मी हा लेख सुमारे दहा वर्षांपूर्वी मी मोहम्मद रफी यांच्याच गाण्यांवर आधारलेला एक सांगीतिक कार्यक्रम पाहून आल्यावर लिहिला होता. आज त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्याने त्याचे थोडे संपादन करून आज हा लेख या स्थळावर देत आहे.
वो जब याद आये
या ठिकाणी लिहितांना मी नेहमी माझ्या लहानपणच्या आठवणी सांगत असतो असे कोणाला वाटेल. उतारवय आल्यावर बहुतेक लोकांना ती खोड लागत असावी. त्यात आणखी एक गंमत अशी आहे की त्या गोष्टी ऐकणे लोकांना आवडते अशी त्यांची आपली (कदाचित गैर)समजूत असते. तर मी एकदा बाहेरगांवाहून येणार असलेल्या कोणाला तरी बसमधून उतरवून घेण्यासाठी एस्टीस्टँडवर जाऊन मोटारीची वाट पहात बसलो होतो. तेंव्हा तशी पध्दतच होती. आपल्या इवल्याशा जगाच्या बाहेर काय चालले आहे ते पहाण्याची तीही एक खिडकी असल्यामुळे आम्हालाही ते काम हवेच असायचे. गृहपाठाचा बोजा नसल्यामुळे स्टँडवर जाऊन थोडा वेळ बसून रहायला फावला वेळ असायचा. खांद्यावर गांठोडे घेऊन चिल्ल्यापिल्ल्यांचे लटांबर सांभाळत दूरवरच्या खेड्यातून पायपीट करत दमून भागून येणाऱ्या खेडुतांपासून ते प्रवासात घामाघूम झाल्यामुळे खिशातून रुमाल काढून त्याने घाम पुसत आपला चुरगळलेला मुळातला झकपक पोशाख ठीकठाक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोठ्या शहरातल्या पांढरपेशा पाहुण्यापर्यंत माणसांचे वेगवेगळे नमूने, त्यांचे कपडे, त्यांचे हांवभाव वगैरे पाहण्यात आणि त्यांच्या निरनिराळ्या बोलीतले आगळे वेगळे हेलकावे ऐकण्यात आमचा वेळ चांगला जात असे. तर एकदा असाच बसच्या येण्याची प्रतीक्षा करत बसलो होतो. त्या दिवशी बुधवार होता आणि रात्रीची वेळ होती. स्टँडवरल्या कँटीनमधल्या रेडिओतून बिनाका गीतमालेचे सूर ऐकू येत होते. अमीन सायानींनी त्यांच्या विशिष्ट लकबीत घोषणा केली, “अब अगली पादानपर आप सुनेंगे मोहम्मद रफीकी आवाजमें एक फडकता हुवा गीत …” आणि लगेच एक अद्भुत आवाजातली लकेर आली, “ओ हो हो…, ओ हो … हो, खोया खोया चाँद, खुला आसमान, ऐसेमें कैसे नींद आयेगी …..” त्यातला झोप न येणे वगैरेचा अनुभव नसल्यामुळे तो भाग कळण्यासारखा नसला तरी ते ओहोहो तेवढे थेट काळजापर्यंत जाऊन भिडले आणि तिथेच कायमचा मुक्काम ठोकून राहिले.
पुढे तो दिव्य आवाज नेहमी कानावर पडत आणि मनाचा ठाव घेत राहिला. रफीसाहेबांनी हजारो गाणी गायिली आणि त्यातली निदान शेकडो अजरामर झाली. आपल्या कारकीर्दीच्या बहरात असतांनाच ते अचानकपणे कालवश झाले. भूतकाळातल्या आठवणींना सतत उराशी बाळगून वर्तमानकाळ हातातून घालवायचा नसतो हे खरे असले तरी त्यांनीच गायिलेल्या ‘वो जब याद आये, बहुत याद आये’ या गाण्यानुसार जेंव्हा कांही लोकांची आठवण येते तेंव्हा त्यांच्या चाहत्यांना ती उत्कटपणे येते हेसुध्दा तितकेच खरे आहे. रफीसाहेबांच्या निधनाला अडतीस वर्षे एवढा काळ लोटून गेला असला तरी अजून त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे कार्यक्रम होतात आणि त्यांच्या मागून आलेल्या पिढीतले लोकसुध्दा तो पहायला व ऐकायला गर्दी करतात. रफीसाहेबांचीच गाणी गात गात किती तरी गायक पुढे नावारूपाला आले आहेत.
पूर्वी एकदा असाच एक कार्यक्रम पहायचा योग आला होता. मोहम्मद रफींच्या आवाजातली खूपशी उत्तमोत्तम सुरेल गाणी श्री. प्रभंजन मराठे यांनी त्या कार्यक्रमात गायिली. ‘मेंदीच्या पानावर’ या अत्यंत लोकप्रिय झालेल्या वाद्यवृंदातून ते मराठी माणसांना परिचित झालेले होतेच. सारेगमप या स्पर्धात्मक कार्यक्रमातल्या प्रौढांच्या पर्वात त्यांनी भाग घेतल्यामुळे ती ओळख दृढ झाली होती. दोन कीबोर्ड आणि एक सेक्साफोन एवढीच सुरांची संगत देणारी वाद्ये साथीला होती आणि तबला, ढोलक, खुळखुळे व ऑक्टोपॅड ही तालवाद्ये गरजेनुसार वाजवणारे तीन वादक होते. पण या सर्वांच्या अप्रतिम कौशल्याची दाद द्यायलाच हवी. त्यांनी सतार, व्हायलिन किंवा फ्ल्यूटवर वाजवलेल्या खास जागासुध्दा घेऊन आणि कोंगोबोंगो किंवा ड्रम्सवरील नाद आपापल्या वाद्यांमधून काढून त्यांची उणीव भासू दिली नाही. ड्यूएट्स गाण्यासाठी विद्या आणि आसावरी या दोन नवोदित गायिका होत्या. रफींनी गायिलेली आणि त्याच चालीवर एकाद्या गायिकेने गायिलेली अशी कांही गाणी त्यांनी स्वतंत्रपणे गायिली. वेगवेगळ्या गीतकारांनी रचलेली, निरनिराळ्या संगीतकारांनी, त्यात पुन्हा अनेक प्रकारच्या संगीताच्या आधाराने स्वरबध्द केलेली, विविध भाव व्यक्त करणारी अशी गाणी निवडून त्यात शक्य तेवढी विविधता आणण्याचा संयोजकांचा प्रयत्न स्तुत्य होता. मोहम्मद रफीसाहेबांच्या गाण्यांची रेंज दाखवण्याचा उद्देश त्यामागे होता. पण त्यातले वैविध्य थोडे कमी करून माझ्या आवडीची आणखी कांही गाणी घेतली असती तर मला ते अधिक आवडले असते. तरीसुध्दा जी घेतली होती ती सगळीच गाणी त्या त्या काळी लोकप्रिय झाली होती आणि माझ्या ओळखीचीच होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल दोन दोन शब्द लिहिण्याचा मोह होतो. कुठल्या तरी एका प्रकारच्या वर्गवारीनुसार क्रम घेतला तर तो दुसऱ्या प्रकारात बसणार नाही. यामुळे ज्या क्रमाने ती सादर केली गेली त्याच क्रमाने त्यांच्याबद्दल लिहिलेले बरे. हा क्रम ठेवण्यामागे आयोजकांचासुध्दा कांही उद्देश असणारच ना !
कवयित्री वंदना विटणकर यांनी लिहिलेली आणि श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबध्द केलेली मोजकीच गाणी गाऊन मोहम्मद रफी यांनी मराठी सुगमसंगीताच्या विश्वात त्यांचा खास ठसा उमटवला आहे. बहुतेक मराठी वाद्यवृंदांच्या कार्यक्रमात त्यातले एकादे गाणे असतेच. या कार्यक्रमाची सुरुवात ‘शोधिसी मानवा राउळी मंदिरी । नांदतो देव हा आपुल्या अंतरी ।।’ या गाण्याने झाली. ‘काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल ।’ या शब्दांत संत नामदेवांनी सांगितलेले मानवतेचे तत्वज्ञान शिकवून अंतर्मुख करणारे हे गंभीर स्वरूपाचे मराठी गीत एका परभाषिक आणि परधर्मीय गायकाने गायले असेल असे वाटतच नाही.
त्यानंतर रफींच्या खास अंदाजातले नायकाच्या प्रेमिकेच्या रूपाचे कौतुक करणारे गाणे सादर झाले आणि चाळीस पन्नास वर्षांपूर्वीच्या सिनेमात असणारी रोमँटिक दृष्ये नजरेसमोर आली. नायकाने किंचित झुकून तिची वाहवा करायची आणि तिने लाजत मुरडत त्याला साद द्यायची वगैरे त्यात आले.
ऐ फूलोंकी रानी बहारोंकी मलिका । तेरा मुस्कुराना गजब हो गया ।। न होशमें तुम न होशमें हम । नजरका मिलाना गजब हो गया ।।
ऊँचे लोग या त्या काळातल्या ऑफबीट सिनेमातले चित्रगुप्त यांनी संगीतबध्द केलेले एक वेगळ्या प्रकारचे गाणे त्यानंतर आले. त्यातले उच्च प्रकारचे उर्दू शब्दप्रयोग ओळखीचे नसल्यामुळे त्यातला भाव बहुतेक लोकांपर्यंत पोचत नव्हता. फक्त सुरावलीतली मजा तेवढीच समजत होती.
जाग दिल ए दीवाना रुत आयी रसिल ए यार की ।
प्रेमगीतांच्या या मालिकेतले पुढचे गाणे जरतर करणारे पण त्याबरोबरच आशावाद दर्शवणारे होते,
गर तुम भुला न दोगे, सपने ये सच भी होंगे । हम तुम जुदा न होंगे ।।
त्यानंतरच्या गाण्यात एक खोटी खोटी प्रेमळ तक्रार करून एक लटका सल्ला (न मानण्यासाठी) दिला होता.
आवाज देके हमें तुम बुलाओ । मोहब्बतमें इतना न हमको सताओ ।।
यापुढच्या द्वंद्वगीतात एकरूप होऊन साथसाथ राहण्याचा निर्धार व्यक्त केला होता.
तेरे मेरे सपने अब एक रंग हैं । ले जहाँ भी ये राहे, हम संग हैं ।।
‘त्यां’च्या जवळ येण्यामुळे आपण सगळ्या जगापासून दूर गेल्याची भावना पुढच्या गाण्यात होती.
दो घडी वो जो पास आ बैठे । हम जमानेसे दूर जा बैठे ।।
तर प्रेमाच्या धुंदीत धुंद झालेला प्रेमिक सगळे जगच आपल्या मालकीचे करत असल्याचा दावा त्यापुढील गाण्यात केला होता. है दुनिया उसीकी जमाना उसीका । मोहब्बतमें जो भी हुवा है किसीका ।।
चित्रपट बनवण्याचे तंत्र आणि त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री पाश्चात्य देशातून आपल्याकडे आली. तिच्या सोबतीने किंवा त्याअगोदरपासून हॉलीवुडमध्ये तयार होत असलेले इंग्रजी सिनेमे भारतात प्रदर्शित होऊ लागले. त्यांची छाप भारतात तयार होणाऱ्या चित्रपटांवर पडणे साहजीक होते. इथल्या प्रेक्षकांना तो सिनेमा आपला वाटावा यासाठी कथावस्तू आणि वातावरण भारतीय ठेऊन तांत्रिक बाबतीत तिकडच्या कांही कल्पना उचलल्या जात होत्या.
चित्रपटसंगीतावर सुध्दा त्याचा प्रभाव पडलेला दिसतो. अभिजात भारतीय संगीत आणि सिनेसंगीत यात एक महत्वाचा फरक मी पहात आलो आहे. आपल्या शास्त्रीय संगीतात पेटी, सारंगी, वीणा, व्हायलिन वगैरे स्वरसाथ देणारी वाद्ये गायनाबरोबर सारखी वाजत असतात आणि गायकाने आळवलेल्या सुरांची पुनरावृत्ती त्यातून होत असते. सिनेमातल्या गाण्यात मुख्य गाणे सुरू होण्यापूर्वी आणि दोन कडव्यांच्या मध्ये त्या गाण्याशी सुसंगत पण वेगळ्या चालीवरचे वाद्यसंगीताचे तुकडे असतात. वादकांनी तर ते तुटकपणे वाजवायचे असतातच, गायकाने त्यात मधून मधून गायचे असते. एकाद्या रागाचा पध्दतशीर सलग विस्तार करत जाणे आणि तुटकतुटकपणे एकदम खालचे किंवा वरचे स्वर गळ्यातून काढणे या अगदी वेगळ्या कला आहेत. ऐकणाऱ्याला त्यातून वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. कांही कलाकारांना या दोन्ही कला साध्य होतात, पण प्रत्येकाची आपापली आवड असते, मर्यादा असतात, इतर कारणेसुध्दा असतात, त्यामुळे शास्त्रीय संगीत गाणारे गायक आणि चित्रपटांचे पार्श्वगायक असे वेगळे वर्गीकरण झालेले आपल्याला दिसते.
भारतीय संगीतातले सूर, ताल, लय आणि वेस्टर्न क्लासिकल म्यूजिकमधली मेलडी, हार्मनी आणि रिदम यांचा सुरेख मिलाफ करून त्यातून आपल्या प्रतिभेचा आविष्कार शंकर जयकिशन या जोडगोळीने कसा केला होता याचे उदाहरण देणारे एक गाणे यानंतर सादर करण्यात आले. शिवरंजनी रागाची आठवण करून देणारी सुरावली थिरकत्या ठेक्यावर गातांना त्यात भावनांचा ओलावा निर्माण करण्याची अद्भुत किमया मोहम्मद रफी यांनी या गाण्यात करून दाखवली आहे. वादकवृंदाने तर कमालच केली. मोजक्या वाद्यांमधून मोठ्या ऑर्केस्ट्राचा आभास निर्माण करून या गाण्याचे प्रिल्यूड, इंटरल्यू़ड वगैरे बहुतेक सगळे तपशील त्यांनी व्यवस्थितपणे दाखवले. ब्रम्हचारी या चित्रपटातले हे गाणे तेंव्हा तर गाजले होतेच, अजूनही ऐकतांना मजा येते. सभागृहातल्या सगळ्या प्रेक्षकांनी त्या गाण्याचा ठेका धरला होता. ते गाणे होते
दिलके झरोकेमें तुझको बिठाकर । यादोंको तेरी मै दुलहन बनाकर । रक्खूंगा मै दिलके पास । मत हो मेरी जाँ उदास ।।
या गाण्यानंतर एक हाँटिंग मेलडी सादर करण्यात आली. महल चित्रपटातील आयेगा आनेवाला या गाण्यापासून थरारनाट्य असलेल्या चित्रपटात (सस्पेन्स मूव्हीजमध्ये) लतादीदींच्या आवाजात अशा प्रकारचे एक गाणे घालून ते वेगवेगळ्या सीनमध्ये पुन्हा पुन्हा वाजवण्याची रूढीच पडली होती. मधुमती, वो कौन थी, मेरा साया, गुमनाम वगैरे त्याची अनेक उदाहरणे देता येतील. या कार्यक्रमात सादर केलेले गाणे होते, अकेले हैं, चले आओ, चले आओ ।
खूप वर्षांपूर्वी आलेल्या, मी न पाहिलेल्या, रतन नावाच्या सिनेमासाठी नौशाद यांनी स्वरबध्द केलेले आणि जोहराबाई या गायिकेने गायिलेले जुन्या अनुनासिक ढंगाचे गाणे यानंतर आले. अजूनही ते कधीतरी ऐकायला मिळते. ते होते, अँखियाँ मिलाके, जिया भरमाके, चले नही जाना, ओओओ ….. चले नही जाना।
अशी खास वेगळ्या प्रकारची गाणी झाल्यानंतर नौशाद यांनीच संगीतबध्द केलेले कोहिनूर चित्रपटातले हमीर रागातले सुप्रसिध्द गाणे प्रभंजन मराठे यांनी अप्रतिम रीतीने गाऊन दाखवले. त्यातल्या तराण्यावर तबलजीने अशी कांही साथ दिली की मुद्दाम त्याच्या तबलावादनासाठी वन्समोअरचा आग्रह धरण्यात आला.
मधुबनमें राधिका नाची रे, गिरिधरकी मुरलियाँ बाजी रे ।।
नौशाद अलींच्याच संगीतरचनेतला खास उत्तर प्रदेशातल्या लोकसंगीताचा बाज पुढील गाण्यात दिसला. त्यानुसार यावेळी तबल्याऐवजी ढोलक या त्या भागात लोकप्रिय असलेल्या तालवाद्यावर ठेका धरला होता. भांगेच्या तारेत असतांनासुध्दा आपण पू्र्णपणे शुध्दीवर असल्याचा विनोदी आव आणत आपली चाल दाखवण्याचे आव्हान देण्याचा अजब प्रकार या गाण्यात आहे.
मेरे पैरोंमें घुंघरू बँधा दो के फिर मेरी चाल देख लो ।।
त्यानंतर खास शम्मीकपूर स्टाइलचे गाणे आले. मला ते पूर्वीसुध्दा विशेष आवडले नव्हते
ये आँखें उफ् युम्मा ।
शास्त्रीय संगीत, लोकसंगीत वगैरे झाल्यानंतर एक अनोखे देशभक्तीपर गाणे झाले. स्व.मदनमोहन या गजलसम्राटाने हकीकत या चित्रपटासाठी स्वरबध्द केलेले हे आवेशपूर्ण गाणे स्वातंत्र्यदिनासारख्या प्रसंगी हमखास ऐकायला मिळते. युध्दात वीरगती प्राप्त झालेले सैनिक अखेरच्या क्षणी आपल्या देशवासियांचा निरोप घेताघेता त्यांना जे आवाहन करतात त्या प्रसंगातले कारुण्य आणि त्यांच्या मनातली देशप्रेमाची भावना याचे सुरेख मिश्रण असलेली मनाला भिडणारी शब्दरचना, ते भाव दाखवणारी स्वररचना आणि त्यात रफीसाहेबांनी आपल्या धीरगंभीर आवाजाने भरलेली जादू असे काँबिनेशन क्वचितच ऐकायला मिळते.
कर चले हम फिदा जान ओ तन साथियों । अब तुम्हारे हवाले वतन साथियों ।।
या गाण्यानंतर गाडी पुन्हा एकदा प्रेमगीतांवर आली. एक गजल सादर झाली,
मुझे दर्द ए दिलका पता न था, मुझे आप किसलिये मिल गये ।
मैं अकेला यूँ ही मजेमे था, मुझे आप किसलिये मिल गये ।।
त्यानंतर एकदम वेगळ्या मूडमधले प्यासा चित्रपटातले विनोदी आणि खटकेबाज गाणे आले. मोहम्मद रफी यांनी फक्त कथानायकांनाच आवाज दिला नव्हता, तर त्यांनी जॉनी वॉकर आदी विनोदवीरांनासुध्दा साजतील अशी अनेक गाणी गायिली आहेत त्यातले आजतागायत सर्वाधिक लोकप्रिय गाणे आहे,
सर जो तेरा चकराये, या दिल डूबा जाये, आजा प्यारे पास हमारे काहे घबराए ।।
गायकाची एवढी दमछाक झाल्यानंतर गायिकेच्या आवाजातले एक गाणे घेऊन प्रभंजन मराठे यांना थोडी विश्रांती दिली गेली. तुम कमसिन हो नादाँ हो या रफी यांनी गायिलेल्या नायकाच्या गाण्याच्या चालीवरच हे गीत सिनेमातल्या नायिकेने म्हंटले आहे.
मैं कमसिन हूँ, नादाँ हूँ, नाजुक हूँ । थाम लो मुझे मै तेरी इल्तजाँ करूँ ।।
त्यानंतर एक युगलगीत झाले.
ओ आ जा पंछी अकेला है । ओ सो जा नींदियाकी बेला है ।।
एक गायक आणि दोन गायिका यांनी एकत्र गायिलेले लोकगीताच्या ढंगातले बैजूबावरा या चित्रपटातले आणखी एक गाणे यानंतर आले, दूर कोई गाये, धुन ये सुनाये, तेरे बिन छलिया रे, बाजे ना मुरलिया रे ।। होजीहो … होहो … होहो…..
त्यानंतर पंचमदांनी (आर.डी.बर्मन यांनी) संगीतबध्द केलेली नव्या धर्तीच्या संगीताने सजलेली गाणीसुध्दा रफी यांनी कशी गायिली याची झलक दाखवण्यात आली. पुढे अशा प्रकारची गाणी किशोरकुमार यांनी गायिली असली तरी सुरुवातीला त्यातली कांही रफी यांच्या आवाजात स्वरबध्द केली गेली. याची उदाहरणे आहेत,
गुलाबी आँखें, ये जो है तेरी, शराबी ये दिल, हो गया ।।
तसेच हे मादक द्वंद्वगीत,
ओ हसीना जुल्फोंवाली जान ए जहाँ, ढूँढती है शातिर आँखे जिसका नशा । मेहफिल मेहफिल ओ शमा, फिरती हो कहाँ ।।
वो अनजाना ढूँढती हूँ, वो परवाना ढूँढती हूँ ………
यानंतर पुन्हा एकदा शंकर जयकिशन यांची मेलडी आली,
अजी रूठकर अब कहाँ जाइयेगा, जहाँ जाइयेगा हमें पाइयेगा ।।
आणि रोशन यांचे काळजाला भिडणारे सूर, दिल जो न कह सका, वोही राज ए दिल, कहनेकी रात आयी है।।
मी सुरुवातीपासून ज्या गाण्याची वाट पहात होतो ते काळीज पिळवटून टाकणारे पहाडी रागातले अजरामर गाणे अखेर आलेच. इतकी आर्तता, इतके शांत आणि सावकाशपणे आंदोलन घेत असलेले स्वर, त्यातला ठहराव वगैरे खुबी फार कमी गाण्यात ऐकायला मिळतात. त्यामुळे असे गाणे दीर्घकाळपर्यंत स्मरणात राहते. सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे । हवा भी रुख बदल चुकी, ना जाने तुम कब आओगे ।।
कार्यक्रमाची अखेर रफीसाहेबांनी गायिलेल्या आणि अनेक लोकांच्या टॉपटेनमध्ये असलेल्या अजरामर अशा गाण्याने झाली. बैजूबावरा चित्रपटातले हे गाणे त्या काळी लोकप्रियतेच्या शिखरावर चढलेले होते. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातले माधुर्य या गाण्यातून व्यक्त झाले होते.
तू गंगाकी मौज मैं जमुना की धारा । ये हमारा तुम्हारा मिलन ये हमारा तुम्हारा ।।
श्री.प्रभंजन मराठे यांनी कितीही चांगल्या रीतीने आणि जीव तोडून ही सगळी गाणी गायिली असली तरी मोहम्मद रफी यांच्या गाण्याची पातळी त्यांनी गाठली होती असे त्यांनाही वाटले नसेल. तसे शक्य असते तर त्यांचे स्वतःचेच नांव झाले असते. पण त्यांच्या गाण्यातून रफी यांची जुनी गाणी आठवली आणि पुन-प्रत्ययाचा आनंद मिळाला. नवोदित गायिकांनी चांगला प्रयत्न केला, पण त्यांना अजून बराच पल्ला गाठायचा आहे हे जाणवत होते.
या कार्यक्रमात न घेतलेली आणखी किती तरी मोहम्मद रफी यांची गाणी अजून लोकांच्या ओठावर आहेत. त्यातली कोणती सांगू आणि कोणती वगळू ? पण मला अतीशय आवडत असलेल्या काही लोकप्रिय गाण्यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे.
मन तरपत हरीदरसन को आज, ओ दुनिया के रखवाले (बैजू बावरा)
ऐ दिल मुश्किल जीना यहाँ … ये है बॉम्बे मेरी जान (सी आई डी)
हम लाए हैं तूफ़ान से कश्ती निकाल के (जागृति)
बाबुल की दुआएँ लेती जा (नीलकमल)
बार बार दिन ये आये … हॅप्पी बर्थ डे टू यू (फर्ज)
मोहम्मद रफीसाहेबांच्या स्मृतीला आज त्यांच्या जन्मदिवसानिमित्य सलाम. दि.२४-१२-२०१८
Filed under: अनुभव, कला आणि कलाकार, विवेचन |
प्रतिक्रिया व्यक्त करा