बाराचा महिमा आणि …. भाव

मुलाचा जन्म झाल्यापासून बारावे दिवशी त्याचे बारसे करतात. बाराव्या दिवशी त्याचे नामकरण करण्यासाठी मुहूर्त पहावा लागत नाही म्हणून त्या दिवशी बारशाचा समारंभ करतात असे म्हणतात. आतासारखी सगळ्या प्रकारच्या मुहूर्तांची माहिती देणारी जाडजूड छापील पंचांगे पूर्वीच्या काळात मिळत नसत. ज्योतिषविद्या जाणणाऱ्या कोणा विद्वानाने आधी बाळाची जन्मतिथी, वेळ, प्रहर वगैरे पाहून त्याची पत्रिका तयार करायची आणि त्यातली राहू, केतू, शनि, मंगळ वगैरेंची स्थाने पाहून त्याच्या कुठल्याही शुभकार्यासाठी मुहूर्त काढायचा हे जरा अवघड असेल.

नुकतेच जन्माला आलेले बाळ फारच नाजुक असते आणि त्याची आईसुध्दा अशक्त झालेली असते. त्यांच्याकडे सगळे लक्ष पुरवून त्यांना संपूर्ण विश्रांती देणे अत्यंत आवश्यक असते, शिवाय त्या वेळेस जंतुसंसर्गाचा धोका जास्त आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे ते टाळणे गरजेचे असते. अशा कारणांमुळे लगेच घरात कुठल्याच प्रकारच्या समारंभाची धांदल असणे उचित नसते. पूर्वीच्या काळात घरात नवीन मूल जन्माला आल्यास सोयर किंवा सोहेर पाळले जात असे. चार दिवस निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर पाचवे दिवशी त्या बाळासाठी जिवतीमातेची पूजा केली जात असे. यावरूनच “अगदी सुरुवातीपासून असलेली गोष्ट” या अर्थाने ‘पाचवीला पूजलेली’ हा वाक्प्रचार पडला. त्यानंतर आणखी आठवडाभराने बारशाचा समारंभ केला जात असे. तोपर्यंत बहुतेक बाळे आणि बाळंतिणींच्या तब्येती सुरळीत झालेल्या असत. त्यांच्या सगळ्या वैद्यकीय तपासण्या करून त्यांना फिटनेस सर्टिफिकेट देऊ शकणारे डॉक्टर त्या काळात नसायचे. अनुभवी शहाण्या लोकांच्या विचारावरून बाराव्या दिवशी बारसे करण्याची प्रथा पडली. बारा हा आकडा अशा प्रकारे जन्मापासूनच आपल्या जीवनात येतो.

पुढे त्या बाळाचा दर महिन्याला वाढदिवस होत राहतो. असे बारा महिने झाल्यावर मासिक वाढदिवस थांबतात आणि वार्षिक सुरू होतात. आकाशातल्या सूर्य आणि चंद्र यांच्या निरीक्षणामधून वर्ष आणि महिने यांच्या द्वारे कालगणना करणे सुरू झाले. त्यामुळे एका वर्षात बारा महिने असणे हे सूर्यचंद्रांनी ठरवले. बहुधा त्यावरून प्रेरणा घेऊन आकाशामधील तारकापुंजांचे बारा गट करून आकाशगोलाची बारा राशींमध्ये विभागणी करण्यात आली. दिवस आणि रात्र यांचेही बारा बारा भाग करून दिवसाची विभागणी चोवीस तासांमध्ये केली गेली. एकपासून चोवीसपर्यंतचे इतके सगळे आकडे पटकन समजणे आणि लक्षात ठेवणे थोडे कठीण असल्यामुळे घड्याळांच्या डायलची रचना करतांना त्यात फक्त बाराच तास दाखवले गेले. दिवस आणि रात्र यांच्यातला फरक उघड असल्यामुळे घड्याळात पाहून अकरा किंवा चार वाजलेले दिसले तर त्या वेळी ते दिवसाचे की रात्रीचे हे सांगण्याची सहसा गरज नसते. आपले जीवन आजकाल घड्याळाशी बांधले गेले आहे आणि त्यातला बाराचा आकडा सारखा आपल्या नजरेसमोर येत राहतो.

माझ्या लहानपणी प्राथमिक शालेय शिक्षण हे अक्षरे आणि अंक यांच्या ओळखीपासून सुरू होऊन त्यातच बराच काळ रेंगाळत असे. आधी अक्षरे, शब्द, वाक्यरचना वगैरेंमधून भाषा साधारणपणे समजायला लागल्यानंतर त्या भाषेतून इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान यासारखे विषय शिकवावेत असा विचार त्यात होता आणि माझ्या मते तो बरोबर होता. अक्षरओळखीमध्ये अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः हे बारा स्वर आणि कखगघङ पासून षसहळक्षज्ञ पर्यंत सगळी व्यंजने शिकून झाल्यावर ककाकिकीकुकूकेकैकोकौकंकः ही बाराखडी आणि त्यानंतर किंवा तिच्या सोबतीने ख ग घ वगैरे इतर व्यंजनांच्या बाराखड्या गिरवल्या जात. निदान दोन वर्षे तरी मी स्लेटच्या पाटीवर सगळ्या बाराखड्या गिरवल्या आहेत. या बाराखड्या गिरवून गिरवून त्यातील प्रत्येक अक्षराचा आकार डोळ्यात बसला की कोठलाही शब्द पटकन वाचता किंवा लिहिता येतो. त्यानंतर अर्थ समजो वा न समजो, कुठलेही वाक्य, उतारा किंवा पान वाचायला अडचण येत नाही. बाराखड्यांच्या गिरवण्यामधून बारा हा शब्द आणि अंक मनावर खोलवर खोदला गेला.

आतासुद्धा मराठी किंवा हिंदी शिकतांना बाराखड्या शिकाव्या लागतातच, शिवाय शालेय शिक्षणात दहावी आणि बारावी हे मोठे टप्पे झाले आहेत. कॉलेजात पदार्पण करण्यासाठी बारावीमध्ये चांगले मार्क मिळणे आवश्यक असल्यामुळे मुलगा (किंवा मुलगी) बारावीला आला की घरातले सगळे वातावरण ढवळून निघते आणि बारा महिने तसे सुपरचार्ज्ड अवस्थेत राहते. तो बारावीचा विद्यार्थी म्हणजे घरातली सर्वात महत्वाची व्यक्ती बनून जाते आणि बाकी सगळ्यांनी आधी त्याची सोय पहायची असे ठरते.

इंग्रज लोकांना बारा हा आकडा फारच आवडत असावा. आता त्यांनीही दशमान पध्दत अंगिकारली असली तरी त्यांच्या पूर्वीच्या चलनात १२ पेन्स म्हणजे एक शिलिंग असायचा. त्यावरूनच त्यांनी भारतात सुरू केलेल्या चलनात सुध्दा बारा पै म्हणजे एक आणा असायचा. पै या नाण्याचा उपयोग माझ्या आजोबांच्या काळात होत असे. आता पै हे फक्त एक आडनाव राहिले आहे. लांबीरुंदी मोजण्यासाठी असलेल्या परिमाणात बारा इंचांचा एक फूट असतो. आता इंग्रजांनी मेट्रिक पध्दत स्वीकारली असली तरी अमेरिकन लोक अजूनही फूटपट्ट्या वापरतात. अजूनही सगळीकडे बारा नगांना एक डझन म्हणतात. होमिओपाथी या चिकित्सापध्दतीत बारा मुख्य क्षार असतात.

आपल्या पूर्वजांनाही बारा आकडा आवडत असे. देशभरात शंकराची लक्षावधी देवळे असतील, पण त्यातली बारा ज्योतीर्लिंगे प्रसिध्द आहेत आणि सर्वाधिक पवित्र व जागृत देवस्थाने मानली जातात. सूर्याच्या बारा नावांनी त्याला बारा सूर्यनमस्कार घालतात. गणपतीच्या बारा नावांची दोन स्तोत्रे आहेत. अनेक गावांची नावे बारा या शब्दापासून तयार झालेली आहेत, जसे महाराष्ट्रात बारामती, उत्तर भारतात बाराबंकी आणि काश्मीरात बारामुल्ला. आणखीही असतील, पण ही तीन गावे बातम्यांमध्ये येत असतात.

हिंदी आणि मराठी सिनेमामधल्या गाण्यांमध्येही बारा हा शब्द खुबीने वापरला गेला आहे. चलती का नाम गाडी या सिनेमातले किशोरकुमारचे पाँच रुपय्या बारा आना हे मधुबालाबरोबर मस्करी करतांना गायिलेले विनोदी गाणे एके काळी खूप गाजले होते. अलीकडच्या काळातल्या नटरंग सिनेमातल्या बेला शेंडेच्या जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा या गाण्याने धमाल उडवली होती.

ही सगळी बारा या अंकाचे महत्व दर्शवणारी उदाहरणे आहेत. पण बारा याच संख्येचा उपयोग निगेटिव्ह अर्थानेही केला जातो. एकाद्याचे वाटोळे होण्याला त्याचे बारा वाजले म्हणतात. व्यापार व्यवसायात एकाद्याला खूप मोठा तोटा झाला तर त्याने लाखाचे बारा हजार केले असे म्हणतात. एकाद्याची किंमत कमी झाली की तो बाराच्या भावात गेला. हा वाक्प्रचार कदाचित ‘चीपर बाय डझन Cheaper by dozen’ वरून आला असेल. ‘केल्याने देशाटन .. मनुजा चातुर्य येतसे फार’ असे सुभाषित आहे. पण या चातुर्याचा उपयोग कोणी इरसाल बनण्यात किंवा लबाडीमध्ये करत असेल तर तो (किंवा ती) बारा गावचे पाणी पिऊन आला (आली) आहे असे बोलले जाते.

या ना त्या कारणाने आणि अर्थाने बाराचा आकडा नेहमी आपल्या आसपास कुठे तरी फिरत असतो.
——————————————

नवी भर दि.१२-१२-२०२०

बारा अंकाची बहाद्दुरी

१२ हा जुन्या लोकांचा फार प्रिय अंक.

मोजण्यासाठी जशी दशमान पध्दती लोकप्रिय तशीच द्वादशमान पध्दतीही.
आपण एक फूट म्हणजे १२ इंचाची पट्टी वापरतो.

एक डझन म्हणजे १२ नग.

वर्ष १२ महिन्यांचे.

आकाशातले नवग्रह १२ राशीतून फिरतात. बारावा गुरू,शनि,मंगळ हानिकारक समजले जातात.
पूर्वी तपश्चर्या १२ वर्षे करीत, गुरूगृही अध्ययनही १२ वर्ष चाले.
घड्याळात आकडे बारा. पूर्ण दिवस जरी २४ तासांचा असला तरी आपण त्याचे १२/१२ तासांचे विभाजन केले आहे मध्यानपूर्व व मध्यान्हनंतर असे.पूर्वी रात्रीचे १२ वाजले म्हणजे मध्यरात्र झाली असे समजत.
एखादी गोष्ट संपली तिचा निकाल लागला म्हणजे बारा वाजले असे म्हणतात.

जिकडेतिकडे सकाळी भरलेला बाजार साधारण बारा वाजता उठतो त्यावेळी राहिला उरला सुरला माल स्वस्त दरात विकण्यात येतो म्हणून एखादी वस्तू कूचकिमतीला काढून टाकायची असेल तर ती १२ च्या भावात काढून टाका असा शब्दप्रयोग आहे.
पूर्वी १२ व्या वर्षी मुलींचे लग्न करत नसत.
आपल्याकडे पूर्वी १२ पयांचा एक आणा होत असे
इंग्लंडमधे १२ पेन्सचा १ शिलींग.
नवीन जन्मलेल्या अपत्याचे नामकरण १२ व्या दिवशी करतात त्याला बारसे म्हणण्याची पध्दत आहे
तसेच मृत व्यक्तीचे धार्मिक विधीही १२ दिवसांनी करतात.
१२बलुतेदार, बारभाई, बारावाटा, बाराबंगले इ.शब्दप्रयोग अर्थपूर्ण आहेत.
एखाद्या अनुभवी बेरकी माणसाला १२ गावचं पाणी प्यायलेला आहे असं म्हणतात.

तसेच न ऐकणाऱ्या रगेल दांडगट स्वभावाच्या व्यक्तीलाही ‘ काय बाराचा आहे हा!’ असा शब्दप्रयोग वापरतात.
१२ ज्योतिर्लिंगे प्रसिध्द आहेत.
मराठी भाषेच्या वर्णमालेत स्वर १२ आहेत त्यावरूनच बाराखडी म्हणण्यात येते.
१२ गावचा मुखिया.
जमिनीला ७/१२ चा उतारा लागतोच.

अशी ही १२ ची किमया…..

म्हणूनच
…..
पुण्याच्या वैशिष्टपूर्ण बेरकीपणासाठी RTO ने पुण्यास MH 12 हा नंबर बहाल केला आहे !
😀😀

************

आता वाजणार की हो बारा बारा बारा …………

(हा लेख दि.१२ डिसेंबर २०१२ च्या निमित्याने लिहिला होता.)

विसावे शतक संपून सन २००० सुरू होण्याच्या क्षणाला वायटूके (Y2K) असे नाव काँप्यूटरवाल्यांनी दिले होते. वर्ष दाखवणाऱ्या ९७, ९८, ९९ अशा आकड्यांना सरावलेल्या मठ्ठ काँप्यूटरांना २००० सालातला ०० हा आकडा समजणारच नाही आणि ते गोंधळून जाऊन बंद पडतील. त्यामुळे त्यांच्या आधारावर चालणाऱ्या सगळ्या यंत्रणा कोलमडून पडतील. हॉस्पिटलमधल्या कुठल्या रोग्याला कोणते औषध द्यायचे किंवा कुणावर कसली शस्त्रक्रिया करायची हे कुणाला समजणार नाही. स्वयंचलित यंत्रांना कच्चा मालच मिळणार नाही किंवा चुकीचा माल त्यात घुसवला जाईल. नोकरदारांना पगार मिळणार नाही, त्यांचे बँकांमधले खाते बंद पडेल आणि एटीएम यंत्रांमधून पैसे बाहेर येणार नाहीत. जमीनीवरली विमाने उडलीच तरी भलत्या दिशांना जातील आणि आकाशात भ्रमण करणारी विमाने दगडासारखी खाली कोसळतील. अशा अनेक वावड्या उडवल्या जात होत्या. सर्वात भयानक बातमी अशी होती की वेगवेगळ्या महासत्तांच्या भूमीगत गुप्त कोठारांमधले अनेक अण्वस्त्रधारी अग्निबाण बाहेर निघून ते भरकटत जातील आणि इतस्ततः कोसळून पृथ्वीवर हलकल्लोळ माजवतील.

असा अनर्थ घडू नये म्हणून सगळे संगणकविश्व कंबर कसून कामाला लागले होते. नव्या भारतातले संगणकतज्ज्ञ प्राचीन काळात भारताने शोधून जगाला दिलेल्या शून्याचा अर्थ जगभरातील संगणकांना नव्याने समजावून देण्याच्या कामाला लागले. त्या काळात ते रात्रंदिवस काम करून निरनिराळ्या सॉफ्टवेअर्सना वायटूकेफ्रेंडली किंवा वायटूकेकंप्लायंट बनवत राहिले. कदाचित त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेही असेल, पण वायटूकेचा बार फारच फुसका निघाला. त्यातून साधे फुस्ससुध्दा झाले नाही. पण आयटीवाल्या कंपन्यांच्या हातातल्या सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबड्या मात्र त्याबरोबर एकदम नाहीशा झाल्या आणि त्यांच्याकडल्या बाकीच्या सगळ्या कोंबड्यांचे भाव धडाधडा कोसळू लागल्यामुळे त्यांच्या धंद्यावर मंदीचे सावट पसरले ते बराच काळ राहिले.

त्यानंतर १ जानेवारी २००१ साली १ वाजून १ मिनिटांनी ०१:०१:०१:०१:०१:०१ हा क्षण येऊन गेला, त्याला फारसे महत्व मिळाले नाही. त्यानंतर दर वर्षी ०२:०२…, ०३:०३… वगैरे विशेष वेळा येत राहिल्या. त्या सगळ्या रात्री झोपेच्या काळात असल्याने कुणाला जाणवल्याही नाहीत. २००७ साली जुलै महिन्याच्या ७ तारखेला युरोपातल्या स्पेन या देशात एक आंतरराष्ट्रीय संमेलन भरवून त्यात ०७:०७:०७:०७:०७:०७ या वेळी म्हणजे सकाळी ७ वाजून ७ मिनिटे आणि ७ सेकंद या क्षणाचा मुहूर्त साधून पुरातनकाळातच माणसाने बांधून ठेवलेल्या जगातील सात जुन्या आश्चर्यांची नवी जगन्मान्य यादी जाहीर करण्यात आली.

त्यानंतर ०८:०८… ०९:०९… वगैरे क्षण येऊन गेले. मागील वर्षी येऊन गेलेल्या ११ नोव्हेंबर २०११ या दिवशी ११ वाजून ११ मिनिटे ११ सेकंद या वेळेत ११ हा आकडा ६ वेळा किंवा १ हा आकडा १२ वेळा येऊन गेला होता. तो याहीपेक्षा जास्त येण्याची वेळ यापूर्वी सन ११११ मध्ये येऊन गेली होती, पण त्या काळात सेकंदांपर्यंत अचूक वेळ दाखवणारी घड्याळेच अस्तित्वात नसल्यामुळे तब्बल अकरा हजार वर्षांमध्ये एकदा येऊन गेलेल्या या क्षणाचे महत्व कोणाच्या ध्यानातही आले नसेल. आता १२-१२-१२ हा दिवस उजाडणार असून त्या दिवशी दुपारचे १२:१२:१२ वाजणार आहेत. अशा प्रकारच्या गणिती योगायोगाची ही या शतकातली शेवटची संधी आहे. इंग्रजी कॅलेंडर्समध्ये कधीच तेरावा महिना येत नसल्यामुळे गेली बारा वर्षे दर वर्षी येणारा अशा प्रकारचा योग आता यानंतर एकदम सन २१०१ मध्ये येईल.

गेली अकरा वर्षे हे विशिष्ट वेळांचे क्षण त्यांच्या त्यांच्या ठरलेल्या वेळी येऊन गेले. त्यातल्या कोठल्याही क्षणी नेमके काय घडले? खरे तर कांही म्हणजे कांहीसुद्धा झाले नाही. बाहेर अंधार, उजेड, ऊन, पाऊस वगैरे सगळे काही ऋतुमानाप्रमाणे होत राहिले. कुठे पावसाची भुरभुर आधीपासून सुरू असली तर त्या क्षणानंतरही ती तशीच होत राहिली. तो क्षण पहायला सूर्य कांही त्या वेळी ढगाआडून बाहेर आला नाही. वारा मंद मंद किंवा वेगाने वहात होता आणि पानांना सळसळ करायला लावत होता. सगळे कांही अगदी नेहमीसारखेच चाललेले होते. आणि त्यांत कांही बदल होण्याचे कांही कारण तरी कुठे होते?

निसर्गाचे चक्र अनादी कालापासून फिरत आले आहे. त्या कालचक्राची सुरुवात कशी आणि कधी झाली हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. माणसानेच कुठल्याशा दिवसापासून वेळ मोजायला सुरुवात केली आणि आपण त्यातल्या विशिष्ट आकड्यांपर्यंत पोचत राहिलो. तारीख, महिना, वर्ष, तास, मिनिटे, सेकंद हे सगळे माणसाच्या मेंदूतून निघाले आहे आणि त्याच्या सोयीसाठी तो ते पहात राहिला आहे. निसर्गाला त्याचे कणभर कौतुक नाही. गेल्या अकरा वर्षांत अगदी योगायोगानेसुध्दा त्यातल्या अशा प्रकारच्या विशिष्ट तारखांना विशिष्ट क्षणी कोठलीच महत्वाची घटना जगात कुठेच घडली नाही. न्युमरॉलॉजी वगैरेंना शास्त्र मानणाऱ्यांनी याची नोंद घ्यावी.

आता या वर्षी या शतकातले १२:१२:१२:१२:१२:१२ असे सहावार बारा वाजणार आहेत. तेंव्हासुध्दा त्यामुळे काही विशेष घडण्याची कणभर शक्यता मला दिसत नाही. पहायला गेल्यास बारा वाजणे या वाक्प्रचाराला मराठी भाषेत (आणि कदाचित हिंदीतसुध्दा) वेगळा खास अर्थ आहे. दोन हजार बारा या वर्षात त्या अर्थाने अनेकजणांचे बारा वाजून गेले. भारतीय क्रिकेट टीम त्या बाबतीत आघाडीवर दिसते. इंडियन ऑलिंपिक समिती, बॉक्सिंग फेडरेशन वगैरेंचेही असेच हाल झाले आहेत. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर आली म्हणून संबंधित लोकांचे बारा वाजले म्हणावे तर त्यासाठी सुरू झालेल्या लढ्यातच फाटाफूट पडून त्याचेही बारा वाजल्यागत झाले आहे. हे वर्ष संपेपर्यंत उरलेल्या तीन आठवड्यात आणखी कोणाकोणाचे काय काय होणार हे पहायचे आहे. दक्षिण अमेरिकेतल्या कुठल्याशा जमातीच्या ऋषीमुनींनी प्राचीन काळात लिहून ठेवलेल्या भविष्याप्रमाणे सगळ्या जगाचेच आता बारा वाजणार आहेत असा धाक काही लोक दाखवत आहेत. २००० साली वायटूकेमुळे होऊ पहाणारा अनर्थ किंवा त्याचा केला गेलेला बाऊ मानवनिर्मित होता आणि माणसांच्याच सावधगिरीमुळे किंवा हुषारीने तो तर टळला, आता हे दैवी सिध्दी प्राप्त झालेल्या लोकांनी वर्तवलेले इंकांचे तथाकथित भविष्यही काही दिवसांनी टाईमबार्ड होईल.
…. आणि अगदी तसेच झालेसुद्धा.
ते काही का असो, परवा येणा-या बारा तारखेला दुपारी बारा वाजून बारा मिनिटे आणि बारा सेकंद हा फक्त त्यातल्या संख्येच्या दृष्टीने विलक्षण असा क्षण तुम्ही आपल्या घड्याळात पाहून टिपू शकता आणि मनातल्या मनात त्यातला काल्पनिक थरार अनुभवू शकता. या क्षणी जन्माला आलेला एकादा महाभाग त्यामुळे अचाट सामर्थ्यवान झाला आणि तो सगळ्या जगाचे बारा वाजवणार आहे असे भविष्य कदाचित उद्या कोणी सांगेल आणि भोळसट लोक त्यावर विश्वासही ठेवतील. पण त्याचा पराक्रम किंवा ते भविष्य खोटे ठरलेले पहायला खूप वर्षे वाट पहावी लागेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: