा संस्कृत भाषेची थोडी ओळख असणे आवश्यक असते.

. . . . . . . . . . . (क्रमशः)

———————–

संस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे – भाग  ४

आदिमानवापासून आतापर्यंत माणसाचा कसा विकास होत गेला हे सांगणारे पाश्चात्य विद्वानांनी तयार केलेले मानववंशशास्त्र साफ खोटे आणि दिशाभूल करणारे आहे असे आपल्याकडले कांही विद्वान लोक नेहमी सांगत असतात. ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली तेंव्हाच अचाट सामर्थ्य, बुध्दीमत्ता आणि नीतीमत्ता यांनी युक्त असे महर्षी निर्माण केले आणि आपल्या चार मुखाद्वारे त्यांना चार वेद सांगितले. त्यात जगातील यच्चयावत सर्व ज्ञानाचा समावेश होता असे त्यांचे म्हणणे असते. हे ज्ञान संस्कृत भाषेमध्ये आहे आणि वैदिक वाङ्मय अपौरुषेय आहे. ते कोणा मर्त्य मानवाने लिहिले नसून साक्षात ब्रह्मदेवाने मौखिक रूपाने सांगितले आहे. अर्थातच त्यांच्या मते संस्कृत भाषेच्या बाबतीत उद्गम, विकास वगैरे टप्पे संभवत नाहीत. नंतरच्या काळातल्या अज्ञ लोकांसाठी पाणिनीने त्याचे व्याकरण फक्त संकलित केले. ब्रह्मदेवाने आपल्या देववाणीमध्ये सारे काही ज्ञान एकदम सांगितले, महर्षींना ते लगेच समजले आणि त्यांनी ते आपल्या शिष्यांना दिले. आजतागायत लागत असलेले सारे नवे शोध या महर्षींना आधीपासून अंतर्ज्ञानाने माहीत होते आणि त्यांनी संस्कृत भाषेत ते कुठेतरी लिहून ठेवलेले आहेत अशी काही लोकांची नितांत श्रध्दा असते आणि त्यावर कोणी शंका घेतलेले त्यांना खपत नाही.

संस्कृत ही भाषा फोनेटिक असल्यामुळे ती संगणकप्रणालीसाठी सर्वोत्तम आहे असे प्रशस्तीपत्रक फोर्बस या जागतिक संस्थेने दिले असल्याची अफवा मध्यंतरी पसरली होती आणि तसा उल्लेख आजसुध्दा वेळोवेळी केला जात असतो. आता त्याचा जोर जास्तच वाढला आहे. आजच्या सुपरकाँप्यूटरपेक्षा अनेकपटीने प्रभावी संगणक आपल्या पूर्वजांकडे असले पाहिजेत असा समजही त्यावरून करून दिला जात असतो. प्रत्यक्षात मात्र संस्कृतमध्ये प्रणाली असलेला संगणक अजूनपर्यंत जागतिक बाजारपेठेत आलेला नाही. त्या कामासाठी या दिव्य भाषेचा नेमका कसा उपयोग करून घ्यावा हे त्या क्षेत्रांमधील विशारदांना अजून समजले नसावे. पण यासाठी आता अमेरिका, जर्मनी वगैरे देशातल्या शाळाकॉलेजांमध्ये संस्कृत भाषेचा कसून अभ्यास चालला आहे, काही ठिकाणी तर तो सक्तीचा विषय केला गेला आहे असेही वारंवार सांगितले जाते. तिकडची मुले पाश्चात्य उच्चारांमध्ये एकादा श्लोक किंवा स्तोत्र म्हणत असल्याचे व्हीडिओ प्रसारित केले जातात, पण निदान मला तरी माझ्या लहानशा जगप्रवासात किंवा जगभर पसरलेल्या आप्तेष्टांकडून तशी माहिती कधीच मिळाली नाही.

काही लोकांना मात्र संस्कृत भाषेच्या भविष्याबद्दल आता चिंता वाटायला लागली आहे असे दिसते. त्यांच्या मनात निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या भावनांचे दर्शन खाली दिलेल्या परिपत्रकात दिसून येते. पाच वर्षांपूर्वीच निदान दहा बारा मित्रांकडून मला ईमेलने हा संदेश मिळाला होता. त्यानंतरही तो अनेक वेळा येत आला आहे. हा संदेश पाठवणाऱ्यातले काही जण उच्चविद्याविभूषित तसेच परदेशभ्रमण करून आलेले सुजाण आणि संतुलित विचार करणारेसुध्दा आहेत. त्यामुळे मी ते पत्रक स्पॅममध्ये न ढकलता लक्षपूर्वक वाचून पाहिले.
संदेश असा आहे:
“अवगत असलेल्या भाषा” मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा आणि पूर्ण जरी नाही तरी आजही आपण ती भाषा वापरतो. संध्याकाळी दिवेलागणीला म्हंटली जाणारी स्त्रोत्रे किंवा गणपतीच्या दिवसात होणारी सहस्त्र आवर्तने अगदी देवाच्या पूजेत किंवा लग्नात म्हंटले जाणारे मंगलमय श्लोक सगळे आपल्याला माहिती आहेत काही पाठ आहेत. हि भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे. कारण मागील सर्वेक्षणात संस्कृत माहिती असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे आणि त्यामुळे तिला मृत भाषा घोषित केले जावू शकते. उलटपक्षी अरबी, फारसी माहिती असलेले लोक बरेच जास्ती आहेत कारण काही राज्यात अगदी ठरवून ह्या भाषा पत्रकात भरल्या आहेत. मृत भाषा घोषित झाली की त्या भाषेच्या उत्कर्षासाठी कुठलाही निधी दिला जात नाही. आणि मग आपली ही पुरातन आणि पवित्र भाषा कायम स्वरूपी काळाच्या पडद्याआड जाईल. तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या भाषेला जिवंत ठेवू शकतो. आज आपल्याच भाषेवर ही वेळ येण्यास आपण सगळेच जबाबदार आहोत पण अजून वेळ गेली नाही.
जर तुम्हाला हा विचार पटत असेल तर जरूर आपल्या मित्रांना सुद्धा सांगा”

हजार वर्षांचा मुसलमानी अंमल आणि दीडदोनशे वर्षांचे इंग्रजांचे राज्य या अत्यंत प्रतिकूल काळात टिकून राहिलेली प्राचीन संस्कृत भाषा आज केवळ सरकारी निधीच्या आधारावर जीवंत असावी, जनगणनेमध्ये ही भाषा अवगत असलेल्या लोकांची संख्या कमी झाली की सरकार तिला मृत घोषित करेल आणि त्यानंतर ती कायमची नष्ट होईल. वगैरे जे चित्र यात सूचित केले आहे त्यातले मला तरी काहीही तर्कसंगत वाटत नसल्यामुळे मी त्या पत्रकाचा पुढे प्रसार केला नाही. संस्कृत भाषेच्या प्रेमापेक्षा अवांतर मुद्दे उपस्थित करून तत्कालिन राज्यकर्ते आणि काही इतर लोक यांच्याबद्दल लोकांच्या मनात अढी निर्माण करणे हा त्यामागचा उद्देश असावा असे दिसते. संस्कृत भाषा खरोखरच नष्ट होण्याची भीती ज्यांना वाटत असेल आणि तसे होऊ नये असे वाटत असेल तर त्यांनी ती स्वतः शिकावी आणि इतरांना शिकवावी. पण ते काम महाकठीण आहे. अनेक लोकांनी जनगणनेत संस्कृत ही आपल्याला अवगत असलेली भाषा आहे असे (ती नसतांना जाणूनबुजून चुकीचे) लिहिले की काम झाले असे नाही. ती भाषा शिकवणारे आणि शिकण्याची इच्छा बाळगणारी माणसे त्यासाठी असायला हवीत. ती आता झपाट्याने कमी होत चाललेली आहेत. हे या भाषेवरील खरे संकट आहे. भविष्यकाळात पुन्हा एकदा संस्कृत ही सर्वसामान्य दैनिक संभाषणाची भाषा बनण्याची शक्यता मला तरी दिसत नाही. एक प्राचीन भाषा हीच तिची ओळख राहणार आहे. आज ती किती लोकांना अवगत आहे याचा त्यात कुठे संबंध येत नाही. भविष्यकाळातील लोकांना प्राचीन काळाबद्दल आस्था उरली नाही तर त्याला काही इलाज नाही. समाजाच्या ज्या वर्गामध्ये या परिपत्रकाचा प्रसार होत आहे त्यातील काही जणांची मुले परदेशात स्थाईक झाली आहेत. त्यांच्या बाबतीत ही आशंका खरी ठरण्याची भीती मात्र अधिक प्रमाणात असणार.

. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

———————

संस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे –  भाग ५

प्रत्येक जीव त्याच्या आधीच्या अनेक जन्मांमध्ये केलेल्या कृत्यांपासून मिळवलेल्या पापपुण्याचे ‘पूर्वसंचित’ बरोबर घेऊन येतो आणि त्याचा प्रभाव त्याच्या सध्याच्या जीवनावर पडतो असे म्हणतात. अनेक अगम्य, अनाकलनीय अशा गोष्टींचे स्पष्टीकरण त्यावरून दिले जाते. एकाद्या माणसाला अमूक एक गोष्ट का मिळाली किंवा दुसऱ्या एकाद्याचे कशामुळे नुकसान झाले याचे नक्की कारण कधी कधी समजत नाही. अशा वेळी “पहिल्याने पूर्वजन्मात काहीतरी चांगले करून ठेवले असावे” किंवा “दुसऱ्याने काहीतरी वाईट कृत्य केले असेल” असे कधी गंभीरपणे किंवा कधी विनोदाने सांगितले जात असते. याला हिंदूधर्मशास्त्राची मान्यता असेल, पण वैज्ञानिक दृष्ट्या पाहता पूर्वसंचिताच्या संकल्पनेला शास्त्रीय आधार नाही.

आईवडिलांचे काही गुण त्यांच्या अपत्यांमध्ये येतात असे दिसते. यावरून “खाण तशी माती” अशी म्हणसुध्दा पडली आहे. जनुकांच्या माध्यमातून हे गुणदोष पुढील पिढीला दिले जातात हे शास्त्रीय संशोधनातूनसुध्दा सिध्द झाले आहे. पण आई किंवा बापाकडून कोणती आणि किती गुणसूत्रे, जनुके वगैरे त्यांच्या अपत्यांकडे जावीत आणि त्यांचे नेमके कोणते गुण किंवा दोष त्यांच्या मुलांनी किती प्रमाणात उचलावे वगैरे गोष्टी अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत. हे सगळे कसे आणि कशामुळे ठरते ते समजलेले नाही. शास्त्रज्ञांना या बाबतीत अजून फारसे सविस्तर ज्ञान प्राप्त झालेले नाही.

वरील दोन गोष्टी वगळता जन्माला आलेल्या प्रत्येक बालकाच्या मनाची पाटी पूर्णपणे कोरी असते. आजूबाजूला दिसत असणारे आकार, त्यांच्या हालचाली ते पहात असते, ध्वनी ऐकत असते आणि त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असते. जसजशी त्याची आकलनशक्ती वाढत जाते, तसतसा त्याला त्या गोष्टींचा बोध होत जातो. ते त्यातून भराभरा शिकत जाते, चालायला, बोलायला लागते, प्रश्न विचारू लागते. लिहायला, वाचायला शिकल्यानंतर ते पुस्तकातले ज्ञान मिळवायला लागते. लहान मुलांची वाढ होत असतांना अधिकाधिक शिकण्याचा प्रयत्न ती मुले करत असतातच, शिवाय त्यांचे पालक, शिक्षक आणि इतर वडीलधारी मंडळी त्यांना काही गोष्टी समजावून सांगतात, शिकवतात, त्यांच्याकडून करवून घेतात. या सगळ्यांमधून त्यांच्यात जो फरक पडत असतो त्याला मराठी भाषेत ‘संस्कार’ असे नाव दिले गेले आहे.

‘निसर्गनिर्मित गोष्टींचे मूळ स्वरूप कायम ठेवून त्यात माणसाने केलेले बदल’ म्हणजे त्यावर केले गेलेले ‘संस्कार’ असे समजले जाते. उदाहरणार्थ शेंगदाणे भाजले किंवा तळले तर ते संस्कार झाले. त्याची कुटून तिखट चटणी किंवा गोड वड्या केल्या तर ते संस्कारामध्ये येत नाही, त्याच्या पलीकडे जाते अशी माझी समजूत आहे. माणसाच्या बाबतीत त्याच्या मनावर संस्कार केले जातात. त्यातून त्याचा स्वभाव, त्याची वागणूक वगैरेवर प्रभाव पडतो. हुषार माणूस गरज पडेल तेंव्हा ठरवून कृत्रिम रीतीने वेगळे वागू शकतो किंबहुना तो तसे करतच असतो, पण ज्या गोष्टी त्याच्या नकळत तो करत असतो त्यांच्या मुळाशी त्याच्या अंगातले उपजत गुण असतात, तसेच त्याच्या मनावर झालेले संस्कार असतात. लहानपणी मनावर झालेले संस्कार इतके खोलवर रुजलेले असतात की ते त्या माणसाच्या व्यक्तीमत्वाचा भाग बनून जन्मभर त्याच्या सोबत राहतात. ते पुसण्यासाठी त्याला खूप प्रयत्न करावे लागतात.

संस्कार हा शब्द सर्वसाधारणपणे चांगल्या अर्थाने वापरला जातो. कोणतेही पालक किंवा शिक्षक सहसा मुद्दामहून मुलांना वाईट मार्गाला लावणार नाहीत. पण ती लागली तर बहुतेक वेळी त्यालासुध्दा वाईट संगत हे कारण दाखवले जाते. ‘चांगले’ आणि ‘वाईट’ या शब्दांचे अर्थ निरनिराळ्या परिस्थितींमध्ये वेगळे निघतात. खूप श्रीमंत कुटुंबांकडे स्वयंपाकपाणी करण्यासाठी नोकरचाकर असतात. घरातल्या प्रत्येक माणसाने त्याला आवडेल तो पदार्थ यथेच्छ खावा आणि त्याला तो कमी पडता कामा नये असा हुकूम असल्यामुळे ढीगभर अन्न शिजवले जाते आणि घरातल्या माणसांची जेवणे झाल्यानंतर उरलेल्या अन्नाचे काय होत असेल याची फिकीर कोणीही करत नाही. अशा वातावरणात वाढलेल्या मुलांच्या मनावर तसेच संस्कार होतात, त्यांना तशाच संवयी लागतात. याउलट दरिद्री माणसांच्या घरात अन्नाचा प्रत्येक कण मोलाचा समजला जातो आणि वाया जाऊ दिला जात नाही. मध्यमवर्गीयांची अन्नान्नदशा नसली तरी ती होऊ नये म्हणून “पानात वाढलेले अन्न संपवलेच पाहिजे”, “शिजवलेले सारे अन्न खाल्ले गेले पाहिजे” वगैरे शिकवण दिली जाते. शरीराला आवश्यकता नसतांना खाल्ले गेलेले जास्तीचे अन्न अपायकारक असते आणि तेसुध्दा एक प्रकारे वायाच जाते हे अनेक लोकांना कळले तरी वळत नाही. याला कारण लहानपणी मनावर झालेले संस्कार ! यातले कोणते संस्कार चांगले आणि कोणते वाईट याबद्दल वेगवेगळी मते असू शकतात.

पूर्वीच्या काळी रूढ असलेल्या एकत्र कुटुंबांमध्ये आजोबापणजोबा आणि आज्यापणज्यांपासून नातवंडे पणतवंडांपर्यंत खूप माणसे एकत्र रहात असत. त्यांनी आपसात भांडणतंटा न करता सामंजस्याने रहावे यासाठी घराघरात एक प्रकारची शिस्त पाळली जात असे. लहानपणापासूनच प्रत्येकाने ती अंगात भिनवावी या दृष्टीने मुलांच्या व मुलींच्या मनावर विशिष्ट प्रकारचे संस्कार प्रयत्नपूर्वक केले जात असत. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय करायचे आणि ते कसे करायचे याचे नियम असत. परवचे आणि श्लोक वगैरेचे पाठांतर करून घेतले जात असे. प्रामाणिकपणा, विनम्रता, आज्ञाधारकपणा वगैरेंसारखे गुण शिकवले जात असत. त्यात आज्ञाधारकपणा हा सर्वात मोठा गुण समजला जात असे. मोठ्या माणसांनी सांगितलेले सर्व काही निमूटपणे ऐकून घ्यायचे, वर तोंड करून त्यांना उलट उत्तरे द्यायची नाहीत, त्यांची चूक काढायची नाहीच, त्यांच्या सांगण्याबद्दल शंकासुध्दा व्यक्त करायची नाही वगैरे बाबींचा थोडा अतिरेक होत असावा असे मला आता वाटते. सुमार वकूब असलेल्या मुलांसाठी ते ठीक असेलही, पण स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घेण्याची क्षमता आणि कल्पकता यांच्या वाढीमध्ये त्या प्रकारच्या संस्कारांचा अडथळा येत असे. संयुक्त कुटुंब पध्दतीच आता मोडीत निघाली आहे आणि टेलिव्हिजनच्या प्रसारामुळे मुलांना लहानपणापासूनच बाहेरच्या जगात काय चालले आहे हे समजू लागले आहे. त्यामुळे कळत नकळत त्यांच्या मनावर होणारे संस्कार आता बदलले आहेत.

माणसाच्या जन्माच्याही आधीपासून ते मृत्यू होऊन गेल्यानंतरसुध्दा त्याच्यासाठी काही धार्मिक विधी केले जात असत. गर्भसंस्कारांपासून ते अंत्यसंस्कारापर्यंत करण्यासाठी अनेक संस्कार सांगितले गेले आहेत. जीवनाच्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर परमेश्वराचे स्मरण करून त्याचे आशीर्वाद घ्यावेत आणि पुढील गोष्टी सुरळीतपणे पार पडोत अशी प्रार्थना त्या संस्कारांच्या प्रसंगी उच्चारण्यात येणाऱ्या मंत्रांमध्ये समाविष्ट आहेत. त्यांच्याबरोबर विशिष्ट विधी करण्याची रूढी पडली होती. ते संस्कार केल्यामुळे काही प्रमाणात त्या व्यक्तीच्या ऐहिक किंवा पारलौकिक जीवनात चांगला फरक पडतो असे समजले जात असे. पण बदललेल्या परिस्थितींमध्ये त्यांना अर्थ उरला नाही आणि श्रध्देची जागा बऱ्याच प्रमाणात तर्कसंगत विचाराने घेतली गेली असल्याने या परंपरा आता मागे पडत चालल्या आहेत.

संस्कार हा प्रकार वैश्विक आहे. स्थळकाळानुसार त्यांचा तपशील वेगळा असतो. चांगले संस्कार लाभलेला भारतीय मुलगा आल्यागेल्या मोठ्या माणसाच्या पाया पडून त्याला नमस्कार करेल, इंग्रज मुलगा हस्तांदोलन करून त्याची विचारपूस करेल किंवा “त्याची सकाळ, संध्याकाळ, किंवा रात्र चांगली जावो” अशी लांबण न लावता फक्त “गुड मॉर्निंग, गुड ईव्हनिंग, गुड नाईट” असे काही तरी उच्चारेल. जाता येता सारखे “थँक्यू, सॉरी” वगैरे म्हणणे हा देखील तिकडच्या संस्कारांचाच भाग आहे. आधुनिक काळात हे संस्कारसुध्दा आपल्याकडील मुलांवर केले जात आहेत. कधी कधी ज्या स्वरांमध्ये ते शब्द म्हंटले जातात त्यात तो भाव मुळीसुध्दा दिसत नाही. कारण ते शब्द केवळ संवयीने उच्चारलेले असतात. त्यांचा अर्थ त्यात अपेक्षित नसतो आणि कोणी तो लावायचा प्रयत्नसुध्दा करत नाही.

इतर भाषिकांशी संवाद साधतांना माझ्या असे लक्षात आले की आपण ज्याला पूर्वसंचित म्हणतो त्याला काही लोक संस्कार म्हणतात आणि अनेक पूर्वजन्मांमधील संस्कार या जन्मावर परिणाम करत असतात असा दावा करतात.

. . . . . . . . . . . . . (क्रमशः)

—————————–

संस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे – भाग ६

‘संस्कृती’ हा शब्द निदान एकदा तरी वाचनात आला नाही किंवा कानावर पडला नाही असा एक दिवससुध्दा जात नसेल. तो शब्द आता आपल्या अगदी अंगवळणी पडला आहे, किंवा घासून गुळगुळीत झाला आहे. ‘भारतीय संस्कृती’चे संरक्षक उदंड झाले आहेत. ती महान प्राचीन संस्कृती आता कशी पार लयाला चालली आहे याचे रडगाणे ते निरनिराळ्या मंचांवरून सारखे ऐकवत असतात. शिवाय ‘ऑफिसातली संस्कृती’, ‘घरातली संस्कृती’, त्यात पुन्हा ‘माहेरची संस्कृती’ आणि ‘सासरची संस्कृती’, ‘कट्ट्यावरची संस्कृती’, ‘गुत्त्यावरली संस्कृती’, ‘रक्षकदलाची संस्कृती’, ‘रिक्षावाल्यांची संस्कृती’ असल्या अगणित प्रकारच्या संस्कृतींनी आपल्याला वेढून ठेवले आहे.

मी लहान असतांना ‘संस्कृती’ या शब्दाचे इतके मुबलक प्रचलन झालेले नव्हते. प्राचीन काळातल्या इतिहासात ‘मेसापोटेमिया’ नावाच्या अनोख्या देशातल्या ‘युफ्रेटिस आणि टायग्रिस’ नावांच्या नद्यांच्या काठी ‘बाबिलोनियन’ नावाची संस्कृती होऊन गेली म्हणे. यातल्या एका अक्षरालाही आमच्या दृष्टीने कणभर महत्व वाटायचे कारण नव्हते. पूर्वीच्या आपल्याच देशातल्या पण आता पाकिस्तानात गेलेल्या ‘मोहेंजोदारो आणि हडप्पा’ गावांजवळ केलेल्या उत्खननात मातीच्या ढिगाऱ्यांच्या खाली जुनी घरे मिळाली आणि त्यात खूप पूर्वीच्या काळचे खापरांचे तुकडे आणि दगडाच्या ओबडधोबड आकृत्या सापडल्या. ती ‘सिंधू नदी संस्कृती’ होती. पुस्तकात छापलेली त्यांची चित्रे पाहून त्या वयात मला तरी त्यांचे जरासुध्दा कौतुक वाटले नाही. पाच मार्कांचे वर्णन आणि जोड्या जुळवा, गाळलेल्या जागा भरा यासारखे दोन तीन मार्कांचे इतर प्रश्न परीक्षेतल्या प्रश्नपत्रिकेत असत यापलीकडे आमच्या लेखी त्या संस्कृतींना काडीचे महत्व नव्हते.

इतिहासाच्या मध्ययुगीन काळात भारतावर आक्रमण करून आलेले मुसलमान बादशहा आपल्या संस्कृतीला सोबत घेऊन आले म्हणे. त्यांच्यात पुन्हा अरब, फारशी, पठाण, तुर्की वगैरे भेद होते. त्यांची भाषा, धर्म, आचार विचार, अन्न, कपडे, कलाकौशल्य वगैरे अनेक गोष्टींचा समावेश त्यांच्या संस्कृतींमध्ये होता. त्यांच्या आधी आलेले हूण, कुषाण वगैरे लोक आपापल्या संस्कृती विसरून गेले होते तसे मुसलमानांनी केले नाही. पुढील काळात इंग्रज लोक एक वेगळीच संस्कृती इकडे घेऊन आले. त्यांनी तिचा प्रसार चालवला. शिवाय हिमालयापासून हिंदी महासागरापर्यंत पसरलेल्या भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये निरनिराळ्या भाषा, चालीरीती, अन्नपदार्थ वगैरे प्रचलित होत होतेच. यातील वैविध्याची हळूहळू ओळख होत गेली. वेळोवेळी शाळेत होत असलेल्या ‘सांस्कृतिक’ कार्यक्रमांमध्ये नाचगाणी, नाटुकल्या, नकला वगैरे होत असत. वाचनाची आवड निर्माण झाल्यानंतर होत असलेल्या अवांतर वाचनामध्ये ‘भारतीय संस्कृती’, ‘मराठमोळा संस्कृती’ वगैरे शब्द यायला लागले. आणखी पुढे गेल्यावर ‘अनेकतामें एकता’ हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट आहे असेही वाचले. त्याबद्दलचा मनातला गोंधळ वाढतच गेला. “संस्कृती संस्कृती म्हणतात ते काय असते रे भाऊ?” असे विचारावे असे वाटत राहिले होते. पण याचे समर्पक उत्तर कोण देणार हे त्यावेळी समजत नव्हते.

‘दिसामाजी कांहीतरी’ या ब्लॉगवर एक लेख वाचला होता. तो या विषयावरला माझ्या वाचनात आलेला पहिलाच लेख होता. त्यातले विचार मला बरेचसे माझ्या विचारांशी जुळण्यासारखे दिसले म्हणून लेखकाच्याच शब्दात थोडक्यात देतो. पुढे त्याने काय लिहिले आहे हे मुळात वाचायला हवे.
“काळानुसार जसा जसा माणसाचा दृष्टीकोन व्यापक होत गेला तशी तशी संस्कृतीची व्याख्या पण बदलत गेली. कोणत्याही गोष्टीची व्याख्या करायची म्हटले कि त्यासाठी काही मेझरेबल क्वाण्टीटीज लागतात पण अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मेझरेबल नसतात. त्यातलीच एक म्हणजे संस्कृती. ….. सर्वसाधारणपणे आजच्या घडीला ज्या काही वेगवेगळ्या व्याख्या आहेत त्यातले सर्वमान्य घटक म्हणजे – मानवता, कला, ज्ञान, श्रद्धा, सामाजिक अनुसरण, वृत्ती आणि मूल्य…
जेव्हा एखादी संस्कृती लयाला जाते म्हणजे नेमके काय होते? तर वर उल्लेखिलेल्या गोष्टी अस्तास जातात. बऱ्याचदा ती नष्ट होत नाही तर बदलत जाते. बाह्यतः आणि आत्मतः पण. पूर्वीची मूल्ये बदलतात, लोकांचा विचार बदलतो… आता असे म्हणू का कि म्हणून संस्कृती बदलली? संस्कृती ही काही थोड्या-फार बदलाने कुठे जात नसते. असे म्हणायचे कोण धाडस करेल कि संस्कृती बदललीच नाही? बदलली ना…पण असे कोण म्हणेल कि संस्कृती नष्ट झाली??? कोणीही नाही. भाषा, कपडे, समज, नीती, मुल्ये, आचार-विचार यांची उत्क्रांती होत गेली. त्यामुळे ही गोष्ट प्रवाही आहे.”

मला असे वाटते की सध्या वापरात असलेला ‘संस्कृती’ हा शब्दच मुळात परका असावा. ‘सिव्हिलायझेशन’ आणि ‘कल्चर’ या दोन वेगवेगळ्या आंग्ल शब्दांना मराठी प्रतिशब्द म्हणून कोणा भाषापंडिताने ‘संस्कृती’ हा एकच शब्द निवडला आणि त्या दोन्ही इंग्रजी शब्दांचे निरनिराळे अर्थ त्याला चिकटले.

. . . . . . . . . . . . . (क्रमशः)

————————

संस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे –  भाग७ (अंतिम)

संस्कृतीची एक अत्यंत सोपी व्याख्या मला कॉलेजात असतांना मिळाली होती आणि ती अजून माझ्या लक्षात राहिली आहे. निसर्गनिर्मिति म्हणजे ‘प्रकृति’, त्यातली सुधारणा ही ‘संस्कृति’ आणि बिघाड म्हणजे ‘विकृति’ अशा त्या व्याख्या होत्या. संस्कृति या संस्कृत भाषेमधील शब्दाचा मूळ अर्थ कदाचित तसा असावा. माणसांच्या बाबतीत पाहिल्यास बालकात असलेला निरागस मनमौजीपणा ही त्याची प्रकृती, मोठे होतांना अंगात बाणवलेली संयमी आणि परोपकारी वृत्ती वगैरे संस्कृती आणि मनात भिनलेला दुष्टपणा, क्रौर्य ही विकृती असे मी समजत आलो आहे. संस्कृति हा शब्द मराठी भाषेत बोलला जातांना मला तरी ‘संस्कृती’ असाच ऐकू येतो. यामुळे मी तो तसा लिहिला आहे. वर लिहिल्याप्रमाणे आज त्याला इतर काही अर्थ चिकटले आहेत.

वन्य पशूंप्रमाणे अन्नाच्या शोधात रानोमाळ भटकत फिरणारे आदिमानव एका जागी राहून शेती, पशुपालन, उद्योगधंदे वगैरे करू लागले, रानटी टोळ्यांचे रूपांतर सभ्य समाजात झाले हा सिव्हिलायझेशनचा भाग होता. मिळालेल्या स्थैर्याचा फायदा घेऊन त्यांनी साहित्य, संगीत, कला आदिमध्ये प्रगती करून आपल्या जीवनाचा स्तर उंचावला हे कल्चरमध्ये येते. भाकरी व फूल याविषयीच्या एका सुप्रसिध्द जुन्या चिनी उक्तीचा आधार घेतला तर सिव्हिलायझेशनचा संबंध मुख्यतः भाकरीशी आणि कल्चरचा फुलाशी होता. धर्म, न्याय, विज्ञान, तंत्रज्ञान आदि गोष्टींची गरज आणि उपयुक्तता दोन्ही बाबतीत होती. संस्कृतीच्या आजच्या कक्षा इतक्या रुंदावल्या आहेत की या सगळ्यांचा समावेश त्यात केला जातो.

देश, वंश, भाषा, धर्म वगैरेंबरोबर चालीरीती, रूढी वगैरे बदलत असतात. जाती, पोटजातींमध्ये सुध्दा काही बाबतीत त्या वेगळ्या असतात. कधीकधी त्यावरून ‘त्यां’ची संस्कृती वेगळी आहे असे म्हंटले जाते तर कधीकधी “थोडा फरक असला तरी तेसुध्दा मराठीच किंवा भारतीयच आहेत” असेही सांगतात. आपल्यातलाच एकादा माणूस जेंव्हा धक्कादायक पध्दतीने वागतो तेंव्हा “त्यांच्या घरातले सगळे असलेच आहेत.” असे म्हणून त्यांच्या घरापुरती एक वेगळी संस्कृती असल्याचे दाखवले जाते. दोन समाजांमधला फरक किती सेंटीमीटर किंवा अंशांपेक्षा अधिक असल्यास त्यांच्या संस्कृती वेगळ्या आहेत असे समजावे असे त्याचे मोजमाप नाही. प्रत्येकजण वेळोवेळी निरनिराळ्या फूटपट्ट्या वापरतांना दिसतो.

संस्कृति या विषयावर आंतरजालावर उत्खनन करतांना एक धागा सापडला. विशेषतः वैदिक संस्कृतीचा मला काहीच गंध नव्हता. तिच्याबद्दल कुतूहल असल्यामुळे वाचून पाहिला. त्यात असे लिहिले आहे.
“वैदिक संस्कृति ही आजच्या भारतीय संस्कृतीहून मी निराळी समजतो. आज एकंदर सव्वाशे संस्कृति जगतीतलावर प्रतिष्ठित आहेत असे तज्ज्ञ मानतात. वैदिक संस्कृति ही त्या ‘अनेकातली एक’ संस्कृति नव्हे. सर्व संस्कृतींना अधिष्ठानभूत असणारी जी एक संस्कृति तिचे नाव वैदिक संस्कृति असे आहे. एखाद्या कालखंडापुरती, स्थल-विशेष-निष्ठ अशी ही संस्कृति नव्हे. डॉ.स्पेंग्लर या सुप्रसिद्ध जर्मन पंडिताने सुचविलेले संस्कृतीचे नियम व अनु्क्रम वैदिक संस्कृतीला लागू होत नाहीत. जणू काय जायते, अस्ति, वधते, विपरिणमते, अपक्षीयते, विनश्यति हे षड्‍-विकार प्रत्येक संस्कृतिला अनिवार्य आहेत, असे स्पेंग्लर म्हणतो. प्रत्येक संस्कृति ही एक सजीव प्रकृति (Organism) आहे व वरील अवस्थांमधून जाणे तिला अपरिहार्य आहे. भारतीय संस्कृति ही विनाशोन्मुख झाली आहे, असेही त्याचे एक विधान आहे. ते अल्प अर्थाने खरेही असेल. पण वैदिक संस्कृति ही अमर आहे, हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे.
वैदिक संस्कृति ही आदर्श संस्कृति होय. प्रज्ञान, समता, विश्वाचे ईशावास्यत्व हे वैदिक संस्कृतिचे व्यावर्तक त्रैगुण्य आहे. ज्या संस्कृतीत ही वैशिष्ट्ये आहेत ती संस्कृति वैदिक संस्कृतीची प्रतिनिधी आहे. मानवकुल एक आहे. मानवी संस्कृति एकच आहे. आचारविचारांच्या गौण वैशिष्ट्यांमुळे निष्पन्न होणारी सांस्कृतिक विविधता ही मूलभूत एकात्मतेला संपन्नता आणणारी आहे, नष्ट करणारी नव्हे.”
– धुं. गो. विनोद
वैदिक संस्कृति किती महान होती हे वर्षानुवर्षे ऐकत आलो आहोतच. तिलाच प्राचीन भारतीय संस्कृती म्हणतात असे वाटले होते. तिच्या स्वरूपाबद्दल किंवा वैशिष्ट्यांबद्दल मला तरी या लेखातून काहीही बोध झाला नाही. ती आपण स्वतःच अजरामर असल्यामुळे कोणीही तिची काळजी करण्याचे कारण नाही इतके समजले.

संस्कारांमुळे चांगला बदल होतो. या अर्थानेच ‘संस्करण’ हा शब्द शोधून काढला असावा किंवा निर्माण केला गेला असावा. पुस्तकाच्या ‘एडिशन’ साठी ‘आवृत्ती’ हा शब्द प्रचलित आहे. पण आवृत्ती म्हणजे ती जशीच्या तशी ‘पुनरावृत्ती’ असावी असे वाटते. पूर्वीच्या आवृत्तीमधल्या चुका दुरुस्त कराव्या, पुस्तकाचे रूप अधिक आकर्षक आणि वाचनीय करावे वगैरे उद्देशाने नव्या आवृत्तीमध्ये बदल केले जात असतात. त्यामुळे ‘सुधारलेली आवृत्ती’ असेही लिहिले जाते. एडिट करण्याच्या क्रियेला संपादन असेही म्हणतात. हिंदी भाषेतील पुस्तकांच्या नव्या एडीशनला ‘संस्करण’ म्हणतात. मला हा शब्द जास्त समर्पक वाटतो. ज्या काळात संस्कृत भाषा बोलली जात असे त्या काळात छापखाने नव्हते आणि ग्रंथांच्या प्रती हातानेच काढाव्या लागत असत. त्या तंतोतंत असण्याची काळजी घेत असत. त्या काळात या दृष्टीने संस्करण या शब्दाला अर्थ नव्हता. त्यामुळे तो शब्द प्रचारात तरी होता की नाही कुणास ठाऊक. असलाच तर त्याचा त्या काळातल्या संदर्भात निराळा अर्थ असण्याची शक्यता आहे.

संस्कृत, संस्कृति किंवा संस्कृती, संस्कार आणि संस्करण या शब्दांशी माझा जेवढा अल्पसा संबंध आला त्यावरून एवढे लिहून ही लांबलेली मालिका संपवत आहे.

. . . . . . . . . . . . . . . . . (समाप्त)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: