निवडणुका – भाग २

निवडणुका – भाग १

निवडणुका – भाग ३

मृगाः मृगैः संगमनुव्रजन्ति गोभिश्च गावः तुरगास्तुरंगैः ।
मूर्खाश्च मूर्खैः सुधियः सुधीभिः समानशीलव्यसनेषु सख्यम् ।।

असे एक संस्कृत सुभाषित आहे. समान शील किंवा संकट असलेल्यांमध्ये सख्य होते असा याचा अर्थ आहे. यात सांगितल्याप्रमाणे हरिणांचे हरिणांबरोबर किंवा गायींचे गायींसोबत सख्य होते त्याचप्रमाणे मूर्खांचे मूर्खांशी आणि सज्जनांचे सज्जनांशी चांगले जुळते. अर्थातच परस्परविरोधी स्वभावाच्या प्राण्यांचे किंवा माणसांचे सख्य होत नाही, झाले तरी ते फार काळ टिकत नाही. १९७७ साली झालेल्या निवडणुकांमध्ये ज्या महाभागांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली होती ते असेच एकमेकांहून फारच भिन्न प्रकृतीचे होते. मोरारजीभाई देसाई आणि जॉर्ज फर्नांडिस, लालकृष्ण अडवानी आणि राजनारायण अशासारख्या नेत्यांमधून पूर्वी कधी विस्तव जात नव्हता. काहीही करून काँग्रेस पक्षाला सत्तेवरून खाली खेचायचेच अशा सिंगल पॉइंट प्रोग्रॅमसाठी ते एकत्र आले होते. त्यांच्या आचारविचारात कधीच साम्य नव्हते आणि आणीबाणीचे समान संकटही दूर झाले होते. त्यामुळे सत्तापालटाचे उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर त्यांच्या आपापसातल्या कुरबुरी सुरू झाल्याच, मोरारजीभाईंना दिलेली पंतप्रधानपदाची खुर्ची आपल्यालाच मिळावी यासाठी इतर वयोवृद्ध नेते आसुसलेले होते. त्यातल्या संधीसाधू चरणसिंग यांनी इतर काही खासदारांना आपल्या बाजूला करून घेतले आणि इंदिरा गांधींचा छुपा पाठिंबा घेऊन जनता पक्षातून बंडखोरी केली, सरकारला अल्पमतात आणले, मोरारजीभाईंना राजीनामा द्यावा लागला आणि चरणसिंग पंतप्रधानपदी विराजमान झाले. जेमतेम सहा महिने गेल्यानंतर इंदिरा गांधींनी त्यांना दिलेला पाठिंबा काढून घेतला आणि सरकारला मध्यावधी निवडणुका करायला भाग पाडले.

१९८० साली झालेली सहाव्या लोकसभेची निवडणूक या पार्श्वभूमीवर झाली. तोपर्यंतच्या काळात जनता पार्टीचा प्रयोग सपशेल अयशस्वी झाला होता. पूर्वाश्रमीच्या जनसंघीयांनी भारतीय जनता पार्टी या नावाचा नवा पक्ष स्थापन केला होता आणि समाजवादी, साम्यवादी वगैरे डाव्या विचारसरणीच्या लोकानी त्या पक्षाला जोरदार विरोध सुरू केला होता. विरोधी पक्षांचे नेते पुन्हा पूर्वीसारखेच आपापसात हाणामारी करत असल्यामुळे त्यांचा प्रभाव त्यांच्या काही बालेकिल्ल्यांमध्येच शिल्लक राहिला होता. सामान्य जनतेला त्यांचा विश्वास वाटत नव्हता. आणीबाणीच्या काळातल्या घटनांबद्दल लोकांचा दृष्टीकोणही थोडा बदलून सौम्य झाला होता. त्यापूर्वीच्या काळातल्या १९७७ च्या निवडणुकांमध्येही महाराष्ट्र आणि दक्षिण भारताने काँग्रेसला साथ दिलेली होतीच. १९८० च्या निवडणुकीत त्यात वाढ झाली आणि उत्तर भारतात काही ठिकाणी कांग्रेस पक्षाने पुन्हा आपले बस्तान बसवले. तीनच वर्षांपूर्वी पराभूत होऊन पायउतार झालेल्या इंदिरा गांधी १९८० च्या निवडणुकींमध्ये पुन्हा बहुमताने विजयी झाल्या आणि सत्तेवर आल्या. पण लगेच खालिस्तानचे हिंसक आंदोलन सुरू झाले. त्यातून मार्ग काढत त्यांनी आपला जम बसवला आहे असे वाटत असतांनाच त्यांचा खून झाला. पण त्यांनी देशाच्या हिताच्या दृष्टीने जी पावले उचलली होती त्यामुळे नाराज झालेल्या लोकांनी हे कृत्य केले असल्यामुळे इंदिराजींना हौतात्म्य प्राप्त झाले.

इंदिरा गांधी पंतप्रधानपदी असतांनासुद्धा राजीव गांधी राजकारणात न येता वैमानिकाची नोकरी करत होते, प्रसिद्धीच्या झगमगाटापासून सतत दूर राहिले होते. त्यांच्या वर्तनामधून त्यांची एक वेगळी चांगली प्रतिमा तयार झाली होती. आणीबाणीच्या काळातल्या हडेलहप्पी घटनांचे खापर दिवंगत संजय गांधींवर फोडून झाले होते, जनतेकडून त्यावर झालेल्या संतप्त प्रतिक्रियांचा फटका राजीव यांना बसला नव्हता. ते या देशाचे सर्वात तरुण आणि उमदे पंतप्रधान होते आणि प्रगतीची भाषा बोलत होते, विरोधी पक्षांची आपापसातली भांडणे चालू होतीच, शिवाय इंदिरा गांधींच्या हौतात्म्यामुळे मिळालेली सहानुभूती राजीवजींच्या पाठीशी होतीच. त्या घटनेनंतर लगेचच झालेल्या १९८४च्या निवडणुकीवर या सर्वांचा मोठा परिणाम झाल्याने राजीव गांधींच्या काँग्रेस पक्षाला ४०० च्यावर जागा मिळून अभूतपूर्व असा विजय मिळाला. या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळातसुद्धा सर्वांना याचा अंदाज आला होता त्यामुळे ती निवडणूक चुरशीची झालीच नाही.

राजीव गांधी यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ तसा सुस्थितीत गेला. पण विरोधी पक्षांनीही आपापली ताकद वाढवली होती. त्यानंतर १९८९ साली झालेल्या निवडणुकीच्या आधी काँग्रेसमधले विश्वनाथ प्रतापसिंह यांनी बंडाचा झेंडा उभारला आणि ते काँग्रेसमधून बाहेर पडले. संरक्षणखात्यासाठी परदेशातून केल्या गेलेल्या मोठ्या किंमतीच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार केला गेला असल्याचा खूप बोभाटा झाला. त्या काळात गाजलेल्या एका व्यंगचित्रात असे दाखवले होते की विश्वनाथ प्रतापसिंह यांच्याकडे पाहून राजीव गांधी म्हणत आहेत, “इसकी कमीज मेरे कमीजसे ज्यादा सफेद क्यूँ?” या निवडणुकीत पुन्हा अटीतटीच्या लढती झाल्या आणि पहिल्यांदाच काँग्रेस पक्ष अल्पमतात आला. जनता दल आणि भारतीय जनता पक्ष या दोन पक्षांना घसघशीत यश मिळाले, पण कुणालाच बहुमत मिळाले नाही. विश्वनाथ प्रतापसिंह यांच्या नेतृत्वाखाली एक लोकशाही आघाडी स्थापन करण्यात आली आणि त्या मोर्च्याने सत्ता काबीज केली. पण १९७७ साली जशी जनतापक्षाची खिचडी तयार केली गेली होती, तसेच या आघाडीच्या बाबतीत झाले. या मोर्च्यातले पक्ष तर सरकारमध्ये एकत्र आले होते तरी स्वतंत्रच राहून निरनिराळ्या सुरांमध्ये बोलत राहिले होते. यामुळे पूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली. जेमतेम वर्षभरामध्ये त्यात बंडाळी झाली आणि या वेळी चंद्रशेखर यांनी फुटून बाहेर पडून काँग्रेसच्या मदतीने पंतप्रधानपद मिळवले. पण तेही काही महिनेच टिकले आणि १९९१ मध्ये पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुका करणे प्राप्त झाले.

१९९१च्या निवडणुकी वेगळ्याच कारणाने ऐतिहासिक ठरल्या, त्या वेळी अत्यंत प्रबळ असा कोणताच राष्ट्रीय पक्ष भारतात शिल्लक राहिला नव्हता. निरनिराळ्या राज्यांमध्ये अनेक स्थानिक पक्ष प्रबळ झाले होते. दक्षिणेतल्या तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळहम, आंध्रात तेलगू देसम्, महाराष्ट्रात शिवसेना, उत्तर भारतात कुठे बहुजन समाज, कुठे लोकदल, कुठे समाजवादी, कुठे झारखंड मुक्ती मोर्चा, कुठे अकाली दल यासारखे विकल्प तयार झाले होते. कम्युनिस्टांनी बंगाल आणि केरळ काबीज केला होता. भारतीय जनता पक्षाने दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान वगैरे प्रदेशात चांगला जम बसवला होता. यातल्या निरनिराळ्या पक्षांनी राज्य पातळीवर निवडून येऊन आपापली सत्ता प्रस्थापित केली होती. या सगळ्या गोंधळात निवडणुकीनंतर काय होणार हे एक प्रश्नचिन्हच होते. इंदिरा गांधींनी १९८० साली जशी देशभर सहानुभूती किंवा मान्यता मिळवली होती तशी हवा राजीव गांधी यांना निर्माण करता आली नव्हती. या निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा यश मिळेल असे अजीबात वाटत नव्हते. पण अचानक एक अघटित वाईट घटना घडली. त्या निवडणुकीचे काही ठिकाणचे मतदान होऊन गेल्यानंतर राजीव गांधी निवडणुकीच्या प्रचारासाठी तामीळनाडूमध्ये गेलेले असतांना त्यांच्यावर अतिरेक्यांनी घाला घातला. याने सर्व देश हळहळला. काँग्रेसच्या कारभारावर लोक नाराज झालेले असले तरी व्यक्तीशः राजीव गांधी काही प्रमाणात लोकप्रिय होते. बहुधा त्यांच्या अशा प्रकारे झालेल्या आकस्मिक निधनाची प्रतिक्रिया त्यानंतर झालेल्या उरलेल्या जागांच्या निवडणुकींवर झाली. पुन्हा एक सहानुभूतीची लाट आली, यामुळे पारडे फिरले आणि काँग्रेस पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या. तरीसुद्धा त्याला पूर्ण बहुमत मिळाले नाहीच. काँग्रेस खासदारांच्या प्रमुखपदी नरसिंहराव या मुरब्बी नेत्याची निवड करण्यात आली. त्यांनी घोडेबाजारातून काही फुटकळ पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा मिळवला आणि ते पंतप्रधान झाले.

१९९१ साली बहुमत मिळाले नसतांनाही पंतप्रधानपदावर आलेल्या नरसिंहराव यांना अनेक अडचणी आल्या. त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांवर वादळे उठली, त्यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप करण्यात आले, त्यांचे काही वरिष्ठ साथी पक्ष सोडून गेले तर काही मित्रपक्षांनी पाठिंबा काढून घेतला. तरीही नरसिंहराव यांनी या सर्वांना तोंड देत आपली गादी पाच वर्षे कशीबशी सांभाळली. तोपर्यंत स्वातंत्र्यप्राप्तीला चार दशके उलटून गेली असल्यामुळे स्वातंत्र्यलढ्यातला सहभागी झालेले बहुतेक नेते आणि तो लढा पाहिलेले बहुतेक मतदार काळाच्या पडद्याआड गेले होते. या तथाकथित स्वातंत्र्यसैनिकांनी सत्तेवर आल्यानंतर केलेला ऐषोआरामच नव्या पिढीतल्या लोकांनी पाहिला असल्यामुळे त्यांचे मत काँग्रेसच्या विरोधात गेलेले होते. शिवाय पूर्वीच्या काँग्रेसमधले कित्येक लोक नंतरच्या काळात विरोधी पक्षांमध्ये गेले होते. यामुळे एके काळी स्वातंत्र्ययुद्धासाठी केलेला त्याग, भोगलेला तुरुंगवास आणि निवडलेले कष्टमय जीवन हा काँग्रेसच्या बाजूचा मुद्दाच शिल्लक राहिला नव्हता. या काळात काँग्रेस पक्षाची पीछेहाट होत राहिली.

याच्या उलट या काळात भारतीय जनता पार्टीचे बळ वाढत गेले. या पक्षाला १९९१च्या निवडणुकीत १२० जागा मिळाल्या होत्या. १९७७ चा अपवाद वगळता यापूर्वी कोणत्याही विरोधी पक्षाला इतके यश मिळाले नव्हते. आपली वाढत असलेली ताकत पाहून भाजपमध्ये जास्त चैतन्य आले आणि आपली लोकप्रियता वाढवण्याच्या दिशेने त्यांचे जोराचे प्रयत्न सुरू झाले. रामजन्मभूमीवर राममंदिर बांधण्यासाठी आंदोलन सुरू झाले, मोठा गाजावाज करून रथयात्रा काढण्यात आली आणि तिला जनतेकडून भरघोस प्रतिसादही मिळाला. त्या आंदोलनाची परिणती अयोध्या येथील बाबरी मशीदीचा ‘ढाँचा’ उध्वस्त करण्यात झाली. या घटनेच्या प्रतिक्रिया देशभर होत राहिल्या. यामुळे वातावरण तापत राहिले. या सर्वांचा परिणाम १९९६ च्या निवडणुकांवर किती होणार आहे हे प्रश्नचिन्ह सर्वांच्या मनात होतेच. या वेळच्या निवडणुकीच्या निकालाबद्दल काहीच खात्रीपूर्वक सांगता येत नव्हते. सर्वांच्या मनात त्याबाबत खूप उत्सुकता होती. निकाल जाहीर झाले तेंव्हा या वेळी भाजपला १६१ जागा मिळाल्या, त्या काँग्रेसला मिळालेल्या १४० हून जास्त असल्याने भाजपला पहिल्यांदाच लोकसभेत सर्वाधिक जागा मिळाल्या. त्या पक्षाला सरकार बनवण्याची संधी दिली गेली आणि अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. लोकसभेतले आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना १५ दिवसांची मुदत दिली गेली, पण त्या मुदतीत त्यांना आवश्यक तेवढी बहुसंख्या जमवता न आल्याने त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही मुख्य पक्षांना वगळून संयुक्त आघाडीच्या (युनायटेड फ्रंटच्या) देवेगौडा यांना आणि त्यानंतर इंद्रकुमार गुजराल यांना पंतप्रधान बनवले गेले. पण पूर्वीच्या अशा प्रकारच्या खिचडी सरकारांचा अनुभव पाहता हा प्रयोग यशस्वी होण्यासारखा नव्हताच. या लोकांकडे संख्याबळ नव्हतेच, ते बाहेरून मिळालेल्या पाठिंब्यावर अवलंबून होते. त्या दोघांनाही पुरते एक एक वर्षसुद्धा आपले पद सांभाळता आले नाही. यामुळे १९९८ साली मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागल्या.

त्या निवडणुकीत उतरण्यापूर्वी भारतीय जनता पार्टीने काही प्रादेशिक मित्रपक्षांची जुळवाजुळव करून एनडीए (नॅशनल डेमॉक्रॅटिक अलायन्स) ही आघाडी तयार केली. या निवडणुकीत भाजपाच्या जागांची संख्या वाढून १८२ वर गेली आणि एनडीए (नॅशनल डेमॉक्रॅटिक अलायन्स) आघाडीला बहुमत मिळून अटलबिहारी वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले. पण दीड वर्षांनंतर अण्णा द्रमुकने आपला पाठिंबा मागे घेतल्यामुळे ते सरकार अल्पमतात आले. त्यांच्या मंत्रिमंडळावर अविश्वास दाखवणारा ठराव लोकसभेच्या अधिवेशनात अवघ्या एका मताने मंजूर झाला. त्यांनी १९९९ साली पुन्हा मध्यावधी निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला.

१९९९ सालची निवडणूकसुद्धा खूप अटीतटीची झाली. या निवडणुकीच्या आधी होऊन गेलेल्या कारगिलच्या युद्धाने भाजप सरकारची प्रतिमा थोडी उजळली होती. १९९९ च्या निवडणुकांच्या वेळी एनडीएने २० पक्षांना एकत्र आणून भक्कम आघाडी तयार केली. या उलट शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस काढली होती. यामुळे काँग्रेसला तोपर्यंत झालेल्या कुठल्याही निवडणुकीतल्याहून कमी म्हणजे फक्त ११४च जागा मिळाल्या. भाजपच्या जागांचा आकडा पूर्वी एवढा १८२ वरच राहिला असला तरी त्यांच्या आघाडीला चांगले बहुमत मिळाले, पण समता, ममता आणि जयललिता यांच्या मर्ज्या सांभाळून काम करणे ही थोडी तारेवरची कसरतच होती. तरीही अटलजींच्या सरकारने पूर्ण पाच वर्षे राज्यकारभार केला. या काळात त्यांनी खरे तर चांगली म्हणण्यासारखी कामगिरी केली. पण ती कदाचित सर्वच लोकांच्या अपेक्षेइतकी चांगली झाली नसावी.

२००४ च्या निवडणुकीला एनडीए (नॅशनल डेमॉक्रॅटिक अलायन्स) जरा जास्तच आत्मविश्वासाने सामोरी गेली. समाजाच्या सुशिक्षित मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय स्तरावरील लोक या सरकारवर खूष असल्यामुळे त्या लोकांमध्ये एक ‘फील गुड फॅक्टर’ तयार झाला होता, तो या सरकारला सहजपणे तारून नेईल अशी त्यांच्या नेत्यांची कल्पना होती. कदाचित या कारणाने त्यांनी आवश्यक तेवढा दमदार प्रचार केला नसावा. एनडीए सरकारचे धोरण साधारणपणे उजवीकडे झुकणारे असल्यामुळे ते देशातल्या गरीब जनतेला कदाचित तितकेसे पसंत पडले नसावे, स्थानिक प्रश्नांमुळे प्रादेशिक मित्रपक्षांची कामगिरी अपेक्षेइतकी चांगली झाली नसावी किंवा त्यांनी भाजपचा प्रचार मनापासून केला नसावा. या सगळ्या कारणांमुळे २००४ च्या निवडणुकीचे परिणाम मात्र धक्कादायक निघाले. भाजपच्या खासदारांची संख्या १८२ वरून १३८ वर खाली आली आणि काँग्रेसची ११४ वरून १४१ पर्यंत वाढली. दोन्हीही आघाड्या बहुमतापर्यंत पोचल्या नव्हत्याच आणि पुन्हा एकदा अस्थिरता आली होती. पण डाव्या पक्षांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावरून आपले वजन यूपीए (युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स)च्या पारड्यात टाकले. राजकारणात फारसे सक्रिय नसलेल्या अर्थशास्त्री मनमोहनसिंग यांना पंतप्रधानपदी निवडण्यात आले. त्यांनी देशाचे आर्थिक धोरण मागून पुढे चालू ठेवले आणि काही प्रमाणात प्रगती घडवून आणली.

त्यानंतर २००९ साली झालेल्या निवडणुकीमध्येही अटीतटीच्या लढती झाल्या. तरीही कदाचित त्या सरकारविरुद्ध लोकांना जास्त रोष वाटत नसल्यामुळे त्यांनी जास्त उत्साह दाखवला नाही. या निवडणुकीत अँटीइन्कम्बन्सी फॅक्टर दिसला नाही. काँग्रेस पार्टी आपली संख्या १४१ वरून २०६ पर्यंत वाढवण्यात यशस्वी झाली. भाजपचे संख्याबल कमी होऊन ११६ वर आले. या वेळीही कोणताच पक्ष बहुमतात आला नाही, त्रिशंकू (हंग) पार्लमेंटच निवडून आले होते, पण यूपीए (युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स) च्या जागा वाढल्यामुळे त्यांचे इतर फुटकळ पक्षांवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी झाले. हे सरकार पाच वर्षे टिकले पण या काळात ते लोकांना अधिकाधिक अप्रिय होत गेले.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

2 प्रतिसाद

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: