निवडणुका – भाग १

निवडणुका

निवडणुका – भाग २

निवडणुका – भाग ३

आता पुन्हा एकदा सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या आहेत. त्याची रणधुमाळी आधीच सुरू झाली आहे. आता त्यात रोज भर पडत जाईल आणि रंग भरत जातील. सोशल मीडियावर तर ही निवडणूक खूपच गोंगाटाची जाणार यात शंका नाही. माझ्या आयुष्यातल्या माझ्या अजून लक्षात असलेल्या निवडणुकांच्या आठवणी मी तो गोंगाट जास्त वाढायच्या आतच या अनुदिनीवर देत आहे. माझ्या ब्लॉगवर मी कधीच राजकारणावरील पोस्ट टाकत नाही पण या काळात घडून गेलेल्या राजकीय घडामोडींचा या निवडणुकांवर प्रचंड परिणाम झाला होताच. त्यामुळे त्यांचाही त्रोटक उल्लेख करणे अपरिहार्य आहे. मी ते शक्य तेवढ्या त्रयस्थ वृत्तीने केले आहे, पण माझ्या लेखनामध्ये मी कुठेतरी डोकावतोच.

निवडणुका – भाग १

स्वतंत्र भारतातली पहिली सार्वत्रिक निवडणूक १९५१-५२ साली झाली तेंव्हा मी फारच लहान होतो, मला त्याबद्दल काहीच आठवत नाही. त्यानंतर १९५७ साली झालेली दुसरी निवडणूक मला अंधुकशी आठवते. त्या काळात फ्लेक्सचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे गावात जागोजागी आतासारखी मोठमोठी रंगीबेरंगी पोस्टर्स लावली जात नव्हती. स्थानिक पेंटरने रंगवलेले लहान लहान साधेसुधे फलक गावातल्या काही मोक्याच्या जागी लावले होते. बैलजोडीचे चित्र काढलेले पोस्टर एका त्रिकोणी ए फ्रेम्सच्या दोन्ही बाजूंना लावून त्यांना खाली एका लहानशा हातगाडीसारखी दोन चाके बसवली होती. अशा काही गाड्या वाजतगाजत गावामध्ये फिरवल्या जात होत्या. त्या काळात थेटरात लागलेल्या सिनेमाच्या जाहिरातीही अशाच गाड्यांवरून केल्या जात असत. दहा बारा बैलजोड्यांना सजवून एका रांगेत चालवत त्यांची एक मोठी मिरवणूक रस्त्यावरून जात असतांना मी एकदा पाहिलेली आठवते. त्यांच्यासोबत अनेक खादीधारी कार्यकर्ते बेंबीच्या देठापासून जोर लावून घोषणा देत चालत होते. त्यांच्या मागे एका सजवलेल्या बैलगाडीत उभे राहिलेले स्व.बसप्पा दानप्पा जत्ती म्हणजे आमचे ‘जत्तीमंत्री’ रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या सर्व लोकांना विनम्र अभिवादन करत होते आणि आम्ही पोरेटोरेसुद्धा जिंदाबाद जिंदाबाद ओरडत दहा बारा मिनिटे त्या गाड्यांच्या मागून चालत पुढे गेलो होतो असे एक दृष्य माझ्या आठवणींच्या कोपऱ्यात बसलेले आहे.

बसप्पा दानप्पा जत्ती या सद्गृहस्थाला लहानपणी जवळून पाहतांना मला ते जसे दिसले होते, त्यांचे जे इम्प्रेशन माझ्या बालमनावर उमटलेले होते ते अखेरपर्यंत जवळजवळ तसेच राहिले. त्या काळात ते तेंव्हाच्या मुंबई राज्यात स्व.मोरारजी देसाई यांच्या हाताखाली कसलेसे उपमंत्री होते. यामुळे गावातले लोक त्यांना जत्तीमंत्री याच नावाने ओळखत असत. पुढे राज्यपुनर्रचना झाली आणि आमचा भाग मैसूर राज्यात (आजच्या कर्नाटकात) गेला. तिथे निजलिंगप्पा आणि हनुमंतय्या नावाचे दोन हुम्म गडी सुंदउपसुंदांसारखे एकमेकांशी झुंजत होते. त्यावर तोडगा म्हणून आमच्या अजातशत्रू, मृदूभाषी आणि सौम्य सोज्ज्वळ वृत्तीच्या जत्तींच्या गळ्यात एकदम मुख्यमंत्रीपदाची माळ घालण्यात आली. पुढे निजलिंगप्पांची सरशी झाल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले आणि जत्तींनी त्यांच्या मंत्रीमंडळात वेगवेगळी खाती सांभाळली. तिथून उचलून त्यांना एकदम भारताचे उपराष्ट्रपती बनवले गेले आणि राष्ट्रपतींचे अचानक निधन झाल्यानंतर काही काळ ते हंगामी राष्ट्रपतीही झाले. त्या काळात मी त्यांना अनेक वेळा दूरदर्शनवर पाहिले. त्यातसुद्धा दर वेळी मला त्यांच्या चेहेऱ्यावर तसेच सौम्य भाव दिसले आणि बोलण्याचालण्यातून तसेच देहबोलीमधून माझ्या ओळखीचे तेच सहृदय व्यक्तीमत्व प्रगट झाले.

पंडित नेहरूजींच्या काळात काँग्रेस हाच एकमेव राष्ट्रीय पक्ष होता. आपल्या देशात समाजवादी, प्रजासमाजवादी, साम्यवादी, जनसंघ, स्वतंत्र वगैरे आणखीही काही पक्ष आहेत आणि मुंबई, पुणे, दिल्ली, कलकत्ता यासारख्या शहरांमध्ये त्यांचा थोडाफार जोर आहे असे मोठ्या लोकांच्या बोलण्यामधून माझ्या कानावर पडत होते. त्या काळात घरोघरी वर्तमानपत्रे घेतली जात नसत. गावातल्या सार्वजनिक वाचनालयातल्या मोठमोठ्या लाकडी स्टँड्सवर निरनिराळी वर्तमानपत्रे स्क्रूने अडकवून ठेवलेली असायची. माझी उंची तिथपर्यंत वाढल्यानंतर निव्वळ कुतूहल म्हणून मीही अधून मधून त्यात डोके खुपसून पाहून येत असे. त्यामुळे कॉ.डांगे, कॉ.रणदिवे, ना.ग.गोरे, मधू लिमये, राजगोपालाचारी, अटलबिहारी वाजपेयी अशी काही नावे अधून मधून नजरेखालून जात होती. पण आमच्या गावात मात्र दुसऱ्या कोणत्याही पक्षाचे अगदी नाममात्र अस्तित्वही नव्हते. निवडणुकीतल्या उमेदवाराचे नाव किंवा चेहरासुद्धा ओळखीचा नसला तरी सगळ्यांचे शिक्के बैलजोडीच्या चिन्हावर मारले जात असत. त्या काळात एकाद्या बुजगावण्याला गांधी टोपी घालून उभे केले असते तरी तोसुद्धा सहज निवडून आला असता अशीच परिस्थिती होती. आमचे जत्तीमंत्री तर चांगले सुशिक्षित, सुसंस्कृत आणि हुषार दिसायचे, ते निवडून न येण्याचा प्रश्नच नव्हता. १९५७ साली त्यांच्या विरोधात कुठला कोण माणूस उभा होता त्याच्याबद्दल एक अक्षरसुद्धा कधी माझ्या कानावर पडलेले आठवत नाही. त्या काळात लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जायच्या. आमचा भाग लोकसभेच्या कोणत्या मतदारसंघात येतो आणि तिथे बैलजोडीच्या चिन्हावर कोणता पाटील की गौडा उभा होता हे ही आता आठवत नाही. मात्र तो गृहस्थ आमच्या गावातला नक्कीच नव्हता आणि त्याच्याबद्दल माहिती समजून घेण्यात घरातल्या कोणालाही मुळीसुद्धा रस नव्हता. यामुळे त्या निवडणुकीच्या निकालाबद्दल गावातल्या कोणालाही कसलीच उत्सुकता नव्हती. आमचे जत्तीमंत्री ठरल्याप्रमाणे सहजपणे निवडून आले आणि मुंबईला जाऊन पुन्हा मंत्रीपदावर विराजमान झाले. खरे सांगायचे तर त्या काळात ते मंत्री असल्यामुळे नेहमी मुंबईमध्येच वास्तव्याला होते, प्रचाराच्या निमित्याने एक दोनदा गावाकडे येऊन गेले असतील.

मी कॉलेजच्या हॉस्टेलवर रहायला गेल्यानंतर रोज तिथल्या मेसमध्ये सगळी वर्तमानपत्रे वाचायला मिळायची. ठळक मथळे, बातम्या, लेख, अग्रलेख वगैरे वाचता वाचता माझा देशाच्या राजकारणातला इंटरेस्ट वाढत गेला. त्या काळात अनेक घटनाही घडून आल्या. १९६२ सालच्या निवडणुका झाल्या त्या काळात मी मुंबईत होतो आणि मला राजकारणाची पुसटशी ओळख ओळख होत होती. त्यामुळे मला सगळ्या पक्षांमधल्या मोठ्या पुढाऱ्यांची भाषणे वाचायला आणि काहीजणांची भाषणे ऐकायला मिळाली. त्या निवडणुकीतली ईशान्य मुंबईमधली लढत खूप गाजली होती. काँग्रेसचे उमेदवार तत्कालीन संरक्षणमंत्री व्ही.के.कृष्णमेनन आणि विरोधी पक्षांनी एकजूट करून प्रजासमाजवादी पक्षातर्फे रणांगणात उतरवलेले वयोवृद्ध ज्येष्ठ नेते आचार्य जे.बी.कृपलानी यांच्यात अटीतटीचा सामना झाला. तसे पाहता हे दोघेही मुंबईच्या बाहेरून आलेले उमेदवार होते, त्यातला कोणीच स्थानिक नव्हता. पण तरीसुद्धा इथले सर्वसामान्य लोक या किंवा त्या उमेदवाराची बाजू घेऊन एकमेकांशी वादविवाद करतांना दिसत होते. प्रत्यक्ष मतदानात मात्र मेनन यांना घवघवीत यश मिळाले. आधी होऊन गेलेल्या तीन निवडणुकांप्रमाणेच या निवडणुकीतही पं.नेहरूंच्या अधिपत्याखाली काँग्रेसने चांगला दणदणित विजय मिळवला आणि ते पंतप्रधानपदी विराजमान झाले.

पण त्या वर्षाअखेरीला चीनने केलेल्या आक्रमणाने पं.नेहरूंना तोंडघशी पाडले. त्यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. काँग्रेसची प्रतिमा सुधारण्याच्या उद्देशाने पंडितजींनी कामराज योजनेच्या नावाने अनेक वयोवृद्ध नेत्यांना मंत्रीपदावरून हटवले. पण ते स्वतःच पुढे जास्त काळ जीवंत राहिले नाहीत. त्यांच्या निधनानंतर लालबहादुर शास्त्री पंतप्रधान झाले. त्यांनी अल्पावधीतच आपली चांगली छाप पाडली, पण दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर त्या काळच्या सर्व ज्येष्ठ पुढाऱ्यांना वगळून श्रीमती इंदिरा गांधींना पंतप्रधान करण्यात आले. या दोन्ही घटनांमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कामराज यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. इंदिरा गांधींनी नव्या दमाचा आपला खास गट स्थापन केला आणि जुन्या नेत्यांना न जुमानता सत्तेची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली. त्यांना गूँगी गुडिया समजणारे जुने पुढारी यामुळे नाराज झाले. या पार्श्वभूमीवर झालेली १९६७ ची निवडणूक थोडी चुरशीची झाली आणि इंदिराजींनी ती जेमतेम कशीबशी जिंकली. पण त्या वेळीसुद्धा काँग्रेसला पर्यायी असा विरोधी पक्ष नव्हता. उरलेल्या जागा अनेक पक्षांमध्ये विभागल्या गेल्या होत्या आणि त्यांच्यात आपसात भांडणे होती, पण भारतीय जनसंघ, समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट आदि पक्षांनी आपापले बळ असलेले विभाग तयार केले होते.

पुढे काँग्रेसचेच विभाजन होऊन त्यातला एक भाग इंदिराजींनी आपल्या ताब्यात घेतला. पण त्यानंतर त्यांनी जी अनेक पावले उचलली त्यामुळे त्यांची आणि त्यांच्या काँग्रेसची लोकप्रियता वाढत गेली आणि पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धानंतर ती शिगेला पोचली. त्यामुळे १९७२ मध्ये झालेल्या निवडणुका त्यांनी सहजपणे जिंकल्या. त्या काळातल्या सगळ्या तरुण वर्गाला इंदिराजींबद्दल खूप आदर वाटत होता आणि त्यांच्या यशाबद्दल कुणालाही शंकाच वाटत नव्हती. पण काही शहरी भागांमध्ये विरोधी पक्षांची ताकतही वाढली होती. भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासाठी एक आंदोलन सुरू केले गेले. निर्विवाद निष्कलंक चारित्र्य असलेले ज्येष्ठ समाजवादी नेते बाबू जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली चाललेले हे जनआंदोलन हाताबाहेर जात आहे असे दिसताच पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी पुकारली आणि एक दमनयंत्र सुरू झाले. सर्व प्रमुख विरोधी नेत्यांची धरपकड झालीच, लहानसहान कार्यकर्त्यांनाही तुरुंगांमध्ये डांबून ठेवण्यात आले. काँग्रेसअंतर्गत उमटायला लागलेले विरोधी सूरसुद्धा दाबून टाकले गेले. राजकारणाशी कसलाच संबंध नसतांना निव्वळ संशय, व्यक्तीगत आकस किंवा गैरसमजुतीमुळे काही लोक उगाचच पकडले गेले होते असे म्हणतात. आपले नातेवाईक, शेजारी, मित्रमंडळी आणि त्यांचे शेजारी, मित्र किंवा नातेवाईक वगैरे वाढत जाणाऱ्या वर्तुळांमधल्या कुणाला तरी अचानक पकडून नेल्याची बातमी अधून मधून कानावर यायची. पण त्या व्यक्तीशी आपला काही संबंध आहे हे कुणाला कळू नये म्हणून ती बातमी दबक्या आवाजात पण तिखटमीठ लावून सांगितली जायची. सगळी प्रसारमाध्यमे दहशतीखाली असल्यामुळे त्यातले खरे खोटे समजायला कोणताच मार्ग नव्हता. आपल्या आसपास वावरणारे कोण लोक गुप्तहेरगिरी करत असतील हे सांगता येत नसल्यामुळे मनावर सतत एक दडपण असायचे. यामुळे वरून शांत दिसली तरी बहुतेक जनता मनातून खदखदत होती.

१९७७ साली घेतलेल्या निवडणुका अशा भारलेल्या वातावरणात झाल्या. आणीबाणीच्या काळात सरसकट सगळ्याच पक्षांच्या कार्यकर्त्यांना अटकेत डांबून ठेवले गेले असल्यामुळे तुरुंगांमध्येच त्यांचे थोडेफार सख्य जमले होते. सुटून बाहेर आल्यानंतर काँग्रेस पक्षाविरुद्ध लढा देण्यासाठी आपापसातले तात्विक मतभेद बाजूला ठेऊन ते सगळे एकत्र आले. काहीही करून काँग्रेस पक्षाला सत्तेवरून खाली खेचणे एवढा एकच कार्यक्रम घेऊन जनता पक्ष नावाचा एक नवा पक्ष घाईघाईत तयार केला गेला. आणीबाणी उठवली गेली असली तरी लोकांच्या मनात बसलेली भीती होतीच. त्यामुळे काहीही उघडपणे बोलायला ते अजूनही बिचकत होते, पण ज्या लोकांना आणीबाणीची प्रत्यक्ष झळ आधीच लागून गेली होती ते मात्र करो या मरो या भावनेने कामाला लागले. त्या काळात दूरदर्शनवरले प्रसारण सुरू झालेले असले तरी ते मुख्यतः सरकारीच असायचे. त्यावर जाहिराती दिल्या जात नव्हत्या. कुठल्याही कार्यक्रमात एकाद्या पक्षाचा प्रचार नाहीच, साधा उल्लेखसुद्धा येऊ दिला जात नव्हता. खाजगी वाहिन्या तर नव्हत्याच. त्या निवडणुकीतला प्रचार मुख्यतः दारोदारी फिरून मतदारांना भेटून केला गेला. आणीबाणीच्या काळात केल्या गेलेल्या दडपशाहीचा लोकांनाच इतका तिटकारा आला होता की तेही जनता पक्षाच्या प्रचाराला उत्स्फूर्त दाद देत होते.

त्या काळात एकदा आमच्या कॉलनीतल्या कोपऱ्या कोपऱ्यावर जाऊन, तिथे एका जीपच्या टपावर उभे राहून तिथे रस्त्यात जमलेल्या लोकांसमोर पोटतिडिकीने भाषण करतांना मी प्रमोद महाजनांना पाहिले होते. हा चळवळ्या तरुण पुढे जाऊन मोठा नेता होणार आहे असे तेंव्हा मला माहीत नव्हते. पु.ल.देशपांडे, दुर्गाबाई भागवत यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि लोकांच्या मनात आदरभाव असलेल्या साहित्यिकांनीसुद्धा लेख लिहून आणि भाषणे करून जनजागृती करण्याची मोहीम हातात घेतली. ती निवडणूक त्यापूर्वी झालेल्या कुठल्याही निवडणुकीपेक्षा खूप वेगळी होती. सामान्य लोकांमध्ये आलेले इतके चैतन्य मी यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. अर्थातच मतमोजणी सुरू झाली तेंव्हा काय निकाल लागेल याबद्दल प्रत्येकाच्या मनात प्रचंड उत्कंठा होती. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी दिवसभर रेडिओसमोर बसून निकालाच्या बातम्या ऐकत आणि टाळ्या वाजवून दाद देत राहिलो. आम्ही रहात असलेल्या भागातून जनता पार्टीच्या जयवंतीबेन मेहता निवडून आल्याचे कळताच झालेला जल्लोष अपूर्व होता. देशभरात, मुख्यतः उत्तर भारतात काँग्रेसचा साफ धुव्वा उडाला होता आणि त्या निवडणुकीत खरोखरीच लोकशाहीचा विजय झाला होता. पण तरीही मुंबई सोडून बाकीचा महाराष्ट्र आणि कर्नाटक, आंध्र वगैरे राज्यांमध्ये काँग्रेसला यश मिळाले होते.
. . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

2 प्रतिसाद

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: