जुने वर्ष आणि नवे वर्ष

“नदीच्या त्याच पाण्यात तुम्ही दोन वेळा हात बुडवू शकत नाही.” अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे. याचे कारण नदीचे पाणी सतत वहात असते. आपला हात पाण्यातून बाहेर काढून पुन्हा पाण्यात घालेपर्यंत त्या ठिकाणी आधी असलेले पाणी वाहून प्रवाहासोबत पुढे गेलेले असते आणि त्या जागी नवीन पाणी आलेले असते. कालौघाचा प्रवाहसुद्धा सारखा पुढेच जात असतो. गेलेला क्षण कधीही परत आणता येत नाहीच, काळाबरोबर सगळे जगही सतत बदलत असते. कालचे आपले घरसुद्धा आज अगदी जसेच्या तसे राहिलेले नसते. काही वस्तू इकडच्या तिकडे झालेल्या असतात, काही नाहीशा झालेल्या असतात, तर काही नव्या वस्तू घरात आलेल्या असतात. वर्षभराने पाहिले तर घरातल्या खूप वस्तू बदललेल्या असतातच, शिवाय ते घर एक वर्षाने जुने झालेले असते. भिंतींचा रंग थोडा उडालेला असतो, तिच्यावर काही ठिकाणी डाग तर काही जागी भेगा पडलेल्या असतात. कदाचित घराची डागडुजी आणि रंगरंगोटी करून त्याला नवे रूप दिलेले असते. माझ्या बाबतीत तर असे झाले की मागच्या वर्षी मी पुन्हा एकदा घरच बदलले.

जर निर्जीव वस्तूंमध्येसुद्धा बदल होत असतात, तर माणसांमध्ये ते जास्तच होत असतात. कालच्या दिवसभरात आपल्याला जितकी माणसे दिसली, भेटली, आपल्याशी बोलली ती सगळी आज दिसत नाहीत, त्यातली काही माणसेच आज पुन्हा भेटतात, काही लोक अनेक दिवसांनी, महिन्यांनी किंवा वर्षांनी भेटतात, काही लोक आयुष्यात पुन्हा कधी भेटतही नाहीत. पुन्हा भेटलेली माणसेसुद्धा थोडी किंवा खूप बदललेली असतात. मध्यंतरीच्या काळात इतरांच्या तसेच आपल्याही जीनवात अनेक घटना घडलेल्या असतात, सर्वांनाच वेगवेगळ्या प्रकारचे अनेक अनुभव आलेले असतात. वयोमानानुसार फरक पडलेले असतातच, शिवाय पूर्वी दणकट वाटणारी काही माणसे व्याधीग्रस्त झालेली असतात, तर आजारी असतांना पाहिलेले लोक ठणठणीत बरे झालेले असतात, अनेक अडचणींमुळे चिंताक्रांत असलेले, निराश झालेले कोणी खूप आनंदी आणि उत्साही झालेले दिसतात, तर कोणाच्या बाबतीत याच्या नेमके उलट झालेले असते. माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही असे म्हंटले जात असले तरी आलेल्या अनुभवांमुळे काही लोक शहाणे झालेले असतात, कोणी सावध झालेले असतात तर काही लोकांना माज चढलेला असतो किंवा ते वैतागलेले असतात. काही नाही तरी निदान आपल्या भेटीच्या वेळी त्यांचा किंवा आपला मूड वेगळा असतो, त्यामुळे आपला दृष्टीकोन वेगळा झालेला असतो. या सगळ्यांमधून आपले जीवन पुढे चालत असते.

नदीच्या प्रवाहात बंधारे घालून निर्माण केलेल्या जलाशयांमधले पाणी स्थिर झाल्यासारखे दिसते, पण तेही हळूहळू बदलत असते. तळातले थोडे पाणी जमीनीमधून झिरपून जात असते तर पृष्ठभागावरच्या पाण्याची वाफ होऊन ती हवेत उडून जात असते. पावसाने आणि नदीच्या प्रवाहामधून आलेल्या पाण्याने त्यात भर पडत जाते, त्यातले जास्तीचे पाणी बंधाऱ्यावरून पुढे वाहून जाते. आठवणींचेसुद्धा असेच असते. त्या साचत जातात, त्यात भर पडत जाते तशाच त्या विस्मरणात जाऊन नष्ट होतात किंवा सुप्तावस्थेत जातात, त्यातल्या काहींना पुन्हा उजाळा मिळतो. भूतकाळातल्या क्षणाच्या काही आठवणी जाग्या झाल्याने पुनःप्रत्ययाचा आभास निर्माण होत असला तरी प्रत्यक्ष आणि आभास यात फरक असतोच, जेंव्हा आपण कोणाच्या फोटोला नमस्कार करतो तेंव्हा एका कागदाला नमन करत असतो आणि एकाद्या बाळाच्या तसबिरीचे चुंबन घेतले तर कागदाला ओठ चिकटवत असतो. तरीसुद्धा त्यात आपल्याला थोडे समाधान मिळतेच. याच प्रमाणे एकादा क्षण जगणे आणि तो आठवणे यात फरक असला तरी त्यातही मजा असते.

बालपण, यौवन, मध्यमवय, उतारवय यासारखे जीवनाचे ठळक टप्पे असतात आणि आपल्या आठवणी त्यातल्या निरनिराळ्या कप्प्यांध्ये साठवलेल्या असतात. याशिवाय आपण वर्षावर्षांचे कप्पे करून जुन्या आठवणींना त्यात ठेवत असतो. वैयक्तिक जीवनात वयाला खूप महत्व असते. वयाच्या अमक्या वर्षी शाळेत किंवा कॉलेजात प्रवेश घेतला किंवा नोकरीला लागलो, इतके वय असतांना लग्न झाले, एकादा अपघात झाला किंवा मोठे आजारपण आले असे तपशील आपल्या लक्षात राहतात. यासाठी आपले वर्ष जन्मतारखेला सुरू होते. सरकारी आणि उद्योगव्यवसायांचे आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू होते आणि ३१ मार्चला संपते. भारतातल्या शाळाकॉलेजांच्या वर्षाची सुरुवात मे जूनच्या सुमाराला होते. जगभरात वापरले जात असलेले ग्रेगोरियन कॅलेंडर या सर्वांचा आधार असते. इतर बहुतेक सगळ्या सर्वसाधारण घटनांसाठी आपण कॅलेंडरवरील वर्षाचाच उपयोग करतो. इसवी सन २०१८ हे त्यातले वर्ष आता संपत आले आहे आणि काही तासांनीच २०१९ साल सुरू होणार आहे.

कुठलेही वर्ष संपत आले असतांना त्या वर्षाचा एक संक्षिप्त आढावा घेतला जात असतो. विद्यार्थ्यांनी शिकलेल्या विषयामधले किती आत्मसात केले हे समजण्यासाठी वार्षिक परीक्षा घेतली जाते, त्याचे निकाल प्रगतीपुस्तकात नोंदवले जातात, संपलेल्या वर्षात उद्योगव्यवसायांमध्ये किती उलाढाल झाली, किती प्राप्ती आणि खर्च झाला, किती नफा मिळाला की तोटा झाला, त्यात किती वाढ किंवा घट झाली वगैरेंचे हिशोब केले जातात. व्यक्तीगत आयुष्यात किती प्रगती झाली, काय काय कमावले किंवा गमावले, कोणत्या महत्वाच्या घटना घडल्या, त्यांना आपण कसे सामोरे गेलो, आपले किती अंदाज किंवा निर्णय बरोबर ठरले, कोणते चुकले, किती माणसे जवळ आली किंवा नव्याने जोडली गेली आणि किती लोक दुरावले गेले अशा अनेक गोष्टी मनात येऊन जातात. त्यातल्या काही आपल्याला सुखावतात, धीर किंवा हुरूप देतात, तसेच काहीमधून बोध मिळतो. हे सगळे गाठीला बांधून आपल्याला पुढे जायचे असते. इतर बाबतीतही असेच होत असते. सन २०१८ मध्ये आपल्या सभोवतालच्या जगात कोणकोणत्या महत्वाच्या घटना घडल्या यांची उजळणी वर्तमानपत्रे आणि टीव्ही चॅनेल्स करायला लागलेले आहेतच. ती पाहतांना त्यातल्या कोणत्या आपल्याला जास्त जवळच्या किंवा महत्वाच्या वाटतात याचा विचार मनात येतच असतो.

मला समजायला लागल्यापासून आजपर्यंत माझा दिवसभरातला जास्तीत जास्त वेळ कशात जात असेल तर तो वाचन आणि लेखन यात जातो, आधी अभ्यास, मग ऑफिसमधले काम आणि सेवानिवृत्तीनंतर अवांतर, म्हणजे बोलाच्याच चुलीवर बोलाचाच तवा ठेऊन त्यावर लश्करच्या भाकरी भाजणे!
“तू हा उपद्व्याप कशाला करतोस?” असे मला कांही लोक विचारतात.

मी त्यांना सांगतो, “कारण मला इतर ज्या गोष्टी करायला आवडतात, त्या जमत नाहीत आणि कांही गोष्टी जमतात, पण त्यात माझे मन रमत नाही. वाचन आणि लेखन मात्र मला खूप आवडते आणि थोडे फार जमते, म्हणजे कांही लोक मला तसे सांगतात.”
त्यामुळे मी रिटायर झाल्यानंतर अवांतर वाचन आणि लेखन यात आपला बराचसा फावला वेळ घालवायला लागलो. आनंदघन या नावाची अनुदिनी (ब्लॉग) सुरू करून दिली, आणखी कांही खाती उघडली आणि त्यावर चार चार शब्द टाकत राहिलो. ईमेल्स, फेसबुक, वॉट्सअॅप वगैरेंच्या आगमनामुळे ब्लॉगिंग कमी झाले होते. पण फेसबुक आणि वॉट्सअॅप यावरील पोस्ट्स क्षणभंगुर असतात आणि आता ईमेलग्रुप्स कालबाह्य होऊ लागले आहेत. हे पाहता मी पुन्हा ब्लॉगिंगकडे जरासे जास्त लक्ष देऊ लागलो. या ठिकाणी लिहिलेले लेख बराच काळ तिथेच राहतात आणि वाचकांना कालांतरानेसुध्दा ते पाहता येतात. माझे लिहिणे कमी झाल्यानंतरसुध्दा वाचकांच्या टिचक्यांची संख्या वाढतच गेली यावरून असे दिसते. यामुळे मी पुन्हा तिकडे लक्ष द्यायचे ठरवले आहे. त्याशिवाय शिक्षणविवेक या नियतकालिकाच्या वेबव्हर्जनवर लिहायची संधी मिळाली आणि मी शास्त्रीय शोध व संशोधक यांच्यावर एक लेखमालिका सुरू केली. ती वर्षभर अखंडपणे चालवली.

“जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका, सावध! ऎका पुढल्या हाका”
ही कवि केशवसुतांनी फुंकलेली तुतारीसुध्दा शंभर वर्षांहून जास्त जुनी होऊन गेली तरी अजून अभंग आहे. “इतिहासाचे ओझे खांद्यावरून फेकून द्या, त्याची पाने फाडून आणि जाळून टाका” अशी जळजळीत वक्तव्ये अनेकदा कानावर पडतात आणि त्या क्षणी ती बरोबर वाटतात. पण नवे पान उलटले तरी पूर्वीची काही पाने मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी लपून बसतात. त्यांच्यावर ढीगभर धूळ बसून ती दिसेनाशी झाली तरी अचानक त्यातल्या एकाद्या पानावरची धूळ पुसली जाते आणि आधी लिहिलेले लख्ख दिसायला लागते. इतकेच नव्हे तर त्यांच्या आधाराने नव्या पानांवर नव्या नोंदी लिहिणे सुरू होते असेही काही अनुभव येतात. पन्नास पंचावन्न वर्षे संपर्कात नसलेले कांही मित्र मला गेल्या एक दोन वर्षांमध्ये अचानक सापडले तर कांहींना मी शोधून काढले आणि पुन्हा त्यांच्याशी अरे तुरेच्या भाषेत बोलणे सुरू झाले. ज्या लोकांनी मला माझ्या लहानपणापासून पाहिले आहे अशी मला एकेरीत संबोधणारी माझ्या संपर्कात असलेली माणसे आता तशी कमीच राहिली आहेत आणि दर वर्षी ती कमी की होत चालली आहेत. खूप वर्षांनंतर तसे बोलणारी आणखी कांही माणसे पुन्हा भेटली तर त्यातून मिळणारा आनंद औरच असतो. असा अनुपम आनंद त्या वर्षाची उपलब्धी ठरते.

नव्या वर्षाचे स्वागत करण्यानिमित्य आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना शुभेच्छा पाठवल्या जातात. कुठल्याही वर्षात फक्त चांगल्याच घटना घडल्या असे आजवर कधी घडलेले नाही आणि पुढल्या वर्षी तरी ते कसे घडणार आहे? पण असे घडावे अशा शुभेच्छा द्यायला किंवा असा विचार करायला काय हरकत आहे? मिर्झा गालिबच्या शब्दात सांगायचे झाल्यास “दिल बहलानेके लिये ये खयाल अच्छा है।” शुभेच्छा, आशीर्वाद वगैरेंचा अगदी किंचितही लाभ मिळत असेल, “दुवाओंका असर” होत असेल तर त्या देण्यात कंजूसी कशाला करायची? मुख्य म्हणजे या निमित्याने आपण इतक्या लोकांच्या संपर्कात येतो, त्यांच्याशी औपचारिक का होईना पण एक संवाद साधला जातो, आपलेही इतके हितचिंतक आपल्या पाठीशी आहेत हे समजते याचेच खूप समाधान मिळते, आधार वाटतो आणि मन उल्हसित होते. काही काही संदेश तर फारच सुरेख असतात. ते वाचूनच छान वाटायला लागते. माझ्या एका मित्राने पाठवलेला हाच संदेश पहा. मला जमेल तेवढा त्याचा अनुवाद मी केला आहे.

नव्या वर्षाच्या शुभेच्छा!
सर्व ऋतूंसाठी, ऊनपाऊस, वादळवारे या सर्वांसाठी शुभेच्छा!
तुम्ही सागरकिनाऱ्यावर फिरत असतांना शुभेच्छा!
तुम्ही आपल्या खुर्चीवर बसून कामात गढलेले असतांना शुभेच्छा!
तुमच्या आसपासचे वातावरण कुंद झाले असतांनाही शुभेच्छा!
तुमचा आनंद अनेकपटीने वाढत जावो, तुमचे सगळे कष्ट नष्ट होवोत, तुम्ही प्रतिकूल परिस्थितीचे रूपांतर संधींमध्ये करून घ्याल, तुम्हाला सुदैवाची साथ मिळेल, तुम्ही यशस्वी व्हाल अशी प्रार्थना.
हे वर्ष आणि हे आयुष्यच तुमच्यासाठी महान ठरो.
(Have a great year, a great life)

दुसऱ्या मित्रांनी पाठवलेल्या शुभेच्छांची गोळाबेरीज पहा.
नववर्षात तुझ्या आणि तुझ्या प्रियजनांच्या सुखसमृद्धीसाठी शुभेच्छा
या नव्या वर्षात तुला अत्यानंद, उत्तम आरोग्य, मनःशांती आणि समृध्दीचे वरदान मिळो.
तू तुझी स्वप्ने, निर्धार आणि वचनांचा मनःपूर्वक पाठपुरावा करशील.
भूतकाळाचे विचार नको .. ते अश्रूंना आणतात
भविष्यकाळाचे विचार नको … त्यातून भीती येते
वर्तमानकाळात जग … त्यामधून आनंद घे
हे वर्ष आणि पुढील अनेक वर्षे तुझ्यासाठी आणू देत
अमर्याद आनंद
कल्पनातीत यश
आरोग्य हीच संपत्ती
संपत्ती हे आभूषण
आणि देव सदैव तुझा पाठीराखा असो
———————————————————–

मागील वर्ष संपता संपता माझ्या मनात आलेले दोन विचार मी फेसबुकावर मांडले होते. ते एकत्र करून या पोस्टमध्ये देत आहे. गतवर्षी माझ्या जवळच्या व्यक्ती दुर्दैवाने दिवंगत झाल्या त्यांच्या आठवणीने माझ्या मनात जे चलबिचल झाले ते पहिल्या लेखात व्यक्त केले आहे आणि इंग्रजी नववर्षदिनाचा जल्लोश लोकांनी करू नये अशी नकारघंटा अनेक लोक वाजवत असतांनासुध्दा बहुतेक लोक हा दिवस का उत्साहाने साजरा करतात याचे कारण शोधण्याचा प्रयत्न मी यातल्या दुसऱ्या लेखात केला आहे.
————————————————–
१. वियोग
नैनम् छिन्दंति शस्त्राणि नैनम् दहति पावकः। न चैनम् क्लेबयंत्यापो न शोषयति मारुतः।।
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृण्हाति नरोपराणि। तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्न्यानि संयाति नवानि देही।।
आत्मा अमर असतो, कपडे बदलल्याप्रमाणे तो शरीरे बदलत असतो वगैरे गीतेमधले तत्वज्ञान सामान्य माणसाच्या मनाची समजूत घालू शकत नाही. जी प्रिय व्यक्ति आपल्याशी बोलते, आपल्याबरोबर खेळते, हंसते किंवा रडते, आपली काळजी करते किंवा घेते, प्रेम करते किंवा रागावते, रुसते वगैरे हे सगळे ती व्यक्ती तिच्या शरीरामार्फतच करत असते आणि ते शरीर नष्ट झाल्यानंतर हे सगळे कायमचे थांबते. त्यानंतर तिचा अमर आत्मा स्वर्गात गेला, परमात्म्यात विलीन झाला, त्याने दुसरा जन्म घेतला किंवा इतर धर्मांत सांगितल्याप्रमाणे तो जजमेंट डे किंवा कयामतची वाट पहात शांतपणे स्वस्थ बसला असला, किंवा इथेच आसपास भरकटत असला, यातले कांहीही झाले असले तरी यापुढे त्याच्याशी आपला कसलाही संपर्क राहणार नाही या विचाराने मन अस्वस्थ होतेच.

शिशिर ऋतूमध्ये झाडांची पाने पिकून गळतात आणि वसंतात त्यांना नवी पालवी फुटते हा निसर्गक्रम असतो. शास्त्रीय भाषेत सांगायचे झाल्यास पानांमधले क्लोरोफिल हे द्रव्य नष्ट होते, ती पाने हवेमधला कार्बनडायॉक्साइड वायू शोषून घेऊन हवेला प्राणवायू देणे थांबवतात, झाडाकडून अन्नपाणी घेणे आणि झाडासाठी अन्नरस तयार करणे ही दोन्ही कामे करत नाहीत. अशी निरुपयोगी झालेली पाने गळून पडतात आणि पाचोळा होतात. माणसांच्या बाबतीत कांहीसा तसाच प्रकार होतो. नट, गायक, चित्रकार, खेळाडू वगैरे मंडळी त्यांच्या बहराच्या काळात जगाला खूप आनंद देतात, पण तो बहराचा काळ ओसरल्यानंतर ते लोक प्रकाशाच्या झोतात रहात नाहीत, वर्षानुवर्षे कुणालाही त्यांची माहिती नसते. कधी तरी त्यांच्या निधनाची बातमी येते तेंव्हा त्यांचे चाहते क्षणभर हळहळतात, पण खरे तर त्या गुणी लोकांचे जीवंत असणे किंवा नसणे याला तोंपर्यंत इतरांच्या दृष्टीने फारसा अर्थ उरलेला नसतो. गेल्या वर्षात अशी किती प्रसिध्द माणसे या जगाचा निरोप घेऊन देवाघरी गेली याच्या याद्या पुढल्या एक दोन दिवसात वर्तमानपत्रांमध्ये येत राहतील.

नोकरीमध्ये माझ्या आयुष्यात आलेले कित्येक लोक पंधरा वीस किंवा त्याहून अधिक वर्षांपूर्वी नोकरी सोडून गेले किंवा सेवानिवृत्त झाले आणि माझ्या संपर्कक्षेत्राच्या बाहेर गेले. त्यानंतर ते कुठे आणि कसे रहात होते की अनंतात विलीन होऊन गेले होते याची मला काहीच माहिती मिळत नव्हती. अशातला एकादा दिवंगत झाल्याची बातमी येते आणि झर्रकन त्याच्या संबंधातल्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर येऊन जातात एवढेच होते. काही लोकांची प्रत्यक्षात भेट होत नसली तरी सोशल मीडियावर अधून मधून गाठ पडत असते आणि काही लोक अचानकपणे भेटतसुध्दा असतात. त्यांच्या सोडून जाण्याने मनाला जास्त तीव्र चटका लागतो. या दोन्ही प्रकारचे तीन चार मित्र गेल्या वर्षभरात दिवंगत झाले. अशा बातम्यांमुळे दुःख होतेच, पण त्यातले जे आपल्यापेक्षा वयाने लहान असतात त्यांच्या जाण्यामुळे एक प्रकारचा धक्कासुध्दा बसतो.

नातेवाईक कधी नात्यामधून रिटायर होत नाहीत. ते परगावी किंवा परदेशीसुध्दा गेले तरी संपर्कात असतात. त्यांच्याशी किती जवळचे व्यक्तीगत संबंध जुळतात आणि जुळून राहतात ते एकमेकांच्या वागण्याप्रमाणे ठरते. त्यामुळे त्यानुसार कमी जास्त तीव्रतेचे दुःख होते. त्यांचा कायमचा वियोग सहन करणे बरेच कठीण असते.

नोकरीमध्ये चांगली प्रमोशन्स मिळत गेली, व्यवसायात चांगला जम बसला, मुले मार्गाला लागली, घरात सुना, जावई, नातवंडे वगैरे आली म्हणजे माणसाच्या जीवनाची इतिकर्तव्यता संपली. अशी पिकली पाने हे जग सोडून गेली तर त्यांचे सोने झाले असे पूर्वीच्या काळात म्हणत असत. पण अशी वडीलधारी माणसे आपल्याला हवीच असतात. अचानक त्यांच्या निवर्तनाच्या मनाला सुन्न करणाऱ्या वार्ता येतात. काही नातेवाइकांच्या पुढच्या पिढीतल्या कुटुंबांचा संसार अजून पूर्ण झालेला नसतो, त्यांच्या किती तरी आशाआकांक्षा आणि योजना अर्धवट राहिलेल्या असतात. अशा वेळी त्यांच्या संसाररथाचे एक चाक निखळून पडले तर त्यामुळे होणाऱ्या मात्र वेदना सोसवत नाहीत.

मनातून इच्छा नसली तरी अखेर गेल्या वर्षाने दिलेल्या या चटक्यांचा उल्लेख करून डोळ्यांमधले आंसू पुसती ओठावरले गाणे असे म्हणत त्याला निरोप द्यावा लागतो.
———————————————————————————-
२. नकारघंटा
वॉट्सअॅप आणि फेसबुकवर रोज ज्ञानगंगेच्या अनंत धारा धो धो वहात असतात, “मार्केट में नया है” असे सांगून विनोदांच्या शिळ्याच कढीला पुनःपुनः ऊत आणला जात असतो, चमत्कृतिपूर्ण किंवा अविश्वसनीय कामे करणारी नवनवी यंत्रे, अफलातून आकारांच्या इमारती आणि निसर्ग सौंदर्याची किंवा सुंदरींची आकर्षक चित्रे आणि चलचित्रे दाखवली जात असतात, अधून मधून सुरेल गायन वादनसुध्दा ऐकायला आणि पहायला मिळते. पण संगीतामधल्या कुठल्याही वाद्यापेक्षा जास्त वेळा सोशल मीडियावर वाजवले जाणारे एक वाद्य आहे ते म्हणजे नकारघंटा.

नकारघंटा वाजवणाऱ्यांचेसुद्धा अनेक प्रकार आहेत. पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा उपदेश देणारे पोस्ट फटाके नकोत, गोंगाट नको, प्लॅस्टिक नको, थर्मोकोल नको, पाणी वाया घालवू नका, अमूक करू नका, तमूक करू नका वगैरे नकार सांगत असतात. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र वगैरेंच्या काळात या नकारघंटा सतत घणघणत राहतात. त्या प्रचाराच्या तसेच कुठल्याही आधुनिक, पुरोगामी विचारांच्या नांवाने सतत शंखनाद केला जातोच, पण हॅपी या शब्दालाच संस्कृतिसंरक्षणाच्या ऐसपैस छत्रछायेत सरसकट नकारघंटा वाजवली जाते. त्यांच्या दृष्टीने हॅपी बर्थडे, हॅपी दिवाली, हॅपी होली वगैरे म्हणणे म्हणजे शांतम् पापम्. मेरी ख्रिसमस आणि हॅपी न्यू ईयर म्हणणारा तर पुरता धर्मभ्रष्टच नव्हे तर चक्क देशद्रोही असल्यासारखे दाखवले जाते. यामधले मूळ विचार कदाचित थोडे बरोबर आहेत, पर्यावरण आणि संस्कृति यांचे महत्व आहेच. मी सुध्दा माझ्या लहानपणापासून त्यांना सुसंगत असेच वागायचा प्रयत्न करत असतो, पण सतत नकारघंटा वाजवणेही मला आवडत नाही.

काही लेखांमध्ये जरा विनोदी उपाय सांगितले जातात. केकच्या ऐवजी उकडीचे मोदक खा, व्हिस्कीऐवजी कडुलिंबाचा काढा किंवा गोमूत्र प्या, सांताच्या गोंड्याच्या टोपीऐवजी केशरी पटका बांधा वगैरे वगैरे. पण त्यांची तरी काय गरज आहे ? मुळात कोण या पोस्टा तयार करतात कोण जाणे, पण आला संदेश की त्याला ढकल पुढे असे करणारे असंख्य पोस्टमन मात्र तयार झाले आहेत. अशा एकाद्या पोस्टमनला त्याबद्दल विचारलेच तर “मी फॉरवर्डेड अॅज रिसीव्ह्ड असे लिहिले आहे ना !” असे म्हणून बगला झटकतो. जसे काही “आम्ही पालखीचे भोई, आम्ही पालखीचे भोई, पालखीत कोण आम्ही पुसायाचे नाही।” हे त्याचे ब्रीदवाक्य असावे. आज ज्या प्रमाणात साक्षरतेचा आणि मोबाइल फोन्सचा प्रसार झाला आहे ते पाहता हे सगळे संदेश प्रत्येक माणसाकडे नसले तरी बहुतेक सर्व कुटुंबांपर्यंत नक्कीच पोचतात. पण त्यांचा किती परिणाम होतो हा संशोधनाचा गहन विषय आहे.

“आपले लोक म्हणजे ना, गाढवं आहेत. त्यांच्यापुढे कितीही गीता वाचा, त्यांना ढिम्म होत नाही.” असे म्हणणाऱ्यांची मला मजा वाटते. यांना जर इतके समजते तर ते कशाला गीता वाचायला जातात ? या बाबतीत पहायचे झाले तर गाढव आणि माणूस यांच्यातला फरक ते नीट समजून घेत नसावेत. कुणी तरी गाढवांना कधी हंसतांना, गातांना, नाचतांना पाहिले आहे कां ? ती नेहमी एकाद्या स्थितप्रज्ञ योग्याप्रमाणे (ही उपमा स्व.पुलंची आहे) शांत असतात, पण माणसांना मात्र आनंदाने गावे, ओरडावे, नाचावे, उड्या माराव्यात असे मनातून वाटते. त्यांना देवाने किंवा निसर्गाने हे एक प्रकारचे वरदान दिले आहे. गणेशोत्सव, गरबा, लग्नाची वरात, वाढदिवस किंवा नववर्षदिन ही फक्त निमित्ये असतात. त्यात भाग घेणाऱ्या माणसांना आनंदाने धुंद होण्याची हौस असते हे मुख्य कारण आहे आणि ती हौस या ना त्या स्वरूपात व्यक्त होतेच. धनाढ्य लोक एअरकंडीशन्ड डिस्कोमध्ये नाचतील तर गरीब आदिवासी रानातल्या त्यांच्या पाड्यामध्ये, कुणी भाविक टाळमृदुंगाच्या तालावर नाचत भजन करतील तर कुणी ऑर्गनच्या सुरात कॅरोल्स गातील, या सगळ्यांच्या मागे मानवी स्वभावातली आनंद प्रकट करण्याची ऊर्मी असते.

त्यामुळे कोणीही आणि कितीही शंखध्वनि किंवा घंटानाद केला तरी निरनिराळे उत्सव हे उत्साहात साजरे होत जाणारच. दर वर्षीप्रमाणेच या वर्षीही ख्रिसमस साजरा होऊन गेला आणि आता नववर्षदिनाच्या पार्ट्यांचा जल्लोश आणि धिंगाणासुध्दा होईल. आणि मला वाटते की सगळे जग जेंव्हा उल्हासाने भारलेले असेल तेंव्हा आपण तरी काय म्हणून आंबट चेहरा करून काळोखात बसा ?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: