मराठी भाषा … उगम आणि भविष्य

जागतिक मराठी दिवस

उद्या जागतिक मराठी भाषा दिवस आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मी यानिमित्य लिहिलेल्या लेखांचे संकलन करून ते खाली दिले आहे. दि.२६-०२-२०२०
१. मराठी भाषा … उगम आणि भविष्य  ( फेब्रुवारी 26, 2019 )
२. जागतिक मराठी दिवस – मराठी भाषेविषयक गीते (फेब्रुवारी 27, 2015)
३. मराठी भाषेची शुध्दता ( फेब्रुवारी 26, 2013 )
४. माझा मराठी बाणा (विनोदी) ( फेब्रुवारी 26, 2013)

१. मराठी भाषा … उगम आणि भविष्य

भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती। तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

सर्व भाषांमध्ये संस्कृत ही प्रमुख, गोड आणि दिव्य भाषा आहे असे या सुभाषिताच्या पहिल्या चरणात म्हंटले आहे. या भाषेत सुभाषितांसारखे मधुर आणि बोधप्रद श्लोकही आहेत, रामायण महाभारतासारखी महाकाव्येही आहेत, वेद, उपनिषदे, स्तोत्रे वगैरे धार्मिक वाङ्मयही आहे आणि शाकुंतलासारखी उत्कृष्ट नाटकेही आहेत. या प्राचीन भाषेमधील शब्दांचे भांडार अपरिमित आहे आणि अर्थपूर्ण असे नवे शब्द तयार करण्याचे सामर्थ्य या भाषेत आहे, मराठी किंवा हिंदीसारख्या तिच्या कन्यांना आजही नवनवीन शब्दांचा पुरवठा संस्कृतमधून होत असतो. उदाहरणार्थ काँप्यूटर आणि इंटरनेट या शब्दांसाठी काढलेले संगणक आणि आंतर्जाल हे प्रतिशब्द संस्कृतजन्यच आहेत. असे सगळे असले तरी ही महान भाषा शिकणे तितकेसे सोपे नाही. तिचा अभ्यास करण्यासाठी खूप वेळ, चिकाटी आणि परिश्रम यांची गरज असते. त्यामुळेच संस्कृत ही फक्त शास्त्री, पंडित, विद्वान वगैरेंची भाषा वाटते. ती शिकणे सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर आहे.

ही परिस्थिती आजचीच नाही तर आठशे वर्षांपूर्वीसुध्दा अशीच होती. व्याकरणाच्या नियमांनी बध्द अशी संस्कृत भाषा समाजातल्या मूठभर लोकांची मक्तेदारी झाली होती. संस्कृत भाषेमधल्या शब्दांचे अपभ्रंश होत गेले, त्यातले काही शब्द लुप्त झाले, इतर भाषांमधून काही शब्द घेतले गेले, अशा रीतीने त्यात बदल होत होत मराठी, हिंदी, बंगाली, गुजराथी वगैरे अनेक निरनिराळ्या भाषा आणि त्यांची विविध रूपे भारताच्या निरनिराळ्या भागात निर्माण झाली होती. महाराष्ट्रातील सामान्य लोकांच्या भाषेला मराठी असे नाव पडले होते. “संस्कृत भाषा जनांसी कळेना, म्हणून नारायणा दया आली.” आणि देवाजीनेच ज्ञानेश्वर अवतार घेऊन भगवद्गीतेचे मराठी भाषेत निरूपण केले. असे एका अभंगात म्हंटले आहे. ते महान कार्य करतांना ज्ञानेश्वर माउली म्हणतात, “माझा मराठाचि बोलू कवतुके, तरी अमृताते पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन।” मराठी भाषेबद्दल ते लिहितात, “जैसी पुष्पामाजी पुष्प मोगरी, की परिमळामाजी कस्तुरी, तैसी भाषांमाजी साजिरी, मराठीया।” त्या काळात प्रचलित असलेल्या बोलीभाषेतून शब्दांची अचूक निवड करून संत ज्ञानेश्वरांनी उच्च दर्जाचे लेखन केले. संत एकनाथांनीसुद्धा भागवतासारख्या संस्कृत भाषेतल्या ग्रंथांची त्यांच्या काळात प्रचलित असलेल्या मराठी भाषेत रूपांतरे केली. पण त्यानंतरच्या काळात मराठी भाषेत आणखी बदल होतच गेले आणि सामाजिक वातावरणही बदलत गेल्यामुळे ज्ञानेश्वर आणि एकनाथांनी सोपी म्हणून लिहिलेली पण साजिरी अशी अलंकारिक मराठी भाषा आज आपल्याला नीट समजत नाही. ती प्राचीन मराठी भाषा समजण्यासाठी आताच्या काळात ज्ञानेश्वरीच्या ‘सार्थ’ आवृत्या काढाव्या लागल्या. पण ते लेखन वाचण्यासाठी सुध्दा तशा प्रकारच्या वाचनाच्या सरावाची आवश्यकता असते आणि वाचकाने साक्षर आणि सुशिक्षित तर असायलाच हवे.

खेड्यांमधली काही जनता अजूनही निरक्षर आहे. माझ्या लहानपणी तर खेड्यांमध्ये शिक्षणाच्या सोयीच नसल्यामुळे बहुसंख्य ग्रामीण लोक निरक्षर असायचे. ते लोकसुद्धा आपसात अघळपघळ बोलत मात्र असत. त्यांच्या आजूबाजूच्या भागातली जमीन, डोंगर, नद्या, त्या भागातल्या वनस्पती, पशुपक्षी, माणसे, शेजारी पाजारी, आप्तेष्ट, मित्र, ते स्वतः वगैरेंच्याबद्दल त्यांना जे काही वाटत असेल, त्यांचे अनुभव, आनंद, दुःख, आश्चर्य, भीती, चिंता वगैरे सगळे ते लोकसुध्दा बोलण्यामधून व्यक्त करतच असत, आजही करतात. त्यांच्या वापरातले शब्द, वाक्यरचना वगैरे गोष्टी ते कोठल्याही शाळेत न जाताच घरातल्या आणि आजूबाजूच्या लोकांचे बोलणे ऐकून त्यातून शिकतात. आपल्या बोलीला कुठले नाव आहे किंवा नावही नाही हेसुध्दा ते कदाचित सांगू शकणार नाहीत आणि त्यातल्या प्रत्येक बोलीला वेगळे नाव असण्याची काही गरजही नाही. संभाषण अर्थपूर्ण होण्यासाठी एकाने जे सांगितले ते ऐकणाऱ्या इतरांना समजले एवढेच पुरेसे आहे.

प्रत्यक्ष बोलण्याऐवजी काही लिहून ठेवायचे असेल आणि नंतर कधी तरी ते वाचतांना वाचकाला ते समजायचे असेल तर त्यासाठी ते काही नियमानुसार लिहिणे गरजेचे असते. वाचकाला काही समजलेच नाही तर तो मजकूर लिहून ठेवण्याचा काही उपयोग होणार नाही. यात आणखी एक मेख अशी आहे की लिहिणारे आणि वाचणारे सगळे लोक एकाच भागात आणि एकाच काळात रहाणारे असतीलच असे नाही. त्यामुळे हे नियम स्थळकाळानुसार शक्यतो बदलू नयेत. अशा प्रकारे शाश्वत प्रकारच्या काही नियमांनुसार केल्या गेलेल्या अभिव्यक्तीच्या या माध्यमालाच ‘भाषा’ असे नाव दिले गेले. त्याचा अभ्यास करणाऱ्या विद्वान मंडळींच्या विचार विनिमयातून ठराविक नियमांचे पालन करून लिहिल्या जाणाऱ्या ‘प्रमाणभाषा’ ठरवल्या गेल्या आणि मुद्रण, प्रकाशन वगैरे व्यवसाय सुरू झाल्यानंतर प्रकाशित होणारे सर्व वाङ्मय लेखकांनी त्यानुसार लिहावे असे ठरवले गेले. ही प्रक्रिया दीर्घ काळ चालत असते. मराठी नावाची अशीच एक प्रमाणभाषा शालेय शिक्षण देतांना सर्व विद्यार्थ्यांना शिकवली जाते आणि तिच्या माध्यमातून इतर सारे विषय शिकवले जातात. ही प्रमाणभाषा शिकलेले मराठी भाषिक लोक महाराष्ट्रात किंवा त्याच्या बाहेर, अगदी परदेशात कुठेही रहात असले तरी ते लेखन वाचून त्याचा अर्थ समजून घेऊ शकतात.

असे असले तरी प्रत्यक्ष जीवनात संभाषण करतांना एकाला काही तरी सांगायचे असते किंवा विचारायचे असते आणि ते ऐकणाऱ्याला कळावे एवढाच त्याचा उद्देश असतो. संभाषणामधले बोलणे व्याकरणशुध्द आहे की नाही, ते अलंकारिक आहे का वगैरे विचार करायला वेळ नसतो आणि त्या गोष्टींना महत्वही नसते. तेंव्हा संभाषण करतांना ही प्रमाणभाषा बाजूला ठेवून त्या भागात प्रचलित असलेली बोली तिथले सगळे लोक बोलतात. सावंतवाडी, डहाणू, चंद्रपूर आणि सोलापूर अशा गावांमधले लोक एकमेकांशी निरनिराळ्या स्थानिक बोलींमध्ये बोलतात. मुंबईपुण्यासारख्या महानगरांमध्ये राहणाऱ्या आणि कोकणातल्या किंवा विदर्भातल्या एकाद्या खेड्यात राहणाऱ्या लोकांच्या रोजच्या बोलण्यात येणारे शब्द आणि त्यांचे उच्चार यात बराच फरक असतो. कथा, कादंबऱ्या, नाटके, चित्रपट वगैरेंमध्ये प्रत्यक्ष जीवनाचे प्रतिबिंब दाखवतांना निरनिराळ्या खेड्यातल्या किंवा शहरातल्या लोकांचे संवाद त्यांच्या बोलीमध्येच लिहिले किंवा बोलले जाऊ लागले. काही लेखकांनी ग्रामीण भाषेतच लिहायची शैली निवडली आणि वाचकांनाही ते आवडले. त्यातल्या बोलीभाषा प्रमाणभाषेपासून मात्र खूपच वेगळ्या असतात.

आपण बहुतेक वेळा कामापुरतेच बोलत असतो, पण लेखन करतांना त्यात लालित्य आणले जाते. ते वाचल्यामुळे वाचकाला आनंद मिळावा, स्फूर्ती मिळावी, त्याचे मनोरंजन व्हावे, त्याने थरार अनुभवावा, त्याच्या ज्ञानात भर पडावी, त्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे सापडावीत, त्याला सावध करावे, मार्गदर्शन मिळावे असे अनंत प्रकारचे उद्देश लेखकाच्या मनात असतात, त्याच्या कल्पनेच्या भराऱ्या त्याच्या लेखनात उतरतात आणि हे साध्य करण्यासाठी भाषा हे माध्यम जितके समृध्द असेल तितके ते लेखन प्रभावी ठरते आणि त्या लेखनातून ती भाषा अधिक समृध्द होते. साहित्यकृतींमधली ही मराठी भाषा रोजच्या बोलण्यापेक्षा किती तरी वेगळी असते.

सध्या खूप जोराने एक ओरड होत आहे. ती म्हणजे मराठीभाषिक लोकांची मुले इंग्रजी माध्यमामधून शिकू लागल्यामुळे त्यांना मराठी भाषा लिहिता वाचता येत नाही. त्यामुळे आता यापुढे मराठी भाषाच शिल्लक राहणार नाही इथपर्यंत भविष्यवाणी करणारे महाभाग जिकडे तिकडे आग ओकत असतात.
आजकालचे लोक मराठी भाषा पूर्वीप्रमाणे नीट बोलत किंवा लिहीत नाहीत असे खूप लोकांना वाटते. पण मला मात्र माझ्या लहानपणी जितकी माणसे शुध्द मराठी बोलत असत त्यांच्या अनेकपटीने अधिक लोक आता शुद्ध बोलतांना दिसतात. उदाहरणार्थ आमचे घरकाम करायला येणारी बाई किंवा रस्त्यावर भाजी विकणारा माणूस माझ्या लहानपणी जितकी व्याकरणशुध्द मराठी भाषा बोलत असत त्याच्या तुलनेत तेच काम करणारे आजचे लोक बरेच शुध्द बोलतात. मराठी भाषेत इंग्रजी आणि आता हिंदी शब्दांची भेसळ झाल्यामुळे ती भ्रष्ट होऊ लागली आहे असा ओरडा काही लोक करत असतात. रोजच्या उपयोगात नसलेले संस्कृत शब्द मराठीत घेतले तर ती उच्च प्रतीची होते आणि प्रचलित असलेले परभाषेतले शब्द वापरले म्हणजे भ्रष्ट हा कुठला न्याय झाला? महाराष्ट्राच्या सर्वच सीमाभागांमधल्या बोलीभाषेत पलीकडल्या राज्यातल्या भाषांमधले म्हणजे गुजराती, कानडी किंवा हिंदीमधले काही शब्द आलेले दिसतात. सिनेमा आणि टेलीव्हिजनमुळे हिंदी भाषेतले अनेक शब्द आता आपले झाले आहेत. सर्वांना समजतील अशा काही नव्या शब्दप्रयोगानेसुध्दा आपली भाषा समृध्दच होत असते.

भाषा नदीप्रमाणे प्रवाही असते. नदीमधले पाणी त्याच्यातला थोडा जुना गाळ काठांवर सोडत जाते आणि नव्याने मिसळलेले पदार्थ घेऊन पुढे जाते. त्याचप्रमाणे कालमानानुसार परिस्थिती बदलते तशी भाषासुध्दा हळूहळू बदलत असते, तिच्यात नवे वाक्प्रचार येत असतात, नवे शब्द रूढ होत असतात. जसजशी आपली जीवनशैली बदलत जाते, आपण नव्या वस्तूंचा वापर करतो, त्यांच्या सोबतीने त्यांची नवी नावे येणारच. दंतमंजन वापरणे बंद होऊन टूथपेस्ट आल्यावर टूथपेस्टला दंतमंजन कसे म्हणता येईल? बसची वाहतूक सुरू झाल्यानंतर तिच्याबरोबर ड्रायव्हर, कंडक्टर आले आणि ते शब्द रूढ झाले. त्यांचा उल्लेख करण्यासाठी वाहक, चालक असले नवे अनोळखी शब्द वापरण्यापेक्षा ड्रायव्हर, कंडक्टर हे प्रचलित असलेले शब्दच लोक वापरणार. त्याबद्दल नाक मुरडण्यापेक्षा ते शब्द आपले झाले आहेत हे मान्य करणे प्रामाणिकपणाचे होईल. इंग्रजी भाषेतसुद्धा दरवर्षी नवे शब्द घेतले जातात आणि त्यांना अधिकृतपणे मान्यता दिली जाते. मराठी भाषेत तसे काम करणारी कोणती यंत्रणा आहे की नाही हे मला माहीत नाही, पण प्रत्यक्ष उपयोगात नवे शब्द येतच राहतात.

मराठी भाषेतली इतकी विविधता दिसत असतांना यातली कोणत्याही एका प्रकारची भाषाच ‘मराठी’ आहे असे म्हणता येणार नाही. आज जी प्रमाणभाषा मानली जाते तीच फक्त मराठी आहे असे म्हंटले तर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आदी कवींनी इतिहासकाळामध्ये केलेल्या महान रचना कोणत्या भाषेत आहेत? आजच्या शुद्ध प्रमाणभाषेत (किंवा हा लेख जसा लिहिला आहे तसे) आपण प्रत्यक्ष संभाषणात एकमेकांशी किती बोलतो? “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी।।” असे लिहितांना कवीवर्य स्व.सुरेश भट यांना कोणती मराठी अभिप्रेत होती? ज्या कवीवर्य स्व.कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाचे दिवशी आपण हा जागतिक मराठी दिवस साजरा करत आहोत त्यांनी मराठी असे भाषेचे नाव न घेता लिहिले आहे, “माझ्या मातीचे गायन, तुझ्या आकाश श्रुतीनी, जरा कानोसा देऊन, कधी ऐकशील का रे।” मातीतून म्हणजेच या भूमीवरील माणसांच्या बोलण्यातून निघालेले स्वर आकाशातल्या परमेश्वराने लक्षपूर्वक ऐकावेत अशी प्रार्थना त्यांनी या गीतात केली आहे. मातीतून आलेले हे गायन कोणत्या मराठी भाषेतले असेल? ते लिखित भाषेतले असेल की बोलीभाषेतले असेल?

मला तरी असे वाटते की सर्व बोलींचा आणि विविध प्रकारच्या लेखनाचा मराठी भाषेमध्ये समावेश होतो. आईला कोणी माय म्हणेल, कोणी अम्मा, कोणी मम्मी, मॉम, तर कोणी आई असेच म्हंटले तरी सर्वांसाठी ती एकच असते. त्याप्रमाणे प्राचीन, आधुनिक, शहरी, ग्रामीण, संस्कृतप्रचुर, इंग्रजाळलेली, हिंदी, गुजराथी, कानडी शब्दांची फोडणी दिलेली अशा अनेक रूपांमध्ये आपली मराठी भाषा आपल्याला ऐकायला मिळते. त्यातली एकच शुध्द आणि इतर सगळ्या अशुध्द किंवा त्याज्य असा अट्टाहास धरण्यात काही अर्थ नाही. उद्याचा जागतिक मराठी दिवस हा मराठीच्या या सगळ्या रूपांचा दिवस आहे. या सगळ्यांनी मराठी भाषेला समृध्द बनवले आहे. असा विचार केला तर मराठी भाषेच्या भविष्याबद्दल चिंता वाटणार नाही. तिचे रूप बदलत गेले तरी निराळे अस्तित्व टिकूनच राहणार आहे याची मला खात्री वाटते.

संगणकक्रांतीमुळे बरेच लोक आता हाताने कागदावर काही लिहीतच नाहीत, सरळ कीबोर्डवरील बटने दाबतात. मीसुद्धा हा लेख तशाच प्रकारे लिहीत आहे. असेच चालत राहिले तर काही काळाने मी हाताने लिहिणे विसरूनही जाईन. माझी बोटे हवी तशी वळणारच नाहीत. आता असे सॉफ्टवेअर आले आहे की आपण तोंडाने बोललेले ऐकून ते तसे टाइप केले जाते. यापुढली पायरी म्हणजे आपण चिठ्ठी न पाठवता आपला आवाजच पाठवू शकतो. ही पायरीसुद्धा गाठलेली आहेच. आता आपल्या आवडीच्या पुस्तकाचे कुणीतरी म्हणजे एकाद्या यंत्राने केलेले वाचन ऐकणे तांत्रिक दृष्ट्या शक्य झाले आहे. छापील पुस्तकांची जागा ईबुक्सने घेतली आहेच, त्यांचीही जागा ही ध्वनिमुद्रित पुस्तके घेतील. म्हणजे हळूहळू स्क्रिप्टची गरज राहणार नाही. असे करून आपण पुन्हा एकदा फक्त मौखिक भाषेकडे चाललो आहोत. काही संगणकतज्ज्ञ भविष्यवेत्ते असेही सांगायला लागले आहेत की जगातल्या सगळ्याच भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पण मला असे वाटत नाही. साहित्य, संस्कृति, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान हे सगळे इतके गुंतागुंतीचे झालेले आहे की ते वैदिक काळातल्याप्रमाणे मौखिक पद्धतीने चालवणे आणि पुढे नेणे शक्य होणार नाही. त्यामुळे भाषा आणि लिपि ही माध्यमे शिल्लक राहणारच आहेत आणि त्यात मराठी भाषेचे स्थानही अबाधित राहणार आहे.


२. जागतिक मराठी दिवस

(फेब्रुवारी 27, 2015)
दरवर्षी २७ फेब्रूवारी हा दिवस ‘जागतिक मराठी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. हे कधीपासून ठरले हे मला माहीत नाही, पण सहा वर्षांपूर्वी मी त्यानिमित्य एक लेख लिहिला होता. मराठी प्रथम भाषा (मातृभाषा) असणार्‍यांच्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे. त्या वेळी सुध्दा मराठी बोलणार्‍या लोकांची एकूण लोकसंख्या नऊ कोटी इतकी होती, आता ती थोडी वाढलीच असेल. महाराष्ट्राबाहेर गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू व छत्तीसगढ राज्यात आणि दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासीत प्रदेशातील काही भागात मोठ्या प्रमाणात मराठी बोलली जाते. पण मराठी भाषिक लोक अनेक राज्यात राहतात हे जितके खरे आहे, त्यापेक्षाही खूप मोठ्या प्रमाणात अमराठी भाषिक लोक महाराष्ट्रात राहतात हे जास्त महत्वाचे आणि आता जाचक वाटायला लागले आहे. भाषावार प्रांतरचना होण्याच्या आधीपासून मुंबईमध्ये मराठी लोकांची संख्या अमराठी लोकांपेक्षा कमी होतीच, पण महाराष्ट्र राज्य निर्माण होऊन पन्नास वर्षे उलटून गेल्यानंतर तिची टक्केवारी वाढण्याऐवजी आणखी कमी झाली आहे. नागपूर ही पूर्वीच्या मध्यप्रांताची राजधानी असल्यामुळे पूर्वीपासूनच तिथे मोठ्या प्रमाणात हिंदी भाषिक लोक राहतात, एवढेच नव्हे तर अनेक नागपूरकर सवयीने हिंदीमधून बोलतात. पण एका काळी पूर्णपणे मराठी असलेली पुणे आणि नाशिक यासारखी शहरेही आता कॉस्मोपॉलिटन होऊ लागली आहेत.

पण यामुळे मराठीचा ऱ्हास होऊ लागला आहे अशी जी चिंता व्यक्त केली जाते, किंवा ओरड केली जाते ती मला थोडी अतीशयोक्त वाटते. राज्यामधील किती टक्के लोक मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे असे सांगतात एवढा एकच निकष लावून ती अधोगतीला लागली आहे असे कसे म्हणता येईल? आर्थिक कारणांमुळे इतरभाषिक लोक मोठ्या संख्येने इकडे येऊ लागले आहेत. त्यांच्या येण्यामुळे येथील मराठीभाषिक लोकांची संख्या कमी होत नाही. तसेच अनेक मराठी लोक महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ लागले आहेत, तरीसुध्दा तिकडेही ते मराठीच राहिले आहेत. आणि या स्थलांतराला अलीकडे जास्त वेग आला असला तरी ते काही शतकांपासून चालले आहे. मराठी लोक जसे परप्रांतात पसरले आहेत तसेच ते परदेशातही स्थलांतर करत आहेत, किंवा कामानिमित्य जाऊन रहात आले आहेत. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, मॉरीशस व इस्त्राएल या देशातही मराठी भाषिक लोक राहतात. यातील बरेचसे लोक आंतर्जालावर मराठी भाषेत आपले विचार व्यक्त करतात. माझे ब्लॉग्ज वाचणाऱ्या वाचकांच्या देशांच्या यादीत जगभरातील मला माहीत असलेले बहुतेक सगळे देश येतात.

मराठी भाषा सुमारे १३०० वर्षांपासून प्रचलित आहे असे मिळालेल्या ऐतिहासिक पुराव्यांवरून समजले जात होते, पण त्याच्याही आधीचे काही नवे पुरावे मिळाले असल्याचे वर्तमानपत्रात वाचले होते. ते किती ग्राह्य आणि विश्वसनीय आहेत यावर त्या विषयामधल्या तज्ज्ञांनी चर्चा करून मराठी ही एक अभिजात भाषा असल्याचे मान्य केले आहे असे समजते.मराठी भाषेत लिहिलेले अनेक प्राचीन शिलालेख, ताम्रपत्रे, दस्तऐवज वगैरे ऐतिहासिक सामुग्री उपलब्ध आहे. ज्ञानेश्वर-तुकारामादि संतकवी, मोरोपंत, वामनपंडित आदी पंतकवी आणि होनाजी बाळा, पठ्टे बापूराव वगैरे तंतकवींच्या पारंपरिक रचना अनेक लोकांना मुखोद्गत असतात. मराठीत अनेक पोथ्या लिहिल्या गेलेल्या आहेत. आता हे सारे वाङ्मय पुस्तकरूपाने उपलब्ध आहे. दैनिक, साप्ताहिक, मासिक, वार्षिक इत्यादी अनेक नियतकालिके मराठीत छापून नियमितपणे प्रसिध्द केली जातात.

मंगल देशा, पवित्रा देशा या सुप्रसिध्द महाराष्ट्रगीतात कवी गोविंदाग्रज यांनी मराठी भाषेचा इतिहास थोडक्यात असा सांगितला आहे.
रसवंतीच्या पहिल्या बाळा मुकुंदराजाला
पहिलावहिला अष्टांगांनी प्रणाम हा त्याला
शहर पुण्याच्या, शिवनेरीच्या, पंढरिच्या देशा
अनंत कोटी ग्रंथ रचुनिया जोडि तुझ्या नामा
वाल्मीकीचे शत कोटी यश विष्णुदास नामा
मयूरकविच्या पूर्ण यमकमय महाराष्ट्र देशा
कवि कृष्णाच्या निर्यमका हे महाराष्ट्र देशा
देवी ज्ञानेश्वरी करि जिथे भक्तीचा खेळ
तिथेच गीतारहस्य बसवी बुद्धीचा मेळ
जिथे रंगली साधीभोळी जनाइची गाणी
तिथेच खेळे श्रीपादांची कलावती वाणी
विकावयाला अमोल असली अभंगमय वाणी
करी तुझी बाजारपेठ तो देहूचा वाणी
तुला जागवी ऐन पहाटे गवळी गोपाळ
धार दुधाची काढित काढित होनाजी बाळ
मर्दानी इष्काचा प्याला तुझा भरायासी
उभा ठाकला सगनभाउ हा शाहुनगरवासी

सध्याच्या काळात एक ओरड खूप जोराने होत आहे. ती म्हणजे मराठीभाषिक लोकांची मुले इंग्रजी माध्यमामधून शिकू लागल्यामुळे त्यांना मराठी भाषा लिहिता वाचता येत नाही. त्यामुळे आता यापुढे मराठी भाषाच शिल्लक राहणार नाही इथपर्यंत भविष्यवाणी करणारे महाभाग जिकडे तिकडे आग ओकत असतात. कदाचित त्यांच्या घरामध्ये असे होत असेलही, पण माझ्या आधीच्या पिढीमध्ये जितके लोक शुध्द मराठी भाषा बोलू किंवा लिहू शकत असत हे मी पाहिले आहे आणि माझ्या पुढील पिढीमधील किती मुले ते करू शकतात हे आता पाहतो आहे. लोकसंख्येत झालेली वाढ आणि शिक्षणाचा प्रसार या दोन्हींमुळे यात प्रचंड प्रमाणात भरच पडलेली मला दिसते. मराठी वृत्तपत्रांचा किंवा पुस्तकांचा खप कमी न होता तो कित्येकपटीने वाढला आहे आणि वाढत आहे. मराठी टीव्ही चॅनेल्सची आणि ती पहाणाऱ्यांची संख्याही दिवसेदिवस वाढत आहे. आंतर्जालावरील मराठी संकेत स्थळे (इंटरनेटवरील वेबसाइट्स) आणि त्यांची सभासदसंख्या, मराठी अनुदिन्या (ब्लॉग्ज) वाढत आहेत. हे सगळे कशाचे द्योतक आहे?

अशा प्रकारे थोडा समंजसपणा दाखवला तर मराठी भाषेला कसलाही धोका आहे असे मला तरी वाटत नाही. हा जागतिक मराठी भाषा दिवस कशा रीतीने साजरा होणार आहे आणि त्यामुळे तिची किती प्रगती होणार आहे हे मला ठाऊक नाही. निदान या दिवशी तिचे गुणगान करावे, रडगाणे गाऊ नये असे मला वाटते. कविवर्य स्व.सुरेश भट यांनी मोठ्या अभिमानाने मायमराठीचे केलेले गुणगान नक्कीच स्फूर्तीदायक आहे.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी ,
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या नहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी

येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलखात सादते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

नव्या दमाचे संगीतकार कौशल इनामदार यांनी या गाण्याला अप्रतिम चाल लावून ते अनेक गायकगायिकांकडून गाऊन घेतले आहे. या दुव्यावर ते ऐकता येईल.
http://www.aathavanitli-gani.com/Song/Labhale_Amhas_Bhagya
कवी कुसुमाग्रज यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमध्ये असे लिहिले आहे.

माझ्या मातीचे गायन, तुझ्या आकाश श्रुतीनी
जरा कानोसा देऊन, कधी ऐकशील का रे

माझी धुळीतील चित्रे, तुझ्या प्रकाश नेत्रांनी
जरा पापणी खुलून, कधी पाहशील का रे

माझ्या जहाजाचे पंख, मध्यरात्रीत माखले
तुझ्या किनाऱ्यास दिवा, कधी लावशील का रे

माझा रांगडा अंधार, मेघामेघात साचला
तुझ्या उषेच्या कानी, कधी टिपशील का रे

कवी माधव ज्यूलियन यांच्या अजरामर गीताचे बोल असे आहेत.

मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे ।
नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे ।।
जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्‍ताबळें श्रीमती इंग्रजी ।
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी ।।

जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी ।
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता थोरवी ।।
मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्‍नधर्मानुयायी असूं ।
पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं ।।

हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी ।
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापे हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं ।।
मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यात ही खंगली ।
हिची थोर संपत्‍ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं ।।

तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्‍नें नियोजूं तयांना हिच्या मंडणी ।
नको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी ।।

जय मराठी! जय महाराष्ट्र!

नवी भर दि.२७-०२-२०२० : ———– शृंगार मराठीचा ———–

अनुस्वारी शुभकुंकुम ते
भाळी सौदामिनी |

प्रश्नचिन्ही डुलती झुमके
सुंदर तव कानी |

नाकावरती स्वल्पविरामी
शोभे तव नथनी |

काना काना गुंफुनी माला
खुलवी तुज मानिनी |

वेलांटी चा पदर शोभे
तुझीया माथ्याला |

मात्रां चा मग सूवर्णचाफा
वेणीवर माळला |

उद्गारा चा तो गे छल्ला
लटके कमरेला |

अवतरणां च्या बटा
मनोहर भावती चेहर्‍याला |

उ काराचे पैंजण झुमझुम
पदकमलांच्यावरी |

पूर्णविरामी तिलोत्तम तो
शोभे गालावरी ॥

———- !! मराठी भाषेचा श्रृंगार !! ——-
——————————-

३. मराठी भाषेची शुध्दता
( फेब्रुवारी 26, 2013 )

मराठी भाषेच्या शुध्दतेचा आग्रह धरण्यावरील लेखात मी उपहासाने लिहिले होते. त्यावर बर्‍याच जणांचे प्रतिसाद आले. ” त्यातला विनोदाचा भाग सोडला तरी हा लेख गंभीरपणे विचार करायला प्रवृत्त करतो.” अशा प्रकारचे कोणीतरी लिहिले होते. असा थोडासा ‘गंभीर विचार’ मी लेख लिहिण्यापूर्वीच केलेला होता. हातासरशी तो सांगून टाकावा, त्यासाठी उगाच वाचकांच्या डोक्याला वेगळा शीण नको म्हणून मीच त्यावर एक गंभीर स्वरूपाचा लेख लिहिला होता, तो या भागात देत आहे.

मी कांही भाषातज्ज्ञ नाही. पण मला असे वाटते की कोणतीही जीवंत भाषा एकाद्या साचलेल्या पाण्याच्या डबक्यासारखी नसते. मागून आलेल्या प्रवाहातले थोडे पाणी आणि त्यातला गाळ कांठावर पसरवत आणि नवे ओहोळ, ओढे, नाले वगैरेमधून आलेल्या प्रवाहांना सामावून घेत नदीचा प्रवाह जसा पुढे जात असतो त्याचप्रमाणे उपयोगात नसलेले शब्दप्रयोग गाळून टाकत व निरनिराळ्या श्रोतांमधून आलेले नवनवे शब्दप्रयोग सामावून घेत भाषा वहात असते. आज मी जे शब्दप्रयोग आपल्या बोलण्यात व लिखाणात वापरतो ते सारे मी कुठे ना कुठे कधी ना कधी पुनःपुनः ऐकलेले किंवा वाचलेले असतात. सतत उपयोग होत असल्यामुळे ते चलनात असतात. उपयोग कमी झाल्यानंतर ते बाहेर फेकले जातात. त्याचप्रमाणे जीवनशैलीतील बदल, वाचन, प्रसारमाध्यमे आणि इतर लोकांशी होणारा संपर्क इत्यादींमधून त्यात अनेक नवनवे शब्द समाविष्ट होत राहतात. ही प्रक्रिया अत्यंत संथपणे आणि बिनबोभाटपणे सतत चाललेली असते.

यासाठी एक अगदी रोजच्या बोलण्यातले उदाहरण देतो. पन्नास वर्षांपूर्वी मी ज्या भागात रहात होतो त्या काळात तिथल्या बहुतेक प्रौढ स्त्रिया नऊ वारी ‘लुगडे’ नेसत असत, तरुणी पांच वारी ‘गोल पातळ’ नेसत आणि लहान मुली ‘परकर पालके’ घालत. ‘साडी’ हा शब्द तेंव्हा फारसा प्रचारात नव्हता. खरे वाटत नसेल पन्नाशीच्या दशकातले राजा परांजप्यांचे मराठी चित्रपट लक्षपूर्वक पहावेत. लहान मुलींसाठी हौसेने ‘पंजाबी ड्रेस’ शिवत असत. या रोजच्या वापरातल्या वस्त्रांच्या कापडाचा पोत, वीण, रंग, त्यावरील नक्षीकाम, किंमत, टिकाऊपणा वगैरेंची चर्चा, त्यांचे कौतुक किंवा हेटाळणी, त्यांची निवड करण्यापासून ते अखेरीस बोहारणीला देण्यापर्यंत त्यांवर घरात होत असलेल्या क्रिया यांच्या संदर्भात हे शब्द रोजच कानावर पडत असत आणि बोलण्यात येत असत. आज पन्नास वर्षांनंतर मी ज्या सामाजिक स्तरात वावरतो आहे तिथे लहानपणचे हे ओळखीचे शब्द आता माझ्या कानावर फारच क्वचित येतात.

‘लुगडे’ नेसणाऱ्या स्त्रियांची पिढी काळाआड गेली. ‘गोल पातळ’ जाऊन आलेली ‘साडी’ मध्यमवयीन व प्रौढ महिला नेसतात. बहुतेक तरुण मुली जीन्स किंवा कॅप्री आणि टॉप घालतात. पंजाबी ड्रेस आता ‘पंजाबी’ राहिला नाही, ‘सलवार कमीज’ किंवा ‘सलवार सूट’ या नांवाने तो सर्वच वयोगटात वापरला जातो. फ्रॉक, स्कर्ट आणि त्यांचे मिनि, मॅक्सी, मिडी वगैरे अनंत प्रकार येत आणि जात असतात. राजस्थानी, गुजराती किंवा लमाणी पध्दतीच्या कपड्यांचाही क्वचित कधी वापर होतांना दिसतो. नव्या पिढीतल्या मुली ‘फंक्शन’ किंवा ‘ऑकेजन’ च्या निमित्याने साडीही ‘घालतात’. आणखी तीन चार दशकांनंतरही कोणत्या ना कोणत्या नांवाने साडी शिल्लक राहील पण ‘नेसणे’ हा शब्द कदाचित राहणार नाही असा माझा अंदाज आहे.

आपण ठरवू किंवा न ठरवू, बोलत असतांना आपल्या मनातले विचार आपोआप सोयीस्कररित्या व्यक्त होतात. त्या वेळेस आपण व्याकरणाचा किंवा भाषाशुध्दतेचा विचार करत नाही. आपले सांगणे ऐकणाऱ्याला लगेच आणि नीट समजणे हे जास्त महत्वाचे असते. माझे आईवडील ज्या बोलीत माझ्या लहानपणी बोलत असत, त्या नंतरच्या काळात ज्या प्रकारे मी माझ्या मुलांशी बोलत होतो आणि आज ज्या भाषेत ते त्यांच्या मुलांशी संभाषण करतात या मराठी भाषेच्याच तीन भिन्न तऱ्हा मी एकाच आयुष्यात पाहिल्या आहेत. ‘हंडा’, ‘कळशी’, ‘बिंदगी’, ‘बंब’ असे माझ्या लहानपणी रोजच्या आयुष्यात उच्चारले जाणारे जुने शब्द मोठेपणी माझ्या बोलण्यात कधी आले नाहीत कारण त्या लहानपणी रोजच्या वापरण्यात असलेल्या वस्तूंना माझ्या मोठेपणीच्या घरात स्थान नव्हते. याच्या उलट पाहता आज रोजच्या संभाषणात उल्लेख होत असलेले ‘सीडी’, ‘मॉल’, ‘रिमोट’ आदि शब्द लहानपणी कधीही माझ्या बोलण्यात आले नव्हते, कारण त्या वस्तूंच्या संकल्पनासुध्दा तेंव्हा अस्तित्वात नव्हत्या.

आपले लेखन वाचणारे अनेक लोक असतात. निदान अशी सोयिस्कर समजूत करून घ्यायला काय हरकत आहे? आपल्याला अभिप्रेत असलेला नेमका अर्थच त्यातून जास्तीत जास्त लोकांना कळावा यासाठी ते प्रमाणभाषेत लिहिणे आणि त्या लेखनाच्या भाषेत शुध्दलेखनाच्या नियमांचे शक्य तितके पालन करणे आवश्यक असते. शुध्दलेखनाच्या चुका वाचतांना खटकतात आणि वाचक त्यात अडखळतो. या कारणासाठी त्या शक्य तोंवर टाळाव्यात. पण त्याचबरोबर त्यात वापरलेले शब्द मूळ मराठी आहेत (म्हणजे नेमके काय?), संस्कृतजन्य आहेत, आपल्याच देशातल्या परप्रांतातून आले आहेत की परदेशातून आले आहेत वगैरे मुद्यांपेक्षा किती लोकांना ते समजतील याकडे अधिक लक्ष द्यायला हवे असे आपले मला वाटते.

जीवंत भाषा ही प्रवाही आणि नव्या शब्दांना व शब्दरचनांना सामावून घेणारी असावी हे मी वर सांगितलेच आहे. माझ्या कल्पनेप्रमाणे इंग्रजी भाषा तशी आहे. कॉम्प्यूटर युग आल्यापासून आणि विशेषतः इंटरनेटच्या प्रसारानंतर त्यात कितीतरी नवे शब्द आले आहेत आणि ‘रन’, ‘सेव्ह’, ‘डिफॉल्ट’, ‘स्क्रॅप’ आदि जुन्या शब्दांना नवे अर्थ प्राप्त झाले आहेत. चॅटिंगसाठी तर नवी लिपीच तयार झाली आहे असे म्हणता येईल. आपण ते सगळे अगदी सहजपणे वापरतो. त्या शब्दांच्या ऐवजी मराठीत ‘धांवा’, ‘वाचवा’ वगैरे म्हणतांना निदान माझी जीभ तरी अडखळेल. उद्या एका मराठी माणसाने नव्याच तंत्रज्ञानावर आधारलेली एकादी नवी गोष्ट बाजारात आणली आणि सुरुवातीपासूनच तिचा वापर करतांना ‘उचला’, ‘ठेवा’, ‘थांबा’, ‘चला’, ‘दाबा’, ‘सोडा’ अशा सोप्या शब्दांचा प्रयोग केला तर त्या शब्दांचा उपयोग करायला मला मनापासून आवडेल. पण सध्या तरी जी गोष्ट ज्या नांवाने माझ्यापर्यंत पोचली त्या नांवाचाच मराठी भाषेत समावेश करावा लागेल असे माझे मत आहे.


४. माझा मराठी बाणा

( फेब्रुवारी 26, 2013)

उद्या जागतिक मराठीदिन आहे. त्या निमित्याने थोडे हलकेफुलके …..

भारताला स्वातंत्र्य मिळून चांगली साठ वर्षे होऊन गेली असली आणि सगळे इंग्रज लोक कधीचे मायदेशी परत गेले असले तरी त्यांनी मागे ठेवलेली इंग्रजी भाषा मात्र आजही आपल्या माय मराठीवर आक्रमण करतेच आहे. “तुझा काय प्रॉब्लेम आहे? तो सॉल्व्ह करायला मी त्यात हेल्प करू कां?” अशा प्रकारची वाक्ये नेहमी आपल्या कानावर पडतात. त्यातच जसजसा ‘भय्या हातपाय पसरायला’ लागला आहे तसतशी त्याची हिंदी देखील मराठी भाषेत पसरू लागली आहे. “वाहवा”, “अच्छा”, “क्या बात है”, “जाने दो”, “चलता है” यासारख्या शब्दप्रयोगांची फोडणी मराठी लोकांच्या बोलण्यात सारखी पडत असते. सिनेमा, टीव्ही आणि पेपर या साऱ्या प्रसारमाध्यमातून इंग्रजी व हिंदीमिश्रित मराठीचा जो खुराक रोज मिळत आहे, त्यामुळे भावी पिढी या खिचडीलाच मराठी भाषा समजेल आणि मूळ मराठी भाषा भ्रष्ट होऊन नष्ट होऊन जाईल अशी गहन चिंता अनेक मराठी भाषाप्रेमी लोकांना सतावते आहे. मराठी नाही तर महाराष्ट्र राहणार नाही, महाराष्ट्राशिवाय राष्ट्राची काय गत होईल आणि आपल्या महान राष्ट्राखेरीज मानवजातीला तारणहार नाही इथपर्यंत ही चिंता वाढत जाते.

अशा प्रकारचे लेख वाचून अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आता आपण कांही तरी करायलाच पाहिजे म्हणून मी स्वतः शुध्द मराठीचा उपयोग करायला सुरुवात करायचे ठरवले. याची सुरुवात कुठून करायची हे मला चांगले विचारपूर्वक ठरवायला पाहिजे होते. पूर्वीच्या काळी सगळीकडे गर्द वनराई असायची. त्या काळातले लोक कुठल्याशा वृक्षाखाली पद्मासन घालून ध्यानस्थ होऊन बसत आणि चिंतन, मनन वगैरे करत असत म्हणे. त्यातून त्यांना ज्ञानबोध होत असे. आता मुंबईत तसली सोय राहिली नसल्यामुळे मी आपला अंथरुणावर पडूनच जमेल तेवढा विचार वगैरे करतो. ज्या वेळात सासू, सून, नणंदा, भावजया वगैरेंचे हेवे दावे, रुसवे फुगवे, लावालाव्या वगैरेचे कार्यक्रम टीव्हीवर चाललेले असतात तेंव्हा चिंतन करण्यासाठी मला निवांत वेळ मिळतो. शुध्द मराठीच्या भवितव्याचे विचार डोक्यात घेऊन पडल्या पडल्या मलाही एक बारीकसा साक्षात्कार झाला आणि इतर भाषेतील शब्द मराठी भाषेत कां शिरू लागले आहेत याचे मुख्य कारण काय असावे ते माझ्या लक्षात आले. आजकाल आपण आपल्या परंपरागत चालीरीती सोडून नवनव्या परकीय गोष्टींचा उपयोग रोजच्या जीवनात करू लागलो आहोत आणि त्या वस्तू आपापल्या नांवानिशी आपली परिभाषा घेऊन आपल्या जीवनात येत आहेत आणि आपली भाषा भ्रष्ट करीत आहेत हे एक महत्वाचे कारण बहुधा त्याच्या मुळाशी आहे असे मला सुचले. तेंव्हा ‘मूले कुठारः ‘ घालून निदान माझ्यापुरता हा प्रश्न निकालात काढायचा असे मी ठरवले. (संस्कृत भाषा मराठीची जननी असल्यामुळे मराठी भाषेला संस्कृत भाषेचे प्रदूषण चालते, किंबहुना त्यामुळे ती समृध्द झाल्यासारखे वाटत असावे.) त्यानंतर मला जराशी शांत झोप लागली.

सकाळी उठून मी नेहमीप्रमाणे स्वच्छतागृहात गेलो. आमच्या गांवाकडच्या वाड्यातल्या न्हाणीघरात पाण्याचा मोठा दगडी हौद होता, झालंच तर पाणी तापवायचा तांब्याचा बंब, हंडा, कळशी, बिंदगी, घमेली, तपेली, तांब्ये वगैरे अनेक आकारांची भांडी होती, कपडे आपटण्यासाठी एक मोठा थोरला टांके घातलेला दगड होता. असल्या कोणत्याच वस्तू इथे नव्हत्या. साधी सांडपाण्याची मोरीसुध्दा नव्हती. इथे तर पायाखालची फरशी आणि बाजूच्या भिंतींवर सगळीकडे भाजलेल्या चिनी मातीचे चौकोनी तुकडे बसवले होते आणि त्याच पदार्थापासून तयार केलेली विचित्र आकाराची परदेशी बनावटीची पात्रे होती. पण आणीबाणीची परिस्थिती आलेली असल्यामुळे मला त्यांच्याबद्दल विचार करायलाही वेळ नव्हता. नाक मुठीत धरून त्या जागी आंग्ल संस्कृतीचे झालेले अतिक्रमण सहन करून घेण्याखेरीज त्या वेळी मला गत्यंतर नव्हते.

पण सकाळी उठल्यावर पहिल्याच क्षणी झालेल्या या पराभवाने मी खचून गेलो नाही. “पराजय ही विजयाची पहिली पायरी असते” असे म्हणत दुप्पट निर्धाराने मी दुसऱ्या पायरीकडे वळलो. अनेक रसायने मिसळून बनवलेला एक लिबलिबीत पदार्थ आणि तो दातांना फासण्याचा बारीक कुंचला या गोष्टींनी रोज दांत घासायची मला संवय होती. या दोन्ही गोष्टींच्या वेष्टनावर ठळक अक्षरात त्यांची इंग्रजी नांवे लिहिलेली होती. शिवाय त्या लिबलिबित पदार्थाने भरलेली नळी, तो कुंचला आणि त्यावरचे केस सुध्दा इंग्रजी नांव असलेल्या आधुनिक द्रव्यापासून बनवले गेले होते. ते पाहून माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली. रोजच्या वापरातील या गोष्टी मी तिरीमिरीने केराच्या टोपलीत टाकून दिल्या. गांवाकडून येऊन गेलेल्या कोठल्याशा पाहुण्याने आणलेली माकडछाप काळी भुकटी खणात राहून गेलेली होती. ती हातात घेतली. पण तिच्या डब्यावर ‘दंतमंजन’ या मराठी शब्दाऐवजी आंग्ल भाषेत लिहिलेले शब्द पाहिले आणि ती भुकटी तयार करणाऱ्याचे नांवसुध्दा मराठी वाटत नव्हते. ते वाचल्यानंतर त्या भुकटीच्या शुद्धतेची खात्री वाटेना.

पूर्वीच्या काळात मराठी माणसे दांत घासण्यासाठी राखुंडीचा उपयोग करतात असे ऐकले होते किंवा ग्रामीण मराठी चित्रपटात कुठे ते पाहिले होते. पण या राखुंडीत नक्की कशाची राख मिसळलेली असते याची मला कल्पना नव्हती. घरात तर औषधाला राख मिळाली नसती. अगदी आयुर्वेदिक औषधी भस्मसुध्दा नव्हते. “संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी” असे म्हणतात. इथे तर त्याच्याही आधी संन्यास घेण्यासाठी (अंगाला फासायला) लागणाऱ्या राखेपासून तयारी करावी लागणार होती.

या निमित्ताने माझ्या भिकार लिखाणाचे सगळे चिटोरे जाळून टाकावेत अशी एक सूज्ञ सूचना समोर आली, नाहीतरी परकीय शब्दांनी बरबटलेल्या माझ्या त्या लिखाणाची होळी कधीतरी पेटवायचीच होती. पण त्यातून निघालेल्या राखेने घासून दांत स्वच्छ होतीलच अशी खात्री नव्हती. शिवाय त्यात कांही स्फोटक सामुग्री आहे अशी थाप मारून मी त्यांना तात्पुरते जीवदान दिले. “तुमच्या दांतघासण्यात मीठ आहे कां?” असे जाहिरातीतली एक बाई ज्याला त्याला विचारत सारखी धांवत असते. तेंव्हा आपण साध्या मिठानेच दांत घासावेत असे म्हणून ते आणायला स्वयंपाकघरात गेलो, तेवढ्यात ताता नावाच्या कोणा पारशाने त्यातही ‘आयो’पासून सुरू होणारे एक मूलद्रव्य मिसळले असल्याची जाहिरात कानावर आदळली. धन्य आहे हो या पारशाची ! समुद्रातून निघालेल्या शुध्द मिठात चक्क परदेशी द्रव्याची भेसळ करतो आणि वर त्याचीच फुशारकी मारतो आहे ! चिमटीत घेतलेले मीठ मी सरळ टाकून दिले.

खडेमीठ विकत आणण्यासाठी पिशवी घेऊन वाण्याकडे गेलो. तो मुळातला मारवाडी असला तरी माझ्याशी अशुध्द मराठीत बोलायचा. त्याची भाषाशुध्दी नंतर केंव्हातरी करायला पाहिजे असा विचार करून मी त्याला “मला पावशेर खडेमीठ दे” असे सांगितले. ते ऐकताच तो ताडकन उठून उभा राहिला आणि हळूच माझ्या तोंडाजवळ नाक नेऊन त्याने हुंगून पाहिले. मी पावशेरच काय पण नौटाक, छटाकभर देखील ‘मारलेली’ नाही याची खात्री करून घेतल्यावर म्हणाला, “शेठ, पावशेर, अच्छेर वगैरे कवाच बाद झाले. आमचा समदा व्यापार आता किलोमंदी होतो.”
मी म्हंटले, “तुझा होत असेल, पण मी या आंग्ल शब्दांचा उच्चार माझ्या जिभेने करणार नाही.”
असे म्हणत मी समोरच्या पोत्यातले बचकाभर खडेमीठ उचलून त्याच्या तराजूच्या पारड्यात टाकले आणि त्याचे वजन करून किती पैसे द्यायचे ते सांगायला सांगितले. मराठीसहित बावीस भाषांमध्ये मूल्य लिहिलेले कागदी चलन त्याला दिल्यावर त्याने कांही नाणी परत केली. पण त्यांवर फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषा होत्या. आंकडे तर फक्त इंग्रजी होते. त्यामुळे ती नाणी न स्वीकारता त्याबद्दल हवे तर मूठभर शेंगदाणे किंवा फुटाणे द्यायला त्याला सांगितले.
“अहो, माझी मस्करी करता काय? मी अजून शेंगादाणे मोजून द्यायाला सुरू केलेलं नाही.” असे म्हणत त्याने मला लिमलेटची एक गोळी देऊ केली. तिच्यावरील कृत्रिम पदार्थाच्या पातळ वेष्टनावर सुध्दा ‘रावळगाव’ हा मराठी शब्द इंग्रजीत लिहिलेला पाहताच मी ती गोळी दुकानात आलेल्या एका मुलाला देऊन टाकली.
पोरगं म्हणालं, “काका, मी रोज तुमच्याबरोबर दुकानात येईन, मला बोलवा बरं”

त्या खडेमीठाचे चूर्ण करण्यासाठी माझ्या घरी जाते, पाटा वरवंटा, खलबत्ता असले कोणतेच साधन नव्हते. त्यामुळे त्यातले थोडे खडे एका रुमालात गुंडाळून, खिडकीत ठेऊन त्यांना कुलुपाने ठेचले. त्यात तो रुमाल भोके पडून वाया गेला, एक फटका बोटावर बसल्याने बोटात कळ आली, कुलुपाचे काय झाले कोणास ठाऊक, पण थोडे चूर्ण मिळाले. ते दांत घासण्यासाठी वापरले. असल्या खरबरीत पदार्थाची संवय नसल्यामुळे या खटपटीत दोन तीन जागी हिरड्या खरचटल्या जाऊन थोडे रक्तही आले, पण ध्येयाच्या साधनेसाठी रक्त सांडण्यातही एक प्रकारचे अद्भुत समाधान मिळते असे म्हणतात. त्याची प्रचीती आली. त्यामुळे मी माघार घेतली नाही.

“आधी केले, मग सांगितले” हे माझे ब्रीदवाक्य असल्यामुळे माझा कृतनिश्चय मी अजून कोणाला सांगितला नव्हता. घरातील मंडळींनी आपला नेहमीचा दिनक्रम सुरू ठेवला होता. रोजच्याप्रमाणेच त्यांनी अमृततुल्य ऊष्ण पेय प्राशन केले. या परकीय पेयाला जरी आपण प्रेमाने मराठी नाव दिले असले आणि आता ते भारताच्या इतर राज्यांत मुबलक प्रमाणात पिकत असले तरी महाराष्ट्रासाठी ते परकीयच आहे. त्याच्या सोबतीने आलेली इतर पेये अजून आंग्ल नांवानेच ओळखली जातात. शिवाय त्याच्या बरोबर किंवा त्यात बुडवून खाण्याच्या भट्टीत भाजलेल्या मैद्याच्या गोल किंवा चौकोनी चकत्याही आल्याच. त्यांनी आपले आंग्ल नांव सोडले नसल्यामुळे त्यांचा त्याग करणे आवश्यक होते. त्यामुळे मी स्पष्ट नकार दिला.

स्नान करण्यासाठी न्हाणीघरात गेलो. इथे पाणी तापवण्याच्या तांब्याच्या बंबाचा प्रवेश कधी झालाच नव्हता. विद्युल्लतेच्या वहनाला अवरोध करून निर्माण होणाऱ्या ऊष्णतेचा उपयोग त्यासाठी केला गेला होता. पण त्या साधनाचे फक्त इंग्रजी नांवच मला माहीत होते. ते सुरू करावयासाठी अंगुलीस्पर्श करायच्या जागेला मराठीत कळ असे म्हणतात असे ऐकले होते पण आयत्या वेळी ते कांही आठवेना. अहो, घरात कोणीच त्याला कळ म्हणत नाहीत आणि बाजारात देखील ‘कळ’ मागायला गेलो तर मिळत नाही. काय करावे ते न कळल्यामुळे नळराजाची तोटी सोडली आणि थंड गार पाण्याची धार डोक्यावर घेतली. त्यामुळे अंगात हुडहुडी भरली पण डोके जरा जास्तच तल्लखपणाने काम करायला लागले आणि डोक्यात एक नवीनच प्रकाश पडला. त्यातून आता मात्र मोठाच प्रश्न समोर उभा राहिला.

अंग पुसण्यासाठी जे रेषारेषांनी युक्त असे चौकोनी फडके मी ठेवले होते त्याचे फक्त इंग्रजी नांवच मला ज्ञात होते. ते बाजारातून विकत आणल्यापासून वापरतांना, धुवून वाळत घालतांना किंवा घडी करून कपाटात ठेवतांना अशा सर्व प्रसंगी त्या अंगपुसण्याचा उल्लेख त्याच्या आंग्ल नांवानेच होत असे. त्याच्या बदल्यात राजापुरी पंचा आणायला हवा होता. एवढेच नव्हे तर माझ्या अतर्वस्त्रावरील ‘वायफळ इब्लिस परदेशी’ या शब्दांची इंग्रजी आद्याक्षरे मला वाकुल्या दाखवीत होती. आतापर्यंत मी बाहेर जातांना जे कपडे अंगात घालत आलो होतो त्यांची नांवे देखील इंग्रजी होती तर घरात वापरात असलेले कपडे परप्रांतातून आलेले होते. मराठी बाणा जपायचा झाल्यास मला कंबरेला पंचा किंवा धोतर गुंडाळून वर कुडते, बंडी, बाराबंदी, उपरणे असे कांही तरी परिधान करायला पाहिजे. ही वस्त्रे तर माझ्याकडे नव्हतीच. शिवाय ती कोणत्या दुकानात मिळतात हे सुध्दा मला ठाऊक नव्हते.

दोन हजार वर्षापूर्वी कोठलासा वेडा शास्त्रज्ञ “सापडले, सापडले” असे ओरडत न्हाणीघरातून निघाला आणि रस्त्यातून विवस्त्र स्थितीत पळत सुटला होता म्हणे. आता मीसुद्धा “कोठे सापडेल? कोठे मिळेल कां?” असे ओरडत रस्त्यातून धांवतो आहे या विचाराने मला हुडहुडी भरलेल्या स्थितीत दरदरून घाम फुटला आणि मी खडबडून जागा झालो.

——————–

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: