सुप्रसिद्ध संगीतकार स्व. सलिल चौधरी

 

salil1दहा वर्षांपूर्वी आम्ही आमच्या वैज्ञानिकांच्या वसाहतीत स्व.सलिल चौधरी यांच्या जीवनकार्यावर एक परिसंवाद ठेवला होता. त्या वेळी मी सात भागात लिहिलेला हा लेख एकत्र संकलित करून या ठिकाणी दिला आहे.

विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणारी माणसे अरसिक आणि रुक्ष मनोवृत्तीची असतात असा एक गैरसमज उगाचच पसरवला जातो. नेहमी आपल्याच धुंदीत रहात असल्यासारखी भासणारी ही माणसे किती कलाप्रेमी असतात हे इतरांना चांगले कळावे अशा प्रकारच्या कांही उपक्रमांचे आयोजनदेखील ते अधून मधून करत असतात. प्रामुख्याने वैज्ञानिक व तंत्रज्ञांची वस्ती असलेल्या अणुशक्तीनगरमधील कलाप्रेमी लोकांनी मागील वर्षी एक वेगळ्याच प्रकारचा कार्यक्रम तिथल्या सभागृहात घडवून आणला होता. सुप्रसिद्ध संगीतकार स्व.सलिल चौधरी यांच्या जन्मदिनानिमित्य त्यांच्या सांगीतिक जीवनावर या वैज्ञानिक लोकांनी चक्क एक परिसंवाद ठेवला.

विषयांवरील परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा वगैरेंच्या थाटातच या कार्यक्रमाची एकंदरीत आंखणी केली होती. स्वागत गीत, दीप प्रज्वलन, विधीवत उद्घाटन, स्मरणिकेचे प्रकाशन, मान्यवरांचे सत्कार, प्रमुख पाहुण्यांचे अभिभाषण, इतर वक्त्यांची व्याख्याने व त्यावर चर्चा वगैरे सारी रूपरेषा तशीच होती. फक्त त्यातला विषय मात्र आगळा वेगळा होता. “संगीत हे ऐकायचे असते. त्यावर चर्चा कसली करताहेत?” किंवा “असल्या कार्यक्रमासाठी रविवारची सुटी कोण वाया घालवणार आहे?” असे प्रश्न कोणाच्या मनात आले असतील तर त्याला सडेतोड उत्तर मिळावे इतकी चांगली उपस्थिती या कार्यक्रमाला झाली आणि तीही त्याच्या प्रवेशशुल्कासाठी पदरमोड करून आलेल्या रसिकजनांची. हा कार्यक्रम इतका रंगला की सर्व प्रेक्षक व श्रोते दिवसभर आपल्या आसनाला खिळून राहिले होते. सकाळचे चहापान व दुपारचे जेवण यांची सोयही तिथेच केली होती. त्यासाठी मध्यंतरात थोडा वेळ उठावे लागत होते तेवढेच.

सलिल चौधरी यांच्या पत्नी व बंगालीमधील सुप्रसिद्ध गायिका श्रीमती सबिता चौधरी या प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांनी फार म्हणजे फारच सुंदर भाषण केले. या भाषणातून त्यांनी सलिलदांचे मधुर संगीत, त्यांच्या बहुमुखी प्रतिभेचे इतर अनेक क्षेत्रातील आविष्कार आणि कांही हृद्य व्यक्तीगत आठवणी यांचा सुंदर मिलाफ घडवून आणलाच. शिवाय आपल्या कोकिळकंठातून त्यांच्या अनेक गाण्यांच्या ओळी कोठल्याही साथीविना ऐकवून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. उतारवयातसुद्धा त्यांनी दाखवलेली आवाजावरील मजबूत पकड, संगणकासारखी तल्लख स्मरणशक्ती आणि मुद्देसूद उत्तरे या सगळ्याच गोष्टी अचंभित करण्यासारख्या होत्या. नंतर सादर करण्यात आलेल्या कार्यक्रमातसुद्धा त्या पदोपदी आपल्या आठवणीतून अधिकाधिक माहिती सांगत होत्या. मी कधीही न ऐकलेल्या किंवा न वाचलेल्या किती तरी गोष्टी सबितादींनी त्या दिवशी सांगून आमच्या ज्ञानात मोलाची भर टाकली. त्यातली थोडी माहिती पुढील भागात देईन.

पहिले व्याख्यान सलिलदांचे सुपुत्र संजय चौधरी यांनी दिले. ‘लोकसंगीत आणि पाश्चात्य संगीत यांचा सलिलदांच्या रचनांवर पडलेला प्रभाव’ हे शीर्षक असले तरी त्यांनी फारसे अभ्यासपूर्ण असे गंभीर वक्तव्य केले नाही. या प्रकारच्या संगीताशी सलिलदांचा संपर्क कसा आला याबद्दलच ते जास्त बोलले. त्यांना स्वतःला बॉक्सिंगची आवड होती आणि त्यांनी त्यात प्राविण्यसुद्धा मिळवले होते. घरातच संगीत असल्यामुळे सलिलदांनी त्यांना संगीताच्या क्षेत्रात कांहीसा जोर लावून खेचूनच आणले असे ते म्हणाले, पण त्यांनी स्वतः दिलेले सुरेल संगीत ऐकल्यावर त्यांनासुद्धा मनापासून संगीतात रुची व प्रतिभा होतीच हे स्पष्ट दिसते.

भाभा अणुसंधान केंद्रातील संगणक विभागाचे प्रमुखपद सांभाळणारे पण साहित्य व संगीतात प्रवीण असलेले श्री आल्हाद आपटे यांचे अतीशय प्रगल्भ असे भाषण झाले. ‘सलिल चौधरी यांची जीवनरेखा व त्यांच्या रचना’ हा या परिसंवादाचा गाभा असलेला विषय निवडून त्याचा विस्तृत अभ्यास त्यांनी केला होता. सलिलदांच्या जीवनातील प्रमुख टप्पे थोडक्यात सांगून त्यांनी केलेल्या अनेकविध प्रकारच्या रचनांचे उत्तम रसग्रहण त्यांनी सादर केले. शास्त्रीय संगीत, लोकगीते, क्लब डान्स, प्रेमगीते, विरहगीते, भारतीय पद्धतीची सुरावटीवर आधारलेली गाणी तसेच थिरकत्या लयीवर रचलेल्या उडत्या स्वरांच्या चाली असे अनेक प्रकार सलिलदांनी समर्थपणे हाताळले होते.

यातील प्रत्येक प्रकारातली गाणी उच्च कोटीची होती आणि आजवर लोकप्रिय आहेत. त्यांची मार्मिक माहिती आपटे यांनी थोडक्यात पण मुद्देसूदपणे दिली. साहिती या गुणी गायिकेने नमून्यादाखल त्यातील कांही गाणी ऐकवून व्याख्यानातील मुद्दे स्पष्ट होण्यास मदत केली. शिवाय अधून मधून सबितादींनी कांही गाण्यांचा इतिहास किंवा कांही ‘अंदरकी बाते’ सांगून मजा आणली. उदाहरणार्थ मधुमती या चित्रपटातील ‘आजारे परदेसी’ हे अप्रतिम गाणे त्या चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक बिमल रॉय यांना कथानकाशी अनुरूप वाटत नव्हते आणि हे गाणे चित्रपटातून गाळण्याचा विचारसुद्धा ते करीत होते. पण सलिलदांनी आग्रह धरल्यामुळे ते गाणे राहिले आणि सुपर डूपर हिट होऊन अजरामर झाले.

लघुपट आणि मालिका निर्माण करणारे श्री.कृष्णराघव यांनी सलिल चौधरी यांनी चित्रपटांव्यतिरिक्त इतर क्षेत्रांमध्ये केलेल्या सांगीतिक कार्याचा गोषवारा दिला. त्यांनी रचलेल्या मधुर गाण्यांच्या चाली आपल्याला माहीत आहेत. पण अत्यंत प्रभावी पार्श्वसंगीत देऊन वातावरणनिर्मिती करण्यात ते कुशल होते आणि अनेक लघुपटांमध्ये व मालिकांमध्ये त्यांच्या या कौशल्याचा वापर करण्यात आला होता. त्यासाठी ते किती खोलवर विचार करत असत, विशिष्ट परिणाम साधण्यासाठी कोणत्या वाद्याचा कसा उपयोग करून घेत असत याबद्दल कृष्णराघव यांनी सांगितले. एकदा तर पार्श्वसंगीतासाठी सरकारकडून मंजूरी मिळालेले बजेट खर्च होऊन गेले होते तरी त्यानंतरसुद्धा त्यांनी एका विशिष्ट प्रसंगासाठी आपल्या खर्चाने वादकाला बोलावून घेऊन त्यांच्या मनातले सनईचे सूर दिल्याची आठवण त्यांनी सांगितली. सलिल चौधरी यांनी अनेकविध वाद्यांचा चपखल उपयोग तर करून घेतलाच पण मानवी आवाज, पक्ष्यांची किलबिल, गुरांचे हंबरणे यासारखे नादसुद्धा त्यांनी पार्श्वसंगीतात आणले. सलिल चौधरी यांचे पार्श्वसंगीत इतके लोकप्रिय झाले होते की कानूनसारख्या गाणी नसलेल्या कांही चित्रपटांचे पार्श्वसंगीत दिग्दर्शन आवर्जून त्यांना दिले गेले. एकंदर सिनेमासाठी त्यांचे पार्श्वसंगीत आणि त्यातली गाणी तेवढी दुस-याच संगीत दिग्दर्शनाने दिल्याची उदाहरणेसुद्धा आहेत.
केरळमधील श्री.टी.उन्नीकृष्णन यांनी केलेल्या भाषणात सलिल चौधरी यांनी इतर भारतीय भाषांमधील चित्रपटांना दिलेल्या संगीताबद्दल माहिती भाषणात दिली. ‘चेम्मीन’या मल्याळी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर मल्याळी सिनेमाच्या विश्वात सलिल चौधरी खूपच लोकप्रिय झाले. भारतातील जवळ जवळ सर्व भाषांमध्ये निघालेल्या चित्रपटांना संगीत देणारे ते एकमेव संगीत दिग्दर्शक असावेत. एका मराठी सिनेमालासुद्धा त्यांनी संगीत दिले होते, पण तो तेवढा गाजला नाही. एका भाषेतील चित्रपटातल्या गाण्याच्या चाली ते अनेक वेळा दुस-या भाषेतल्या गाण्याला देत असत. एवढेच नव्हे तर एका गाण्याच्या सुरुवातीच्या आधी दिलेल्या किंवा दोन कडव्यांमधल्या वाद्यसंगीताच्या लकेरीवर नंतर स्वतंत्र गाण्याची चाल रचल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. पण असे करतांना ते त्या चित्रपटातील प्रसंग व वातावरणाचे भान ठेऊन त्यानुसार त्यात फेरफार करीत व त्यासाठी योग्य त्याच वाद्यांची जोड त्याला देत असत. श्री.उन्नीकृष्णन स्वतः संगीतज्ञ व उत्कृष्ट गायक आहेत. ते खैरागढ संगीत विद्यापीठात अध्यापनाचे काम
करतात. उदाहरणादाखल त्यांनी आपल्या खड्या आवाजात फक्त कीबोर्डच्या कॉर्डच्या आधारावर कांही छान गाणी म्हणून दाखवली. तसेच गायकाच्या आवाजातील वैशिष्ट्यानुसार सलिलदा कोणत्या प्रकारच्या गाण्यासाठी कोणाची निवड करायची ते कसे ठरवत असत तेही दाखवून दिले.
salil2

स्व.सलिल चौधरी यांची जीवनयात्रासुद्धा त्यांच्या संगीतासारखीच विलक्षण होती असे म्हणता येईल. त्यांचे वडील आसाममधील चहाच्या मळ्यांमध्ये डॉक्टर म्हणून काम करीत. या मळ्यांचे मालक त्या काळी बहुधा ब्रिटीश असत तर मजूरवर्ग भारतीय, त्यातही बहुतांश गिरीजन असे. त्यांच्याबद्दल डॉक्टरांना जास्त आपुलकी वाटत असे आणि वेळ पडल्यास ते मालकांविरुद्ध मजूरांना साथ देत असत. हल्ली सुरू असलेल्या ‘असंभव’ या मालिकेमध्ये आलेल्या ‘श्रीरंग रानडे’ हे पात्र पाहून मला सलिलदांच्या पिताजींची आठवण झाली.

सलिलदांचे बालपण चहाच्या मळ्यांच्या निसर्गरम्य परिसरात गेले. ब्रिटीश मालकवर्गाच्या सहवासामुळे आणि जात्याच आवड असल्यामुळे सलिलदांच्या वडिलांनी पाश्चात्य संगीताच्या ध्वनीमुद्रिकांचा प्रचंड संग्रह केला होता. त्यातली गाणी ऐकत मोझार्ट आणि बिथोवन यांच्या रचनामधून सलिलदांनी स्वरांची ओळख करून घेतली. कुशाग्र बुद्धीमत्ता आणि ग्रहणशीलता असल्यामुळे कुठल्याही गुरूच्या मार्गदर्शनाशिवायच ते स्वरमालिका शिकले एवढेच नव्हे तर ऐकलेले किंवा सुचलेले स्वर लिपीबद्ध करू लागले. पियानो, हार्मोनियम व व्हायलिनसारखी पाश्चात्य वाद्ये आणि बांसुरीसारखी भारतीय वाद्येदेखील ते आपल्या स्वतःच्या प्रयत्नानेच वाजवायला शिकले. मजूरांच्या सान्निध्यात राहून त्यांनी ईशान्य भारतातील लोकसंगीत भरपूर ऐकले आणि तेही आत्मसात केले. शांत निसर्गरम्य ठिकाणी बसून पांव्याचे मधुर स्वर आळवायचा नाद त्यांना लागला.

संगीताच्या क्षेत्रात अशी एकट्याने वाटचाल सुरू असतांना त्यांच्या मनावर साम्यवादी विचारांचा प्रभाव पडत होता. गरीब मजूरांना एकत्र आणून त्यांच्या समस्यासाठी लढा देणे वगैरे गतिविधींना सुरुवात झाली. त्या विषयांना अनुरूप अशी ज्वलंत गाणी रचून व त्यांना आकर्षक चाली लावून ती कामगारांकडून म्हणवून घेणे, त्यांच्यासाठी नाटके व पथनाट्ये लिहून ती बसवणे हा सुद्धा लढ्याचा एक भाग म्हणून त्यांनी केला. अशा विविध माध्यमांमधून आपले क्रांतिकारी विचार दीनदुबळ्या जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या कार्यात गुंतल्यामुळे दुस-या महायुद्धाच्या काळात त्यांना भूमीगत व्हावे लागले. पुढील काळात ते संगीताकडे वळले नसते तर खचितच राजकीय पुढारी झाले असते, किंवा कदाचित प्रसिद्ध साहित्यिकही झाले असते. या सगळ्या क्षेत्रात त्यांना रुची होती तसेच चांगल्यापैकी गतीसुद्धा होती आणि मुख्य म्हणजे शिखरापर्यंत चढून जाण्याची जिद्द व क्षमता होती.
त्यांनी गाणी लिहिली तसेच कथासुद्धा लिहिल्या आणि त्या चांगल्या गाजल्या. त्यांनी लिहिलेली नाटके बंगाली रंगभूमीवर आली आणि लोकप्रिय झाली. बंगाली भाषेतील चित्रपटांसाठी कथा व गाणी लिहिली ती सुद्धा यशस्वी झाली. बंगाली चित्रपटक्षेत्रात त्यांचे नांव झाले. कोलकाता शहरात मोलमजूरी करून आपली गांवाकडील जमीन सावकाराच्या पाशातून सोडवण्याची स्वप्ने पाहणा-या गरीब बिचा-या माणसाच्या जीवनाची कशी फरपट होते या गोष्टीवर त्यांनी लिहिलेली कथा ‘रिक्शावाला’ या नांवाने बंगाली सिनेमाच्या पडद्यावर आली.

ती पाहून तिचे हिंदीत रूपांतर करण्यासाठी स्व.बिमल रॉय यांनी सलिल चौधरी यांना मुंबईला पाचारण केले आणि या कथेवर आधारित ‘दो बीघा जमीन’ हा चित्रपट करण्यासाठी ते मुंबईला आले. हा चित्रपट चांगला गाजला. बिमल रॉय यांचे कुशल दिग्दर्शन व बलराज साहनी यांनी विलक्षण ताकदीने साकारलेली त्यातली प्रमुख भूमिका तर लक्षात राहिलीच. पण सलिल चौधरींची कथा, त्यांनी दिलेले प्रभावी पार्श्वसंगीत आणि त्यातील ‘धरती कहे पुकारके … मौसम बीता जाये’ हे गाणे खूप गाजले. त्यानंतर अनेक वर्शे ते बिमलदांच्या बरोबर राहिले. बंगाली चित्रपट सुरूच होते. हिंदी व इतर भारतीय भाषांमधील चित्रपट त्यांना एकामागोमाग एक मिळत गेले.

आधी गीतकार गाणे लिहितो, संगीत दिग्दर्शक त्याला चाल लावतो आणि गायक ते गाणे त्या चालीवर म्हणतो अशी बहुतेक लोकांची एक ढोबळ समजूत असते. हा सुद्धा तसा एक महत्वाचा मार्ग आहे. मध्ययुगात होऊन गेलेल्या संतांनी रचलेले अभंग, दोहे, भजने किंवा भा.रा.तांबे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यासारख्या कवींनी कित्येक दशकांपूर्वी केलेल्या उत्तमोत्तम कविता गाण्याच्या रूपात याच मार्गाने आपल्या कानापर्यंत पोचल्या आहेत. “मी कधीही आधी ठरवून कविता लिहीत नाही. ती आपल्याला स्फुरत जाते.” असे कवी मंगेश पाडगांवकर नेहमी आपल्या मुलाखतींमध्ये सांगतात. अर्थातच त्या कवितेला चाल लावणे ही त्यानंतरची गोष्ट झाली. “ज्या वेळी काव्याचे शब्द माझ्या समोर असतात तेंव्हाच मी त्यांना चाल लावतो.” असे संगीतकार श्रीनिवास खळे यांनी एका मुलाखतीत सांगितल्याचे मला आठवते. श्री.यशवंत देवांनी तर ‘शब्दप्रधान गायकी’ या विषयावर खास कार्यक्रम केले आहेत आणि पुस्तकसुद्धा लिहिले आहे. बोलपटांचा जमाना आल्यानंतर ते अधिक आकर्षक व मनोरंजक करण्यासाठी त्यात गाणी घालणे सुरू झाले. त्यासाठी पाहिजे तशी तयार गाणी आयती मिळणे कठीणच असल्यामुळे बव्हंशी ती मुद्दाम लिहिली जाऊ लागली. सुरुवातीच्या काळात आधी सिनेमातील प्रसंगानुसार गीत लिहून ते नंतर स्वरबद्ध केले जात असे. हा सगळा या प्रक्रियेचा एक भाग झाला.

पण जसजशी सिनेमातली गाणी लोकप्रिय होत गेली, लोकांच्या तोंडात बसली तेंव्हा त्यांमधील स्वरांना व ठेक्याला अधिकाधिक महत्व निर्माण झाले. कांही गाणी त्यातील सुंदर अर्थामुळे लक्षात रहायची तर बरीचशी गाणी त्यांच्या गोड किंवा आकर्षक चालीमुळे मनात भरायची. त्यामुळे गीतकार आणि संगीतकार यांनी एकत्र बसून गीतरचना करणे सुरू झाले. संगीतकारांनी धुन ऐकवायची, गीतकारांनी त्यावर शब्द लिहायचे, त्या शब्दांच्या अर्थाला उठाव देतील अशा जागा संगीतकाराने निर्माण करायच्या आणि गायक वा गायिकेकडून त्या घटवून घ्यायच्या, त्या ऐकल्यावर वाटल्यास थोडे शब्द इकडे तिकडे करायचे वगैरे प्रकारे सर्वांच्या सहकार्याने गाणी बनू लागली. ग.दि.माडगूळकर किंवा शांता शेळके यांच्यासारखे संगीताची जाण असलेले गीतकार आणि सुधीर फडके किंवा हृदयनाथ मंगेशकरांसारखे साहित्यप्रेमी संगीतकार एकत्र आल्यावर त्यांनी एकत्र येऊन कित्येक अजरामर अशी गाणी निर्माण केली.

आजच्या काळात सिनेमातील गाणी म्हणजे त्याच्या ठेक्यावर नाचून घ्यायचे एक साधन अशीच लोकांची समजूत झालेली असावी असे कधी कधी दिसते. त्यामुळे त्यातला एक नशा आणणारा, धुंद करणारा जलद ठेका जोरजोरात कानावर आदळत असतो. हिंदी, इंग्रजी, मराठी, पंजाबी अशा कुठल्याही भाषेतले कांही शब्द त्या ठेक्यावर ओढून ताणून बसवलेले असतात. एकतर ते नीट स्पष्टपणे ऐकू येत नाहीत, ऐकू आले तरी समजत नाहीत आणि समजले तरी लक्षात रहात नाहीत कारण त्यातून कांही अर्थाचा बोध व्हावा अशी अपेक्षाच नसते. निवांतपणे बसून ऐकत रहावीत अशी कांही गाणीसुद्धा अधून मधून येतात पण त्यांची टक्केवारी हल्ली कमी झाली आहे.

संगणक क्रांती आल्यानंतर ध्वनीसंयोजनाच्या तंत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. कोठलेही वाद्य प्रत्यक्ष न वाजवता अनंत प्रकारचे नाद कृत्रिम रीत्या निर्माण करणे आता शक्य झाले आहे. स्व.सलिल चौधरी यांच्या काळात ते तंत्र असते तर त्याचा देखील त्यांनी कुशलतेने उपयोग करून घेतला असता यांत शंका नाही. भारतीय व पाश्चात्य संगीतातील सर्व छटा त्यांनी त्यांच्या संगीतात आणल्याच. बंगाली चित्रपटामधील गीते ते स्वतःच लिहीत असत. त्यामुळे आधी चाल की आधी शब्द हे सांगता येणे कठीण आहे. कदाचित या दोन्ही गोष्टी त्यांच्या मनात एकत्रच जन्म घेत असाव्यात. पण बंगालीमध्ये लोकप्रिय झालेल्या चालीवर हिंदी गाणे करायचे असेल तर ते नंतरच लिहावे लागणार. त्यांची बरीचशी गाणी आधी कवी शैलेंद्र यांनी लिहिली आणि नंतर योगेश यांनी. ते दोघेही प्रतिभासंपन्न कवी असल्यामुळे ती गाणी ऐकायला जितकी मधुर वाटतात तितकेच त्यातले भाव सुंदर असतात.

पारंपरिक भारतीय संगीतामध्ये साथीला जी वाद्ये असतात त्यातला तबला किंवा ढोलक वगैरे वाजवून ताल धरतात आणि तानपुरा सुरांचा संदर्भ देत असतो. पेटी, सारंगी वगैरे वाजवणारे साथीदार गायकाने आळवलेले सूरच त्याच्या मागोमाग वाजवून त्याच्या गायनात एक प्रकारचा भराव घालत असतात. या सर्व साजांचे वाजणे सतत चालूच असते. त्यात सुसंवाद साधण्यासाठी केलेले तंबोरे जुळवण्याचे ट्याँव ट्याँव आणि तबल्याची ठाकठूक श्रोत्यांना निमूटपणे ऐकून घ्यावीच लागते. सिनेमामधील गाण्यात मात्र कधी मुख्य गाणे सुरू होण्यापूर्वीच त्याची चाहूल देणारे कांही ध्वनी ऐकू येतात, मुख्य गाण्याच्या सोबतीने दुसरेच कांही वाजत असते आणि ध्रुपद व कडव्यांमधल्या जागा इतर वाद्यांच्या वादनातून भरलेल्या असतात. सारी वाद्ये सहसा सलगपणे वाजत नाहीत. कधी पन्नास व्हायलीन वाजत असल्याचा सामूहिक ध्वनी येईल तर मध्येच एका बांसुरीवर घातलेली शीळ, कुठे मेंडोलिनचा पीस तर कुठे ड्रम्सचे तुकडे. अशा शेकडो व्हरायटीज त्या गाण्यांमध्ये असतात. या सगळ्या वाद्यवृंदाचा सांभाळ करणारा अरेंजर नांवाचा वेगळाच तज्ञ असतो.

सलिलदा संगीत दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरले त्यापूर्वीच पाश्चात्य देशात प्रचलित असलेला ऑर्केस्ट्रा त्यात येऊन स्थिरावला होता. त्यांना तर पाश्चिमात्य संगीताचे बाळकडूच प्यायला मिळाले होते. मनात भारतीय शास्त्रीय तसेच लोकसंगीताची आवड होती. त्या सर्वांचा सुंदर मिलाफ त्यांनी केला. एकदा ते आपण बसवलेले गाणे रेकॉर्ड करत असतांना बोलावलेल्या ऑर्केस्ट्राच्या अरेंजरने “त्यांना यातलं काय कळतंय्?” असा कांहीसा आव आणला. ते सलिलदांना सहन झाले नाही. त्यांना सर्व वाद्यांची माहिती होतीच, स्वरलिपीही समजत होती. त्यांनी त्या अरेंजरलाच रजा देऊन टाकली आणि स्वतःच त्या गाण्याचे ध्वनिसंयोजन केले अशी आठवण कोणी सांगितली. केवळ आपल्याला येतात म्हणून कांही कोणी सगळी कामे आपल्या स्वतःच्या डोक्यावर घेत नाही. पण कोणाशिवाय आपले अडत नाही हा मुद्दा त्यांना दाखवून द्यायचा असणार.

दो बिघा जमीन हा बिमल रॉय यांचा चित्रपट १९५३ साली प्रदर्शित झाला या गोष्टीला आता पन्नास वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. सलिल चौधरी हे मुख्यतः या चित्रपटाचे कथालेखक होते, पण त्यांनी त्याचे संगीत दिग्दर्शनही केले. त्यासाठी त्यांनी स्वरबद्ध केलेली त्यातली चारही गाणी तेंव्हा तर गाजलीच, पण आजदेखील अधून मधून ऐकू येतात. पर्जन्यराजाच्या आगमनाने शेतक-यांच्या मनातले मोर कसे थुई थुई नाचू लागतात त्याचे चित्र “हरियाला सावन ढोल बजाता आया।” या समूहगीताने साक्षात डोळ्यापुढे उभे राहते, तर “भाई रे, धरती कहे पुकारके” या गाण्यात जमीनीपासून दूर जाऊ पाहणा-या किसानाला ती हांका मारते, “कुछ तो निशानी छोड जा ” असे विनवते तसेच “तू फिर आये ना आये” असा इशारा देते. अशा प्रकारे हे गाणे सामाजिक आशयाने भरलेले आहे. सलिलदांच्या सामाजिक जाणीवांचे दर्शन त्यात घडते. “अजब तेरी दुनिया, ओ मोरे रामा” हे एक खास उत्तर भारतीय ढंगाचे, ग्रामीण भागातून महानगरात आलेल्या ‘भय्या’ लोकांचे लोकसंगीत कसे असते त्याचे चांगले उदाहरण आहे. “आजा तू आ, निंदिया तू आ” ही लता मंगेशकरांच्या आवाजातली एक गोड अंगाई आहे.

त्यानंतर पाठोपाठ आलेल्या चित्रपटांमधील गाणीसुद्धा लोकप्रिय होत गेली. कांही गाण्यांच्या चित्रपटांची नांवे आता कदाचित आठवणार नाहीत, किंवा ते कधी पाहिलेसुद्धा नसतील, पण त्या गाण्याची चाल लक्षात राहिली असेसुद्धा सांगता येईल. “नौकरी” हा चित्रपट किती लोकांना आठवत असेल? पण त्यातले “छोटासा घर होगा बादलोंकी छांवमें” या गाण्यात किशोरकुमारने केलेले “हा हा हुइ हुइ हुइहई” मात्र सगळ्यांना आठवते. सलिलदा एकदा काठमांडूला हॉटेलमध्ये उतरले असतांना तिथले गुरखे लोक म्हणत असलेले एक नेपाळी गाणे त्यांच्या कानांवर पडले. त्यांनी ती धुन लक्षात ठेवली आणि तिच्यावर आपले संस्कार करून ती चाल या गाण्याला दिली.

हंसध्वनी या कर्नाटक संगीताकडून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात आलेल्या रागावर आधारलेले “जा तोसे नहीं बोलू कन्हैया। राह चलत पकडी मोरी बैंया।” हे गीत सलिलदांनी “परिवार” या चित्रपटामध्ये दिले आणि लतादीदी आणि मन्ना डे यांनी ते अप्रतिमरीत्या गायिले आहे. त्यात रागदारीच्या सुंदर ताना आहेतच, शिवाय कृष्ण आणि गोपिका यांच्यामधल्या लटक्या रुसव्याफुगव्याचे इतके लोभसवाणे दर्शन घडवणारे ते एक अजरामर गाणे ठरले.

राजकपूरच्या चित्रपटांना बहुधा शंकर जयकिशन यांचेच संगीत असायचे. त्याला अपवाद असलेले जे थोडे सिनेमे आले त्यात “जागते रहो” हे नांव पटकन डोळ्यासमोर येते. हा देखील सामाजिक जाणीव असलेला त्या काळातला एक कलात्मक चित्रपट होता. त्याला कार्लोव्ही व्हेरी इथल्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात प्रथम क्रमांक मिळाला होता. पण त्याच्या कथानकात गाण्यांना योग्य अशा जागा नव्हत्या. तरीसुद्धा सलिलदांनी स्वरबद्ध केलेली त्यातली गाणी तुफान लोकप्रिय झाली, कदाचित ती त्या सिनेमापेक्षाही अधिक चालली. स्व.मोतीलाल यांच्या सकस अभिनयाने सजलेले “जिंदगी ख्वाब है, ख्वाबमें झूठ क्या? और भला सच है क्या?” हे दारुड्याचे गाणे जीवनाचे वास्तव स्वरूप सहजपणे सांगते. त्यात एक भांगडा नाच टांकला आहे. मोहंमद रफी आणि बलबीरसिंग यांनी खड्या आवाजात म्हंटलेल्या त्या गाण्यात पहिल्यांदाच हिंदी प्रेक्षकांनी इतके जोरकस “याँहूँ याँहूँ” आणि “बल्ले बल्ले” ऐकले असेल. घोटभर पाण्यासाठी रात्रभर तडफड केल्यानंतर सकाळी नायकाची तृषा मोठ्या कलात्मक रीतीने शांत होते त्या प्रसंगी दिलेले सकारात्मक जीवन जगण्याचा संदेश देणारे पहिल्या प्रहरी गायल्या जाणा-या भैरव रागावर आधारलेले “जागो मोहन प्यारे” या गाण्याला तर तोड नाही. इतकी गोड आणि शांतरसपूर्ण दुसरी कोणतीही भूपाळी हिंदीमध्ये नसेल.

“अपराधी कौन?” हा रहस्यपट त्यातील कथेच्या त्या काळातल्या नाविन्याने जसा धक्का देणारा होता तसेच त्यातले “द्वार दिलका खुल गया, हाथी निकल गया, दुम रह गयी मगर” हे गाणे गुदगुल्या करणारे होते. रेशमी मुलायम आवाजाचा गायक तलत मेहमूद “एक गांवकी कहानी” या चित्रपटाचा नायक होता. “नीला अंबर झूमे, धरतीको चूमे” आणि “रातने क्या क्या ख्वाब दिखाये” यासारखी तलतने गायिलेली गाणी प्रसिद्ध झाली.

“रातने क्या क्या ख्वाब दिखाये” या गाण्याबद्दल एक मजेदार आठवण माझ्या जीवनाला जोडली गेली आहे. स्टार चॅनेलवर एका काळी गाजलेल्या “मेरी आवाज सुनो” या ‘रिअँलिटी शो’ कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्या वेळी प्रेक्षकात बसण्याची संधी आम्हाला मिळाली होती. अन्नू कपूर हे त्या गाण्याच्या स्पर्धेचे सूत्रसंचालक होते. त्यातल्या एका फैरीमध्ये त्यांनी चिठ्ठ्यांनी भरलेला एक वाडगा प्रेक्षकांसमोर धरला आणि एका कन्यकेला त्यातून गाण्याचे नांव असलेली एक चिठ्ठी काढून ती वाचून दाखवायला सांगितले. तिने उचललेल्या चिठ्ठीवर “रातने क्या क्या ख्वाब दिखाये” या गाण्याचे नांव होते. तिला याची चाल ठाऊक नसल्यामुळे ती ते नांव गद्यातच वाचत होती. “प्रेक्षकांमध्ये कोणाला याची चाल येते काय?” असा प्रश्न अन्नू कपूरने विचारताच लगेच मी हांत वर करून ते गाणे गुणगुणून दांखवले. टीव्हीच्या पडद्यावर झळकण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. तो कार्यक्रम त्या काळी खूप लोकांनी पाहिला आणि माझ्या त्या ‘चमकण्याचे’ सार्थकही झाले.

त्यानंतर आलेल्या “मुसाफिर” सिनेमातील “मुन्ना बडा प्यारा, अम्मीका दुलारा” हे एक मजेदार बालगीत एका कोंकणी लोकगीताच्या चालीवर आधारलेले आहे. त्याच चित्रपटातले “लागी नाही छूटे रामा, चाहे जिया जाये” हे प्रेमगीतसुद्धा खूप चांगले आहे. अशी वाटचाल करत सलिलदांनी पांच वर्षाच्या आंत म्हणजे १९५८ साली ‘मधुमती’ नांवाचे हिंदी चित्रपटांच्या इतिहासातले एक महत्वाचे शिखर गांठले.
salil5

ज्याने मधुमती हा चित्रपट अजून पाहिला नाही किंवा पाहिल्यानंतर त्याला तो आवडला नाही असा हिंदी सिनेमाचा शौकीन आपल्याला सहसा मिळणार नाही. मला तरी अद्याप असा माणूस भेटलेला नाही. अगदी आलमआरा पासून ते काल परवा आलेल्या स्लमडॉग मिलिऑनेअर पर्यंत सर्व हिंदी सिनेमांमधील संगीताच्या दृष्टीने ‘टॉप टेन’ ची यादी बनवल्यास त्यात मधुमतीचे नांव निश्चितपणे येईल असे मला वाटते. खुद्द सलिल चौधरी यांनीसुद्धा मधुमतीच्या यशानंतर पन्नासावर चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले आणि त्यातून उत्तमोत्तम गाणी दिली पण एकंदरीत पाहता मधुमतीची सर त्यातील कोणत्याही चित्रपटाला येऊ शकली नाही असे माझे मत आहे.

असे एवढे काय त्या चित्रपटाच्या संगीतात होते ? यापेक्षा त्यात काय नव्हते या प्रश्नाचे उत्तर देणे अधिक कठीण जाईल. चित्रपटाची सुरुवात होऊन थोडाच वेळ झाल्यावर एका निसर्गरम्य अशा जागेचे दृष्य पडद्यावर येते, चिमण्यांची चिंवचिंव कानावर पडते, धनगराची लकेर ऐकू येते आणि अचानकपणे मुकेशच्या स्वरात एक गाणे सुरू होते, “सुहाना सफर है ये मौसम हंसी” जणु ते आपल्यालाच त्या नयनरम्य ठिकाणी घेऊन जाते. आपण सुद्धा “हमें डर है हम खो न जाये कहीं” असे मनात म्हणतो. दूरवर असलेल्या पहाडीवरून लता मंगेशकरांच्या आंवाजात एक कमालीची मधुर साद ऐकू येते, “आ जा रे, परदेसी, मै तो कबसे खडी उस पार, अँखियाँ थक गयी पंथ निहार।”. महल या चित्रपटांमधल्या “आयेगा, आनेवाला” या गीतापासून गूढ आर्त अशी साद घालणा-या गाण्यांची मालिकाच सुरू झाली. “नैना बरसे रिमझिम रिमझिम”, “कहीं दीप जले कहीं दिल”, “अनजान है कोई”, “या डोळ्यांची दोन पांखरे”, “तू जहाँ जहाँ चलेगा” वगैरे अशा प्रकारची किती तरी ‘हॉँटिंग’ गाणी त्यानंतर आली आहेत. “आ जा रे, परदेसी” हे सुद्धा त्याच पद्धतीचे आणि त्या गूढ आवाजाचा वेध घेण्यास भाग पाडणारे असे गाणे आहे. माझ्या टॉप टेनमध्ये त्याची जागा पक्की आहे.

या गाण्याच्या इंटरल्यूडमध्ये आपल्याला “घडी घडी मोरा दिल धडके” या पुढे येणा-या दुस-या एका गोड गाण्याची चाल ऐकू येते. प्रेमिकाच्या मीलनासाठी आतुर झालेल्या नायिकेच्या हृदयाची तो अमूल्य क्षण जवळ आल्यानंतर जी नाजुक अवस्था होईल ती या गाण्यात अचूक टिपली आहे. “जुल्मीसंग आँख लडी, सखी मै कासे कहूँ।” हे एक प्रेमगीत आणि कुमाँऊँमधील लोकसंगीत यांचे अप्रतिम मिश्रण आहे. प्रेमी जनांच्या जिवाची होणारी तडफड “दिल तडप तडपके कह रहा है आ भी जा। तू हमसे आँख ना चुरा तुझे कसम है, आ भी जा।” या गाण्यात प्रभावीपणे दाखवली आहे. प्रेमिकेशी मीलन न होऊ शकल्याने सर्वस्व गमावून बसलेल्या नायकाचा तीव्र आक्रोश “टूटे हुवे ख्वाबोंने हमको ये सिखाया है। दिलने जिसे पाया था आँखोंने गँवायाहै।” या महंमद रफीच्या गाण्याने प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतल्याशिवाय रहात नाही.

याच्या अगदी उलट “जंगलमें मोर नाचा किसीने ना देखा। हम जो थोडीसी पीके जरा झूमे तो हाय रे सबने देखा।” हे महंमद रफीनेच गायिलेले विनोदी गाणे मनावरचा ताण हलका करते. “हम हालेदिल सुनायेंगे सुनिये के न सुनिये” ही एक खास उत्तर भारतीय ढंगाची ठुमरीसुद्धा मुबारक बेगम यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमध्ये या सिनेमात ऐकायला मिळते आणि “कांची रे कांचीरे” हे नेपाळी पद्धतीचे समूहगीत सुद्धा यात आहे. “दैया रे दैया रे चढ गयो पापी बिछूआ।” हे गाणे तर मला लोकसंगीतातल्या समूहनृत्याचा अगदी परमोच्च बिंदू वाटतो. त्यानंतरच्या काळात मी किती तरी लावण्या, कोळीगीते, गरबा वगैरे पाहिले आहेत. भांगड्याचा धांगडधिंगा तर आजकाल फारच बोकाळला आहे. अलीकडे आलेल्या “ढोल बाजे”, “चोलीके पीछे क्या है” किंवा “बीडी जलैले” यासारख्या गाण्यांना वाद्यांची अप्रतिम साथ आहे. असे असले तरी “दैया रे दैया” ने पन्नास वर्षांपूर्वी मनावर घातलेली जादू त्या “पापी बिछूआ” च्या विषासारखी उतरत नाही.

अशा प्रकारे भरपूर विविधतेने नटलेली खूप गाणी या चित्रपटांत आहेत. “सुहाना सफर” आणि “दिल तडप तडपके” यासारख्या गाण्यात उडते सूर आणि थोडे खालचे स्वर घेतले आहेत आणि त्यातले शब्द थबकत थबकत पुढे जात आहेत असे वाटते. त्यातल्या ललाल्लाच्या लकेरी पश्चिमेकडल्या दिसतात. ही गाणी गाण्यासाठी मुकेशचा भरदार आवाज वापरला आहे, तर “टूटे हुए ख्वाबोंने” हे थोड्या चढ्या स्वरात आणि मींडचा वापर करून सलगपणे म्हंटलेले गाणे महंमद रफी यांनी गायिले आहे. “आ जा रे परदेसी” व “दैया रे दैया” या अप्रतिम दर्जाच्या गाण्यांसाठी लतादीदींचा स्वर निवडला आहे, ठुमरीसाठी मुबारक बेगम आणि समूहगीतासाठी आशा भोसले, सबिता वगैरेंचा आवाज घेतला आहे. गायक वा गायिकेची अचूक निवड, वाद्यांची उत्तम साथ आणि मुख्य म्हणजे मनमोहक मुखडे या सगळ्या बाबतीत विचारपूर्वक काम केले असल्याने ही गाणी नुसती कानाला संतोष देऊन थांबत नाहीत, त्यांतले तर शैलेंद्र यांचे सुंदर अर्थपूर्ण शब्द थेट मनाला जाऊन भिडतात आणि दीर्घकाळ लक्षात राहतात.

मधुमती हा चित्रपट १९५८ सालचा सर्वोत्तम चित्रपट ठरला. या चित्रपटाला त्या वर्षातली अर्ध्याहूनही अधिक पारितोषिके मिळाली. त्यात सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचे पारितोषिक सलिल चौधरी यांना मिळाले. त्या चित्रपटालातील गाणी तुफान लोकप्रिय झालीच. १९५३ साली निघालेल्या दो बिघा जमीन पासून मधुमती पर्यंतचा पांच वर्षांचा प्रवास सलिलदा आणि बिमलदा यांनी एकत्र केला होता. बिराज बहू, नौकरी, अमानत, परिवार, अपराधी कौन आदि चित्रपटांसाठी दोघांनीही काम केले होते. मधुमतीच्या यशानंतर मात्र त्यांनी एकत्र केलेला फक्त उसने कहा था हा एकच सित्रपट आला. बंदिनी, सुजाता आदि बिमलदांच्या सिनेमांना सचिनदेव बर्मन यांनी संगीत दिले.

मधुमतीनंतरसुद्धा सलिलदांनी दिलेली गोड व आकर्षक गाणी कांही काळ येतच होती. परखमधील ” ओ सजना, बरखाबहार आय़ी, रसके फुहार लायी, अँखियोंमे प्यार लाय़ी।” हे गाणे आतांपर्यंत आलेल्या सर्व पर्जन्यगीतात सर्वात मधुर म्हणता येईल तर ” मिला है किसीका झूमका” हे गाणे त्याच्या चालीमधल्या लडिवाळपणानुळे छान वाटते. उसने कहा था मधले “मचलती आरजू, खडी बांहे पुकारे ओ मेरे साजना रे, धडकता दिल पुकारे” या गाण्यात आर्त अशी साद आहे तर “आहा रिमझिमके ये प्यारे प्यारे गीत लिये, आय़ी रात सुहानी देखो प्रीत लिये” या उडत्या चालीवरल्या गाण्यात प्रेमाची धुंदी आहे. याच सिनेमातील “जानेवाले सिपाहीसे पूछो के कोई कहाँ जा रहा है” हे गंभीर प्रकृतीचे गाणे आहे. या गाण्याला समूहाच्या कोरसने एक विलक्षण सखोलपणा प्राप्त झाला आहे.

छाया चित्रपटातील “छम छम नाचत आयी बहार” हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर आधारलेले गाणे आहे तर “इतना ना मुझसे तू प्यार बढा कि मै इक बादल आवारा ” गाणे मोझार्टच्या सिंफनीचे भारतीय रूप आहे. “आँखोमें मस्ती शराबकी” हे धुंद करणारे गाणे आहे तर “आँसू समझके क्यूँ मुझे आँखसे तूने गिरा दिया” ही एक अतिशय सुंदर गजल आहे. अशी विविधता छाया सिनेमातल्या गाण्यांत आहे. काबुलीवाला सिनेमातले “गंगा आये कहाँसे, गंगा जाये कहाँ रे” या गाण्याला उत्तर भारतीय लोकगीताची चाल आहे तर “ऐ मेरे प्यारे वतन” हे देशभक्तीपर गाणे आहे. त्यात उल्लेख केलेला देश अफगाणिस्तान आहे ही गोष्ट वेगळी. त्याच वर्षी आलेल्या माया सिनेमातली गाणीसुद्धा खूप गाजली. “कोई सोनेके दिलवाला, कोई चाँदीके दिलवाला, शीशेका ऐ मतवाले मेरा दिल”, “तसवीर तेरी दिलमे इस दिलने उतारी है”, “जा आरे जारे उड जारे पंछी, बहारोंके देस जारे”, “ऐ दिल कहाँ तेरी मंजिल” इत्यदि अमर गाणी खास सलिलदांची किमया दाखवतात. आजसुद्धा ही गाणी ऐकू येतात आणि ऐकावीशी वाटतात.

विनोदी प्रकारची गाणी हा एक सलिलदांचा हातखंडा झाला होता. किशोरकुमारचा हाफ टिकट हा सिनेमाच पूर्णपणे विनोदी होता. त्यातले “चील चील चिल्लाके” हे बालगीत मजेदार आहे. किशोरकुमार आणि प्राण यांनी “आके सीधी लगी दिलपे जैसी ये कटरिया, ओ गुजरिया” या गाण्यात जो धुमाकूळ घातला आहे, त्याला तोड नाही. उडत्या सुरांचे हे गाणे हंसवून पोट दुखवते. “वो एक निगाह क्या मिली”, “आँखोंमे तुम दिलमे तुम हो” आणि “चाँद रात, तुम हो साथ” ही द्वंदगीतेसुद्धा श्रवणीय आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीत आल्यानंतर सलिल चौधरी यांनी आपला दबदबा निर्माण केला होता. सलिलदांनी संगीतबद्ध केलेली दोन तीन गाणी तरी त्या काळी अत्यंत लोकप्रिय असलेल्या बिनाका गीतमाला या कार्यक्रमात दर बुधवारी वरच्या ‘पादान’वर लागत असत आणि त्यामधली कित्येक गाण्यांना ‘सरताज’ मिळत असे. अशी सात आठ वर्षे गेली. त्यानंतर मधला कांही काळ सलिलदांची एवढी गाणी एका पाठोपाठ आली नाहीत. चाँद और सूरज आणि पूनमकी रात यासारखे कांही सिनेमे आले, पण ते फारसे गाजले नाहीत. “बागमें कली खिली बगिया मेहकी, पर बेवफा भँवरा नही आया” यासारखे नटखट गाणे, “झनन झन बाजे” हे शास्त्रीय संगीत असलेले गीत, आणि “तेरी याद न दिलसे जा सकी” हे विरहगीत अशी कांही गाणी अजून स्मरणात टिकून आहेत. पूनमकी रातमधले “साथी रे, तुझबिन जिया उदास .. आजा, आजा, आजा” हे गूढतामय गाणेसुद्धा अमर झाले. पण एकंदरीत सलिलदांचे अस्तित्व पूर्वीइतके उठून दिसत नव्हते.

त्यांची जादू ओसरली की काय असे वाटत असतांनाच सन १९७१ च्या सुमारास त्यांच्या सदाबहार गाण्यांची नवी लाट घेऊन आनंद हा सिनेमा आला. त्यामधली “जिंदगी कैसी ये पहेली हाये, कभी तो हंसाये कभी ये रुलाये”, “कहीं दूर जब दिन ढल जाये, चाँदसी दुलहन बदन चुराये, चुपके से आये”, “मैने तेरे लियेही सात रंगके सपने चुने ” आणि “ना जिया लागे ना ” ही चारही वेगवेगळ्या प्रकृतीची गाणी एकदम ताजी तवानी आणि मनोहारी वाटत होती. त्याच वर्षी आलेल्या मेरे अपने चित्रपटातले “कोई होगा अपना जिसको हम अपना कह देते यारो” हे किशोरकुमारचे गाणेही गाजले. त्याच्या पाठोपाठ आलेल्या अन्नदातामधले “गुजर जाये दिन, दिन, दिन ” हे गाणे सलिलदांच्या खास ढंगातले गाणे होते. ते ऐकायला सोपे वाटत असले तरी त्याची चाल अचूकपणे येण्यासाठी कितीतरी वेळा त्या गाण्याचे रिटेक करावे लागले.

त्यानंतर आलेल्या रजनीगंधा सिनेमातले “एक बार यूँ भी देखा है ” हे मुकेशचे गाणे आणि “रजनीगंधा फूल तुम्हारे” हे लता मंगेशकरांनी गायिलेले गाणे ही दोन्हीही गाणी सुरेख होती. छोटीसी बात सिनेमातली “जानेमन जानेमन तेरे दो नयन” आणि “न जाने क्यूँ होता है ये जिंदगी के साथ” ही गाणीसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण होती. हे सगळे सिनेमे फाँर्म्यूल्यापासून जरा ‘हटके’ असे होते. लोकप्रिय चित्रपटांच्या मुख्य प्रवाहापासून सलिलदा थोडे दूर गेले होते.

हिंदी चित्रपटांमध्ये सुरुवातीपासूनच शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत यांवर आधारलेली गाणी दिली जात होती। इंग्रजी चित्रपटांबरोबर पाश्चात्य संगीताचा प्रभाव त्यावर गेला. हे सगळे सलिल चौधरींनी या क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वीच होऊन गेलेले होते. नौशाद, मदनमोहन, शंकर जयकिशन आदि समकालीन संगीत दिग्दर्शकांनी सुद्धा या तीन्हींचा उत्तम उपयोग केला आहे. त्यातही प्रत्येकाची आपापली लैशिष्ट्ये होती. सलिलदांनी आपली खास अशी स्वतंत्र शैली निर्माण केली.

मेलडी किंवा सुरेलपणा हा गाण्याचा आत्मा असतो असे म्हणतात. सलिलदांच्या संगीतात त्यांनी हा आत्मा मुख्यतः भारतीय ठेवला. पश्चिमेकडून आलेल्या ठेक्यांची साथ देऊन व लय कमी अधिक करून गाण्यांच्या चाली आकर्षक बनवल्या. अनेक प्रकारचे वाद्यसंगीत वापरून त्याची जोड देत गाणी अधिकाधिक चांगली बनवली. भारतीय मूळ संगीताला त्यांनी पाश्चात्य संगीताचा उपयोग करून अलंकृत केले असे म्हणता येईल. फक्त वाद्यसंगीतच नव्हे तर मानवी स्वरांचा उपयोगसुद्धा पार्श्वसंगीतात खुबीने केला. सलिलदांच्या गाण्यात समूहगानाचे स्वर आलेले दिसतात. एक उदाहरणच घ्यायचे झाल्यास जागते रहो या चित्रपटातल्या जागो मोहन प्यारे गाण्यातले “जागोरे जागोरे सब कलियाँ जागी” हा तुकडा पहा.

नंतरच्या काळात पाश्चिमात्य संगीतातली मेलडीच कमी होत जाऊन कर्णकर्कश तालवाद्यांचा प्रभाव वाढला. गाण्यापेक्षा नाचालाच महत्व आले. या प्रकारचे बदल सलिलदांनी केले नाहीत. त्यांचे शैलीदार संगीत हळूहळू लोप पावत गेले.
(समाप्त)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: